Thursday, March 17, 2016

हेमंत ढोमे - अॅग्रोवन भेट

पुणे, ता.१७ ः राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक शेतकरी उत्तम शेती करत आहेत. ॲग्रोवनमधून अशा यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध होत असतात. मात्र प्रसिद्धी माध्यमांबरोबरच चित्रपटांमधूनही शेतीतील नायक समाजासमोर यायला हवेत, असे मत चित्रपट अभिनेता, लेखक हेमंत ढोमे यांनी व्यक्त केले. पोस्टर गर्ल या चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर श्री. ढोमे यांनी ॲग्रोवन कार्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

ढोमे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी सकाळ माध्यम समुह, ॲग्रोवन करत असलेले काम खूपच परिणामकारक आहे. हे काम मी जवळून पाहीले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीबाबतचे नैराश्य व स्री भृण हत्या या विषयावर भाष्य करणाऱ्या पोस्टर गर्ल या चित्रपटाची कथा-पटकथा लिहीताना ॲग्रोवन डोळ्यांसमोर होता. बहुतेक चित्रपटांमधून शेतकऱ्यांचे चित्र एक तर नकारात्मक रेखाटले जाते. दारिद्र्य, आत्महत्या, गावाकडचे विनोद एवढ्यापुरतेच ते मर्यादित असते. या पलिकडे जावून शेतीकडे चला असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. यापासून प्रेरणा घेवून शेती व शेतकरी विषयक आणखी विषय व चित्रपट पुढे येतील, अशी आशा आहे.

गावाकडील झगमगाटीला विकास म्हटले जातेय. खेडोपाडीही काळानुरुप बदल हवा. या बदलात शेतकऱ्यांचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावला पाहिजे. गावात शेती अनुषंगीक सर्व सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. हा खरा विकास म्हणता येईल, असेही ढोमे म्हणाले. चित्रपट सृष्टीचा शेती व शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन, व्यवसायिक स्थिती व स्पर्धा, चित्रपट निर्मितीत मोठी वाढ झाली असली तर गुणवत्तेत होत असलेली घसरण, राजकारण ते गटतट आदी विषयांबाबत त्यांने ॲग्रोवनच्या संपादकीय विभागाशी मनसोक्त गप्पा मारल्या. ॲग्रोवनचे सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले यांनी श्री. ढोमे यांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले.
------------------- 

No comments:

Post a Comment