Wednesday, January 22, 2014

जळगावमध्ये फेब्रुवारीत "ऍग्रोवन सरपंच महापरिषद'

सरपंच निवड प्रक्रिया सुरू; उपक्रमशील तरुणांना संधी

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्राच्या कृषिकेंद्रित ग्रामविकासाची गंगा ठरलेली "सकाळ-ऍग्रोवन'ची सरपंच महापरिषद येत्या 15 व 16 फेब्रुवारीला जळगावमध्ये आयोजित करण्यात आली आहे. औरंगाबाद, नाशिक व कोल्हापूरनंतर ही चौथी महापरिषद राज्याची सुवर्णनगरी असलेल्या जळगावमध्ये होणार आहे. "सकाळ'च्या राज्यभरातील बातमीदारांमार्फत सरपंच निवडीची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे.

शेतीची आणि गावाची प्रगती व्हावी यासाठी गावाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांना सर्वांगीण माहिती देऊन सक्षम करणे ही सरपंच महापरिषदेचे प्रेरणा आहे. यासाठी 2011पासून सरपंचांना कृषिकेंद्रित ग्रामविकासाची दिशा व बळ देण्यासाठी सरपंच महापरिषदेचे आयोजन करण्यात येते. गावाचा कृषिकेंद्रित विकास कसा करावा, याचे धडे परिषदेत सहभागी सरपंचांना देण्यात येतात. सरपंच व गावांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगे काढण्यात आतापर्यंत झालेल्या तीनही महापरिषदा यशस्वी ठरल्या आहेत. सुमारे साडेतीन हजारांहून अधिक सरपंचांनी महापरिषदेत सहभागी होऊन कृषिकेंद्रित ग्रामविकासाचा ध्यास घेतला आहे. यंदा एक हजार नवीन सरपंचांना ग्रामविकासाचे भगीरथ होऊन विकासगंगा आपल्या गावी नेण्याची संधी मिळणार आहे. आतापर्यंत झालेल्या सरपंच महापरिषदांमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रोहयो मंत्री नितीन राऊत, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्यासह अनेक कृषी व ग्रामविकास तज्ज्ञांनी ग्रामविकासाची शिदोरी सरपंचांना दिली आहे. यातून प्रेरणा घेतलेल्या सरपंचांमार्फत कृषिकेंद्रित ग्रामविकासाच्या अनेक यशोगाथा सध्या राज्यभर घडत आहेत.

...अशी होणार सरपंच निवड
"सकाळ'च्या राज्यभरातील बातमीदारांमार्फत सरपंच महापरिषदेसाठीची सरपंच निवड प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. तरुण, सुशिक्षित व उपक्रमशील सरपंचांचीच निवड करण्यात येणार आहे. यापूर्वी सहभागी झालेल्या सरपंचांना यंदाच्या महापरिषदेत पुन्हा सहभागी होता येणार नाही. फक्त निमंत्रित सरपंचांनाच यात सहभागी होता येणार असून, त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था "सकाळ माध्यम समूहा'मार्फत करण्यात येणार आहे.
------------------



No comments:

Post a Comment