Friday, October 31, 2014

दृष्टिकोन - बाळासाहेब खिलारी, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ

दुग्ध व्यवसायाला हवे
स्थिर दीर्घकालीन धोरण
-----------
गेल्या काही वर्षात राज्यातील दुग्ध व्यवसायाची चांगली प्रगती झाली आहे. उत्पादन, प्रक्रिया वाढली आहे. मात्र आता केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळे नवीन समस्या उभ्या राहिल्या आहेत. लोकांनी दुधापेक्षा दारू प्यावी, अशी सध्याची धोरणे आहेत. सर्वसामान्य दूध उत्पादक केंद्रस्थानी ठेवून उत्पादन ते निर्यातीपर्यंतची धोरणे राबवण्याची गरज आहे. सांगताहेत "पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा'चे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी.
----------
- विविध पातळ्यांवर दुग्ध व्यवसायाची सद्यःस्थिती काय आहे?
महाराष्ट्रातील शेतकरी खऱ्या अर्थाने दुधामुळे पुढे गेला. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा 1988 मध्ये देशात दुधाचे सर्वाधिक विपणन करणारा संघ होता. 1992-95 पर्यंत देशात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे होता. नंतर ही परिस्थिती पालटली. आज पुण्यात दुधाचे 100 ब्रॅंड आहेत. दुधाच्या गुणवत्तेचा प्रश्‍न मोठा आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. भेसळ प्रतिबंधक कायदा फक्त कागदावर असल्याची स्थिती आहे. पुण्यात दररोज 20 लाख लिटर दूध संकलित होते. प्रत्यक्षात येथे दररोज एक कोटी लिटर दूध प्रक्रिया क्षमतेचे प्रकल्प आहेत. या एकाच जिल्ह्यात 65 प्रक्रिया प्रकल्प आहेत. सगळ्यांनी मिळून दुग्ध व्यवसायाचा पचका करायचे ठरवलेय की काय, अशी स्थिती आहे. बेशिस्तीचा फटका सगळ्यांनाच बसतोय. शासकीय अनुदानातून स्थापन झालेले दूध भुकटी व इतर प्रक्रिया उद्योग बंद पडत आहेत. राजकीय पक्षांशी संबंधित लोक या व्यवसायात असल्याने प्रत्येकाकडे काणाडोळा केला जातोय. त्याचा फायदा इतर लोक घेत आहेत.

- सातत्यपूर्ण दूध उत्पादनासाठी कात्रजमार्फत काय प्रयत्न सुरू आहेत?
दर्जेदार जनावरांची निर्मिती हा दुग्ध व्यवसायातील महत्त्वाचा भाग आहे. देश दूध उत्पादनात जगात वरच्या क्रमांकावर आहे. पण प्रति जनावर उत्पादकता अजूनही खूप कमी आहे. जिल्हा दूध संघामार्फत आम्ही यास सर्वाधिक महत्त्व दिले आहे. यासाठी "एनडीडीबी'च्या सहकार्याने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. दर्जेदार जनावरांपासून सातत्यपूर्ण उत्पादन मिळवणे हेही मोठे आव्हान आहे. जनावरांची निगा राखणे आणि ती रोगमुक्त ठेवणे महत्त्वाचे असते. आपले बहुसंख्य गोठे अस्वच्छ असतात. परिणामी जंत व गोचिड यांच्यामुळे दूध उत्पादनात 30 ते 35 टक्के घट होते. संघामार्फत दर वर्षी जंत व गोचिडनिर्मूलन सप्ताह पाळला जातो. उत्पादनातील सातत्यात गोठ्यांची चुकीची पद्धत हाच मोठा अडथळा आहे. आधुनिक दूध उत्पादनात मुक्त संचार पद्धतीचे गोठे अतिशय गरजेचे व महत्त्वाचे आहेत. यासाठी एनडीडीबीच्या मदतीने संघामार्फत वडगाव कांदळी (जुन्नर) व टुलेवस्ती (दौंड) येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्रे (मायक्रो ट्रेनिंग सेंटर) सुरू केली आहेत. येथे शेतकरीच शेतकऱ्यांना मुक्त गोठा पद्धतीने जनावरांच्या उत्पादकता वाढीसाठी प्रशिक्षण देणार आहेत. पशू आहाराच्या बाबतीत जागृती करण्यासाठीही संघाचे प्रयत्न सुरू आहेत.

- राज्यातील खासगी व सहकारी दूध संस्थांतील संघर्ष वाढत असल्याचे चित्र दिसते. याबाबत आपली भूमिका काय?
शासनाच्या धोरणामुळे गेल्या काही वर्षात राज्यात खासगी व्यावसायिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. पण ते वैयक्तिक फायद्यासाठी काम करतात. खासगी संस्था नफा होत असतो तेव्हा विचार करत नाहीत. एक-दोन महिने अडचणीचे आले की लगेच शेतकऱ्यांच्या मानेवर सुरी ठेवली जाते. दर जादा दिल्याचे दाखवतात; पण सेवा काहीच देत नाहीत. सर्व पैसा मधल्या दलालांकडे जातोय. आगाऊ रक्कम देऊन (ऍडव्हान्स) वेठबिगार तयार करून ठेवण्याचे प्रकार सुरू आहेत. "गाय झाली छोटी आणि गोचिड झाली मोठी' अशी स्थिती आहे. सहकारी संस्था शेतकरी हितासाठी काम करतात. यामुळे दूध उत्पादकांनी तात्पुरती सोय, फायदा न पाहता सहकारी संस्थांवर विश्‍वास ठेवला पाहिजे. धरसोड करणारे शेतकरी फक्त पायापाशी पाहतात; दूरचा विचार करत नाहीत. ही चूक वेळीच सावरली पाहिजे. सहकाराशी प्रामाणिक राहणाऱ्या दूध उत्पादक संस्थांच्या संख्येत वाढ झाल्यास त्याचा दूरगामी फायदा होईल. सहकार टिकला तर दुधाचे भाव टिकतील व व्यवसाय फायद्यात राहील.

- दुग्ध व्यवसायात दरवाढ, कपात असे सतत चढ-उतार सुरू असतात. यामागे धोरणात्मक अपयश आहे का?
गेल्या काही वर्षात राज्यात दुग्ध व्यवसायात मोठी क्रांती झाली. "एनडीडीबी'ने केलेल्या प्रयत्नांतून उत्पादनाला चांगली गती मिळाली. गेल्या काही वर्षात दूध भुकटी निर्मितीसंदर्भात चांगल्या पद्धतीने धोरणे राबवली. यामुळे दुधाचे उत्पादन वाढून दरातही लक्षणीय वाढ झाली. सहकारात भुकटी उद्योग कमी असल्याने खासगीकडे लोकांचा ओढा वाढला. यातही संघांनी चांगले दर देऊन स्थिरता राखण्याचा प्रयत्न केला. सध्या केंद्राने भुकटीसंदर्भातील धोरणे बदलल्याने दुधाच्या खरेदी दराला फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारही कारणीभूत आहेतच. त्यात खासगी संस्था फक्त 20 रुपये लिटर दराने दूध खरेदी करत आहेत. शासनाचे धोरण धरसोडीचे आहे. धोरण बदलल्यावर सर्व गोंधळ होतो. शासनाने दीर्घकालीन स्थिर धोरण अवलंबण्याची गरज आहे.

- दुधाचा दरडोई वापर वाढवण्यात आपण नक्की कोठे कमी पडतोय?
सध्या राज्यात दुधाचे मार्केटिंग बरोबर होत नाही. चहा, कॉफी, दारूच्या जाहिरातींचा मारा दुधापेक्षा जास्त आहे. मध्यंतरी "पिओ ग्लास फुल' ही दुधाची जाहिरात चांगली लोकप्रिय झाली. त्यामुळे दुधाचा खपही वाढला. मात्र काही काळानंतर ती जाहिरात बंद झाली. सध्या याबाबत काहीही सुरू नाही. संडे हो या मंडे... ही अंड्यांची जाहिरात "नॅशनल एग्ज कोऑर्डीनेशन कमिटी'मार्फत सतत सुरू असते. अशा प्रकारे दुधाचा खप, दरडोई वापर वाढविण्यासाठी राज्य शासनाने जाहिरात करणे गरजेचे आहे. दुधाचा खप वाढला तर सर्वांनाच संधी राहील. सध्या राज्यात दुधाला पाण्यापेक्षाही कमी किंमत आहे.

- संपूर्ण राज्याचा विचार करता सहकारी संघांचे जाळे कमकुवत आहे. याबाबत काय प्रयत्न सुरू आहेत?
गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना करून राज्यातील सर्व सहकारी संस्थांचा एक ब्रॅंड तयार करण्याची गरज आहे. हे काम अवघड आहे; पण अशक्‍य नाही. काही दिवसांपूर्वी याबाबत चाचपणी झाली; पण पुन्हा सारे शांत झाले. आज सहकारी संघांच्या बरोबरीने खासगी संस्थांचे पाऊल मोठे झाले आहे. शासन, संघ व खासगी संस्थांचा मेळ घालून दुधाच्या मार्केटिंगसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याची गरज आहे. सध्या सर्व जण एकमेकांची पुनरावृत्ती म्हणजेच "डुप्लिकेशन ऑफ वर्क' करत आहेत. ज्याची जी गुणवत्ता चांगली आहे त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी. यामुळे सर्वच संघांचा व पर्यायाने शेतकऱ्यांचा फायदा होईल. आज सगळ्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना आहेत. याचा तोटा सर्वांनाच सहन करावा लागत असून राज्यातील बाजारपेठेतही झगडावे लागत आहे. आपले दूध शिल्लक राहतेय आणि मुंबईला दिल्लीवरून दूध येतेय.

- शासनाकडून काय अपेक्षा आहेत?
तूप व इतर दुग्धप्रक्रिया उत्पादनांवर कर भरावे लागतात. ते रद्द केले पाहिजेत. दूध उद्योग हा शेती व्यवसायाचाच भाग गृहीत धरून त्यासाठी शेतीसाठीच्या दराने वीज उपलब्ध करून द्यावी. दूध व दुग्धजन्य पदार्थांचा दरडोई वापर वाढण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. शालेय पोषण आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ देण्याची आवश्‍यकता आहे. याचा फायदा थेटपणे शेतकऱ्यांना होईल. गेल्या काही वर्षात पशुखाद्य, मजुरी आदी सर्व बाबींचे दर वाढल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकरी दुग्ध व्यवसायातून बाहेर पडत आहेत. नवी पिढी या व्यवसायात येण्यास फारशी उत्सुक नाही. यामुळे छोट्या प्रमाणातील या व्यवसायाला थोडे मोठे स्वरूप देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना भरीव पाठबळ देण्याची गरज आहे.

- दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत देशी गाईंचे महत्त्व वाढले आहे. संघामार्फत याबाबत काय उपक्रम सुरू आहेत?
देशी गाईंच्या दुधाला सध्या मोठ्या प्रमाणात महत्त्व आले आहे, हे खरे. पुण्यातील काही सुवर्ण व्यावसायिकांकडून प्रतिलिटर 80 रुपये दराने, देशी गाईंचे पाच हजार लिटर दूध उपलब्ध करून देण्याबाबत विचारणा झाली. देशी गाईंच्या दुधापासून चुलीवर तयार केलेल्या तुपाला तब्बल 2400 रुपये प्रतिकिलो दराने मागणी आहे. मात्र ही मागणी पूर्ण करण्यास संघ सध्या असमर्थ आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळण्यासाठी अशा पर्यायांचा विचार करणे महत्त्वाचे राहील.
.................
कोट - सहकाराशी प्रामाणिक राहणाऱ्या दूध उत्पादक संस्थांच्या संख्येत वाढ झाल्यास त्याचा दूरगामी फायदा होईल. सहकार टिकला तर दुधाचे भाव टिकतील व व्यवसाय फायद्यात राहील.
.................
संपर्क - श्री. खिलारी 9011099966
.................

