Wednesday, January 29, 2014

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, दक्षिण कोकणात आकाश अंशतः ढगाळ

पुणे (प्रतिनिधी) ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची तिव्रता वाढल्याने विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट आली आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात किमान तापमान सरासरीहून तीन ते सहा अंश सेल्सिअसने घसरले आहे. नगरमध्ये बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यातील सर्वात कमी आठ अंश सेल्सिस किमान तापमानाची नोंद झाली. याच वेळी समुद्रावरुन बाष्पाचा पुरवठा होवू लागण्याने दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळले आहे.

हवामान खात्याने शुक्रवारी सकाळपर्यंत दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळलेले राहण्याचा व उर्वरीत महाराष्ट्रात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. किमान तापमानातील घसरणीमुळे राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. याच वेळी कोकण वगळता उर्वरीत संपूर्ण महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा सरासरीहून घसरला आहे.

दरम्यान, उत्तरेकडील राज्यामध्ये दाट धुके पडत आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसात दाट धुके कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी पावसाचाही अंदाज असून जम्मू व काश्‍मिर आणि हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी (ता.29) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान व कंसात किमान तापमानात सरासरीहून झालेली वाढ किंवा घट अंश सेल्सिअसमध्ये ः अलिबाग 18 (1), भिरा 19 (3), डहाणू 18 (1), पणजी 21 (1), हर्णे 22 (0), मुंबई 17 (0), रत्नागिरी 17 (-2), नगर 8 (-5), जळगाव 11 (-2), कोल्हापूर 17 (1), महाबळेश्‍वर 13 (-1), मालेगाव 11 (0), नाशिक 9 (-2), पुणे 9 (-2), सांगली 15 (1), सातारा 12 (-1), सोलापूर 16 (-1), औरंगाबाद 11 (-1), नांदेड 12 (2), उस्मानाबाद 13, परभणी 11 (-4), अकोला 12 (-3), अमरावती 14 (-2), ब्रम्हपुरी 13 (-1), बुलडाणा 13 (-2), चंद्रपूर 9 (-6), नागपूर 9 (-5), वर्धा 11 (-4), यवतमाळ 12 (-5)
-----------------(समाप्त)--------------

दुष्काळग्रस्त शेतकरी आगीतून फुफाट्यात, 562 कोटींची विमा भरपाई लाल फितीत

दोन महिन्यांपासून नकारघंटा; शासकीय यंत्रणेकडून हात वर

संतोष डुकरे
पुणे ः गेल्या वर्षीच्या दुष्काळात रब्बी हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी भारतीय कृषी विमा कंपनीने (एआयसी) जाहीर केलेली 562 कोटी रुपयांची भरपाई दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही. विशेष म्हणजे खुद्द राज्य व केंद्र शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे नऊ लाख दुष्काळग्रस्तांवर ही आपत्ती ओढवली आहे.

शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम राज्य व केंद्र शासन आणि केंद्र शासनाची भारतीय कृषी विमा कंपनी यांच्यामार्फत एकत्रितपणे दिली जाते. कृषी विभागामार्फत राज्य हिश्‍श्‍याचा 168 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. मात्र गेली दोन महिने हा प्रस्ताव अर्थविभागाकडे पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे केंद्राकडूनही केंद्र हिश्‍श्‍याची 168 कोटी रुपये रक्कम अद्याप विमा कंपनीला मिळालेली नाही.

शासनाकडून निधी मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना भरपाई द्यायची नाही, अशी भूमिका विमा कंपनीने घेतल्याने अद्याप बॅंकांकडे भरपाईची रक्कम वर्ग करण्यात आलेली नसून राज्यातील एकाही लाभार्थ्याला भरपाई मिळू शकलेली नाही. विमा भरपाई मंजूर झालेले शेतकरी बॅंकेमध्ये भरपाईसाठी खेटा मारत असून बॅंका, कृषी विभाग व विमा कंपनीच्या नकारघंटेने मेटाकुटीला आले आहेत.

खरिपापाठोपाठ रब्बीवरही दुष्काळाचे सावट असल्याने 2012-13 च्या रब्बी हंगामात नऊ लाख 90 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या आठ लाख 78 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण मिळवले होते. यापैकी 8 लाख 96 हजार 401 शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा कंपनीने डिसेंबर 2013 च्या प्रारंभी 562 कोटी 14 लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली. पीक विमा योजनेच्या इतिहासातील एका हंगामासाठी मंजूर झालेली सर्वोच्च भरपाई आहे.

जिरायती ज्वारीला 290 कोटी रुपये, बागायती ज्वारीला 102 कोटी रुपये, तर हरभरा पिकाला 140 कोटी रुपये भरपाई मंजूर झाली. मात्र यानंतर दोन महिने उलटत आले असतानाही सर्व कारभार कागदावरच असून अद्यापही शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकलेली नाही. यामध्ये नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक 211 कोटी रुपये थकले आहेत.

*कोट
""बॅंकेपासून कृषी विभागाच्या मुंबईतील अधिकाऱ्यांपर्यंत सगळीकडे चौकशी केली. कुणीच नीट उत्तर देत नाही. भरपाई कधी मिळेल, सांगता येत नाही म्हणतात. एकमेकांकडे बोट दाखवतात. सलग दोन दुष्काळांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेय. त्यात आता शासन आमची हक्काची विमा भरपाई देण्यासही अक्षम्य विलंब करत आहे. ही अवहेलना थांबवा.''
- तानाजी बब्रुवाहन जगदाळे, चारे, ता. बार्शी, जि. सोलापूर

""सर्वसाधारणपणे डिसेंबरअखेरपर्यंत रब्बी विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते. मात्र यंदा रब्बी 2012-13 च्या भरपाईच्या राज्य व केंद्र हिश्‍श्‍याचे प्रत्येकी 168 कोटी रुपये अद्याप कंपनीला मिळालेले नाहीत. यामुळे भरपाई देणे शक्‍य झालेले नाही. राज्य हिश्‍श्‍याची रक्कम मिळाल्याबरोबर भरपाई बॅंकांकडे वर्ग करण्यात येईल.''
- डी. जी. हळवे, विभागीय व्यवस्थापक, ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी (एआयसी)

*चौकट
- रब्बी पीक विमा भरपाई थकीत रक्कम (2012-13)
जिल्हा --- लाभार्थी शेतकरी --- थकीत रक्कम (लाख रुपये)
नगर --- 3,04,110 --- 21181.38
बीड --- 1,35,739 --- 9895.93
सांगली --- 1,01,146 --- 5814.43
सोलापूर --- 77,517 --- 5119.01
उस्मानाबाद --- 1,24,399 --- 4887.08
जालना --- 59,231 --- 4464.50
सातारा --- 63,510 --- 3234.45
पुणे --- 17,051 --- 950.59
औरंगाबाद --- 10,427 --- 622.97
लातूर --- 1,694 --- 14.45
अकोला --- 432 --- 10.94
बुलडाणा --- 205 --- 8.45
नाशिक --- 323 --- 5.75
नांदेड --- 483 --- 1.51
जळगाव --- 53 --- 1.24
हिंगोली --- 12 --- 0.31
नागपूर --- 9 --- 0.31
भंडारा --- 4 --- 0.25
वाशीम --- 12 --- 0.24
परभणी --- 7 --- 0.22
नंदुरबार --- 36 --- 0.12
वर्धा --- 1 --- 0.09
एकूण --- 8,96,401 --- 56214.22
----------(समाप्त)-----------


Tuesday, January 28, 2014

विदर्भ, मराठवाड्यात थंडी वाढली, सापेक्ष आर्द्रतेतही उल्लेखनीय घट

पुणे (प्रतिनिधी) ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसनी घट होऊन थंडी वाढली आहे. किमान तापमानातील या घटीबरोबरच अनेक ठिकाणी सापेक्ष आर्द्रतेतही मोठी घट होऊन ती सरासरीहून घसरली आहे. हीच स्थिती बुधवारीही कायम राहणार असून, त्यात फारसा बदल होणार नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

मंगळवारी (ता. 28) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील किमान तापमान (अंश सेल्सिअस, कंसात किमान तापमानात सरासरीहून झालेली वाढ किंवा घट) ः अलिबाग 19 (2), भिरा 21 (5), डहाणू 19 (2), पणजी 21, हर्णे 23 (1), मुंबई 23 (3), रत्नागिरी 20 (1), नगर 10 (-3), जळगाव 11 (-2), जेऊर 12 (-1), कोल्हापूर 17 (1), महाबळेश्‍वर 12 (-2), मालेगाव 13 (2), नाशिक 11, पुणे 9.9, सांगली 17 (3), सातारा 12 (-1), सोलापूर 15 (-2), औरंगाबाद 13 (1), नांदेड 11 (-3), उस्मानाबाद 12, परभणी 11 (-4), अकोला 12 (-3), अमरावती 16, ब्रह्मपुरी 15, बुलडाणा 13 (-2), चंद्रपूर 14 (-1), नागपूर 11 (-3), वर्धा 11 (-4), यवतमाळ 13 (-4)

