Tuesday, February 25, 2014

राज्यभर पावसाचे सावट गडद

पुणे (प्रतिनिधी) ः बाष्पयुक्त ढगांच्या प्रमाणात हवामानात मोठी वाढ झाल्याने कोकण व्यतिरिक्तच्या संपूर्ण महाराष्ट्रावर पावसाचे सावट गडद झाले आहे. हवामान खात्याने रविवारी (ता.23) सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पाऊस झाल्यास काढणीस आलेल्या रब्बी पिकांबरोबरच द्राक्ष व इतर पिकांनाही नुकसानीचा धोका आहे. 

हिंदी महासागर व अरबी समुद्रातील चक्राकार वारे, कमी दाबाचे पट्टे व उत्तरेत राजस्थान व हिमालयाच्या पायथ्याकडील भागातील कमी दाबाची स्थिती यामुळे देशात अनेक राज्यांमध्ये ढगाळ हवामानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे हिमालयीन भाग, मध्य व दक्षिण भारतातील राज्यांवर पावसाचे सावट आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भात पावसाचे सावट अधिक काळ राहण्याचा अंदाज आहे. 

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट झाली. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीहून दोन ते पाच अंशांनी घसरला. याउलट मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीहून दोन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झाली. कोकणात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. दिवसभरात गोंदिया येथे राज्यातील सर्वांत कमी 13.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. 

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 23.2, रत्नागिरी 22.8, पणजी 22.3, डहाणू 20.6, भिरा 21.5, पुणे 18.6, नगर 20.5, जळगाव 14.8, कोल्हापूर 20.4, महाबळेश्‍वर 15.7, मालेगाव 18.3, नाशिक 16.6, सांगली 20.5, सातारा 18, सोलापूर 23.1, उस्मानाबाद 18.9, औरंगाबाद 20.5, परभणी 18.2, नांदेड 14, बीड 20.6, अकोला 20.6, अमरावती 15.2, बुलडाणा 19, ब्रम्हपुरी 16.7, चंद्रपूर 20.8, गोंदिया 13.6, नागपूर 14.1, वाशीम 18, वर्धा 15.8, यवतमाळ 17 
-------------- 

Saturday, February 8, 2014

स्वच्छ, पुरेसे पाणी हा आमचा हक्कच - 3

आवाज महाराष्ट्राचा : अँकर
------------------
योगदान देण्याची राज्यभरातील नागरिकांची तयारी

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. 7 ः नागरिकांना जीवनावश्‍यक गोष्टींच्या पुरवठ्याची हमी हे राज्य शासनाचे आद्य कर्तव्य आहे. जगण्याचे मुख्य साधन म्हणून स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी हा आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळावा. त्यासाठी आम्ही आमचे योगदान द्यायला तयार आहोत, अशा प्रतिक्रिया पिण्याच्या पाणीप्रश्नावर राज्यभरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

काही अपवाद वगळता राज्यातील बहुतेक शहरांतील पाणीकपात आणि खेड्यांमधील महिलांच्या डोक्‍यावरील हंड्यांची संख्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. नागरिकांच्या प्रयत्नातून हिवरे बाजार, कडवंची या गावांसह काही नगरपालिकांनी पिण्याच्या पाण्याबाबत काम केले आहे. मात्र त्याचा वेग अतिशय संथ आहे. केंद्र सरकारच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील एक लाख 700 गावे-वाड्यांपैकी फक्त 700 गावांमध्ये नागरिकांना पुरेसे पाणी मिळते. उर्वरित तब्बल एक लाख गावांमध्ये पाण्याच्या बाबतीत ओढाताण सुरू आहे. शेकडो गावांसमोर अस्वच्छ पाण्याचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. लोकप्रतिनिधींनी या पाण्याच्या प्रश्‍नावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आणि त्यासाठी स्वतःचे योगदान देण्याची तयारी नागरिकांमार्फत "सकाळ'कडे व्यक्त करण्यात येत आहे.

पाणी चालले खोल खोल
गेल्या पाच वर्षात राज्यभरातील पेयजलाच्या भूजलस्रोतांची पाणी पातळी खोल चालली आहे. यामुळे राज्यातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत, तर अनेक पाणीपुरवठा योजना शेवटच्या घटका मोजत आहेत. नवीन जलस्रोतांचा शोध सुरू असताना आटलेल्या स्रोतांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. पाणीपुरवठा, वितरण, वापर आणि गुणवत्ता याबाबतही सर्वांगीण प्रयत्नांची गरज व्यक्त होत आहे.

टॅंकर कधी हटणार
पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर व कोल्हापूर विभागांतील अनेक गावांना बाराही महिने पिण्यासाठी टॅंकरची वाट पाहावी लागते. गेल्या कित्येक वर्षांत या गावांचे टॅंकर बंद होऊ शकलेले नाहीत. सध्या नाशिक, नगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, बुलडाणा आदी जिल्ह्यांतील शेकडो गावात टॅंकर सुरू आहेत. टॅंकरच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही मुलभूत उपाययोजनांअभावी या गावांचे घसे कोरडेच आहेत. याच वेळी धरणांच्या पाण्यावरून नाशिक, पुणे, औरंगाबादसह अनेक शहरांमध्ये वाद पेटले आहेत.

निर्णय घेण्याची वेळ
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे माजी सदस्य सचिव राजेंद्र होलानी म्हणाले, की महाराष्ट्राचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने व्हायला हवा. त्यासाठी 100 टक्के पाणी मीटरनेच द्यायला हवे. मोठ्या शहरांतील अशुद्ध पाणी शुद्ध करून जवळच्या गावांना दिले, तर धरणातले तेवढे पाणी कमी वापरले जाईल व पिण्यासाठी जास्त पाणी मिळेल. सध्या राज्यात 80 टक्के पाणी सिंचनाला व 8 ते 10 टक्के पाणी पिण्यासाठी वापरले जाते. शेतीचे पाणी पिकांपेक्षा जमिनीलाच अधिक दिले जाते. धरणातील शेतीच्या पाणीवापरात 10 टक्के बचत केली, तरी 8 टक्के अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल. म्हणजेच पिण्यासाठी सध्याच्या दुप्पट पाणी उपलब्ध होईल. या पर्यायांवर गांभीर्याने विचार करून ते अमलात आणण्याची वेळ आली आहे.
-----------------------
राज्यातील स्थिती
1 लाख 700 गावे-वाड्या
700 गावांमध्ये पुरेसे पाणी
1 लाख गावांत ओढाताणच
..............


