Wednesday, January 29, 2014

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, दक्षिण कोकणात आकाश अंशतः ढगाळ

पुणे (प्रतिनिधी) ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची तिव्रता वाढल्याने विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट आली आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात किमान तापमान सरासरीहून तीन ते सहा अंश सेल्सिअसने घसरले आहे. नगरमध्ये बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यातील सर्वात कमी आठ अंश सेल्सिस किमान तापमानाची नोंद झाली. याच वेळी समुद्रावरुन बाष्पाचा पुरवठा होवू लागण्याने दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळले आहे.

हवामान खात्याने शुक्रवारी सकाळपर्यंत दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळलेले राहण्याचा व उर्वरीत महाराष्ट्रात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. किमान तापमानातील घसरणीमुळे राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. याच वेळी कोकण वगळता उर्वरीत संपूर्ण महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा सरासरीहून घसरला आहे.

दरम्यान, उत्तरेकडील राज्यामध्ये दाट धुके पडत आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसात दाट धुके कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी पावसाचाही अंदाज असून जम्मू व काश्‍मिर आणि हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी (ता.29) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान व कंसात किमान तापमानात सरासरीहून झालेली वाढ किंवा घट अंश सेल्सिअसमध्ये ः अलिबाग 18 (1), भिरा 19 (3), डहाणू 18 (1), पणजी 21 (1), हर्णे 22 (0), मुंबई 17 (0), रत्नागिरी 17 (-2), नगर 8 (-5), जळगाव 11 (-2), कोल्हापूर 17 (1), महाबळेश्‍वर 13 (-1), मालेगाव 11 (0), नाशिक 9 (-2), पुणे 9 (-2), सांगली 15 (1), सातारा 12 (-1), सोलापूर 16 (-1), औरंगाबाद 11 (-1), नांदेड 12 (2), उस्मानाबाद 13, परभणी 11 (-4), अकोला 12 (-3), अमरावती 14 (-2), ब्रम्हपुरी 13 (-1), बुलडाणा 13 (-2), चंद्रपूर 9 (-6), नागपूर 9 (-5), वर्धा 11 (-4), यवतमाळ 12 (-5)
-----------------(समाप्त)--------------

No comments:

Post a Comment