Wednesday, October 28, 2015

कृषी आणि पणन, फलोत्पादन - राज्य वार्षिक मुल्यांकन

डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरु, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
-------------------------------
अ) गतवर्षभरात खात्याबाबत झालेले पाच चांगले निर्णय
१) जलयुक्त शिवार कार्यक्रमातून २४ टीएमसी साठा निर्माण केला.
२) कृषी निविष्ठांचे अनुदान थेट खात्यावर जमा करण्याचा निर्णय.
३) राज्य कृषी मुल्य आयोगाची स्थापना
४) कृषी क्षेत्राच्या स्थैऱ्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय.
५) कृषी शिक्षणाच्या विस्ताराचा निर्णय. नवीन विद्यापीठे, महाविद्यालयांची स्थापना
-------------------
ब) गतवर्षभरात खात्याबाबतचे पाच फसलेले निर्णय
१) केंद्र पुरस्कृत योजना व अनुदान यात झालेली मोठी घट
२) कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा करण्याचा निर्णय कागदावरच
३) कृषी क्षेत्रातील आर्थिक वाढीचा दर उंचावण्यात अपयश
४) कृषी अवजारे व निविष्ठा वाटपातील भ्रष्टाचार थांबविण्यात अपयश.
५) शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात अपयश.
------------------
क) आगामी काळात खात्याबाबत अपेक्षित पाच प्रमुख निर्णय किंवा उचलावयाची पावले
१) कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी इतर राज्यांच्या धर्तीवर कृषी व संलग्न खात्यांचा वेगळा अर्थसंकल्प हवा.
२) बाजार समिती कायद्यात सुधारणा करुन शेतकऱ्यांची बाजार साक्षरता (मार्केट इंटेलिजन्स) वाढविण्यावर भर द्यावा.
३) प्रत्येक जिल्ह्यात तेथील मुख्य पिकांवर आधारीत शेतमाल मुल्यवर्धन साखळीसाठी मेगा फुड पार्क स्थापन करावेत.
४) जमीन आरोग्याच्या दृष्टीने शेतीसाठी गुणवत्तापूर्ण जैविक व सेंद्रीय निविष्ठांच्या पुरवठ्याची व्यवस्था करावी.
५) शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षाकवच देण्यासाठी पिक विमा, पशु विमा आदी जनांचे बळकटीकरण करावे.
--------------
ड) खात्याची वर्षभरातील कामगिरीचे मुल्यमापन
(१ ते १० गुण द्यावेत. १ गुण निचांकी कामगिरी तर १० गुण सर्वोत्कृष्ट कामगिरी दर्शवणारा असेल)

- ३ गुण
--------------- 

Tuesday, October 27, 2015

कृषी सहायक, पर्यवेक्षकांच्या विनंती बदल्या रखडल्या



चार महिन्यांपासून प्रतिक्षा; प्रस्ताव सचिवालयात पडून

पुणे (प्रतिनिधी) - राज्य कृषी विभागाच्या सेवेतील सुमारे ५०० हून अधिक कृषी सहायक व पर्यवेक्षकांच्या विनंती बदल्या गेल्या पाच महिन्यांपासून रखडल्या आहेत. विशेष म्हणजे कृषी विभागातीलच वर्ग एक व वर्ग दोन मधील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या चार महिन्यांपूर्वीच झाल्या आहेत. इतर शासकीय विभागातील वर्ग तीन मधिल ग्रामसेवक, तलाठी आदी कर्मचाऱ्यांच्याही विनंती बदल्या झाल्या आहे. फक्त कृषी कर्मचाऱ्यांच्याच विनंती बदल्या सचिवालयात रखडल्याबाबत कृषी सहायक व पर्यवेक्षकांमध्ये तिव्र नाराजीचे वातावरण आहे.

कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या मे अखेरीस पूर्ण होतात. यानंतर जून अखेरपर्यंत विनंती बदल्या होतात. यामध्ये पती पत्नी एकत्रिकरण, कौटुंबिक अडचणी, अति गंभिर स्वरुपाचे आजार, आदिवासी भागात काम करणारे कर्मचारी यांची पात्रतेनुसार विनंती बदली करण्यात येते. सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच्या विभागिय संभाग बदल्यांची स्वतंत्र यादी मंत्रालयातून जाहिर केली जाते. मंत्रालयातून आयुक्तालयाकडे व तेथून विभागिय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे ही यादी येते. विभागिय कृषी सहसंचालक त्यांच्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बदलीचा आदेश देतात. गेल्या वर्षीपर्यंत ही सर्व प्रक्रीया सुरळीत सुरु होती. मात्र सचिव बदलल्यानंतर फक्त विनंती बदल्यांनाच खिळ बसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

आदिवासी भागात सहा वर्षे पूर्ण केलेले एक सहायक म्हणाले, शिफारशी इ. सर्व घेवून परिपूर्ण प्रस्ताव विभागिय सहसंचालकांकडून आयुक्तालयाला व तेथून मुख्य सचिवांकडे पाठवले आहेत. आम्ही वर चौकशी केली की पुढच्या महिन्यात होतील, पुढच्या महिन्यात होतील असे सांगितले जाते. प्रत्यक्षात गेली पाच महिने काहीही प्रगती नाही. एकाच वेळी विनंतीवरुन एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या कशा करायच्या असा सवाल, सचिवालयामार्फत उपस्थित करण्यात येत असल्याचे समजते. पण प्रत्यक्षात अधिकृतरित्या काहीही माहिती सांगितली जात नाही. यामुळे बदल्यांच्या प्रस्तावात गैरप्रकार तर सुरु नाही ना, अशी शंका आहे.

- त्यांच्या बदल्या झाल्या, आमच्या का नाही ?
मोक्याच्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांमध्ये अनेकदा मोठी चुरस असते. एका जागेसाठी अनेक इच्छूक असतात. गैरसोईच्या ठिकाणी बदली होऊ नये म्हणूनही अनेकजण जिवाचा आटापिटा करत असतात. यामुळे या सर्व प्रक्रियेत मोक्याच्या जागी असलेल्या व्यक्ती किंवा अशा व्यक्तींच्या जवळच्या लोकांमार्फत आर्थिक देवाणघेवाण करुन, पैसे देवून इच्छापूर्ती करण्याचे प्रकार सुरु असतात. पद, अधिकार व उलाढाल मोठी असल्याने ही सेटलमेंटची रक्कमही मोठी असते. कृषी सहायक व पर्यवेक्षक यांच्या बदल्यांत अशा पद्धतीने फारशी देवघेव होत नाही. म्हणून बदल्या रखडल्यात अशीही चर्चा या कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.

- मंत्र्यांच्या शिफारसी, कार्यकर्त्यांची सेटींग
विनंती बदल्यांबाबत राज्य शासनाचे नियम, आदेश आहेत. त्यानुसार प्रस्ताव सादर करताना बदली पात्र ठरावे व इच्छूक ठिकाणी बदलीची इच्छापुर्ती व्हावी म्हणून अनेकांनी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरुन सेटींग लावली आहे. काही कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी दस्तुरखुद्द कृषीमंत्री एकनाथ खडसे यांचीही शिफारस जोडली आहे. गृहमंत्री राम शिंदे व इतर मंत्री, आमदारांच्याही शिफारशी आहेत. सोईच्या ठिकाणी बदली व्हावी म्हणून अनेकांनी मथ्यस्तांमार्फत आर्थिक व्यवहारही केले आहेत. मात्र मंत्रालयातून यादीच बाहेर पडत नसल्याने हे कर्मचारी हवालदिल अवस्थेत आहेत. 

