Friday, March 18, 2016

डॉ. दादाभाऊ यादव - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

हा अर्थसंकल्प ग्रामिण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. यानंतरच्या पुरक अर्थसंकल्पात आणखी २५ ते ३० टक्के रक्कम वाढवली तर योग्य न्याय मिळू शकतो. सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवारसाठीचे अनुदान अपुरे आहे. कृषी प्रक्रियेसाठीच्या २५ टक्के अनुदानामुळे क्लस्टर विकसित होवून रोजगाराचे चांगले साधन मिळेल. पिक विमा योजना निधी, हवामान केंद्र या चांगल्या तरतूदी आहे. नाबार्डच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, गोसंवर्धनशाळा या व इतर शेतीपुरक व्यवसायांना अधिक चालना द्यायला हवी. स्मार्ट गाव योजनेत अति दुर्गम भागातील गावांमध्ये रस्ते, बॅंका व आठवडे बाजार सुविधा निर्मितीवर भर द्यायला हवा. येत्या हंगामाच्या दृष्टीने तेलबिया व कडधान्य उत्पादनाच्या दृष्टीने असलेली तरतूद दुप्पट करायला हवी. कृषीपंप ग्राहकांना विज दरात सवलत आहे, पण त्याबाबतची व्यवस्था सुधारणेची गरज आहे. विजेची कार्यक्षमता ३०-४० टक्के आहे. शेतीच्या पाण्याची कार्यक्षमताही ३० ते ४० टक्केच आहे. ही कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत. शेती व पिण्यासाठीच्या पाण्यासाठी तात्पुरती योजना करण्याऐवजी प्रश्न कायमचा सोडविण्याच्या अनुषंगाने काम होणे अपेक्षित आहे. कृषी गुरुकुलची तरतूद वाढवायला हवी. सेंद्रीय शेती, पुरस्कार, कृषी महोत्सव यासाठी चांगली तरतूद आहे. सलग दुष्काळांमुळे कृषीचा विकासदर कमी आहे. दुष्काळ, गारपीट, बदलते हवामान याला सामोरे जाण्यासाठी संशोधन व विस्तार महत्वाचा आहे. मात्र अर्थसंकल्पात संशोधन व विस्तारासाठी अर्थसंकल्पात तरतूद दिसत नाही. पुरवणी अर्थसंकल्पात ती वाढून मिळायला हवी.
- दादाभाऊ यादव, विभागप्रमुख, कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी 

सुनिल पवार - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

उपयुक्त तरतुदी
या अर्थसंकल्पाप्रमाणे संबंधित बाबींवर प्रत्यक्षात खर्च झाला, तर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आतापर्यंतचे सर्वोत्तम काम या वर्षात होऊ शकते. कृषीसाठी २५ हजार कोटी ही मोठी तरतूद आहे. पीक विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. फळबागांमध्ये त्याबाबत चांगले काम झाले आहे. आता विम्यासाठीची तरतूद समाधानकारक आहे. प्रक्रिया उद्योगाला यंत्रसामग्रीसाठी कमाल ५० लाख रुपयांचे अनुदान वाइन व बेदाणा उद्योगांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. पण ते फक्त २५ टक्के आहे. ठिबक सिंचनासाठी भरिव तरतूद झाल्याने तीन वर्षांपासून रखडलेली प्रकरणे निकाली निघून फळबागांपलीकडे ऊस व इतर पिकांनाही त्याचा थेट चांगला लाभ होईल. निर्यात व पायाभूत गोष्टींसाठी कमी तरतूद आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघांचे संचालक सुनील पवार यांनी दिली आहे.   

डॉ. शंकरराव मगर - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

केंद्राचा अर्थसंकल्प व राज्याचा अर्थसंकल्प यात खूपच साम्य आहे. मोठ्या आशा निर्माण करायच्या आणि शेंडीला तूप लावल्यासारखी तरतूद करायची, असा प्रकार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५० हजार कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित होती. एकीकडे शेतकरी प्रचंड संकटात आहे. आत्महत्या वाढत आहेत. आणि एकूण अर्थसंकल्पाचा विचार करता तुटपुंजी रक्कम असूनही शेतकऱ्यांना अर्पण आणि स्वाभिमान वर्षाचे कौतुक सांगतात, ते शेतकऱ्यांना काय कामाचे. उड्डाण पूल, रस्त्यांना प्रचंड तरतूद केली आहे. शेतकऱ्यांवरील संकट पाहता एखादे वर्षे रस्त्यांची कामे थांबवून पूर्ण क्षमतेनिशी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला असता, तर बिघडले असते का?

