Monday, January 27, 2014

फेबुवारीत रुजू होणार 1070 कृषी सेवक

जानेवारी अखेरीस निकाल; 10 फेब्रुवारीपर्यंत नेमणुका

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी विभागाने कृषी सहायकांच्या राज्यभरातील 1070 रिक्‍त जागा भरण्यासाठी घेतलेल्या सरळसेवा परीक्षेचा निकाल येत्या 31 जानेवारीपर्यंत जाहीर होणार आहे. तब्बल 76 हजार उमेदवारांमधून गुणानुक्रमे या जागा भरण्यात येणार आहेत. निकाल लागल्यानंतर पुढील आठ-दहा दिवसात विभागीय कृषी सह संचालकांमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे.

कृषी विभागाने कृषी सहायक भरतीसाठी सलग दुसऱ्या वर्षी केंद्रीय भरती प्रक्रिया राबवून राज्यभर एकाच वेळी परीक्षा घेतली. गेल्या 23 नोव्हेंबरला ही परीक्षा झाली. राज्यातील तब्बल एक लाख 11 हजार 650 उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. प्रत्यक्षात 76 हजार उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. गेल्या दोन महिन्यांपासून हे उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी घरी नेण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर 25 नोव्हेंबरला या परीक्षेची उत्तरतालिकाही जाहीर करण्यात आली. यामुळे उमेदवारांना या उत्तरतालिकेनुसार स्वतःचे गुण पडताळून पाहता आले. आता गुणानुक्रमे निकाल जाहीर होणार असून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना कृषी सेवेत रुजू करून घेण्यात येणार आहे.

कृषी आयुक्त उमाकांत दांगट म्हणाले, ""यापूर्वी तोंडी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे राज्य शासनाची विशेष परवानगी घेऊन कृषी सेवक भरतीसाठीच्या मुलाखतीच रद्द केल्या आहे. सर्व भरती 100 टक्के पारदर्शक होण्यासाठी ऑनलाइन अर्ज, एकाच वेळी राज्यभर परीक्षा, उमेदवारांना प्रश्‍नपत्रिका, उत्तरपत्रिका देणे व उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यासारख्या सर्व बाबींचा अवलंब करण्यात आला आहे. येत्या चार-सहा दिवसात निकाल जाहीर होईल.''

*कोट
""दोन महिन्यांपूर्वी 200 गुणांची लेखी परीक्षा झाली. उत्तरतालिकेनुसार मला 125 गुण पडत आहेत. सर्व प्रक्रिया पारदर्शक आहे त्याबाबत तक्रार नाही. मुलाखत रद्द झाली हे खूप चांगले झाले. पण निकाल लवकर लागायला हवा.''
- बंकट राजाभाऊ सोळुंके, कृषी पदविकाधारक, लिंबारुई, बीड.

*चौकट
- 179 अधिकाऱ्यांची छाननी सुरू
तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पदांची उमेदवार निवड प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगामार्फत नुकतीच राबविण्यात आली. आयोगाने यातून 179 उमेदवारांची शिफारस कृषी विभागाला केली आहे. यामध्ये वर्ग दोन च्या पदांसाठी 59 तर कृषी अधिकारी पदासाठी 120 जणांची शिफारस करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम सध्या मंत्रालय पातळीवर सुरू आहे. येत्या महिनाभरात हे सर्व उमेदवार कृषी विभागाच्या सेवेत दाखल होण्याचा अंदाज आहे.
-------(समाप्त)------

No comments:

Post a Comment