Thursday, November 5, 2015

फर्टिलायझर डिलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रकाश कवडे

पुणे ः येथील महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डिलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोपरगाव (नगर) येथील प्रकाश कवडे यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष कैलास ठोळे यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यात पार पडली. या वेळी ही निवड करण्यात आली. संघटनेचे विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.


ईशान्य मोसमी पावसाचा जोर वाढला

दक्षिण कोकण, गोव्यात हलका पाऊस; तमिळनाडू, केरळात अतिवृष्टीचा इशारा

पुणे (प्रतिनिधी) - नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर आता अरबी समुद्राच्या अनुकूलतेमुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. या मॉन्सूनच्या प्रभावाने पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण कोकणातही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसात ईशान्य मॉन्सूनची सक्रीयता वाढून तमिळनाडू व केरळात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात रविवारपर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून सोमवारी (ता.९) दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

किनारी आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पॉडेचरीसह दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रीय झाला असून पुढील दोन दिवसात या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वाऱ्यांची दिशा ईशान्येकडून पश्चिमेकडे म्हणजेच माघारीच्या मॉन्सूनच्या दिशेने आहे. हे वारे उपसागरावरुन दक्षिणेकडील राज्यांवर बाष्पयुक्त ढग वाहून आणत असल्याने या भागात ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ईशान्य मॉन्सूनचा पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात सध्या त्याची तिव्रता सर्वाधिक आहे. अरबी समुद्रात सक्रीय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उपसागराकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढलेला आहे.

गुरुवारी (ता.५) सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्ट्र, कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी आणि कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीहून तीन ते सहा अंश सेल्सिअसने वाढ झाली. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

दिवसभरात आंध्र प्रदेशलगतच्या उपसागरात सक्रीय असलल्या चक्राकार वाऱ्याची तिव्रता कमी झाली. तर मध्य पूर्व अरबी समुद्रात सक्रीय असलेल्या तिव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे न्यून दाबाच्या क्षेत्रात डिप्रेशन) रुपांतर झाले. मुंबईपासून सुमारे १००० किलोमिटर अंतरावर सक्रीय असून ते ओमानच्या दिशेने सरकत आहे. शुक्रवारी (ता.६) त्याची तिव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

शुक्रावारी (ता.५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात प्रमुख ठिकाणी नोंदविण्यात आलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई २६.८, अलिबाग २५.६, रत्नागिरी २३.१, पणजी २५, डहाणू २३, पुणे १८.३, नगर १६, जळगाव १९.४, कोल्हापूर २१.९, महाबळेश्वर १७.४, मालेगाव २०.२, नाशिक १६.५, सांगली २३.१, सातारा २०.९, सोलापूर २३, उस्मानाबाद १८, औरंगाबाद १८.६, परभणी १७.१, नांदेड १६, अकोला १९.५, अमरावती २०.६, बुलडाणा १९.६, ब्रम्हपुरी २१.३, चंद्रपूर २१.२, गोंदिया २०.४, नागपूर २०.३, वाशिम २१.६, वर्धा २०.५, यवतमाळ २०.४
----------------------------

Wednesday, November 4, 2015

जमीन मोजणी - मनोज आवाळे

वाचण्याजोगे काही
----------------
जमीन मोजणी
------------------
जमीन मोजणीची कार्यपद्धती, भूमी अभिलेख खात्याचे कार्य, भूमी अभिलेखाकडे असणारी कागदपत्रे, मोजणीसाठी वापरण्यात येणारी आधुनिक पद्धत याबाबतची सविस्तर माहिती पत्रकार मनोज आवाळे यांनी या पुस्तकात दिली आहे. आदिश्रेय प्रकाशन यांनी ते प्रकाशित केले आहे.
------------------
या पुस्तकातील महत्वाचे मुद्दे

- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलमांनुसार जमीनीची मोजणी केली जाते.
- हद्द कायम मोजणी, पोटहिस्सा मोजणी, भूसंपादन संयुक्त मोजणी, कोर्टवाटप मोजणी, कोर्टकमिशन मोजणी, बिनशेती मोजणी असे मोजणीचे प्रकार आहेत.
- जमीनधारकाने आपला भूमी अभिलेख सक्षम करायला हवा. ज्याचे भूमी अभिलेख सक्षम असतात ताचे वाद उद्भवत नाहीत. उद्भवल्यास तातडीने, सामोपचाराने मिटवता येतात.
- भूमी अभिलेख खाते जमीन मोजणीबरोबरच भूसंपादन, सातबारा उताऱ्यावरील आकार, नकाशा, जमीनधारणेच्या नावात आलेली चुक, गटवारी, दुरुस्ती, पोटहिस्सा मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, गाव नकाशातील दुरूस्ती ही कामे करते.
- भूमी अभिलेख कार्यालयाकडील मुळ रेकॉर्डशी तुलना व पडताळणी करुनच नवीन मोजणी केली जाते.
- भूमी अभिलेख खाते जमिनीतील अतिक्रमण दाखवू शकते, अतिक्रमण काढू शकत नाही. तो अधिकार त्यांना नाही. तो अधिकार तहसिलदारांना आहे. त्यासाठी त्यांच्याकडे अर्ज करावा लागतो.
- जमीन पुनर्मोजणी, ईटीएस प्रणाली, ऑनलाईन मोजणी, उपग्रहाद्वारे गावठाण मोजणी, ई चावडी, ई फेरफार, ई म्युटेशन, कागदपत्रांचे स्कॅनिंग, डिजिटायझेशन यामुळे भूमी अभिलेख खात्याचा चेहरा मोहरा बदलत आहे.
- जमिनीच्या क्षेत्राबाबत व वादविवादाबाबत पोलिसांना काहीच अधिकार नसतो. त्यामुळे मोजणीबाबत किंबहुना महसूलच्या कुठल्याही बाबत पोलिसांकडे तक्रार करण्याच्या भानगडीत पडू नये. अतिक्रमण काढण्यासाठी शुल्क भरुन पोलिस बंदोबस्त मागवता येतो.
- लगतच्या शेतकऱ्याने मोजणी मागवली म्हणून त्याच्यासारखी मोजणी होईल हा गैरसमज आहे. मोजणी ही उपलब्ध जमिनीच्या रेकॉर्डनुसार होत असते. त्यात उलटापालट करता येत नाही.

Monday, November 2, 2015

कृषीकिंग स्मार्ट ॲपचे उद्घाटन

पुणे (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांच्या माहितीसाठी बनविण्यात आलेल्या कृषिकिंग स्मार्ट ॲप्लिकेशन सेवेचा शुभारंभ महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख यांच्या हस्ते ॲग्रोवनमार्फत पिंपरी येथे आयोजित कृषी प्रदर्शनात नुकताच झाला. कृषीकिंगचे व्यवस्थापन प्रमुख डॉ. नरेश शेजवळ, व्यवसाय प्रमुख निलेश शेजवळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. सुभाष शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मोबाईल प्लेस्टोअरवर हे ॲप्लिकेशन मोफत डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध आहे. हवामान अंदाज, पिक सल्ला, बाजारभाव, कृषी क्षेत्रातील घडामोडी, शासकीय योजना व अनुदान आदी कृषी संबंधीत माहिती या ॲप्लिकेशनद्वारे मोबाईलवर उपलब्ध होते.


डाळिंब संघाच्या अध्यक्षपदी शहाजीराव जाचक

उपाध्यक्षपदी अरुण देवरे

पुणे (प्रतिनिधी) - अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या अध्यक्षपदी शहाजीराव जाचक (पुणे) तर उपाध्यक्षपदी अरुण देवरे (नाशिक) यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष रविंद्र नवलाखा व प्रभाकर चांदणे यांनी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नुकतिच ही निवड जाहिर केली. उर्वरीत कार्यकारणीची निवड संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत जाहिर संघाचे नवीन संचालक मंडळ पुढीलप्रमाणे - प्रभाकर चांदणे, हरिदास थोरात, भागवत पवार, महेंद्र बाजारे, नारायणराव काटकर (सोलापूर), रविंद्र नवलाखा, शहाजीराव जाचक (पुणे), अरुण देवरे, खेमराज कोर (नाशिक), शिवलिंगप्पा संख, आनंदराव पाटील (सांगली), खंडेराव मदने (सातारा), संदीप रोहमारे (नगर), मदनराव वाडेकर (जालना), डॉ. धोंडिराम वाडकर (लातूर)