Wednesday, October 21, 2015

अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान आजपासून आपल्या हाती

लोगो - ॲग्रोवन कृषी प्रदर्शन २०१५
-------------
पिंपरीतील एच.ए. मैदानावर ॲग्रोवन कृषी प्रदर्शन

- प्रवेशिका भरा, ट्रॅक्टर जिंका !
ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असलेल्या फोर्स मोटर्स लि. मार्फत प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी प्रदर्शनात प्रवेश करताना तिकिटासोबत देण्यात येणारी प्रवेशिका पूर्ण भरून जमा करणे अत्यावश्यक आहे. प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी अखेरच्या क्षणापर्यंत जमा होणाऱ्या प्रवेशिकांतून एका भाग्यवान शेतकऱ्याची निवड करण्यात येईल. प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ही निवड जाहिर करून संबंधीत शेतकऱ्याला ट्रॅक्टर वितरीत करण्यात येईल.

पुणे (प्रतिनिधी) - गेली वर्षभर राज्यभरातील प्रगतशिल शेतकरी वाट पाहत असलेले उपयोगाच्या दृष्टीने राज्यातील सर्वोत्तम असलेले ॲग्रोवनचे भव्य कृषी प्रदर्शन आजपासून उद्योगनगरी पिंपरी चिंचवड येथिल हिंदुस्तान ॲन्टीबायोटिक्सच्या मैदानावर सुरु होत आहे. प्रदर्शनासाठी गुरुवारी सायंकाळपासूनच शेतकरी दाखल होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित आणि राज्यात सेवा पुरविण्यात सर्वोत्तम असलेल्या कंपन्या व संस्था या प्रदर्शनातून थेट शेतकऱ्यांशी जोडणी करणार आहेत. शेतकऱ्यांना हवे ते सर्व प्रकारचे अत्याधुनिक, अद्ययावत तंत्रज्ञान या ठिकाणी पाहता, जोखता व स्विकारता येणार आहे.

वारकऱ्यांसाठी जशी पंढरी तसे प्रगतशिल शेतकऱ्यांसाठी ॲग्रोवन कृषी प्रदर्शन हे समिकरण रूढ झाले आहे. ॲग्रोवन दर वर्षी आयोजित करत असलेल्या कृषी प्रदर्शनातून ज्ञान, तंत्रज्ञान व प्रेरणा घेवून राज्याच्या कानाकोपऱ्यात शेकडो यशोगाथा आकारास आल्या आहेत. यंदा पुन्हा एकदा या प्रदर्शनात सहभागी होवून स्वतःच्या गरजेनुसार अत्याधुनिक, प्रगत तंत्रज्ञानाशी जोडून घेवून स्वतःची शेती, कुटूंब विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. फोर्स मोटर्स लि. हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक, जे.जे. ओव्हरसीज हे प्रायोजक,आईज कॉर्पोरेशन प्रा.लि. हे सहप्रायोजक आणि डॉ. बावसकर टेक्‍नॉलॉजी (ॲग्रो) प्रा.लि. हे नॉलेज पार्टनर आहेत.

राज्य व देशपातळीवरील विद्यापीठे, संशोधन संस्था, प्रक्रियाविषयक संस्था, शासनाचे विविध विभाग, गवडपूर्व कामांपासून ते पीक उत्पादनाची प्रक्रिया, विक्री व निर्यातीपर्यंतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व त्यातील तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य अाहे. शेती उपयोगी अवजारे, ट्रॅक्‍टर, हार्वेस्टर, पिकांचे नवीन वाण, खते, बियाणे, ठिबक आणि तुषार सिंचन, कीडनाशके, पशुपालन, कुक्कुटपालन, प्रक्रिया उद्योग, पीक व्यवस्थापन, ठिबक सिंचन व तुषार सिंचन, पॅकेजिंग, शीतगृह तंत्र, सौर ऊर्जा उपकरणे, प्रतवारी यंत्रणा, टिश्‍युकल्चर, पशुपालन, पोल्ट्री उद्योग, पॉलिहाऊस आदींच्या कंपन्या व संस्थांनी प्रदर्शनात तंत्रज्ञान सादर केले आहे. कृषी पर्यटन, बांबू पॉलिहाऊस, इनलान ठिबक मशिन, पशुखाद्य, मोबाईल तंत्रज्ञान यांची स्वतंत्र दालने प्रदर्शनात आहेत. प्रदर्शनात पाचही दिवस सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत विविध विषयांवरील चर्चासत्रांचे होणार आहेत. ज्यभरातील तज्ज्ञ मार्गदर्शक व प्रगतिशील शेतकरी या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

