Thursday, March 10, 2016

राजूरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन

शिवनेरी कृषी, पशु प्रदर्शनाला
उद्यापासून राजूरीत प्रारंभ

बेल्हा, ता. जुन्नर, पुणे (प्रतिनिधी) - दुग्ध उत्पादन व विकासात राज्यात अग्रसर असलेल्या राजुरी (ता.जुन्नर) येथिल गणेश सहकारी दुग्धव्यसायिक संस्थेमार्फत आयोजित राज्यस्तरिय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला शनिवारपासून (ता.१२) प्रारंभ होत आहे. पुणे जिल्हा परिषद, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग व राजुरी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारपर्यंत (ता.१४) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन सुरु राहणार आहेत.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदिप कंद अध्यक्षस्थानी असतील. आमदार शरद सोनवणे व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती ॲड. सारिका इंगळे-वाडेकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. रविवारी (ता.१३) पशुपालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात पिक स्पर्धा व दुग्ध स्पर्धेचे उद्घाटन होणार अाहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

सुमारे १०० कालवडींचा रॅम्पवॉक, सर्वोत्तम गाय व म्हैस स्पर्धा, द्राक्ष व डाळिंब परिसंवाद, डायड्रोपोननिक चारा तंत्र, शासकीय योजना, धान्य महोत्सव, खाद्यजत्रा, परिसरातील शेतमाल आणि फळांचे नाविन्यपुर्ण नमुने यासह विविध कृषी तंत्रज्ञानाच्या २०० दालनांचा या प्रदर्शनात समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन मोफत खुले आहे.

सोमवारी सायंकाळी ४ वाजता प्रदर्शनाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, पशुसंवर्धन आयुक्त विश्‍वास भोसले, कृषी आयुक्त विकास देशमुख, पुणे विभागाचे अधिक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
-------------------

No comments:

Post a Comment