8 पीपीपी प्रकल्पांना मंजूरी

एकात्मिक कृषी विकासाच्या
८ नवीन पीपीपी प्रकल्पांना मंजूरी

पुणे (प्रतिनिधी) - राज्य सरकारने सार्वजनिक खासगी गुंतवणूकीतून (पीपीपी) आठ कंपन्यांना २३ जिल्ह्यांतील एक लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर ७०.९४ कोटी रुपयांचे एकात्मिक शेती विकास प्रकल्प राबविण्यास मंजूरी दिली आहे. उत्पादन ते विक्री मुल्यसाखळी विकासासाठी कापूस, सोयाबीन, कडधान्य, भाजीपाला, ऊस (गुळ), वाटाणा व मका या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या एक लाख ४० हजार २६१ शेतकऱ्यांसाठी हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यातून सुमारे तीन लाख २८ हजार ५०० टन शेतमाल खरेदीचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या प्रकल्पांसाठी सरकारमार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १५.४० कोटी व इतर योजनांतून ३.२४ कोटी असे एकूण १८.६४ कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. कृषी आयुक्तालयामार्फत या प्रकल्पांचे संनियंत्रण करण्यात येणार आहे. शेतकरी हिस्सा १७.९४ कोटी रुपये तर कंपन्यांचा वाटा ३४.२८ कोटी रुपयांचा राहणार आहे. या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादित शेतमाल संबंधीत कंपनी व संलग्न खरेदीदारांमार्फत खरेदी करण्यात येणार आहे.

- चौकट
- सार्वजनिक खासगी भागिदारी प्रकल्प (२०१५-१६)
पिक --- कंपनी --- जिल्हे --- प्रकल्प किंमत (रुपये) --- क्षेत्र (हेक्टर) --- सहभागी शेतकरी --- माल खरेदी लक्षांक (टन)
वाटाणा --- त्रिमुर्ती फुडटेक प्रा. लि. आणि ॲडवान्टा लि. --- बुलडाणा, नगर --- १००० --- ३५०० --- १४०००
मधुमका --- त्रिमुर्ती फुडटेक प्रा. लि. आणि ॲडवान्टा लि. --- औरंगाबाद, नगर --- ३००० --- ७००० --- ३००००
भाजीपाला --- आकाश ॲग्री सोल्युशन्स प्रा. लि. --- औरंगाबाद, जालना, जळगाव --- १५०० --- २००० --- ९०००
गुळ --- श्रीकांत ॲग्री इंडस्ट्रीज लि. --- सातारा, सांगली --- ५२५ --- १२५१ --- ४४०००
कापूस --- एएफपीआरओ, बेटर कॉटन इनिशिटिव्ह --- यवतमाळ --- २५००० --- १४००० --- ४०००
कापूस यांत्रिकीकरण --- जॉन डियर --- अकोला --- ४० --- १५१० --- ०
कडधान्य --- रॅलिज इंडिया लि. --- उस्मानाबाद, लातूर, बीड --- ७००० --- ११००० --- १००००
सोयाबीन --- एडीएम ॲग्रो इंडस्ट्रीज लि. --- उस्मानाबाद, लातूर, बीड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, नागपूर --- १,५०,००० --- १,००,००० --- २१७५०० 