Friday, February 7, 2014

अन्नसुरक्षेआधी शेतीसाठी जलसंजीवनी हवी - 2

राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना; राजकीय, शासकीय पाठबळाची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. 6 ः राज्य, देशातील नागरिकांची भूक भागविण्यासाठी अन्नसुरक्षा महत्त्वाची आहेच; मात्र त्याआधी ही सुरक्षा देणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठीची जलसुरक्षा देणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी भावना राज्यभरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

राज्यात गेल्या 60 वर्षांत फक्त 18 ते 25 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. उर्वरित सर्व म्हणजेच सुमारे दीड कोटी हेक्‍टरहून अधिक क्षेत्र जिरायती आहे. नेमक्‍या याच क्षेत्रावर धान्य पिके घेण्यात येत असून हे सर्व क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यात गेल्या दहा वर्षांत पावसाच्या प्रमाणात मोठे विपरीत बदल झाल्याने जिरायती भागातील शेतकरी संकटात सापडले आहेत. गेली तीन वर्षे दुष्काळाचा सर्वाधिक फटकाही याच शेतकऱ्यांना बसला आहे. या स्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेतीला पाण्याची संजीवनी देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

नाशिक, धुळे, जळगाव, नगर, औरंगाबाद, बीड, जालना, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, बुलडाणा या जिल्ह्यांतील शेतकरी पाणी टंचाईने; तर विदर्भात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. सुमारे आठ हजारांहून अधिक गावांमध्ये हा प्रश्‍न अधिक गंभीर आहे. रब्बी व उन्हाळी हंगाम तर दूर अनेकदा खरिपाची पिकेही ऐन भरात असताना पाण्याअभावी हातची जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून संरक्षित पाण्याची सोय होत असली, तरी ती अत्यंत विखुरलेल्या स्वरूपात आहे. बऱ्यापैकी पाऊस होऊनही यंदा खरीप व रब्बी हंगामालाही अनेक जिल्ह्यांत पाण्याअभावी मोठा फटका बसला आहे.

शेतीसाठीच्या पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शासकीय योजनांना गेल्या काही वर्षांपासून घरघर लागलेली आहे. पाणलोट समित्यांत सुरू असलेल्या राजकारणामुळे अनेक पाणलोटांमध्ये पाण्याऐवजी धुळीचे लोट उठत आहेत. दर वर्षी एक लाख शेततळी उभारण्याची राज्य शासनाची घोषणाही अधांतरीच राहिली आहे. सूक्ष्म सिंचन योजना, रोहयोमधील शेततळी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील शेततळी योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातील शेततळी आदी उपयुक्त योजनांची स्थिती बिकट आहे. यातील अनेक योजना फक्त कागदोपत्री चालू अवस्थेत आहेत. कॅनॉल व तलावांच्या बाबतीत "टेल'च्या शेतकऱ्यांचे पाणी वाट्याला येत नसल्याचे वर्षानुवर्षाचे दुखणे कायम आहे. राजकीय नेतृत्वाने या प्रश्‍नात लक्ष घालण्याची गरज शेतकरी व्यक्त करत आहेत.

कोरडवाहू शेती अभियानाचे मार्गदर्शक, माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख म्हणाले, ""मोठी धरणे फक्त शहरांच्या कामाची राहिली आहेत. शेतीला त्याचा फारसा फायदा नाही. मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरणाला चालना दिली पाहिजे. पावसाचे पाणी शेतातच मुरले पाहिजे. पाणी वापराची कार्यक्षमता अतिशय कमी आहे. वितरण व्यवस्था चुकीची असल्याने उपलब्धतेच्या फक्त 23 टक्के पाणी योग्य प्रकारे वापरले जाते. पाणीवाटपही न्याय्य पद्धतीने होत नाही. आज नदीकाठची गावेच पाण्याचा लाभ घेत आहेत. पाण्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. शेतकऱ्यांना गरजेएवढे पाणी मोफत पण मोजून दिले पाहिजे. एकूण क्षेत्रापैकी अवघे एक टक्का क्षेत्र असलेल्या उसाला शेतीच्या एकूण पाण्याच्या 70 टक्के पाणी खर्च होते. आपण साखर नाही तर पाणी निर्यात करतोय. इतर पिकांचे पाचपट क्षेत्र त्यात भिजू शकते. मोठ्या शहरांत पाण्याचा अति अपव्यय होतोय. या पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीला दिले पाहिजे. प्रत्येक खेड्यात- गावात मोठ्या प्रमाणात पाण्याचे साठे तयार होऊन शेततळी व ठिबकच्या माध्यमातून ते पिकांना दिले पाहिजे, याकडे शासन, राज्यकर्ते व स्थानिक नेतृत्वाने लक्ष देणे गरजेचे आहे.''

- कोट
""शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देणे हे शासनाचे काम आहे. नेमके याच मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे. सलगच्या दुष्काळांना स्वबळावर तोंड देऊन आम्ही जेरीस आलोय. केंद्राच्या चांगल्या योजनांना मध्येच गळती लागते. स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करतात, हे चिंताजनक आहे. खासदारांनी रस्ते आणि समाज मंदिरांपेक्षा पाण्यावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवे.''
- रघुनाथ शिंदे, ज्येष्ठ शेतकरी, खैरेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे
----------------
पान 1अँकरमध्ये चौकट
--------------------------
साम वाहिनीवर आज "आवाज महाराष्ट्राचा'मध्ये
पाणी शेतीचे

असमान-अपुरा पाऊस, जलसाठे व वितरण व्यवस्थेची दयनीय अवस्था, वापर व पुनर्वापराबाबतची नियोजनशून्यता आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा अभाव या गर्तेत राज्यातील शेतीचा पाणीप्रश्‍न सापडला आहे. या प्रश्‍नाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, नैसर्गिक अशा अनेक बाजू आहेत. विविध पातळ्यांवर प्रयत्न होऊनही गेली 60 वर्षे हा प्रश्‍न भेडसावतोच आहे.
या प्रश्‍नावर साम वाहिनीवरील आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमात शुक्रवारी (ता.7) सायंकाळी 7.30 ते रात्री 9 या वेळेत चर्चा होणार आहे. त्यात ठाण्यातील साधना महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि औरंगाबाद येथील तनिष्का व्यासपीठाच्या सदस्य सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समीरण वाळवेकर करतील.
----------


पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी हवी राजकीय इच्छाशक्ती - 1

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. 5 ः पाणी व्यवस्थापनाबाबतची सुंदोपसुंदी, पाण्याचा संचय व संवर्धनापेक्षा वाटपावरून सुरू असलेले प्रादेशिक वाद, तंटे व त्याभोवती फिरणारे राजकारण आणि इच्छाशक्तीचा अभाव यामुळे महाराष्ट्राचा पाणीप्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे. पाण्याविषयीच्या योजनांसाठी राज्याची सारी भिस्त केंद्रावर आहे. मात्र, केंद्राची बदलती धोरणे आणि खासदारांचे या प्रश्‍नी होत असलेले दुर्लक्षही यात अधिक भर घालत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय पातळीवरून राज्याच्या पाणीप्रश्‍नी ठोस उपायांसाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्र सरकारमार्फत पाणलोट विकास, बंधारे ते पेयजलापर्यंतच्या अनेक योजनांसाठी निधी पुरवला जातो. या निधीचा वापर व परिणामाबाबत राज्यातील स्थिती फारशी समाधानकारक नाही. राज्य शासनाने आपल्या हिश्‍श्‍याची अर्थसंकल्पीय तरतूद केली असतानाही केंद्राने यंदा नदी खोरे विकास कार्यक्रम, राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम या प्रमुख योजना बंद केल्या आहेत. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम गेली दोन वर्षे सुरू असला तरी त्याची महाराष्ट्रातील प्रगती अत्यंत असमाधानकारक आहे. पाणी संकलन, पुनर्भरण व साठवणुकीबाबत यापेक्षा फारशी वेगळी स्थिती नाही.

भूजल पातळी दिवसेंदिवस खोल चालली आहे. नक्‍की कुठे किती पाणी आहे, माहीत नाही. त्यापाठोपाठ राज्यभर बोअरवेलची संख्या दर वर्षी लाखोने वाढत आहे. त्यात अपूर्ण सिंचन प्रकल्प व त्यांचा खर्चही दिवसेंदिवस वाढत आहे. जलसाठे मृत होण्याचे प्रमाणही वाढले आहे. नदीजोड प्रकल्पांचा विषयही राजकीय भोवऱ्यात अडकला आहे.

किमान स्थानिक पातळीवरील जलस्रोत जोडणीच्या बाबतीतही काही प्रगती झालेली नाही. पाण्याबाबत उद्योगांच्या पातळीवरही उदासीनताच अधिक आहे. गाव, तालुका पातळीवर पावसाच्या असमान वितरणात वर्षागणिक भर पडत आहे. विशेष म्हणजे एवढी उलथापालथ सुरू असताना काही अपवाद वगळता या सर्व बाबतीत राजकीय नेतृत्वाला जाग आलेली नाही.

ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. दि. मा. मोरे म्हणाले, केंद्राकडून पाणलोट व इतर कामांसाठी निधी मिळतो. मात्र, हा निधी व्यवस्थितपणे खर्च होत नाही; मग त्यासाठी अधिकचा पैसा कशाला पाहिजे. महाराष्ट्राचे काम अत्यंत धीम्या गतीने आहे. राज्याकडे फारसा पैसा नाही. सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांना विकासकामांसाठी मिळणारा सर्व निधी पाण्यासाठी खर्च करणे अत्यावश्‍यक आहे. कृषिमंत्री शरद पवार यांनी या पद्धतीने आपला सर्व निधी या कामांसाठी दिला. आमदारांचे प्रत्येकी दोन कोटी व खासदारांचे प्रत्येकी पाच कोटी रुपये यातून उपलब्ध झाले तरी त्यास गती मिळेल. या निवडणुकीत नागरिकांनी उमेदवारांसमोर हा प्रश्‍न उपस्थित केला पाहिजे. राज्याने पैसा पाण्यासाठी कसा वळवायचा याचा विचार करावा.

जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणाले, पाण्याचे समन्यायी वाटप हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा व्हायला हवा; पण तो बाजूला पडतोय. दिल्लीत "आप'ने पाण्याचे दर कमी केले तर सगळीकडे तेच सुरू झाले. ही धोरणे चुकीची आहेत. याचे दूरगामी विपरीत परिणाम होतील. पुढचे पाठ मागचे सपाट असे होण्याची भीती आहे. निवडणुकीच्या वेळी अनेक राजकारणी भान विसरतात. याबाबत राजकीय पुढाऱ्यांचे शिक्षण होणे अत्यावश्‍यक आहे. क्षणिक लाभाच्या घोषणांना नागरिकांनी भुलून जाता कामा नये. सध्याची पाणीपट्टी वसुली प्रक्रिया फार क्‍लिष्ट असून, फक्त 10 टक्के पाणीपट्टी वसूल होते. वसुली चांगली असेल तरच प्रश्‍न सुटतील. पैसे घ्या; पण योग्य ते द्या, अशी भूमिका हवी. पाणीप्रश्‍नी फुकटपणा महाराष्ट्राला परवडणारा नाही. त्याचे दूरगामी दुष्परिणाम महाराष्ट्राच्या पाणीप्रश्‍नावर होतील.

*कोट
""राज्यात अपूर्ण प्रकल्पांची संख्या फार मोठी आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 75 हजार कोटी रुपये लागणार आहेत. यासाठी योजना, निधीची तरतूद काय आहे, याबाबत काहीही स्पष्टता नाही. हे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत, तर महाराष्ट्रातील दुष्काळ हटणे अवघड आहे.''
- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

""केंद्राने राज्यातील सर्व ऊस व फळबागांना आधुनिक सिंचन व्यवस्था करण्यासाठी निधी द्यावा. हेक्‍टरी एक लाख रुपये याप्रमाणे किमान 16 लाख हेक्‍टरसाठी 75 टक्के केंद्र, 15 टक्के राज्य व 10 टक्के शेतकरी हिस्सा या प्रमाणात मदत व्हायला हवी.''
- डॉ. दि. मा. मोरे, ज्येष्ठ जलतज्ज्ञ

------चौकट-------------
"साम' वाहिनीवर आज "आवाज महाराष्ट्राचा'मध्ये
पाण्याचे राजकारण

