Wednesday, January 1, 2014

शेतीत घुमतंय तरुणाईचं वारं !

सर्वाधिक संख्या शेतीत, उच्चशिक्षितांचा शेतीकडे वाढता कल

संतोष डुकरे
पुणे : शिक्षण संस्थांमुळे उच्चशिक्षितांच्या संख्येत झालेली वाढ, वाढलेली बेरोजगारी, शिक्षकी व इतर नोकरीच्या संधींवर आलेली मर्यादा व याच वेळी शेतीचे वाढते महत्त्व यामुळे गेल्या काही वर्षात उच्चशिक्षितांचाही शेतीकडे ओढा वाढल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे करिअर म्हणून शेतीत उतरलेली ही उच्चशिक्षित तरुणाई अत्याधुनिक ज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतीला अधिक हायटेक स्वरूप देत आहे.

शेतीतल्या अनंत अडचणींनी त्रस्त झालेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना आपल्या मुलांनी शेती करू नये, यातून बाहेर पडावे, नोकरी व्यवसाय करावा असे वाटते. त्यामुळे अनेकदा कृषी शिक्षण घेऊनही शेतीपेक्षा नोकरीत अनेक जण रमत असल्याचे चित्र गेली अनेक दशके होते. आता मात्र हळूहळू ही मानसिकता बदलत असल्याचे राज्याच्या कानाकोपऱ्यांत घडत असलेल्या यशोगाथांवरून दिसते. ऍग्रोवनमध्ये गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध यशोगाथांमध्येही तरुणाईच्या शेतीतील यशाची चढती कमान प्रकर्षाने जाणवते. विविध उपक्रम, प्रयोगांपासून ते विक्रमी उत्पादन आणि जागतिक मानकांचे पालन करण्यापर्यंत सर्व आघाड्यांवर हे तरुण उजवे ठरत आहेत.

- सर्वाधिक तरुण शेतीत
राज्यातील सुमारे 60 टक्के लोकसंख्या शेती व्यवसायात आहे. यानुसार राज्यातील 16 ते 35 वयोगटातील तरुणांमध्ये शेतकरी तरुणांची संख्या सर्वांत मोठी असण्याची शक्‍यता आहे. याबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र यापूर्वीची जनगणना व केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अहवालांच्या संदर्भाने शेतकरी कुटुंबाची पार्श्वभुमी असलेले तरुण आणि स्वतः शेती कसणारे तरुण या दोन्हींची संख्या देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

- शेतीतील तरुणाईची परिभाषा बदलतेय
गेल्या पाच वर्षांत मोबाईल दूरध्वनीच्या तंत्रज्ञानात झालेल्या प्रचंड क्रांतीचे लोण खेडोपाडी शेतशिवारात पोचले आहे. सोशल नेटवर्किंगपाठोपाठ आता व्हॉट्‌स अपसारखी ऍप्लिकेशन्स वापरण्यातही शेतकरी तरुण आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे टाइमपासपेक्षाही या तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर करण्याकडे अनेकांचा कल आहे. कीडरोगांच्या प्रादुर्भावाची एकमेकांना सूचना देण्यापासून ते अद्ययावत माहिती व तंत्रज्ञानाची आदानप्रदान करण्याचा वेग वाढला असून, त्या अनुषंगाने तरुणांची परिभाषाही बदलली आहे.

- बांधावर बोर्ड रूम, एक्‍सेलमध्ये हिशेब
काठापूर येथील प्रशांत घुले (ता. आंबेगाव, पुणे) म्हणाला, की कंपन्यांच्या बोर्ड रूममध्ये व्यवस्थापनाचे आराखडे आखून त्यांची अंमलबजावणी केली जाते. याच पद्धतीने मी व्हाइट बोर्डवर प्लॅनिंग करून टार्गेट समोर ठेवून शेतीचे काम करतो. सर्व हिशेब एक्‍सेलमध्ये ठेवतो. यामुळे रोजची प्रगती आणि संगणकाच्या एका क्‍लिकवर सर्व अर्थकारण समोर राहते, उद्दिष्ट वेळेत गाठता येते. माहितीच्या बॅकअपसाठी ऍग्रोवन, कृषी दैनंदिनी व इतर पुस्तके संग्रहित करून ठेवतो.

- कीड-रोगांना उत्तर मोबाईलवर
नारायणगाव (पुणे) येथील अनंत कानिटकर म्हणाले, की मला शेतीच्या व्यवस्थापनात मोबाईल व व्हॉट्‌स अपचा खूप उपयोग होतो. मजूरांच्या रोजच्या नोंदींपासून, कीड-रोग, पिकाची स्थिती, सल्ला ते अगदी निविष्ठांच्या बिलापर्यंत सर्व गोष्टी मोबाईलवर काही क्षणांत शेअर होतात. त्यामुळे शेती अधिक काटेकोरपणे करणे शक्‍य होतेय.

- युवा कृषी राष्ट्र
गेल्या दोन्ही जनगणनांनुसार (2001 व 2011) लोकसंख्या व युवकांच्या (16 ते 35 वर्षे) संख्येत उत्तर प्रदेशचा देशात प्रथम क्रमांक असून, त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. देशात एकूण लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोक शेतीमध्ये कार्यरत आहेत. हेच प्रमाण महाराष्ट्रातही कायम आहे. राज्यात सर्वाधिक युवक शेती व शेतीसंलग्न व्यवसायांत कार्यरत आहेत.

Publish in Agrowon, Page 4, 1 Jan 2014

No comments:

Post a Comment