Tuesday, April 14, 2015

पूर्वमोसमी मुसळधार - 14 april

गारपीटीचा इशारा कायम; अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात पूर्वमोसमी पावसाची मुसळधार सर आणि गारपीटीचा तडाखा कायम आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, कळवण, सटाणा आणि वर्धा जिल्ह्यात गारपीट झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या तिन्ही विभागांतील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. पुणे, नाशिक, वर्धा, औरंगाबाद, नागपूरसह अनेक जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी (ता.16) सकाळपर्यंत विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र आकाश ढगाळलेले राहण्याची शक्‍यता आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जेनेसह हलक्‍या स्वरुपाचा वादळी पाऊस पडला. कोकणात हवामान कोरडे होते. सोलापूरमध्ये राज्यात सर्वात जास्त 34 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या संपूर्ण भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झालेली आहे.

देशपातळीवरील हवामान स्थितीमध्ये मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकवरील कमी दाबाचा पट्टा, दक्षिण अंदमानातील कमी दाबाचा पट्टा, गुजरात, मध्य प्रदेश, आसाम व मेघालयावरील चक्राकार वारे आणि उत्तर प्रदेशवरील कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बुधवारी (ता.15) हिमालयीन भागात नवीन पश्‍चिमी चक्रावात सक्रीय होण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता.14) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यात ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः
मध्य महाराष्ट्र ः कसबेवनी 9, त्र्यंबकेश्‍वर 6, नगर 10, शेवडी 11, तळेगाव 25, अकोले 43, साकिरवाडी 16, राजूर 17, कोतूळ 56, कसबे बावडा 7

मराठवाडा ः औरंगाबाद व फुलंब्री प्रत्येकी 20, भोकरदन 18, केदारखेडा 38, सातोना 9, रांजणी 13, तळणी 10, घाटंदूर 42, आंबेजोगाई, माजलगाव व परभणी प्रत्येकी 10

विदर्भ ः मोप 18, रिठाड 11, यवतमाळ 2, दिग्रस 11, महागाव 9, वणी 8, घाटंजी 8, नागपूर 7.4, कामठी 17, नगरधन 15, नवेगाव 10, मौदा 18.2, चाचेर 30.2, कोंढाळी 19, सावरगाव 21, उमरेड 18, नंद 50.3, कुही 20.1, भंडारा 11, मोहाडी 19, कन्हळगाव 23, आढळगाव 31, पवनी 12, मोहली 18
--------------- 

Monday, April 13, 2015

तयारी खरिपाची - भाग 3

खरिपात पेरणीसाठी
17 लाख टन बियाणे

गरजेएवढ्या उपलब्धतेचा कृषी विभागाचा दावा

*कोट
""राज्यात यंदा मागणी व गरजेपेक्षा अधिक प्रमाणात बियाणे उपलब्ध होणार आहे. यामुळे बियाण्याची टंचाई जाणवण्याची शक्‍यता नाही.''
- विकास देशमुख, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य

पुणे (प्रतिनिधी) ः येत्या खरिप हंगामासाठी विविध पिकांच्या बियाणे बदलाच्या दरानुसार राज्याला 16 लाख 64 हजार 114 क्विंटल नवीन बियाण्याची आवश्‍यता आहे. प्रत्यक्षात महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व खासगी कंपन्यांमार्फत 17 लाख 10 हजार 920 क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात नवीन बियाणे वापरलेल्या सोयाबीन उत्पादकांनी यंदा घरचेच बियाणे पेरावे यासाठी कृषी विभागामार्फत मोहीम राबविण्यात येणार आहे.

खरिपासाठी आवश्‍यक बियाण्यापैकी सर्वाधिक 10 लाख 38 हजार 328 क्विंटल बियाणे खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांमार्फत पुरविण्यात येणार आहे. महाबीजमार्फत पाच लाख 54 हजार 552 तर राष्ट्रीय बिज निगममार्फत एक लाख 18 हजार 50 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाबिजमार्फत 20 हजार क्विंटल आणि बीज निगममार्फत 50 हजार क्विंटल जादा तर खासगी कंपन्यांमार्फत दोन लाख 30 हजार क्विंटल कमी बियाणे बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे.