जलसंचय, संवर्धन व व्यवस्थापनाबाबत होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष आणि त्याबाबतची राजकीय उदासीनता या प्रश्‍नाची दाहकता दिवसेंदिवस वाढवत असल्याचे "सकाळ माध्यम समूहा'ने राज्यभरातील तज्ज्ञांच्या मदतीने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले. सलग तीन वर्षे पडलेल्या दुष्काळांच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पाणीप्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आहे. या प्रश्‍नावर "साम' वाहिनीवरील "आवाज महाराष्ट्राचा' कार्यक्रमात गुरुवारी (ता. 6) सायंकाळी 7.30 ते रात्री 9 या वेळेत चर्चा होणार आहे. त्यात मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि नाशिक येथील "तनिष्का व्यासपीठा'च्या सदस्य सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समीरण वाळवेकर करतील.
- - - - - -


Wednesday, February 5, 2014

राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर

354 उमेदवारांची निवड; कुणाल पाटील राज्यात प्रथम

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2013 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे. गट "अ'च्या 138 व गट "ब'च्या 216 अशा एकूण 354 राजपत्रित अधिकाऱ्यांची रिक्त पदे यातून भरण्यात येणार आहेत. धुळे जिल्ह्यातील देवपूरचे कुणाल मनोहर पाटील या परीक्षेत राज्यात प्रथम आले असून, त्यांची सहायक विक्रीकर आयुक्त (गट अ) पदी निवड झाली आहे.

मागासवर्गीय वर्गवारीतून वालचंदनगर (पुणे) येथील कृषी अभियांत्रिकी पदवीधर श्रीनिवास महादेवराव अर्जुन, तर महिला वर्गवारीत अमागास (ओपन) गटातून पाथरी (परभणी) येथील क्रांती काशिनाथ डोंबे प्रथम आल्या आहेत. दोघांचीही उपनिबंधक सहकारी संस्था (गट अ) पदी निवड करण्यात आली आहे.

अमरावती महसूल विभागातून 19, औरंगाबाद विभागातून 66, कोकणातून 29, नागपूरमधून 12, नाशिकमधून 28, तर पुणे महसूल विभागातून सर्वाधिक 200 उमेदवारांची निवड झाली आहे. यापैकी 86 उमेदवार पदव्युत्तर पदवीधारक आहेत. सर्वाधिक 75 उमेदवार वैद्यकीय शाखेचे पदवीधर असून, 63 उमेदवार अभियांत्रिकी पदवीधर आहेत. निवड झालेल्या उमेदवारांत 106 महिला व सात अपंग उमेदवारांचा समावेश आहे.

या भरतीप्रक्रियेसाठी मुंबईसह राज्यातील 33 जिल्हा केंद्रांवर 18 मे 2013 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. राज्यभरातील दोन लाख 85 हजार 643 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातून चार हजार 342 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले. या उमेदवारांची मुख्य परीक्षा 26 ते 28 ऑक्‍टोबर 2013 दरम्यान झाली. यातील एक हजार 97 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. गेल्या 6 ते 23 जानेवारीदरम्यान या उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर आता अंतिम निवड यादी जाहीर झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवार निवडीची सविस्तर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Tuesday, February 4, 2014

कृषी विद्यापीठांत "सेंद्रिय शेती विभाग' येणार अस्तित्वात

आयुक्तालय स्तरावरून कार्यवाही सुरू; महिनाअखेर मंजूर होणार प्रकल्प आराखडा

पुणे (प्रतिनिधी) ः हिमाचल प्रदेश, धारवाड, शेर ए काश्‍मीर कृषी विद्यापीठांच्या धर्तीवर राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये सेंद्रिय शेतीचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याची कार्यवाही कृषी आयुक्तालयामार्फत नुकतीच सुरू करण्यात आली. चारही विद्यापीठांमार्फत यासाठी आयुक्तालयाकडे प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र, या प्रस्तावांची फेरतपासणी करून प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी चारही विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांची समिती गठित करून दोन कोटी रुपयांच्या मर्यादेत संशोधन आराखडा तयार करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत.

कृषी विद्यापीठांच्या स्वतंत्र सेंद्रिय शेती विभागासाठी सुरवातीला करार पद्धतीवर अधिकारी, कर्मचारी घ्यावेत व त्यानंतर टप्प्याटप्प्याने विद्यापीठांनी त्यांची व्यवस्था करावी, अशी सूचना कृषी आयुक्तांनी केली आहे. सेंद्रिय शेती धोरण समन्वय व संनियंत्रण समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित संशोधनावर भर द्यावा, यासाठी फलोत्पादन संचालकांमार्फत विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची विशेष बैठक आयोजिण्यात यावी, सेंद्रिय शेती संशोधनासाठी विद्यापीठांनी प्रथम स्वतःकडील साधनसामग्री वापरण्यास पुढाकार घ्यावा, इतर विद्यापीठांच्या सेंद्रिय शेती विभागांचा अभ्यास करून त्यातील बाबींचा समावेश या विभागात करावा, सेंद्रिय शेती धोरणात तरतूद आहे म्हणून विद्यापीठांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या उपकरणांची, साहित्याची पुन्हा खरेदी करू नये, शेतकऱ्यांच्या गरजांचा, मागण्यांचा मागोवा घेऊन दोन कोटी रुपयांच्या मर्यादेत संशोधन आराखडा तयार करून समितीच्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणाऱ्या बैठकीत सादर करावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

-अझाडीरेक्‍टीनची उपयुक्तता तपासा
कृषी विद्यापीठांनी निंबोळी पावडरमधील अझाडीरेक्‍टीनची उपयुक्तता तपासून त्याच्या वापराविषयी शिफारस करावी. यासाठी लिंबाच्या झाडांखाली प्लॅस्टिक कागद किंवा ताडपत्री अंथरूण 25 मे ते 7 जून या कालावधीत निंबोळ्या गोळा कराव्यात. निम केक, तेलाच्या वापराविषयी पुणे कृषी महाविद्यालयामार्फत; तर निंबोळी अर्काच्या फवारणीविषयी क्षेत्रीय पातळीवरून विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता करावी, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

- सेंद्रिय शेतमालासाठी स्वतंत्र विक्री केंद्रे
राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी स्वतंत्र केंद्रे सुरू करावीत व यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात यावी, अशा सूचना कृषी विभागाच्या सेंद्रिय शेती विभागाला देण्यात आल्या आहेत. सेंद्रिय शेतमाल विक्रीस चालना देण्यासाठी मेळाव्यांच्या माध्यमातून ग्राहकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही शासकीय यंत्रणेला करण्यास आल्या आहेत.