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील सापेक्ष आर्द्रता (टक्के, कंसात झालेली वाढ किंवा घट) ः अलिबाग 75 (1), भिरा 37 (-35), डहाणू 60 (-5), पणजी 70 (-7), हर्णे 70 (13), मुंबई 65 (-12), रत्नागिरी 37 (-23), नगर 90 (32), जळगाव 70 (7), जेऊर 65 (1), कोल्हापूर 60 (-9), महाबळेश्‍वर 65 (14), मालेगाव 90 (30), नाशिक 75 (14), पुणे 85 (6), सांगली 70 (0), सातारा 80 (11), सोलापूर 55 (-5), औरंगाबाद 75 (18), नांदेड 70 (8), उस्मानाबाद 60, परभणी 60 (-4), अकोला 70 (11), अमरावती 80 (29), ब्रह्मपुरी 85 (11), बुलडाणा 50 (-5), चंद्रपूर 65 (-2), नागपूर 60 (-2), वर्धा 70 (12), यवतमाळ 45 (-3)
--------------

1 फेब्रुवारीपासून शिर्डीत कृषी सहायक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन येत्या एक व दोन फेब्रुवारीला शिर्डी (नगर) येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाचे उद्घाटन दोन फेब्रुवारी रोजी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, कृषी राज्यमंत्री संजय सावकारे, अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोएल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट यावेळी उपस्थित राहणार आहेत. कृषी सहायकांच्या प्रलंबीत मागण्या शासनासमोर मांडून त्या सोडविण्यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

कृषी सहायक संघटनेची स्थापना 2 नोव्हेंबर 2007 रोजी झाली. यानंतर 2011 मध्ये संघटनेला शासन मान्यता मिळाली. राज्यातील 11 हजार 500 कृषी सहायक संघटनेचे सभासद आहेत. कायम प्रवास भत्यात वाढ, कृषी सेवक महिलांना प्रसुती रजा मंजूरी, 100 टक्के पदोन्नती, निविठ्ठा वितरण प्रणाली सुधारणा, कृषी सेवकांचे मानधनवाढ, 42 दिवसांचे संपकालिन वेतन आदी महत्वाचे निर्णय संघटनेच्या पाठपुराव्यामुळे झाले असून सहायकांच्या इतर मागण्यांविषयी अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संदीप केवटे यांनी सांगितले.

कृषी विभागाच्या पुर्नरचना करताना महसूलच्या धर्तीवर कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी अशी त्रिस्तरीय रचना स्विकारावी, कृषी सहायकांना कोतवालाच्या धर्तीवर मदतनीस द्यावा, तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, 12 वर्षे व 24 वर्षांच्या सेवेनंतर कालबद्ध पदोन्नती लागू करण्यात यावी, कृषी सहायकांचे पदनाम सहायक कृषी अधिकारी करण्यात यावे, निविष्ठा वितरणाबाबत आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकाची त्वरित अंमलबजाऽणी करण्यात यावी, शुन्याधारीत अर्थसंकल्पात कमी केलेल्या कृषी सहायकांचा खंडीत कालावधी समर्पित करण्यात यावा, कृषी सेवकांचा तीन वर्षाचा कालावधी शिक्षण संवकांप्रमाणे अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, कृषी विभागात नव्याने ठेकेदारांमार्फत सुरु झालेली टेंडरिंग पद्धत बंद करुन या कामांची जबाबदारी कृषी सहायकांकडेच ठेवण्यात यावी, प्रवास भत्त्यात वाढ करावी, 100 टक्के पदोन्नतीचा शासन आदेश लवकरात लवकर जाहिर करावा, तालुका ते राज्य पातळीपर्यंत आदर्श कृषी सहायक पुरस्कार देण्यात यावेत, यासह 24 मागण्या या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.
----------(समाप्त)---------

Monday, January 27, 2014

राहत्यात होणार राज्यातील पहिला कस्टमाईज खत निर्मिती कारखाना

संतुलित खत वापराचे नवे तंत्रज्ञान; एमएआयडीसीमार्फत प्रक्रिया सुरू

संतोष डुकरे
पुणे ः पीक आणि माती यांच्या गरजेनुसार स्थानिक ठिकाणांसाठी आवश्‍यक ते परिपूर्ण गरजाभिमुख खत (कस्टमाईज फर्टिलायझर) तयार करण्याचा राज्यातील पहिला कारखाना राहता (नगर) तालुक्‍यातील पुणतांबे येथे सुरू करण्यात येणार आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने (एमएआयडीसी) कारखाना उभारणीची तयारी सुरू केली आहे.

राज्यात सध्या विविध प्रकारची संयुक्त व मिश्र खते उत्पादित व विक्री केली जातात. ही सर्व खते खतांच्या प्रकारानुसार घटकांच्या काही ठराविक प्रमाणात उपलब्ध आहे. स्थानिक मातीतील अन्नद्रव्ये व पिकांच्या गरजेनुसार ही खते बनविण्यात येत नाहीत. यामुळे अनेकदा गरजेपेक्षा अधिक किंवा कमी प्रमाणात खत वापरले जाते. खताच्या या असंतुलित वापराचा विपरीत परिणाम जमिनीची सुपीकता व पीक उत्पादनावर होतो. यावर उपाय म्हणून पीक व मातीच्या गरजेनुसार गरजाभिमुख खते तयार करण्याचे तंत्रज्ञान पुढे आले आहे.

सध्या टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनीमार्फत उत्तरेतील राज्यांमध्ये कस्टमाईज फर्टिलायझर उत्पादन व विक्री करण्यात येत आहे. यासाठी कंपनीने उत्तर प्रदेशातील बाबराला येथे एक लाख 30 हजार टन क्षमतेचा कस्टमाईज खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. महाराष्ट्रात अद्याप एकही कस्टमाईज खत निर्मिती प्रकल्प कार्यरत नाही. यासाठी आता एमएआयडीसीने पुढाकार घेतला आहे.

*चौकट
- पीपीपी पद्धतीने उभारणी
केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात खासगी कंपन्यांची गुंतवणूक वाढविण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर भर दिला आहे. कस्टमाईज खत निर्मिती प्रकल्पही याच पद्धतीने सुरू करावा, अशा सूचना कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोएल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार एमएआयडीसीमार्फत पीपीपीचे टेंडर काढण्यात आले आहे. त्यास आत्तापर्यंत पीपीएल व नागार्जुना या दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. येत्या महिनाभरात या प्रकल्पातील खासगी भागीदार निश्‍चित होऊन पुढील कार्यवाही सुरू होण्याचे नियोजन आहे.

*चौकट
- 10 एकर जमिनीची प्रक्रिया सुरू
पुणतांबे येथे कस्टमाईज खत निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासनामार्फत एमएआयडीसीला 10 एकर जमिनी उपलब्ध करण्यात येणार आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सध्या ही कार्यवाही सुरू आहे. लवकरच या जमिनीच्या सात बाऱ्यावर एमएआयडीसीचे नाव लागण्याची शक्‍यता आहे. पीपीपी प्रकल्पातील खासगी कंपनीसोबतच्या कराराच्या बाबी, कोणत्या भागासाठी व पिकांसाठी कोणत्या प्रकारची खते उत्पादित करायची याचा निर्णय येत्या महिनाभरात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गरजाभिमुख खतांचे फायदे
- कमी खर्चात उत्पादकतावाढ
- पिकांसाठी अन्नद्रव्यांचा संतुलित वापर
- स्थानिक गरजेनुसार उत्पादन, कमी किंमत
- नत्राव्यतिरिक्त सर्व मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्यांचा एकाच वेळी वापर
-------------

फुलोत्पादन संशोधन संचालनालय एक फेब्रुवारीपासून पुण्यात


*कोट
""डॉ. रमेशकुमार... सहा महिने मी फक्त चर्चा ऐकतोय. आता बास झालं. एक फेब्रुवारीला तुम्ही तुमच्या सर्व शास्त्रज्ञांसह पुणे कृषी महाविद्यालयातून संचालनालयाचे काम सुरू करा. मला पुन्हा सांगायला लावू नका.''
- डॉ. एस. अय्यपन, महासंचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली.

संतोष डुकरे
पुणे ः सध्या नवी दिल्लीत सुरू असलेले फुलोत्पादन संशोधन संचालनालय कोणत्याही परिस्थितीत येत्या एक फेब्रुवारीपासून पुण्यात सुरू करण्याचे आदेश भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) महासंचालक डॉ. एस. अय्यपन यांनी संचालक डॉ. रमेशकुमार यांना दिले आहे. या कामी गेल्या सहा महिन्यापासून दिरंगाई सुरू असल्याबाबत तीव्र शब्दात कानउघाडणी करत आहे त्या स्थितीत पुण्यात रुजू होण्याचे फर्मान डॉ. अय्यपन यांनी संबंधित सर्व शास्त्रज्ञांना काढले आहे.

राष्ट्रीय पातळीवरील फुलोत्पादन संशोधन संचालनालय पुण्यात सुरू करण्याचा निर्णय आयसीएआर पातळीवर होऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अद्यापही हे संचालनालय पुण्यात कार्यरत होऊ शकलेले नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत पुण्यातील शंभर एकर जागा संचालनालयासाठी देण्यात येणार आहे. पुणे कृषी महाविद्यालयाची दहा हेक्‍टर आणि हडपसरमधील 30 हेक्‍टर जागा देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.