कृषी आयुक्तालयामार्फत राज्यातील सर्व बियाणे उत्पादकांची बैठक आयोजित करुन सर्वांकडून हंगामासाठीच्या बियाणे उपलब्धतेचे व पुरवठ्याचे नियोजन घेण्यात आले आहे. या नियोजनानुसार बियाणे उपलब्ध करणे कंपन्यांना बंधनकारक आहे. यानुसार उत्पादकांमार्फत खरिपासाठीचा बियाणे पुरवठा नुकताच सुरु झाला आहे. येत्या महिन्यात बहुतांश पुरवठा पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

गेल्या खरिपात राज्यासाठी 17 लाख 14 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आले होते. मात्र पावसाने दगा दिल्याने प्रत्यक्षात 11 लाख 94 हजार क्विंटल बियाण्याचा वापर झाला. यंदा सर्व पिकांचे बियाणे मागणीच्या व बियाणे बदलाच्या दराहून अधिक प्रमाणात उपलब्ध असल्याने बियाण्याची कमतरता जाणवणार नाही, अशी माहीती कृषी आयुक्तालयामार्फत देण्यात आली.

- सोयाबीन बियाणे स्थिती
राज्यात गेल्या वर्षी 38 लाख हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. त्यावर बियाणे बदलासाठी सहा लाख 84 हजार 928 क्विंटल नवीन बियाण्याचा वापर करण्यात आला. यंदा सोयाबीनचे 10 लाख 36 हजार क्विंटल म्हणजेच गेल्या खरीपाच्या वापराच्या सुमारे साडेतीन लाख क्विंटल जादा बियाणे उपलब्ध होणार आहे. याशिवाय गेल्या तीन वर्षात नवीन बियाण्याचा वापर केलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरावे यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

*चौकट
- बियाण उपलब्धता (खरीप 2015)
पिक --- अपेक्षित क्षेत्र (लाख हेक्‍टर) --- बियाणे गरज (क्विंटल) --- उपलब्धता (क्विंटल)
संकरीत ज्वारी --- 9 --- 67,500 --- 68,325
सुधारीत ज्वारी --- 1.37 --- 2,603 --- 2,650
संकरीत बाजरी --- 9 --- 22,500 --- 23,240
सुधारीत बाजरी --- 2.45 --- 7,840 --- 7,930
भात --- 14.92 --- 2,05,896 --- 2,11,513
मका --- 7.87 --- 1,18,050 --- 1,29,100
तुर --- 11.83 --- 62,108 --- 63,338
मुग --- 5.34 --- 28,035 --- 26,071
उडिद --- 4.47 --- 33,525 --- 34,882
भूईमुग --- 2.98 --- 17,880 --- 18,625
तीळ --- 0.70 --- 928 --- 1,114
सोयाबीन --- 39 --- 10,23,750 --- 10,36,515
बी.टी. कापूस --- 40 --- 72,000 --- 86,017
सुधारीत कापूस --- 0.50 --- 1,500 --- 1,600
एकूण --- 149.43 --- 16,64,114 --- 17,10,920

(बियाण्याची गरज संबंधीत पिकातील बियाणे बदलाच्या दरानुसार)
-------- 

तयारी खरिपाची - भाग 2

खरिपाला मिळणार
50 लाख टन खत

41.75 लाख टन केंद्राकडून मंजूर; 8.25 लाख टन साठा शिल्लक

पुणे (प्रतिनिधी) ः केंद्राने येत्या खरिपासाठी राज्याला 41.75 लाख टन खते मंजूर केली आहे. यामुळे गेल्या हंगामाच्या शिल्लक असलेल्या 8.25 लाख टन खतांसह खरिपासाठी तब्बल 50 लाख टन खते उपलब्ध होणार आहेत. गेल्या खरीपाच्या वापरापेक्षा ही खते तब्बल 15 लाख टनांनी अधिक आहे. केंद्राकडून वेळेत मुबलक खतांचा पुरवठा सुरु झाल्याने यंदा संरक्षित खत साठा करावा लागणार नाही, अशी स्थिती आहे.

खरिपासाठी 17 लाख टन युरीया, पाच लाख टन डीएपी, 2.75 लाख टन एमओपी, 11 लाख टन संयुक्त खते व सहा लाख टन एसएसपी खते मंजूर झाली आहेत. गेल्या खरिपासाठी 39 लाख टन खते मंजूर करण्यात आली होती. प्रत्यक्षात 41.78 लाख टन खते उपलब्ध करण्यात आली. मात्र दुष्काळाच्या फटक्‍यामुळे प्रत्यक्षात 33.56 टन खतांचा खप झाला. शिल्लक खतांसह 34.45 लाख टन खते वापरण्यात आली. या तुलनेत यंदा 21.17 टक्के खते जास्त मंजूर असली तरी यंदा पाऊस चांगला राहील्यास खत वापरात वाढ होण्याचा अंदाज आहे.

