Friday, November 28, 2014

"इग्नू'च्या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु

"इग्नू'च्या पाणलोट, जलसंधारण
अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु

पुणे ः इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामार्फत (इग्नू) 2015 या वर्षात राबविण्यात येणाऱ्या "पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन' पदविका व "जलसंधारण व्यवस्थापन' प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रीया नुकतिच सुरु झाली आहे. विद्यापीठाचे पुणे क्षेत्रिय कार्यालय व बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशनच्या वारजे येथील केंद्रावर प्रवेशाचे माहितीपत्रक उपलब्ध आहे.

प्रवेश अर्ज व माहितीपत्रकासाठी 200 रुपये शुल्क आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख एक डिसेंबर 2014 आहे. यानंतर 300 रुपये विलंब शुल्कासह 15 डिसेंबर 2014 पर्यंत अर्ज स्विकारले जातील. अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रीयेविषयी www.ignou.ac.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. बाएफ केंद्र संपर्क क्रमांक - 020 25231661
-------------- 

Wednesday, November 26, 2014

राज्यावर पुन्हा अवकाळीचे सावट

29 नोव्हेंबरपासून पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः उपसागराच्या दक्षिण भागातील कमी दाबाचे क्षेत्र व अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील कमी दाबाचा पट्टा यांच्या एकत्रित प्रभावामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. या दोन्ही विभागांमध्ये 29 नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

दक्षिण अरबी समुद्रात समुद्रसपाटीच्या पातळीवर कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. या पट्ट्याशी संलग्न असलेले चक्राकार वारे लक्षद्वीप परिसरात सक्रीय आहेत. याच वेळी उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली आहे. गुरुवारपासून तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही ढगाळ हवामानात वाढ झाली आहे. पाठोपाठ 29 पासून महाराष्ट्रातही पावसाला सुरवात होण्याची दाट शक्‍यता आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात थंडी वाढली आहे. या ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट आहे. कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचीत वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वत्र हवामान कोरडे होते. कोठेही पावसाची नोंद झाली नाही. दिवसभरात गोंदिया येथे राज्यात सर्वात कमी 11.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे बुधवारी (ता.26) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 21, अलिबाग 20.2, रत्नागिरी 19.3, पणजी 19.3, डहाणू 21.1, भिरा 16.5, पुणे 12.4, नगर 11.4, जळगाव 12.2, कोल्हापूर 16.9, महाबळेश्‍वर 13.8, मालेगाव 15.5, नाशिक 12.5, सांगली 17.7, सातारा 12.5, सोलापूर 14.9, उस्मानाबाद 11.3, औरंगाबाद 14.4, परभणी 13.2, नांदेड 12, बीड 13.4, अकोला 14.2, अमरावती 15.6, बुलडाणा 15.5, ब्रम्हपुरी 12.9, चंद्रपूर 14.6, गोंदिया 11.2, नागपूर 12.1, वाशिम 15.4, वर्धा 13.2, यवतमाळ 13.2
------------ 

Monday, November 24, 2014

उत्तम कुंजीर निधन वृत्त

अधिक्षक कृषी अधिकारी
उत्तम कुंजीर यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी खात्यातील अत्यंत कार्यक्षम, मनमिळावू, पारदर्शक व प्रामाणिक अधिकारी म्हणून लौकीक असलेले कृषी आयुक्तालयाचे माजी मुख्य सांख्यिक व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे प्रकल्प अधिकारी उत्तम धोंडीबा कुंजीर (वय 55) यांचे रविवारी (ता.23) पहाटे ह्दयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

कुंजीर यांच्या मुळ गावी वाघापूर (पुरंदर, पुणे) येथे रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याच्या कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोएल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांसह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व अन्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंजीर यांना दोन वर्षापुर्वी ह्दयविकाराला झटका आल्यानंतर त्याची अँजीओप्लास्टी शस्त्रक्रीया झाली. मात्र यानंतर जंतूसंसर्ग झाल्याने ते दिर्घकाळ आजारी होते.

राज्याच्या वित्त विभागात वर्ग दोन अधिकारी म्हणून काही काळ सेवा केल्यानंतर ते कृषी विभागात वर्ग एक चे अधिकारी म्हणून भरती झाले. नगर येथे कडा विभागात त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यानंतर कृषी आयुक्तालयाच्या मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागात कृषी उपसंचालक, नाशिकच्या विभागिय कृषी सहसंचालक अधिकारी कार्यालयात अधिक्षक कृषी अधिकारी म्हणून काम केले. यानंतर सलग आठ वर्षे राज्याच्या कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक म्हणून केलेली कामगिरी विशेष गाजली.

राज्यासाठीच्या विविध कृषी विमा योजनांची आखणी व अंमलबजावणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. खरीप व रब्बी पिक विमा, हवामानाधारीत विमा योजना, फळपिक विमा योजना, शेतकरी अपघात विमा योजना यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या काळात सांख्यिकी विभागामार्फत अनेक महत्वाचे अहवाल प्रसिद्‌ध झाले. सध्या प्रगतीपथावर असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांचे जाळे उभारण्याच्या प्रकल्पाचे पायाभूत कामही त्यांनी केले होते. यासाठी तामिळनाडू कृषी विद्यापीठात त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले होते. दोन वर्षापुर्वी युरोपमध्ये गेलेल्या शेतकरी दौऱ्याचे नेतृत्व त्यांनी केले होते. स्वतःच्या वाघापूर या कोरडवाहू गावातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी ते प्रयत्नशिल होते. गावातील सिताफळ लागवड, शेतकरी गट स्थापना व सिताफळ निर्यातीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
---------------- 

कृषी उद्योजकता राष्ट्रीय परिसंवाद - १५,१६ डिसेंबर पुणे


कृषी विद्यापीठांमार्फत पुण्यात
कृषी उद्योजकता राष्ट्रीय परिसंवाद

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठे व जर्नल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च ऍण्ड टेक्‍नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 15 व 16 डिसेंबरला बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात "कृषी उद्योजकता, व्यापारातील वैश्‍विक संधी' या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी तंत्रज्ञान व कृषी उद्योजकता या दोन गटात हा परिसंवाद होणार आहे. या निमित्ताने नवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले असून विद्यापीठांच्या माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा व परिचय पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.