- खास आपल्या सोईसाठी...
ॲग्रोवन प्रदर्शनास सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोईसाठी यंदाचे प्रदर्शन अधिक भव्य स्वरुपात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनस्थळ मुंबई, नाशिक, नगर व सातारा या चारही दिशांनी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सोईच्या ठिकाणी आहे. प्रदर्शनीय दालने, प्रात्यक्षिके, वाहनतळ अधिक ऐसपैस करण्यात आली आहेत. पिण्याचे पाणी व शौच्चालयांचीही सुविधा आहे. प्रदर्शन स्थळी पोचण्यासाठी न.ता.वाडी (शिवाजीनगर) बस स्थानकापासून स्वतंत्र बस सेवा सुरु करण्यात आली अाहे. स्वतःच्या वाहनाने प्रदर्शनस्थळी येणारांसाठी प्रमुख रस्त्यांवर दिशादर्शक लावण्यात आले आहेत. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत २७ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन सुरु राहणार आहे.

प्रदर्शनातून मिळवा...
- शेतीतून विकासाची नवी दृष्टी
- मजूरांच्या समस्येवर उपाय
- उत्पादन खर्च कपातीचे तंत्र
- नव्या किड रोगांवरील नवी औषधे
- प्रगत, यशस्वी शेतकऱ्यांकडून प्रेरणा
- कंपन्या, संस्थांकडून उत्कृष्ट सेवा, मार्गदर्शन
- कृषी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी
-----------

कृषीसंस्कृतीच्या संपन्न जिवनकथा

पुस्तक परिचय - संतोष डुकरे
-------------
पुस्तकाचे नाव - पावसाचे पाखरू
लेखक - र. वा. दिघे
प्रकाशक - संस्कृती प्रकाशन, पुणे
पृष्ठे - १४४
किंमत - १०० रुपये
-------------
कृषी व ग्रामिण साहित्याचे आद्य शिलेदार म्हणून र. वा. दिघे यांचा लौकीक आहे. ते स्वतः प्रगतशिल शेतकरी होते. कोकणात उत्कृष्ट गहू उत्पादनाबाबत तत्कालिन राज्य शासनामार्फत त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शेती कसता कसता त्यांनी साहित्यनिर्मिती केली. स्वातंत्र्य पूर्व काळातील शेती व शेतकऱ्यांची त्यांनी चितारलेली परिस्थिती आजच्या स्थितीतही जशीच्या तशी लागू होते. त्यांचा वारकरी आणि शेतकरी नायक वारकरी संप्रदायाची मूल्ये जपत संतांच्या शिकवणीतून निसर्गाच्या आपत्तीशी झगडा देतो, मुकाबला करतो. पाणकळा, पड रे पाण्या आदी कादंबऱ्या, कथा, कवितांमधून त्यांनी शेतकरी जीवन समर्थपणे उभे केले आहे. पड रे पाण्या, पड पाण्या तू, कर पाणी पाणी, शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी... हे त्यांचे ७० वर्षापूर्वीचे गित आजही राज्यभर लोकप्रिय आहे. पावसाचे पाखरु हा त्यांचा १९५० च्या दशकातला कथासंग्रह. त्यातील पावसाचं पाखरु, राजा खेळतो भातुकली, फितूर, वेताळाची धोंड आदी कथांमधून कृषी व ग्रामिण जिवनाचे अनेक कांगोरे काळजाला हात घालतात.

