Friday, March 18, 2016

डॉ. दादाभाऊ यादव - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

हा अर्थसंकल्प ग्रामिण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. यानंतरच्या पुरक अर्थसंकल्पात आणखी २५ ते ३० टक्के रक्कम वाढवली तर योग्य न्याय मिळू शकतो. सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवारसाठीचे अनुदान अपुरे आहे. कृषी प्रक्रियेसाठीच्या २५ टक्के अनुदानामुळे क्लस्टर विकसित होवून रोजगाराचे चांगले साधन मिळेल. पिक विमा योजना निधी, हवामान केंद्र या चांगल्या तरतूदी आहे. नाबार्डच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, गोसंवर्धनशाळा या व इतर शेतीपुरक व्यवसायांना अधिक चालना द्यायला हवी. स्मार्ट गाव योजनेत अति दुर्गम भागातील गावांमध्ये रस्ते, बॅंका व आठवडे बाजार सुविधा निर्मितीवर भर द्यायला हवा. येत्या हंगामाच्या दृष्टीने तेलबिया व कडधान्य उत्पादनाच्या दृष्टीने असलेली तरतूद दुप्पट करायला हवी. कृषीपंप ग्राहकांना विज दरात सवलत आहे, पण त्याबाबतची व्यवस्था सुधारणेची गरज आहे. विजेची कार्यक्षमता ३०-४० टक्के आहे. शेतीच्या पाण्याची कार्यक्षमताही ३० ते ४० टक्केच आहे. ही कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत. शेती व पिण्यासाठीच्या पाण्यासाठी तात्पुरती योजना करण्याऐवजी प्रश्न कायमचा सोडविण्याच्या अनुषंगाने काम होणे अपेक्षित आहे. कृषी गुरुकुलची तरतूद वाढवायला हवी. सेंद्रीय शेती, पुरस्कार, कृषी महोत्सव यासाठी चांगली तरतूद आहे. सलग दुष्काळांमुळे कृषीचा विकासदर कमी आहे. दुष्काळ, गारपीट, बदलते हवामान याला सामोरे जाण्यासाठी संशोधन व विस्तार महत्वाचा आहे. मात्र अर्थसंकल्पात संशोधन व विस्तारासाठी अर्थसंकल्पात तरतूद दिसत नाही. पुरवणी अर्थसंकल्पात ती वाढून मिळायला हवी.
- दादाभाऊ यादव, विभागप्रमुख, कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी 

सुनिल पवार - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

उपयुक्त तरतुदी
या अर्थसंकल्पाप्रमाणे संबंधित बाबींवर प्रत्यक्षात खर्च झाला, तर महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आतापर्यंतचे सर्वोत्तम काम या वर्षात होऊ शकते. कृषीसाठी २५ हजार कोटी ही मोठी तरतूद आहे. पीक विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. फळबागांमध्ये त्याबाबत चांगले काम झाले आहे. आता विम्यासाठीची तरतूद समाधानकारक आहे. प्रक्रिया उद्योगाला यंत्रसामग्रीसाठी कमाल ५० लाख रुपयांचे अनुदान वाइन व बेदाणा उद्योगांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. पण ते फक्त २५ टक्के आहे. ठिबक सिंचनासाठी भरिव तरतूद झाल्याने तीन वर्षांपासून रखडलेली प्रकरणे निकाली निघून फळबागांपलीकडे ऊस व इतर पिकांनाही त्याचा थेट चांगला लाभ होईल. निर्यात व पायाभूत गोष्टींसाठी कमी तरतूद आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघांचे संचालक सुनील पवार यांनी दिली आहे.   

डॉ. शंकरराव मगर - अर्थसंकल्प प्रतिक्रिया

केंद्राचा अर्थसंकल्प व राज्याचा अर्थसंकल्प यात खूपच साम्य आहे. मोठ्या आशा निर्माण करायच्या आणि शेंडीला तूप लावल्यासारखी तरतूद करायची, असा प्रकार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५० हजार कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित होती. एकीकडे शेतकरी प्रचंड संकटात आहे. आत्महत्या वाढत आहेत. आणि एकूण अर्थसंकल्पाचा विचार करता तुटपुंजी रक्कम असूनही शेतकऱ्यांना अर्पण आणि स्वाभिमान वर्षाचे कौतुक सांगतात, ते शेतकऱ्यांना काय कामाचे. उड्डाण पूल, रस्त्यांना प्रचंड तरतूद केली आहे. शेतकऱ्यांवरील संकट पाहता एखादे वर्षे रस्त्यांची कामे थांबवून पूर्ण क्षमतेनिशी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला असता, तर बिघडले असते का?

जलसिंचन प्रकल्प व जलयुक्त शिवारसाठीची तरतूद फारच कमी आहे. साठवण व प्रक्रिया या चांगल्या विषयाला हात घालता असला, तरी याविषयीच्या तरतुदीविषयी व निकषांविषयी संधिग्धता आहे. यात अन्नधान्य व कडधान्यावर जोर देणे आवश्यक आहे. विम्याची तरतूद त्या मानाने चांगली आहे. मेक इन महाराष्ट्र, स्टार्ट अप म्हणतात आणि फक्त २५ टक्के अनुदान हे कमीच आहे. मत्स्य व्यवसायातून सरकार सहा हजार कोटी रुपये कर कमावतेय आणि त्यासाठी फक्त १५० कोटी ठेवलेत. मत्स्य विद्यापीठाचा प्रस्तावही गुंडाळण्यात आलाय. सेंद्रिय शेतीसाठी बजेट ठेवलेले नाही, पण उल्लेख केला हेही चांगले झाले. ग्रामीण विभागाकडे बारिक लक्ष दिलेय ही त्यातल्या त्यात चांगली बाब आहे.
- डॉ. शंकरराव मगर, माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 

कृषी पदव्युत्तर पदवी प्रवेश परिक्षा सुरु

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सुमारे १३५० जागांसाठीची सामायिक प्रवेश परिक्षा नुकतिच सुरु झाली आहे. कृषी, फलोत्पादनसह वेगवेगळ्या १० विद्याशाखांसाठी राज्यातील १४ केंद्रांवर ही परिक्षा होत असून तब्बल १५ हजार ३२७ विद्यार्थी या परिक्षेला बसले आहेत. यातील सर्वाधीक प्रतिसादाची कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश परिक्षा रविवारी (ता.२०) होणार आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळामार्फत येत्या १० एप्रिलला निकाल जाहिर होणार आहे.

पुणे, अकोला, नागपूर, परभणी, दापोली (रत्नागिरी), राहुरी (नगर), कोल्हापूर, धुळे, लातूर, बदनापूर (जालना), यवतमाळ, कराड (सातारा), अंबेजोगाई (बीड) व सोनापूर (गडचिरोली) या ठिकाणच्‍या कृषी व संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश परिक्षा सुरु आहेत. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष परिक्षा घेण्यापर्यंत आणि पुढे निकालापर्यंत प्रत्येक पातळीवर गोपनियता पाळण्यात आली असून निरिक्षकांच्या देखरेखीखाली प्रत्येक टप्प्यातील कार्यवाही होत आहे. प्रवेश अर्ज व पुढे निकालाचीही सर्व यंत्रणा ऑनलाईन आहे. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार, गैरवर्तन कोणत्याही पातळीवर होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली असल्याचे मंडळाचे नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी सांगितले.