मंजूर खतांपैकी निम्मी खते जून अखेरपर्यंत मिळणार आहेत. पावसाला सुरवात होण्यापुर्वी येत्या एक जूनपर्यंत राज्यात सुमारे 11 लाख टन खत पुरवठ्याचे नियोजन आहे. हंगामाआधीच्या शिल्लक खत साठ्यासह सुमारे 20 लाख टन खते मॉन्सूनआधी राज्यात पोच असतील. पाठोपाठ जून अखेरपर्यंत हा साठी 28 लाख टनाहून अधिक होईल. यामुळे यंदाही खत टंचाई जाणवणार नाही, अशी माहीती आयुक्तालयामार्फत देण्यात आली.

एप्रिलमध्ये राज्याला 4 लाख सात हजार 800 टन, मे मध्ये सहा लाख 79 टन, जूनमध्ये नऊ लाख 94 हजार 700 टन, जुलैमध्ये आठ लाख 50 हजार 900 टन, ऑगस्टमध्ये सहा लाख 54 हजार 500 टन तर सप्टेंबरमध्ये उर्वरीत पाच लाख 88 हजार 100 टन खते मिळणार आहेत. कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी सर्व खत कंपन्या व विक्रेत्यांची बैठक घेवून केंद्रांकडून मिळणारे सर्व खते खरेदी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात केंद्राकडून मंजूर झालेली सर्व खते कंपन्यांनी उचलली आहेत.

हंगामासाठी सर्व जिल्ह्यांतील एकूण 46 हजार 649 खत विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना खते उपलब्ध होणार आहेत. राज्यातील 85 रेल्वे स्थानकांमधून गावोगाव खत वितरणाचे नियोजन आहे. संयुक्त खतांचे 18 व एसएसपीचे 29 पुरवठादार राज्यात आहेत. याव्यतिरिक्त जैविक खतांच्या 82 मान्यताप्राप्त उत्पादकांमार्फतही खरिपासाठी जैविक खते उपलब्ध होणार आहेत.

- खतांचा ओघ सुरु
एप्रिलमध्ये राज्याला मंजूर असलेल्या कोट्याहून दोन लाख टनाहून अधिक खते उपलब्ध झाली आहेत. या महिन्यात राज्याला 44 हजार 700 टन ऐवजी 55 हजार 900 टन डीएपी, 10 हजार 800 टनाऐवजी 36 हजार टन एमओपी, 76 हजार 700 ऐवजी एक लाख 67 हजार 200 टन संयुक्त खते, दोन लाख तीन हजार 700 टनाऐवजी तीन लाख एक हजार टन युरीया व नियोजनाप्रमाणे 71 हजार 900 टन एसएसपी खतांचा साठा केंद्रामार्फत देण्यात आला आहेत. यापैकी निम्मी खते पहिल्या पंधरवड्यात राज्यात पोच झाली आहेत.

- खत आयात सुरु
निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाच्या माहितीसुसार केंद्रामार्फत दर वर्षी राज्यातील खत उत्पादन व मागणी यातील तफावत लक्षात घेवून तेवढ्या खतांच्या आयातीस मंजूरी दिली जाते. गेली काही वर्षे आयातीस विलंब होत असल्याने जून-जुलैमधील पावसात पुरवठ्यात समस्या निर्माण होत होत्या. यंदा केंद्राने आयातीस लवकर मंजूरी दिल्याने खतांची आयात सुरु झाली असून पुरवठाही मंजूर कोट्यापेक्षा अधिक प्रमाणात होत आहे.