फडवणविस मंत्रीमंडळ - मंत्री परिचय

देवेंद्र फडणविस, मुख्यमंत्री
- नागपूरमधून सलग चारवेळा आमदार
- नगरसेवक, महापौर, आमदार ते मुख्यमंत्री असा प्रवास
- 2013 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष
-------
एकनाथ खडसे
- सलग सहा वेळा मुक्ताईनगरमधून विधानसभेवर
- युती सरकारमध्ये अर्थ, उच्च शिक्षण खात्याचे मंत्री
- विरोधी पक्षनेते म्हणून लक्षवेधी कामगिरी
- कोथळी गावचे सरपंच ते भाजपचे जेष्ठ नेते
- खानदेशातील भाजपचा चेहरा म्हणून लौकीक
-------
चंद्रकांत पाटील
- कोल्हापूर भाजपचे अग्रणी नेते, विधान परिषदेत भाजपचे प्रतोद
- 2008 पासून पुणे पदवीधरमधून विधान परिषदेवर सदस्य
- भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष, सरचिटणीस म्हणून काम
- शिक्षण, सामाजिक, राजकीय क्षेत्राचा अनेक वर्षांचा अनुभव
- 1980 ते 1993 - विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते
- 1995 ते 1999 - आरएसएसचे कोल्हापूर विभाग सहकार्यवाह
-------
विनोद तावडे
- विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम
- मुंबई भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान
- अभाविपच्या माध्यमातून भाजपमध्ये सक्रीय
-------
पंकजा पालवे
- बीडमधील परळीतून दुसऱ्यांदा आमदार
- भाजप कोअर कमिटीच्या सदस्या
- स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी "लेक वाचवा, राष्ट्र वाचवा' अभियान
- त्यांच्या संघर्ष यात्रेने भाजपला मोठे राजकीय बळ
-------
प्रकाश मेहता
- सलग सहा वेळा घाटकोपरमधून आमदार
- युती सरकारच्या काळात उत्पादन शुल्क मंत्री
- मुंबई उपनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री
- मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष
- आणीबाणी विरोधी आंदोलनात सहभाग
-------
सुधिर मुंगुटीवार
- सलग पाच वेळा विधानसभेचे आमदार
- भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष
- युती सरकारमध्ये पर्यटन, ग्राहक संरक्षण मंत्री
- अनुभवी, अभ्यासू, प्रभावी वक्तृत्व असलेला नेता
- बल्लारपूर तालुक्‍याच्या निर्मितीत योगदान
-------
विष्णू सावरा
- पालघर जिल्ह्यातील विक्रमगडचे विद्यमान आमदार
- विधानसभेवर सहा वेळा निवड
- युती सरकारच्या काळात आदिवासी विकासमंत्री
- आदिवासी नेता अशी ओळख
------------
विद्या ठाकूर (राज्यमंत्री)
- गोरेगावमधून भाजपच्या आमदार
- मुंबईच्या माजी उपमहापौर
- मुंबई मनपात चार वेळा नगरसेविका
- भाजपचा उत्तर भारतीय चेहरा
-------------
दिलीप कांबळे (राज्यमंत्री)
- पुणे कॅटोन्मेंटमधून दुसऱ्यांदा विजयी
- युती सरकारच्या काळात राज्यमंत्री
- स्वारगेट एसटी स्थानकातले एकेकाळचे फुलविक्रेते
- भाजपचा दलित चेहरा
------------------------------------ 

Thursday, October 30, 2014

निलोफर चक्रीवादळाची अति तिव्रता ओसरली

उत्तर गुजरात, कोकणात पावसाचा अंदाज कायम

पुणे (प्रतिनिधी) ः अरबी समुद्रातून उत्तर गुजरातच्या दिशेने वाटचाल सुरु असलेल्या निलोफर चक्रिवादळाची अति तिव्रता कमी होवून त्याचे रुपांतर तिव्र चक्रीवादळात झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत त्याची तिव्रता आणखी कमी होऊन ते सौम्य स्वरुपात (डिप्रेशन) गुजरातला धडकण्याचा अंदाज आहे. गुरुवारी सकाळी हे वादळ गुजरातपासून सुमारे 620 किलोमिटर अंतरावर पश्‍चिम मध्य अरबी समुद्रात सक्रीय होते. वादळ उत्तर गुजरातला धडकल्यानंतर या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज कायम आहे.

निलोफर चक्रिवादळाची तिव्रता मध्यंतरी वाढल्याने गुजरातमध्ये अतिदक्षतेच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र आता हे वादळ कमी दाबाच्या क्षेत्राच्या तिव्रतेहून अधिक व वादळाच्या तिव्रतेहून कमी स्वरुपात गुजरातमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमिटर राहण्याचा अंदाज आहे. वादळाची तिव्रता ओसरल्याने किनारपट्टीवर फारशी हानी होण्याची शक्‍यता नाही. मात्र या वादळाच्या प्रभावामुळे या भागात दमदार पाऊस होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात कोकण वगळता उर्वरीत भागात हवामान कोरडे व स्वच्छ सुर्यप्रकाश राहण्याचा अंदाज आहे.

राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या आसपास तर किमान तापमान सरासरीहून दोन ते पाच अंश सेल्सिअसने घसरलेले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी थंडीचे प्रमाण वाढले आहे. उस्मानाबाद येथे राज्यात सर्वात कमी 13.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. भिरा येथे राज्यात सर्वात जास्त 36.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

गुरुवारी (ता.30) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 35.3 (24.9), अलिबाग 34.2 (22), रत्नागिरी 33.9 (20), पणजी 33.5 (21.3), डहाणू 34.8 (21.8), भिरा 36.5 (17.5), पुणे 31 (13.9), नगर (15.2), जळगाव 33.5 (14.1), कोल्हापूर 29.9 (17.6), महाबळेश्‍वर 25.1 (15), मालेगाव 34.4 (16.4), नाशिक 30.5 (15), सांगली 30 (16.7), सातारा 29.6 (14.5), सोलापूर 33 (16), उस्मानाबाद 31.8 (13.8), औरंगाबाद 32 (16), परभणी 32.6 (14.7), नांदेड 31.5 (15.5), अकोला 34.5 (16.9), अमरावती 31.8 (18.4), बुलडाणा 31 (17.8), ब्रम्हपुरी 33.2 (17.8), गोंदिया 31.1 (15.4), नागपूर 32.6 (16.1), वाशिम 32 (18), वर्धा 32 (16.4), यवतमाळ 31.6 (15.6)
------------------ 

Wednesday, October 29, 2014

दुध पावडरच्या दरावरुन खरेदी दराचे राजकारण

खासगी संस्थांचा शेतकऱ्यांना दणका; सहकारी संघांकडून दर कायम

पुणे (प्रतिनिधी) ः आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कमी झाल्याच्या कारणाखाली खासगी दुध संस्था, प्रकल्पांनी शेतकऱ्यांकडून होणाऱ्या दुध खरेदीच्या दरात कपात करण्यास सुरवात केली आहे. मात्र आपल्याशी प्रामाणिक असलेल्या दुध संकलन केंद्रे व शेतकऱ्यांच्या दुध खरेदी दरात कपात न करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी दुध उत्पादक संघांनी घेतला आहे. यामुळे खासगी प्रकल्पांशी संबंधीत शेतकरी संकटात सापडले असून सहकारी संघांशी संबंधीत शेतकऱ्यांनी संकट टळल्याचा निश्‍विास सोडला आहे.

पुणे जिल्ह्यातील खासगी प्रकल्प व दुग्ध संस्थांनी गेल्या दोन महिन्यात दुधाचे खरेदी दर दोन ते अडिच रुपयांनी कमी केले आहेत. यामध्ये स्वराज्य दुध, डायनामिक्‍स डेअरी, प्रभात दुध, गोविंद दुध, पारस आदी प्रकल्पांचा समावेश आहे. इंदापूरच्या सोनई दुध प्रकल्पाने एक नोव्हेंबरपासून दुधाला 20 रुपये प्रति लिटर दर देण्याचा निर्णय घेतला आहे. तुलनेत पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 24 रुपये, दूध संस्थांना वरकड खर्चासाठी प्रति लिटर एक रुपया व वाहतूकीसाठी प्रति लिटर किमान 95 पैसे स्वतंत्रपणे देण्यात येत आहेत.

*चौकट
- खासगी संस्थांकडून गैरफायदा ?
आंतरराष्ट्रीय बाजारात दुध पावडरचे दर खाली वर होत असतात. मात्र या बाबीचा बाऊ करुन काही खासगी संस्था शेतकऱ्यांचा खिसा कापत आहेत. दुध पावडरला जास्त दर मिळतो तेव्हा हे प्रकल्प त्याचा फायदा शेतकऱ्यांना फारसा देत नाही. अडचण असून शकते. मात्र तो व्यवसायाचा भाग असतो. पशुखाद्य, भुसा, गाईंच्या किमती, चारा व औषधे, टॉनिक, मजूरी यांचे दर दिवसेंदिवस वाढत असताना मुळात कमी असलेल्या पावडरला दर नाही या कारणाखाली दुध दरात आणखी कपात करुन शेतकऱ्यांना भुर्दंड देणे चुकीचे आहे. अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

*कोट
""गेल्या पंधरा दिवसात दुध भुकटीचे दर 300 रुपयांवर 180 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. यामुळे विक्री ठप्प आहे. गोकुळमार्फत दररोज एक ते दीड लाख लिटरची पावडर केली जाते. सध्या दर नसल्याने आम्ही पावडरचा साठा करत आहोत. दुध खरेदी दर कमी करण्याचा संघाचा विचार नाही.''
- दिलीप पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकूळ)

""खासगी संस्थांनी दर जास्त कमी केल्याने संघाकडे अचानक दुधाची आवक वाढली आहे. नेहमीच्या दुधाला पुर्वीप्रमाणेच दर कायम ठेवून अचानक वाढलेल्या दुधाला एक रुपया कमी दर देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. संघ शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.''
- बाळासाहेब खिलारी, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (कात्रज)
----------(समाप्त)----------- 

निलोफर चक्रीवादळाची उद्या उत्तर गुजरातला धडक

पुणे (प्रतिनिधी) ः अरबी समुद्रातून गुजरातच्या दिशने घोंगावत येत असलेले अति तिव्र स्वरुपाचे "निलोफर' चक्रीवादळ शुक्रवारी (ता.31) रात्री उशीरा ते शनिवारी (ता.1) पहाटे दरम्यान गुजरातच्या उत्तर किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्याचा अति तिव्र पणा कमी होऊन हे चक्रीवादळ किनारा ओलांडेल. या वेळी वाऱ्यांचा वेग ताशी 60 ते 70 किलोमिटर असेल, असे मुंबई वेधशाळेने म्हटले आहे. सौराष्ट्र व कच्छमध्ये गुरुवारीपासून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात सुमारे 300 किलोमिटर अंतर कापून निलोफर चक्रीवादळ गुजरातमधील नलियापासून 870 किलोमिटर अंतरावर पोचले. त्याचा प्रवास ताशी 15 किलोमिटर वेगाने उत्तर दिशेने सुरु असून गुरुवारी (ता.30) सकाळपर्यंत ते गुजरातपासून 500 किलोमिटर अंतरावर येवून ठेपण्याची चिन्हे आहेत. या वादळाच्या प्रभावामुळे गुरुवारी (ता.30) सौराष्ट्र व कच्छमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन सौराष्ट्र व कच्छमध्ये बहुतेक ठिकाणी तर कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, निलोफर चक्रावादळाचा महाराष्ट्रावरील प्रभाव कमी झाल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणातही बहुतेक ठिकाणी घटलेले कमाल तापमान पुर्वपदावर म्हणजेच सरासरीच्या जवळपास आले आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानातील घट कायम आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात जळगाव व नाशिक येथे राज्यातील सर्वात कमी 14 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्र या तिनही विभागांमध्ये बहुतेक ठिकाणी किमान तापमान सरासरीहून दोन ते तीन अंशांनी कमी आहे. कोकणात कमाल व किमान दोन्ही प्रकारचे तापमान सरासरीएवढे आहे. दिवसभरात कोठेही पावसाची नोंद झाली नाही.