- चौकट
विद्याशाखानिहाय परिक्षांना बसणारे विद्यार्थी
कृषी - ९०१८, फलोत्पादन - २५४४, कृषी व्यवसाय व्यवस्थापन - १६७२, कृषी जैवतंत्रज्ञान - ७१५, अन्न तंत्रज्ञान - ३९७, काढणी पश्चित तंत्रज्ञान - ३९६, कृषी अभियांत्रिकी - २९४, वनिकी - २२२, मत्स्यविज्ञान - ५३, गृह विज्ञान - १६

- चौकट
चार महिने अगोदरच परिक्षा
आत्तापर्यंत पदवीचे अंतिम निकाल लागल्यानंतर जुलै मध्ये पदव्युत्तर पदवीची प्रवेश परिक्षा होत होती. यानंतर प्रवेश प्रक्रिया पार पडून अभ्यासक्रम सुरु होण्यास सप्टेंबर उजाडत होता. परिणामी अभ्यासक्रम पूर्ण करण्यास फार थोडा कालावधी हाती राहत होता. ही तृटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळाने यंदा प्रथमच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या धर्तीवर (आयसीएआर) निकाल लागण्यापुर्वीच प्रवेश परिक्षा घेतली आहे. या परिक्षेचा निकालही पदवीच्या निकालाआधीच जाहिर होणार आहे. पदवीचे निकाल लागल्यानंतर मे महिन्यात प्रवेश प्रक्रिया पार पडून जून मध्ये प्रत्यक्ष अभ्यासक्रमांना सुरवात होईल, असा प्रयत्न आहे.

- कोट
‘‘नेहमीपेक्षा चार महिने आधी प्रवेश परिक्षा घेण्यास परभणीतील काही विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. पण ही परिक्षा वेळेत होण्याची गरज आणि महत्व सांगितल्यावर त्यांनाही ते मान्य झाले. पदवीचे आठवे सत्र कार्यानुभवाचे आहे. फक्त प्रॅक्टिकल आहे, थिअरी नाही. त्यामुळे विनाकारण परिक्षा लांबवण्यात अर्थ नव्हता. परिक्षा लवकर घेतल्याने आता पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांचा मोठा फायदा होणार आहे.’’
- डॉ. आर. के. रहाणे, नियंत्रक, महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळ, पुणे
------------------------ 

Thursday, March 17, 2016

हेमंत ढोमे - अॅग्रोवन भेट

पुणे, ता.१७ ः राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक शेतकरी उत्तम शेती करत आहेत. ॲग्रोवनमधून अशा यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध होत असतात. मात्र प्रसिद्धी माध्यमांबरोबरच चित्रपटांमधूनही शेतीतील नायक समाजासमोर यायला हवेत, असे मत चित्रपट अभिनेता, लेखक हेमंत ढोमे यांनी व्यक्त केले. पोस्टर गर्ल या चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर श्री. ढोमे यांनी ॲग्रोवन कार्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

ढोमे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी सकाळ माध्यम समुह, ॲग्रोवन करत असलेले काम खूपच परिणामकारक आहे. हे काम मी जवळून पाहीले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीबाबतचे नैराश्य व स्री भृण हत्या या विषयावर भाष्य करणाऱ्या पोस्टर गर्ल या चित्रपटाची कथा-पटकथा लिहीताना ॲग्रोवन डोळ्यांसमोर होता. बहुतेक चित्रपटांमधून शेतकऱ्यांचे चित्र एक तर नकारात्मक रेखाटले जाते. दारिद्र्य, आत्महत्या, गावाकडचे विनोद एवढ्यापुरतेच ते मर्यादित असते. या पलिकडे जावून शेतीकडे चला असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. यापासून प्रेरणा घेवून शेती व शेतकरी विषयक आणखी विषय व चित्रपट पुढे येतील, अशी आशा आहे.

गावाकडील झगमगाटीला विकास म्हटले जातेय. खेडोपाडीही काळानुरुप बदल हवा. या बदलात शेतकऱ्यांचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावला पाहिजे. गावात शेती अनुषंगीक सर्व सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. हा खरा विकास म्हणता येईल, असेही ढोमे म्हणाले. चित्रपट सृष्टीचा शेती व शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन, व्यवसायिक स्थिती व स्पर्धा, चित्रपट निर्मितीत मोठी वाढ झाली असली तर गुणवत्तेत होत असलेली घसरण, राजकारण ते गटतट आदी विषयांबाबत त्यांने ॲग्रोवनच्या संपादकीय विभागाशी मनसोक्त गप्पा मारल्या. ॲग्रोवनचे सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले यांनी श्री. ढोमे यांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले.
------------------- 

विदर्भात पावसाचा अंदाज कायम



पुणे (प्रतिनिधी) - शुक्रवारी (ता.१८) विदर्भात हलक्या पावसाची शक्यता असून राज्याच्या उर्वरीत भागात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भात ठिकठिकाणी सुरु असलेला हलका पाऊस व ढगाळ हवामानमुळे कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात कमाल व किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे.

कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. दिवसभरात सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे सर्वात कमी १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोदविण्यात आले.

गुरुवारी (ता.१७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात प्रमुख ठिकाणी नोंदविण्यात आलेले कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३२ (२३.७), अलिबाग ३१.५ (२१.६), रत्नागिरी ३०.२ (१९.६), पणजी ३२.५ (२१.७), डहाणू ३०.४ (२१.९), भिरा ३८.२ (१६.५), पुणे ३५.१ (१६.७), नगर (१६.६), जळगाव ३६.५ (१८.२), कोल्हापूर ३३ (१८.३), कोल्हापूर ३३ (१८.३), महाबळेश्वर २९.६ (१६.२), मालेगाव ३८.२ (२०.६), नाशिक ३५.४ (१७.७), सांगली ३४.५ (१८.५), सातारा ३५.१ (१७.५), सोलापूर ३८.४ (२२.१), उस्मानाबाद ३६.२ (१८.८), औरंगाबाद ३६ (१८.८), परभणी ३७.४ (२२.६), नांदेड ३७.५ (२५), अकोला ३७.६ (२४.६), अमरावती ३५.४ (२२.४), बुलडाणा ३५ (२२.२), ब्रम्हपुरी ३४.१ (२३.३), चंद्रपूर ३५.८ (२५.४), गोंदिया ३३.२ (२०.५), नागपूर ३४.४ (२०.५), वाशिम ३३.८, वर्धा ३४.८ (२२.६), यवतमाळ ३४ (२२.८)
------------------ 