Sunday, November 1, 2015

मॉन्सून आणि बदल

राज्यात पडणाऱ्या मॉन्सून पावसाचा सह्याद्री व सातपुडा पर्वतरांगांशी थेट संबंध आहे. या दोन्ही पर्वतांवरील वनसंपदेच्या गेल्या काही दशकात झालेल्या ऱ्हासाची मोठी किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागत आहे. यानंतरही याकडे पुरेशा गांभिर्याने पाहिले जात नाही, हे दुर्दैव आहे.
--------------------
मॉन्सून आणि बदल यांचे अतूट नाते आहे. दर वर्षीचा मॉन्सून यापूर्वीच्या सर्व मॉन्सूनपेक्षा वेगळा असतो. यंदाचा मॉन्सूनही सर्वार्थाने वेगळा आहे. यंदा त्याने अनेक बाबतीत टोकाची स्थिती गाठली आहे. त्याचे भिषण परिणाम शेती, पर्यावरण व अर्थकारणावर झाले आहेत. कदाचित पावसाचे वितरण व मॉन्सूनच्या विविध घटकातील तिव्र बदल गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक असावेत. कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळे, वाऱ्याचा समुद्रावरील, घाटमाथ्यावरील आणि पर्जन्यछायेच्या भागातील वेग, कमाल किमान तापमान साऱ्यातच मोठे बदल आहे. संपूर्ण खरिप हातचा गेलाय, रब्बी शाश्वती नाही. विहीरी, धरणं भरतील का, तहान भागेल का... प्रश्न अनेक आहेत.
आता दर वर्षी असं होतंय. परिस्थिती नापिकी आणि आत्महत्यांपर्यंत जावून पोचते. एखादा पाऊस यावा आणि सर्व प्रश्न मिटावेत या आशेवर शासन प्रशासन दिवस काढत राहतं. जागरुक नागरिक बेडकाची, गाढवाची लग्न लावतात. मारूतीला शेण चोळतात. धोड्याला गावभर फिरवून दारोदार पाणी मागतात. भिकचे सारे डोहाळे मिरवले जातात, पुरवले जातात. देवांना गाऱ्हाणी घालून झाली की पुन्हा सारे गुडघ्यावर हात आणि हातावर डोकं ठेवून पावसाची वाट पाहत बसतात. दर वर्षी हे असंच सुरु आहे. यंदाही चित्र फार काही वेगळं नाही. बेडूक ओरडल्यावर पाऊस येतो... मग लावा त्याचं लग्न. तो खुष होईल, ओरडेल व पाऊस पडेल. अशा श्रद्धांच्या नावाखाली किती दिवस आपण अंधश्रद्धा पोसणार आणि पावसाची वाट पाहत भेगाडलेल्या रानात टाचा घासत राहणार.
मॉन्सून, त्याची वाटचाल, त्यावर प्रभाव पाडणारे घटक त्यात मानवी अति हस्तक्षेपामुळे झालेले बदल हे लक्षात घेवून कृती कधी करणार. उलट दिवसेदिवस पाऊस कमी होत चाललाय आणि तो वाढणारच नाही अशा अविर्भावात थेंब न् थेंब अडविण्यासाठी, त्याच्यावर मालकी प्रस्थापिक करण्यासाठी गावोगाव प्रयत्न सुरु आहेत. चांगलं आहे. साठा वाढतोय. पण पाऊस ज्या गोष्टींमुळे कमी झालाय, जे गणित बिघडलंय ते पुन्हा जुळवून, सोडवून पावसाच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा दिशेने फार कमी प्रयत्न सुरु आहेत. जे आहेत ते ही फक्त पंचतारांकित बैठकांपुरते मर्यादित. प्रत्यक्ष गावपातळीवर, शेता शिवाराच्या पातळीवर काय ? तिथे तर प्रचंड वेगाने ऱ्हास सुरु आहे.
महाराष्ट्रातील पावसावर व्यापक प्रमाणात प्रभाव पाडणारे दोन सर्वात महत्वाचे घटक म्हणजे दक्षिण-उत्तर पसरलेला सह्याद्री पर्वत आणि पुर्व-पश्चिम पसरलेला सातपुडा पर्वत. गेल्या १० ते १५ वर्षात या दोन्ही पर्वतांचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास झाला आहे. विशेषतः मॉन्सूनवर थेट परिणाम करणारी वृक्षसंपदा प्रचंड प्रमाणात घटली आहे. यंदा वृक्षसंपदा घनदाट असलेल्या महाबळेश्वरमध्ये एकाच दिवशी ३५० मिलीमिटर पाऊस पडला तर त्याच वेळी अवघ्या ८-१० किलोमिटरवर पाचगणीला अवघा ३५ मिलिमिटर पाऊस होता. अशी स्थिती तोरणमाळपासून ते आजऱ्यापर्यंत अनेक ठिकाणी यंदा अनेकदा आढळून आली. पश्चिम पट्ट्यात घाट ओलांडला की बांधावरही झाड दिसणं दुरापस्त होत चाललंय. अवघ्या काही दशकांपूर्वी संपूर्ण जंगल असलेल्या नाशिकच्या संपूर्ण त्र्यंबकेश्वर इगतपुरी पट्यात फक्त उघडे बोडके डोंगर उरलेत.