बुधवारी (ता.29) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः अलिबाग 33 (23), डहाणू 35 (23), पणजी 33 (23), मुंबई 34 (25), रत्नागिरी 33 (21), जळगाव 32 (14), जेऊर 31 (17), कोल्हापूर 29 (19), महाबळेश्‍वर 25 (15), मालेगाव 35 (16), नाशिक 30 (14), पुणे 31 (15), सांगली 29 (18), सातारा 29 (16), सोलापूर 32 (17), औरंगाबाद 32 (16), उस्मानाबाद 31 (15), परभणी 31 (16), अकोला 33 (17), अमरावती 30 (18), ब्रम्हपुरी 31 (18), बुलडाणा 30 (17), नागपूर 31 (16), वर्धा 31 (16), यवतमाळ 30 (16)
---------------------- 

Tuesday, October 28, 2014

कोकणात पाऊस वाढणार

निलोफरचा प्रभाव 31 पासून वाढणार

पुणे (प्रतिनिधी) ः अरबी समुद्रातील निलोफर चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येत्या शुक्रवारपासून (ता.31) गुजरातबरोबरच कोकणातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यापासून सुमारे एक हजार 100 किलोमिटर अंतरावर सक्रीय आहे. गुरुवारी सकाळपर्यंत (ता.30) कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्याच्या उर्वरीत भागात हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

पश्‍चिम मध्य अरबी समुद्रावर असलेल्या निलोफर चक्रीवादळाची तिव्रता आणखी वाढून त्याचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात झाले आहे. मंगळवारी सकाळी ते आणखी उत्तर वायव्येकडे सरकले. त्याचा केंद्रबिंदू गुजरातमधील नलियापासून नैऋत्य दिशेस एक हजार 110 किलोमिटर आणि पाकिस्तानातील कराचीपासून दक्षिण-नैऋत्य दिशेस एक हजार 150 किलोमिटर अंतरावर होता.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. वेंगुर्ला येथे सर्वाधिक 10 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. राज्याच्या उर्वरीत भागात हवामान कोरडे होते. निलोफरच्या प्रभावामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल सात अंशापर्यंत उल्लेखनिय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणिय घट झाली आहे. उर्वरीत राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. उर्वरीत राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. कोकणात बहुतेक ठिकाणी कमाल व किमान तापमानात अवघा चार पाच अंशाचा फरक अनुभवास आला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान डहाणू व अलिबाग येथे प्रत्येकी 31.1 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर सर्वात कमी तापमान नाशिक येथे 14 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

मंगळवारी (ता.28) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील राज्यातील प्रमुख ठिकाणचे कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 30 (24.2), अलिबाग 31.1 (23.2), रत्नागिरी 27.3 (21), पणजी 29.4 (22.4), डहाणू 31.1 (22.5), पुणे 26 (19), जळगाव 28.2 (15.3), कोल्हापूर 23.1 (20), महाबळेश्‍वर 20.1 (15), मालेगाव 30.4 (15.6), नाशिक 27.8 (14), सांगली 23 (17.7), सातारा 25.3 (16.5), सोलापूर 28.1 (17.6), उस्मानाबाद 26.8 (15.5), औरंगाबाद 27 (15.2), परभणी 28.5 17.2), नांदेड 29 (15.5), अकोला 29.4 (17.2), अमरावती 26.8 (18), बुलडाणा 26.6 (16.6), ब्रम्हपुरी 29.9 (18.4), गोंदिया 27.1 (16.2), नागपूर 28.9 (17.1), वाशिम 29 (20.2), वर्धा 28.5 (17.4), यवतमाळ 28 (15.2)
--------------------- 

Wednesday, October 22, 2014

करिअर कट्टा - केंद्रीय सहाय्यक कृषी आयु्क्त

केंद्रीय कृषी विभागात
कंत्राटी सहाय्यक आयुक्त भरती

केंद्रीय कृषी मंत्रालयातील कृषी व सहकार विभागात नवीन दिल्ली येथे सहाय्यक आयुक्त पदाच्या चार जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अन्न व नगदी पिकांच्या क्षेत्रात पाच वर्षाहून अधिक अनुभव असलेले राज्य किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्था, विद्यापीठे व इतर संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कृषी पदवी व पदव्युत्तर पदवीधारक व्यक्ती यासाठी पात्र आहेत. डिसेंबरचा दुसरा आठवडा ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ ः http://agricoop.nic.in 

करिअर कट्टा - केंद्रीय कृषी उपायुक्त

केंद्रीय कृषी विभागात
कंत्राटी उपायुक्त भरती

केंद्रीय कृषी मंत्रालयातील कृषी व सहकार विभागात नवी दिल्ली येथे उपायुक्त पदाच्या सहा जागा डेप्युटेशन, कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यासाठी देशभरातील इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अन्न व नगदी पिकांच्या क्षेत्रात दहा वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्था, विद्यापीठे व इतर संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कृषी पदवी व पदव्युत्तर पदवीधारक व्यक्ती यासाठी पात्र आहेत. डिसेंबरचा दुसरा आठवडा ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ ः http://agricoop.nic.in 

करिअर कट्टा - कृषी विज्ञान केंद्र गुजरात

कृषी विज्ञान केंद्रात
रिक्त पदांची भरती

उत्तर गुजरातमधील सरस्वती ग्राम विद्यापीठाच्या सामोडा-गनवाडा (जि. पाटण) येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रकल्प समन्वयक व विषय विशेषज्ञ पदांच्या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. विषय विशेषज्ञ पदासाठी कृषी किंवा संलग्न पदव्युत्तर पदवी आणि कृषी विस्तारात दोन वर्षांचा अनुभव ही पात्रता आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 39 हजार 100 रुपये व अतिरिक्त भत्ते देण्यात येणार आहेत. प्रकल्प समन्वयक पदासाठी पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्‍टरेट आणि सहा ते आठ वर्षांचा अनुभव अशी पात्रता आहे. निवड होणाऱ्या उमेदवारास दरमहा 67 हजार रुपये व इतर भत्ते असे वेतन देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः 02767 285528, ई-मेल kvksamoda@yahoo.com
---------------- 

करिअर कट्टा

राष्ट्रीय साखर संस्थेत
ज्युनियर रिसर्च फेलो भरती

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथिल राष्ट्रीय साखर संस्थेत रसायनशास्त्र विभागाअंतर्गत ज्युनियर रिसर्च फलो (जेआरएफ) पदाच्या सहा रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र व कृषीरसायनशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीधर यासाठी पात्र आहेत. इच्छूक उमेदवारांच्या छानणीतून निवडक उमेदवारांच्या मुलाखतींतून गुणानुक्रमे अंतिम निवड करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2014 ही आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ ः http://nsi.gov.in
-------------- 

गहू, हरभरा, ज्वारीसाठी हवामानाधारित रब्बी पिक विमा सुरु

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये चालू रब्बी हंगामात गहू, हरभरा व ज्वारी पिकासाठी हवामानाधारित पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारी व गहू, नगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात रब्बी ज्वारी व हरभरा तर अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांत गहू व हरभरा पिकांसाठी हेक्‍टरी 20 हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करण्यात येणार आहे. हरभरा व ज्वारीसाठी 31 ऑक्‍टोबर तर गहू पिकासाठी 22 नोव्हेंबर ही सहभागाची अंतिम मुदत आहे.

हवामानाधारीत रब्बी पिक विमा योजना राबविण्यात येणाऱ्या पाचही जिल्ह्यांमध्ये या योजनेबरोबरच राष्ट्रीय कृषी पिक विमा योजनाही सुरु राहणार आहे. संबंधित पिकांसाठी पिक कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजना लागू असलेल्या जिल्ह्यांतील संबंधीत पिकाचे उत्पादन घेणारे सर्व शेतकरी विमा योजनेत सहभागासाठी पात्र आहेत. महसूल मंडळ स्तरावर हवामान घटकांच्या नोंदी घेणअयासाठी नोंदणीकृत त्रयस्थ संस्थेमार्फत स्वयंचलित संदर्भ हवामान केंद्र उभारणी करण्याची जबाबदारी भारतीय कृषी विमा कंपनीवर राहणार आहे.

विमा कालावधी संपल्यानंतर 45 दिवसात भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अदा करणे विमा कंपनीवर बंधनकारक आहे. विमा हप्ता अनुदान व अवेळी पाऊस, तापमान व आद्रता या बाबींची आकडेवारी वेळेत मिळण्याच्या अटिंच्या आधिन राहून विमा कंपनी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना बॅंकांमार्फत देणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन हवामानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत पिकास होणाऱ्या आर्थिक नुकसानीस संरक्षण मिळावावे, असे आवाहन विमा कंपनीचे क्षेत्रिय व्यवस्थापक डी. डी. डांगे यांनी केले आहे.

- बॅंकांची जबाबदारी महत्वाची
हवामान आधारीत विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांना विमा प्रस्तावामधील माहिती भरणे व कागदपत्रे सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी बॅंकांवर राहणार आहे. यासाठी त्यांना विमा हप्त्याच्या चार टक्के रक्कम कमिशन म्हणून देण्यात येणार आहे. वित्तिय संस्थांच्या तृटींमुळे, दिरंगाईमुळे किंवा हलगर्जीपणामुळे योजनेच्या लाभापासून योजनेत सहभागी झालेले शेतकरी वंचित राहिल्यास या संबंधात काही नुकसान भरपाई द्यावयाची झाल्यास त्याची जबाबदारी संबंधीत वित्तीय संस्थेवर राहणार आहे.

- शेतकऱ्यांनी हे करावे
हवामानाधारिक विमा योजनेचा लाभ घेऊ इच्छिनाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या बॅंकेत किंवा प्राथमिक कृषी सहकारी संस्थेत विम्याचा प्रस्ताव सादर करावा. अंतिम मुदतीच्या आत पेरणी झाल्याचा सात बारा उतरा किंवा पेरणी केल्याचे प्रमाणपत्र विमा प्रस्तावासोबत द्यावे. शेतकऱ्यांनी एका क्षेत्रासाठी एकदाच आणि एकाच विमा कंपनीकडून विमा संरक्षण घेणे बंधनकारक आहे. जर त्याने एकाच क्षेत्रासाठी दोन दिंवा त्यापेक्षा अधिक विमा संरक्षण एकाच किंवा वेगवेगळ्या कंपन्यांकडून घेतले तर त्याचा जमा विमा हप्ता जप्त करण्यात येणार आहे.

*चौकट
- असे आहे संरक्षण
पिक --- जिल्हा --- विमा संरक्षण (रुपये, प्रति हेक्‍टर) ---- शेतकऱ्यांनी विमा हप्ता
हरभरा --- नगर, उस्मानाबाद, अमरावती, नागपूर --- 20,000 --- 900
रब्बी ज्वारी --- सोलापूर, नगर, उस्मानाबाद --- 18,000 --- 864
गहू --- सोलापूर, अमरावती, नागपूर --- 20,000 --- 840
---------------
*चौकट
- विमा संरक्षित बाबी व संरक्षण
पिक --- विमा संरक्षित बाबी व कंसात विमा संरक्षणाची रक्कम (रुपये)
गहू --- अति तापमान (8000), अवेळी किंवा अती पाऊस (8000), रोगाला अनुकूल हवामान (4000)
ज्वारी --- अति तापमान (5400), कमी तापमान (7200), आद्रता (1800), अवेळी किंवा अति पाऊस (3600)
हरभरा --- अति तापमान (8000), कमी तापमान (4000), अवेळी किंवा अति पाऊस (4000), रोगाला अनुकूल हवामान (4000)
-------------- 

Tuesday, October 21, 2014

कात्रज डेअरीचे खरेदी दर कायम

पुणे जिल्हा दुध संघामार्फत
दुध खरेदी दर कायम

पुणे (प्रतिनिधी) ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर कमी झाल्याने खासगी दूध व्यावसायिकांनी दूध धरेदी दरात प्रति लिटर एक रुपया कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे दुध उत्पादक आधीच अडचणीत असल्याने पुणे जिल्हा दुध संघामार्फत दुध खरेदी दरात कपात करण्यात येणार नाही. शेतकऱ्यांना शासनाने निर्धारीत केलेल्या दराहून जादा दर देण्यात येत असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी संघाला दुध पुरवठा करावा, असे आवाहन दुध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी केले आहे.