Wednesday, March 16, 2016

डाळिंब संघाचे वार्षिक अधिवेशन - 26 ते 28 मार्च



पुणे - अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधक संघाचे वार्षिक अधिवेशन येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान जैन हिल्स (जि.जळगाव) येथे होणार आहे. यानिमित्ताने अधिवेशनस्थळी राष्ट्रीय डाळिंब परिसंवाद आणि प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, कृषीमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, जैन इरिगेशनचे अशोक जैन, राज्य व देशातील प्रमुख कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, केंद्रीय पातळीवरील अधिकारी परिसंवादास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. देशातील डाळिंब पिकसंबंधीचे प्रमुख शास्त्रज्ञ यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांसाठी हा परिसंवाद सशुल्क आहे. राज्यातील अधिकाधिक डाळींब उत्पादकांनी या परिसंवाद व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - मारुती बोराटे ७५८८५९२८९१
------------------

औषधी वनस्पती प्रदर्शन



पुणे - इको फ्रेन्डली फ्लोरा नर्सरीमार्फत जैवविविधता जतन व संवर्धनासाठी देशभरातील ३०० हून अधिक औषधी, आयुर्वेदिक वनस्पती व १०० हून अधिक देशी विदेशी फळ झाडांच्या प्रजातींचे वृक्षप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जुन्या पुणे -मुंबई महामार्गावरील परंदवाडी (सोमाटणे फाटा) येथे येत्या १८ ते ३१ मार्चदरम्यान दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळात हे प्रदर्शन निशुल्क सुरु राहणार आहे. आयुर्वेद, युनानी, होमीयोपॅथी, फार्मासी, कृषी, वनस्पतीशास्त्र या क्षेत्रातील विद्यार्थी, शेतकरी, औषधी कंपन्या, वृक्ष व पर्यावरण प्रेमींसाठी हे वृक्षप्रदर्शन उपयुक्त ठरु शकते. अधिक माहितीसाठी संपर्क - ९२२५१०४३८४
-------------------

पोस्टऑल - थेट शेतमाल विक्री पोर्टल

शेतमालाच्या थेट विक्रीसाठी
मोफत ऑनलाईन पोर्टल

आयटीतील तरुणाचा उपक्रम, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांना शेतमालाची ऑनलाईन पद्धतीने थेट विक्री करणे सोपे व्हावे, यासाठी पुण्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कार्यरत असलेल्या निरंजन माने या तरुणाने मोफत खरेदी विक्री संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. शेतकरी व खरेदीदार या दोघांसाठीही त्यांचे www.postall.in हे संकेतस्थळ उपयुक्त ठरत आहे. माने यांच्याबरोबरच राज्यात ठिकठिकाणी आयटी क्षेत्रातील तरुणांनी शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारची मोफत सेवा पुरविण्यास सुरवात केली अाहे. इंटरनेटवर यासाठी विविध प्रकारची संकेतस्थळे सुरु झाली आहेत.

निरंजन माने हे लातूर जिल्ह्यातील वाकसा (ता.निलंगा) गावचे मुळ रहिवासी आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रात पदवी संपादन केल्यानंतर ते पुण्यात आयटी क्षेत्रात नोकरी करत आहे. योग्य बाजारभावाअभावी शेतकऱ्याचे कष्ट व शेतमालाची बाजारात होणारी अवहेलना पाहिलेल्या माने यांनी त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना शेतमाल विकता यावा यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे. गेल्या सहा महिन्यापासून राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांनी तिचा लाभ घेतला आहे. यात सध्या द्राक्ष व डाळींब उत्पादक शेतकरी आघाडीवर आहेत. शेतीतील व शेतीसाठी लागणारी सर्व प्रकारची उत्पादने खरेदी विक्री करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे.

शेतकऱ्याने त्याच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शेतमालाची माहिती, त्याला अपेक्षित किमतीसह संकेतस्थळावर जाहिरातीच्या स्वरुपात प्रसिद्ध करावी लागते. शहरी ग्राहक, व्यापारी यांनाही या त्यांच्या गरजेनुसार शेतमाल आवश्यकतेची व अपेक्षित दराची जाहिरात प्रसिद्ध करता येते. त्यानुसार खरेदीदार व शेतकरी यांच्यात एकमेकांच्या सहमतीने, सोईने पुढचे व्यवहार होतात. संकेतस्थळाची भुमिका फक्त दोघांची गाठ घालून देण्याची आहे. जुन्या नव्या वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी सध्या देशभर अग्रेसर असलेल्या व जाहिरातीतून प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या एका लोकप्रिय संकेतस्थळापासून प्रेरणा घेवून माने यांनी हे संकेतस्थळ बनवले आहे.

- कोट
‘‘पोस्टऑल हे संकेतस्थळ शेतकरी आणि ग्राहक दोघांच्याही सोईसाठी तयार केले आहे. ही सुविधा मोफत आहे. यात माझा कोणताही व्यवसाईक हेतू नाही. तसं झालं तर मग माझ्यात आणि दलालांत काय फरक राहीला. मला दलाल व्हायचं नाही. माहिती तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ करुन द्यायचा आहे. म्हणून हे संकेतस्थळ तयार केले आहे.’’
- निरंजन माने 

अशोक डोंगरे, संगमनेर - पोल्ट्री यशोगाथा

कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्रीने दाखवला
शाश्वत विकासाचा महामार्ग
----------------
अत्यल्पभुधारणा आणि पाणी टंचाई यामुळे निमज (संगमनेर, नगर) येथिल एका तरुणाने बी कॉम झाल्यावर नोकरीचा मार्ग स्विकारला. अनेक ठिकाणी काम केले. बॅकेत काम करुनही आर्थिक गणित तोट्याचेच राहीले. बॅंक बुडाल्यावर नोकरी गेली आणि मग शेती पुरक व्यवसायात उडी घेतली. उत्पादन, गुणवत्ता आणि अर्थकारणात मजल एवढी मारली की पोल्ट्री व्यवसायातील कंपन्या व शेतकऱ्यांसाठी ते आदर्श ठरले आहेत. पोल्ट्रीतील सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळवलेले श्री. अशोक व सौ. विमल डोंगरे यांची ही यशोगाथा...
----------------
एकत्र कुटुंब होतं. शेतीत फारसा काही अर्थ नव्हता. यामुळं 1989 साली पदवीधर झाल्याबरोबर अशोक डोंगरे यांनी नोकरी करायला सुरवात केली. पीडब्लूडीमध्ये कंत्राटदाराच्या हाताखाली मुकादम म्हणून पुलांची, रस्त्यांची कामं केली. सिन्नर येथिल बिडी उद्योगात प्रॉडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केले. यानंतर 1993 पासून संगमनेरमधील बी.जे.खताळ जनता सहकारी बॅंकेत कर्ज विभागात क्लर्क म्हणून काम करायला सुरवात केली. तिघे भाऊ आणि आई वडील 2003 पर्यंत कुटुंब एकत्र होतं. मधला भाऊ सर्व शेती पहायचा. गहू, बाजरी, भुईमुग, घास अशी पिकं होती. पाच गाई, दोन बैल असायचे.