शिरपूर पँटर्नचा गाजावाजा होतो. त्याचे महत्व आहेच. पण ऐके काळी जलसंपन्न असलेल्या, दोन्ही समुद्रांवरचा मॉन्सून बरसणाऱ्या या भागात हा पँटर्न राबवण्याची गरज का पडली हे लक्षात घेतले जात नाही. सातपुडा बहुतांश उजाड झालाय. डोंगरच्या डोंगर बेचिराख झालेत. पावसाळ्यानंतर डोंगरांवर दिसणारी हिरवळ म्हणजे जंगल नाही, हे कुणी कुणाला समजून सांगायचं. पूर्वी निसर्ग हाच देव होता. प्रत्येक बाबीसाठी निसर्गाची आराधना होती. त्यातून निसर्गालाही संरक्षण होते. जंगल होतं. पाऊस शाश्वत होता. दुष्काळाचे चक्र नव्हते असे नाही पण त्याची कारणे पडणाऱ्या नाही तर वाहून जाणाऱ्या पाण्यात जास्त होती. पुढे पाणीसाठे झाले. निसर्ग देव राहीला नाही. माणसांसाठीच नाही तर देवांसाठीही सिमेंटची जंगले उभी राहताहेत. निसर्ग संपला, तेथे हवामानावर परिणाम झाला, तेथे पाऊस संपला, हे राज्यातील वास्तव आहे.
शासकीय पातळीवरही फारशी आनंददायी स्थिती नाही. युनेस्कोने पश्चिम घाट जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ घोषित करुन काय फरक पडला ते गुलदस्त्यातच आहे. केंद्राने २०१० मध्ये डॉ. माधव गाडगिळ समिती नेमली. त्यांनी बहुतांश पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह घोषीत करावा, नैसर्गिक साधनसंपत्ती टिकण्यासाठी बेकायदा खोदकाम, खाणकामावर काही बंधने घालावीत अशा शिफारशी केला. त्याला विरोध झाला. मग डॉ. कस्तुरीरंगन समिती आली. त्यांनी दगडापेक्षा विट मऊ केली. केंद्राने हा अहवाल मान्य केला. पण राज्य सरकारने दोन्ही अहवाल झुगारलेत. त्यातल्या त्यात राष्‍ट्रीय उद्याने व अभयारण्यांच्या भागात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जे काही संरक्षण होतेय ते होतेय. बाकी सर्व नद्यांचे उगम, पर्जन्यसंचयाचा पाणलोटां भाग, पर्वत शिखरे वाऱ्यावर आहे. मग आपली वाटचाल नक्की कोणत्या दिशेने सुरु आहे, हेच कळत नाही.
देशाचे 33 टक्के क्षेत्र वनांखाली असणे महत्वाचे आहे. पण हा नियम फक्त देशालाच लावायचा का. त्यासाठी प्रत्येकाने फक्त वन खात्याकडेच बोट दाखवायचे का. देशातील प्रत्येक जमीनधारकाला त्याच्या एकूण जमीन धारण क्षेत्रापैकी 33 टक्के क्षेत्रावर बारमाही फळपिके, वनवृक्ष राखण्याचे बंधन का असू नये. कार्बन क्रेडिट कार्डचं महत्व वारंवार सांगितलं जाते. त्याचीही यास जोड देता येऊ शकते. आता पावसाळा संपला की अवकाळी पाऊस सुरु होईल, मग त्यानंतर गारपीटीचा हंगाम सुरु होईल पुन्हा मॉन्सूनची वाट पाहणं आलंच. आपल्याला कारणं माहित आहेत. उपाय माहित आहेत. पण घोडं अडलेलं आहे. सोशल मीडियावरची चर्चा, पारावरच्या गप्पा आणि हळहळ यापलिकडे योग्य कृतीच्या पातळीवर विषय जात नाही. जोपर्यंत बदलाची गती कमी होती तोपर्यंत हे सहन होत होतं. पण जसा जंगलांचा ऱ्हास वाढेल तसा मॉन्सूनचा आणि संलग्न आपत्तींचाही फटका वाढत राहील. त्याची किंमत आणखी किती काळ चुकवत रहायची, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
संतोष डुकरे - ९८८११४३१८०
(लेखक ॲग्रोवनचे वरिष्ठ बातमीदार आहेत)

