Thursday, July 3, 2014

विदर्भात उष्णतेची लाट; मुंबईत अतिवृष्टी !

कोकण, मध्य महाराष्ट्रात मॉन्सून सक्रीय

*चौकट
- मॉन्सून पुढे सरकला
नैऋत्य मोसमी पावसाच्या प्रवासात गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात उत्तर भारतात भरिव तर उत्तर महाराष्ट्रात अल्पशी प्रगती झाली. उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, दिल्लीसह हरियाणा, पंजाबचा उर्वरीत भाग आणि उत्तर राजस्थानचा काही भाग मॉन्सूनने व्यापला आहे. महाराष्ट्रात वाशिमपर्यंतचा भाग मॉन्सूनने व्यापलेला आहे. उत्तर प्रदेशच्या उर्वरीत भागात आणि राजस्थान व मध्य प्रदेशच्या काही भागात मॉन्सून पुढील तीन दिवसात दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

पुणे (प्रतिनिधी) ः गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण व मध्य महाराष्ट्रात मॉन्सून जोरदारपणे सक्रीय झाला. दिवसभरात मुंबईत पावसाच्या या हंगामातील 207 मिलीमिटरच्या उच्चांकासह लगतच्या भागातही अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली. याच वेळी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. हवामान खात्याने शनिवारी सकाळपर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

शनिवारी सकाळपर्यंत (ता.5) कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात उंचावलेले कमाल तापमान या कालावधीत कमी होण्याची शक्‍यता नाही. राज्यात सर्वत्र आकाश ढगाळलेले राहणार असून अनेक ठिकाणी अधून मधून पावसाच्या हलक्‍या सरी कोसळण्याचीही शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अरबी समुद्राच्या उत्तर भागात मॉन्सून सर्वाधिक जोरदारपणे सक्रीय आहे.

गुरुवारी सकाळपर्यतच्या चोविस तासात विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट आली आहे. ब्रम्हपुरी येथे राज्यात सर्वाधिक 41.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भाच्या उर्वरीत भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनिय वाढ झाली. राज्यात उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

- अशी आहे हवामानस्थिती
दरम्यान, उत्तर कोकणापासून ते कर्नाटकच्या समुद्रकिनारी भागापर्यंत समुद्रकिनाऱ्याला समांतर दिशेत भुगागावर समुद्रसपाटीच्या पातळीवर कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. हा पट्टा कोकण किनारपट्टीसह राज्यातील पावसाच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरण्याची शक्‍यता आहे. मात्र त्याचा निश्‍चित परिणाम शनिवारपर्यंत स्पष्ट होईल, अशी माहीती हवामान खात्याच्या सुत्रांनी दिली. याशिवाय पश्‍चिम बंगालच्या किनारी भागालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. याच वेळी पंजाबपासून हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड ते पश्‍चिम बंगालमधील कमी दाबाच्या क्षेत्राच्या मध्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. या पट्ट्याच्या प्रभावामुळे उत्तर व मध्य भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

गुरुवारी (ता.3) सकाळपर्यंतच्या 24 तासात पडलेला पाऊस मिलिमिटरमध्ये ः
कोकण - गोवा ः मुंबई 210, कुलाबा 150, पालघर 130, ठाणे 90, अलिबाग 70, माणगाव, भिवंडी, तलासरी व उरण प्रत्येकी 50, हर्णे, पनवेल, डहाणू, रोहा, कल्याण, मुरुड प्रत्येकी 40, पेण, तळा, भिरा, म्हसाळा, जव्हार, लांजा प्रत्येकी 30, अंबरनाथ, उल्हासनगर, पोलादपूर, दाभोलीम, श्रीवर्धन, महाड, मडगाव, रत्नागिरी, दापोली, वाडा, वेंगुर्ला व राजापूर प्रत्येकी 20, मंडणगड, शहापूर, विक्रमगड, गुहागर, सुधागड, पाली, कर्जत, मार्मागोवा, माथेरान, चिपळून, संगमेश्‍वर, देवरुख व खेड प्रत्येकी 10
घाटमाथा ः धारावी 110, भिरा, भिवपुरी, दावडी, डुंगरवाडी व खोपोली प्रत्येकी 30, लोणावळा, अम्बोणे, कोयना, तामिनी प्रत्येकी 20, शिरगाव, शिरोटा, वळवण, कोयना, खंद प्रत्येकी 10
मध्य महाराष्ट्र ः वडगाव मावळ 30, मालेगाव, पौड, चाळीसगाव, महाबळेश्‍वर व पारोळा प्रत्येकी 20, पेठ, जुन्नर, श्रीरामपूर, गारगोटी, भुदरगड व गगनबावडा प्रत्येकी 10
मराठवाडा ः जालना 30, गंगापूर व कन्नड प्रत्येकी 10
विदर्भ ः पातुर 30, चिखली 20, मालेगाव 10