- शेतावर उभारणार 8 प्रशिक्षण केंद्रे
यशस्वी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावरच सेंद्रिय शेती बहुविध प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद व लातूर या आठ विभागांमध्ये प्रत्येकी एक केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागवून घेऊन पुढील बैठकीत ते सादर करण्याच्या सूचना सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना देण्यात आल्या आहेत. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी विभागीय सहसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा.

- प्रमाणीकरणावर होणार स्वतंत्र बैठक
सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची विश्‍वासार्हता राखण्यासाठी व प्रमाणीकरणास गती देण्यासाठी याबाबतच्या सर्व शासकीय व खासगी संस्थांची विशेष बैठक फेब्रुवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पुण्यात आयोजिण्यात येणार आहे. सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाची सहभागी हमी योजना (पीजीएस) व गटांच्या माध्यमातून प्रमाणीकरणाच्या अंमलबजावणीबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.
----------------------------

किमान तापमान सरासरीवर

पुणे (प्रतिनिधी) ः विदर्भाचा अपवाद वगळता राज्यात सर्वत्र किमान तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास आहे. विदर्भात किमान तापमान सरासरीहून दोन ते चार अंशांनी घसरलेले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी सकाळपर्यंत (ता. 6) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा व कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल न होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मंगळवारी (ता. 4) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तामपानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर कोकणाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीहून किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. जळगाव येथे राज्यातील नीचांकी 10.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

ंमंगळवारी (ता. 4) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील किमान तापमान व कंसात सरासरीहून झालेली वाढ किंवा घट अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 19.1 (2), अलिबाग 19.8 (2), रत्नागिरी 19.5, हर्णे 23 (2), पणजी 20.5 (0), डहाणू 19.5 (2), भिरा 18.5 (4), पुणे 12.4 (1), नगर 11.7 (-1), जळगाव 10.7 (-2), कोल्हापूर 18.5 (3), महाबळेश्‍वर 15.2 (1), मालेगाव 14.2 (3), नाशिक 11.6 (1), सांगली 16.4 (1), सातारा 14 (1), सोलापूर 16.7, उस्मानाबाद 14.3, औरंगाबाद 14 (1), परभणी 12.9 (-3), नांदेड 11 (-3), अकोला 13.8 (-1), अमरावती 15.6, बुलडाणा 15.4 (-1), ब्रम्हपुरी 15 (0), चंद्रपूर 15 (-1), गोंदिया 11.4, नागपूर 13.3 (-1), वाशिम 17.6, वर्धा 14.4 (-1), यवतमाळ 12.6 (-4).
- - - -

कृषी अधीक्षक, सेवक, लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर

969 उमेदवारांची निवड; माजी सैनिकांअभावी 101 पदे रिक्त

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी विभागामार्फत नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या कृषी सेवक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक यासाठीच्या 1070 रिक्त पदांच्या भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यापैकी 969 पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली असून, उमेदवारांअभावी माजी सैनिकांची 101 पदे रिक्त राहिली आहेत. कृषी विभागाच्या संकेतस्थळावर वरील पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची विभाग व प्रवर्गनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी 5 जून 2013 रोजी जाहिरात प्रसिद्ध होऊन 23 नोव्हेंबर 2013 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.

- हे आहेत "टॉपर'
कृषी सेवक ः भूषण दिलीप वाघ, औरंगाबाद व मुकेश भाईदास सोनवणे, नाशिक (प्रत्येकी 186 गुण)
सहायक अधीक्षक ः वर्षा रमेश चौधरी, नाशिक (186 गुण)
वरिष्ठ लिपिक ः प्रवीण राजधर चौधरी, मंदार नारायण म्हाडेश्‍वर, ठाणे (186 गुण)
कनिष्ठ लिपिक ः मनोज दगडू पाटील, नागपूर (191 गुण)

आठ दहा दिवसांत "ऑर्डर'
निवड झालेल्या उमेदवारांनी पदासाठी अर्ज करताना सादर केलेली माहिती व त्याबाबतची मूळ कागदपत्रे तपासून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे पत्र (ऑर्डर) देण्यात येणार आहे. संबंधित विभागीय कार्यालयामार्फत येत्या आठ दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. हे पत्र हाती पडल्यानंतर तत्काळ किंवा जास्तीत जास्त एक महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होता येईल.

...तर निवड रद्द
कृषी विभागाने जाहीर केलेली निवड यादी उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीच्या आधीन राहून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार पुढील आठ दिवसात संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून नियुक्तीपूर्वी आवश्‍यक मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. या पडताळणीत उमेदवार पात्र असल्यास नियुक्ती देण्यात येईल. पडताळणीत चुकीची अथवा खोटी माहिती आढळून आल्यास संबंधित उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.

101 पद भरती "वेटिंग लिस्ट'मधून
या भरती प्रक्रियेत माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त राहिलेली कृषी सेवकांची 93 व कनिष्ठ लिपिकांची आठ पदे याच परीक्षेतील उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीतून भरण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. यासाठी जिल्हा सैनिक बोर्डाची परवानगी घेण्यात येणार आहे. बोर्डाच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर संबंधित प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतून गुणानुक्रमे रिक्त पदे भरण्याचे प्रस्तावित आहे.
------------
सर्वाधिक रिक्त पदे विदर्भात
माजी सैनिक उमेदवारांअभावी सर्वाधिक 66 पदे विदर्भात रिक्त राहिली आहेत. कृषी सहायकांची नागपूर विभागात 40 अमरावती विभागात 20, नाशिकमध्ये 12, ठाण्यात 10, पुणे विभागात 6, तर औरंगाबादमध्ये 5 पदे रिक्त आहेत. कनिष्ठ लिपिक संवर्गातील नागपूरमध्ये सहा तर कोल्हापूर व ठाण्यात प्रत्येकी एक पद रिक्त राहिले आहे.
------------
विभागनिहाय निवड पुढीलप्रमाणे
कृषी सेवक (एकूण 763) ः नागपूर 247, अमरावती 150, नाशिक 115, औरंगाबाद 75, पुणे 89, ठाणे 87
लिपिक (एकूण 149) ः नागपूर 62, ठाणे 36, नाशिक 17, कोल्हापूर 15, आयुक्तालय 15, पुणे 4
वरिष्ठ लिपिक (एकूण 39) ः नाशिक 14, नागपूर 8, पुणे 5, ठाणे 5, कोल्हापूर 4, लातूर 3
सहायक अधीक्षक (एकूण 12) ः नाशिक 3, ठाणे 3, कोल्हापूर 2, नागपूर 2, लातूर 1, पुणे 1
------------(समाप्त)--------------

