Monday, May 4, 2015

करिअर कट्टा

ट्रायबल फेडरेशनमध्ये
व्यवस्थापक भरती

केंद्र सरकारच्या नवी दिल्ली येथिल ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटींग डेव्हलपमेंट फेरडेशन ऑफ इंडिया लि. या संस्थेत सहायक व्यवस्थापक पद भरती करण्यात येणार आहे. ही जागा शारिरिक विकलांग व्यक्तीसाठी राखिव आहे. देशातील कोणत्याही विद्याशाखेचे 21 ते 35 वयोगटातील पदवीधर यासाठी पात्र आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जून आहे. अधिक माहितीसाठी www.tribesindia.com या संकेतस्थळास भेट द्यावी.
------------
मिलीटरी स्कूलमध्ये
समुपदेशक भरती

अजमेर (राजस्थान) येथिल राष्ट्रीय मिलीटरी स्कूलमध्ये कंत्राटी पद्धतीने समुपदेशक भरती होणार आहे. मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी धारण केलेले व किमान एक वर्ष समुपदेशानाचा अनुभव असलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत. निवड होणाऱ्या उमेदवारास दरमहा 25 हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जून आहे. अधिक माहिती व अर्जासाठी www.rashtriyamilitaryschoolajmer.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
----------------- 

करिअर कट्टा


जी.बी.पंत इन्स्टिट्यूटमध्ये
रिसर्च फेलो भरती

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या उत्तराखंडमधील जी.बी.पंत इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन एन्व्हिरॉन्मेंट ऍण्ड डेव्हलपमेंट या संस्थेमार्फत जुनियर रिसर्च प्रोजेक्‍ट फेलो पदाच्या दोन व फिल्ड असिस्टंट पदाची एक जागा भरण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 मे ही आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.gbpihed.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

---------------
हिंदुस्तान कॉपर मध्ये
76 पदांची भरती

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (एचसीएल) या कंपनीमध्ये विविध शाखांमधील 76 रिक्त पदांची भरती प्रक्रीया जाहिर झाली आहे. अननुभवी उमेदवारांची व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी म्हणून भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 19 मे आहे. अधिक माहितीसाठी www.hindustancopper.com या संकेतस्थळास भेट द्यावी.
----------------- 

Saturday, May 2, 2015

अभिग्ना, मोहना यांना नेदरलॅन्डची शिष्यवृत्ती

पुणे ः बारामती येथिल कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या कु. अभिग्ना रेड्डी व मोहना रेड्डी या दोन विद्यार्थीनींना नेदरलॅन्ड सरकारची "हॉलंड स्कॉलरशिप' जाहीर झाली आहे. यंदा ही शिष्यवृत्ती जाहिर झालेल्या जगातील पाच विद्यार्थ्यांमध्ये या दोघींचा समावेश आहे. दर वर्षी पाच हजार युरो (सुमारे साडे तीन लाख रुपये) असे या शिष्यवृत्तीचे स्वरुप आहे.

नेदरलॅन्डच्या डच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, कल्चर ऍण्ड सायन्स तर्फे त्या देशातील विद्यापीठात अध्ययन करण्यासाठी निवडक उत्कृष्ट विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. अभिग्ना व मोहना यांनी आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेच्या व अथक परिश्रमाच्या जोरावर ही शिष्यवृत्ती पटकावली आहे. यासाठी प्रा. प्रसाद कलेढोणकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

या दोन्ही विद्यार्थीनी कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व चौथ्या वर्षी नेदरलॅन्ड स्थित व्हॅन हॉल लारेन्स्टाईन विद्यापीठात पुढील शिक्षण पूर्ण करतील, अशी माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश नलावडे यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्‍वस्त सौ. सुनंदा पवार, विष्णूपंत हिंगणे यांनी या यशाबद्दल विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.
---------------- 

कात्रज डेअरीत महाराष्ट्र दिन साजरा

पुणे ः पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) मुख्यालयात एक मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण झाले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संघामार्फत डॉ. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पीटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच शिवा नागराणी यांचे व्यसनमुक्ती या विषयावर यावेळी व्याख्यान झाले. संचालक रामभाऊ टुले, कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षिरसागर, कामगार संघटना इंटकचे महासचिव चंद्रकांत कदम व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
------------