मात्र जमीन व इमारती उपलब्ध नाहीत, या कारणाखाली दिल्लीत स्थायी असलेली सध्याची यंत्रणा, संचालक व शास्त्रज्ञांनी पुण्यात रुजू होण्यास गेली सहा महिने टाळाटाळ चालविली आहे. याबाबत डॉ. अय्यपन यांनी संचालकांना सुनावले. ते म्हणाले, ""पुण्यात संचालनालय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार अनुकूल आहे. ते सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहेत. जमिनीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आहे. कोणत्याही क्षणी कृषी महाविद्यालयाची 10 हेक्‍टर जमीन उपलब्ध होईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माझे या विषयावर बोलणे झाले आहे. राज्य शासनासह सर्वजण जबाबदारी घेत असताना तुम्ही टाळाटाळ कशासाठी करता.''

कृषी महाविद्यालयाने संचलनालयासाठी सहा खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व दहा शास्त्रज्ञांना घेऊन तातडीने पुण्याला जा. कोणत्याही परिस्थितीत एक फेब्रुवारीपासून पुणे कृषी महाविद्यालयामध्ये मिळालेल्या खोल्यांमधून संचालनालयाचे कामकाज सुरू करा. जागा उपलब्ध झाल्यानंतर पुढील गोष्टी करता येतील, या शब्दात डॉ. अय्यपन यांनी संचालकांना यशदामध्ये झालेल्या आयसीएआरच्या संचालकांच्या बैठकीदरम्यान सुनावले. संचालक डॉ. रमेशकुमार यांनी पुण्यात रुजू होण्यास आणखी वेळ देण्याची मागणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो डॉ. अय्यपन यांनी फेटाळून लावला. शेवटी डॉ. रमेशकुमार यांनी एक फेब्रुवारीपासून पुण्यात रुजू होण्यास सहमती दिली.

आयसीएआरअंतर्गत देशात 14 संशोधन संचालनालये कार्यरत आहेत. यापैकी द्राक्ष, डाळिंब, लिंबूवर्गीय फळे आणि कांदा-लसूण या विषयांची चार संचालनालये महाराष्ट्रात आहेत. फुलोत्पादन संशोधन संचालनालय हे राज्यातील राष्ट्रीय पातळीवरील पाचवे संशोधन संचालनालय ठरणार आहे. फुलोत्पादनासाठी देशात 23 संशोधन केंद्रे असून, त्यांची संख्या 37 होणार आहे. महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांत सुमारे साडेसतरा हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर फुलशेती केली जाते. सुमारे तीन हजाराहून अधिक हरितगृहे फुलोत्पादनासाठी कार्यरत आहेत. पुण्यात संशोधन संचालनालय सुरू होण्याचा फायदा राज्यभरातील शेतकऱ्यांना होणार आहे.
--------

फेबुवारीत रुजू होणार 1070 कृषी सेवक

जानेवारी अखेरीस निकाल; 10 फेब्रुवारीपर्यंत नेमणुका

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी विभागाने कृषी सहायकांच्या राज्यभरातील 1070 रिक्‍त जागा भरण्यासाठी घेतलेल्या सरळसेवा परीक्षेचा निकाल येत्या 31 जानेवारीपर्यंत जाहीर होणार आहे. तब्बल 76 हजार उमेदवारांमधून गुणानुक्रमे या जागा भरण्यात येणार आहेत. निकाल लागल्यानंतर पुढील आठ-दहा दिवसात विभागीय कृषी सह संचालकांमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे.

कृषी विभागाने कृषी सहायक भरतीसाठी सलग दुसऱ्या वर्षी केंद्रीय भरती प्रक्रिया राबवून राज्यभर एकाच वेळी परीक्षा घेतली. गेल्या 23 नोव्हेंबरला ही परीक्षा झाली. राज्यातील तब्बल एक लाख 11 हजार 650 उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. प्रत्यक्षात 76 हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. गेल्या दोन महिन्यांपासून हे उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी घरी नेण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर 25 नोव्हेंबरला या परीक्षेची उत्तरतालिकाही जाहीर करण्यात आली. यामुळे उमेदवारांना या उत्तरतालिकेनुसार स्वतःचे गुण पडताळून पाहता आले. आता गुणानुक्रमे निकाल जाहीर होणार असून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना कृषी सेवेत रुजू करून घेण्यात येणार आहे.

कृषी आयुक्त उमाकांत दांगट म्हणाले, ""यापूर्वी तोंडी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे राज्य शासनाची विशेष परवानगी घेऊन कृषी सेवक भरतीसाठीच्या मुलाखतीच रद्द केल्या आहे. सर्व भरती 100 टक्के पारदर्शक होण्यासाठी ऑनलाइन अर्ज, एकाच वेळी राज्यभर परीक्षा, उमेदवारांना प्रश्‍नपत्रिका, उत्तरपत्रिका देणे व उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यासारख्या सर्व बाबींचा अवलंब करण्यात आला आहे. येत्या चार-सहा दिवसात निकाल जाहीर होईल.''

*कोट
""दोन महिन्यांपूर्वी 200 गुणांची लेखी परीक्षा झाली. उत्तरतालिकेनुसार मला 125 गुण पडत आहेत. सर्व प्रक्रिया पारदर्शक आहे त्याबाबत तक्रार नाही. मुलाखत रद्द झाली हे खूप चांगले झाले. पण निकाल लवकर लागायला हवा.''
- बंकट राजाभाऊ सोळुंके, कृषी पदविकाधारक, लिंबारुई, बीड.

*चौकट
- 179 अधिकाऱ्यांची छाननी सुरू
तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पदांची उमेदवार निवड प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगामार्फत नुकतीच राबविण्यात आली. आयोगाने यातून 179 उमेदवारांची शिफारस कृषी विभागाला केली आहे. यामध्ये वर्ग दोन च्या पदांसाठी 59 तर कृषी अधिकारी पदासाठी 120 जणांची शिफारस करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम सध्या मंत्रालय पातळीवर सुरू आहे. येत्या महिनाभरात हे सर्व उमेदवार कृषी विभागाच्या सेवेत दाखल होण्याचा अंदाज आहे.
-------(समाप्त)------

भात उत्पादनासाठी महाराष्ट्राला कृषी कर्मण पुरस्कार

पुणे (प्रतिनिधी) ः भात उत्पादनात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्राच्या कृषी विभागाला केंद्रीय कृषी विभागामार्फत देण्यात येणारा 2012-13 चा कृषी कर्मण पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याने 2006-07 पासून 2012-13 पर्यंत भाताची उत्पादकता 17 टक्‍क्‍यांनी वाढविल्याबद्दल हा गौरव करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली असून पुरस्काराबद्दल कृषी विभागाचे अभिनंदन केले आहे.

येत्या 10 फेब्रुवारीला विज्ञान भवनात (नवी दिल्ली) होणाऱ्या "वर्ल्ड कॉग्रेस ऑन ऍग्रो फॉरेस्ट्री 2014' मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्याच्या कृषीमंत्र्यांसोबतच कृषी सचिव व कृषी आयुक्तांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

राज्यात 15 लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेतले जाते. भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी 2006-07 पासून 2012-13 पर्यंत भात उत्पादक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम राबविलेल्या जिल्ह्यांत उत्पादकतेत 27 टक्के तर इतर जिल्ह्यांमध्ये उत्पादकतेत 13 टक्के वाढ झाली. सरासरी भात उत्पादकता 17 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. यासाठी चारसूत्री पद्धत, बियाणे बदल आदी नवीन तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावीपणे प्रसार व अंमलबजावणी करण्यात आली. या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्राची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.

राज्यातील भात उत्पादन
वर्ष --- क्षेत्र (हेक्‍टर) --- उत्पादन (टन) --- उत्पादकता (किलो प्रति हेक्‍टर)
2006-07 --- 1529300 --- 2569700 --- 1680
2007-08 --- 1576700 --- 3011500 --- 1910
2008-09 --- 1521500 --- 2287500 --- 1503
2009-10 --- 1470600 --- 2185800 --- 1486
2010-11 --- 1486200 --- 2625100 --- 1766
2011-12 --- 1516400 --- 2784600 --- 1836
2012-13 --- 1520200 --- 2982200 --- 1962
-------(समाप्त)-----

Wednesday, January 22, 2014

VSI Trainning


जळगावमध्ये फेब्रुवारीत "ऍग्रोवन सरपंच महापरिषद'

सरपंच निवड प्रक्रिया सुरू; उपक्रमशील तरुणांना संधी

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्राच्या कृषिकेंद्रित ग्रामविकासाची गंगा ठरलेली "सकाळ-ऍग्रोवन'ची सरपंच महापरिषद येत्या 15 व 16 फेब्रुवारीला जळगावमध्ये आयोजित करण्यात आली आहे. औरंगाबाद, नाशिक व कोल्हापूरनंतर ही चौथी महापरिषद राज्याची सुवर्णनगरी असलेल्या जळगावमध्ये होणार आहे. "सकाळ'च्या राज्यभरातील बातमीदारांमार्फत सरपंच निवडीची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे.