तळकोकणातील भात अवकाळीच्या छायेत

पुण (प्रतिनिधी) - नैऋत्य मोसमी वारे देशातून माघारी गेल्यानंतर कोकणात ठिकठिकाणी सुरु असलेल्या अवकाळी पावसाने ऐन काढणीस आलेले भात पिक नुकसानीच्या छायेत आहे. गेली दोन दिवस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. हवामान खात्याने येत्या बुधवारपर्यंत (ता.४) दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून उर्वरीत महाराष्‍ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्यातील ढगाळ हवामान व कोकण-मध्य महाराष्‍ट्रातील पावसाला कारणीभूत ठरलेले अरबी समुद्रातील चापला चक्रीवादळ भारतीय किनाऱ्यापासून दूर आखाती देशांच्या दिशेने वेगाने सरकले आहे. मंगळवारी सकाळी (ता.३) अति तिव्र स्वरुपातच येमेनच्या किनारपट्टीला जोरदार धडक देण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हे वादळ दूर गेल्याने राज्यातील ढगाळ हवामानातही घट अपेक्षित असून मंगळवारपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. कोकणात मात्र पावसाचे सावट कायम आहे. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्‍ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मराठवाड्यात नांदेड येथे राज्यातील निचांकी १५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पाठोपाठ नाशिक येथे १५.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.

बाजरी, ज्वारी, भात आदी तृणधान्य पिकांच्या काढणीच्या वेळी ढगाळ हवामान असल्यास व पाऊस झाल्यास धान्य भिजून मोठे नुकसान होते. जास्त पाऊस न होता पावसाचा हलक्या पावसाचा शिडकावा झाला तरी साठवणूकीत धान्याला काजळी व किड लागून नुकसान होते. नेमकी अशीच आपत्तीजनक स्थिती दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्‍ट्रात उद्भवलेली आहे. या भागातील ढगाळ हवामान कायम असल्याने पावसाचे सावट व पिकांच्या नुकसानीची शक्यताही कायम आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणी रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात नोंदविण्यात आलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई २१.८, अलिबाग २४.३, रत्नागिरी २४.७, पणजी २५, डहाणू २३.५, पुणे १७.४, जळगाव २०, कोल्हापूर २२.१, महाबळेश्वर १६.४, मालेगाव १९, नाशिक १५.९, सांगली २१.६, सातारा २०.५, सोलापूर २२.६, औरंगाबाद १९, परभणी १८.६, नांदेड १५.५, अकोला २०, अमरावती १८.६, बुलडाणा १८.६, ब्रम्हपुरी २०.३, गोंदिया १८.६, नागपूर २०, वाशिम २१.२, वर्धा १९.४, यवतमाळ १८