जिल्हा दुध उत्पादक संघ सध्या उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी (3.5 फॅट व 8.5 एसएनएफ) 24 रुपये खरेदी दर देत आहे. दूध संस्थांना त्यांच्या वरकड खर्चासाठी प्रति लिटर एक रुपया व वाहतुकीसाठी प्रतिलिटर किमान 95 पैसे स्वतंत्रपणे देत आहे. संस्थांनी 2013-14 मध्ये संघास पुरवठा केलेल्या दुधावर सहकारी संस्थांसाठी पहिल्या टप्प्यात प्रति लिटर 25 पैसे दुध दर फरकाची रक्कम संस्थांना 16 ते 30 सप्टेंबर 2014 च्या दुध बिलात दिलेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रति लिटर 25 पैसे दुध दर फरकाची रक्कम संस्थांना 31 मार्च 2015 पुर्वी देण्यात येणार आहे.

दुध उत्पादकांच्या मदतीला प्रत्येक वेळी सहकारी दुध संघच धावून आलेला आहे. याची जाणीव ठेवून दुध उत्पादक शेतकऱ्यांनी सहकारातील कात्रज डेअरीस जास्तीत जास्त दुध पुरवठा करावा, असे आवाहन श्री. खिलारी यांनी केले आहे.
--------------- 

राजकीय लढ्यात शेतकरी संघटनांना धोबीपछाड !!!

पुणे (प्रतिनिधी) ः शेतीप्रश्‍नांचा जागर करत विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या शेतकरी संघटनांच्या सर्व उमेदवारांच्या पदरी पराभव पडला आहे. संघटनांनी लढवलेल्या 55 हून अधिक जागांपैकी अवघ्या आठ जागांवर संघटनांच्या नेत्यांनी लुटूपुटीची लढत दिली. उर्वरीत सर्व ठिकाणी संघटनांच्या नेत्यांना मतदारांनी खिजगिणतीतही धरले नसल्याचे निकालांवरुन स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतकरी संघटनांचे राजकीय स्थान, ताकद व आवाक्‍याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने स्वबळावर 40 मतदारसंघांमध्ये प्रस्थापित नेतृत्वाला आव्हाण दिले होते. यापैकी एकाही ठिकाणी संघटनेला यश आले नाही. एकाही लढतीत संघटनेच्या उमेदवारांना पहिल्या पाच उमेदवारांमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. स्वाभीमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेशी फारकत घेऊन भाजपशी घरोबा केला होता. मात्र मोदींची लाट आणि त्यांच्या सभांचा थाट स्वाभीमानीच्या कामी आला नाही. संघटनेच्या सर्व उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.

दुसरीकडे शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठवून धोरणात्मक सुधारणांवर भर देणारे भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. लातूरमधील औसा मतदारसंघातून त्यांना अवघ्या 37 हजार 414 मतांनिशी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवार कॉग्रेसचे बसवराज पाटील यांना 64 हजार 237 मते मिळाली. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने या निवडणूकीत कार्यकर्त्यांना सर्वपक्षिय रान मोकळे करुन दिल्याने त्यांच्या राजकीय लढ्याचा प्रश्‍नच उपस्थित झाला नाही.

स्वाभीमानीचे आठ उमेदवार या निवडणूकीत थोडीफार मजल मारु शकले. कोल्हापूरमध्ये पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघात अमरसिंह पाटील सुमारे 28 हजार मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर, हातकणंगलेमध्ये प्रमोद कदम 21 हजार 318 मते मिळवून चौथ्या क्रमांकावर तर शिरोळमध्ये सावकार मादनाईक हे 48 हजार 511 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहीले. सातारा जिल्ह्यात फलटनमध्ये पोपटराव काकडे 24 हजार 529 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर, कोरेगावमध्ये संजय भगत हे 13 हजार 126 मते मिळवून चौथ्या क्रमांकावर तर कराड उत्तर मध्ये मनोज घोरपडे 43 हजार 903 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहीले.

ज्यांच्या विरुद्ध आत्तापर्यंत अनेकदा आंदोलने केली त्या साखरसम्राटांनाच उमेदवारी दिल्याने स्वाभीमानीच्या शेतकरी प्रश्‍नावर लढण्याच्या भुमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. कारखानदार उमेदवार, त्यात भाजप व इतर मित्र पक्षांचा शत प्रतिशत पाठींबा एवढा सगळा लावाजमा असतानाही स्वाभीमानीच्या उमेदवारांना फड जिंकता आला नाही. पंढरपुरमध्ये आयात कारखानदार उमेदवार म्हणून टिका झालेल्या स्वाभीमानीच्या प्रशांत परिचारकांना संघटनांच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक 82 हजार 950 मतांचा जनाधार मिळाला. मात्र यानंतरही कॉग्रेसच्या भारत भालके यांनी त्यांचा सुमारे नऊ हजार मतांनी दणदणीत पराभव केला. परिचारकांप्रमाणेच राष्ट्रवादीतून आलेल्या संजय शिंदे यांना अवघ्या दोन हजार मतांच्या फरकाने तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानत पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे सर्व विरोधकांची मोट बांधून जयंत पाटलांसह राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांना पराभूत करण्यासाठी केलेले स्वाभीमानीचे प्रयत्नही निरर्थक ठरले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी म्हणाले, ""उमेदवारांच्या पराभवाच्या अनुषंगाने मी सगळ्या बाजूने विचार करुन पाहीला. पण एकच बाब निदर्शनास आली. बहुतेक ठिकाणी बहुरंगी लढत असल्यामुळे पैशाचा वापर वारेमाप झाला. प्रत्येकाने कमी पडणारी 10-20 हजार मते विकत घेतली. नगरपालिकेसारखा दर निघाला. आम्ही हे केले नाही. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर चळवळी करणारी आम्ही माणसं. शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे न्याय देता येईल म्हणून काही लोकांना विधानसभेत पाठविण्याचा प्रयत्न केला. पण लोकांना आम्ही फक्त रस्त्यावरच चळवळी करत रहावं असं वाटत असेल तर आम्हाला मान्य आहे. यापुढेही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळी सुरुच राहतील.''

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, ""चारही प्रमुख पक्षांच्या तुल्यबळ पैसा खर्च करणाऱ्या उमेदवारांच्या झंजावातात शेतीचे प्रश्‍न, शेतकरी, तत्वज्ञान सगळे बाजूला फेकले गेले. शेतकऱ्यांचा माल स्वस्त घ्यायचाय अशा मानसिकतेच्या लोकांना शेतकऱ्यांनीच कल दिलाय. शेतकरी अजून शेतकरी म्हणून मतदान करत नाही. शेतकऱ्यांचे हे अज्ञान अडचणीचे ठरते. राजकीय अभिनिवेश, गावातील इर्षा, स्थानिक स्पर्धा याभोवतीच लोक गुरफटतात. सोनिया काय नी मोदी काय या बदलाने आपल्या जिवनात काही पडत नाही. हे लोकांच्या लवकरच लक्षात येईल. शेतकरी लवकरच शेतकरी म्हणून मतदान करतील. एक ना एक दिवस लोकांना शेतकरी संघटनेच्या मुद्‌द्‌यांवर यावच लागेल. शेतीच्या मुद्‌द्‌यांना बगल देवून कुणालाही काहीही करता येणार नाही. शेतकरी संघटनेचा लढा असाच किंबहुना अधिक जोमाने सुरु राहील.''
---------
*चौकट
- स्वाभिमानीचा घरोबा चुकला !
स्वाभीमानी शेतकरी संघटनेने यंदा शिवसेनेशी असलेली महायुती तोडून मोदी लाटेत हात धुवून घेण्याच्या इराद्याने भाजपशी घरोबा केला. मात्र प्रत्यक्षात याचा त्यांना काहीही फायदा झाला नाही. उलट कशीबशी तटपुंजी झुंज दिलेल्या आठ पैकी चार ठिकाणी त्यांना शिवसेनेच्या उमेदवारांकडून माती चाखावी लागली. तर उर्वरीत तीन ठिकाणी राष्ट्रवादी व एका ठिकाणी कॉग्रेसकडून भुईसपाट होताना शिवसेनेची मतविभागणीही निर्यायक ठरली. भाजपशी घरोब्याऐवजी शिवसेनेशी जवळीक कायम ठेवली असती तर कदाचित चार, सहा जागा स्वाभीमानीच्या पदरी पडल्या असत्या, असे चित्र आहे.

*कोट
""शेतकरी अजून शेतकरी म्हणून मतदान करत नाही, ही मोठी समस्या आहे. मोदी आले म्हणून बदल होत नाही, हे शेतकऱ्यांना लवकरच कळेल. तो दिवस दुर नाही.''
- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना

""शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे न्याय मिळवून विधानसभा निवडणूक लढलो. पण लोकांना आम्ही फक्त रस्त्यावरच चळवळी करत रहावं असं वाटत असेल, तर आम्हाला मान्य आहे.''
- राजू शेट्टी, प्रमुख, स्वाभीमानी शेतकरी संघटना 

जिताडा संशोधन प्रकल्पावर शेतकरी मेळावा


जिताडा संवर्धन प्रकल्पावर
1 नोव्हेंबरला शेतकरी मेळावा

पनवेल, जि. रायगड ः पनवेल येथिल खार जमीन संशोधन केंद्रात जिताडा माशांची पिंजऱ्यामध्ये कृत्रिम खाद्य वापरुन वाढ व जगणूकीचा अभ्यास सुरु आहे. संशोधन केंद्रामार्फत शेतकऱ्यांना हा प्रकल्प दाखविण्यासाठी येत्या 1 नोव्हेंबरला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिताडा माशाच्या चवीमुळे बाजारात त्यास प्रचंड मागणी आहे. रायगड जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीचा वापर करुन तलावामध्ये त्याचे संवर्धन केले जाते. जिताडा मासा मांसाहारी असल्याने तलावात पुरेसे खाद्य न मिळाल्यास तो इतर मासे खावून फस्त करतो. तसेच तो स्वकुलभक्षक असल्याने स्वतःच्या जातीचे मासेही खातो. यामुळे पारंपरिक पद्धतीने अतिशय कमी उत्पादन मिळते. यावर उपाय म्हणून रायगडच्या जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध निधीतून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत पनवेल येथिल खार जमीन संशोधन केंद्रात जिताडा संवर्धन प्रयोग राबविण्यात येत आहेत. यामध्ये जिताडाचे पिंजऱ्यात कृत्रीम खाद्य देऊन संवर्धन करण्यात येत आहे. हे सर्व प्रयोग शेतकऱ्यांना दाखविण्यासाठी केंद्रामार्फत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खार जमीन शास्त्रज्ञ डॉ. के. डी. पाटील यांनी केले आहे.
------------------------ 

Friday, October 17, 2014

पुस्तक परिचय - गडकोट, अपरिचित गडकोट, दुर्गम दुर्ग - भागवान चिले


जावे पुस्तकांच्या गावा - संतोष डुकरे
---------------
पुस्तकाचे नाव - दुर्गम दुर्ग
पृष्ठे - 133
मुल्य - 150

पुस्तकाचे नाव - गडकोट
पृष्ठे - 128
मुल्य - 150 रुपये

पुस्तकाचे नाव - अपरिचित गडकोट
पृष्ठे - 133
मुल्य - 150 रुपये
---------------
दुर्गम गडांच्या सोप्या वाटा !