शेती व्यवसाय व कृषी उद्योगाच्या अनुषंगाने झालेल्या कामाचा मागोवा व कृषी उद्योग व्यवसायांना नवी दिशा देण्याच्या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी निविष्ठा उद्योग, कृषी पणन, मुल्यवर्धन तंत्रज्ञान आणि कृषी उद्योजकता यावर या परिसंवादात भर राहणार आहे. परिसंवाद सशुल्क असून त्यासाठी विद्यार्थ्यांना दोन हजार व इतरांना पाच हजार रुपये शुल्क आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः डॉ. एस. डी. गोरंटीवार 02426 243268
------------------ 

अन्नप्रक्रीया प्रशिक्षण - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था

स्त्री शिक्षण संस्थेमार्फत महिलांसाठी
अन्नप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम
------------
पुणे ः येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्री. मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर वुमेन मार्फत महिला सबलीकरणासाठी मुली व महिलांसाठी कौशल्य शिक्षणावर आधारित विविध अन्नप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत येत्या 26 नोव्हेंबरला पाव, बिस्किटे, केक, ब्रेड, पॅटिस इ. पदार्थ तयार करण्याचे "बेकिंग प्रशिक्षण' तर 28 नोव्हेंबरला "आवळा प्रक्रिया प्रशिक्षण' कार्यक्रम घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणातील सहभाग निश्‍चिती व अधिक माहितीसाठी संपर्क ः सौ. दळवी -020 25471099, 9373788933.
------- 

यशोगाथांसाठी विद्यापीठांचे रेटकार्ड... १० हजार रुपये रेट

यशोगाथा प्रसिद्ध करायचीये ?
दहा हजार रुपये द्या !!!

नाव छापण्यासाठी दोन हजार रुपये; कृषी विद्यापीठांचे अधिकृत रेटकार्ड

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील कृषी पदवीधारकांच्या यशोगाथा पुस्तकाच्या स्वरुपात प्रसिद्ध करण्याचा स्त्युत्य निर्णय राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी घेतला आहे. मात्र या पुस्तकात यशोगाथा प्रसिद्ध करण्यासाठी प्रत्येकी तब्बल 10 हजार रुपयांचा दर निश्‍चित करण्यात आला आहे. दहा हजार रुपये भरा यशोगाथा छापा, दोन हजार रुपये भरा "परिचय दर्शिके'त (डिरेक्‍टरी) छापा असा बिझनेस मंत्र विद्यापीठांनी माजी विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात केली आहे.

परिसंवादाच्या आयोजनासाठी सहप्रायोजकत्व (सहा लाख रुपये) व प्रायोजकत्व (तीन, दोन व एक लाख रुपये) या माध्यमातूनही निधी गोळा करण्यात येत आहे. याशिवाय परिसंवादात प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पुस्तकांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 15 ते 60 हजार रुपये, संकेतस्थळावर लिंक प्रसिद्ध करण्यासाठी 25 हजार रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. याउपर परिसंवादात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये तर इतरांना पाच हजार रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. एक डिसेंबरपासून या शुल्कात आणखी वाढ करुन ते विद्यार्थ्यांना दोन हजार 500 व इतरांना सहा हजार रुपये करण्यात येणार आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डिसेंबरमध्ये कृषी उद्योजकता या विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. परिसंवाद कालावधीच कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांपुढे माजी विद्यार्थ्यांचे आदर्श उभे करावेत, त्यांना प्रेरणा द्यावी या उदात्त हेतुने यशोगाथांचे पुस्तक प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या पुस्तकात यशोगाथा प्रसिद्ध करण्याचे इतर निकष पाठीमागे ठेवून एका यशोगाथेला 10 हजार रुपये शुल्क ठरविण्यात आले आहे. या शुल्कात एक हजार शब्दाचा मजकूर व दोन ते तीन छायाचित्र प्रसिद्ध करण्यात येईल, असे विद्यापीठांनी म्हटले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांची परिचय दर्शिकाही प्रसिद्ध करण्याचे विद्यापीठांचे नियोजन असून त्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये दर निश्‍चित करण्यात आला आहे. या दोन हजार रुपयात इच्छूकांचा संक्षिप्त परिचय छापण्यात येणार आहे. आकारण्यात येणारे शुल्क हा संबंधीत पुस्तकाच्या छपाईचा खर्च असल्याचेही सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय परिसंवादाच्या निमित्ताने परिसंवाद स्थळी तंत्रज्ञान व नवनिर्मिती प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, संशोधक, व्यवसायिक, कंपन्या या प्रदर्शनात आपले तंत्रज्ञान मांडू शकतात. यासाठी तीन मिटर लांबी व रुंदी असलेल्या दालनाला 15 हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रत्येक दालनात एक टेबल व दोन खुर्च्या पुरविण्यात येतील. एकाहून अधिक दालने हवी असल्यास अधिकच्या दालनासाठी 25 हजार रुपये रेट आहे. यात शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी कोणतीही वेगळी सवलत नाही.
------------------- 

Tuesday, November 11, 2014

प्रदर्शनात शास्त्रज्ञ थेट भेट

प्रदर्शनात शास्त्रज्ञांना थेट भेटा
शंकाचे निरसन करून घ्या!