शेतीची आणि गावाची प्रगती व्हावी यासाठी गावाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांना सर्वांगीण माहिती देऊन सक्षम करणे ही सरपंच महापरिषदेचे प्रेरणा आहे. यासाठी 2011पासून सरपंचांना कृषिकेंद्रित ग्रामविकासाची दिशा व बळ देण्यासाठी सरपंच महापरिषदेचे आयोजन करण्यात येते. गावाचा कृषिकेंद्रित विकास कसा करावा, याचे धडे परिषदेत सहभागी सरपंचांना देण्यात येतात. सरपंच व गावांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगे काढण्यात आतापर्यंत झालेल्या तीनही महापरिषदा यशस्वी ठरल्या आहेत. सुमारे साडेतीन हजारांहून अधिक सरपंचांनी महापरिषदेत सहभागी होऊन कृषिकेंद्रित ग्रामविकासाचा ध्यास घेतला आहे. यंदा एक हजार नवीन सरपंचांना ग्रामविकासाचे भगीरथ होऊन विकासगंगा आपल्या गावी नेण्याची संधी मिळणार आहे. आतापर्यंत झालेल्या सरपंच महापरिषदांमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रोहयो मंत्री नितीन राऊत, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्यासह अनेक कृषी व ग्रामविकास तज्ज्ञांनी ग्रामविकासाची शिदोरी सरपंचांना दिली आहे. यातून प्रेरणा घेतलेल्या सरपंचांमार्फत कृषिकेंद्रित ग्रामविकासाच्या अनेक यशोगाथा सध्या राज्यभर घडत आहेत.

...अशी होणार सरपंच निवड
"सकाळ'च्या राज्यभरातील बातमीदारांमार्फत सरपंच महापरिषदेसाठीची सरपंच निवड प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. तरुण, सुशिक्षित व उपक्रमशील सरपंचांचीच निवड करण्यात येणार आहे. यापूर्वी सहभागी झालेल्या सरपंचांना यंदाच्या महापरिषदेत पुन्हा सहभागी होता येणार नाही. फक्त निमंत्रित सरपंचांनाच यात सहभागी होता येणार असून, त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था "सकाळ माध्यम समूहा'मार्फत करण्यात येणार आहे.
------------------



राज्यभर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

शुक्रवारपासून ढगाळ हवामान निवळणार; थंडी वाढण्याची शक्‍यता

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता. 24) सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. तर सध्या राज्यभर असलेले ढगाळ हवामान शुक्रवारपासून निवळणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांपासून गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पट्ट्याची तीव्रता कमी होण्यास बुधवारी (ता. 23) सुरवात झाली असून, शुक्रवारी तो पूर्णपणे ओसरण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वत्र बाष्पयुक्त ढगाळ हवामानात वाढ झालेली आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्रही शुक्रवारपर्यंत नाहीसे होण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यावरील ढगांचे सावट दूर होऊन हवामान कोरडे होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, ढगाळ हवामानामुळे राज्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीहून मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकणात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीहून तब्बल नऊ ते दहा अंशांनी उंचावला. किमान तापमान वाढीने बहुतेक ठिकाणी थंडी गायब झाली आहे. बहुतेक ठिकाणी वाढलेली सापेक्ष आर्द्रताही कायम होती. ढगाळ हवामान कमी झाल्यानंतर शुक्रवारनंतर पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी विदर्भासह मध्य भारतात किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

बुधवारी (ता.22) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांतील प्रमुख ठिकाणचे किमान तापमान (अंश सेल्सिअस) ः मुंबई 21.2, अलिबाग 20.5, रत्नागिरी 20.4, डहाणू 20.7, भिरा 22.5, पुणे 14.9, नगर 13.3, जळगाव 15.6, कोल्हापूर 19, महाबळेश्‍वर 14.6, मालेगाव 14.8, नाशिक 13, सांगली 19.6, सोलापूर 18.4, उस्मानाबाद 15.3, औरंगाबाद 15.1, परभणी 17.7, नांदेड 16.6, बीड 18.8, अकोला 19, अमरावती 15.2, बुलडाणा 17.4, ब्रह्मपुरी 17.3, चंद्रपूर 19, गोंदिया 15.4, नागपूर 17.2, वाशीम 19.4, वर्धा 16.2, यवतमाळ 16.8.
--------

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर पावसाचे सावट

पुणे (प्रतिनिधी) ः गुरुवारी (ता.23) सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्याच्या उर्वरित भागांत हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. मंगळवारी सकाळपर्यंत कोकण व उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला.

गेल्या दोन- तीन दिवसांत राज्यातील ढगाळ हवामानात वाढ झाली आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी व नाशिक, जळगाव परिसरात हवामान जास्त ढगाळ आहे. यामुळे किमान तापमान व आर्द्रतेतही मोठी वाढ झाली आहे. कोकणात बहुतेक ठिकाणी आर्द्रता 90 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. मुंबई, नाशिकमध्ये आर्द्रतेने 95 टक्‍क्‍यांची पातळी ओलांडली आहे. बाष्पयुक्त ढगाळ हवामान व सुमारे 100 टक्‍क्‍यांच्या आसपासची आर्द्रता ही हवामानस्थिती पाऊस पडण्यास अनुकूल मानली जाते. सध्या अशी स्थिती कोकण व मध्य महाराष्ट्रात जास्त आहे.

मंगळवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

मंगळवारी (ता.21) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई 21.1, अलिबाग 22, रत्नागिरी 21.8, पणजी 21, डहाणू 20.2, भिरा 24, पुणे 18, नगर 18.2, जळगाव 17.2, कोल्हापूर 18.4, महाबळेश्‍वर 15.2, मालेगाव 15.6, नाशिक 17.4, सांगली 18.6, सातारा 19, सोलापूर 18.6, उस्मानाबाद 15.4, औरंगाबाद 18.5, परभणी 16, नांदेड 16.5, बीड 18.6, अकोला 18.6, अमरावती 14, बुलडाणा 18.8, ब्रह्मपुरी 17.2, चंद्रपूर 18.8, गोंदिया 15, नागपूर 16.1, वाशीम 19.8, वर्धा 12, यवतमाळ 16.

राज्यातील प्रमुख ठिकाणची सापेक्ष आर्द्रता व कंसात सरासरीच्या तुलनेत आर्द्रतेत झालेली वाढ टक्‍क्‍यांमध्ये ः अलिबाग 90 (16), भिरा 90 (12), डहाणू 90 (24), पणजी 90 (11), हर्णे 75 (15), मुंबई 96 (19), रत्नागिरी 85 (22), नगर 75 (14), जळगाव 70 (6), जेऊर 70 (5), कोल्हापूर 70, महाबळेश्‍वर 75 (21), मालेगाव 70 (7), नाशिक 90 (27), पुणे 85 (4), सांगली, सातारा प्रत्येकी 75 (4), औरंगाबाद 75 (16), नांदेड 80 (15), परभणी 80 (21), अमरावती 80 (29), बुलडाणा 75 (20), चंद्रपूर 80 (10), नागपूर 85 (20), वर्धा 70 (15), यवतमाळ 70 (19)
----------------

वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान "कृषिरत्न'

- राज्य कृषी विभागाचे पुरस्कार कृषिमंत्र्यांकडून जाहीर
- अनिल पाटील, गावडे, मराळे, घोलप आदी "कृषिभूषण'
- "सकाळ'चे बाळ बोठे, "ऍग्रोवन'चे जितेंद्र पाटील "शेतीमित्र'

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनामार्फत देण्यात येणारा 2012 साठीचा "डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न' पुरस्कार अमरावतीतील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानला जाहीर झाला आहे. "ऍग्रोवन'चे जळगावमधील बातमीदार जितेंद्र पाटील व "सकाळ'चे नगरचे निवासी संपादक ऍड. बाळ बोठे यांना "वसंतराव नाईक शेतीमित्र' पुरस्कार जाहीर झाले आहेत. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध गटांतील 80 पुरस्कारांची घोषणा मंगळवारी (ता. 21) पुण्यात केली.

राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत येत्या 28 जानेवारीला सकाळी 11 वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात (दापोली, रत्नागिरी) सर्व पुरस्कारविजेत्यांचा सपत्नीक सत्कार करून पुरस्कार वितरण होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषी व संलग्न विभागांचे आणि कोकणातील सर्व मंत्री पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कारांचे नाव, स्वरूप व विजेते शेतकरी पुढीलप्रमाणे ः

1) "डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न' पुरस्कार ः 75 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसद, यवतमाळ

2) "वसंतराव नाईक कृषिभूषण' पुरस्कार ः 50 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
अनिल नारायण पाटील (सांगे, वाडा, ठाणे), मधुसूदन केशव गावडे (वेतोरे, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग), बाळासाहेब शंकर मराळे (शहा, सिन्नर, नाशिक), सुदाम किसन करंके (तऱ्हाडी, शिरपूर, धुळे), हिरालाल छन्नू पाटील (कुरवेल, चोपडा, जळगाव), अरुण गोविंद मोरे (शिरोली खुर्द, जुन्नर, पुणे), मच्छिंद्र भागवत घोलप (हनुमंतगाव, राहता, नगर), विष्णू रामचंद्र जरे (बहिरवाडी, जेऊर, नगर), हंबीरराव जगन्नाथ भोसले (खोडशी, कराड, सातारा), सूर्याजी गणपत पाटील (परिते, करवीर, कोल्हापूर), जगन्नाथ गंगाराम तायडे (औरंगपूर, औरंगाबाद), सूर्यकांतराव माणिकराव देशमुख (झरी, परभणी), रवींद्र रामकृष्ण मुळे (खानजमानगर, अचलपूर, अमरावती), सुधाकर रामचंद्र बानाईत (मधापुरी, मूर्तिजापूर, अकोला), रामभाऊ इसनजी कडव (इंदूरखा, कोथूर्णा, भंडारा), देवाजी मारोती बनकर (सडकअर्जुनी, गोंदिया).