भगवान चिले आणि शिवस्पर्श प्रकाशन ही नावे दुर्गप्रेमींना नवीन नाहीत. महाराष्ट्रातील किल्ल्यांची भ्रमंती, अभ्यास व माहिती प्रसार यात ही नावे अग्रणी आहे. गडकोट मालिकेतील त्यांचे दुर्गम दुर्ग हे नविन पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्रातील 40 दुर्लक्षित, चढाईसाठी अवघड अनोख्या किल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे. पदरगड, भैरवगडापासून ते रांजणगिरीपर्यंतच्या अनेक वैविध्यपुर्ण किल्ल्यांचा यात समावेश आहे. अपरिचित गडकोट या पुस्तकात अलंग, मदन, कुलंग, चंदेरी, कंडाळा अशा 35 दुर्लक्षित किल्ल्यांचा धांडोळा घेण्यात आला आहे. तर गडकोट या पुस्तकात राज्यातील लोकप्रिय, प्रसिद्ध व सातत्याने चर्चेत असलेल्या 51 किल्यांची माहीती आहे.

सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात दर वर्षी हजारो सह्यवेडे फिरत असतात. मुख्य आकर्षण गड किल्ले हेच असते. मग माध्यम ट्रेकिंगचे असो, रॉक क्‍लायंबिंगचे, सायकलिंग, इतिहास वा निसर्ग अभ्यासाचे. योग्य माहिती हाताशी असेल गडाबरोबर त्याभोवतीचे आसमंतही उलगडत जाते. मग किल्ला फक्त किल्ला न राहता प्रेरणास्त्रोत होतो. सह्याद्रीच्या कुशीत अशी 500 हून अधिक प्रेरणास्थळे आहेत. जाज्वल्य इतिहास मनाला भिडला की वर्तमान प्रबळ व भविष्य उज्वल होते, असे म्हणतात. एकेका किल्ल्याचे वर्णन वाचल्यानंतर त्यास भेट देण्याची उर्मी जागृत होते, हे या पुस्तकांचे यश आहे. चिले यांनी वाचकाचे बोट धरुन त्याला चिकित्सकपणे किल्ल्याच्या कानाकोपऱ्यात फिरवले आहे. गडवाटा, स्थळ नकाशे, दुर्गावशेषांची माहिती, इतिहास व त्यास सद्यस्थितीच्या रंगित छायाचित्रांची जोड ही या पुस्तकांची वैशिष्ट्ये आहेत. या पुस्तकांच्या आधारे दुर्गम गड किल्ल्यांच्या खडतर वाटाही वाचकांसाठी सोप्या होतील, हे निश्‍चित.
---------------
अधिक माहितीसाठी संपर्क ः भागवान चिले 9890973437
--------------- 

Thursday, October 16, 2014

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भात अनेक ठिकाणी मॉन्सूनने दमदार हजेरी लावली. मराठवाडा, खानदेश व पश्‍चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. हवामान खात्याने रविवारी सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्‍त केला आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रात सातारा व कोकणात वेंगुर्ल्यापर्यंतच्या भागातून मॉन्सून माघारी फिरलेला आहे. कोकणात बहुतेक ठिकाणी कोरडे हवामान आहे. रविवारपर्यंत मॉन्सूनच्या माघारीच्या वाटचालीत आणखी प्रगती होण्याची शक्‍यता असून, मध्य भारताच्या आणखी काही भागातून तो माघारी येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. 16) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये ः विदर्भ ः सेलू 60, पारशिवनी 50, वाशीम, रामटेक प्रत्येकी 40, सडकअर्जुनी, सालेरसा, नरखेड, राळेगाव प्रत्येकी 20, घाटंजी, मौदा, अर्जुनीमोरगाव, कळमेश्‍वर प्रत्येकी 10; मराठवाडा ः चाकूर, निलंगा, रेणापूर प्रत्येकी 10; मध्य महाराष्ट्र- पाथर्डी 40, जेऊर 20; कोकण गोवा ः काही नाही.
-------------
१६ आॅक्टोबर

सेंद्रीय शेती यशोगाथा - गणपत औटी, बेल्हा, ता. जुन्नर, जि. पुणे


अल्पभुधारक शेतकर्याची आदर्श सेंद्रीय शेती
------------------------
संतोष डुकरे
-------------------------
सेंद्रीय शेती ही फक्त शेती नाही तर ती शेतकऱ्याची संपन्न शाश्‍वत नैसर्गिक जिवनपद्धती आहे. संख्या कमी असली तरी राज्यात विखूरलेल्या स्वरुपात ठिकठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी जिवनपद्धती अमलात आणली आहे. गणपत सुदाम औटी (बेल्हे, ता.जुन्नर, पुणे) हे अशाच निसर्गवेड्या शेतकऱ्यांमधील एक व्यक्तिमत्व. नैसर्गिक वा सेंद्रीय शेतीचा त्यांचा ध्यास एवढा प्रखर आहे की गेली 15 वर्षे स्वतःच्या 30 गुंठे शेतीबरोबरच शेतकऱ्यांकडे वाट्याने केलेल्या पिकांचेही ते सेंद्रीय पद्धतीने दर्जेदार उत्पादन घेत आहेत.
--------------------------
रासायनिक किटकनाशके आणि खतांचा शेतीतील वापर यामध्ये जुन्नर तालुका हा देशातील अग्रणी तालुक्‍यांपैकी एक आहे. द्राक्ष, डाळींबासारख्या फळबागा, टोमॅटो, कांदा यासारखी नगदी भाजीपाला पिके यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक वापरले जातात. अनेक गावांमध्ये एकच एक पिकामुळे किड नियंत्रणाबाहेर गेल्याने काही पिकेच हद्दपार होण्यासारख्या घटनाही घडलेल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आणि हातात फक्त 30 गुंठे जमीन असतानाही अतिचा हव्यास टाळून औटी कुटुंबाने सेंद्रीयचा मार्ग अवलंबून शेती भरघोस उत्पादनाची शाश्‍वत केली आहे.

गणपतरावांची शाळा सहावीतून सुटली आणि त्यांचा शेतीतला प्रवास सुरु झाला. कुटुंबाची शेती बऱ्यापैकी पण पाण्याची पिढीजात अडचण. सर्व शेती कोरडवाहू. पावसाच्या पाण्यावर येईल ते पिक घ्यायचे अशी स्थिती. पाऊस कमी असला तरी कुटुंबाच्या गरजेपुरते चांगले पिकायचे. वडील, चुलते, सहा भावंडांचे मोठे कुटुंब. हाती येईल ते काम करता करता गणपतरावांवर शेतीचे संस्कार झाले. पुढे 1986 ला लग्न झाल्यानंतर कामासाठी त्यांनी गाव सोडले. सलग दहा वर्षे त्यांनी औरंगाबाद, सातारा, नाशिक, वापी आदी ठिकाणी पाण्याच्या टाक्‍या, जलशुद्धीकरण प्रकल्पांवर काम केले. यानंतर 1996 साली बाहेरची कामे सोडून ते पुन्हा शेतीवर परत आले आणि शेतीत झोकून दिले.

भावाभावात झालेल्या जमिनीच्या अघोषीत वाटण्या, पाण्याची हक्काची सोय नाही, तीन सामायिक विहीरी, त्यावर 12-15 दिवसात एखाद दिवस येणारी पाण्याची बारी अशा सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे श्री. औटी यांच्या शेतीवर मर्यादा आल्या. सध्या त्यांच्या ताब्यात कुटुंबाची 30 गुंठे जमीन असून त्यावर गेल्या 15 वर्षापासून ते सेंद्रीय पद्धतीने बहुविध पिकांचे उत्पादन घेत आहेत. यात 26 वर्षे वयाची राजापूरी, केशर व हापूस आंब्याची सात झाडे, मोसंबी, संत्रा, लिंबू, नारळ आदी फळपिके, नव्याने लावलेली डाळींबाची 40 झाडे, संरक्षित पाण्यासाठी यंदा तयार केलेले छोटे शेततळे व अनेकविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

- औषधी वनस्पती व मसाला पिके
अवघी 30 गुंठे जमीन असल्याने उपलब्ध क्षेत्राचा इंच न्‌ इंच काटेकोर वापर श्री. औटी यांनी केला आहे. बांध, सावलीतील पिके, हळदीसारखी मसाला पिके, गवती चहा, धोतरा, तुळस यासह अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती त्यांच्या शेतात आहेत. आठवडे बाजारासाठी अळूचेही उत्पादन घेतात. घराशेजारीच वांगी, कारली आदी भाजीपाल्याही गावात विक्री केली जाते. कुटुंबाची दैनंदिन गरज या शेतीत पूर्ण भागत आहे. आंबा, संत्रा, मोसंबी यांसह सर्वच पिकांचे उत्पादन भरघोस आहे. नाशिकसह अनेक फळ महोत्सवांमध्ये त्यांच्या आंबा, नारळ आदी फळांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे.

- वाट्याच्या पिकांसाठीही सेंद्रीय पद्धती
घरची शेती कमी असल्याने श्री. औटी कुटुंबीय इतर शेतकऱ्यांकडे वाट्याने म्हणजेच भागिदारीत विविध पिकांचे उत्पादन घेतात. निम्मा वाटा, तिसरा वाटा असे पिकानुसार या भागिदारीचे स्वरुप असते. निम्म्या वाट्यात होणारा सर्व खर्च निम्मा निम्मा असतो. तर तिसऱ्या वाटा हा पिक उत्पादनासाठी सर्व श्रमचा मोबदला असतो. दुसऱ्या शेतीतही सेंद्रीय पद्धतीनेच रासायनिक पेक्षा सरस उत्पादन घेण्याची जबाबदारी गणपतराव स्वतःच्या खांद्यावर घेतात व यशस्वीपणे पार पाडतात. 2006 साली त्यांनी आर्वी पिंपळगाव येथील मधुसुदन देवकर यांच्याकडे दीड एकर कांद्यापासून पाच लाख रुपये उत्पन्न मिळवले होते. गेल्या काही वर्षापासून ते गावातील शेतकरी हरीदास भिकाजी ताजवे यांच्या चार एकर जमीनीवर वाट्याने पिके घेत आहेत.

- ऐकेक दाना लागवड, भरघोस उत्पादन
श्री. औटी यांनी 2011 मध्ये तीन फुट बाय एक फुट अंतरावर सरी पद्धतीने आणि विशेष म्हणजे हाताने एक एक दाना वेगळा करुन बाजरीची लागवड केली. अवघ्या पाऊन किलो बियाण्यापासून त्यांना एक टन बाजरीचे धान्य उत्पादन मिळाले. गेली चार वर्षे कुटुंबाला ही बाजरी व त्याचे गुरांसाठीचे सरमाड (वैरण) संपलेले नाही. गेली सहा वर्षे त्यांनी शेतात ट्रॅक्‍टर किंवा बैल आणलेले नाहीत. आवश्‍यकतेनुसार हवी ती मशागत हाताने करतात. दुष्काळ, पाणी टंचाई, गारपीट यांचा सामना औटी कुटुंबियांनाही वेळोवेळी करावा लागला. या प्रत्येक संकटात त्यांचा सेंद्रीय शेतीवरचा विश्‍वास अधिक वाढला.

- माती पहेलवान, पिक बलवान
योग्य नियोजन व काटेकोर लक्ष देऊन बनविलेली सुपिक जमीन हे श्री. औटी यांच्या शेतीचे मुख्य बलस्थान आहे. शेतात कुठेही थोडी माती उकरुन पाहिली तर मोठ्या संख्येने गांडुळे आढळतात. गांडूळ खताचे दोन बेड तयार केले असून त्यातून दर तीन महिन्याला 40 गोणी खत तयार होते. घरच्या गावठी गाईच्या शेणाची स्लरीही पिकांना दिली जाते. किड रोग नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, करंजी तेल व इतर जैविक पद्धतींचा वापर केला जातो.

- रुपयाला रुपयाचे अर्थशास्त्र
शेतीमध्ये गुंतवलेल्या रुपयापासून रुपया उत्पन्न मिळाले पाहिजे असे गणपतराव औटी यांच्या शेतीचे अर्थशास्त्र आहे. घरच्याच बियाण्याचा, खतांचा व इतर निविष्ठांचा वापर होत असल्याने उत्पादन खर्च कमी आहे. किड रोगांचा प्रादुर्भाव फारसा नसल्याने पिकाची गुणवत्ता व प्रतवारीही चांगली आहे. परिणामी दरही चांगले मिळत असून रुपयाला रुपया मिळत असल्याचे ते सांगतात. घरची शेती थोडी असल्याने वाट्याच्या शेतीतही सेंद्रीय पद्धतीने रुपयाला रुपया नफा मिळविण्याचा प्रयत्न असतो, असे श्री. औटी यांनी सांगितले.