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 27, अलिबाग 31.4, रत्नागिरी 32.2, पणजी 32.3, डहाणू 33.8, भिरा 29.5, पुणे 31.1, नगर 33.6, जळगाव 39.7, कोल्हापूर 31.4, महाबळेश्‍वर 21.3, मालेगाव 35.2, नाशिक 31.6, सांगली 33, सातारा 32.1, सोलापूर 37.9, उस्मानाबाद 36.2, औरंगाबाद 35.4, परभणी 39, नांदेड 40, अकोला 39.1, अमरावती 38.8, बुलडाणा 37.2, ब्रम्हपुरी 41.5, चंद्रपूर 39.2, गोंदिया 40.1, नागपूर 40.5, वाशिम 38, वर्धा 40.5, यवतमाळ 38
----------------------
3 july

Friday, June 27, 2014

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमाल तापमानात वाढ

पुणे (प्रतिनिधी) ः रविवारी सकाळपर्यंत (ता.29) विदर्भात काही ठिकाणी व कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीहून उंचावलेले राहण्याची शक्‍यता आहे. मॉन्सूनच्या वाटचालीत येत्या दोन दिवसात प्रगती होण्याची चिन्हे नाहीत.

दरम्यान, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भापाठोपाठ मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही कमाल तापमानात सरासरीहून मोठी वाढ झाली. यामुळे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवास आली. मराठवाड्यातही पारा 39 अंशावर पोचला. राज्यात वर्धा येथे सर्वाधिक 40 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात मालेगाव येथे कमाल तापमानाचा पारा 38.7 अंश सेल्सिअसपर्यंत उंचावला. राज्यातील उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

दिवसभरात विदर्भात कुही येथे सर्वाधिक 60 मिलीमिटर, सावनेर येथे 40 मिलीमिटर, शिंदेवाही, मुल व चंद्रपूर येथे प्रत्येकी 30 मिलीमिटर, भंडारा व वरोरा येथे प्रत्येकी 20 मिलीमिटर, गोंडपिंपरी, मौदा, पोमभूर्णा व गडचिरोली येथे प्रत्येकी 10 मिलीमिटर, मध्य महाराष्ट्रात मोहोळ येथे 10 मिलीमिटर तर कोकण गोव्यात मडगाव येथे 10 मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 34.7, अलिबाग 34.5, रत्नागिरी 32, पणजी 33, डहाणू 33.7, पुणे 33.7, नगर 37.1, कोल्हापूर 32.1, महाबळेश्‍वर 23.9, मालेगाव 38.7, नाशिक 33.6, सांगली 34, सातारा 33.1, सोलापूर 38.3, उस्मानाबाद 37.9, परभणी 39, नांदेड 39, अकोला 38.6, बुलडाणा 36.2, बुलडाणा 36.2, ब्रम्हपुरी 31.5, गोंदिया 34.3, नागपूर 38.9, वाशिम 37, वर्धा 40, यवतमाळ 38
------------------
27 june 

राज्य डाळिंब संघाच्या उपाध्यक्षपदी महादेव चाकोते

पुणे (प्रतिनिधी) ः अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या उपाध्यक्षपदी महादेव बाबूराव चाकोते यांची निवड करण्यात आली आहे. संघाचे उपाध्यक्ष सुरेश बेले (सांगोला) यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झाले होते. संघाच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष रविंद्र नवलाखा व भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे उपस्थित होते.
------------------ 

पाणलोटांची कामे ग्रामविकास, जलसंधारणकडे देण्याचा डाव

कृषी सेवा महासंघाचा आरोप; विरोधासाठी सर्व संघटना एकजूट

पुणे (प्रतिनिधी) ः मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची कामे कृषी विभागाकडून ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठी संबंधीत विभागांमार्फत छुप्या पद्धतीने प्रयत्न सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कृषि सेवा महासंघाने केला आहे. महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या हस्तांतरणास ठाम विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. छुप्या कार्यपद्धती विरुद्ध कृषी सहायक, पर्यवेक्षक, कृषी अधिकारी वर्ग दोन व एकचे राजपत्रित अधिकारी या कृषी अधिकारी-कर्मचार्यांच्या पाचही प्रमुख संघटनांनी एकजूटीने प्रयत्न करण्याचे निश्‍चित केले आहे.

महाराष्ट्र राज्य कृषि सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, महाराष्ट्र कृषि सेवा वर्ग 2 अधिकारी कल्याणकारी संघटना, महाराष्ट्र राज्य कृषि अधिकारी संघटना, महाराष्ट्र कृषि पर्यवेक्षक संघटना व महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना या पाच संघटनांच्या महाराष्ट्र राज्य कृषि सेवा महासंघाची बैठक औरंगाबादचे विभागिय कृषी सहसंचालक जनार्दन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतिच पुण्यात पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याचे महासंघाचे सरचिटणीस प्रमोद वानखेडकर यांनी सांगितले.