3) "जिजामाता कृषिभूषण' पुरस्कार ः 50 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
सौ. रंजना रामचंद्र कदम (इळये, देवगड, सिंधुदुर्ग), सौ. सुनंदा प्रभाकर पाटील (मितावली, चोपडा, जळगाव), सौ. शकुंतला जनार्दन संकपाळ (झरेगाव, बार्शी, सोलापूर), सौ. साईश्रिया अशोक घाटे (सांगली), सौ. सरस्वती शिवाजी दाबेकर (कालिंकानगर, नेकनूर, बीड), सौ. अनुपमा भारत कुलकर्णी (नळदुर्गा, तुळजापूर, उस्मानाबाद), श्रीमती नीता राजेंद्र सावदे (कणी मिर्जापूर, नांदगाव खंडेश्‍वर, अमरावती), सौ. वंदना पंडितराव सवाई (उत्तमसरा, भातकुली, अमरावती), सौ. मालतीबाई मधुकर कुथे (गांगलवाडी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर).

4) "कृषिभूषण' (सेंद्रिय शेती गट) ः 50 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
राजेंद्र श्रीकृष्ण भट (बेडशिळ, अंबरनाथ, ठाणे), यशवंत वंजी पवार (वरसूत, सिंदखेडा, धुळे), बापूसाहेब निवृत्ती गाडे (भैरवनाथनगर, श्रीरामपूर, नगर), सुदाम अर्जुन सरोदे (डोऱ्हाळे, राहता, नगर), संभाजी धोंडीराम बोराडे (शेगाव, जत, सांगली), मंगेश धर्मराज थोरात (पांगरी, धारुर, बीड), माधवराव बापूराव अंधारे (गणेशपूर, जाफराबाद, जालना), बालासाहेब रघुनाथराव पांढरे (चिंचोलीराव, गंगापूर, लातूर), मधुकरराव राजाराम सरप (कानेरी सरप, बार्शी टाकळी, अकोला), डॉ. नारायण चिंधूजी लांबट (चिखलापार, भिवापूर, नागपूर).

5) कृषिभूषण (सेंद्रिय शेती संस्था गट) ः 50 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रॅस्ट, दिंडोरी, जि. नाशिक (श्रीराम खंडेराव मोरे).

6) "वसंतराव नाईक शेतीमित्र' पुरस्कार ः 30 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
ऍड. बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील (नगर), जितेंद्र रधुनाथ पाटील (ममुराबाद, जळगाव), राहुल मनोहर खैरनार (मालेगाव, नाशिक), रावसाहेब बाळू पुजारी (तमदलगे, शिरोळ, कोल्हापूर), अतुल अविनाश कुलकर्णी (विडा, केज, बीड).

7) "उद्यानपंडित' पुरस्कार ः 15 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
दीनानाथ विनायक धारगळकर (आडेली, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग), विनायक रघुनाथ बारी (कंकाडी, डहाणू, ठाणे), रवींद्र काशिनाथ चव्हाण (म्हसदी, साक्री, धुळे), मारुती संपत डाके (दत्तवाडी, श्रीगोंदा, नगर), सौ. अंजली जयकुमार देसाई (पेठ वडगाव, हातकणंगले, कोल्हापूर), अभिमन्यू शंकरराव कडबाने (बोरीसावरगाव, केज, बीड), दिलीप माधवराव पावडे (पावडेवाडी, नांदेड), विश्‍वासराव जयराम बोरकर (नंधाना, रिसोड, वाशिम), सतीश नथ्थूजी खुबाळकर (खुबाळा, सावनेर, नागपूर).

8) "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार (सर्वसाधारण गट) ः 11 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
विजय जगन्नाथ माळी (शिरगाव, पालघर, ठाणे), वसंत केरू गायकवाड (आपटी, दापोली, रत्नागिरी), सुधाकर प्रकाश वाघ (खलाणे, सिंदखेडा, धुळे), प्रकाश खुशाल पाटील (म्हसावद, शहादा, नंदुरबार), साहेबराव नामदेव मोहिते (काटी, इंदापूर, पुणे), सचिन अरुणराव जगताप (बनपिंपरी, श्रीगोंदा, नगर), अविनाश अरविंद जामदार (कोकणगाव, श्रीगोंदा, नगर), रवी अशोक पाटील (अकेलखोप, पलुस, सांगली), आनंदराव गणपत शिंदे (बोरगाव, सातारा), बाबासाहेब रंगनाथ खांडेभराड (माहेर भायगाव, अंबड, औरंगाबाद), तात्यासाहेब तुळशीराम गोरे (अंतरगाव, भूम, उस्मानाबाद), संग्राम माणिकराव डोंगरे (साकोळ, शिरूर अनंतपाळ, लातूर), उमेश मोहनराव ठोकळ (दहीगाव गावंडे, अकोला), सौ. चंद्रकलाबाई प्रकाश सुरुशे (शेलगाव आटोळ, चिखली, बुलडाणा), अशोक बालाराम गायधने (शिवणी, आमगाव, गोंदिया), दिनेश नामदेवराव शेंडे (मेंढा, सिंदेवाही, चंद्रपूर), संजय विठ्ठलराव अवचट (वाहितपूर, सेलू, वर्धा), सीताराम व्येंका मडावी (जिजगाव, भामरागड, गडचिरोली).

9) "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार (आदिवासी गट) ः 11 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह ः
श्रीमती कासाबाई दत्तू शिंद (मढवाडी, मुरबाड, ठाणे), संजय रतन ठाकरे (भावनगर, सटाणा, नाशिक), रमण खापऱ्या गावित (रायपूर, नवापूर, नंदुरबार), दिगंबर निंबाजी गवारी (असाणे, आंबेगाव, पुणे), किसन भुऱ्या कास्देकर (बारू, धारणी, अमरावती), बळवंत सदाशिव डडमल (मांडवा, हिंगणा, नागपूर).

10) राज्यस्तरीय खरीप भातपीक स्पर्धा विजेते शेतकरी (प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह.)
प्रथम ः हंबीरराव जगन्नाथ भोसले, हेक्‍टरी 112 क्विंटल 19 किलो उत्पादन (खोडशी, कराड, सातारा),
द्वितीय ः नागेश कृष्णा बामणे, हेक्‍टरी 92 क्विंटल 25 किलो उत्पादन (सरोळी, गडहिंग्लज, कोल्हापूर),
तृतीय ः एकनाथ गंगाराम शिंदे, हेक्‍टरी 89 क्विंटल 52 किलो उत्पादन (बेलावडे, जावली, सातारा).
---------

Monday, January 20, 2014

अखर्चित निधी परत करा

देशातील कृषी संचालनालयांना डॉ. अय्यपन यांचा आदेश

पुणे (प्रतिनिधी) ः देशातील कृषीविषयक संचालनालये व संशोधन संस्थांना चालू आर्थिक वर्षात देण्यात आलेल्या निधीपैकी तब्बल 200 कोटी रुपये अखर्चित राहणार आहेत. सर्व संस्थांच्या संचालकांनी हा संभाव्य अखर्चित निधी तातडीने परत करावा, असे आदेश भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) महासंचालक डॉ. एस. अय्यपन यांनी दिले आहेत.

आयसीएआरच्या सर्व संचालकांची बैठक सोमवारी (ता.20) यशदाच्या सामवेद सभागृहात झाली. या वेळी डॉ. अय्यपन यांनी अखर्चित निधी परत करण्यास संशोधन संचालनालये टाळाटाळ करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पुढच्या वर्षासाठी एप्रिलमध्ये मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे अखर्चित राहणारा निधी बळकावून न ठेवता तातडीने आयसीएआरला परत करावा. यामुळे ज्या संस्थांना निधीची गरज आहे, त्यांची कामे वेळेत होतील व नियोजनानुसार उपलब्ध निधीचा वापर मार्चअखेर पूर्ण करता येईल, असे डॉ. अय्यपन यांनी या वेळी स्पष्ट केले.

कृषी संशोधनासाठी तेराव्या पंचवार्षिक योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. संशोधन संस्थांनी अनेक प्रकल्पांची आखणी केली आहे. मात्र, ते अद्याप सादर करण्यात आलेले नाहीत. प्रकल्प सादर करण्यात उशीर झाला तर तो निधीअभावी रेंगाळू शकतो. हे सर्व प्रस्ताव 13 व्या पंचवार्षिकमध्ये समाविष्ट केल्यास एप्रिलपासून अधिक चांगल्या प्रकारे निधी मिळू शकतो. यामुळे संचालकांनी कोणत्याही परिस्थितीत सर्व प्रकल्प प्रस्ताव येत्या 10 दिवसांत आयसीएआरकडे जमा करावेत, असे आवाहन डॉ. अय्यपन यांनी या वेळी केले.