- ऍग्रोवनचे "डाय हर्ट फॉलोअर'
गणपतराव औटी हे ऍग्रोवनचे नियमित वाचक असून ऍग्रोवनचे सर्व अंक त्यांच्या संग्रही आहेत. रात्री कधी जाग आली तरी ते अंक काढून वाचत बसतात. विशेषतः सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती याविषयी आलेली माहिती त्यांनी कात्रणे करुन जपून ठेवली आहे. ऍग्रोवनमधून राज्यातील अनेक तज्ज्ञांशी त्यांचा ऋनानुबंध तयार झाला असून दुरध्वनीवर एकमेकाच्या संपर्कात राहून तो अधिक वाढवल्याचे ते आवर्जुन सांगतात.

*कोट
""कुटुंब फक्त नावापुरते एकत्र आहे. वाटण्या झालेल्या नाहीत, इतर भावांनी घेतल्यानंतर उरलेली 30 गुंठे जमीन आम्ही कसतोय. सगळी गुंतागुंत आहे. पण सेंद्रीय शेतीच करायची हा यांचा ध्यास आहे. त्याचे फायदे आम्ही बघतोय. त्यामुळे शेती करायची तर सेंद्रीयच हे आता मुलांच्याही अंगवळणी पडले आहे.''
- सौ. कुंदा गणपत औटी
--------------------------
भुमातेला सुवर्णदान !

ब्रिटिशांच्या जुलमी पाशातून
क्रांतीविरांनी भुमातेला सोडविले
तिच्या भल्यासाठी नेत्यांनी
आम्हाला क्रांतीचे धडे दिले
कोणी सांगितली हरितक्रांती
कोणी सुचविली धवलक्रांती
भुमातेच्या शोषणाची
कुणाला राहीली नाही भ्रांती

अस्सल देशी वाण सोडून,
संकरितांचा प्रसार झाला
विक्रमी पिकांच्या हव्यासाने,
तिच्यावर रसायनांचा भडीमार झाला
रोग वाढले न्‌व्÷िवषाचा वापर झाला
निकस, संकरित, विषारी अन्न खाऊनी
रोगराईचा भस्मासूर मानवापुढे ठाकला

धवलक्रांतीच्या ध्यासापोटी
देशी गोमातेला गहाण ठेवले
मांसासाठी संकरित केलेल्या वळुमुळे
दुध दुभत्याने मानवी आरोग्य सडले
विक्रमी उत्पादन म्हणून
नेत्यांनी स्वसत्कार घडविले
परदेशी कंपन्यांची चंगळ उडाली
शेतकऱ्यांची मात्र कर्ज वाढली
कर्जे फेडण्यासाठी कर्जे काढली
सावकारी पाशामुळे आत्महत्यांची पाळी आली

सुवर्णयुग पाहणाऱ्या भुमातेला
विषारी रसायनाने वैराग्य आले
तरी नेत्यांचे डोळे उघडत नाही
निसर्गाशी दोन हात करुन
कुणाचेही भले होत नाही
अमृताच्या फळासाठी विष पेऊन चालत नाही
शेतकऱ्यांनो आता विचार करा
निसर्ग नियमांची कास धरा
ऋषीमुनींनी दिलेल्या ज्ञानाचा पुनश्‍च वापर करा
आपल्या भुमातेला सुवर्णयुगाचे दान करा !
- गणपत औटी
-------------------------------
संपर्क -
गणपत सुदाम औटी
मु. पो. बेल्हे (औटीमळा)
ता. जुन्नर, जि. पुणे
मोबाईल - 9404683986
--------------------------------





















Monday, October 13, 2014

शेतकरी नेत्यांचे भवितव्य पणाला

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वर्षानुवर्ष लढणाऱ्या विविध शेतकरी संघटनांचे सुमारे 55 हून अधिक उमेदवार यंदा विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. प्रस्थापित, सत्ताधारी व विरोधी उमेदवारांच्या धुराळ्यात रंगणाऱ्या बहुरंगी लढतींमध्ये राज्यातील शेतकरी राजा या सक्रीय शेतकरी नेत्यांवर कितपत विश्‍वास दाखवतो, या प्रश्‍नाचे उत्तर उद्या (ता.15) मतपेटीत बंद होणार आहे.

रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना या निवडणूकीत कुणाच्याही वळचणीला न जाता स्वबळावर लढत आहे. संघटनेचे सर्वाधिक 40 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यातील बहुसंख्य उमेदवारांनी शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरुन संघर्ष केलेला आहे. संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, पांडुरंग रायते, राहुल म्हस्के, मराठवाड्यात कालिदास आपेट यांच्यासह संघटनेच्या पहिल्या व दुसऱ्या फळीतील अनेक नेते कार्यकर्ते दंड थोपटून आहेत. विशेषतः रघुनाथदादा पाटील यांच्या वाळवा तालुक्‍यातून (सांगली) प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते विलास रकटे हे रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे.

राजू शेट्टींच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणूकीत शिवसेनेशी महायुती केल्यानंतर आता विधानसभा निवडणूकीसाठी महायुतीतून काडीमोड घेत भाजपच्या महाआघाडीशी घरोबा केला आहे. संघटना 13 जागांवर निवडणूक लढवत असून यातील बहुतांश ठिकाणी भाजपा व मित्रपक्षांनी संघटनेला पाठींबा दिलेला आहे. प्रशांत परिचारक, संजय शिंदे, प्रमोद कदम, जालंदर पाटील, विजय सिताफळे, अभिजीत पाटील आदी उमेदवार स्वाभीमानीमार्फत लढत आहेत.

शरज जोशी प्रणित शेतकरी संघटननेने या निवडणूकीत नेत्यांना "जो जे वांछिल तो ते लाहो' अशी मोकळीक दिल्याने संघटना निवडणूकीत थेट सक्रीय नाही. मात्र अनेक कार्यकर्ते ठिकाणी भाजपाच्या पाठीशी उभे आहेत. याशिवाय भाजपामधून विधानसभेवर उमेदवारी मिळालेले शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. राज्यात भाजपाचे सरकार आले तर कृषीमंत्री पदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात आहे.

नांदेडमध्ये किसान बिरादरी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ पाटील इजळीकर यांनी शेतकरी व शेतमजूरांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्‍न हाती घेऊन विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. भोकर मतदारसंघातून ते लढत आहेत. याशिवाय इतरही लहानमोठ्या शेतकरी संघटना संस्थांचे उमेदवार रिंगणात आहेत. यंदा बहुरंगी लढतींमुळे मोठी मतविभागणी होण्याचा अंदाज आहे. ही शेतकरी संघटनांच्या नेत्यांना मोठी संधी मानली जात आहे. अनेक ठिकाणी हे नेते किती मते खेचतात हे ही निर्णयक ठरेल. गेल्या आठ दिवसात सभा, बैठका, पदयात्रांच्या माध्यमातून या नेत्यांनी आपापले मतदारसंघ पिंजून काढले आहेत. आता शेतकरी मतदारांचा उद्याचा निर्णायक कौल या उमेदवारांचे भवितव्य निश्‍चित करणार आहे.
------------------- 

Friday, October 10, 2014

ऍग्रोवन कृषी प्रदर्शन 2014

पुणे (प्रतिनिधी) ः राज्य व परराज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या "ऍग्री एक्‍स्पो 2014' या कृषी प्रदर्शनाचे आयोजन "ऍग्रोवन'च्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. येत्या 12 ते 16 नोव्हेंबर दरम्यान सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या नवीन मैदानावर हे भव्य प्रदर्शन होणार आहे.

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कृषी उद्योजक आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन "ऍग्रोवन' गेली अनेक वर्षे "ऍग्री एक्‍स्पो'चे आयोजन करीत आहे. हे प्रदर्शन कृषी उद्योजक आणि शेतकऱ्यांमधील प्रभावी दुवा ठरत आहे. आधुनिक शेती पद्धतीसाठीची अवजारे, हार्वेस्टर, ट्रॅक्‍टरसह आधुनिक साधने, दुग्ध उत्पादन- प्रक्रिया उद्योगांची यंत्रे, जैविक कीटकनाशके, खते, बियाणे, विद्राव्य खते, ठिबक व तुषार सिंचन, बॅंका, स्वयंसेवी संस्था, कृषी शिक्षण, साहित्य, प्रकाशने, कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांची संशोधने, प्रात्यक्षिके आदींचा समावेश या प्रदर्शनात असेल.

राज्याबरोबरच परराज्यांतील शेतकरी, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय उद्योजक, कृषी व संलग्न शाखांचे विद्यार्थी आदींसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे. प्रदर्शनातील स्टॉल बुकिंगसाठी संपर्क चेतन ः 8308399100, रूपेश ः 8888529500, प्रशांत ः 8380081969.
-------------
"एक्‍स्पो 2014'ची वैशिष्ट्ये
- आंतरराष्ट्रीय दर्जाची भव्य मांडणी
- राज्याबरोबरच परराज्यांतील शेतकऱ्यांचा सहभाग
- नवनवीन अवजारे, यंत्रे, तंत्रज्ञानाचा समावेश
- आंतरराष्ट्रीय कृषी उद्योजकांचा सहभाग
- कृषीकेंद्रीत व्यवसायवृद्धीचे बीजारोपण
- ब्रॅण्ड लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची उत्तम संधी
- सकाळ माध्यम समूहातर्फे व्यापक प्रसिद्धी
- हजारो शेतकरी कुटुंबांत ज्ञान-तंत्रज्ञान प्रसार
-----------
गेल्या प्रदर्शनात (ऍग्री एक्‍स्पो 2013)
- इस्राईल, इटली, तैवानसह देश परदेशातील प्रमुख कंपन्यांचा सहभाग
- सूक्ष्म सिंचनाच्या 1500 हून अधिक संचांचे बुकिंग
- यंत्रे, अवजारांची मोठी खरेदी, उलाढाल
- विद्यापीठांच्या उत्पादनांची लाखो रुपयांची विक्री
- डेअरी सॉफ्टवेअर, मिल्किंग मशिनला मोठी पसंती
- कंपनी, उत्पादनांची शेतकऱ्यांकडून तुलनात्मक तपासणी, अभ्यास
- राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रदर्शन व त्यातील तंत्रज्ञानाचा प्रसार
------------- 

जलधारा, जलपुष्प, जलाशय, गंगोत्री - पुस्तक परिचय

जावे पुस्तकांच्या गावा
------------
संतोष डुकरे
------------
नाव ः जलधारा
पृष्ठे ः85
मुल्य ः 50
------------
नाव ः जलपुष्प
पृष्ठे ः 93
मुल्य ः 100
------------
नाव ः जलाशय
पृष्ठे ः 129
मुल्य ः 100
------------
नाव ः गंगोत्री
पृष्ठे ः 138
मुल्य ः 130
------------
दुष्काळमुक्ती, जलसाक्षरतेचे जनजागरण

दुष्काळ आणि सुकाळ या पाणी नावाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक होरपळवणारी तर दुसरी संपन्नतेची. दोन टोकाच्या या दोन बाजू त्यातील विरोधाभासासह वर्षानुवर्षे कायम आहेत. दुष्काळ हटविण्यासाठी अनेक चळवळी, कार्यक्रम, उपक्रम सुरु आहेत. शेकडो जण यात आपापल्या परिने योगदान देत आहेत. श्रीधर खंडापूरकर हे या चळवळीतील एक नाव. त्यांची पाणी या विषयाला वाहिलेली लहान लहान कवितांची ही चार पुस्तके. यातील जलपुष्प हे पुस्तक स्वतः लेखकाने तर उर्वरीत तीनही पुस्तके ठाणे येथिल शारदा प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहे. दुष्काळमुक्ती आणि जलसाक्षरतेसाठीचे जनजागरण हा या चारही पुस्तकांचा गाभा आहे.