साखळी सिमेंट बंधारे, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांसह कृषी विभागातील मृदसंधारण व पाणलोट व्यवस्थापनाची कामे कृषी विभागाकडून काढून घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. कृषी विभाग गेली अनेक वर्षे ही कामे ग्रामविकास वा जलसंधारण विभागांपेक्षा चांगल्या प्रकारे करत आहे. यामुळे ही कामे कृषीकडून काढून घेण्यास विरोध करण्यात आला. याबरोबरच कृषी विभाग जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यासही विरोध करण्यात आला. कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांना 16 जुलै 2004 रोजी शासनाने वेतनश्रेणी व दर्जा वाढीबाबत घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी पाठपुरावा करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे श्री. वानखेडकर यांनी कळवले आहे.

*चौकट
- कृषी सेवकांच्या वेतनवाढीसाठी
""वेतनश्रेणीच्या बाबतीत कृषी सहायकांवर मोठा अन्याय होत आहे. 85 टक्के कृषी सहायक त्याच पदावरुन सेवानिवृत्त होता. इतर सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळत असताना फक्त कृषी सहायकांनाच पहिली तिन वर्षे फक्त सहा हजार रुपये वेतन मिळते. महासंघाच्या प्रतिनिधींनी वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन याबाबत दाद मागितली आहे. त्यांनी यात लक्ष घालून योग्य कार्यवाही करण्याचे मान्य केले आहे.''
जनार्दन जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषि सेवा महासंघ.
-------------------------

Thursday, June 26, 2014

अनुदानावरील निविष्ठा वितरण संकटात

सिस्टिम सुधारणाचे आदेश धाब्यावर; सहायकांचा निविष्ठा स्विकारण्यास नकार

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी आयुक्तांनी शासकीय योजनांतील कृषी निविष्ठांचा पुरवठादारांकडून थेट लाभार्थी शेतकऱ्यांना पुरवठा करण्याच्या सुधारीत कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देवून नऊ महिने उलटल्यानंतरही बहुतेक तालुक्‍यांत जैसे थे स्थिती असल्याचे चित्र आहे. कृषी सहायकांनी पूर्वीप्रमाणे निविष्ठा पुरवठा करण्यास नकार देत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यामुळे खरिपातील शासकीय योजनांचे निविष्ठा वितरण संकटात सापडले आहे.

गेल्या हंगामापर्यंत जिल्हा स्तरावरुन पुरवठादारांना औजारे, यंत्रे, खते, बियाणे आदी निविष्ठा पुरवठ्याचे आदेश देत. त्यांच्याकडून थेट कृषी सहायक, मंडळ अधिकार्यांकडे हा साठा सोपविला जाई. मात्र स्थानिक पातळीवर कृषी विभागाकडे गोदामेच नसल्याने हा साठा ठेवायचा कुठे हा प्रश्‍न होता. मग कुठे तरी ओळखीच्या शेतकऱ्यांकडे खते उतरली जात. शेतकरी हिश्‍श्‍याची रक्कम गोळा करुन पुरवठादारांना देण्याची जबाबदारीही स्थानिक कृषी सहायकांवर होती. स्थानिक राजकारण, काही अधिकारी कर्मचार्यांनी केलेले गैरप्रकार आणि निविष्ठा पुरवठ्यासाठी गोदामे आदी सुविधांचा अभाव यामुळे ही पद्धत वादात सापडली होती. खत साठा, शेतकरी हिश्‍श्‍याची अल्पकालिन अफरातफर आदी अनेक गैरप्रकार सुरु होते. शेवटी यावर कृषी सहायक संघटनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कृषी विभागाने ही कार्यपद्धती सुधरविण्याचा निर्णय घेतला.

कृषी आयुक्तांमार्फत गेल्या 16 सप्टेंबरला निविष्ठा वितरणाच्या सुधारीत पद्धतीचे आदेश (परिपत्रकान्वये) देण्यात आले. यामध्ये निविष्ठा पुरवठ्याची जबाबदारी संबंधीत पुरवठादाराकडे देण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या हिश्‍श्‍याची रक्कम बॅंकेत जमा करुन थेट पुरवठादाराकडून निविष्ठा घेण्याची व त्याबाबत तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संनियंत्रण करण्याची सुधारीत कार्यपद्धती आखण्यात आली. यामुळे कृषी सहायकांचे निविष्ठा स्विकारुन त्याचे वाटप करण्याचे अथवा त्यापोटीचे लाभार्थी हिस्से गोळा करण्याची जबाबदारी राहीलेली नाही. मात्र तालुका स्तरावरुन सुधारीत कार्यपद्धतीची अंमलबजावणी होत नसून सहायकांनाच निविष्ठा वाटण्याचा आग्रह सुरु असल्याचे प्रकार सुरु आहेत. अनेक कृषी सहायकांनी या निविष्ठा स्विकारण्यास नकार दिला असून कृषी सहायक संघटनेने आयुक्तांच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