जलसिंचन प्रकल्प व जलयुक्त शिवारसाठीची तरतूद फारच कमी आहे. साठवण व प्रक्रिया या चांगल्या विषयाला हात घालता असला, तरी याविषयीच्या तरतुदीविषयी व निकषांविषयी संधिग्धता आहे. यात अन्नधान्य व कडधान्यावर जोर देणे आवश्यक आहे. विम्याची तरतूद त्या मानाने चांगली आहे. मेक इन महाराष्ट्र, स्टार्ट अप म्हणतात आणि फक्त २५ टक्के अनुदान हे कमीच आहे. मत्स्य व्यवसायातून सरकार सहा हजार कोटी रुपये कर कमावतेय आणि त्यासाठी फक्त १५० कोटी ठेवलेत. मत्स्य विद्यापीठाचा प्रस्तावही गुंडाळण्यात आलाय. सेंद्रिय शेतीसाठी बजेट ठेवलेले नाही, पण उल्लेख केला हेही चांगले झाले. ग्रामीण विभागाकडे बारिक लक्ष दिलेय ही त्यातल्या त्यात चांगली बाब आहे.
- डॉ. शंकरराव मगर, माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 

कृषी पदव्युत्तर पदवी प्रवेश परिक्षा सुरु

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सुमारे १३५० जागांसाठीची सामायिक प्रवेश परिक्षा नुकतिच सुरु झाली आहे. कृषी, फलोत्पादनसह वेगवेगळ्या १० विद्याशाखांसाठी राज्यातील १४ केंद्रांवर ही परिक्षा होत असून तब्बल १५ हजार ३२७ विद्यार्थी या परिक्षेला बसले आहेत. यातील सर्वाधीक प्रतिसादाची कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश परिक्षा रविवारी (ता.२०) होणार आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळामार्फत येत्या १० एप्रिलला निकाल जाहिर होणार आहे.

पुणे, अकोला, नागपूर, परभणी, दापोली (रत्नागिरी), राहुरी (नगर), कोल्हापूर, धुळे, लातूर, बदनापूर (जालना), यवतमाळ, कराड (सातारा), अंबेजोगाई (बीड) व सोनापूर (गडचिरोली) या ठिकाणच्‍या कृषी व संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश परिक्षा सुरु आहेत. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष परिक्षा घेण्यापर्यंत आणि पुढे निकालापर्यंत प्रत्येक पातळीवर गोपनियता पाळण्यात आली असून निरिक्षकांच्या देखरेखीखाली प्रत्येक टप्प्यातील कार्यवाही होत आहे. प्रवेश अर्ज व पुढे निकालाचीही सर्व यंत्रणा ऑनलाईन आहे. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार, गैरवर्तन कोणत्याही पातळीवर होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली असल्याचे मंडळाचे नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी सांगितले.

- चौकट
विद्याशाखानिहाय परिक्षांना बसणारे विद्यार्थी
कृषी - ९०१८, फलोत्पादन - २५४४, कृषी व्यवसाय व्यवस्थापन - १६७२, कृषी जैवतंत्रज्ञान - ७१५, अन्न तंत्रज्ञान - ३९७, काढणी पश्चित तंत्रज्ञान - ३९६, कृषी अभियांत्रिकी - २९४, वनिकी - २२२, मत्स्यविज्ञान - ५३, गृह विज्ञान - १६

- चौकट
चार महिने अगोदरच परिक्षा
आत्तापर्यंत पदवीचे अंतिम निकाल लागल्यानंतर जुलै मध्ये पदव्युत्तर पदवीची प्रवेश परिक्षा होत होती. यानंतर प्रवेश प्रक्रिया पार पडून अभ्यासक्रम सुरु होण्यास सप्टेंबर उजाडत होता. परिणामी अभ्यासक्रम पूर्ण करण्यास फार थोडा कालावधी हाती राहत होता. ही तृटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळाने यंदा प्रथमच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या धर्तीवर (आयसीएआर) निकाल लागण्यापुर्वीच प्रवेश परिक्षा घेतली आहे. या परिक्षेचा निकालही पदवीच्या निकालाआधीच जाहिर होणार आहे. पदवीचे निकाल लागल्यानंतर मे महिन्यात प्रवेश प्रक्रिया पार पडून जून मध्ये प्रत्यक्ष अभ्यासक्रमांना सुरवात होईल, असा प्रयत्न आहे.

- कोट
‘‘नेहमीपेक्षा चार महिने आधी प्रवेश परिक्षा घेण्यास परभणीतील काही विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. पण ही परिक्षा वेळेत होण्याची गरज आणि महत्व सांगितल्यावर त्यांनाही ते मान्य झाले. पदवीचे आठवे सत्र कार्यानुभवाचे आहे. फक्त प्रॅक्टिकल आहे, थिअरी नाही. त्यामुळे विनाकारण परिक्षा लांबवण्यात अर्थ नव्हता. परिक्षा लवकर घेतल्याने आता पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांचा मोठा फायदा होणार आहे.’’
- डॉ. आर. के. रहाणे, नियंत्रक, महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळ, पुणे
------------------------ 