*चौकट
- खतनिहाय मंजूर साठा (लाख टन)
खत --- खरिप 14, वापर --- खरीप 15, मागणी --- मंजूर
युरिया --- 14.62 --- 18 --- 17
संयुक्त खते --- 8.87 --- 13 --- 11
एसएसपी --- 4.07 --- 6 --- 6
डीएपी --- 3.73 --- 6 --- 5
एमओपी --- 2.72 --- 2.75 --- 2.75
इतर खते --- 0.44 --- 0.75 --- 0
एकूण --- 34.45 --- 46.50 --- 41.75
---------------------
*चौकट
- जिल्हानिहाय मंजूर खत साठा (खरिप 2015)
जिल्हा --- मंजूर एकूण खते --- मंजूर युरिया
जळगाव --- 3,53,600 --- 1,38,600
औरंगाबाद --- 2,39,100 --- 1,07,400
नांदेड --- 2,38,500 --- 89,100
नाशिक --- 2,32,600 --- 86,800
नगर --- 2,22,300 --- 82,100
यवतमाळ --- 2,03,900 --- 85,400
बुलडाणा --- 1,83,700 --- 62,800
सोलापूर --- 1,83,200 --- 78,300
पुणे --- 1,80,000 --- 70,400
कोल्हापूर --- 1,78,000 --- 74,700
बीड --- 1,76,500 --- 76,000
जालना --- 1,60,400 --- 63,300
सांगली --- 1,35,000 --- 47,500
नागपूर --- 1,23,100 --- 44,000
परभणी --- 1,21,200 --- 55,200
सातारा --- 1,17,500 --- 47,000
लातूर --- 1,15,900 --- 34,700
अमरावती --- 1,15,600 --- 32,700
चंद्रपूर --- 1,10,200 --- 47,100
धुळे --- 1,06,200 --- 52,500
वर्धा --- 94,400 --- 37,000
नंदुरबार --- 92,400 --- 48,300
हिंगोली --- 78,200 --- 22,400
उस्मानाबाद --- 76,500 --- 25,300
अकोला --- 72,400 --- 19,800
भंडारा --- 67,100 --- 26,500
वाशिम --- 60,600 --- 18,200
गोंदिया --- 58,100 --- 25,200
गडचिरोली --- 49,800 --- 24,700
रायगड --- 30,600 --- 24,500
पालघर --- 25,400 --- 20,700
रत्नागिरी --- 18,700 --- 13,000
सिंधुदुर्ग --- 17,400 --- 8,900
ठाणे --- 11,900 --- 9,900
एकूण --- 42,50,000 --- 17,00,000
----------(समाप्त)------------- 

तयारी खरिपाची - भाग 1

राज्यात यंदा 162 लाख टन
अन्नधान्य उत्पादनाचे उद्दीष्ट

कृषी विभागाचे नियोजन; मुख्य भर खरिपावर

*कोट
""खरिपाची शाश्‍वती वाढविण्यासाठी कापूस व सोयाबीनमध्ये कडधान्य पिकांची आंतरपिक म्हणून लागवड वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत यंदाच्या खरिपात विदर्भ व मराठवाड्यात विशेष प्रयत्न करण्याचे नियोजन आहे.''
- के. व्ही. देशमुख, विस्तार संचालक, कृषी विभाग

पुणे (प्रतिनिधी) ः राज्याच्या कृषी विभागाने यंदा (2015-16) अन्नधान्याचे एक कोटी 62 लाख 22 हजार टन तर तेलबियांचे 60 लाख 66 हजार टन उत्पादन करण्याचे उद्दीष्ट निश्‍चित केले आहे. याचा मुख्य भार नेहमीप्रमाणे खरिप हंगामावर राहणार आहे. खरिपात एक कोटी 51 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी करुन अन्नधान्यांचे एक कोटी टन, तेलबियांचे 57 लाख टन, कापसाचे 69 लाख गाठी तर उसाचे 773 लाख टन उत्पादन मिळविण्याचे उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट गाठण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत खरिपात विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

खरिप हा राज्यांचा मुख्य हंगाम आहे. यातील बहुतेक पिके सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षातील पाऊस, पिक पेरणी, उत्पादन, उत्पादकता विचारात घेवून कृषी विभागामार्फत योजनांची अंमलबजावणी व शेतकऱ्यांना खते, बियाणे आदी पुरक सुविधा पुरविण्यासाठी पेरणी क्षेत्र, उत्पादन व उत्पादकतेची उद्दीष्टे निश्‍चित करण्यात आली आहेत. ही उद्दीष्टे सरासरी व गेल्या काही वर्षांपेक्षा जास्त ठरविण्यात आली आहेत. यानुसार हंगामात पिकनिहाय उत्पादकतावाढ कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