शेळीपालनातून साधा आर्थिक प्रगती - Agrowon Event

पुण्यात ऍग्रोवनतर्फे 12 मेपासून कार्यशाळेचे आयोजन

पुणे (प्रतिनिधी) ः शेतकऱ्यांना आधुनिक शेळीपालनाच्या माध्यमातून पूरक व्यवसाय उभारता यावा, या उद्देशाने ऍग्रोवन तर्फे आयोजित केलेल्या "आधुनिक शेळीपालनातून आर्थिक विकास' या कार्यशाळेस राज्यभरातून भरघोस प्रतिसाद लाभत आहे. अशी कार्यशाळा पुन्हा आयोजित करावी, अशी मागणी अनेक इच्छूकांकडून होऊ लागल्याने आता पुन्हा 12 आणि 13 मे 2015 रोजी पुण्यातील एस.एम.जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ऍग्रोवनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये शेळ्यांमधील विविध जाती आणि निवड, शेळी व्यवस्थापन व गोठ्याची उभारणी, शेळ्यांमधील आजार व उपचार, शेळीपालनासाठी शासकीय योजना, बॅंकेच्या योजना, प्रोजेक्‍ट रिपोर्ट, तसेच शेळ्यांच्या गोठ्याला प्रक्षेत्र दौरा आयोजित केला आहे. कार्यशाळा सशुल्क असून प्रवेश मर्यादीत आहेत. नावनोंदणीसाठी प्रथम येणारास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

...असे आहेत विषय
- शेळ्यांमधील विविध जाती आणि निवड
- शेळ्यांच्या गोठ्याची उभारणी, व्यवस्थापन व अर्थशास्त्र
- शेळीपालनाच्या शासकीय योजना
- शेळ्यांमधील आजार व उपचार
- बॅंकेच्या योजना
- प्रक्षेत्र दौरा

कार्यशाळेचे नियोजन
कालावधी ः 12 आणि 13 मे 2015
वेळ ः सकाळी 10 ते सायंकाळी 6
शुल्क ः प्रतिव्यक्ती 4,000 रुपये (चहा, नाश्‍ता, जेवण आणि प्रशिक्षण साहित्यासह)
प्रवेश ः फक्त 50 व्यक्तींसाठी
स्थळ ः एस.एम.जोशी सभागृह, पत्रकार भवन शेजारी, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे 30
संपर्क (वेळ 10 ते 6) ः 020 24405950, 66035950, 9423391969
------------ 

विदर्भात सर्वाधिक उष्मा

कमाल तापमान 45 अंशांवर; वर्धा, चंद्रपूर उच्चांकी

पुणे (प्रतिनिधी) ः कमाल तापमानाच्या उचावत्या पाऱ्याने विदर्भात अनेक ठिकाणी 44 ते 45 अंशांचा टप्पा गाठला आहे. यामुळे सध्या विदर्भ देशात सर्वाधिक उष्ण भाग आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासातही चंद्रपूरमध्ये देशातील सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पाठोपाठ वर्ध्यात पारा 44.5 अंशावर झेपावलेला होता. मराठवाड्यातही सर्वत्र कमाल तापमान 41 ते 43 अंशांदरम्यान आहे. पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्‍यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, रविवारी (ता.3) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. सोमवारी (ता.4) फक्त विदर्भात तर मंगळवारी (ता.5) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी (ता.6) फक्त विदर्भात पावसाची चिन्हे असून उर्वरीत महाराष्ट्रात सर्वत्र हवामान कोरडे राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

जम्मू काश्‍मिर व लगतच्या भागात पश्‍चिमी चक्रावात कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरुपात सक्रीय आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात चक्राकार वारे सक्रीय असून त्यांच्यापासून छत्तीसगड ते तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. पूर्व उत्तरप्रदेशपासून आसामपर्यंतच्या भागातही एक कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. मध्य प्रदेशच्या उत्तर भागात आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रातही चक्राकार वारे सक्रीय आहेत.

शनिवारी (ता.2) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 34.7, अलिबाग 34.5, रत्नागिरी 33.6, पणजी 34.5, डहाणू 34.8, पुणे 37.4, जळगाव 43, कोल्हापूर 37.5, महाबळेश्‍वर 30.8, मालेगाव 43.8, नाशिक 38.4, सांगली 39, सातारा 38.9, सोलापूर 42.6, उस्मानाबाद 41.2, औरंगाबाद 41.3, परभणी 42.6, अकोला 42.7, अमरावती 42.8, बुलडाणा 40.3, ब्रम्हपुरी 43.7, चंद्रपूर 45, नागपूर 44.3, वाशिम 41.2, वर्धा 44.5, यवतमाळ 42.5
--------- 

करिअर कट्टा - IARI research fellow recruitment

आयएआरआय मध्ये
संशोधन फेलो भरती

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयएआरआय) नवी दिल्ली येथील विविध संशोधन विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने एक ते तीन वर्षे कालावधीसाठी जुनियर रिसर्च फेलो व सिनियर रिसर्च फेलो पदांची मुलाखतींद्वारे थेट भरती करण्यात येणार आहे. कृषी व संलग्न विद्याशाखांचे पदव्युत्तर प्रदवीधारक 35 ते 40 वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र आहेत. पात्र उमेदवारांच्या पाच ते 11 मे दरम्यान संस्थेच्या संबंधित विभागांमध्ये मुलाखती होणार आहेत. अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.iari.res.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
-------------