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील शेतकऱ्यांना माहिती, तंत्रज्ञानाची सखोल माहिती व त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी राज्यातील प्रमुख कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ ऍग्रोवन कृषी प्रदर्शनाच्या संपूर्ण पाच दिवसांच्या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी सात या कालावधीत उपस्थित राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना थेट विद्यापीठांशी, संशोधन संस्थांशी जोडणी करून आपल्या समस्यांवर उपाय मिळवणे व यापुढील काळातही त्यांचा थेटपणे वापर करून घेणे शक्‍य होणार आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन या संस्थांमार्फत करण्यात आले आहे.
सेंट्रल फूड टेक्‍नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटचे (मुंबई) प्रमुख पी. एम. बडगुजर, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (राहुरी) कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. टी. बी. बस्तेवाड, राष्ट्रीय कांदा व लसुण संशोधन संचलनालयाचे (राजगुरुनगर) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शैलेंद्र घाडगे व बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ संतोष गोडसे हे प्रदर्शनाचे सर्व पाचही दिवस संबंधित संस्थांच्या दालनांमध्ये शेतकऱ्यांना थेट भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (परभणी) दालनात 12 व 13 नोव्हेंबर रोजी डॉ. ए. के. गोरे तर 14 व 15 नोव्हेंबर रोजी डॉ. ए. व्ही. गुट्टे हे उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने ते मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयामार्फत (शिरवळ, सातारा) कृषी प्रदर्शनामध्ये खास शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी तज्ज्ञांची फौजच तैनात करण्यात आली आहे. प्रदर्शनाचे सर्व दिवस डॉ. स्मिता सुरकर (पशुपालन, महिलांसाठी पशुपालनातील रोजगार संधी) उपस्थित राहतील. त्याव्यतिरिक्त पहिले दोन दिवस डॉ. एम. बी. आमले (पशुप्रजनन व्यवस्थापन), डॉ. एस. एम. भोकरे (डेअरी फार्मिंग, गोठा व्यवस्थापन) व डॉ. डी. टी. सकुंडे (दुग्धपदार्थ प्रक्रिया) उपस्थित असतील.
पाठोपाठ 14 नोव्हेंबरला डॉ. ए. व्ही. खानविलकर (जनावरांची निवड, डेअरी फार्मिंग, गोठा व्यवस्थापन), डॉ. व्ही. डी. लोणकर (कुक्कुटपालन), डॉ. एस. टी. बोरीकर (पशु रोग व्यवस्थापन) थेट भेटीसाठी उपस्थित राहतील. प्रदर्शनाच्या अखेरचे दोन दिवस म्हणजेच 15 व 16 नोव्हेंबरला डॉ. तेजस शेंडे (शेळीपालन), डॉ. एस. बी. स्वामी (पशु रोग व्यवस्थापन), डॉ. आर. पी. कोल्हे (पशुसामूहिक स्वास्थ्य व्यवस्थापन) आणि डॉ. एस. बी. कविटकर (पशुआहार व्यवस्थापन) हे शेतकऱ्यांच्या थेट भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत.
------------- 

अत्याधुनिक तंत्रज्ञान आता शेतकऱ्यांच्या गोठ्यात

-----------
संजीव लाटकर, संचालक, डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स प्रा. लि.
-----------
डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स कंपनीची सुरवात 1991 मध्ये झाली. स्थापनेपासूनच शेतकऱ्यांच्या अडचणी आव्हान म्हणून स्वीकारून संशोधनाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणारी दर्जेदार उत्पादने बाजारात आणली. आज संपूर्ण दूध साखळी संपूर्णपणे स्वयंचलित (ऑटोमेशन) करण्यात आली आहे. दुग्ध व्यवसायासंबंधित सर्व प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यापासून मोठ्या प्रकल्पापर्यंत सर्वांना उपलब्ध करून दिले आहे. आम्हाला अडचण, समस्या सांगा आणि ती सोडविणारे तंत्रज्ञान विकसित करून देतो, असे आमचे स्वरूप आहे. सुरवातीला ग्रामीण भागात विजेची मोठी समस्या होती. त्यावर डीएसकेने पेट्रोल व केरोसीन इंधन आवश्‍यक नसलेला इन्व्हर्टर तयार केला. वारणा समूह उद्योगापासून त्याची सुरवात झाली. त्यात शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आम्हाला दूध या विषयातले काहीच माहीत नव्हते. दुग्ध उत्पादकांनी त्यांना हवे ते, हव्या त्या प्रकारचे व माफक किमतीतील तंत्रज्ञान आमच्याकडून विकसित करून घेतले. जशा येतील तशा शेतकऱ्यांच्या अडचणी आम्ही दूर करीत गेलो.

कस्टमाइज सोल्युशन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, दूध संकलन व्यवस्थेचे सर्व ऑटोमेशन हा सर्व प्रवास वेगाने झाला. आज वेगवेगळ्या प्रकारची 23 उत्पादने डीएसकेमार्फत उपलब्ध आहेत. दूध व्यवसायातील पशुखाद्यापासून ते बिलिंग, प्रोसेसिंगपर्यंतची सर्व कामे सोपी झाली आहेत. दूध सचिव यंत्रणा राज्य शासनाच्या अनुदानामुळे राज्यातील सर्व संघांमध्ये पोचली. सन 1997-98 मध्ये संगणक आल्यानंतर त्यावर आधारित विविध उपकरणे, "टेस्टिंग'ची साधने विकसित केली. दूध जास्त असेल तर जास्त पैसे मिळतात, हा समज खोटा ठरविण्यात आम्ही यशस्वी झालो. यामुळे दुधाची गुणवत्ता वाढीस लागली. संघांचा, संस्थांचा दुधातील पाणी बाजूला काढण्यासाठीचा अवांतर खर्चही कमी झाला. कंपनीच्या या गुणवत्ता पद्धतीला (क्वालिटी सिस्टीम) "एनडीडीबी' संस्थेनेही वाखाणले.

यानंतर 2003 पर्यंत दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा, टेस्टिंग युनिटची संकल्पना लोकप्रिय झाली. सन 2007 पर्यंत फक्त पाच ते सहा टक्के स्वयंचलित यंत्रणा होती. तंत्रज्ञानात अनेक अडचणी होत्या. देश त्यासाठी पूर्णतः आयातीवर अवलंबून होता. कंपनीने यातील सर्व त्रुटी दूर करून गोठ्यापासून डेअरीचा मुख्य प्लॅंट, शेतकरी, संकलन केंद्र, बल्क मिल्क कुलर, चिलिंग सेंटर, डेअरी प्लॅंट व बिलिंगची प्रोसेस ही दुधाची पूर्ण साखळी ऑटोमाइज केली आहे. शेतकरी दूध घालून डेअरीच्या बाहेर पडेपर्यंत त्याच्या बॅंक खात्यात दुधाचे पैसे जमा झालेले असतात. सुमारे 250 प्रकारचे रिपोर्ट तयार करणारे मराठी व इंग्रजी, या दोन्ही भाषांतले डेअरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, गोठ्यातच हिरवा सेंद्रिय चारा तयार करणारे मशिन, सौर ऊर्जेवर व सायकलवर चालणारी उपकरणे, मिल्किंग मशिन, लहान शेतकरी व लहान गोठे केंद्रस्थानी ठेवून उपलब्ध केलेली किफायतशीर व कमी खर्चाची यंत्रे अशा विविध प्रकारचे तंत्रज्ञान कंपनीने उपलब्ध केलेले आहे.