नोकरीतून फार काही हाती येत नसलं, महिन्याच्या शेवटी शिल्लक शुन्य असली तरी ती सोडून दुसरं काही करण्याचं धाडस नव्हतं. अशातच 2009 मध्ये बॅंक बुडाली. लिक्विडेशनमध्ये निघाली. नोकरी गेली. आता दुसऱ्या धंदा व्यवसायात हात पाय हलवल्याशिवाय पर्याय नव्हता. स्वतःला दुध काढता येत नव्हते, पत्निलाही शेतीकामाची सवय नव्हती. यामुळे दुग्धव्यवसायाचा पर्याय संपल्यात जमा होता. पर्याय म्हणून मग लहान कालवडी विकत घेवून त्या मोठ्या करुन खाली व्हायच्या वेळी विक्री करायची असा व्यवसाय सुरु केला. सुमारे 15 हजाराची कालवड दीड वर्ष सांभाळून 40 हजाराला जायची. पण तोपर्यंत ती जवळपास 15 हजाराचा चारा खायची. मिळायचे फक्त दहा हजार. चार पाच कालवडी सांभाळायचे, घासाची ओझी- उसाच्या मुळ्या डोक्यावर वहायच्या आणि दीड वर्षाचे उत्पन्न फक्त 40 हजार रुपये. बॅंकेत काम केलेल्या मानसासाठी हे अर्थकारण तापदायक होतं. मग करायचं काय...

तालुक्यातच गोडसेवाडी (धांदरफळ खुर्द) येथे मामांची (शांताराम गोडसे) सुमारे 25-30 वर्षे जुनी 22 हजार पक्षी क्षमतेची पोल्ट्री होती. ते यशस्वीपणे व्यवसाय करत होते. नंतर त्यांना जमेना. मग डोंगरे यांच्या मालदाड येथे शिक्षक असलेल्या लहान भावाने (रोहिदास डोंगरे) मामांची पोल्ट्री चालवायला घेतली. नोकरी करुन मोकळ्या वेळात ते पोल्ट्री पहायचे, भरपूर उत्पन्न भेटायचे. ते नोकरी पाहून करतात... मी तर मोकळाच आहे. मग मी का नाही करु शकत... असा विचार करुन पोल्ट्री चालवायला घेण्यापेक्षा स्वतःचीच उभारायचा निर्णय घेतला आणि 2011 साली अशोकरावांनी आपल्या गिताप्रसाद पोल्ट्री फार्मचा श्रीगणेशा केला.

परिसरातील पोल्ट्री शेडला भेट दिली. पहाणी केली आणि त्यानुसार 10 गुंठे जागेवर 210 फुट लांब आणि 30 फुट रुंद असे 6300 चौरस फुटाचे बांधकाम सुरु केलं. साठवणूकीची खोली, शेजारी मोकळी जागा, गाड्या वळण्यासाठी जागा ठेवली. पाण्यासाठी 35,000 लिटरची टाकी उभारली. विहीरीतून त्यात पाणी आणायची सोय केली. तीन महिन्यात पोल्ट्री उभारली. सुमारे साडेनऊ लाख रुपये खर्च आला. इंडियन ओव्हरसिअर बॅंकेकडून पाच लाख रुपये कर्ज काढले आणि बाकीचे पैसे पाव्हण्या रावळ्यांकडून उभे केले. 2011 सालीच्या दसऱ्याला पोल्ट्री सुरु झाली. कुटुंबाची एकूण जमिनधारणा अडीच एकर असली तरी सर्व लक्ष 10 गुंठ्यावरील पोल्ट्रीवर केंद्रीत केले. उर्वरीत जमिनीत 20 गुंठे ऊस आणि बाकी सर्व पडीक आहे. फक्त 10 गुंठ्यावरील पोल्ट्रीने त्यांना यशाचा मार्ग दाखवला. गेली पाच वर्षे ते यशस्वीपणे करार पद्धतीने पोल्ट्री करत आहेत.

- उत्पादन खर्च
पिल्ले, खाद्य, औषधे, डॉक्टर, सुपरव्हिजन, वाहतूक हा सर्व खर्च कंपनी करते. त्याची मर्यादा ठरलेली असते. पिल्लू 18 रुपये, खाद्य 30 रुपये किलो, औषधांचा खर्च प्रत्यक्ष होईल तो, सुपरव्हिजनचे प्रति किलो दोन रुपये धरतात. प्रति किलो 64 रुपये उत्पादन खर्च कंपनीने निश्चित केलेला आहे. त्यापेक्षा कमी खर्चात वजन मिळवले तर त्यासाठी त्या पटीत इनसेन्टिव्ह मिळतो. मर्यादेपेक्षा जास्त उत्पादन खर्च झाल्यास दंड आकारला जातो. प्रति किलो 4 रुपये 70 पैसे हे निश्चित संगोपन शुल्क (रेअरिंग चार्ज) आहे. डोंगरे कमी दिवसात, सुदृढ, निरोगी पक्षी तयार करत असल्याने त्यांचा उत्पादन खर्च कंपनीच्या मर्यादेहून दहा ते पंधरा रुपये कमी येतो आणि त्यामुळे त्यांना अनेकदा निर्धारीत संगोपन शुल्काहून दुप्पट दर मिळतो.

यातिरिक्त पक्षांखाली टाकण्यासाठीचे भाताचे तुस (एका बॅचला 1.250 टन, सुमारे 6 हजार रुपये), वीज (एका बॅचला सुमारे तीन हजार रुपये), पाणी (35 हजार लिटरची टाकी आहे, ती 15 दिवस पुरते. दररोज 2000 लिटर पाणी लागते), कागदाची रद्दी, चुना, कोळसा, साखर आदींसाठी सुमारे 5000 रुपये खर्च येतो. बाहेरचे मजूर घेत नाहीत. पतीपत्नी आणि मुलं सकाळी दीड तास आणि संध्याकाळी दीड तास असे दिवसभरात फक्त तीन तास काम करतात. सर्व बाबींचा खर्च विचारात घेतला तरी तो सुमारे 18 ते 20 हजार रुपये येतो.

- नफ्याचे... गणित फायद्याचे

डोंगरे यांनी पहिल्याच वर्षी भरघोस उत्पादनासह सात बॅच यशस्वीपणे काढल्या. कंपनीचा तीन ग्रॅम सोन्याच्या अंगठीसहचा सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कार त्यांना मिळाला. सरासरी ते वर्षाला सहा बॅच काढतात. एका बॅचला 50 हजार ते एक लाख रुपयांदरम्यान उत्पन्न मिळते. प्रति बॅच उत्पन्नाची सरासरी सुमारे 70 हजार रुपये आहे. वर्षाला सुमारे साडेतीन चे चार लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.
चार हजार रुपये प्रति ट्रॉली याप्रमाणे त्याची विक्री करतात. त्यापासून प्रत्येक बॅचला सुमारे 17,200 रुपये उत्पन्न मिळते. एका बॅचला सुमारे 300 गोणी खाद्य लागते. खाद्याच्या रिकाम्या पिशव्या प्रति पिशवी सात रुपये या होलसेल दराने विकतात. त्यातूनही सुमारे दोन हजार रुपये उत्पन्न मिळते. याशिवाय भांड्यांमध्ये व फोडलेल्या गोणींमध्ये राहीलेले खाद्य संगमनेर बाजारात विकूनही काही उत्पन्न मिळते. या सर्वातून त्या बॅचचा सर्व उत्पादन खर्च वसूल होतो आणि कंपनीकडून मिळालेले संगोपन शिल्क निव्वळ नफा म्हणून शिल्लक राहते.