आयसीएआरचे सचिव अरविंद कौशल, आर्थिक सल्लागार पी. के. पुजारी, उपमहासंचालक (समन्वय) रवींद्र कुमार, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. गुरबचन सिंग, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. बी. सिंग व्यासपीठावर उपस्थित होते. आयसीएआरमार्फत सुरू असलेले विविध उपक्रम व त्यातील संचालकांचे योगदान याबाबत या परिषदेत सविस्तर चर्चा झाली. चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संचालकांना देण्यात आल्या.

- रेकॉर्ड नीट ठेवा
संशोधन प्रकल्पांचे रेकॉर्ड (माहिती, नोंदी इ.) व्यवस्थित ठेवले जात नसल्याबद्दलही परिषदेत नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांनी त्याबाबतची काहीही माहिती उपलब्ध नसेल. अधिकारी बदलले तरी ही माहिती उपलब्ध होत नाही. संचालक म्हणून तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत. या अधिकारांचा वापर करा. रिपोर्ट चांगल्या प्रकारे लिहा. प्रसंगी कुणाशी वाईट होण्याची वेळ आली तरी हरकत नाही; पण सर्व प्रकल्पांचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवा, असे डॉ. अय्यपन यांनी सुनावले.

*चौकट
- संशोधकांसाठी एक कोटी रुपयांचे पारितोषिक
प्रयोगशाळा व शेतकरी यातील दरी भरून काढण्यासाठी व कृषी शास्त्रज्ञांना शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविणारे संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी येत्या आर्थिक वर्षापासून आयसीएआरच्या संशोधकांसाठी सिजेंटा फाउंडेशनच्या पुढाकाराने एक कोटी रुपयांचा गौरव पुरस्कार (आयसीएआर-सिजेंटा ऍग्रिकल्चर प्राईज) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दहा वर्षे सिजेंटा फाउंडेशनमार्फत पुरस्काराची रक्कम आयसीएआरकडे देण्यात येणार असल्याचे सिजेंटाचे कार्यकारी संचालक डॉ. भास्कर रेड्डी यांनी सांगितले.



बारामती केव्हीके विशेष


बारामती आयसीएआर कुलगुरु परिषद 2014




विदर्भात हलक्‍या पावसाचा अंदाज


Wednesday, January 15, 2014

विदर्भात पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः ढगाळ हवामान व हवेत वाढलेली आर्द्रता यामुळे शुक्रवार (ता. 17)पर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळलेले, तर आर्द्रता, कमाल व किमान तापमान सरासरीहून अधिक राहण्याची शक्‍यता आहे.

बुधवारी (ता. 15) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत नाशिक येथे सर्वांत कमी 11.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमान सरासरीहून किंचित घटलेले होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीहून अधिक तर राज्याच्या उर्वरित भागात ते सरासरीच्या आसपास होते.

उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुके आले असून, जम्मू-काश्‍मीर व मध्य प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपर्यंत या दोन्ही राज्यांबरोबरच केरळ व तमिळनाडूमध्येही काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य भारतातील ढगाळ हवामानातही वाढ झाली आहे. यामुळे शुक्रवारी मध्य प्रदेशसोबतच विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे.

बुधवारी (ता. 15) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील किमान तापमान (अंश सेल्सिअस) ः मुंबई 17, अलिबाग 18.2, रत्नागिरी 17.8, पणजी 20.1, डहाणू 19.3, भिरा 22.1, पुणे 13.5, नगर 13.7, जळगाव 17.3, कोल्हापूर 18.2, महाबळेश्‍वर 14.5, मालेगाव 15, नाशिक 11.2, सांगली 15.5, सातारा 13.8, सोलापूर 17.3, उस्मानाबाद 14.2, औरंगाबाद 16.2, परभणी 15.4, नांदेड 15.5, बीड 16.4, अकोला 17, अमरावती 13.2, बुलडाणा 17.2, ब्रह्मपुरी 16.8, चंद्रपूर 18.6, गोंदिया 14, नागपूर 15.3, वाशीम 15.8, वर्धा 15.4, यवतमाळ 15.

Tuesday, January 14, 2014

राज्यात ढगाळ हवामान

आर्द्रता, किमान तापमानात वाढ

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात किमान तापमानाचा पारा बऱ्यापैकी घसरलेला असतानाच मंगळवारी (ता. 14) सकाळी आठपर्यंतच्या चोवीस तासांत ढगाळ हवामानात वाढ झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमान व आर्द्रतेत भरीव वाढ झाली. घसरलेले कमाल तापमानही सरासरीच्या पातळीवर आले. पुण्यात सर्वाधिक 100 टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली. अमरावती येथे सर्वांत कमी 10.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.

राज्यातील प्रमुख ठिकाणी मंगळवारी (ता. 14) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासांतील किमान तापमान (कंसात वाढ किंवा घट, अंश सेल्सिअस) ः अलिबाग 20 (3), भिरा 23 (8), डहाणू 17, हर्णे 20 (-1), मुंबई 19 (3), रत्नागिरी 18 (-1), नगर 14 (2), जळगाव 15 (3), जेऊर 12, कोल्हापूर 17 (2), महाबळेश्‍वर 15 (2), मालेगाव 17 (6), नाशिक 14 (4), पुणे 16 (5), सांगली 17 (4), सातारा 15, सोलापूर 20 (4), औरंगाबाद 17 (6), नांदेड 15 (2), उस्मानाबाद 14, परभणी 16 (2), अकोला 18 (4), अमरावती 10.6 (-4), ब्रह्मपुरी 17 (4), बुलडाणा 18 (3), चंद्रपूर 17 (2), नागपूर 16 (3), वर्धा 16 (2), यवतमाळ 13 (-2).

आर्द्रता (टक्के, व कंसात सरासरीच्या तुलनेतील वाढ किंवा घट) ः अलिबाग 90 (16), भिरा 95 (14), डहाणू 90 (23), हर्णे 80 (21), मुंबई 91 (22), रत्नागिरी 90 (23), नगर 70 (6), जळगाव 70 (1), जेऊर 70 (3), कोल्हापूर 80 (6), महाबळेश्‍वर 70 (8), मालेगाव 90 (23), नाशिक 90 (22), पुणे 100, सांगली 70 (-4), सातारा 95 (21), सोलापूर 70 (4), औरंगाबाद 80 (18), उस्मानाबाद 90, परभणी 73 (11), अकोला 75 (11), अमरावती 85 (28), ब्रह्मपुरी 80 (4), बुलडाणा 70 (9), चंद्रपूर 90 (17), नागपूर 80 (9), वर्धा 50 (-9), यवतमाळ 65 (10).

कृषी विद्यापीठांच्या कारभारात "इम्पॅक्‍ट ऍनालेसीस'चा अभाव

स्वतंत्र यंत्रणेची गरज

संतोष डुकरे
पुणे ः गेल्या अनेक दशकांपासून कृषी विद्यापीठांनी कृषी शिक्षण, संशोधन व विस्तारात केलेल्या कामाचा शेती व शेतकऱ्यांवर झालेल्या परिणामांचे मुल्यांकन एकाही विद्यापीठाने वा संस्थेने केला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कृषी विभागाच्या कामाचे मूल्यांकन होते मात्र विद्यापीठांच्या नाही, असा सूर नेहमी आवळला जातो. केवळ ढोबळ अंदाज, संबंधित लोकांचे स्वारस्य आदींच्या आधारे संशोधन व विस्तार उपक्रमांची दिशा ठरत असल्याचे चित्र आहे.

चारही विद्यापीठांच्या संशोधन व विस्तार विभागांत याबाबत यंत्रणा नसल्याचीच माहिती समोर आली आहे. विद्यापीठाने काय केले याची माहिती आहे, मात्र या कामाचा परिणाम काय झाला याबाबत काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. "आयसीएआर'कडून किंवा राज्य शासनाकडून अद्याप याबाबत कोणताही प्रकल्प सुरू करण्यात आलेला नाही, त्यामुळे आत्तापर्यंत शक्‍य झालेले नाही असाही दावा काही विभागप्रमुखांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला.

- विस्तार विभाग झाले सुस्त
कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, संशोधनाचा प्रसार करण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये स्वतंत्रपणे कृषी विस्तार विभाग कार्यरत आहे. शिक्षणाबरोबरच तंत्रज्ञानाचा प्रसार हे या विभागाचे अधिकृतरीत्या प्रमुख काम आहे. यासाठी विविध मेळावे, कार्यशाळा, प्रसिद्धिपत्रके, पुस्तके, चर्चासत्रे आदींचे आयोजन करण्यात येते. याचप्रमाणे या कामाचे मूल्यमापन करण्याचीही जबाबदारी विस्तार विभागांचीच आहे, मात्र ती सोईस्कररीत्या विसरण्यात आली आहे. विस्तार विभागांनीच याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा कृषी विस्तार तज्ज्ञांनी व्यक्त केली.