हंगामात सर्वाधिक 46.50 लाख हेक्‍टर क्षेत्रावर तृणधान्ये, 38.28 लाख हेक्‍टरवर तेलबिया, 34.24 लाख हेक्‍टरवर कापूस, 23.05 लाख हेक्‍टरवर कडधान्ये तर 8.95 लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊस पिक राहील, असे नियोजन आहे. गेल्या वर्षी पाऊस महिनाभर उशीरा आल्याने व त्यानंतरही पावसात खंड पडल्याने खरिपाला मोठा फटका बसला होता. सोयाबीन व कापूस वगळता उर्वरीत सर्वच पिकांच्या लागवडीत मोठी घट झाली होती. यंदा त्यात भरिव वाढ अपेक्षित आहे.

- उत्पादकतेच्या केंद्रस्थांनी तृणधान्ये
राज्यातील खरिप तृणधान्यांची सरासरी उत्पादकता कमी आहे. यामुळे यंदाच्या हंगामात कडधान्ये, गौण तेलबिया, ऊस, कापूस यांच्यापेक्षाही कृषी विभागाचा मुख्य भर ज्वारी, बाजरी, भात व मका या तृणधान्यांवर आणि सोयाबीन या मुख्य तेलबिया पिकावर राहणार आहे. यासाठी विशेष अभियान, प्रात्यक्षिके राबवण्याचे नियोजन आहे.

- रब्बी, उन्हाळी सरासरीएवढे
खरिपापाठोपाठ येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागाने पिक पेरणीचे उद्दीष्ट सरासरीएवढे तर उत्पादन व उत्पादकता वाढीचे उद्दीष्ट सरासरीहून अधिक प्रमाणात नक्की केले आहे. रब्बीत 62.90 लाख हेक्‍टरवर पेरणीचे तर 62 लाख टन अन्नधान्य व 2.60 लाख टन तेलबिया उत्पादनाचे उद्दीष्ट आहे. उन्हाळी हंगामात 1.38 लाख हेक्‍टरवर पेरणीचे आणि एक लाख टन अन्नधान्य व 1.40 लाख टन तेलबिया उत्पादनाचे नियोजन आहे.

*चौकट
- असे आहे खरिपाचे उद्दीष्ट (2015)
पिक --- पिक पेरणी (लाख हेक्‍टर) --- उत्पादन (लाख टन) --- उत्पादकता (किलो प्रति हेक्‍टर)
भात --- 14.42 --- 28.63 --- 1918
ज्वारी --- 10.37 --- 14.98 --- 1444
बाजरी --- 11.45 --- 11.13 --- 972
नाचणी --- 1.27 --- 1.26 --- 986
मका --- 7.87 --- 23.70 --- 3012
तूर --- 11.83 --- 11.88 --- 1004
मुग --- 5.34 --- 3.55 --- 665
उडीद --- 4.47 --- 3.02 --- 677
भुईमुग --- 2.98 --- 3.34 --- 1122
तीळ --- 0.70 --- 0.23 --- 322
कारळे --- 0.42 --- 0.10 --- 248
सुर्यफुल --- 0.99 --- 0.56 --- 562
सोयाबीन --- 33.08 --- 52.38 --- 1584
ऊस --- 8.95 --- 773.08 --- 86 (टन)
कापूस (गाठी) --- 34.24 --- 68.89 --- 342
----------(समाप्त)--------- 

पंचनामा अवकाळीचा - भाग 2

"अवकाळी'ने घेतला
10 हजार कोटींचा घास

10 लाख हेक्‍टरला फटका; 33 ते 50 टक्‍क्‍यांत 4 लाख हेक्‍टर

संतोष डुकरे
पुणे ः राज्यात 28 फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत सुमारे 10 लाख हेक्‍टर क्षेत्राला बसला आहे. यापैकी सुमारे चार लाख हेक्‍टर क्षेत्राचे 50 टक्‍क्‍यांहून अधिक, तर चार लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे 33 ते 50 टक्‍क्‍यांदरम्यान नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये सुमारे तीन लाख हेक्‍टर फळपिके, तर पाच लाख हेक्‍टर रब्बी पिके आहे. उत्पादन, उत्पादकता, बाजारभाव, हमीभाव व उत्पन्नाचा विचार करता गेल्या महिनाभरात अवकाळीमुळे पिकांचे तब्बल 10 हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

राज्यातील पीक नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे अपूर्ण असल्याने नुकसानाची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही. मात्र, सुमारे चार लाख हेक्‍टरवरील पिकाचे 50 टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला आहे. यामध्ये सुमारे एक लाख 45 हजार हेक्‍टर फळपिके आहेत. उर्वरीत सुमारे सहा लाख हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान 50 टक्‍क्‍यांहून कमी आहे. यापैकी 33 टक्के क्षेत्र वगळता 67 टक्के म्हणजेच सुमारे चार लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान 33 ते 50 टक्‍क्‍यांदरम्यान असल्याचा अंदाज आहे.