ग्रामीण भागात परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी भारताचा पहिला सोलर कॉम्प्युटिंग डिव्हाइस मोबिलिझ कंपनीने तयार केला. सोलर बेस ऑटोमॅटिक मिल्क कलेक्‍शन युनिट हे एकच यंत्र दूध संकलन आणि बॅंकेचे सर्व व्यवहार करण्याचे काम करते. दुधाचे खाते बॅंकेशी निगडित करून दिले आहे. डेअरी टु बॅंक या संकल्पनेनुसार या यंत्राद्वारा दूध संकलन, बॅंक, शिक्षण, बचत गटाची कामे अशी अनेक प्रकारची कामे करता येतात. ग्रामीण भागात हे यंत्र क्रांतिकारक ठरत आहे. गोठ्यातील सर्व कामे करणारा व सौर ऊर्जेवर चालणारा रामू यंत्रमानव, दारात जाऊन दूध गोळा करण्याची सायकलवरील ऑटोमेशनची सुविधा, बल्क कुलर मॉनिटरिंग सिस्टीम असे विविध प्रकारचे तंत्रज्ञान कंपनीने उपलब्ध केले आहे. हे सर्व पाहण्याची संधी शेतकऱ्यांना ऍग्रोवन कृषी प्रदर्शनात मिळेल.
----------

उत्पादनाचे मूल्यवर्धन हा आमचा "फोकस' - बावसकर


शेतीपुढे अनेक आव्हाने आहेत. मॉन्सून उशिरा किंवा लवकर येणार असेल तर त्या दृष्टीने पिकांचे नियोजन करता येणे महत्त्वाचे असते. यात सरकार, स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना थेट शेतावर संभाव्य आपत्तीच्या दोन महिने आधी मार्गदर्शन मिळाले पाहिजे. चालू वर्षी पाऊस उशिरा झाला. शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले. दोन-तीन वेळा पेरणी करूनही बियाणे वाया जाते. गेली पन्नास वर्षे हेच सुरू आहे. शास्त्र खूप पुढे गेले आहे. सरकारने संभाव्य धोक्‍यांची पूर्वसूचना शेतकऱ्यांना पावलोपावली मोफत दिली पाहिजे. समाजाला चालना देण्यासाठी संकटे उपयुक्त असतात. संकटे ही सुसंधी असते. ती मेंदूला चालना देतात. शिथिलतेचे ऊर्जेत रूपांतर करतात. फुले, आंबेडकर यांच्यासारख्या शून्यातून घडलेल्या व्यक्तींनी संकटांचे रूपांतर संधीत केलं. मानवजातीचा विकास केला. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.

पाणी वाचवणे हे फार महत्त्वाचे आहे. ते अतिशय योग्य रितीने वापरले तर उत्पादन व दर्जा सुधारेल, खर्च कमी होईल. शेतकरी बॅंकेच्या दावणीला बांधला जाणार नाही. आज खेडी ओस पडताहेत व शहरे अजगरासारखी सुजताहेत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तालुका पातळीवर प्रक्रिया उद्योगाची ट्रेनिंग सेंटर काढायला हवीत. चीनमध्ये फॅक्‍टरीज भाड्याने दिल्या जातात. शासनाने दुजाभाव न करता प्रक्रिया उद्योगासाठी तालुका पातळीवर प्रशिक्षण व लहान फॅक्‍टरी भाड्याने द्यावी. देशासाठी झोकून घेतले पाहिजे. चीनमध्ये पाण्याला पैसा मानतात. आपल्याकडे पैसा पाण्यासारखा वापरतात व पाण्याची नासाडीच नाही तर हत्या करतात.

बावसकर टेक्‍नॉलॉजीमार्फत आम्ही संकटाच्या काळातही शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादन घेता येईल असे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. निविष्ठा, सुविधा, हवामान यांच्या कमतरतांवर मात करून चांगले उत्पादन मिळवण्यास मदत होते. शेतकऱ्याला स्वतःचे बियाणे अधिक उत्पादनासाठी वापरता येते. आमचे तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीच्या पलीकडचे आहे. आमची जैविक, सेंद्रिय उत्पादने पिकातले विष काढून टाकण्याचे काम करतात. बिगर हंगामातही चांगले पीक उत्पादन मिळवून देतात. रोग-किडींच्या नियंत्रणासाठी जैविक, आयुर्वेदिक उत्पादने वापरून 40 ते 50 टक्के उत्पादन जास्त मिळते. मूल्यवर्धन हा आमच्या कामाचा मुख्य "फोकस' आहे. मूल्यवर्धित उत्पादन कसे घ्यायचं हे गेली 25 वर्षे आम्ही शेतकऱ्यांना शिकवतो. देशातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होत आहे. ज्यांना काहीच आधार नाही अशा हजारो कुटुंबांना आम्ही या तंत्रज्ञानाने उभे केले आहे. आम्हाला मानवतेचा प्रसार करायचा आहे.
------------

डॉ. व्ही. एस. बावसकर, संचालक, बावसकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. 