- सर्व श्रेय मार्गदर्शकाला

डोंगरे यांनी पोल्ट्री सुरु केली तेव्हा सर्वप्रथम सगुणा पोल्ट्री सोबत करार केला. सुगुणाचे त्या भागाचे तत्कालिन पोल्ट्री वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र गोरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. डॉ. गोरेंनी पोल्ट्रीतले सर्व बारकावे शिकवले. त्यांच्यामुळे कमीत कमी दिवसात सर्वोच्च गुणवत्ता व वजन मिळवायला शिकलो, त्यांनी मोठ्या भावासारखं मार्गदर्शन केलं म्हणून यशाचं सुत्र सापडलं, असं डोंगरे आवर्जून सांगतात. पुढे डॉ. गोरे यांची पदोन्नतीने बदली झाली. ते याच भागात कायम रहावेत म्हणून डोंगरेंनी प्रयत्न केले पण यश आले नाही. शेवटी ते नाहीत म्हणून डोंगरेंनी सगुणाची साथ सोडून इतर कंपन्यांशी करार केला. अजूनही काही अडचण आल्यास डॉ. गोरे दुरध्वनीवरुन त्यांना मार्गदर्शन करतात.

- डोंगरे कुटुंबाचा दिनक्रम
दररोज सकाळी 8 वाजता श्री व सौ. डोंगरे घरापासून पाचशे मिटरवर असलेल्या पोल्ट्रीकडे जातात. साडेनऊपर्यंत पक्षांना खाद्य, पाणी, तुसाची हालवाहालव आदी काम आवरतात आणि घरी येतात. यानंतर सौ. डोंगरे स्वयंपाक, मुलांच्या शाळेची आवराआवर करतात. तोपर्यंत श्री. डोंगरे गावात जावून तास दीड तास पतसंस्थेचा कारभार पाहून येतात. गावच्या सरस्वती ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. साडेअकरा बाराच्या सुमारास दोघं नवरा बायको सोबत जेवण करतात. यानंतर बाहेरची काही असतील किंवा कुठं जायचं असेल तर ते... नाही तर विश्रांती घेतात. संध्याकाळी 4 वाजता ते साडेपाच पर्यंत पुन्हा पोल्टीत काम करतात. साडेपाच वाजता पोल्ट्रीला कुलुप लावून घरी येतात. स्वयंपाक, एकत्रित जेवण, गप्पाटप्पा, मुलांचा अभ्यास आणि मग झोप. सकाळी दीड तास व संध्याकाळी दीड तास असे दिवसाला फक्त तीन तास काम करतात. हा दिनक्रम ठरलेला आहे.

- जगण्याचं, व्यवसायाचं रॉयल तत्वज्ञान
प्रत्येक माणसाची, कुटुंबाची कामाची आणि व्यवस्थापनाची एक क्षमता आणि मर्यादा ठरलेली असते. ती ओलांडण्याचा प्रयत्न केला तर कार्यक्षमता (इफिसियन्सी) कमी होते. विचार होता आणखी पोल्ट्री वाढवण्याचा... पण सर्व बाबींचा विचार करुन पाच चे दहा हजार पक्षी करण्यापेक्षा पाच हजार पक्षांपासून दहा हजार पक्षांएवढे उत्पन्न घेण्यावर भर दिला व ते साध्य केले.

अति कामाच्या किंवा पैशाच्या मागे लागून जगणं विसरण्यात अर्थ नसतो. शेवटी तुम्ही काम कशासाठी करता, कामासाठी की चांगले जगण्यासाठी. चांगलं जगायला आवश्यक तेवढा पैसा शाश्वतपणे येत असेल तर मग हव्यास कशाला. अनेक शेतकरी डेअरीला दररोज शंभर-दोनशे लिटर दुध घालतात, पण घरी चहाला दुध नसतं. त्यांना वेळेवर भाकर खाता येत नाही. ना मुलांना निट घडवता येत. मग ढोरमेहनत केल्याचा व जे काही कमवले त्या पैशाचा काय उपयोग. कामात, व्यवहारात, जगण्यात स्मार्टपणा हवा. आयुष्य एकदाच आहे. चांगलं खायचं, चांगलं रहायचं, चांगलं जगायचं. कामाच्या नादात जगणं विसरायचं नाही. अतीरेक करुन कुणासाठी कमवून ठेवायचं ?

मला पोल्ट्रीतून जे उत्पन्न मिळतंय ते शाश्वत आणि कुटुंबासाठी पुरेसे आहे. दोन मुले आहेत. मुलगा वैभव ( वय 18) कृषी पदविकेच्या पहिल्या वर्षात आहे. तर मुलगी पुनम ( वय 20) अभियांत्रिकी पदविकेच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्यांना पुरेसा वेळ देतो. एखादे दिवशी पोल्ट्रीत जास्त काम असलं तर सर्व उरकल्यावर संगमनेरला हॉटेलमध्ये जेवायला जातो सर्वजण. दर वर्षी एका मोठ्या सहलीला जातो. राज्यातील सर्व प्रमुख देवस्थाने आणि प्रमुख पर्यंटन स्थळं फिरलो आहोत. गुजरात (सापुतारा), गोवा, कोकणात फिरलोय. यंदा परत कोकणात जाणार आहोत. जे काही करायचं ते कुटुंबासोबत. एकटा तर मी गावात जावून चहाही पित नाही... इति. अशोक डोंगरे