*चौकट
सुधारीत निविष्ठा वितरण पद्धत
- कृषी सहायक, मंडळ कार्यालय लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारेल.
- तालुका कृषी अधिकारी लाभार्थी निवड व पुरवठादाराकडे निविष्ठांची मागणी नोंदवतील.
- शेतकऱ्यांना एक महिन्यासाठी 2 परमिट दिली जातील. एक स्वतःसाठी (हिरवे) दुसरे पुरवठादाराला देण्यासाठी (पिवळे).
- परमिटवर लाभार्थीला द्यावयाच्या निविष्ठा, शेतकरी हिस्सा आदी सर्व बाबींची नोंद.
- शेतकरी हिस्सा बॅंकेत भरुन पुरवठादाराकडून निविष्ठा ताब्यात घेण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची.
- शेतकऱ्यांनी निविष्ठांची पोच दिल्यानंतर कृषी विभागाकडून पुरवठादारांना अनुदानाची रक्कम अदा.

*कोट
""निविष्ठांची जुनी वितरण पद्धत सहायकांसाठी जाचक आहे. कृषी आयुक्तांनी सुधारणांचे परिपत्रक काढले. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. कृषी सहायक निविष्ठा उतरुन घेण्यास, पैसे गोळा करण्यास तयार नाहीत. ही कामे सहायकांची नाहीत. या प्रश्‍नी लवकर तोडगा काढला नाही तर संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.''
- संदीप केवटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना
--------------------- 

रब्बीच्या 484 गावांत टंचाईसदृश स्थिती जाहीर

शासनामार्फत सवलती लागू

पुणे (प्रतिनिधी) ः नुकत्याच संपलेल्या रब्बी हंगामात 50 पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या 484 गावांमध्ये राज्य शासनामार्फत टंचाईसदृश स्थिती जाहीर करण्यात आली आहे. नगरमधील सर्वाधिक 355, सोलापुरातील 88, नागपूरमधील 14, चंद्रपुरातील 26, तर भंडारा जिल्ह्यातील एका गावाचा यात समावेश आहे. या सर्व गावांना वीज, जमीन महसूल, सहकारी कर्ज, रोहयोची कामे आदी बाबतीत विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. संबंधित शासकीय विभागांमार्फत त्याची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

राज्यातील तीन हजार 866 गावांची पैसेवारी आतापर्यंत जाहीर झालेली आहे. यापैकी तीन हजार 382 गावांची पैसेवारी 50 पैशांहून अधिक आहे, तर अमरावती विभागाची पैसेवारी निरंक असल्याचे शासनाने म्हटले आहे. टंचाईसदृश स्थिती जाहीर झालेल्या गावातील नागरिकांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे रूपांतर, परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी सवलती देण्यात येणार आहेत. याबाबत महसूल व वन विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.
-----------
26 june

विदर्भात उष्णतेची लाट

मॉन्सूनची प्रगती थांबलेलीच; मध्य महाराष्ट्र, मराठवाडा कोरडा

पुणे (प्रतिनिधी) ः मॉन्सूनची महाराष्ट्रातील प्रगती थांबलेली असतानाच विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. कोकणातही पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. याच वेळी नागपूरसह काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार जावून उष्णतेची लाट आली.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र आकाश अंशतः ढगाळलेले राहण्याचा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा व कोकण, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. किमान येत्या रविवारपर्यंत मॉन्सूनच्या राज्यातील वाटचालीत प्रगती होण्याचा किंवा पावसाचा जोर वाढण्याची फारशी शक्‍यता नसल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात अरमोरी येथे 40 मिलीमिटर, ब्रम्हपुरीत 30 मिलीमिटर, पवनी व लाखांदूर येथे 20 मिलीमिटर तर साकोली, गडचिरोली, धानोरा व देसाईगंज येथे प्रत्येकी 10 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. नागपूर येथे राज्यातील सर्वाधिक 40.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. पाठोपाठ चंद्रपूरमध्ये 39.6, ब्रम्हपुरी येथे 39.3, वर्ध्यात 39.2 तर नांदेड येथे 39 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, बंगालच्या उपसागराकडून किनारी भागात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने शनिवारी सकाळपर्यंत इशान्येकडील राज्यांसह संपूर्ण पूर्व किनारपट्टीवर सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज व तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशातील मॉन्सूनची वाटचाल 15 जून पासून थांबलेली असून ठिकठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, पश्‍चिम बंगाल, ओदीशा या राज्यांमध्ये पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्‍यता आहे.
--------------(समाप्त)---------------
26 june