ऍग्रोवन कृषी ज्ञान मेळाव्यास आज प्रारंभ

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कृषी ज्ञान तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करून शेतीची आव्हाणे पेलण्याचे बळ देणाऱ्या ऍग्रोवनच्या बहुउपयोगी भव्य कृषी प्रदर्शनास आज (ता.12) पुणे कृषी महाविद्यालयाच्या नवीन मैदानावर प्रारंभ होत आहे. फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार अध्यक्षस्थानी असतील. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डीएसके डेव्हलपर्स प्रा. लि. चे कार्यकारी संचालक शिरीष कुलकर्णी व डॉ. बावसकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. चे प्रमुख डॉ. वि. सु. बावसकर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, प्रदर्शन मंडप राज्यभरातील शेतकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. सर्व सहभागी कंपन्या, संस्था आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, उत्पादनांसह प्रदर्शनस्थळी एक दिवस आधीच हजर झाल्या आहेत. सकाळी 11 वाजता प्रदर्शनाला प्रारंभ होईल. येत्या रविवारपर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत प्रदर्शन सुरू राहील. प्रदर्शनास भेट देणाऱ्यांसाठी प्रदर्शन मंडपाच्या पुढे व मागे वाहनतळ उभारण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या सोईसाठी या ठिकाणी विशेष मदतनिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांना देश-विदेशातील अत्याधुनिक कृषी यंत्र, अवजारे, निविष्ठा, ज्ञान व तंत्रज्ञान पाहण्याची, अभ्यासण्याची आणि आत्मसात करण्याची संधी या प्रदर्शनात एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. शेतकरी संशोधकांपासून ते जागतिक पातळीवरील कंपन्यांपर्यंत आणि स्वयंसेवी संस्थांपासून कृषी विद्यापीठे व राष्ट्रीय संशोधन संस्थांपर्यंत कृषीविषयक सर्व बाजूंशी संबंधित कंपन्या, संस्थांचा यात समावेश आहे. फक्त शेतकरीच नाही तर कृषी व संलग्न क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे प्रदर्शन उपयुक्त ठरू शकते. फोर्स मोटर्स लि. व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स प्रा. लि. व डॉ. बावसरकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.

ऍग्रो संवाद या उपक्रमाचा प्रारंभ दुपारी दोन वाजता ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बी. डी. जडे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ऊस लागवडीतील प्रगत तंत्र या विषयावर ते मार्गदर्शन करतील. गुरुवारी (ता.13) उद्धव खेडेकर (शेडनेटमधील भाजीपाला), शुक्रवारी (ता.14) संजय मोरे पाटील (केसर आंबा व्यवस्थापन), खेमराज कोर (दर्जेदार डाळिंब उत्पादन) व सौ. सुनीता घोगरे (प्रक्रिया उद्योगातील संधी), शनिवारी (ता.15) श्रीरंग सुपनेकर (शाश्‍वत शेती उत्पादन ते थेट विक्री) व कांतिलाल रणदिवे (सेंद्रिय शेती उत्पादन ते विक्री) आणि रविवारी (ता.16) अनिल जाधव (दुग्ध व्यवसायातील महत्त्वाची सूत्रे) यांची व्याखाने होणार आहेत.
------------------ 

राज्यात पावसाळी हवा

कमी दाबाचा परिणाम; उस्मानाबादेत अतिवृष्टी

पुणे (प्रतिनिधी) ः बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागातील कमी दाबाचे क्षेत्र व अरबी समुद्रात कर्नाटक व कोकण किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा या दोन्हींच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामानात वाढ झाली असून ठिकठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात उस्मानाबाद शहरात तब्बल 155 मिलीमिटर पावसासह अतिवृष्टी झाली. कमी दाबाच्या क्षेत्राची तिव्रता आणखी वाढत असल्याने शुक्रवारपर्यंत (ता.14) पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरुपात हलक्‍या ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. सोलापूरमध्ये सर्वाधिक 20 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूर व सांगलित बहुतेक ठिकाणी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तासगाव परिसरात अर्धा तास दमदार पाऊस झाला. परभणीत दोन तर तुळजापूर, कळंब व जेऊरमध्ये एक मिलीमिटर पावसाची नोंद झाली. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या.

दरम्यान, ढगाळ हवामान व पाऊस यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीहून वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कोकणात तीन अंशांनी, मध्य महाराष्ट्रात पाच अंशांपर्यंत तर मराठवाड्यात तब्बल आठ अंशांपर्यंत उंचावले आहे. कमाल तापमानही ठिकठिकाणी सरासरीहून एक ते तीन अंश सेल्सिअसने उंचावले आहे. कमाल व किमान तापमानाच्या या वाढीत पुढील दोन दिवसात घट होण्याची शक्‍यता नसल्याचे हवामान खात्यातील सुत्रांनी सांगितले.

*चौकट
- ढगाळ, पावसाळी आठवडा
हवामान खात्याने गेल्या आठवड्यातच 10 तारखेनंतर राज्यात पावसाची शक्‍यता व्यक्त केली होती. हा अंदाज खरा ठरला असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली आहे. येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. एकाच वेळी उपसागर व अरबी समुद्रात हवेचा दाब कमी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असून तिचा प्रभाव पुढील आठ दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत.
----------- 

Wednesday, November 5, 2014

अॅग्रोवन कृषी प्रदर्शन वैशिष्ट्ये बातमी - सेकंड एडिट


7 नोव्हेंबर रोजी पेस्टिंगसाठी
---------------
लोगो ः ऍग्रोवन कृषी प्रदर्शन 2014 व प्रायोजकांचे लोगो
---------------
ऍग्रोवन कृषी प्रदर्शन चार दिवसांवर; राज्यभरात वाढती उत्सूकता

पुणे (प्रतिनिधी) ः अत्याधुनिक इरिगेशन सिस्टिम्स, सौर उर्जेवर चालणारी कृषी पुरक उपकरणे, फवारणी यंत्रे, मळणी यंत्रे, पिक कापणी यंत्रे, पडगिलवारची सर्व पोस्ट हार्वेस्ट इक्विपमेंट, किर्लोस्करचा नवीन छोटा पॉवर टिलर, फोर्सचा मिनी ऑर्चड ट्रॅक्‍टर, डिएसकेंची दुग्धव्यवसायासाठीची विविध उपकरणे, गोठ्यात काम करणारा रामू यंत्रमानव, नवीन बियाणे, खते, कीडनाशके, धान्य निवडणीचा "नॅनो ग्रिन क्‍लिनिंग प्लॅन्ट' व "ग्रेडर' यासह देश विदेशात लोकप्रिय ठरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान खास शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. शेतीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंधीत असलेल्या प्रत्येकाला शेकडो संधीचा खजिना उपलब्ध करुन देणारे ऍग्रोवन कृषी प्रदर्शन आता अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपले आहे.

