Wednesday, January 22, 2014

राज्यभर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

शुक्रवारपासून ढगाळ हवामान निवळणार; थंडी वाढण्याची शक्‍यता

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (ता. 24) सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. तर सध्या राज्यभर असलेले ढगाळ हवामान शुक्रवारपासून निवळणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांपासून गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पट्ट्याची तीव्रता कमी होण्यास बुधवारी (ता. 23) सुरवात झाली असून, शुक्रवारी तो पूर्णपणे ओसरण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वत्र बाष्पयुक्त ढगाळ हवामानात वाढ झालेली आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्रही शुक्रवारपर्यंत नाहीसे होण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यावरील ढगांचे सावट दूर होऊन हवामान कोरडे होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, ढगाळ हवामानामुळे राज्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीहून मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकणात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीहून तब्बल नऊ ते दहा अंशांनी उंचावला. किमान तापमान वाढीने बहुतेक ठिकाणी थंडी गायब झाली आहे. बहुतेक ठिकाणी वाढलेली सापेक्ष आर्द्रताही कायम होती. ढगाळ हवामान कमी झाल्यानंतर शुक्रवारनंतर पुन्हा थंडीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी विदर्भासह मध्य भारतात किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

बुधवारी (ता.22) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांतील प्रमुख ठिकाणचे किमान तापमान (अंश सेल्सिअस) ः मुंबई 21.2, अलिबाग 20.5, रत्नागिरी 20.4, डहाणू 20.7, भिरा 22.5, पुणे 14.9, नगर 13.3, जळगाव 15.6, कोल्हापूर 19, महाबळेश्‍वर 14.6, मालेगाव 14.8, नाशिक 13, सांगली 19.6, सोलापूर 18.4, उस्मानाबाद 15.3, औरंगाबाद 15.1, परभणी 17.7, नांदेड 16.6, बीड 18.8, अकोला 19, अमरावती 15.2, बुलडाणा 17.4, ब्रह्मपुरी 17.3, चंद्रपूर 19, गोंदिया 15.4, नागपूर 17.2, वाशीम 19.4, वर्धा 16.2, यवतमाळ 16.8.
--------

No comments:

Post a Comment