पाण्याचा योग्य वापर व्हावा आणि अपव्यय टाळावा या तळमळीने या पुस्तकांमध्ये लेखकाने सर्वसामान्यांना पटेल, रुचेल, भावेल आणि प्रत्यय येईल अशा शब्दांत रचना मांडल्या आहेत. पाणी आणि सजिवांचे अतुट नाते, जलसंवर्धन, जलसंचय, भुजल पुर्नभरण, पाण्याचा काटेकोर वापर, जलशुद्धीकरण यासह पाणी व त्याच्याशी जोडलेल्या जवळपास प्रत्येक बाबीवर लेखकाने या पुस्तकांमध्ये स्पर्ष केला आहे. पाण्याची महती सांगितली आहे. आणि व्यथा व उपायही मांडले आहेत. पावसाच्या थेंबावर, नाव नाही कोणाचे, जो जो वाचवील, थेंब थेंब होय त्याचे... अशा साध्या सोप्या सहज रचनांमधून पाण्याचे संस्कार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न लेखकाने यात केला आहे. पैशाने नाही विझली जगी, आजतागायत कोणाची तहान... यासारख्या त्यांच्या अनेक कविता सुभाषिते, बोधवाक्‍यांसारख्या आहेत. पुस्तके वेगवेगळी असली तरी त्यांची जातकुळी एकच आहे. पाणी आणि पर्यावरण या विषयांच्या जागरणासाठी ही पुस्तके निश्‍चितच महत्वपूर्ण ठरु शकतील.
------------- 

Wednesday, October 8, 2014

राज्यात पावसाचा अंदाज कायम

पुणे (प्रतिनिधी) ः विदर्भावरील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात सुरु झालेला पाऊस हे वारे बुधवारी सकाळपर्यंत मध्य प्रदेशकडे सरकल्यानंतरही कायम आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळलेले होते. हवामान खात्याने शुक्रवारी सकाळपर्यंत (ता.10) संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान, अंदमानलगतच्या समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तिव्रता वाढून त्याचे रुपांतर चक्रीवादळात (हूड हूड) झाले आहे. हे वादळ बुधवारी दुपारी उत्तर अंदमानचा समुद्र आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर घोंगावत होते.

राज्यातील प्रमुख ठिकाणी बुधवारी (ता.8) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः कोकण ः शहापूर, रोहा प्रत्येकी 40, वाडा, वाशी, विक्रमगड, मोखाडा प्रत्येकी 30, मुरबाड, खालापूर, अंबरनाथ प्रत्येकी 20, पालघर, पनवेल, तळा, पेण, पोलादपूर, सांगे प्रत्येकी 10
मध्य महाराष्ट्र ः कोल्हापूर, त्र्यंबकेश्‍वर, कडेगाव प्रत्येकी 30, विटा, गगनबावडा प्रत्येकी 20, कर्जत, पुणे, शिराळा, पारनेर, इगतपुरी, सुरगणा, आजरा, वाई, नाशिक, कवठेमहांकाळ, तासगाव, नगर, मिरज, इस्लामपूर, पाटण, पलूस, इंदापूर, बारामती, हातकणंगले, गडहिंग्लज, कागल प्रत्येकी 10
मराठवाडा ः परांडा, रेणापूर, अंबेजोगाई, पाटोदा, उस्मानाबाद, तुळजापूर प्रत्येकी 10
विदर्भ ः आष्टी, नरखेड प्रत्येकी 10
----------------- 

पुणे, कोल्हापूर विभागात रब्बी पेरणीला प्रारंभ

नगर जिल्ह्याची आघाडी, ज्वारीला सर्वाधिक पसंती

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात चालू रब्बी हंगामात आत्तापर्यंत सुमारे तीन लाख 81 हजार हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरी 62 लाख 43 हजार हेक्‍टर क्षेत्राच्या सहा टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. यापैकी सुमारे दोन लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या नगर जिल्ह्यातील आहे. तर पेरणीपैकी तब्बल तीन लाख 62 हजार हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. पुणे व कोल्हापूर विभागात ज्वारी व मक्‍याची पेरणी झाली झाली. उर्वरीत भागात पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे प्रगतीपथावर असल्याचे कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे.

नगर जिल्ह्यात सात लाख 88 हजार हेक्‍टर सरासरी क्षेत्रापैकी 25 टक्के म्हणजेच सुमारे एक लाख 99 हजार 600 हेक्‍टरवर ज्वारी, मका, करडई, हरभरा या पिकांची पेरणी झाली आहे. पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यात 78 हजार 600 हेक्‍टर (9 टक्के), पुणे जिल्ह्यात 69 हजार 600 हेक्‍टर (12 टक्के), सातारा जिल्ह्यात 17 हजार 600 हेक्‍टर (8 टक्के) तर सांगली जिल्ह्यात 15 हजार 600 हेक्‍टरवर (6 टक्के) रब्बी पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत.

पुणे व कोल्हापूर विभाग वगळता इतर विभागांमध्ये अद्याप पेरण्या सुरु झालेल्या नाहीत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या 28 जिल्ह्यांमध्ये अद्याप पेरणीला प्रारंभ झालेला नसून या ठिकाणी पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे सुरु असल्याचे कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे.

पिकनिहाय रब्बी पेरणीची सद्यस्थिती (2014-15)
पिक ---- सरासरी क्षेत्र (हेक्‍टर) --- पेरणी हेक्‍टरमध्ये व कंसात टक्केवारी
ज्वारी --- 30,90,000 --- 3,61,000
मका --- 99,600 --- 17,300
हरभरा --- 13,06,800 --- 1,100
करडई --- 2,11,300 --- 700
सुर्यफुल --- 1,65,500 --- 700
गहू --- 11,78,600 --- 0
जवस --- 49,900 --- 0
तीळ --- 3,300 --- 0
--------------
- राज्यातील पावसात मोठी घट
राज्यात एक जून ते सात ऑक्‍टोबर या कालावधीत सरासरीच्य 71.8 टक्के (823.10 मिलीमिटर) पाऊस झाला आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्ये 25 ते 50 टक्के; रायगड, नाशिक, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूरमध्ये 50 ते 75 टक्के; ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नगर, अमरावती व गडचिरोलीत 75 ते 100 टक्के तर पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यांत 100 टक्‍क्‍यांहून अधिक पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाचा विचार करता 355 पैकी 38 तालुक्‍यांत 25 ते 50 टक्के, 163 तालुुक्‍यात 50 ते 75 टक्के, 101 तालुक्‍यात 75 ते 100 टक्के तर 53 तालुक्‍यात 100 टक्‍क्‍यांहून अधिक पाऊस झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
-------------- 

पिकांना पाण्याअभावी झळ !

माना टाकण्यास सुरवात; हवे पाऊस, सिंचनाचे सलाईन

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून पावसाने मारलेली दडी, ऑक्‍टोबरचा वाढता उष्मा आणि जमीनीत खोल खोल चाललेली ओल यामुळे राज्याच्या बहुतेक भागात ऐन मोक्‍याच्या अवस्थेत असलेली खरिप पिके माना टाकू लागली आहेत. पुरक सिंचनाची सोय असलेल्या भागात वीज भारनियमाची समस्या गंभिर झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. पाटचाऱ्यांना पाणी सोडण्याच्या मागणीसाठीही शेतकऱ्यांना ठिकठिकाणी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. रब्बी पिकांची पेरणीही माती कोरडी झाल्याने संकटात सापडली आहे.

राज्यात यंदा खरिपाच्या सुमारे एक कोटी 35 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. यापैकी बहुतांश क्षेत्रावरील पिकांना सध्या पाण्याअभावी झळ बसत आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात राज्याच्या बहुतेक भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. ठिकठिकाणी पाऊस झाला असला तरी त्याची व्यापकता फारच कमी आहे. मॉन्सून माघारी फिरल्यानंतरही सर्वदूर पावसाची आशा पूर्ण होऊ शकलेली नाही. संपूर्ण मराठवाडा, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक, सोलापूर, पुणे, सातारा, सांगलीचा काही भाग व कोकणातील पश्‍चिम घाटालगतच्या भागात पिकांच्या पाणी टंचाईची स्थिती अधिक गंभिर होऊ लागली आहे.

यातच भरीस भर म्हणून की काय गेल्या आठ दिवसात राज्यात सर्वत्र कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ते सरासरीहून पाच ते सहा अंशांनी उंचावले आहे. यामुळे जमीनीत मुळांच्या थरातील पाण्याबरोबरच पिकांमधील पाणीही वेगाने कमी होऊन पिके सुकत आहेत. बहुतेक पिकांमध्ये यामुळे फुलांची गळ, शेंगा बाल्यावस्थेतच वाळणे, शेंडा जळून जाणे अशी लक्षणे दिसत आहे. येत्या आठ दिवसात पावसाचे, पाटपाण्याचे किंवा पुरक सिंचनाचे सलाईन मिळाले नाही तर ही पिके हातची जाण्याचा किंवा उत्पादनात मोठी घट येण्याचा धोका आहे.

- निर्णायक स्थितीच बिकट
पोटरी ते फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेली ज्वारी, बाजरी, मका व तूर, फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेले मुग, उडीद व सोयाबीन आणि फुलोरा ते बोंड धरण्याच्या अवस्थेत असलेला कापूस यांना पाण्याचा सर्वाधिक ताण बसत आहे. या पिकांची ही अवस्था उत्पादनात सर्वात महत्वाची मानली जाते आणि याच काळात त्यांना पाण्याची गरज जास्त असते. मात्र या स्थितीत ओल कमी पडल्याने पिके संकटात सापडली आहेत.

- खरिपाचे पिकनिहाय क्षेत्र हेक्‍टरमध्ये
कापूस 41,91,900; सोयाबीन 38,00,800; भात 14,95,000; तूर 10,36,800; मका 7,97,100; बाजरी 6,47,000; ज्वारी 4,53,300; मुग 3,18,600; उडीद 2,55,500; भुईमुग 1,93,700; नाचणी 92,600; तीळ 27,800; सुर्यफुल 26,600
------------------ 

पुणे पाऊस

पुणे - बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. वेल्हे, मुळशी तालुक्‍यांच्या डोंगराळ भागाबरोबरच जुन्नर, आंबेगाव, बारामती, पुरंदर तालुक्‍यांच्या दुष्काळी भागातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. प्रमुख ठिकाणचा पाऊस मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे ः पुणे शहर 16.7, पौंड 9, घोटवडे 10, मुठे 29, नसरापूर 5, लोणावळा 10, निमगाव 13, नारायणगाव 5, मंचर 18, कळंब 8, बारामती 16, मालेगाव 29, वेल्हे 12
---------

Thursday, October 2, 2014

भुमि अभिलेख - स्वच्छता अभियान

पुणे ः राज्याच्या भुमी अभिलेख विभागाने यापुढे प्रत्येक शुक्रवारी सकाळी एक तास कार्यलयीन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. भुमी अभिलेखच्या राज्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या दिवशी एक तास परिसर स्वच्छता करणार आहे. जमाबंदी आयुक्त आणि भुमी अभिलेख संचालक चंद्रकांत दळवी यांनी याबाबतच्या सुचना दिल्या आहेत. 

गांधी जयंती निमित्त केंद्र शासनामार्फत आयोजित स्वच्छ भारत अभियान भुमि अभिलेखमार्फत नवीन प्रशासकीय इमारत परिसरात राबविण्यात आले. श्री. दळवी यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावेळी स्वच्छता शपथ दिली. यावेळी दर आठवड्याला स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
------------- 



कृषी भवनमध्ये गांधी, शास्त्री जयंती साजरी, श्रमदानाने स्वच्छता अभियान

पुणे ः कृषी विभागाची विविध शासकीय कार्यालये असलेल्या येथिल कृषी भवन परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त श्रमदानाने परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमांचे पुजन करुन स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. विभागिय कार्यालयातील अधिक्षक कृषी अधिकारी विनयकुमार घावटे यांनी सर्वांना स्वच्छता राखण्याची शपथ दिली. 