राज्यातील शेती, शेतकरी व ग्रामविकासासाठी विविध उपक्रम राबविणात सकाळ-ऍग्रोवन आघाडीवर आहे. ऍग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाने गेली काही वर्षे शेतकऱ्यांच्या मनात मानाचे स्थान पटकाविले आहे. या प्रदर्शनात सहभागी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्याला विकासात्मक कलाटणी मिळाली असून अनेक यशोगाथा घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या कृषी प्रदर्शनातून राज्यातील शेतकऱ्यांच्या उपयोगाचे हवे ते सर्व उपलब्ध करण्याचे प्रयत्न ऍग्रोवन परिवाराकडून सुरु आहेत. पुणे कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर (रेंजहिल्स) येथिल नवीन मैदानावर बुधवारी (ता.12) प्रदर्शनाला भव्य प्रारंभ होणार आहे. फोर्स मोटर्स लि. हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक तर जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स प्रा. लि. आणि डॉ. बावसकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. हे सहप्रायोजक आहेत.

भारतीय निर्यात कर्ज हमी महामंडळ (ईसीजीसी), बॅंक ऑफ इंडिया, आयडीबीआय आदी बॅंकांच्या खास शेतकऱ्यांसाठीच्या योजना; सेंद्रीय शेतीसाठीची खते, औषधे, बियाणे; कृषीविषयक माहिती प्रसाराच्या संस्था, कृषीविषयक साहित्य; लक्ष्मी, सुर्याटेक, सुदर्शन, जैन आदी आघाडीच्या कंपन्यांची अत्याधुनिक सौर उर्जा उपकरणे, पशुधनविषयक चारा, खुराक, यंत्रसामग्री; पॉलिहाऊस, शेडनेट विषयक उत्पादने, शेळी व मेंढीपालन, पिक उत्पादक संस्था आणि शेती व पुरक व्यवसाय संबंधीत स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रदर्शनात नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान सादर करण्यात येणार आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठे, विविध कृषी संशोधन संस्था, अन्न प्रक्रिया संस्था, कृषी, अभियांत्रिकी व पशुवैद्यकीय महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, केंद्रीय अन्न प्रक्रीया संस्था, राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचलनालय, कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आदी शेतीपुरक शासकीय विभाग व संस्था प्रदर्शनात शेतकऱ्यांशी थेट जोडणी करण्यासाठी सहभागी होत आहेत. या संस्थांच्या दालनात शेतकऱ्यांना तज्ज्ञांशी संवाद साधण्याची व तंत्रज्ञान थेट बांधावर उपलब्ध करुन घेण्याची संधी मिळणार आहे.

- संधी अभ्यासाची, संधी प्रगतीची !
टिश्‍यू कल्चर, बायोटेक, पॅकिंग टेक्‍नॉलॉजी, सोलर टेक्‍नॉलॉजी, ऍग्रो इलेक्‍ट्रॉनिक्‍स, पल्विलायझेशन टेक्‍नॉलॉजी, डायड्रो पॉवर, केमिकल व ऑरगॅनिक फार्मिंग टेक्‍निक्‍स, मायक्रो इरिगेशन टेक्‍नॉलॉजी, शेतीसाठीची मोबाईल टेक्‍नॉलॉजी, ऍग्री बॅंकिंग, बियाणे तंत्रज्ञान, ब्लोअर, ग्रीन हाऊस टेक्‍नॉलॉजी आदी अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची, हाताळण्याची, जाणून घेण्याची, तुलना करण्याची व पटेल ते आत्मसात करण्याची संधी प्रदर्शनात शेतकऱ्यांना मिळणार आहे.
------------ 

बुधवारपासून पुण्यात सुरु होणार ऍग्रोवन कृषी प्रदर्शन महामेळा

लोगो ः ऍग्रोवन कृषी प्रदर्शन 2014 व प्रायोजकांचे लोगो
----------------------------
पुणे (प्रतिनिधी) ः राज्यभरातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या ऍग्रोवनच्या यंदाच्या बहुप्रतिक्षित, बहुचर्चित कृषी प्रदर्शनाला येत्या बुधवारपासून (ता.12) पुणे कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथिल नवीन मैदानावर भव्य प्रारंभ होत आहे. सलग पाच दिवस म्हणजेच 12 पासून 16 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत कृषी ज्ञान, तंत्रज्ञानाचा हा महामेळा सुरु राहणार आहे. फोर्स मोटर्स लि. हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स प्रा. लि., डॉ. बावसकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.

ऍग्रोवनचे कृषी प्रदर्शन हा राज्यातील कृषी तंत्रज्ञान विस्ताराचा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. राज्य परराज्यांतून शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, उद्योजक या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देत असतात. यंदाच्या प्रदर्शनातही शेती व शेतीसंबंधी सर्व घटकांची माहीती, ज्ञान, तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शेतीपुढील नव्या आव्हाणांचा सामना करण्यासाठी बळ देवून शेतकऱ्यांचे जगणे सोपे करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

देशभरातील प्रमुख खत कंपन्या, दुग्धव्यवसाय यंत्र सामग्री, ठिबक, तुषार सिंचन, पुस्तके व प्रकाशने, बॅंका, सल्ला सेवा, रोपवाटिका, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, अत्याधुनिक यंत्रसामग्री, अवजारे, शेततळे, सौर उर्जा सयंत्रे, फळ महोत्सव, शेळीपालन, पशुपालन, कृषी पर्यटन, हरितगृह, जैविक किडनाशके, बियाणे उत्पादक आदींचा या प्रदर्शनात सहभाग आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने नवीन उत्पादनांचे, साधनांचे लॉंचिंगही या प्रदर्शनात होणार आहे.

दरम्यान, कृषी प्रदर्शनाची माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचविण्यासाठी चार ऍग्रोवन कृषी प्रदर्शन प्रचार महारथ विविध जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. हे महारथ सात हजार किलोमिटर प्रवास करुन 1200 गावांमध्ये प्रदर्शनाची माहीती थेट पोचविणार आहेत. कृषी विद्यापीठे, ग्रामपंचायत, कृषीविषयक संस्था व शेतकऱ्यांकडून या महारथांचे व कृषी प्रदर्शनाच्या उपक्रमाचे उत्स्फुर्त जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. पुढील पाच दिवस उत्तरोत्तर प्रदर्शनाची उत्कंठा वाढत जाणार आहे.