- विद्यार्थ्यांचे शिक्षणानंतर काय ?
कृषी पदवीधर शेती करत नाहीत, असा आरोप अनेकदा केला जातो. विद्यापीठांतही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतात. मात्र याबाबत अद्याप चारही विद्यापीठांमध्ये कोठेही पाहणी, अभ्यास झालेला नाही. वस्तुतः विद्यार्थांच्या कर्तृत्वावरही शिक्षण संस्थेचे यश मोजले जाते. मात्र नेमक्‍या याच बाबतीत कृषीत आनंदी आनंद आहे. अगदी शंभरी ओलांडलेल्या पुणे कृषी महाविद्यालयातही या पद्धतीने माजी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही, हे विशेष! कृषी महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावरून माजी विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती संकलित करुण विश्‍लेषण केल्यास याबाबतची वस्तुस्थिती पुढे येऊ शकते.

*चौकट
- तर विद्यापीठांची उपयुक्तता वाढेल
""कृषी विद्यापीठांच्या कामाचे, संशोधनाचे अद्याप मुल्यांकन झालेले नाही. ते करण्याचे गरज आहे. त्यामुळे विद्यापीठांची उपयुक्तता आणखी वाढण्यास मोठी मदत होईल. हे काम खूप मोठे आहे. त्यास खास यंत्रणा लागेल. खासगी कंपन्या, विक्रेते, विस्तार यंत्रणा यांच्या मदतीने सर्वेक्षण करावे लागेल. शिक्षण, संशोधन, विस्तार या सर्वांचीच घटकनिहाय मुल्यांकनाची गरज आहे.''
- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ.

*चौकट
- मूल्यमापन होणे अत्यावश्‍यक
""विद्यापीठांमार्फत केल्या जाणाऱ्या कामाचे टप्प्या टप्प्याने मूल्यमापन होणे अत्यावश्‍यक आहे. अनेकदा संबंधित शास्त्रज्ञांना याची माहिती असते मात्र ती व्यक्तिगत पातळीवर राहते. अकोल्यात इम्पॅक्‍ट ऍनालेसीस करण्याचा प्रयत्न झाला होता. विद्यापीठ पातळीवर यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे.''
- डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

*चौकट
- काम "युजर फ्रेंडली' पाहिजे
""ठिबकच्या नळ्या गुंडाळण्याचे मशिन, उसासाठी आंतरमशागतीची यंत्रे ही कुठल्या विद्यापीठाने किंवा कंपन्यांनी काढलेली नाहीत. गावोगावच्या शेतकऱ्यांनी, लोहारांनी विकसित केलेली ही यंत्रे अत्यंत लोकप्रिय झाली. याच पद्धतीने विद्यापीठाचे काम वापरकर्त्याच्या सोईचे (युजर फ्रेंडली) पाहिजे. शेतकऱ्यांची त्या संशोधनाशी, तंत्रज्ञानाशी मैत्रीच झाली पाहिजे. यासाठी विद्यापीठांनी फक्त तंत्रज्ञान, संशोधने जाहीर करण्यावर न थांबता त्याचे वेळोवेळी मूल्यमापन करुण सुधारणा केल्या पाहिजेत.''
- सोपान कांचन, अध्यक्ष, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन हॉर्टीकल्चर

इम्पॅक्‍ट ऍनालेसीस नसल्याचे दुष्पपरिणाम
- कामाचे यश, अपयश गुलदस्त्यातच
- विद्यापीठ व शेतकऱ्यांत दुरावा, दरी
- कालबाह्य, अपयशी उपक्रम वर्षानुवर्षे सुरू
- शेतकरी उपयोगी संशोधन, तंत्रज्ञानाचा वेग कमी
- धोरणे ठरविण्यासाठी वस्तुनिष्ठ माहितीचा अभाव
- धोरण, उपक्रम गरजांऐवजी व्यक्तीकेंद्रीत होण्याचा धोका
-------------

Sunday, January 5, 2014

"ऍग्रोवन'चे आनंद गाडे इस्राईलला रवाना

पुणे (प्रतिनिधी) ः इस्राईलच्या नवी दिल्लीतील दूतावासामार्फत आयोजित भारतीय पत्रकारांच्या इस्राईल कृषी अभ्यास दौऱ्याअंतर्गत "ऍग्रोवन'चे वृत्तसंपादक आनंद गाडे नुकतेच इस्राईलला रवाना झाले. श्री. गाडे यांच्यासह देशातील सहा पत्रकारांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. भारत व इस्राईलमध्ये कृषी तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीस चालना देणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.

पत्रकारांचे हे शिष्टमंडळ पाच ते 10 जानेवारी या कालावधीत इस्राईलमधील कृषी व व्यापारविषयक संस्था, शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन संस्था, विविध प्रकल्प, वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ, शेतकरी यांना भेटी देणार आहेत. यामध्ये प्रमुख्याने दुग्ध प्रकल्प, पाणी पुनर्वापर प्रकल्प, शेतमाल प्रक्रिया संस्था, पॅकेजिंग प्रकल्प, सूक्ष्म सिंचन कंपन्या, वाळवंटी प्रदेश संशोधन संस्था, चारा व्यवस्थापन, खजूर उत्पादन, मत्स्य उत्पादन प्रकल्प आदींचा समावेश आहे.


कृषी शिक्षणात लाखोंची भरारी

लाखो तरुण घेताहेत कृषी शिक्षण; दहा वर्षांत विद्यार्थिसंख्येत पाचपटीने वाढ

* चौकट
- कृषी पदवीधर कसताहेत शेती
कृषी पदवीधर प्रत्यक्ष शेती कसत नाहीत, असा आरोप अनेकदा केला जातो. दशकभरापूर्वी त्यात तथ्यही होते. मात्र आता पदवीनंतर प्रत्यक्ष शेती कसण्यात व शेतीबरोबरच इतर पूरक व्यवसायांच्या मदतीने प्रगती साधण्यात कृषी पदवीधर आघाडीवर आहेत. पुणे कृषी महाविद्यालयासह राज्यभरातील महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने थेट शेती व शेतीसाठी काम करत असल्याची माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या सूत्रांनी दिली.

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने राबविलेली धोरणे, चारही कृषी विद्यापीठांचे प्रयत्न, शेती व संलग्न क्षेत्राचा विकास व व्यवस्थापन जाणकारांची वाढती मागणी यामुळे गेल्या काही वर्षांत कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या दर वर्षी सुमारे एक लाखाहून अधिक विद्यार्थी राज्यात कृषीचे शिक्षण घेत आहेत. याशिवाय परराज्यांमध्ये व परदेशात कृषी शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.

दहा वर्षांपूर्वी अवघी अडीच हजार असलेली कृषी पदवीची प्रवेशक्षमता आता 15 हजारांपर्यंत म्हणजेच तब्बल पाचपटींनी वाढली आहे. कृषीतील विविध विद्याशाखांच्या नवीन अभ्यासक्रम व विद्याशाखा सुरू झाल्या आहेत. यास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. सध्या दर वर्षी सुमारे 15 हजार कृषी पदवीधर व तेवढेच कृषी पदविकाधारक उपलब्ध होत आहेत. याशिवाय एमबीए व इतर प्रावीण्याच्या पदव्या घेऊन कृषी व संलग्न क्षेत्रात करिअर घडविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. कृषीच्या स्वतंत्र स्पर्धा परीक्षांबरोबरच राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, भरतीमध्येही कृषीचा वरचष्मा कायम आहे.

चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत कार्यरत असलेली सुमारे 185 कृषी महाविद्यालये, 238 कृषी तंत्र विद्यालये, कृषी तंत्रनिकेतन, 46 हून अधिक पदव्युत्तर पदवी शिक्षण संस्था याबरोबरच पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आदी विद्यापीठाअंतर्गत शेकडो संस्थांमार्फत कृषिविषयक विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या ठिकाणी दर वर्षी सुमारे एकूण एक लाखाहून अधिक विद्यार्थी कृषी शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत.

- परदेशगमनातही वाढ
राज्यातून परदेशात कृषी शिक्षणास जाण्यास 1950 पासून सुरवात झाली. त्यानंतर गेली सहा दशके हे प्रमाण तसे तुटपुंजेच होते. मात्र गेल्या पाच वर्षांत परदेशात कृषीचे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम व इतर कौशल्याधारित अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांत मोठी वाढ झाली आहे. यात पुणे कृषी महाविद्यालय व बारामती कृषी महाविद्यालयाच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचा हा कल लक्षात घेऊन देशात प्रथमच बारामती येथे नेदरलॅंडमधील शिक्षण संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पदवीचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमही सुरू झाले आहेत.

