Thursday, December 17, 2015

राज्यात हवामान कोरडे, सोमवारी विदर्भात पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) - राज्यात येत्या रविवारपर्यंत (ता.२०) सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून सोमवारी (ता.२१) विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी थंडीची प्रतिक्षा कायम असून अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान किमान तापमान नाशिक येथे १२.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मराठवाड्याच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनिय वाढ तर मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनिय वाढ झाली आहे. राजाच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे गुरुवारी (ता.१७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई १५.६, अलिबाग १९, रत्नागिरी २०, पणजी २४.२, डहाणू १९.५, भिरा १६.५, पुणे १६.६, जळगाव १४.२, कोल्हापूर १९.५, महाबळेश्वर १८.६, मालेगाव १५, नाशिक १२.४, सातारा १८.९, सोलापूर १९.३, उस्मानाबाद १६.८, औरंगाबाद १९.४, परभणी २१.१, नांदेड १४.५, अकोला १९.२, अमरावती १८, बुलडाणा १९, ब्रम्हपुरी १८.३, चंद्रपूर १९.२, गोंदिया १६, नागपूर १७.२, वर्धा १८.५, यवतमाळ १८.४
---------------- 

कृषी पदव्यत्तर पदवी प्रवेश प्रक्रीया रखडली

 आयसीएआर कोट्यातील जागा रिक्‍त, विद्यापिठस्तरावरून प्रवेश देण्याची मागणी

औरंगाबाद(प्रतिनिधी) - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठांतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कोट्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अनेक जागा रिक्‍त असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शासनाने खास विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुविधांचा अपव्यय सुरु असून इच्छूक पात्र विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या रिक्‍त जागा भरण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

कृषी परिषदेमार्फत चालू शैक्षणीक वर्षातील (2015-16) पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने नियोजित वेळापत्रकानुसार राबविण्यात आली. यात २5 टक्के जागा (अतिरिक्त 10 टक्के सह) भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत (आयसीएआर) भरण्यात येतात. आयसीएआर देशपातळीवर प्रवेश परिक्षा घेवून त्यातून निवडलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी संबंधित कृषी विद्यापीठाकडे पाठवते. यानंतरही जागा रिक्त राहिल्यास, नियमानुसार संबंधित विद्यापीठे राज्यस्तरावर जाहिरात देऊन विद्यापीठस्तरावर प्रवेश प्रक्रिया घेतात. यानुसार रिक्त जागांबाबत कृषी विद्यापीठस्तरावर पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे पत्र कृषी परिषदेच्या शिक्षण संचालकांनी चारही कृषी विद्यापीठांना दिले आहे. मात्र, विद्यापीठांनी अद्याप काहीही पावले उचलली नसल्याने या जागांपासून मुकण्याची आपत्ती विद्यार्थींवर ओढावली आहे.

एकट्या परभणी कृषी महाविद्यालयात 2014-15 शैक्षणीक वर्षात आयसीएआर कोट्यांतील 9 जागा रिक्‍त राहूनही कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. यंदाही 2015 -16 या शैक्षणीक वर्षात आयसीएआर कोट्यांतर्गत 7 जागा रिक्‍त असूनही त्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे पात्र असूनही विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. यासंदर्भात दिग्विजय दिवटे यांनी कुलसचिवांना व कृषी परिषदेला निवेदन दिले आहे. कृषी विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. रिक्त जागा भरण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा विद्यार्थ्यांतर्फे देण्यात आला आहे.

- विद्यापीठाचा असाही कारभार
कृषी परिषदेच्या कोट्यातील फक्त एका रिक्‍त जागेसाठी 12 ऑक्‍टोबर 2015 ला स्पॉट ऍडमिशन राउंड फक्त परभणी येथे घेण्यात आला. यात आयसीएआर कोट्यातील रिक्त जागांचा समावेश केला नाही. एका जागेसाठी तब्बल 29 विद्यार्थ्यी रांगेत होते. यापैकी एकाला प्रवेश मिळाला. उर्वरित विद्यार्थ्यांना आयसीएआरचा कोटा रिक्‍त असूनही प्रवेशापासून वंचित रहावे लागले. बदनापूर येथील महाविद्यालायत कोणताही स्पॉट राउंड घेतला गेला नाही.

- कोट
आयसीआरच्या रिक्‍त जागा नेमक्‍या कशा भराव्यात, निकष नेमके कसे असावेत, यासंदर्भात कृषी परिषदेकडे वरिष्ठांकडे माहिती व मार्गदर्शन मागितले आहे. यावर निर्णय झाल्यानंतर जाहीरात काढून रिक्‍त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
डॉ. दि. ल. जाधव, कुलसचिव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ परभणी.
.........................

Monday, December 14, 2015

ppp प्रस्ताव दाखल करण्यास 25 डिसेंबर अंतिम मुदत

पुणे (प्रतिनिधी) - येत्या आर्थिक वर्षात (२०१६-१७) राज्यात सार्वजनिक खासगी गुंतवणूकीतून (पीपीपी) एकात्मिक कृषी विकासाचे प्रकल्प राबविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २५ डिसेंबर २०१५ ही आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये असे प्रकल्प राबविण्यास इच्छूक असलेल्या खासगी कंपन्या, संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी आपले प्रस्ताव अंतिम मुदतीत कृषी आयुक्तालयातील नियोजन शाखेत जमा करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या mahaagri.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. 