कृषी परिषदेचे उपाध्यक्षपद तीन महिन्यांपासून रिक्त

सात महिन्यांपासून बैठकच नाही; कामकाजावर विपरीत परिणाम

पुणे (प्रतिनिधी) ः मंत्रिपदाचा दर्जा असलेले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (कृषी परिषद) उपाध्यक्षपद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे. माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी नोव्हेंबरमध्ये राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून अद्याप नवीन नाव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आलेले नाही. उपाध्यक्षांअभावी कृषी परिषदेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

राज्याचे कृषिमंत्री हे कृषी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मात्र कृषिमंत्र्यांना व्यस्त कामकाजातून पुरेसा वेळ देणे शक्‍य होत नसल्याने चारही कृषी विद्यापीठांमध्ये समन्वय साधून कामकाजास गती देण्याची महत्त्वाची जबाबदारी उपाध्यक्षांवर सोपविण्यात आली आहे. यासाठी उपाध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा, वाहन, वाहनचालक, लेखनिक, शिपाई आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र सध्या उपाध्यक्षांची खुर्ची रिकामी असल्याने अनेक महत्त्वाच्या बाबींना खीळ बसल्यासारखी स्थिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी परिषदेची यापूर्वीची बैठक मे 2013 मध्ये शिर्डी (नगर) येथे झाली. यानंतर अद्याप परिषदेची बैठक होऊ शकलेली नाही. विद्यापीठांच्या संचालकांच्या एकत्रित शिक्षण, विस्तार व संशोधन विषयक आढावा बैठका, कुलसचिव, अभियंते, वित्त अधिकारी यांच्या समन्वय बैठका सध्या बंद आहेत. शासनाकडे प्रलंबित असलेली कामे पूर्ण करणे, विद्यापीठांना निधी मिळवून देण्याचा व मिळालेला निधी वेळेत खर्च करण्याचा पाठपुरावा करण्याची कामे सध्या बंद आहेत. विद्यापीठांची प्राध्यापक, शास्त्रज्ञ आदी रिक्त पदभरती प्रक्रियाही थंडावली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने राज्यात येत्या महिनाभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. यामुळे या पदावरील नियुक्ती साठी पुढील दोन-तीन आठवड्यांचा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या पदावर नियुक्ती करता येणार नाही. या पार्श्‍वभूमीवर उपाध्यक्ष निवडीस विलंब झाल्यास त्याचा विपरीत परिणाम कृषी परिषदेच्या कामकाजावर होण्याचा धोका आहे.

चौकट
- कोणीही होऊ शकतो उपाध्यक्ष !
माजी उपाध्यक्ष विजय कोलते म्हणाले, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडे आहे. पक्षनेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना नावाची शिफारस केली जाईल व त्यानंतर मुख्यमंत्री उपाध्यक्ष नेमणुकीचा आदेश जारी करतील. उपाध्यक्षपदाच्या पात्रतेसाठी वेगळे निकष नाहीत. सर्वसाधारणपणे शेती व संलग्न क्षेत्रातील व्यक्तीची या पदी निवड केली जाते. राज्यातील प्रगत शेतकरी किंवा इतर कोणीही व्यक्ती उपाध्यक्ष होऊ शकते.

चौकट
- सुरेश वरपुडकर, सोपान कांचन चर्चेत
उपाध्यक्षपदासाठी सध्या माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष सोपान कांचन, माजी पाटबंधारे मंत्री अजित घोरपडे व सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शशिकांत पिसाळ यांची नावे चर्चेत आहेत. यातही वरपुडकर किंवा कांचन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-------------

Sunday, February 2, 2014

डॉ. सुभाष पुरी - शेतीमाल प्रक्रियेतील गुंतवणुकीवर शासनाला भर द्यावा लागेल

जळगावचे भरताचे वांगे कानपूरला पाठवले तर कुणी घेणार नाही, पण पश्‍चिम बंगालला पाठविले तर चांगले पैसे मिळतील, ही बाजार साक्षरता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. शेतीमाल प्रक्रियेतील गुंतवणूक अत्यल्प आहे यावर शासनाने भविष्यात अधिक भर द्यावा लागेल, असे मत डॉ. सुभाष पुरी व्यक्त करतात. इंफाळ येथील ईशान्येकडील सात राज्यांसाठीच्या एकमेव केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून गेली नऊ वर्षे त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याबद्दल "आयसीएआर'मार्फत त्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर देशातील कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार याबाबत त्यांची ही विशेष मुलाखत...

- देशातील कृषी शिक्षणाची सद्यःस्थिती काय आहे?
देशात 712 बिगर कृषी विद्यापीठे आहेत. त्यातून लाखो पदवीधर दर वर्षी तयार होतात. तुलनेत देशातील सर्व कृषी विद्यापीठांमधून फक्त 30 हजार कृषी व संलग्न विषयांचे पदवीधर तयार होतात. बिगरकृषीच्या तुलनेत कृषीचे प्रमाण अवघे 0.5 ते एक टक्का आहे. यातील प्रत्यक्ष शेतावर जाणारे फारच अत्यल्प आहेत. देशाची 120 कोटी लोकसंख्या, त्यातील 60 ते 70 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र त्या तुलनेत कृषी शिक्षणाचे प्रमाण व्यस्त आहे. मुळात कृषी शिक्षण हे नोकरीसाठी नाहीच ते व्यवसाय शिक्षण आहे. पदवीधरांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा अशी अपेक्षा आहे. मात्र आज कृषी शिक्षणाबाबत मोठी दुरवस्था आहे. विद्यार्थ्यांना शेतीची आवड, आकर्षण नाही. यासाठी केंद्र सरकारनेच देशभर प्राथमिक शिक्षणात कृषी अभ्यासक्रम सक्तीचा करण्याची गरज आहे.