राजाची लेक बाव्हली या कथेत पश्चाताप झालेला राजा आपल्या शेतकऱ्याशी लग्न केलेल्या राजकन्येला जावयाला राजा करण्याचे बोलतो तेव्हा राजकन्या म्हणते... शेतकरी राजा झाला तर शेती कोण करील. माझं राज्य शेती, माझा आनंद शेतीत आहे. सर्वच शेतकरी राजा होवू पाहत आहेत. त्यांनी शेतकरीच राहीलं पाहिजे. शेतकऱ्याचा राजा करण्यापेक्षा राजानं शेतकरी झालं पाहिजे. ज्या दिवशी सर्वजण शेतकरी होतील अन् आमच्या शेतीच्या राज्यात येतील त्या दिवशी राजाची जरुरी भासणार नाही. महात्मा फुलें बळीच्या राज्याची कल्पना मांडली. दिघेंनी शेतकऱ्याने राजा होण्यापेक्षा राजाने शेतकरी व्हावे, ही विचारधारा रुंदावली. या पुस्तकाची डॉ. सदानंद मोरे यांनी लिहीलेली प्रस्तावणा कृषी व ग्रामिण साहित्यातील र. वा. दिघे यांचे अमिट योगदान अतिशय नेमकेपणाने स्पष्ट करणारी आहे. हिंदू, मुस्लिम, अस्पृश्य, आदिवासी अशा विविध सामाजिक, धार्मिक गटांचे अभिसरण व्यापक मानवतावादी दृष्टीने करून जोतीराव फुल्यांना अभिप्रेत असलेल्या एकमय लोकांचे म्हणजे भारत या राष्ट्राचे प्रतिबिंब साहित्यात पाहू शकणारे र. वा. दिघे हे एकमेव लेखक आहेत. या शब्दात डॉ. मोरे यांनी त्यांच्या साहित्याचा गौरव केला आहे.
------------

जनावरांच्या असेसरीज - मार्केट स्टोरी

पुणे (प्रतिनिधी) - गेल्या काही वर्षात वाढलेल्या इंधनाच्या किमती, सलग तीन चार वर्षांपासूनची दुष्काळी स्थिती आणि जनावरांच्या शौकीनांच्या संख्येत झालेली घट यामुळे बैल आणि इतर जनावरांसाठीच्या विविध वस्तूंच्या मागणीत गेल्या काही वर्षात घट सुरु असल्याचे चित्र आहे. मात्र यानंतरही वस्तूंच्या किमतींचा आलेख मात्र चढताच आहे. जोती, माळा इ. तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्येही खऱ्या कवड्यांच्या ऐवजी प्लॅस्टिकच्या कवड्या वापरण्यासारखे बदल होत आहेत.

कोणत्याही प्रकारचे पशुपालन करताना जनावरांसाठी विविध प्रकारच्या वस्तु शेतकऱ्यांना अावश्यक ठरतात. बांधण्यासाठी दोरखंड, गळपेंडे, मोरखी, वेसन, सजवण्यासाठी घुंगरमाळा, दृष्टमाळा, तोडे, वशिंड पट्टा, गोंडे, बेगडं आदी अनेक प्रकारच्या वस्तू दैनंदीन पशुपालनात वापरल्या जातात. या वस्तूंच्या निर्मिती व किमतीत गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात बदल सुरु असल्याची स्थिती आहे. डिझेलच्या किमती वाढतील किंवा कमी होतील तसा या वस्तूंच्या किमतीत चढ उतार होत आहेत. पूर्वी मोरखी इ. वस्तू सरसकटपणे दोरखंडासून तयार करण्यात येत. आता यासाठी नायलॉन, सुती किंवा मिश्र धाग्यांच्या पट्ट्यांचा वापर करण्यात येतोय. शेतकऱ्यांची पहिली पसंती अशा पट्ट्याच्या वस्तूंना आहे.

