Friday, May 13, 2016

मॉन्सून मंगळवारपर्यंत अंदमानात

आगमनास स्थिती अनुकूल, ५ दिवस जलद वाटचाल

- विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
पुढील तीन चार दिवसात इशान्य, पश्चिम व मध्य भारतात कमाल तापमानाचा पारा पुन्हा उसळी मारण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने शनिवार, रविवार व सोमवारी (ता. १४ ते १६) विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा व राजस्थानात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भातील कमाल तापमानात लक्षणिय वाढ होवून पारा ४४ अंशापार गेला. दिवसभरात राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान नागपूरमध्ये ४४.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील दोन तीन दिवसात यात आणखी वाढ होण्याचा इशारा आहे. १४ व १५ मे दरम्यान राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून १६ मे पासून पुन्हा गडगडाटी, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

पुणे (प्रतिनिधी) - हिंदी महासागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) भारतीय उपखंडाकडे वेगाने झेपावले असून मंगळवारपर्यंत (ता.१६) ते अंदमानात दाखल होण्याचा अंदाज आहे. पुढील दोन-तीन दिवसात निकोबार बेटे, दक्षिण अंदमानचा समुद्र व बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात मॉन्सून पोचण्यास अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची वाटचाल यंदा सर्वसाधारण वेळेहून ५ दिवस जलद होण्याची चिन्हे आहेत.

मॉन्सून सर्वसाधारणपणे २० मे रोजी अंदमानात दाखल होतो. यंदा तो नेहमीच्या वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच दाखल होण्याची चिन्हे आहेत. अंदमानपाठोपाठ २५ मे रोजी श्रीलंकेत आणि एक जूनला केरळात मॉन्सून दाखल होतो. मॉन्सूनच्या आगमनाच्या सर्वसाधारण तारखा व त्याची यंदाच्या वाटचालीचा विचार करता येत्या ७ ते १५ जून दरम्यान मॉन्सून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मध्य प्रदेश, विदर्भा, कर्नाटक ते तमिळनाडूपर्यंतच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. उपसागराच्या दक्षिण भागात चक्राकार वारे सक्रीय असून शनिवारी या वाऱ्यांची तिव्रता वाढू कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होवून व रविवारी (ता.१५) त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या आगमनासाठी ही अनुकूल स्थिती असतानाच मध्य भारतात पुन्हा एकता उष्णतेचा भडका उडाला आहे. कमाल तापमानाने ४५ अंश सेल्सिअसची पातळी गाठली असून त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे मॉन्सूनच्या देशांतर्गत वाटचालीलाही वेग येण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणी शुक्रवारी (ता.१३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३३.८, अलिबाग ३२.५, रत्नागिरी ३४.८, पणजी ३४.६, डहाणू ३४.६, पुणे ३८.७, जळगाव ४४, कोल्हापूर ३९, महाबळेश्वर ३३.३, मालेगाव ४३.२, नाशिक ३८.२, सांगली ४०.५, सातारा ३९, सोलापूर ४०.५, औरंगाबाद ४०.६, परभणी ४३, नांदेड ४२.५, अकोला ४३.६, अमरावती ३७.४, बुलडाणा ४०.५, चंद्रपूर ४३.८, गोंदिया ४२.४, नागपूर ४४.१, वाशिम ३८, वर्धा ४३.५, यवतमाळ ४२.४
------------------- 

Tuesday, May 10, 2016

गारपिटीचे सावट निवळले



शनिवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज

- मृगाआधी रोहिणी बरसणार ?
मृग नक्षत्राचा पाऊस पेरणीसाठी सर्वोत्तम समजला जातो. तर त्याआधीच्या रोहिनी नक्षत्रावर पडलेला पाऊस हा पेरणीपूर्व मशागतींसाठी सर्वोत्तम समजला जातो. रोहिणीच्या पावसावर मशागत आणि मृगाच्या पावसावर पेरणी असे खेडोपाडी समिकरण आहे. अद्याप रोहीणी सुरु होण्यास दहा पंधरा दिवसाचा कालावधी बाकी असला तरी सध्या राज्यात ठिकठिकाणी सुरु असलेला पाऊस रोहिणीसारखाच असल्याचे अनुभवास येत आहे. बदलत्या ऋतूमानानुसार रोहिणीचा पाऊस मागेपुढे होवू शकतो, त्यात यंदा मॉन्सून लवकर दाखल होण्याचे अंदाज... यानुसार सध्याचा पाऊस रोहिणीचाच असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत असून सध्याची स्थिती पाहता मृग चांगला बरसेल, अशी आशाही व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे (प्रतिनिधी) - मध्य महाराष्ट्रावरील चक्राकार वारे ओसरल्याने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यावरील गारपिटीचे सावट निवळले आहे. मात्र या दोन्ही विभागांसह विदर्भातही मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता कायम आहे. हवामान खात्याने गुरुवारपर्यंत (ता.१२) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात व त्यानंतर पुढची दोन दिवस फक्त मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून उर्वरीत भागात हवामान कोरडे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळे वारे व मेघगर्जेनेसह पाऊस पडला. तुरळक ठिकाणी गारपिटीचीही नोंद झाली. मंगळवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी आकाश ढगाळलेले होते. त्यानंतर ढगांच्या प्रमाणात घट झाली. काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. औरंगाबाद व महाबळेश्वर येथे प्रत्येकी १० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. पुणे, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, नगर जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ तर विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. राज्याच्या उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

दरम्यान, अरबी समुद्रात लक्षद्विप बेटे, मालदिव परिसरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून या सिस्टिमच्या दक्षिण दिशेला हिंदी महासागरात विश्ववृत्ताजवळ शुक्रवारपर्यंत (ता.१३) कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या दोन्ही हवामान स्थितींच्या प्रभावामुळे हिंदी महासागरातील मॉन्सूनच्या वाटचालीला बळ मिळण्याची चिन्हे आहेत.

मंगळवारी (ता.१०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३४, अलिबाग ३२.४, रत्नागिरी ३३.४, पणजी ३५, डहाणू ३४.७, पुणे ३८.७, जळगाव ४२, कोल्हापूर ३८.२, महाबळेश्वर ३३, मालेगाव ४१, नाशिक ३८, सांगली ४०, सातारा ३९.९, सोलापूर ४१.९, उस्मानाबाद ४०.६, औरंगाबाद ३७.९, परभणी ४१.२, नांदेड ४०, अकोला ३९.७, अमरावती ३९, बुलडाणा ३९, ब्रम्हपुरी ४१.३, चंद्रपूर ४१.२, गोंदिया ३९.६, नागपूर ४१.७, वाशिम ३६.६, वर्धा ४०.९, यवतमाळ ३९.२
--------------------