- कृषी पदवीधर, शेतकरी आणि शेती यातील संबंधांकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता?
आज बहुसंख्य कृषी पदवीधर प्रत्यक्ष शेतीत जाऊ इच्छित नाहीत. शेतकऱ्यांच्या मुलांनाही शेती नको वाटते. नोकरीसाठी प्रसंगी शेती विकण्याचीही त्यांची तयारी आहे. शेतीत आहेत ते सुद्धा बाहेर पडू इच्छितात. दोन चार एकर शेती असलेले लोक शिपाई व्हायला तयार आहेत, पण शेती नको म्हणतात. हे का... तर शेतीत अंगमेहनत खूप करावी लागते. त्याचा खूप त्रास होतो. मजूर कठीण काम नको म्हणतात. खेड्यातून शहरांकडे ओढा वाढला आहे. खेड्यातील व शहरातील राहणीमान यात जमीन अस्मानाचा फरक आहे. शिक्षण, आरोग्य व इतर सोयी सवलती शहरात आहेत तशाच गावात मिळाल्या तर शेतकरी गावात थांबतील. खेड्यात पैसा असूनही काहीच करता येत नाही, हा मोठा प्रश्‍न आहे. सरकारला यात खूप काम करावे लागेल. सर्व पिके सर्व ठिकाणी घेण्याचा अट्टहासही सोडावा लागेल. पारंपरिक पद्धत बदलावी लागेल. स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी आवश्‍यक पिके सर्वांत आधी आणि त्यानंतर इतर पिकांचा विचार करावा लागेल. निर्यातीसाठी ऑर्किड लावायचे आणि कांदा आयात करायचा अशी पद्धत योग्य नाही.

- संशोधनाच्या पातळीवर सध्या काय त्रुटी आहेत. त्याबाबत कोणती दिशा अपेक्षित आहे?
शेतीतील अंगमेहनत कमी करणारे यांत्रिकीकरण आपल्याकडे फारसे प्रगत नाही, ही मोठी समस्या आहे. शेतीचे 70 टक्के काम महिला करतात. सातत्याने काबाडकष्ट उपसून शेतकरी महिलांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होतात. यासाठी यांत्रिकीकरण महत्त्वाचे आहे. छोट्या छोट्या गोष्टी वापरून मोठे कष्ट वाचवता येते. यांत्रिकीकरण म्हटले, की आपले लोक भव्य दिव्य असे चित्र उभे करतात. शेतीत सर्वप्रथम अल्पभूधारक शेतकरीकेंद्रित अंगमेहनत कमी करणारे यांत्रिकीकरण महत्त्वाचे आहे. हाताळण्यास छोटी यंत्रे अधिकाधिक विकसित व्हायला हवीत. यंत्रांसाठी पेट्रोलियम इंधनाला पर्याय दिले पाहिजेत. एकूणच कृषी अभियांत्रिकीत आमूलाग्र बदल करावा लागेल. प्रत्येक शेतकरी वापरू शकेल व त्याचे जगणे सोपे होईल, असे तंत्रज्ञान आवश्‍यक आहे. कमी पाणी व इतर ताण सहन करून चांगले उत्पादन देतील अशा वाणांची प्रकर्षाने आवश्‍यकता आहे.

- भविष्याच्या दृष्टीने शेती क्षेत्रात कोणती बाब महत्त्वाची ठरेल?
पुढच्या काळात पाणी हाच सर्वांत महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. पावसाच्या पाण्याचे जतन आणि जमा झालेल्या पाण्याचा नियंत्रित वापर या दोन गोष्टी शेती आणि शेतकऱ्यांचे यश ठरवतील. त्यामुळे याच गोष्टीवर सर्वाधिक लक्ष देण्याची आणि संशोधन करण्याची गरज आहे. प्रत्येक शेतकरी स्वतःच्या शेतावरच पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाला पाहिजे. महाराष्ट्रात पडणारा पाऊस कमी नाही. योग्य नियोजन व काटेकोर अंमलबजावणी केली तर जलस्वयंपूर्ण होणे शक्‍य आहे.

- शेतीमाल मार्केटिंग व प्रक्रिया यात काय सुधारणा आवश्‍यक आहेत?
देशभरातील शेतकरी उत्पादन कसे घ्यायचे यात तज्ज्ञ आहेत. या उत्पादनापासून अधिकाधिक पैसा कसा मिळवायचा, त्यासाठी मार्केटिंग कसे करायचे, कोणत्या बाजारात कशा प्रकारे चांगला भाव मिळेल, ही इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे. जळगावचे भरताचे वांगे कानपूरला पाठवले तर कुणी घेणार नाही, पण पश्‍चिम बंगालला पाठविले तर चांगले पैसे मिळतील, ही बाजार साक्षरता शेतकऱ्यांमध्ये झाली पाहिजे. कच्चा माल व प्रक्रिया यात फार मोठे अंतर आहे. शेतकऱ्याच्या शेतावर स्वच्छ धुणे, प्रतवारी यांसारखी प्राथमिक प्रक्रिया केली तरी चांगल्या प्रकारे मूल्यवर्धन होऊ शकते. सध्या काही ठराविक पद्धतीच्या प्रक्रिया सुरू आहेत. प्रक्रिया करताना उप उत्पादनांकडेही कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. शेतकऱ्यांना प्रक्रियेत पैसा मिळाला पाहिजे, तसे झाले तर या तंत्रज्ञानाचा प्रसारही वेगाने होईल.

