Sunday, January 5, 2014

कृषी शिक्षणात लाखोंची भरारी

लाखो तरुण घेताहेत कृषी शिक्षण; दहा वर्षांत विद्यार्थिसंख्येत पाचपटीने वाढ

* चौकट
- कृषी पदवीधर कसताहेत शेती
कृषी पदवीधर प्रत्यक्ष शेती कसत नाहीत, असा आरोप अनेकदा केला जातो. दशकभरापूर्वी त्यात तथ्यही होते. मात्र आता पदवीनंतर प्रत्यक्ष शेती कसण्यात व शेतीबरोबरच इतर पूरक व्यवसायांच्या मदतीने प्रगती साधण्यात कृषी पदवीधर आघाडीवर आहेत. पुणे कृषी महाविद्यालयासह राज्यभरातील महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने थेट शेती व शेतीसाठी काम करत असल्याची माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या सूत्रांनी दिली.

पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने राबविलेली धोरणे, चारही कृषी विद्यापीठांचे प्रयत्न, शेती व संलग्न क्षेत्राचा विकास व व्यवस्थापन जाणकारांची वाढती मागणी यामुळे गेल्या काही वर्षांत कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या दर वर्षी सुमारे एक लाखाहून अधिक विद्यार्थी राज्यात कृषीचे शिक्षण घेत आहेत. याशिवाय परराज्यांमध्ये व परदेशात कृषी शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.

दहा वर्षांपूर्वी अवघी अडीच हजार असलेली कृषी पदवीची प्रवेशक्षमता आता 15 हजारांपर्यंत म्हणजेच तब्बल पाचपटींनी वाढली आहे. कृषीतील विविध विद्याशाखांच्या नवीन अभ्यासक्रम व विद्याशाखा सुरू झाल्या आहेत. यास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. सध्या दर वर्षी सुमारे 15 हजार कृषी पदवीधर व तेवढेच कृषी पदविकाधारक उपलब्ध होत आहेत. याशिवाय एमबीए व इतर प्रावीण्याच्या पदव्या घेऊन कृषी व संलग्न क्षेत्रात करिअर घडविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. कृषीच्या स्वतंत्र स्पर्धा परीक्षांबरोबरच राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, भरतीमध्येही कृषीचा वरचष्मा कायम आहे.

चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत कार्यरत असलेली सुमारे 185 कृषी महाविद्यालये, 238 कृषी तंत्र विद्यालये, कृषी तंत्रनिकेतन, 46 हून अधिक पदव्युत्तर पदवी शिक्षण संस्था याबरोबरच पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आदी विद्यापीठाअंतर्गत शेकडो संस्थांमार्फत कृषिविषयक विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या ठिकाणी दर वर्षी सुमारे एकूण एक लाखाहून अधिक विद्यार्थी कृषी शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत.

- परदेशगमनातही वाढ
राज्यातून परदेशात कृषी शिक्षणास जाण्यास 1950 पासून सुरवात झाली. त्यानंतर गेली सहा दशके हे प्रमाण तसे तुटपुंजेच होते. मात्र गेल्या पाच वर्षांत परदेशात कृषीचे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम व इतर कौशल्याधारित अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांत मोठी वाढ झाली आहे. यात पुणे कृषी महाविद्यालय व बारामती कृषी महाविद्यालयाच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचा हा कल लक्षात घेऊन देशात प्रथमच बारामती येथे नेदरलॅंडमधील शिक्षण संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पदवीचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमही सुरू झाले आहेत.

- आहे शिक्षण तरीही...
""शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन कृषी शिक्षणातही यायला हवा. सध्याचे अभ्यासक्रम संस्थांच्या पातळीवर पुस्तकी फेऱ्यात अडकले आहेत. "थेअरी' व "प्रॅक्‍टिस' यात फार मोठी दरी आहे. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक यासाठीही प्रशिक्षणाची वानवा आहे. ही दरी भरून काढण्यासाठी "ऍग्रोवन' व "एसआयएलसी'मार्फत विविध अभ्यासक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.''
- डॉ. अपूर्वा पालकर, संचालक, सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी), पुणे

* कोट
""राज्यात 2000 पासून कृषी शिक्षणासाठी कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयांना मान्यता देण्यास सुरवात झाली. यामुळे कृषी शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. मोठ्या प्रमाणात चांगले मनुष्यबळ उपलब्ध झाले. यंदा पदवीच्या जागांसाठी क्षमतेच्या दुपटीहून अधिक विद्यार्थी इच्छुक होते. यावरून हे महत्त्व स्पष्ट होते.''
- विजय कोलते, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे



No comments:

Post a Comment