कृषी भवनमधील दक्षता पथक प्रमुख दादासाहेब सप्रे, कृषी गणना उपायुक्त ज्ञानदेव वाकुरे, बीज परिक्षण प्रयोगशाळेचे महादेव निंबाळकर, विभागिय सांख्यिक दयानंद जाधव, चंद्रकांत गोरड, यशवंत केंजळे, शिवाजी वाघमोडे, संगिता नागपूरे, अविनाश यादव, राजेंद्र देशपांडे, सुरेश भालेराव आदी सुमारे 80 अधिकारी, कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले. 
----------- 




माॅन्सूचा राज्यातील मुक्काम लांबणार


चौकट
- राज्यात पावसाचा अंदाज
भारतीय हवामान खात्याने शनिवारी (ता.4) सकाळपर्यंत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः हा पाऊस दुपारनंतर पडण्याची अधिक शक्‍यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी आकाश ढगाळलेले राहण्याची शक्‍यता आहे. गुरुवारी (ता.2) सकाळपर्यंत कोकणात मॉन्सुन सक्रीय होता. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

पुणे (प्रतिनिधी) ः नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) माघारीचा प्रवास महाराष्ट्राच्या उत्तर उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपला आहे. मात्र नेमक्‍या याच कालावधीत कोकणातील मॉन्सूनची सक्रीयता, उत्तर महाराष्ट्रात आद्रता उंचावलेली व बहुतेक ठिकाणी हवेची दिशा (विन्ड पॅटर्न) अस्थिर आहे. यामुळे निम्म्या महाराष्ट्रातील माघारीची सर्वसाधारण वेळ (1 ऑक्‍टोबर) उलटून गेल्यानंतरही मॉन्सूनचा मुक्काम कायम आहे. उलट त्याचा मुक्काम अजून काही काळ लांबण्याची चिन्हे आहेत. चालू आठवड्यात राज्यात ठिकाठिकाणी मॉन्सून पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासात कोकणात मॉन्सून सक्रीय होता. कोकणात कर्जत येथे 50 मिलीमिटर, खालापूर व पनवेल येथे प्रत्येकी 40 मिलीमिटर, कुडाळ, खेड व माथेरान येथे प्रत्येकी 30 मिलीमिटर, चिपळूण, सुधागड, माणगाव, पोलादपूर, लांजा येथे प्रत्येकी 20 मिलीमिटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात वडगाव मावळ येथे 50 मिलीमिटर, वडुज येथे 30 मिलीमिटर, शाहुवाडी, शिराळा, गगनबावडा व दहिवडी येथे प्रत्येकी 20 मिलीमिटर पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

हवामान खात्याने पुढील तीन-चार दिवसात उत्तर भारतातील उर्वरीत ठिकाणे व मध्य भारतातील आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील मॉन्सूनचा मुक्काम कायम राहण्याची दाट शक्‍यता आहे. मॉन्सून माघारी येणे म्हणजे त्या भागातील नैऋत्य मॉन्सून वाऱ्यांची दिशा विरुद्ध दिशेने बदलून स्थिर होणे, त्या भागातील सापेक्ष आद्रतेत एकदम मोठ्या प्रमाणात घट होऊन ती स्थिर राहणे व सलग तीन दिवस त्या भागात पाऊस न पडणे. या तिन्ही गोष्टी जुळल्यास संबंधीत भागातून मॉन्सून माघारी फिरला असे म्हटले जाते. सद्यस्थितीत येत्या आठ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात अशी स्थिती तयार होण्याची शक्‍यता कमी असल्याची माहिती हवामान खात्याच्या सुत्रांनी दिली.

दक्षिण गुजरातमध्ये पोरबंदरपर्यंत, मध्य प्रदेशात उज्जैनपर्यंत, उत्तर प्रदेशात कानपूरपर्यंत तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्‍मिरच्या काही भागातून माघारी आला आहे. पुढील तीन चार दिवसात तो जम्मू काश्‍मिर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या बहुतेक भागातून माघारी फिरण्याची दाट शक्‍यता आहे.
---------------- 

Wednesday, October 1, 2014

निवृ्त्त संचालक डाॅ. नांदवटेंची सेवा तडकाफडकी समाप्त

एनएचएमचे संचालक डॉ. नांदवटेंची
सेवा तडकाफडकी समाप्तीचे आदेश

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी विभागाच्या सेवेतून कृषी संचालक पदावरुन निवृत्त झाल्यानंतर डॉ. ह. द. नांदवटे यांची कंत्राटी सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या संचालक पदी करण्यात आलेली नियुक्ती रद्द करुन त्यांना तडकाफडकी सेवेतून मुक्त करण्याचे आदेश कृषी सचिवालयाने दिले आहेत. याबाबत होणाऱ्या कार्यवाहीचा अहवालही तत्काळ सादर करण्याचा आदेश अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आला आहे.

डॉ. नांदवटे यांची सेवा तत्काळ समाप्त करण्यामागचे कारण याबाबतच्या आदेशात उघडपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा कंत्राटी सेवेत घेण्यासाठी शासनाने निर्धारीत केलेल्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. डॉ. नांगवटे यांच्या सेवा समाप्त केल्यानंतर या पदाचे कामकाज फलोत्पादन संचालक यांनी पहावे, असा आदेश कृषी व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. सुधिरकुमार गोएल यांनी दिला आहे. सेवा समाप्तीचे कारण अद्याप अज्ञात असल्याने डॉ. नांदवटे यांच्याप्रमाणेच निवृत्तीनंतरही कंत्राटी सेवेच्या माध्यमातून कृषी खात्यात अधिकारपदावर कार्यरत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनएचएमचा चालू वर्षाचा कृती आराखडा मंजूर होवून सहा महिने उलटल्यानंतरही अभियानाच्या अंतिम मार्गदर्शक सुचना तयार नसल्याच्या कारणावरून कृषी आयुक्त कार्यालयांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. तसेच माहिती न देणे, चुकीची माहिती देणे अशा विविध कारणामुळे डॉ. नांदवटे यांच्या विरोधात अनेक तक्रारी थेट कृषी व पणनचे अपर मुख्य सचिवापर्यंत गेल्या होत्या. आयुक्तालय वा अभियान स्तरावरुन याबाबत निर्णय न झाल्याने अखेर डॉ. सुधीर कुमार गोयल यांनी डॉ. नांदवटे यांचे काम थांबविण्याचा व या पदाचा कार्यभार फलोत्पादन संचालक डॉ. सुदाम अडसूळ यांच्याकडे सोपविण्याचा आदेश राज्य फलोत्पादन अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक व कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांना दिला आहे.

- अनेक सेवानिवृत्त सेवेत
फलोत्पादन अभियानाशिवाय पणन मंडळ, फलोत्पादन संचालक, विस्तार संचालक, आत्मा, अन्न सुरक्षा अभियान आदींच्या विभाग-उपविभागांमध्ये जिल्हा, विभागिय व राज्य स्तरावरील कृषी खात्यातील अनेक सेवा निवृत्त अधिकारी कंत्राटी सेवेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. यातील बहुतेकांना सल्लागार म्हणून सेवेत घेण्यात आले आहे. बहुतेक सर्व योजनांमध्ये सल्लागारांची भरती करण्यात आली आहे. त्यातही केंद्राच्या योजनांमध्ये सल्लागार नेमण्यास केंद्राने घालून दिलेल्या नियमांचा आधार घेण्यात आल्याचे सांगितले जाते. दर 11 महिन्यांनी या अधिकाऱ्यांचे करार संपतात व पुन्हा नव्याने केले जातात.
------------- 

कृषी व संलग्न विद्याशाखा, समकक्षता - कृषी मंत्रालय खुलासा

पुणे (प्रतिनिधी) ः जमीन मशागत, पिकांची वाढ, उत्पादन, काढणी; पशु, पक्षी व माशांची पैदास, पालन व उत्पादन यांच्याशी संबंधीत व्यवसाय व माहिती क्षेत्रास कृषी व संलग्न क्षेत्र असे म्हणतात. जैवतंत्रज्ञान, अन्न प्रक्रीया, गृह विज्ञान, वनिकी व कृषी विपणन यांचा कृषी व संलग्न क्षेत्रात समावेश होत नाही. मात्र, बॅंकींग क्षेत्रात भरती करताना कृषी मंत्रालयाने निश्‍चित केलेल्या कृषी व संलग्न विद्याशाखांच्या या व्याख्येवर अवलंबून न राहता संबंधीत भरतीच्या पदांच्या कामाच्या स्वरुपाचा विचार करुन पात्रता निश्‍चित करावी, असा सल्ला केंद्रीय कृषी विभागाने "दी इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्‍शन' (आयबीपीएस) यांना दिला आहे.

कृषी व समकक्ष विद्याशाखांचा वाद बॅंकिंग वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि कृषी विद्यापीठांनी कृषी विद्यापीठांतील सर्व पदवी अभ्यासक्रम समकक्ष असल्याचे यापुर्वीच जाहिर केले आहे. मात्र काही बॅंकांनी या मुद्यावर आक्षेप घेतल्याने काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर आयबीपीएसने केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला कृषी व संलग्न विद्याशाखांच्या समकक्षतेबाबत खुलासा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार कृषी मंत्रालयाच्या धोरण विभागाचे अवर सचिव कमलजीत सिंग यांनी हा नुकताच खुलासा जाहिर केला आहे.

जैवतंत्रज्ञान हे नव्याने विकसीत होणारी स्वतंत्र विज्ञानशाखा आहे. अन्न प्रक्रीया ही कृषीपासून स्वतंत्र असलेली शाखा आहे. तर कृषी विपनन (ऍग्री मार्केटींग) हा कृषी विकासाचा एकात्मिक भाग आहे. जैवतंत्रज्ञान, गृह विज्ञान, अन्न प्रक्रीया व वनिकी या विद्याशाखा बॅंकिंग क्षेत्रात कृषी क्षेत्र अधिकारी (ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर) पद भरतीसाठी कृषीच्या समकक्ष पात्रता नाहीत. याउलट कृषी वनिकी व उद्यानविद्या यांचा कृषी क्षेत्र अधिकारी पदाच्या भरतीसाठी दुग्धशास्त्र, मत्स्यकी व कृषी अभियांत्रिकी या विद्याशाखांऐवजी समावेश करता येऊ शकतो, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
------------
* चौकट
- माहिती देऊन फॉलोअप घेणार
तत्पुर्वी विद्यार्थ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधीत बॅंका व संस्थांकडे पाठपुरावा केल्यानंतर प्रथम नकार दिलेल्या काही बॅंकांनी समकक्ष विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना रुजू करुन घेतले आहे. आता कृषी मंत्रालयाने कृषी व समकक्ष विद्याशाखांबाबत स्पष्ट केलेली भुमिका कृषी अभियांत्रिकी, अन्न प्रक्रीया यासह काही विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना पसंत पडलेली नाही. या अभ्यासक्रमांची त्यातील कृषीविषयक भागासह सविस्तर माहिती व याबाबत कृषी परिषद व राज्य शासनाने घेतलेले निर्णयांची माहिती कृषी मंत्रालयाला सादर करुन विद्यापीठामार्फत याबाबत पाठपुरावा (फॉलोअप) करण्यात येणार असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव सुनिल वानखेडे यांनी सांगितले.
-------------
*चौकट
- असोसिएशनचा निर्णय अंतिम !
केंद्रीय कृषी मंत्रालयाने केलेली व्याख्या व स्पष्टीकरण बरोबर आहे. त्या भुमिकेत चुक नाही. कृषी मंत्रालय पदव्यांच्या समकक्षतेबाबत अभिप्राय देवू शकते. मात्र त्यांचा याबाबतचा निर्णय बंधनकारक किवा गृहित धरावाच असे नसते. कृषी विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी असा प्रश्‍न उपस्थित झाल्यास "इंडियन युनिर्व्हसिटी असोसिएशन' किंवा "इंडियन ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी असोसिएशन'चा निर्णय अंतिम मानला जातो. सध्या पदव्यांच्या समकक्षतेबाबत आक्षेप असतील तर एसोसिएशनकडे बाजू मांडून निर्णय होणे योग्य ठरेल, अशी माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांनी दिली.
-------------