- व्यवसायिक यशाची सुत्रे...
1) पोल्ट्रीभोवती चेरी ची झाडे. ही झाडे बारमाही हिरवी असतात. त्यामुळे गारवा राहतो. ऊन थेट लागत नाही आणि झळाही बसत नाहीत. यामुळे शेडमधील जागेचा पक्षी पुरेपूर उपयोग करतात.
2) पिल्ले लहान असताना पहिले तीन दिवस पक्षांना बसू देत नाही. सारखे हलवत राहतो. यामुळे ती पाणी जास्त पितात व खाद्य जास्त खातात. लहानपणीच खाण्याची व पिण्याची सवय लागते. यामुळे त्यांचे वजन भराभर वाढते.
3) पहिले पाच सहा दिवस तापमान नियंत्रित करावं लागतं. कोळसा शेगडी वापरतो. पहिली आठ दिवस खूप काळजी घ्यावी लागते.
4) पक्षांखाली जमीनीवर एक इंच जाडीचा तुसाचा थर देतो. तो दररोज एकदा हलवतो. यामुळे वास येत नाही, आजार तयार होत नाही.
5) उष्णतेच्या प्रमाणानुसार वजन अपेक्षित असते. खूपच वजन झाले आणि उष्णता वाढली तर तयार झालेला पक्षी खावून मरतो. म्हणून उष्णता जास्त असल्यास खाद्यावर नियंत्रण ठेवतो. रात्री मुबलक खाद्य ठेवतो. दुपारी खाद्याची भांडी उंचावर घेतो.
6) पिण्याचे पाणी स्वच्छ हवे. भांडी वेळच्या वेळी साफ करायची. आत पाणी सांडू द्यायचे नाही. त्यामुळे तुस खराब होत नाही व वास येत नाही.
7) स्वच्छता खूप महत्वाची. ती राखली तर आजार येत नाही, आला तर ज्या पक्षाला बाधा होईल तो मरतोच. यामुळे आजार येवू नये म्हणूनच प्रयत्न करायचे. सरासरी 3 टक्के मर राहते.
8) कंपनीने निर्धारीत केलेल्या खर्चापेक्षा उत्पादन खर्च कमी राखतो. हवामानाची साथ आहे. आजूबाजूला बागायती क्षेत्र असल्याने हवामानाची साथ आहे. स्वच्छता, मेहनत, बारकाईने लक्ष असते. या सर्वांमुळे कंपनीच्या निर्धारीत उत्पादन खर्चाहून 10 ते 15 रुपये कमी खर्चात प्रतिकिलो उत्पादन घेतो. 50 ते 60 रुपये प्रतिकिलो उत्पादन खर्च येतो.
9) पक्षाच्या वयानुसार चार टप्प्यात चार प्रकारचे खाद्य देतो. पहिल्यांदा पीबीएस, त्यानंतर ग्रोअर, मग पॅलेट आणि सर्वात शेवटी फिनिशर असे खाद्य असते. या खाद्य बदलांच्या वेळी एक दिवस दोन प्रकारचे खाद्य मिक्स करुन चारतो. यामुळे पचनाला बाधा येत नाही.
10) कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजन मिळवण्यावर कटाक्ष. 34 दिवसात 2100 ग्रॅम वजन होतेय. दोन किलोची साईज झाल्यावर कंपनी लगेच पक्षी उचलते. 30 दिवसांहून पुढे वजन जास्त वेगाने वाढते. सर्व लॉट 34 ते 37 दिवसातच उचलतात.

------------------------
- काही बॅचच्या अर्थकारणाचे नमुने
बॅच विक्री दिनांक --- पक्षी --- सरासरी वजन (किग्रॅ) --- एकूण वजन (किग्रॅ) --- प्रति किलो दर, रुपये (रेअरिंग चार्ज) --- एकूण उत्पन्न रुपये) --- कालावधी (दिवस)
24.11.2011 --- 5,870 --- 2.406 --- 13,420 --- 9.40 --- 81,881 --- 37
09.10.2012 --- 5,897 --- 2.600 --- 14,929 --- 7.04 --- 1,05,164 --- 44
02.03.2013 --- 4,733 --- 2.095 --- 9691 --- 6.50 --- 61,088 --- 40
23.11.2014 --- 6,428 --- 2.174 --- 13,633 --- 6.03 --- 80,916 --- 34
28.11.2015 --- 5,100 --- 2.085 --- 10,340 --- 9.10 --- 90,591 --- 32

- कमी दिवसात जास्त वजन
आठवडा --- कंपनीला अपेक्षित वजन (ग्रॅम) --- डोंगरेंच्या पक्षांच्या वजन (ग्रॅम)
पहिला --- 250 --- 300
दुसरा --- 950 --- 1035
तिसरा --- 1435 --- 1590
चौथा --- 1800 --- 2000
-----------
"पोल्ट्रीमुळं प्रगती झालीये. पूर्वी वर्षाला मिळायचे एवढे उत्पन्न आता महिन्यात घेतोय. मानसिक ताणतणाव नाहीत. आर्थिक अडचण नाही. मुलांचे शिक्षण चांगल्या प्रकारे सुरु आहे. चांगल्या प्रकारे मनासारखं आयुष्य जगतोय. खरोखर सुखी आहोत."
- सौ. विमल डोंगरे

"बारा तेरा वर्षे नोकरी केली. आज उद्या उत्पन्न वाढेल या आशेने काम करत रहायचो. पण शिल्लक काहीच राहायचं नाही. ही सर्व वर्षे फुकट घालवली असं वाटतं कधी कधी. पोल्ट्रीसाठी पाच वर्षाच्या बोलीवर घेतलेले कर्ज सर्व जबाबदाऱ्या पार पाडून तीन वर्षात फेडले. मनासारखं संपन्न जगतोय आता. बॅंक बंद पडली नसती तर आजही नोकरीच करत असतो. "
- श्री. अशोक डोंगरे
----------
संपर्क -
अशोक गणपत डोंगरे, मु. पो. निमज (खंडोबामळा), ता. संगमनेर, जि. नगर - 9922694671














Tuesday, March 15, 2016

काश्मिर ते कन्याकुमारी... एक सायकल प्रवास

जगणं समृद्ध करणारा रोमांचक प्रवास
-----------------------
महात्मा गांधी, स्वामी विकेकानंद आदी जग बदलणाऱ्या, लाखो लोकांच्या जिवनावर, जिवनपद्धतीवर प्रभाव पाडणाऱ्या मोठ्या लोकांमध्ये एक गोष्ट समान दिसते. त्यांनी आपापला देश सर्वप्रथम समजून घेतला. त्यासाठी ते देशभर फिरले. माती, माणसं, प्रदेश, रुढी, परंपरा, मानसिकता, जिवनपद्धती, सुख, दुःख, वारसा, वाटचाल, दृष्टीकोन, अपेक्षा हे सारं काही समजून घेतलं. आपापल्या कार्यक्षेत्राशी नाळ जोडली, एकरुप झाले. अनुभूतीतून आलेली समज, ज्ञानाच्या जोरावर पुढे इतिहास घडवला. माणसाच्या वैयक्तिक जडणघडणीत प्रवासाचा, त्यातून होणाऱ्या आकलनाचा, आत्माभुतीचा फार मोठा वाटा असतो. हे वैश्विक सुत्र समजून घेतले तर जयदिप शिंदे व संकेत देशमुख या पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सायकलवर केलेल्या काश्मिर ते कन्याकुमारी या सायकल टूर चे महत्व अधिकच अधोरेखित होते. त्यांच्या २७ दिवसाच्या प्रेरणादायी मोहिमेचे त्यांच्याच शब्दात राहूल रायकर यांनी काश्मिर ते कन्याकुमारी... एक सायकल प्रवास या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. पुण्यातील स्नेहल प्रकाशन ने ते प्रसिद्ध केले आहे. आवर्जून वाचावं असे हे पुस्तक आहे...