Thursday, March 17, 2016

हेमंत ढोमे - अॅग्रोवन भेट

पुणे, ता.१७ ः राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक शेतकरी उत्तम शेती करत आहेत. ॲग्रोवनमधून अशा यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध होत असतात. मात्र प्रसिद्धी माध्यमांबरोबरच चित्रपटांमधूनही शेतीतील नायक समाजासमोर यायला हवेत, असे मत चित्रपट अभिनेता, लेखक हेमंत ढोमे यांनी व्यक्त केले. पोस्टर गर्ल या चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर श्री. ढोमे यांनी ॲग्रोवन कार्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

ढोमे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी सकाळ माध्यम समुह, ॲग्रोवन करत असलेले काम खूपच परिणामकारक आहे. हे काम मी जवळून पाहीले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीबाबतचे नैराश्य व स्री भृण हत्या या विषयावर भाष्य करणाऱ्या पोस्टर गर्ल या चित्रपटाची कथा-पटकथा लिहीताना ॲग्रोवन डोळ्यांसमोर होता. बहुतेक चित्रपटांमधून शेतकऱ्यांचे चित्र एक तर नकारात्मक रेखाटले जाते. दारिद्र्य, आत्महत्या, गावाकडचे विनोद एवढ्यापुरतेच ते मर्यादित असते. या पलिकडे जावून शेतीकडे चला असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. यापासून प्रेरणा घेवून शेती व शेतकरी विषयक आणखी विषय व चित्रपट पुढे येतील, अशी आशा आहे.

गावाकडील झगमगाटीला विकास म्हटले जातेय. खेडोपाडीही काळानुरुप बदल हवा. या बदलात शेतकऱ्यांचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावला पाहिजे. गावात शेती अनुषंगीक सर्व सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. हा खरा विकास म्हणता येईल, असेही ढोमे म्हणाले. चित्रपट सृष्टीचा शेती व शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन, व्यवसायिक स्थिती व स्पर्धा, चित्रपट निर्मितीत मोठी वाढ झाली असली तर गुणवत्तेत होत असलेली घसरण, राजकारण ते गटतट आदी विषयांबाबत त्यांने ॲग्रोवनच्या संपादकीय विभागाशी मनसोक्त गप्पा मारल्या. ॲग्रोवनचे सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले यांनी श्री. ढोमे यांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले.
------------------- 

विदर्भात पावसाचा अंदाज कायम



पुणे (प्रतिनिधी) - शुक्रवारी (ता.१८) विदर्भात हलक्या पावसाची शक्यता असून राज्याच्या उर्वरीत भागात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भात ठिकठिकाणी सुरु असलेला हलका पाऊस व ढगाळ हवामानमुळे कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात कमाल व किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे.

कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. दिवसभरात सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे सर्वात कमी १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोदविण्यात आले.

गुरुवारी (ता.१७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात प्रमुख ठिकाणी नोंदविण्यात आलेले कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३२ (२३.७), अलिबाग ३१.५ (२१.६), रत्नागिरी ३०.२ (१९.६), पणजी ३२.५ (२१.७), डहाणू ३०.४ (२१.९), भिरा ३८.२ (१६.५), पुणे ३५.१ (१६.७), नगर (१६.६), जळगाव ३६.५ (१८.२), कोल्हापूर ३३ (१८.३), कोल्हापूर ३३ (१८.३), महाबळेश्वर २९.६ (१६.२), मालेगाव ३८.२ (२०.६), नाशिक ३५.४ (१७.७), सांगली ३४.५ (१८.५), सातारा ३५.१ (१७.५), सोलापूर ३८.४ (२२.१), उस्मानाबाद ३६.२ (१८.८), औरंगाबाद ३६ (१८.८), परभणी ३७.४ (२२.६), नांदेड ३७.५ (२५), अकोला ३७.६ (२४.६), अमरावती ३५.४ (२२.४), बुलडाणा ३५ (२२.२), ब्रम्हपुरी ३४.१ (२३.३), चंद्रपूर ३५.८ (२५.४), गोंदिया ३३.२ (२०.५), नागपूर ३४.४ (२०.५), वाशिम ३३.८, वर्धा ३४.८ (२२.६), यवतमाळ ३४ (२२.८)
------------------ 

Wednesday, March 16, 2016

डाळिंब संघाचे वार्षिक अधिवेशन - 26 ते 28 मार्च



पुणे - अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधक संघाचे वार्षिक अधिवेशन येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान जैन हिल्स (जि.जळगाव) येथे होणार आहे. यानिमित्ताने अधिवेशनस्थळी राष्ट्रीय डाळिंब परिसंवाद आणि प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, कृषीमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, जैन इरिगेशनचे अशोक जैन, राज्य व देशातील प्रमुख कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, केंद्रीय पातळीवरील अधिकारी परिसंवादास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. देशातील डाळिंब पिकसंबंधीचे प्रमुख शास्त्रज्ञ यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांसाठी हा परिसंवाद सशुल्क आहे. राज्यातील अधिकाधिक डाळींब उत्पादकांनी या परिसंवाद व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - मारुती बोराटे ७५८८५९२८९१
------------------