द्राक्ष, डाळिंब, केळी, कांदा, संत्रा, मोसंबी या फळपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. उत्पादन व बाजारभावाचा विचार करता या पिकांपासून शेतकऱ्यांना सरासरी किमान एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळते. या हिशेबाने राज्यातील सुमारे तीन लाख हेक्‍टर फळबागांचे सुमारे सात हजार 500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

रब्बी पिकांमध्ये हरभरा पिकाला सर्वाधिक फटका बसला असून त्यापाठोपाठ गहू, ज्वारी आदी पिकांचे नुकसानही मोठे आहे. राज्याची सरासरी उत्पादकता, हमीभाव व बाजारभावाचा विचार करता हेक्‍टरी सरासरी किमान 45 हजार रुपये उत्पन्न गृहीत धरले, तर सुमारे दोन हजार 250 ते अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

केंद्र शासनाच्या सुधारित निकषानुसार कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक पिकांना अनुक्रमे 6800, 13 हजार 500 व 18 हजार रुपये मदत निश्‍चित झाली आहे. यानुसार राज्यातील 33 ते 50 टक्‍क्‍यांदरम्यानच्या नुकसानग्रस्त चार लाख हेक्‍टरला सरासरी 13 हजार 500 रुपये मदत गृहीत धरली तरी यासाठी सुमारे 550 कोटी रुपयांची अतिरिक्त आवश्‍यकता भासणार आहे.

राज्यात 28 फेब्रुवारी व एक मार्चला 29 जिल्ह्यांत एक लाख 40 हजार हेक्‍टरवरील फळबागांसह तब्बल सात लाख 50 हजार हेक्‍टर क्षेत्राला अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. पालघर, सोलापूर, कोल्हापूर, बुलडाणा व वाशिम हे पाच जिल्हे या तडाख्यातून बचावले होते. मात्र, 8 ते 10 व 13 ते 15 मार्च या कालावधीत झालेल्या जोरदार गारपिटीने या जिल्ह्यांनाही मोठा तडाखा दिल्याने नुकसानग्रस्त क्षेत्र नऊ लाख हेक्‍टरहून पुढे सरकले. आता गेल्या आठवडाभरात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने पीक नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा 10 लाख हेक्‍टरला भिडल्याचा अंदाज आहे.

- महिना उलटला, पंचनामे संथगतीने
महाराष्ट्राबरोबरच अवेळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या अन्य काही राज्यांनी अंतिम पंचनामे पूर्ण करून केंद्राला माहिती सादर केली आहे. महाराष्ट्राला केंद्राने याबाबत वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र, गारपिटीला महिना उलटून गेल्यानंतरही राज्यातील नुकसानग्रस्त क्षेत्राचा अंतिम अहवाल केंद्राला सादर झालेला नाही. याशिवाय, 33 ते 50 टक्‍क्‍यांदरम्यान झालेल्या नुकसानीचे काय हा प्रश्‍नही अनुत्तरितच आहे. 

गारपीटीचा कहर सुरुच

पुणे (प्रतिनिधी) ः बुलडाणा, वाशिम, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, उस्मानाबाद, जालना व लातूर जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी रविवारी सायंकाळी व सोमवारी दिवसभरात वादळी वारे व पावसासह जोरदार गारपीट झाली. विदर्भावर वादळी पाऊस व गारपीटीचे सावट मंगळवारीही (ता.14) कायम राहण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा दिला आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी पाऊस झाला. पावसाबरोबर गारपीटीचे सत्रही सुरुच राहीले. सोमवारी सायंकाळपर्यंत पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्‍यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पाऊस व गारपीट झाली. नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांसह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस व गारपीट सुरु होती. मराठवाडा व विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत भर पावसाळ्यासारखा सर्वदूर पाऊस झाला आहे.

