Monday, January 27, 2014

फुलोत्पादन संशोधन संचालनालय एक फेब्रुवारीपासून पुण्यात


*कोट
""डॉ. रमेशकुमार... सहा महिने मी फक्त चर्चा ऐकतोय. आता बास झालं. एक फेब्रुवारीला तुम्ही तुमच्या सर्व शास्त्रज्ञांसह पुणे कृषी महाविद्यालयातून संचालनालयाचे काम सुरू करा. मला पुन्हा सांगायला लावू नका.''
- डॉ. एस. अय्यपन, महासंचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली.

संतोष डुकरे
पुणे ः सध्या नवी दिल्लीत सुरू असलेले फुलोत्पादन संशोधन संचालनालय कोणत्याही परिस्थितीत येत्या एक फेब्रुवारीपासून पुण्यात सुरू करण्याचे आदेश भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) महासंचालक डॉ. एस. अय्यपन यांनी संचालक डॉ. रमेशकुमार यांना दिले आहे. या कामी गेल्या सहा महिन्यापासून दिरंगाई सुरू असल्याबाबत तीव्र शब्दात कानउघाडणी करत आहे त्या स्थितीत पुण्यात रुजू होण्याचे फर्मान डॉ. अय्यपन यांनी संबंधित सर्व शास्त्रज्ञांना काढले आहे.

राष्ट्रीय पातळीवरील फुलोत्पादन संशोधन संचालनालय पुण्यात सुरू करण्याचा निर्णय आयसीएआर पातळीवर होऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अद्यापही हे संचालनालय पुण्यात कार्यरत होऊ शकलेले नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत पुण्यातील शंभर एकर जागा संचालनालयासाठी देण्यात येणार आहे. पुणे कृषी महाविद्यालयाची दहा हेक्‍टर आणि हडपसरमधील 30 हेक्‍टर जागा देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाच्या विचाराधीन आहे.

मात्र जमीन व इमारती उपलब्ध नाहीत, या कारणाखाली दिल्लीत स्थायी असलेली सध्याची यंत्रणा, संचालक व शास्त्रज्ञांनी पुण्यात रुजू होण्यास गेली सहा महिने टाळाटाळ चालविली आहे. याबाबत डॉ. अय्यपन यांनी संचालकांना सुनावले. ते म्हणाले, ""पुण्यात संचालनालय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार अनुकूल आहे. ते सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहेत. जमिनीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आहे. कोणत्याही क्षणी कृषी महाविद्यालयाची 10 हेक्‍टर जमीन उपलब्ध होईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माझे या विषयावर बोलणे झाले आहे. राज्य शासनासह सर्वजण जबाबदारी घेत असताना तुम्ही टाळाटाळ कशासाठी करता.''

कृषी महाविद्यालयाने संचलनालयासाठी सहा खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व दहा शास्त्रज्ञांना घेऊन तातडीने पुण्याला जा. कोणत्याही परिस्थितीत एक फेब्रुवारीपासून पुणे कृषी महाविद्यालयामध्ये मिळालेल्या खोल्यांमधून संचालनालयाचे कामकाज सुरू करा. जागा उपलब्ध झाल्यानंतर पुढील गोष्टी करता येतील, या शब्दात डॉ. अय्यपन यांनी संचालकांना यशदामध्ये झालेल्या आयसीएआरच्या संचालकांच्या बैठकीदरम्यान सुनावले. संचालक डॉ. रमेशकुमार यांनी पुण्यात रुजू होण्यास आणखी वेळ देण्याची मागणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो डॉ. अय्यपन यांनी फेटाळून लावला. शेवटी डॉ. रमेशकुमार यांनी एक फेब्रुवारीपासून पुण्यात रुजू होण्यास सहमती दिली.

आयसीएआरअंतर्गत देशात 14 संशोधन संचालनालये कार्यरत आहेत. यापैकी द्राक्ष, डाळिंब, लिंबूवर्गीय फळे आणि कांदा-लसूण या विषयांची चार संचालनालये महाराष्ट्रात आहेत. फुलोत्पादन संशोधन संचालनालय हे राज्यातील राष्ट्रीय पातळीवरील पाचवे संशोधन संचालनालय ठरणार आहे. फुलोत्पादनासाठी देशात 23 संशोधन केंद्रे असून, त्यांची संख्या 37 होणार आहे. महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांत सुमारे साडेसतरा हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर फुलशेती केली जाते. सुमारे तीन हजाराहून अधिक हरितगृहे फुलोत्पादनासाठी कार्यरत आहेत. पुण्यात संशोधन संचालनालय सुरू होण्याचा फायदा राज्यभरातील शेतकऱ्यांना होणार आहे.
--------

No comments:

Post a Comment