Thursday, April 21, 2016

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा


रात्रीचा उष्माही कायम

पुणे (प्रतिनिधी) - विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. विदर्भात कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ झालेली असून शुक्रवारी (ता.२२) काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बहुतेक ठिकाणी कमाल व किमान तापमानात सरासरीहून उल्लेखनिय वाढ झाल्याने मराठवाड्‍यातही उन्हाचा कडाका जोरदार राहण्याची चिन्हे आहेत.

विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानाचा पारा वाढलेला असतानाच किमान तापमानातही सरासरीहून पाच अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रात्रही उष्ण झाली आहे. संपूर्ण मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी उष्ण रात्र अनुभवास येत आहे. मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमान सरासरीहून पाच अंश सेल्सिअसने उंचावले आहे. विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीहून उल्लेखनिय वाढ झालेली आहे. यामुळे दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री पुन्हा उष्णनेने लाही लाही अशी होरपळवणारी स्थिती अनुभवास येत आहे.

दरम्यान, इशान्येकडील आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पाऊस सुरु आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात गुवाहाटीला १३० मिलीमिटर तर चेरापुंजीला ५० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे या भागात कमाल तापमानात सरासरीहून पाच अंशांनी घट झाली आहे. विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंतच्या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. हिंदी महासागरात विश्ववृत्तीया भाग व लगतच्या अरबी समुद्राच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे.

गुरुवारी (ता.२१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - अलिबाग ३१ (२५), भिरा ३९ (२२), डहाणू ३४ (२५), पणजी ३४ (२७), हर्णे ३२ (२५), कुलाबा ३१ (२६), सांताक्रुझ ३३ (२५), रत्नागिरी ३२ (२६), जळगाव ४३ (२७), जेऊर ४२ (२६), महाबळेश्वर ३३ (२२), मालेगाव ४४ (२७), नाशिक ४० (२३), पुणे ४० (२३), सांगली ४१ (२४), सातारा ४० (२५), सोलापूर ४४ (३०), नांदेड ४५ (३१), उस्मानाबाद ४२ (२६), परभणी ४५ (३१), अकोला ४५ (३०), अमरावती ४३ (२८), ब्रम्हपुरी ४४ (२९), बुलडाणा ४२ (२९), चंद्रपूर ४४ (३०), नागपूर ४४ (२८), वर्धा ४५ (२९), यवतमाळ ४३ (२७)
------------------ 

Thursday, April 14, 2016

विदर्भात उष्‍णतेच्या लाटेचा इशारा

शुक्रवार, शनिवार तापदायक; आद्रतेतही मोठी घसरण

पुणे (प्रतिनिधी) - विदर्भ व मराठवाड्यात शुक्रवार (ता.१५) व शनिवारी (ता.१६) उन्हाची ताप लक्षणिय वाढून उष्णतेची लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. उन्हाची लाहीलाही वाढतानाच सापेक्ष आद्रतेत सरासरीच्या दहा टक्क्यांहून अधिक घट झाल्याने उष्णतेच्या लाटेच्या झळा अधिक तिव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता.१८) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे व आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाडा, कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीच्या पातळीहून ९०० मिटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. याव्यतिरिक्त वाऱ्यांची हालचाल मंद असून उन्हाची तिरिप अधिक तिव्र झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. कोकणात भिरा येथे सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भ व मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपार गेला आहे. विदर्भ व मराठवाड्यात अनेक ठिकाणी सापेक्ष आद्रतेत लक्षणिय घट झाली. उस्मानाबाद येथे राज्यातील निचांकी २५ टक्के सापेक्ष आद्रतेची नोंद झाली. याशिवाय अनेक ठिकाणी आद्रतेत सरासरीहून तब्बल १५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. कोकणात आद्रता पाच ते १७ टक्क्यांनी वाढली आहे.

दरम्यान, मध्य भारतात उष्णतेचा झटका वाढत असताना इशान्य भारतात आसाम, सिक्कमी, नागालॅन्ड, मनिपूर, मिझोरम, त्रिपुरा व अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी दमदार पाऊस सुरु आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात चेरापुंजी येथे तब्बल २१० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. उर्वरीत भागात अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण १० ते ४० मिलीमिटर दरम्यान होते. उपसागरात पश्चिम बंगालपासून बांग्लादेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने पुढील दोन दिवस या सर्व भागात पावसाचा अंदाज आहे.

गुरुवारी (ता.१४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३१.८, सांताक्रुझ ३३, अलिबाग ३०.४, रत्नागिरी ३२.९, पणजी ३४.२, डहाणू ३३.३, भिरा ४३.५, पुणे ३९.८, जळगाव ४१.६, कोल्हापूर ३९.२, महाबळेश्वर ३३.९, मालेगाव ४२, नाशिक ३८.६, सांगली ४०.१, सातारा ३८.९, सोलापूर ४१.७, उस्मानाबाद ४०.६, औरंगाबाद ३९.५, परभणी ४२.५, नांदेड ४२.५, अकोला ४१.५, अमरावती ४०.२, बुलडाणा ३९.५, ब्रम्हपुरी ४१.६, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४०, नागपूर ४२, वाशिम ३८.२, वर्धा ४२, यवतमाळ ४१.२