सर्वदूर होत असलेला पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे कमाल व किमान तापमानात सरासरीहून मोठी घट झाली असून राज्यात सध्या सुरु असलेला उन्हाळा हा ऋतू पूर्णपणे गायब झाल्यासारखी स्थिती आहे. दिवसभरात पुण्यात राज्यातील सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. किमान तापमान राज्यात बहुतेक ठिकाणी 19 अंश सेल्सिअसहून कमी होते.

मध्य प्रदेशच्या पश्‍चिम भागापासून महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंतच्या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. गुजरात व लगतच्या भागात समुद्रसपाटीपासून 900 मिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय आहेत. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशच्या भागातील चक्राकार वारे आणि पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, मध्य प्रदेशवरील कमी दाबाचा पट्टाही कायम आहे. यामुळे मंगळवारी राज्यातील पावसाची शक्‍यताही कायम आहे.

*चौकट
- वेधशाळांचे वेगवेगळे अंदाज
हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेने मंगळवारी (ता.14) मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. पुणे वेधशाळेने मंगळवारी फक्त विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला असून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नागपूर वेधशाळेने मंगळवारी विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला आहे. तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिल्लीहून प्रसिद्ध केलेल्या अंदाजात फक्त विदर्भात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यातील प्रमुख ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः
मध्य महाराष्ट्र ः सोलापूर 2, बार्शी 22, धुळे 6, म्हसवड 17, मुळंगी 28, वरणगाव 12, तळेगाव 14, कोरेगाव 32, रांजणगाव 11, वैराग 15, पानगाव 26, नारी 32, सुर्डी 19, नरखेड 39, माढा 16, मारवाडे 20, घोलेगाव 16, बोरगाव 15

मराठवाडा ः नांदेड 5, उस्मानाबाद 25, परभणी 3, नळवंडी 16, पाली 21, अंमळनेर 12, गेवराई 9, अंबेजोगाई 39, लोखंडी 40, घाटंदूर 40, बर्दापूर 35, केज 23, युसूफ 30, होळ 32, बनसारोळा 40, परळी 26, धर्मापूरी 23, नागापूर 22, मोहखेडा 32, तळेगाव 25, लातूर 26, हरंगुळ 36, तांदुळजा 25, किनगाव 26, मदनसुरी 30, रेणापूर 26, दावनी 26, जळकोट 46, बेंबळी 26, सावरगाव 35, मंगरुळ 40, ढोकी 32, नारंगवाडी 57, मकनी 35, येवती 22, मुक्रमाबाद 32,

विदर्भ ः जळगाव जामोद 64, अकोला 25, बुलडाणा 8, नागपूर 4, वर्धा 3, यवतमाळ 11, असलगाव 34, चिखली 42, इकलरा 44.2, हातनी 40, मेरा 43, रायपूर 53, पाडळी 35, साकळी 40, देऊळगाव 17, मेहकर 24, वरवंड 27, खामगाव 38, पिंपरी 25, शेंभा 25, हातरुन 50, दहीहंडा 46, आगर 40, हादगाव 32, रिसोड 32, करंजा 29, दारापूर 32, मोवड 42,
----------(समाप्त)---------- 

देशभर पावसाचा इशारा

राज्यात गारपीट, पूर्वमोसमीचा तडाखा कायम

- हातकणंगलेत आभाळ फाटलं
शनिवारी सायंकाळच्या सुमारास हातकणंगलेत आभाळ फाटल्यासारखेच पाऊस कोसळला. वाऱ्याने पत्रे उडून गेले. क्षणार्धात घर होत्याच नव्हते झाले. विजेचे खांब धडधडा कोसळले. कडब्याच्या बडीम बघता बघता वाहून गेल्या. अख्ख शेत वाहून जात आहे काय अशीच स्थिती आळते, लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी, मजले, हातकणंगले, तारदाळ, खोतवाडी, कोरोची या गावाची झाली. विहिरी गाळाने भरल्या. केळी, ऊस, भाजीपाल्याचे पिक भुईसपाट झाली. ओढ्याला पूर आला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या 20-30 वर्षात असा पाऊस कधीच अनुभवला नसल्याचे अनेकांनी सांगितले.

*चौकट
- बुधवारपर्यंत गारपीटीचा अंदाज
हवामान खात्याने मंगळवारी (ता.14) सकाळपर्यंत मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सुरु असलेली गारपीट बुधवारपासून (ता.14) थांबण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारी सकाळपर्यंत फक्त विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज आहे.