Monday, December 7, 2015

मराठा चेंबर अपारंपरिक उर्जा परिषद व प्रदर्शन - 9-10 डिसेंबर

पुणे (प्रतिनिधी) - मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज ॲन्ड ॲग्रिकल्चर आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने येथिल हयात हॉटेलमध्ये अपारंपरिक उर्जा परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी (ता.९) सकाळी जेष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र विद्यूत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष डाॅ. प्रमोद देव यावेळी उपस्थित असतील. ही परिषद व प्रदर्शन बुधवारी शुल्क (३००० रुपये) असून गुरुवारी सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे.

सौर व पवन उर्जेतील संधी, धोरणे, वित्तपुरवठा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, कायदेशीर बाबी, आव्हाणे, यशोगाथा आदी विषयावर या परिषदेत चर्चा होणार असून त्यात या दोन्ही क्षेत्रातील सर्व प्रमुख कंपन्या व तज्ज्ञ सहभागी होत आहेत. मराठा चेंबरचे महाव्यवस्थापक अनंत सरदेशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र सरकार व राज्य सरकारने अपारंपरिक उर्जा विषयक धोरण जाहिर केले आहे. यासाठी विविध योजनाही राबविण्यात येत आहेत. यातून उद्योग, उद्योजक, शेतकरी, संस्थांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. इमारतीच्या छपरांवरील सौर प्रकल्पातून विज स्वयंपूर्णता मिळविण्यास मदत होईल. शिवाय या प्रकल्पातून निर्माण होणारी अतिरिक्त उर्जा राज्य सरकार खरेदी करणार असल्याने त्यातून उत्पन्नाचीही संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर अपारंपरिक उर्जेतील संधींबाबत जागृती करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सौर किंवा पवन उर्जेतील संधींचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या व्यक्तिंनी या परिषद व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सरदेशमुख यांनी केले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क - ०२० २५७०९००० 

Friday, December 4, 2015

गोदरेज ॲग्रोव्हेटचे सुरभी अभियान

पुणे (प्रतिनिधी) - गोदरेज ॲग्रोव्हेट लि. या पशुखाद्य उत्पादक कंपनीमार्फत शेतकऱ्यांमध्ये संकरित गाईंचे आरोग्य व पोषण आहार याबाबत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व पंजाबमध्ये सुरभी अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील १२५ गावांमध्ये याअंतर्गत एक ते पाच गाय असलेल्या पशुपालकांसाठी उत्तम दुध उत्पादन, आरोग्य आणि सुयोग्य प्रजनन या निकषांवरील सर्वोत्तम गाय स्पर्धा व मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कंपनीच्या पशुखाद्य व्यवसायाचे प्रमुख मंगेश वांगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहीती दिली. विनय वतल व डॉ. संजय टोके यावेळी उपस्थित होते. श्री. वांगे म्हणाले, संकरित गाईंची दुध देण्याची क्षमता जास्त असते. मात्र त्या क्षमतेनुसार उत्पादन मिळविण्यात शेतकऱ्यांना अपुऱ्या माहितीमुळे अनेक अडचणी येतात. आरोग्य संवर्धन, दुध उत्पादनात सुधारणा आणि प्रजनन क्षमता वाढविणे या सर्वात महत्वाच्या बाबी आहेत. याबाबत सुरभी अभियानात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  

Thursday, December 3, 2015

कृषी सल्ला सेवा केंद्रे सुरू करणार



आयुक्त विकास देशमुख ः ‘भविष्यातील स्मार्ट शेती’ज्ञान सोहळ्याचे उद्घाटन

लोगो- एसआयएलसी
पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे तंत्रज्ञान, यंत्र, अवजारे उपलब्ध करून दिली जातात. मात्र याबाबतचे तांत्रिक सल्ले व सेवा न मिळाल्याने छोट्या छोट्या गोष्टींमुळे ती बंद राहतात. तंत्रज्ञान असूनही त्याचा पुरेसा वापर होत नाही. या त्रुटी दूर करण्यासाठी कृषी विभागामार्फत तरुणांच्या सहभागातून गावपातळीवर मोफत कृषी तांत्रिक सल्ला व सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिली.

सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरमार्फत (एसआयएलसी) आयोजित करण्यात आलेल्या ‘भविष्यातील स्मार्ट शेती’ या विषयावरील कृषी ज्ञान सोहळ्याचे उद्घाटन गुरुवारी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माजी अप्पर मुख्य कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, ‘नेटाफिम’चे व्यवसाय प्रमुख विकास सोनवणे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, ‘एसआयएलसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा पालकर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘यंदा पाऊस कमी पडल्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ आहे. फक्त पावसावर अवलंबून असलेला शेतकरी कोलमडून पडलाय. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जमिनीच्या ओलाव्याची सुरक्षा, पाण्याच्या थेंबाथेंबापासून अधिकाधिक उत्पादन व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सर्वाधिक भर देण्यात येत आहे. यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार, सूक्ष्म सिंचन आदी विविध उपाययोजना, अभियाने राबविण्यात येत आहेत. उत्पादन वाढले की भाव नाही आणि भाव असेल तर उत्पादन नाही, या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पीक पद्धतीत बदल करणे अत्यावश्यक ठरणार आहे. उसाला ठिबक केल्यानंतर वाचलेल्या पाण्यातून इतर पिके घेतली जावीत. कुटुंबाची धान्य, भाजीपाला आदी वार्षिक गरज लक्षात घेऊन उर्वरित जमिनीवर नगदी पिकांचा विचार करावा लागेल.’’

शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, शेतीतील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून मूल्य साखळी तयार करण्यापलीकडे शेती विकासाची दुसरी गुरुकिल्ली नाही, असे मत डॉ. गोयल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘ शेती करण्यासाठी अनेक घटकांवर अवलंबून राहावे लागते. हे सर्व घटक विखुरलेले अाहेत. यात दुवे नसल्याने दलाल तयार झाले आहेत. या सर्व घटकांना एकत्र केल्याशिवाय शेतीत फायदा नाही. कृषी क्षेत्रातील कंपन्यांनीही शेतकरी विकासासाठी पुढाकार घ्यायला हवा. कारण शेतकऱ्याला चांगले दिवस आल्याशिवाय तुमचे धंदे चालणार नाहीत व चांगले दिवसही टिकणार नाहीत. शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या, शेतकरी गटांत संघटन शक्ती आहे. संघटितपणे प्रयत्न केल्यास हमीभाव व शासन या दोन्हींशिवाय शेतीतून समृद्धी मिळवता येईल. यासाठी ‘ॲग्रोवन‘मधून दररोज प्रसिद्ध होणाऱ्या यशोगाथा अतिशय प्रेरणादायी आहेत.’’

श्री. सोनवणे यांनी या वेळी ‘नेटाफिम’ कंपनीच्या वाटचालीची माहिती दिली. डॉ. पालकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
--------------
‘‘सकाळ माध्यम समूहाने हाती घेतलेल्या स्मार्ट व्हिलेज उपक्रमाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावांनी उत्सुकता दर्शविली आहे. यातील १० ते १५ गावे निवडण्यात येतील. त्यासाठी मोठा निधी लागणार असून, तो उभा करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार आणि समाजातील घटकांनी यासाठी मदतीचा हात पुढे केल्यास हा उपक्रम पूर्ण होण्यास मदत होईल.’’
- अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह 

थंडीची प्रतिक्षा कायम, सोमवारी पावसाचा अंदाज



पुणे (प्रतिनिधी) - सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल व किमान तापमानामध्ये उल्लेखनिय वाढ झालेली असल्याने राज्यभर थंडी गुल झालेली आहे. गुरुवारी सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडे व आकाश निरभ्र होते. हवामान खात्याचा येत्या रविवारपर्यंत (ता.६) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज कायम आहे. तर सोमवारी (ता.७) कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरीत भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सरासरीहून कमाल तापमानात एक ते चार अंश सेल्सिअसने तर किमान तापमानात दोन ते सात अंश सेल्सिअसने वाढ झालेली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनिय वाढ तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणिय वाढ आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. नाशिक येथे राज्यातील सर्वात कमी १४.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.

अरबी समुद्रात तमिळनाडू किनारपट्टीनजीकच्या कमी दाबाच्या पट्ट्याची तिव्रता वाढून त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीच्या पातळीहून सुमारे साडेचार किलोमिटर उंचीपर्यंत सक्रीय आहे. याच वेळी तामिळनाडूवरील चक्राकार वारे केरळ व लक्षद्विपकडे सरकले आहेत. बांग्लादेशवरही चक्राकार वारे सक्रीय असून मध्य प्रदेशच्या पश्चिम भागावरील चक्राकार वाऱ्याची तिव्रता वाढून त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. समुद्रसपाटीच्या पातळीहून ९०० मिटर उंचीपर्यंत हा पट्टा सक्रीय आहे.

गुरुवारी (ता.३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील राज्यातील प्रमुख ठिकाणीचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई १९.६, अलिबाग २१.४, रत्नागिरी २३.६, पणजी २४.३, डहाणू २२, भिरा १८.५, पुणे १७.२, नगर १६, जळगाव १६.४, कोल्हापूर २०, महाबळेश्वर १६.४, मालेगाव १७.६, नाशिक १४.९, सांगली २०.६, सातारा १८, सोलापूर २१, उस्मानाबाद १७, औरंगाबाद १८.८, परभणी १९.२, नादेड १६.५, अकोला १९.५, अमरावती १८.४, बुलडाणा १९, ब्रम्हपुरी २०.३, चंद्रपूर २०.४, गोंदिया १७.७, नागपूर १८.१, वाशिम २१.२, वर्धा १७.६, यवतमाळ १५
------------------------