* प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये
- आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अविष्कार
- प्रगतशिल शेतकरी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन
- कृषीतील नामवंत कंपन्यांचा सहभाग
- ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचा अनोखा मेळ
- ऍमिग्रोमार्फत राज्यस्तरीय फळ महोत्सव
-------------- 

Saturday, November 1, 2014

पुण्यातील 200 गावांमध्ये संतुलित पशुआहार योजना

पुणे (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात वाढ करुन सातत्य राखण्याठी राष्ट्रीय दुग्ध विकास आराखड्याअंतर्गत एनडीडीबीच्या आर्थिक सहाय्याने पुणे जिल्हा सहकारी दुध संघामार्फत संतुलित पशुआहार कार्यक्रम व वैरण विकास कार्यक्रम राबविण्यास नुकतिच सुरवात झाली आहे. यासाठी जिल्ह्यातील 200 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या थेट संपर्कात राहून कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी 200 स्थानिक सेवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सध्या नारायणगाव येथिल कृषी विज्ञान केंद्रात सुरु आहे.

जनावरांना देण्यात येणाऱ्या खाद्यात अनेकदा प्रोटिन, उर्जा, फॅट, जीवनसत्वे व क्षार यांचा अभाव असतो किंवा ते कमी प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे जनावरांच्या आरोग्यावर व दुध उत्पादनावर विपरित परिणाम होतो. असंतुलित आहारामुळे जनावराच्या क्षमतेपेक्षाही कमी प्रमाणात दुध उत्पादन होते. ही घट टाळून उत्पादकतावाढ करण्यासाठी संघामार्फत संतुलित आहार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दोन वेतातील वाढते अंतर कमी करणे, दुध देण्याचा कालावधी वाढवणे, दुधाचा ताप व किटोसिन रोगांमुळे जनावरांचा होणारा मृत्यू रोखणे, कालवडी लवकर वयात आणून पहिल्या वेताचा कालावधी योग्य ठेवणे, उत्पादन कालावधी वाढून दुध उत्पादन वाढवणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

एप्रिलपासून आंबेगावमधील 30, दौंड 20, जुन्नर 49, पुरंदर 10,भोर 20, हवेली 6, खेड 17, मुळशी 10, शिरुर 28 तर मावळ व वेल्हा तालुक्‍यातील प्रत्येकी पाच गावांमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. गावातील प्रत्येक शेतकऱ्याला संतुलित पशुआहाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गावातीलच एका व्यक्तीची स्थानिक सेवक (लोकल रिसोअर्स पर्सन) म्हणून निवड करण्यात आली आहे. या सेवकास पहिल्या वर्षी दरमहा 1500 रुपये व दुसऱ्या वर्षी दरमहा 750 रुपये मानधन देण्यात येणार आहे. जनावराचे वजन, आरोग्य तपासून संतूलित आहार ठरवून देण्याचे काम हे सेवक आपापल्या गावांमध्ये करणार आहेत. संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वीर हे या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

- 4500 हेक्‍टरवर चारा पिक प्रात्यक्षिके
चारा पिकांच्या विकासासाठी संघामार्फत सुमारे साडेचार हजार हेक्‍टरवर वैरण विकास प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. यामध्ये मोअर मॅन्युअल, मोअर ऍटो पीकअप, बायोमास बंकर, सायलोट, सायलेज मेकिंग प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. याशिवाय शेतकऱ्यांना चारा पिकांच्या बियाण्यासाठी व गायरान जमीनीच्या विकासासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. एनडीडीबीकडून वैरण विकासासाठी जिल्ह्याला 97 लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. यातून आंबेगाव, भोर, दौंड, हवेली, जुन्नर, खेड, पुरंदर तालुक्‍यांमधील एकूण 58 गावांमध्ये मका, लसूण, ज्वारी, भात व ऊस या चारा पिकांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. संघामार्फत याबाबत गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे.

- कोट
""संतुलित आहार कार्यक्रमासाठी एनडीडीबीकडून एक कोटी 78 लाख रुपये उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्स्फुर्त सहभागातून या कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा संघाचा प्रयत्न आहे.''
- बाळासाहेब खिलारी, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ
-------------- 

कात्रज - दुध संकलन केंद्र बळकटीकरण योजना, शेतकरी प्रशिक्षण

पुणे जिल्हा दुध संघ देणार
60 हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण

संकलन केंद्रांच्या बळकटीकरणासाठी तीन कोटी रुपये

पुणे (प्रतिनिधी) ः राष्ट्रीय दुग्ध विकास आराखड्याअंतर्गत गावपातळीवर दुध संकलन व्यवस्थेचे मजबुतीकरण करण्याचा कार्यक्रम पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघामार्फत नुकताच सुरु करण्यात आला आहे. यातून दुग्धव्यवसायाशी थेट संबंधीत असलेल्या सुमारे 60 हजार व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार असून दुग्ध संस्थांना आधुनिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. येत्या चार वर्षात यासाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

नॅशनल डेअरी प्लॅनमधून कात्रज संघाला सहा कोटी 75 लाख 12 हजार रुपये उपलब्ध होणार आहेत. यापैकी 4 कोटी 60 लाख 39 हजार रुपये 100 टक्के अनुदान तत्वावर होणार आहे. संघाचे योगदान दोन कोटी 14 लाख 73 हजार रुपयांचे राहणार आहे. जिल्ह्यात 236 दुग्ध संस्थांमार्फत 2017-18 पर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात आंबेगावमधील 15, दौंड 52, जुन्नर 13, पुरंदर 25, भोर 28, हवेली 12, खेड 30, मुळशी 12, शिरुर 27, मावळ 10 तर वेल्हा तालुक्‍यातील 12 संस्थांचा समावेश आहे. प्रशिक्षण हा या योजनेचा महत्वाचा भाग आहे. येत्या पाच वर्षात छोट्या दुध उत्पादकांपासून संचालकांपर्यंत जिल्ह्यातील सुमारे 60 हजार व्यक्तींना यातून प्रशिक्षण देण्याचे उद्दीष्ट आहे.