पुणे (प्रतिनिधी) ः हवेच्या कमी दाबामुळे देशांतर्गत भागात बाष्पाचा पुरवठा वाढल्याने हवामान खात्याने देशात सर्वत्र पावसाचा अंदाज व्यक्त केला असून बहुतेक राज्यांमध्ये वादळी पाऊस व गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पूर्वमोसमी पाऊस व गारांचा तडाखा सुरुच आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात हातकणंगलेत सर्वाधीत 120 मिलीमिटर अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 50 मिलीमिटरहून अधिक प्रमाणात वादळी पाऊस व गारपीट झाली.

चक्राकार वारे व कमी दाबाच्या पट्ट्यांच्या सक्रीयतेमुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्ही बाजूंनी देशांतर्गत भागात बाष्पाचा पुरवठा सुरु असल्याने देशात सर्वत्र पावसाची शक्‍यता आहे. सोमवारी (ता.13) दिवसभरात हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, ओदीशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्रात गारपीटीचा तर उर्वरीत राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भ व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीटीसह हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. बुलडाणा, सातारा, कोल्हापूर, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांना या वादळी पाऊस व गारपीटीचा मोठा तडाखा बसला. पावसाच्या दमदार हजेरीमुळे विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात कमाल व किमान तापमानात मोठी घसरण झाली.

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान जळगाव येथे 38 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस झाल्याने कमाल व किमान तापमानात सरासरीहून तब्बल नऊ अंशांपर्यंत घट झाली आहेत. यामुळे किमान तापमान 20 अंशांहून खाली तर कमाल तापमानाचा पारा 35 अंशाहूनही खाली घसरला आहे. मराठवाड्यातही कमाल व किमान तापमानात सरासरीहून आठ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. यामुळे उन्हाच्या झळा लाही लाही करत असतानाच अचानक तापमान कोसळून थंडावा निर्माण झाल्याची स्थिती आहे.

दरम्यान, गुजरात व लगतच्या भागात हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे सक्रीय झाले असून त्यांच्याशी संलग्न असलेला कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंतच्या भागात सक्रीय आहे. उत्तर पाकिस्तान व लगतच्या जम्मू काश्‍मिरमध्ये समुसपाटीच्या पातळीहून 5.8 किलोमिटर उंचीवर चक्रावार वाऱ्यांच्या स्वरुपाच पश्‍चिमी चक्रावात सक्रीय झाला आहे. पुर्व राजस्थान व लगतच्या भागावर समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय आहेत. याच वेळी आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश व लगतच्या बांग्लादेशच्या भागावर समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय आहेत. या वाऱ्यांशी संलग्न कमी दाबाचा पट्टा दक्षिण छत्तीसगडपासून बंगालपर्यंतच्या भागात सक्रीय आहे. यामुळे देशांतर्गत भागाकडे अरबी समुद्र व उपसागर या दोन्ही बाजूंनी बाष्पाचा पुरवठा होत आहे.

रविवारी (ता.12) सकाळपर्यंतच्या चोविस तासात ठिकठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः
मध्य महाराष्ट्र ः हातकणंगले 120, खडकेवाडी 62, कापशी 59, गडहिंग्लज 34, वाठार 27, सांगली 29, जळगाव 10, ऐनपूर 15, नागापूर 11, कर्जत 13, बांभोरा 29, खर्डा 26, जामखेड 10, शेवगाव 12, बोधेगाव 67, घोडेगाव 52, चांदा 51, वांबोरी 35, रवांदे 15, दुधानी 61, वाघोली 18, पलूज 39.2, उस्लामपूर 23, कोरेगाव 39, मांगले 25, सोलापूर 1, पुणे 0.5

मराठवाडा ः नांदेड 10, औरंगाबाद 6, उस्मानाबाद 5, परभणी 2,

विदर्भ ः सावळदबारा 52, आंभी 42, अकोला 37, परतवाडा 26, ढेपेवाडा 22, अंजनगाव 22, पाटणसावंगी 21.6, सावळीखेडा 19.4, सेमाडोह 17.6, अमरावती 11, भातकुली 10.2, बुलडाणा 10, चंद्रपूर 6, यवतमाळ 4, नागपूर 0.5
--------------------