Tuesday, February 16, 2016

मनिषा कुंजिर - लघुयशोगाथा

मनिषा कुंजिर
ॲग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी पुरस्कार
-------------------
सौ. मनिषा भाऊसाहेब कुंजिर या दुष्काळग्रस्त पुरंदर तालुक्यातील वाघापूर गावच्या प्रगतशिल महिला शेतकरी. हिवरे बाजारच्या या सुकन्येवर जलसंवर्धन व पाण्याच्या काटेकोर वापराचे संस्कार माहेरीच झालेले. पती शिक्षक म्हणून शासकीय सेवेत. कुटुंबाच्या सर्व सहा एकर कोरडवाहू शेतीची जबाबदारी मनिषाताईंनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. पाण्यासाठी २००१ मध्ये शेतीत बोअरवेल घेतला. त्याच्या अर्धा इंची पाण्यावर सिताफळाची २०० झाडे लावली आणि शेतीचा श्रीगणेशा केला. सिताफळांची विक्री २००३ साली सुरु झाली. मात्र त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळेना. शेतकऱ्यांसाठी २००५ पासून ॲग्रोवन सुरु झाला. सौ मनिषा पहिल्या अंकापासून ॲग्रोवनच्या वाचक झाल्या. त्यातूनच २००७-०८ मध्ये ॲग्रोवनमधून उच्च तंत्रज्ञानावर आधारीत पॉलीहाऊसमधील फुलशेतीची माहिती त्यांना मिळाली. ॲग्रोवनच्या त्या वर्षीच्या कृषी प्रदर्शनात त्या माहिती मिळवण्यासाठी आल्या. प्रदर्शनातून त्यांना या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती घेतली.

कमी पाण्यात, कमी जागेत जास्त उत्पादन देणारी आधुनिक शेती करायचीच या विचाराने १० गुंठ्यावर पॉलिहाऊस उभारण्याचा निर्णय घेतला. सुमारे नऊ लाख रुपये बॅंक कर्ज घेवून जून २००९ मध्ये पॉलीहाऊसची उभारणी केली. जुलै २००९ मध्ये कार्नेशियनची लागवड केली. फुलांना चांगला दर मिळाला, उत्पादन चांगले आले, हातात दरमहा चांगले पैसे येवू लागले, यामुळे सौ. कुंजिर यांचा आत्मविश्वास वाढला. पती, सासु-सासऱ्याची साथ होतीच. यातून आलेल्या उत्पन्नातून बॅंकेचे सर्व कर्ज मुदतीपुर्वीच फेडले. गावात एक चांगला बंगलाही बांधला. ॲग्रोवनने प्रेरणा दिली, यशाचा मार्ग दाखवला असे स्पष्ट करत त्या यशाचे सारे श्रेय ॲग्रोवनला देतात.

पॉलिहाऊसमधील औषध फवारणीपासूनची सिंचन व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फुलांच्या काढणी, विक्रीपर्यंतची सर्व कामे सौ. कुंजीर स्वतः करतात. शेतीचे सर्व निर्णयही त्याच घेतात. कोणत्याही कामासाठी त्या मजूरांवर अवलंबून नाहीत. वापरत असलेले सर्व तंत्रज्ञान, औषधांची शास्रिय नावांपासूनची कार्यापर्यंतची सखोल माहिती त्यांना आहे. सौ. कुंजिर यांना जैन इरिगेशनमार्फत २०११ साली पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार (एक लाख रुपये व स्मृती चिन्ह) देण्यात आला. यानंतर राज्यभरातील शेकडो शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतीला देवून कामाची पहाणी केली. पॉलिहाऊसमधील फुलशेतीचे सखोल ज्ञान, नफ्या तोट्याचे चोख गणित आणि सहज नजरेत भरणारे यश यामुळे सौ. कुंजिर यांच्यापासून प्रेरणा घेवून राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पॉलिहाऊसमधील फुलशेतीला प्रारंभ केला. त्यांच्या वाघापुर गावात सुमारे ३५ हून अधिक पॉलिहाऊस उभी राहीली. पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पॉलीहाऊसच्या माध्यमातून फुलशेतीची यशस्वी अंमलबजावणी सुरु झाली.

दोन पिकांच्या मधल्या कालावधीत त्यांनी सध्या पॉलिहाऊसमध्ये फुलकोबीचे उत्पादन घेतले आहे. जुलैमध्ये त्या पुन्हा कार्नेशियनची लागवड करणार आहेत. पॉलिहाऊसशिवाय सिताफळ (६५० झाडे), डाळिंब (५५० झाडे) या फळबागांपासूनही त्या दर्जेदार उत्पादन घेत आहेत. हंगामानुसार कलिंगड, खरबुजाचे उत्पादनही त्या घेतात. सध्या खरबूजाचे पिक आहे. गेल्या पंधरा वर्षापासून पॉलीहाऊस व फळझाडांची शेती त्या यशस्वीपणे करत असून शेतीला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यातून तंत्रज्ञान प्रसाराचेही प्रभावी कार्य करत आहेत.

- कोरडवाहू भागात आधुनिक उच्च तंत्र, फळबागा, पारंपरिक पिकांची सांगड
- सुक्ष्म सिंचनावर भर, पाण्याचा काटेकोर वापर, सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण उत्पादन
- उपलब्ध पाण्यावर दुष्काळी भागातही उत्तम शेती, सर्व निर्णयप्रक्रीया, कामे स्वतः करतात
- सर्व बाबींच्या काटेकोर नोंदी, आर्थिक आघाडीवर चांगली प्रगती, वेळेआधी कर्जपरतफेड
- शेतीतील ढोरमेहनत किंवा अति शारिरिक श्रमाला फाटा देवून स्मार्ट वर्क ला प्राधान्य
-------------------
संपर्क
सौ. कुंजिर - ९६२३४१६८९७, ९९२२९१५३१७ 

No comments:

Post a Comment