Monday, January 27, 2014

भात उत्पादनासाठी महाराष्ट्राला कृषी कर्मण पुरस्कार

पुणे (प्रतिनिधी) ः भात उत्पादनात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्राच्या कृषी विभागाला केंद्रीय कृषी विभागामार्फत देण्यात येणारा 2012-13 चा कृषी कर्मण पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याने 2006-07 पासून 2012-13 पर्यंत भाताची उत्पादकता 17 टक्‍क्‍यांनी वाढविल्याबद्दल हा गौरव करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली असून पुरस्काराबद्दल कृषी विभागाचे अभिनंदन केले आहे.

येत्या 10 फेब्रुवारीला विज्ञान भवनात (नवी दिल्ली) होणाऱ्या "वर्ल्ड कॉग्रेस ऑन ऍग्रो फॉरेस्ट्री 2014' मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्याच्या कृषीमंत्र्यांसोबतच कृषी सचिव व कृषी आयुक्तांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

राज्यात 15 लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेतले जाते. भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी 2006-07 पासून 2012-13 पर्यंत भात उत्पादक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम राबविलेल्या जिल्ह्यांत उत्पादकतेत 27 टक्के तर इतर जिल्ह्यांमध्ये उत्पादकतेत 13 टक्के वाढ झाली. सरासरी भात उत्पादकता 17 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. यासाठी चारसूत्री पद्धत, बियाणे बदल आदी नवीन तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावीपणे प्रसार व अंमलबजावणी करण्यात आली. या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्राची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.

राज्यातील भात उत्पादन
वर्ष --- क्षेत्र (हेक्‍टर) --- उत्पादन (टन) --- उत्पादकता (किलो प्रति हेक्‍टर)
2006-07 --- 1529300 --- 2569700 --- 1680
2007-08 --- 1576700 --- 3011500 --- 1910
2008-09 --- 1521500 --- 2287500 --- 1503
2009-10 --- 1470600 --- 2185800 --- 1486
2010-11 --- 1486200 --- 2625100 --- 1766
2011-12 --- 1516400 --- 2784600 --- 1836
2012-13 --- 1520200 --- 2982200 --- 1962
-------(समाप्त)-----

No comments:

Post a Comment