- आहे शिक्षण तरीही...
""शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन कृषी शिक्षणातही यायला हवा. सध्याचे अभ्यासक्रम संस्थांच्या पातळीवर पुस्तकी फेऱ्यात अडकले आहेत. "थेअरी' व "प्रॅक्‍टिस' यात फार मोठी दरी आहे. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक यासाठीही प्रशिक्षणाची वानवा आहे. ही दरी भरून काढण्यासाठी "ऍग्रोवन' व "एसआयएलसी'मार्फत विविध अभ्यासक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.''
- डॉ. अपूर्वा पालकर, संचालक, सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी), पुणे

* कोट
""राज्यात 2000 पासून कृषी शिक्षणासाठी कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयांना मान्यता देण्यास सुरवात झाली. यामुळे कृषी शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. मोठ्या प्रमाणात चांगले मनुष्यबळ उपलब्ध झाले. यंदा पदवीच्या जागांसाठी क्षमतेच्या दुपटीहून अधिक विद्यार्थी इच्छुक होते. यावरून हे महत्त्व स्पष्ट होते.''
- विजय कोलते, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे



Wednesday, January 1, 2014

15 जानेवारीपासून पुण्यात परदेशी भाजीपाला कार्यशाळा

"ऍग्रोवन', "एसआयएलसी' यांच्यामार्फत आयोजन; उत्पादन ते विक्री परिपूर्ण प्रशिक्षण

पुणे (प्रतिनिधी) ः "ऍग्रोवन' व सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी)च्या कृषीविषयक कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत येत्या 15 व 16 जानेवारी रोजी पुण्यात दोन दिवसीय परदेशी भाजीपाला उत्पादन, विक्री प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यभरातील शेतकऱ्यांच्या कौशल्यविकासाची गरज व मागणी लक्षात घेऊन "ऍग्रोवन' व "एसआयएलसी'मार्फत विविध प्रकारचे कृषीविषयक प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याअंतर्गत पहिला कृषी उद्योजकताविषयक अभ्यासक्रम सात जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यास राज्यभरातून मोठा प्रतिसाद लाभला आहे. पाठोपाठ आता राज्यभरातील शेतकऱ्यांना विकासाचे नवे दालन खुले करणाऱ्या परदेशी भाजीपाला उत्पादन व विक्री या विषयावर दुसरा अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे.

प्रशिक्षण कार्यशाळेत गेल्या काही दशकांपासून परदेशी भाजीपाल्याचे यशस्वी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते पंचतारांकित हॉटेलच्या खरेदीदारांपर्यंत अनेक तज्ज्ञ या प्रशिक्षण कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. परदेशी भाजीपाल्याचे प्रकार, उत्पादन व विक्री व्यवस्थापन, ब्रॅंडिंग, नवीन तंत्रज्ञान, निविष्ठा व्यवस्थापन यासह इत्थंभूत माहिती घेण्याची संधी प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे. प्रत्यक्ष उत्पादन व पुरवठा केंद्रांनी भेटी व यशस्वितांच्या अनुभवातून शिक्षण हे या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य आहे.

नेदरलॅंडमधील परदेशी भाजीपाला बियाणे उत्पादक कंपनीचे भारतातील तज्ज्ञ मार्गदर्शक रवींद्र सावंत, एक तपाहून अधिक काळ उत्पादन व विक्रीत सातत्यपूर्ण यश मिळवणारे तज्ज्ञ शेतकरी मुरलीधर व वनिता गुंजाळ, कृषी व पणन विभागातील वरिष्ठ अधिकारी सुनील बोरकर, मुंबईतील पंचतारांकित हॉटेलचे परदेशी भाजीपाला खरेदीदार राकेश दादर, परदेशी भाजीपाला उत्पादन, प्रक्रिया व विक्रीत स्वतःचा ब्रॅंड उभारून या उद्योगाला नवी दिशा देणारे मकरंद चुरी हे या प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय दोन्ही दिवस पुण्याजवळील यशस्वी प्रकल्पांना अभ्यासभेटी देण्याची संधीही प्रशिक्षणार्थींना उपलब्ध करण्यात येणार आहे.

- चौकट
सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुरेपूर वेळ आणि वाव मिळावा या दृष्टीने प्रशिक्षण कार्यशाळेत मर्यादित प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येणार आहे. "एसआयएलसी'च्या बाणेर येथील अद्ययावत प्रशिक्षण केंद्रात हे प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षणास प्रत्येकी सहा हजार रुपये शुल्क आहे. यात निवास, चहा, नाश्‍ता, जेवण व स्टडी मटेरियलचा समावेश आहे. किमान पाच जणांच्या गटासाठी प्रती व्यक्ती पाच हजार 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क - 8605699007, 9881371044,
वेबसाइट - www.silc.edu.in

शेतीत घुमतंय तरुणाईचं वारं !

सर्वाधिक संख्या शेतीत, उच्चशिक्षितांचा शेतीकडे वाढता कल

संतोष डुकरे
पुणे : शिक्षण संस्थांमुळे उच्चशिक्षितांच्या संख्येत झालेली वाढ, वाढलेली बेरोजगारी, शिक्षकी व इतर नोकरीच्या संधींवर आलेली मर्यादा व याच वेळी शेतीचे वाढते महत्त्व यामुळे गेल्या काही वर्षात उच्चशिक्षितांचाही शेतीकडे ओढा वाढल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे करिअर म्हणून शेतीत उतरलेली ही उच्चशिक्षित तरुणाई अत्याधुनिक ज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतीला अधिक हायटेक स्वरूप देत आहे.

शेतीतल्या अनंत अडचणींनी त्रस्त झालेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना आपल्या मुलांनी शेती करू नये, यातून बाहेर पडावे, नोकरी व्यवसाय करावा असे वाटते. त्यामुळे अनेकदा कृषी शिक्षण घेऊनही शेतीपेक्षा नोकरीत अनेक जण रमत असल्याचे चित्र गेली अनेक दशके होते. आता मात्र हळूहळू ही मानसिकता बदलत असल्याचे राज्याच्या कानाकोपऱ्यांत घडत असलेल्या यशोगाथांवरून दिसते. ऍग्रोवनमध्ये गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध यशोगाथांमध्येही तरुणाईच्या शेतीतील यशाची चढती कमान प्रकर्षाने जाणवते. विविध उपक्रम, प्रयोगांपासून ते विक्रमी उत्पादन आणि जागतिक मानकांचे पालन करण्यापर्यंत सर्व आघाड्यांवर हे तरुण उजवे ठरत आहेत.

- सर्वाधिक तरुण शेतीत
राज्यातील सुमारे 60 टक्के लोकसंख्या शेती व्यवसायात आहे. यानुसार राज्यातील 16 ते 35 वयोगटातील तरुणांमध्ये शेतकरी तरुणांची संख्या सर्वांत मोठी असण्याची शक्‍यता आहे. याबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र यापूर्वीची जनगणना व केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अहवालांच्या संदर्भाने शेतकरी कुटुंबाची पार्श्वभुमी असलेले तरुण आणि स्वतः शेती कसणारे तरुण या दोन्हींची संख्या देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

- शेतीतील तरुणाईची परिभाषा बदलतेय
गेल्या पाच वर्षांत मोबाईल दूरध्वनीच्या तंत्रज्ञानात झालेल्या प्रचंड क्रांतीचे लोण खेडोपाडी शेतशिवारात पोचले आहे. सोशल नेटवर्किंगपाठोपाठ आता व्हॉट्‌स अपसारखी ऍप्लिकेशन्स वापरण्यातही शेतकरी तरुण आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे टाइमपासपेक्षाही या तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर करण्याकडे अनेकांचा कल आहे. कीडरोगांच्या प्रादुर्भावाची एकमेकांना सूचना देण्यापासून ते अद्ययावत माहिती व तंत्रज्ञानाची आदानप्रदान करण्याचा वेग वाढला असून, त्या अनुषंगाने तरुणांची परिभाषाही बदलली आहे.

- बांधावर बोर्ड रूम, एक्‍सेलमध्ये हिशेब
काठापूर येथील प्रशांत घुले (ता. आंबेगाव, पुणे) म्हणाला, की कंपन्यांच्या बोर्ड रूममध्ये व्यवस्थापनाचे आराखडे आखून त्यांची अंमलबजावणी केली जाते. याच पद्धतीने मी व्हाइट बोर्डवर प्लॅनिंग करून टार्गेट समोर ठेवून शेतीचे काम करतो. सर्व हिशेब एक्‍सेलमध्ये ठेवतो. यामुळे रोजची प्रगती आणि संगणकाच्या एका क्‍लिकवर सर्व अर्थकारण समोर राहते, उद्दिष्ट वेळेत गाठता येते. माहितीच्या बॅकअपसाठी ऍग्रोवन, कृषी दैनंदिनी व इतर पुस्तके संग्रहित करून ठेवतो.

- कीड-रोगांना उत्तर मोबाईलवर
नारायणगाव (पुणे) येथील अनंत कानिटकर म्हणाले, की मला शेतीच्या व्यवस्थापनात मोबाईल व व्हॉट्‌स अपचा खूप उपयोग होतो. मजूरांच्या रोजच्या नोंदींपासून, कीड-रोग, पिकाची स्थिती, सल्ला ते अगदी निविष्ठांच्या बिलापर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवर काही क्षणांत शेअर होतात. त्यामुळे शेती अधिक काटेकोरपणे करणे शक्‍य होतेय.

- युवा कृषी राष्ट्र
गेल्या दोन्ही जनगणनांनुसार (2001 व 2011) लोकसंख्या व युवकांच्या (16 ते 35 वर्षे) संख्येत उत्तर प्रदेशचा देशात प्रथम क्रमांक असून, त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. देशात एकूण लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोक शेतीमध्ये कार्यरत आहेत. हेच प्रमाण महाराष्ट्रातही कायम आहे. राज्यात सर्वाधिक युवक शेती व शेतीसंलग्न व्यवसायांत कार्यरत आहेत.

Publish in Agrowon, Page 4, 1 Jan 2014