Thursday, February 18, 2016

कृषीकेंद्रीत ग्रामविकासाचा जागर आजपासून शिर्डीत सुरु

राज्यभरातील सरपंच शिर्डीत दाखल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे (प्रतिनिधी) - कृषीकेंद्रीत ग्रामविकासाचा जागर गावोगाव पोहचविणाऱ्या ॲग्रोवन सरपंच महापरिषदेला आज (ता.१९) दुपारी साडेबारा वाजता सिद्ध संकल्प पॉल (साकुरी, शिर्डी) येथे प्रारंभ होत आहे. राज्यभरातील सरपंच महापरिषदेसाठी दाखल झाल्याने संपूर्ण शिर्डी परिसर सरपंचमय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते महापरिषदेचे उद्घाटन होणार असून ग्रामविकासमंत्री पंकजा पालवे, गृहराज्यमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

ॲग्रोवनच्या या पाचव्या सरपंच महापरिषदेसाठी राज्यभरातून एक हजार उच्चशिक्षित पुरुष व महिला सरपंच उपस्थित राहणार आहेत. यामध्ये राज्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. गावाच्या विकास करण्याची प्रबळ इच्छाशक्ती व त्यासाठी सर्व बाबी समजून उमजून विधायक दिशेने प्रयत्न करण्याची तयारी हा या सर्व सरपंचांमधील समान दुवा आहे. सरपंच महापरिषदेच्या माध्यमातून या सरपंचांना राज्यातील ग्रामविकासाच्या प्रमुख राजकीय, प्रशासकीय व सामाजिक नेतृत्वांशी थेट संपर्क साधण्याची, त्यांच्याकडून ग्रामविकासाचे मंत्र समजून घेण्याची व ग्रामविकासाच्या राज्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडणी करुन घेण्याची संधी मिळणार आहे.

आपल्या कर्तृत्वाने गावांचा वर्तमान व भविष्य घडविलेले अनेक दिग्गज सरपंचांशी संवाद साधणार आहेत. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबरच ग्रामविकास चळवळीतले कार्यकर्ते, सरपंच, गावांना नवी दिशा देणारी सक्षम तरुणाई या सर्वांचा यात समावेश आहे. राज्यातील सर्व सरपंचांचे प्रतिनिधी, नेतृत्व समजले जाणारे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या गावगाडा कसा हाकावा या मार्गदर्शन सत्राने परिषदेचा उद्या सायंकाळी समारोप होणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी दुपारपासूनच महापरिषदेसाठी शिर्डीत सरपंच दाखल होण्यास सुरवात झाली. सध्याकाळपर्यंत बहुसंख्य सरपंच निवासाच्या ठिकाणी पोचले. विदर्भासह दूरच्या भागातील उर्वरीत सरपंच आज सकाळपर्यंत दाखल होणार आहेत. कार्यक्रम स्थळी दाखल झाल्यानंतर सरपंचांनी त्यांच्या निवडीचे पत्र किंवा सकाळ कडून आलेला एसएमएस दाखविल्यानंतर त्यांना फोटो ओळखपत्र देण्यात येणार आहे. सरपंचांसोबत आलेल्या व्यक्तींना सभागृहात प्रवेश देण्यात येणार नाही.

फोर्स मोटर्स लि प्रस्तूत व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. पॉवर्ड बाय असलेल्या या महापरिदेचे दीपक फर्टिलायझर्स ॲन्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पो. लि., सीएट टायर्स, ॲग्रो व्हिजन गृप, किर्लोस्कर ऑईल इंजिन लि, सोना पॉलीप्लास्ट प्रा. लि (ठोळे गृप) हे प्रायोजक आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचाही या परिषदेस सहयोग लाभला आहे.

- मार्गदर्शनाचे विषय व वक्ते
१९ फेब्रुवारी २०१६
ती व्यवसाय करु नफ्याचा --- के. बी. पाटील, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन
गटशेती, कृषी विकासाची किल्ली --- नाथराव कराड, प्रगतशिल शेतकरी
परिसंवाद - ग्रामविकासातील आव्हाने आणि उपाय --- एकनाथ डवले (विभागिय आयुक्त, नाशिक), शैलेश नवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नगर), कल्पिता पाटील (सरपंच, जळगाव), चंदू पाटील (सरपंच, चंद्रपूर)

२० फेब्रुवारी २०१६
परिसंवाद - दुष्काळमुक्तीसाठी जलसंधारण --- प्रभाकर देशमुख (जलसंधारण सचिव, महाराष्ट्र राज्य), डॉ. अविनाश पोळ (जलसंधारण कार्यकर्ते), नरहरी शिवपुजे (जलसंधारण कार्यकर्ते)
परिसंवाद - कृषी उद्योगातून ग्रामविकास --- बी. बी. ठोंबरे (कृषी उद्योजक), विलास शिंदे (कृषी उद्योजक), महेश शेळके (संचालक, फार्मर प्रड्युसर कंपनी), मारुती चापके (विपणन तज्ज्ञ)
शेतीचे प्रश्न आणि उपाय --- पाशा पटेल, माजी आमदार, शेती प्रश्नांचे अभ्यासक
कृषीतील संधी आणि सरकारची धोरणे --- विकास देशमुख, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य
गावगाडा कसा हाकावा --- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती, महाराष्ट्र राज्य
-----------(समाप्त)-------------

No comments:

Post a Comment