Tuesday, January 14, 2014

कृषी विद्यापीठांच्या कारभारात "इम्पॅक्‍ट ऍनालेसीस'चा अभाव

स्वतंत्र यंत्रणेची गरज

संतोष डुकरे
पुणे ः गेल्या अनेक दशकांपासून कृषी विद्यापीठांनी कृषी शिक्षण, संशोधन व विस्तारात केलेल्या कामाचा शेती व शेतकऱ्यांवर झालेल्या परिणामांचे मुल्यांकन एकाही विद्यापीठाने वा संस्थेने केला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कृषी विभागाच्या कामाचे मूल्यांकन होते मात्र विद्यापीठांच्या नाही, असा सूर नेहमी आवळला जातो. केवळ ढोबळ अंदाज, संबंधित लोकांचे स्वारस्य आदींच्या आधारे संशोधन व विस्तार उपक्रमांची दिशा ठरत असल्याचे चित्र आहे.

चारही विद्यापीठांच्या संशोधन व विस्तार विभागांत याबाबत यंत्रणा नसल्याचीच माहिती समोर आली आहे. विद्यापीठाने काय केले याची माहिती आहे, मात्र या कामाचा परिणाम काय झाला याबाबत काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. "आयसीएआर'कडून किंवा राज्य शासनाकडून अद्याप याबाबत कोणताही प्रकल्प सुरू करण्यात आलेला नाही, त्यामुळे आत्तापर्यंत शक्‍य झालेले नाही असाही दावा काही विभागप्रमुखांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला.

- विस्तार विभाग झाले सुस्त
कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, संशोधनाचा प्रसार करण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये स्वतंत्रपणे कृषी विस्तार विभाग कार्यरत आहे. शिक्षणाबरोबरच तंत्रज्ञानाचा प्रसार हे या विभागाचे अधिकृतरीत्या प्रमुख काम आहे. यासाठी विविध मेळावे, कार्यशाळा, प्रसिद्धिपत्रके, पुस्तके, चर्चासत्रे आदींचे आयोजन करण्यात येते. याचप्रमाणे या कामाचे मूल्यमापन करण्याचीही जबाबदारी विस्तार विभागांचीच आहे, मात्र ती सोईस्कररीत्या विसरण्यात आली आहे. विस्तार विभागांनीच याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा कृषी विस्तार तज्ज्ञांनी व्यक्त केली.

- विद्यार्थ्यांचे शिक्षणानंतर काय ?
कृषी पदवीधर शेती करत नाहीत, असा आरोप अनेकदा केला जातो. विद्यापीठांतही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतात. मात्र याबाबत अद्याप चारही विद्यापीठांमध्ये कोठेही पाहणी, अभ्यास झालेला नाही. वस्तुतः विद्यार्थांच्या कर्तृत्वावरही शिक्षण संस्थेचे यश मोजले जाते. मात्र नेमक्‍या याच बाबतीत कृषीत आनंदी आनंद आहे. अगदी शंभरी ओलांडलेल्या पुणे कृषी महाविद्यालयातही या पद्धतीने माजी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आलेले नाही, हे विशेष! कृषी महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावरून माजी विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती संकलित करुण विश्‍लेषण केल्यास याबाबतची वस्तुस्थिती पुढे येऊ शकते.

*चौकट
- तर विद्यापीठांची उपयुक्तता वाढेल
""कृषी विद्यापीठांच्या कामाचे, संशोधनाचे अद्याप मुल्यांकन झालेले नाही. ते करण्याचे गरज आहे. त्यामुळे विद्यापीठांची उपयुक्तता आणखी वाढण्यास मोठी मदत होईल. हे काम खूप मोठे आहे. त्यास खास यंत्रणा लागेल. खासगी कंपन्या, विक्रेते, विस्तार यंत्रणा यांच्या मदतीने सर्वेक्षण करावे लागेल. शिक्षण, संशोधन, विस्तार या सर्वांचीच घटकनिहाय मुल्यांकनाची गरज आहे.''
- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ.

*चौकट
- मूल्यमापन होणे अत्यावश्‍यक
""विद्यापीठांमार्फत केल्या जाणाऱ्या कामाचे टप्प्या टप्प्याने मूल्यमापन होणे अत्यावश्‍यक आहे. अनेकदा संबंधित शास्त्रज्ञांना याची माहिती असते मात्र ती व्यक्तिगत पातळीवर राहते. अकोल्यात इम्पॅक्‍ट ऍनालेसीस करण्याचा प्रयत्न झाला होता. विद्यापीठ पातळीवर यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज आहे.''
- डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

*चौकट
- काम "युजर फ्रेंडली' पाहिजे
""ठिबकच्या नळ्या गुंडाळण्याचे मशिन, उसासाठी आंतरमशागतीची यंत्रे ही कुठल्या विद्यापीठाने किंवा कंपन्यांनी काढलेली नाहीत. गावोगावच्या शेतकऱ्यांनी, लोहारांनी विकसित केलेली ही यंत्रे अत्यंत लोकप्रिय झाली. याच पद्धतीने विद्यापीठाचे काम वापरकर्त्याच्या सोईचे (युजर फ्रेंडली) पाहिजे. शेतकऱ्यांची त्या संशोधनाशी, तंत्रज्ञानाशी मैत्रीच झाली पाहिजे. यासाठी विद्यापीठांनी फक्त तंत्रज्ञान, संशोधने जाहीर करण्यावर न थांबता त्याचे वेळोवेळी मूल्यमापन करुण सुधारणा केल्या पाहिजेत.''
- सोपान कांचन, अध्यक्ष, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन हॉर्टीकल्चर

इम्पॅक्‍ट ऍनालेसीस नसल्याचे दुष्पपरिणाम
- कामाचे यश, अपयश गुलदस्त्यातच
- विद्यापीठ व शेतकऱ्यांत दुरावा, दरी
- कालबाह्य, अपयशी उपक्रम वर्षानुवर्षे सुरू
- शेतकरी उपयोगी संशोधन, तंत्रज्ञानाचा वेग कमी
- धोरणे ठरविण्यासाठी वस्तुनिष्ठ माहितीचा अभाव
- धोरण, उपक्रम गरजांऐवजी व्यक्तीकेंद्रीत होण्याचा धोका
-------------

No comments:

Post a Comment