Monday, January 27, 2014

राहत्यात होणार राज्यातील पहिला कस्टमाईज खत निर्मिती कारखाना

संतुलित खत वापराचे नवे तंत्रज्ञान; एमएआयडीसीमार्फत प्रक्रिया सुरू

संतोष डुकरे
पुणे ः पीक आणि माती यांच्या गरजेनुसार स्थानिक ठिकाणांसाठी आवश्‍यक ते परिपूर्ण गरजाभिमुख खत (कस्टमाईज फर्टिलायझर) तयार करण्याचा राज्यातील पहिला कारखाना राहता (नगर) तालुक्‍यातील पुणतांबे येथे सुरू करण्यात येणार आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने (एमएआयडीसी) कारखाना उभारणीची तयारी सुरू केली आहे.

राज्यात सध्या विविध प्रकारची संयुक्त व मिश्र खते उत्पादित व विक्री केली जातात. ही सर्व खते खतांच्या प्रकारानुसार घटकांच्या काही ठराविक प्रमाणात उपलब्ध आहे. स्थानिक मातीतील अन्नद्रव्ये व पिकांच्या गरजेनुसार ही खते बनविण्यात येत नाहीत. यामुळे अनेकदा गरजेपेक्षा अधिक किंवा कमी प्रमाणात खत वापरले जाते. खताच्या या असंतुलित वापराचा विपरीत परिणाम जमिनीची सुपीकता व पीक उत्पादनावर होतो. यावर उपाय म्हणून पीक व मातीच्या गरजेनुसार गरजाभिमुख खते तयार करण्याचे तंत्रज्ञान पुढे आले आहे.

सध्या टाटा केमिकल्स लिमिटेड कंपनीमार्फत उत्तरेतील राज्यांमध्ये कस्टमाईज फर्टिलायझर उत्पादन व विक्री करण्यात येत आहे. यासाठी कंपनीने उत्तर प्रदेशातील बाबराला येथे एक लाख 30 हजार टन क्षमतेचा कस्टमाईज खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. महाराष्ट्रात अद्याप एकही कस्टमाईज खत निर्मिती प्रकल्प कार्यरत नाही. यासाठी आता एमएआयडीसीने पुढाकार घेतला आहे.

*चौकट
- पीपीपी पद्धतीने उभारणी
केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात खासगी कंपन्यांची गुंतवणूक वाढविण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर भर दिला आहे. कस्टमाईज खत निर्मिती प्रकल्पही याच पद्धतीने सुरू करावा, अशा सूचना कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोएल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार एमएआयडीसीमार्फत पीपीपीचे टेंडर काढण्यात आले आहे. त्यास आत्तापर्यंत पीपीएल व नागार्जुना या दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. येत्या महिनाभरात या प्रकल्पातील खासगी भागीदार निश्‍चित होऊन पुढील कार्यवाही सुरू होण्याचे नियोजन आहे.

*चौकट
- 10 एकर जमिनीची प्रक्रिया सुरू
पुणतांबे येथे कस्टमाईज खत निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासनामार्फत एमएआयडीसीला 10 एकर जमिनी उपलब्ध करण्यात येणार आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सध्या ही कार्यवाही सुरू आहे. लवकरच या जमिनीच्या सात बाऱ्यावर एमएआयडीसीचे नाव लागण्याची शक्‍यता आहे. पीपीपी प्रकल्पातील खासगी कंपनीसोबतच्या कराराच्या बाबी, कोणत्या भागासाठी व पिकांसाठी कोणत्या प्रकारची खते उत्पादित करायची याचा निर्णय येत्या महिनाभरात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गरजाभिमुख खतांचे फायदे
- कमी खर्चात उत्पादकतावाढ
- पिकांसाठी अन्नद्रव्यांचा संतुलित वापर
- स्थानिक गरजेनुसार उत्पादन, कमी किंमत
- नत्राव्यतिरिक्त सर्व मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्यांचा एकाच वेळी वापर
-------------

No comments:

Post a Comment