- दहा वर्षे सायकलला हात लागला नसताना अचानक शाळेतल्या मित्रांनी पुणे ते महाबळेश्वर सायकल टूर ठरवली. भाड्याच्या सायकली घेवून निघाले पण पोचता पोचता तोंडाला फेस आला. दमलेल्या अवस्थेत एकानं पैज लावली... काश्मिर ते कन्याकुमारी सायकलवर करिल त्याला पार्टी वगैरे.
- संकेत व जयदिप ने हे चॅलेंज स्विकारले आणि अतिशय थोड्या वेळात मोहीम आखली. तयारी म्हणजे काय... तर फक्त प्रवासाचा मार्ग व मुक्कामाची ठिकाणं ठरलेली. बाकी सारं नाविन्यच. येईल तो अनुभव घ्यायचा आणि चालत रहायचं हे सुत्र. जोडीला शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून पर्यावरणविषयक जागृतीचाही अजेंडा हाती घेतला व राबवला.
- कोषातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक्ष क्षण नवा अनुभव देत होता. मंदीरं, शाळा, ढाबे, माणसं... त्या त्या भागाशी एकरुप होत मनाची, शरिराची क्षमता वाढवत मुक्त पाखरासारखा प्रवास.
- वाऱ्याची दिशा, रस्त्यावरील पांढऱ्या रंगाचे पट्टे यांचा सायकल चालवताना झालेल्या फायदा आणि ट्रेक, ट्रॅक्टरची साखळी धरुन जानाचा तोटा, अपघात काहीही आडपडदा न ठेवता सर्व अनुभवांचे संचित दिलखुलासपणे खुले केले आहे.
- एका दिवशी ६० ते ३०४ किलोमिटरपर्यंत प्रवास. सलग ३१ दिवसांची मोहीम २७ दिवसात पूर्ण केली. उद्दीष्ट ठरवणं आणि ते वेळेआधी पुर्ण करण्याची नशा, जिद्द, जिगर एकमेकाद्वितीय. स्वतःला उद्दीष्ट गाठण्याची, जिकण्याची सवय कशी लावावी, याचा उत्तम वस्तूपाठ.
- साहसी प्रवास, त्यातून येणारी अनुभूती, गाठीशी बांधला जाणारा अनुभव, त्यातून मिळणाऱ्या टिप्स... या सर्वातून प्रगल्भ होत जाणारं व्यक्तीमत्व हे सारं या पुस्तकात पहायला मिळतं.
-----------------------

Thursday, March 10, 2016

अॅग्रोवन पुरस्कार सोहळा सामवर

साम टिव्हीवर रविवारी
ॲग्रोवन स्मार्ट पुरस्कारांचा जल्लोष

पुणे (प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या कृषी व ग्रामिण संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या अस्सल गावरान दिमाखदार गीत, संगीत, नृत्यमय अविष्कारात राज्यभरातील शेतकऱ्यांच्या गौरव सोहळा याची देही याची डोळा घरबसल्या अनुभवण्याची संधी राज्यभरातील शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. भरघोस रकमेसह शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणारा हा सोहळा येत्या रविवारी (ता.१३) सायंकाळी ६.३० ते रात्री १० या वेळेत साम टिव्हीवर दाखविण्यात येणार आहे. याच दिवशी मध्यरात्री साडे बारा वाजता या कार्यक्रमाचे पुर्नप्रक्षेपण करण्यात येणार आहे.

चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले व नकुल घाणेकर नृत्य पथकाची एकाहून एक सरस, ठसकेबाज ग्रामिण, कृषी व लोकगितांवरील अदाकारी, अभिनेते योगेश शिरसाट व नम्रता संभेराव या जोडीची बतावणीची जुगलबंदी, हास्याचे धबधबे आणि कारुण्याची किनार आणि गायिका आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत यांची नादब्रम्ह जागवणारी, काळजाला हात घालणारी सुरेल मैफिल आणि त्यांना अनेक दिग्गजांची साथ अशा एकाहून एक सरस सादरीकरणांचा या सोहळ्यात समावेश आहे.

बिकट परिस्थितीशी झुंजून उज्वल यश मिळवलेल्या, शेतीच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील निवडक शेतकऱ्यांना ॲग्रोवनमार्फत विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात विलास शिंदे (नाशिक), कुसुमताई गव्हाळे (अकोला), मनीषा कुंजिर, कांतिलाल रणदिवे, रोहिदास डोके (पुणे), अभिजिक फाळके (वर्धा), मोहोम्मद गौस (परभणी), अंकुश पडवळे (सोलापूर), जगन्नाथ बोरकर (वाशीम), उद्धव खेडेकर (जालना), चैत्राम पवार (धुळे), सचिन चुरी (पालघर) या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
-------------------

विदर्भात गारपिट, वावटळींचा इशारा



येत्या सोमवारपर्यंत ठिकठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) - राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे. हवामान खात्याने शनिवारी विदर्भाच्या तुरळक भागात गारांचा पाऊस व गडगडाटी वावटळ होण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी (ता.११) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याचा, शनिवारी (ता.१२) मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात तर कोकण, मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा, रविवारी (ता.१३) मराठवाडा व विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा तर सोमवारी (ता.१४) विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पूर्व मध्य प्रदेश, लगतचा विदर्भ व छत्तिसगडवर समुद्रसपाटीच्या पातळीहून दीड किलोमिटर उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रीय आहेत. याच वेळी कोकण किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे राज्यात पावसाचे सावट निर्माण झाले आहे. विदर्भावरील चक्राकार वाऱ्यांमुळे गारपीटीचा अंदाज आहे. दिवसभरात मालेगाव येथे राज्यातील सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची तर नाशिक येथे सर्वात कमी १४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. किमान तापमानात कोकणच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या आसपास होते.

गुरुवारी (ता.१०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३२.२ (२२.५), अलिबाग ३०.९ (२१.४), रत्नागिरी ३३.७ (१९.३), पणजी ३३ (२३.४), डहाणू ३०.६ (२०.६), भिरा (१७), पुणे ३५.८ (१६.५), नगर (१८.९), जळगाव ३७.६ (१७.४), कोल्हापूर ३५.६ (२२.५), महाबळेश्वर ३२.१ (१९.४), मालेगाव ३९ (१७.२), नाशिक ३४.९ (१४), सांगली ३६.५ (२०.३), सातारा ३५.३ (१८.७), सोलापूर ३७.६ (२४.१), उस्मानाबाद (१८.४), औरंगाबाद ३५.३ (१७.१), परभणी ३७.६ (२१.२), नांदेड ३८.६ (१८), अकोला ३७.६ (२०.४), अमरावती ३७ (२१), बुलडाणा ३५ (२१.७), ब्रम्हपुरी ३६.९ (२२.७), चंद्रपूर ३८.२ (२४.७), गोंदिया ३४ (२१.५), नागपूर ३५ (१९.६), वाशिम ३३.८ (२३.६), वर्धा ३६.२ (१९.८), यवतमाळ ३६ (२१.६)
----------------------------------- 

राजूरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन

शिवनेरी कृषी, पशु प्रदर्शनाला
उद्यापासून राजूरीत प्रारंभ

बेल्हा, ता. जुन्नर, पुणे (प्रतिनिधी) - दुग्ध उत्पादन व विकासात राज्यात अग्रसर असलेल्या राजुरी (ता.जुन्नर) येथिल गणेश सहकारी दुग्धव्यसायिक संस्थेमार्फत आयोजित राज्यस्तरिय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला शनिवारपासून (ता.१२) प्रारंभ होत आहे. पुणे जिल्हा परिषद, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग व राजुरी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारपर्यंत (ता.१४) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन सुरु राहणार आहेत.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदिप कंद अध्यक्षस्थानी असतील. आमदार शरद सोनवणे व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती ॲड. सारिका इंगळे-वाडेकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. रविवारी (ता.१३) पशुपालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात पिक स्पर्धा व दुग्ध स्पर्धेचे उद्घाटन होणार अाहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

सुमारे १०० कालवडींचा रॅम्पवॉक, सर्वोत्तम गाय व म्हैस स्पर्धा, द्राक्ष व डाळिंब परिसंवाद, डायड्रोपोननिक चारा तंत्र, शासकीय योजना, धान्य महोत्सव, खाद्यजत्रा, परिसरातील शेतमाल आणि फळांचे नाविन्यपुर्ण नमुने यासह विविध कृषी तंत्रज्ञानाच्या २०० दालनांचा या प्रदर्शनात समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन मोफत खुले आहे.

सोमवारी सायंकाळी ४ वाजता प्रदर्शनाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, पशुसंवर्धन आयुक्त विश्‍वास भोसले, कृषी आयुक्त विकास देशमुख, पुणे विभागाचे अधिक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
-------------------

Wednesday, March 9, 2016

देवदत्त निकम प्रतिक्रिया

निर्णयात अस्पष्टता, फरकाचे काय

राज्याच्या निर्णयानुसार नियामक मंडळाच्या दराबरोबरच एफआरपी सुद्धा बंधनकारक आहे, असे दिसते. एफआरपी दर वर्षी वाढतच जाणार आहे. कारण तिचा सारखेच्या किमतीशी संबंध नाही. साखरेच्या किमती पडल्या तर नियामक मंडळाचा दर एफआरपी पेक्षा कमी राहील. मग अशा वेळी दोन्ही दरातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना कोण देणार. या रकमेचा भार राज्य शासन उचलणार का. आणि जर असे नसेल तर मग सध्याची एफआरपीनुसार दर देण्याची पद्धत काय वाईट आहे. कारण चांगले दर असतील तर कारखाने एफआरपीहून अधिक दर देत आहेत. अशा स्थितीत कारखान्यांना एकाच वेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींचे वेगवेगळे नियम पाळणे बंधनकारक असेल का. ते संयुक्तिक होईल का. की केंद्र सरकार त्यांचा एफआरपीचा कायदा मागे घेवून दर ठरविण्याचे अधिकार पूर्णपणे राज्य शासनाला देणार आहे. एकूणच शासनाचा या निर्णयात अद्याप स्पष्टता नाही. याबाबत सविस्तर गाईडलाईनची आवश्यकता आहे.
- देवदत्त निकम, अध्यक्ष, भिमाशंकर सहकारी साखर कारखाना, आंबेगाव, पुणे.
------------------------------ 

Tuesday, March 8, 2016

अॅग्रोवन एनजीओ कार्यशाळा

सकाळ ॲग्रोवन तर्फे पुण्यात १७ व १८ मार्चला चर्चासत्र

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील कृषी व संलग्न क्षेत्राच्या विकासकार्यात शासनाच्या मदतीशिवाय किंवा शासनासोबत स्वतंत्रपणे कार्य करुन सामाजिक कारकीर्द घडवू इच्छिनाऱ्यांसाठी सकाळ ॲग्रोवन तर्फे बिगरसरकारी संस्था (एनजीओ) स्थापना ते उद्दिष्टप्राप्तीविषयक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील प्रगतिशील शेतकरी, कृषी व संलग्न व्यवसायिक,नोकरदार, विद्यार्थी, सेवाभावी वृत्तीने काम करु इच्छिनाऱ्या व्यक्तींसाठी हे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे.

सध्या राज्य व देशपातळीवर अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून कृषी व ग्रामिण विकासाला मोठी चालना मिळालेली आहे. या संस्थांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झालेली आहे. आदर्श गाव योजना, जल व मृदसंधारणविषयक योजना, सार्वजनिक व खासगी गुंतवणुकीच्या (पीपीपी) योजना, विविध खासगी कंपन्यांसाठी सेवाभावी काम करणे, शासकीय कामांसाठीची कंत्राटी नोकरभरती, समाजाच्या विविध स्तरांच्या विकासासाठी सेवाभावी व्यक्ती, संस्थांनी दिलेल्या निधीचा योग्य वापर आदी असंख्य कामांसाठी एनजीओंना प्राधान्य देण्यात येत आहे.

एनजीओच्या माध्यमातून विकास, व्यवसायाच्या अनेक संधी खुल्या झाल्या आहेत. मात्र, एनजीओची स्थापना व कार्यपद्धती याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्याने त्यांच्या विस्तारावर मर्यादा आल्या आहेत. ही अडचण दूर करुन इच्छुकांना एनजीओच्या माध्यमातून स्वतःबरोबरच समाजाच्याही विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सकाळ ॲग्रोवनमार्फत या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. एनजीओ संबंधित विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा सशुल्क असून वैयक्तिक पातळीवरील प्रशिक्षणाच्या दृष्टीने एका चर्चासत्रात फक्त ५० व्यक्तिंनाच प्रवेश देण्यात येणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार हे प्रवेश देण्यात येतील.

चर्चासत्रातील विषय...
- एनजीओ स्थापनेसाठी लागणारी माहिती, घटना, उद्दीष्टे
- एनजीओ व्यवस्थापन कसे करावे
- एनजीओ उभारणीसाठी कायदेशीर बाबी (धर्मादाय आयुक्त कार्यालय परवानगी, आयकर आयुक्त कार्यालय संबंधित बाबी)
- प्रकल्प अहवाल व उभारणी
- निधीची उभारणी (सीएसआर अंतर्गत, विदेशी सहभागाच्या अटी)
- शासकीय योजनांची एनजीओच्या सहयोगाने अंमलबजावणी
- शेतीविषयक काम करणाऱ्या संस्थांची यशोगाथा

असे आहे नियोजन
दिनांक - १७ व १८ मार्च २०१६
वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ६
ठिकाण - सकाळनगर, गेट नं १, यशदाशेजारी, बाणेर रोड, पुणे
शुल्क - प्रतिव्यक्ती ३००० रुपये (चहा, नाश्ता, जेवण व प्रशिक्षण साहित्यासह)
प्रवेश - फक्त ५० व्यक्तिंसाठी
संपर्क - सुशांत ९८५०३०५६५४, ९४२३३९१९६९
------------------------------------