- कृषी विस्ताराच्या सद्यःस्थितीबाबत आपले मत काय?
कृषी विस्तारामध्ये फार मोठा गॅप आहे. संशोधन संस्था, विद्यापीठांमध्ये होणारे फारच थोडे संशोधन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचतोय.. हे संशोधन शेतात नेण्याची जबाबदारी राज्य सरकारच्या कृषी विभागाची आहे. नेमके हेच लोक ही जबाबदारी झटकत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) स्थापन करण्यात येत आहे. चांगल्या संशोधनाची प्रात्यक्षिके लोकांना दाखवणे, संशोधनाची पडताळणी करून त्याचे प्रमोशन करणे हा "केव्हीकें'चा उद्देश आहे. याउलट आता कृषी विस्ताराचे सर्वच काम "केव्हीके'ने करावे, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. यात मूळ उद्देश बाजूला राहून चुकीचा पायंडा पडतोय. केव्हीके हे फार्म सायन्स सेंटर आहे, ते फार्म एक्‍सटेन्शन सेंटर नाही. "केव्हीकें'ना त्यांचे काम करू द्यावे व शासनाच्या संबंधित विभागांनी आपली मुख्य जबाबदारी पार पाडावी. आज अनेक खासगी कंपन्या स्वतःचे संशोधन, उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी अत्यंत प्रभावी विस्तार यंत्रणा उभारत आहेत. या तुलनेत शासकीय यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे दिसते. आज शेतकऱ्यांपर्यंत विविध मार्गांनी भरमसाट माहिती पोचत असल्याने शेतकरी अनेकदा भांबावून जातोय. ही परिस्थिती बदलली पाहिजे, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम शेतीवर होतील.

- गेल्या काही वर्षांत शेती क्षेत्रात कोणते बदल झाले, भविष्यात कोणते बदल अपेक्षित आहेत?
देशाच्या कृषी क्षेत्राच्या दृष्टीने गेली दहा वर्षे अतिशय महत्त्वाची ठरली आहेत. या दहा वर्षात शेतकऱ्यांना मिळणारा कर्जपुरवठा 80-85 हजार कोटी रुपयांवरून सहा लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला, शेतकऱ्यांच्या अडचणीत सापडले त्या त्या ठिकाणी कर्जमाफीचे धोरण अवलंबिण्यात आले आणि पीककर्जाचा व्याजदर 11 टक्‍क्‍यांवरून चार टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाला. वेळेत भरणा केल्यास शून्य टक्के व्याजदर हे तीन अतिशय मोठे बदल झाले. या काळात उत्पादन खर्च वाढला असला तरी त्या प्रमाणात हमीभावातही भरीव वाढ झाली. त्याचा मोठा फायदा शेती व शेतकऱ्यांना झाला. परिणामी, अन्नधान्य उत्पादनात आपण सलग तीन वर्षे विक्रमी कामगिरी केली आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाचे हे यश आहे. मात्र अद्यापही काही बाबींवर चांगले काम होणे आवश्‍यक आहे. विशेषतः नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीचा योग्य मोबदला मिळत नाही, शासन पैसा मंजूर करते मात्र तो वेळेत उपलब्ध होत नाही. शेतीमाल प्रक्रियेतील गुंतवणूक अत्यल्प आहे यावर भविष्यात अधिक भर द्यावा लागेल.
...............................
कोट ः ""आज कृषी शिक्षणाबाबत मोठी दुरवस्था आहे. विद्यार्थ्यांना शेतीची आवड, आकर्षण नाही. यासाठी केंद्र सरकारनेच देशभर प्राथमिक शिक्षणात कृषी अभ्यासक्रम सक्तीचा करण्याची गरज आहे.''
....................................

अफार्मला सर्वोत्कृष्ट नवोपक्रम पुरस्कार

पुणे ः येथिल ऍक्‍शन फॉर ऍग्रिकल्चर रिन्युअल इन महाराष्ट्र (अफार्म) या संस्थेला विदर्भातील कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उपजिविका सक्षमीकरणासाठी केलेल्या अभिनव कार्याबद्दल राज्य शासनामार्फत केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांच्या हस्ते "ग्रामीण उपजीविका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवोपक्रम पुरस्कार' देवून गौरविण्यात आले. रविद्र नाट्यमंदीर (मुंबई) या ठिकाणी झालेल्या समारंभात नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सतेज पाटील, जागतीक बॅंक प्रतिनिधी परमेश शहा, केंद्रीय ग्रामीण विकास सचिव विजयकुमार, प्रधान सचिव एस. एस. सिंधू आदी यावेळी उपस्थित होते. अफार्मचे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी यांनी हा पुरस्कार स्विकारला. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अफार्ममार्फत गेल्या सहा वर्षापासून अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील 39 गावांतील पाच हजार 900 शेतकरी कुटुंबांना वैफल्यग्रस्त स्थितीतून बाहेर काढण्यासाठी एकात्मिक कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
-----------

किमान तापमानाचा पारा सरसरीवर

पुणे (प्रतिनिधी) ः गुरुवारी (ता.30) सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भात किमान तापमानाचा पारा सरासरीहून घसरलेला तर उर्वरीत महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीच्या आसपास होते. कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीहून एक ते तीन अंश सेल्सिअसने घसरलेले आहे. कोकणात कमाल तापमानाचा पारा सरासरीहून अधिक आहे. हवामान खात्याने शनिवारी (ता.1) सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

गुरुवारी (ता.30) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः अलिबाग 18 (1), भिरा 18 (2), डहाणू 17.9 (1), पणजी 21, हर्णे 23 (1), मुंबई 18, रत्नागिरी 19, नगर 9.9, जळगाव 11 (-2), जेऊर 13, कोल्हापूर 18 (2), महाबळेश्‍वर 13 (-1), मालेगाव 11, नाशिक 9.5 (-2), पुणे 11, सांगली 16 (2), सातारा 13 (0), सोलापूर 17, औरंगाबाद 12, नांदेड 13 (-1), उस्मानाबाद 14, परभणी 11.2 (-4), अकोला 12 (-3), अमरावती 14 (-2), ब्रम्हपुरी 13 (-1), बुलडाणा 13 (-2), चंद्रपूर 13 (-2), नागपूर 11 (-3), वर्धा 11 (-4), यवतमाळ 12 (-5)
--------------

मोफत शेतमाल मार्केटींग, प्रमोशन

पुणे ः शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेला चालना देण्यासाठी येथिल आपुलकी संस्थेमार्फत शेतकऱ्यांचा प्रक्रीया केलेल्या शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी ऑनलाईन मार्केटींग व प्रमोशनची सुविधा मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. उत्पादनांची माहीती, वैशिष्ट्य, छायाचित्र, किंमत, शेतकऱ्यांचे संपर्क क्रमांक व पत्ता संस्थेच्या संकेतस्थळावर (www.apulkee.org) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दलाल यंत्रणा मोडीत काढून फायदा थेट कष्टकरी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी संस्थेने हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अभिजित फाळके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः 8983357559 माहिती पाठविण्यासाठी इ मेल ः fabhijeet1980@gmail.com
---------------------