जिल्ह्यातील दुध संकलन केंद्रांच्या सुधारणेसाठी सर्वाधिक सुमारे तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या शिवाय संकलन केंद्रांना पुरक ठरणारे संकलन साहित्य, कॅन्स, बल्क कुलर आदी साहित्याचाही पुरवठा या योजनेतून संस्थांना करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने या योजनांची अंमलबजावणी होणार असून सध्या शेतकरी प्रशिक्षणासाठी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण व इतर कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरु असल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली.

- असे होणार दुध संकलन बळकटीकरण (2017-18 पर्यंत)
अनुदानाची बाब ---- नग --- उपलब्ध निधी (लाख रुपये)
दुध संकलन केंद्र --- 238 --- 274.90
संकलन साहित्य --- 374 --- 59.84
एस.एस.कॅन्स --- 1913 --- 57.39
बल्क कुलर --- 8 --- 44.29
ऍटोमेटेड दुध संकलन केंद्र --- 4 --- 6.30
आयसीटी सपोर्ट --- 1 --- 6
संस्था पातळीवर मानधन --- 236 --- 101.95
विस्तार साहित्य --- 6 --- 24
शेतकरी प्रेरणा कार्यक्रम --- 472 --- 2.83
शेतकरी विकास कार्यक्रम --- 160 --- 0.96
स्वच्छ दुध निर्मिती प्रशिक्षण --- 9440 --- 3.54
सचिव प्रशिक्षण --- 396 --- 20.16
संचालक, पर्यवेक्षक, कर्मचारी प्रशिक्षण --- 54 --- 3.32
---------- 

पुस्तक परिचय - मनापासून मनाकडं - डाॅ. कृष्णा मस्तुद

जावे पुस्तकांच्या गावा ः संतोष डुकरे
------------
पुस्तकाचे नाव - मनापासून मनाकडं
लेखक - डॉ. कृष्णा मस्तूद
पृष्ठ - 216
मुल्य - 240 रुपये
प्रकाशक - सकाळ प्रकाशन, सकाळ पेपर्स प्रा. लि, 595, बुधवार पेठ, पुणे 2.
संपर्क - 020 24405678
-------------
माणसाच्या मनाचा ठाव कुणाला लागू शकत नाही. याचं मनच थाऱ्यावर नाही. मन मारून संसार केला. खुळं आहे ते... असे शेलके टोमणे असतील किंवा वेडा आहे म्हणून केलेले दुर्लक्ष, मारलेले दगड असतील. समोरच्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून आपण मनाचा धांडोळा घेतो. स्वतःच्या मनाला ओळखायला, त्याच्याशी संवाद साधायला, त्याला घडवायला बहुतेक जण विसरतात. आणि मग स्वतःबरोबरच इतरांच्याही आयुष्यावर बिब्बा घालत राहतात. मनाच्या हिंदोळ्यावर अधांतरी टांगून राहण्यापेक्षा त्याच्या प्रखर ताकतीवर यशाची शिखरे सर करणे कोणाला नको असते? पण मग मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? बार्शी येथील प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. कृष्णा मस्तूद यांनी आपल्या या पुस्तकात अतिशय सहजपणे ही जीवनविद्या वाचकांसाठी खुली केली आहे.

डॉ. मस्तूद यांच्या सकाळच्या सप्तरंग पुरवणीतील गाजलेल्या "मनापासून मनाकडं' या सदरातील सर्व 52 लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांची प्रस्तावना आणि डॉ. मस्तूद यांच्या मनोगताने या पुस्तकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. सर्व लेख मनाची मशागत करून यशस्वी जगण्याचा पाया घालणारे आहेत. गौतम बुद्धांपासून संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, कबीर ते अगदी रोजच्या जगण्यातील दाखल्यांचा आधार घेत मनाचे विविध कंगोरे उलगडून दाखवले आहेत. मनाची मशागत करून आयुष्याचे पीक सुदृढ, संपन्न व फलदायी करण्याची, स्वतःच्या मनाकडे पाहण्याची निकोप दृष्टी हे पुस्तक देते. मनातून निर्माण होणाऱ्या विकारांवर विजय मिळवण्याचा सहजसोपा मार्गही हे पुस्तक दाखवते. स्वयंविकास ही अखेरच्या श्‍वासापर्यंत सुरू राहणारी प्रक्रिया असते. तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असला तरी तुमच्या मनाला लागलेली जळमटं झटकून जगण्याला नवा अर्थ आणि नवी झळाळी देण्यात हे पुस्तक उपयुक्त ठरेल, हे निश्‍चित.
-------------

हवामानाधारित रब्बी विम्याला 15 दिवसांची मुदतवाढ

गहू, हरभरा पिकांना मिळणार लाभ

पुणे (प्रतिनिधी) ः हवामानाधारित रब्बी पिक विमा योजनेतील शेतकरी सहभागाची अंतिम मुदत हरभरा पिकासाठी 31 ऑक्‍टोबरवरुन 15 नोव्हेंबरपर्यंत तर गहू पिकासाठी 22 नोव्हेंबरवरुन 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. नगर, सोलापूर, उस्मानाबाद, अमरावती व नागपूर या पाच जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येत आहे. यापैकी रब्बी ज्वारी पिकासाठी विमा संरक्षण मिळवण्याची अंतिम मुदत नुकतिच (31 ऑक्‍टोबर) संपली आहे.

रब्बी पिकांच्या पेरणीस विलंब झाल्याने हरभरा व गहू पिकांसाठी विमा उतरविण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याची मागणी कृषी आयुक्तालयामार्फत कृषी विमा कंपनीकडे करण्यात आली होती. यानुसार कंपनीने मुदतवाढीला हिरवा कंदील दाखवला असून राज्य शासनानेही याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. योजनेच्या इतर निकषांमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही. योजना राबविण्यात येत असलेल्या पाच जिल्ह्यांतील अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेवून पिकांना विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.
----------------