Monday, January 20, 2014

अखर्चित निधी परत करा

देशातील कृषी संचालनालयांना डॉ. अय्यपन यांचा आदेश

पुणे (प्रतिनिधी) ः देशातील कृषीविषयक संचालनालये व संशोधन संस्थांना चालू आर्थिक वर्षात देण्यात आलेल्या निधीपैकी तब्बल 200 कोटी रुपये अखर्चित राहणार आहेत. सर्व संस्थांच्या संचालकांनी हा संभाव्य अखर्चित निधी तातडीने परत करावा, असे आदेश भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) महासंचालक डॉ. एस. अय्यपन यांनी दिले आहेत.

आयसीएआरच्या सर्व संचालकांची बैठक सोमवारी (ता.20) यशदाच्या सामवेद सभागृहात झाली. या वेळी डॉ. अय्यपन यांनी अखर्चित निधी परत करण्यास संशोधन संचालनालये टाळाटाळ करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पुढच्या वर्षासाठी एप्रिलमध्ये मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे अखर्चित राहणारा निधी बळकावून न ठेवता तातडीने आयसीएआरला परत करावा. यामुळे ज्या संस्थांना निधीची गरज आहे, त्यांची कामे वेळेत होतील व नियोजनानुसार उपलब्ध निधीचा वापर मार्चअखेर पूर्ण करता येईल, असे डॉ. अय्यपन यांनी या वेळी स्पष्ट केले.

कृषी संशोधनासाठी तेराव्या पंचवार्षिक योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. संशोधन संस्थांनी अनेक प्रकल्पांची आखणी केली आहे. मात्र, ते अद्याप सादर करण्यात आलेले नाहीत. प्रकल्प सादर करण्यात उशीर झाला तर तो निधीअभावी रेंगाळू शकतो. हे सर्व प्रस्ताव 13 व्या पंचवार्षिकमध्ये समाविष्ट केल्यास एप्रिलपासून अधिक चांगल्या प्रकारे निधी मिळू शकतो. यामुळे संचालकांनी कोणत्याही परिस्थितीत सर्व प्रकल्प प्रस्ताव येत्या 10 दिवसांत आयसीएआरकडे जमा करावेत, असे आवाहन डॉ. अय्यपन यांनी या वेळी केले.

आयसीएआरचे सचिव अरविंद कौशल, आर्थिक सल्लागार पी. के. पुजारी, उपमहासंचालक (समन्वय) रवींद्र कुमार, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. गुरबचन सिंग, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. बी. सिंग व्यासपीठावर उपस्थित होते. आयसीएआरमार्फत सुरू असलेले विविध उपक्रम व त्यातील संचालकांचे योगदान याबाबत या परिषदेत सविस्तर चर्चा झाली. चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संचालकांना देण्यात आल्या.

- रेकॉर्ड नीट ठेवा
संशोधन प्रकल्पांचे रेकॉर्ड (माहिती, नोंदी इ.) व्यवस्थित ठेवले जात नसल्याबद्दलही परिषदेत नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांनी त्याबाबतची काहीही माहिती उपलब्ध नसेल. अधिकारी बदलले तरी ही माहिती उपलब्ध होत नाही. संचालक म्हणून तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत. या अधिकारांचा वापर करा. रिपोर्ट चांगल्या प्रकारे लिहा. प्रसंगी कुणाशी वाईट होण्याची वेळ आली तरी हरकत नाही; पण सर्व प्रकल्पांचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवा, असे डॉ. अय्यपन यांनी सुनावले.

*चौकट
- संशोधकांसाठी एक कोटी रुपयांचे पारितोषिक
प्रयोगशाळा व शेतकरी यातील दरी भरून काढण्यासाठी व कृषी शास्त्रज्ञांना शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविणारे संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी येत्या आर्थिक वर्षापासून आयसीएआरच्या संशोधकांसाठी सिजेंटा फाउंडेशनच्या पुढाकाराने एक कोटी रुपयांचा गौरव पुरस्कार (आयसीएआर-सिजेंटा ऍग्रिकल्चर प्राईज) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दहा वर्षे सिजेंटा फाउंडेशनमार्फत पुरस्काराची रक्कम आयसीएआरकडे देण्यात येणार असल्याचे सिजेंटाचे कार्यकारी संचालक डॉ. भास्कर रेड्डी यांनी सांगितले.



No comments:

Post a Comment