- अंबाडी हद्दपार
काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यात घायपात या झुडुपवर्गिय वनस्पतीची पाने भिजवून त्यापासून अंबाडी आणि अंबाडीपासून दोरखंड व जनावरांच्या उपयोगी वस्तू तयार केल्या जात. काही विशिष्ट समाज या व्यवसायात होते. मात्र गेल्या काही वर्षात या व्यवसायात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून अंबाडीपासून दोरखंड व इतर वस्तू तयार करण्याचे व्यवसाय जवळपास बंद पडले आहेत. बाजारातही अंबाडीचे दोरखंड दुर्मिळ झाले असून नायलॉनच्या दोरखंडांनी बाजारपेठ काबिज केली आहे.

- बैलगाडा शर्यतींचा असाही परिणाम
बैलगाडा शर्यतीमुळे बैलांसाठी लागणाऱ्या वस्तू निर्मिती व विक्रीला चांगले दिवस आले होते. दोरखंड, मोरखी, वेसन, गळपट्टे, कवड्याच्या माळा, दृष्टमाळा, गोंडे, बेगडं आदींना मोठी मागणी होती. अनेक शौकीन प्रत्येक शर्यतीच्या वेळी या सर्व साहित्याचे वेगवेगळे साज वापरत. यामुळे या वस्तूंची मागणी टिकून होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शर्यती बंद आहे. यामुळे या वस्तूंची बाजारातील उलाढाल २० ते ३० टक्क्यांनी मंदावली आहे. मशागतीच्या जनावरांसाठी शेतकरी वर्षा दोन वर्षाने एकदा खरेदी करतात, ती सुद्धा पोळ्याला सुमारास किंवा आगुठीच्या वेळी. इतर वेळी बाजार मंदावलेला असतो, अशी माहीती बेल्हा (जुन्नर, पुणे) येथिल बैलबाजारातील विक्रेत्यांनी दिली.

- जनावरांसाठीच्या वस्तुंच्या प्रतिनग किमती (रुपये)
मोरखी - २० ते ४०, चाबुक - ८० ते १५०, दोरखंड - १२० ते १६० रुपये किलो, वेसन - १० ते ५०, गळपेंडे - २५ ते ८० रुपये, घुंगरमाळ - ६०० ते ७००, दृष्टमाळ - ६० ते ८०, कवडीमाळ - ५० ते ७०, गोंडे - २० ते ५०, शिंगाड्या - ७० ते ८० रुपये जोडी, भवरकडी - १० ते ६० रुपये जोडी, ताडपत्री १३० ते २०० रुपये किलो

- कोट
‘‘गेल्या दहा वर्षात बैल व जनावरांचे शौकीन लोक कमी झाले आहेत. बैलपोळा, आगुठीचे सणवारही पुर्वीसारखे होत नाहीत. यामुळे जनावरांच्या उपयोगाच्या सजावटीच्या वस्तुंच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. शर्यतींवरील बंदी, डिझेलच्या वाढत्या किमती याचाही फटका बसलाय. पण वस्तूंच्या किमती चढत्या आहेत.
- हरीभाऊ नारायण गुंजाळ, विक्रेते, बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे
----------------- 

रब्बीला प्रतिक्षा थंडीची


- हवामान अंदाज
राज्यात येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व विभागांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोकणात २५ ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून उर्वरीत महराष्ट्रात हवामान कोरडेच राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंशांनी चढ उतार होऊ शकतो. मात्र थंडीत फारशी वाढ होण्याची चिन्हे नाहीत.

पुणे (प्रतिनिधी) - माघारीच्या मॉन्सूनपासून पडलेला पावसावर रब्बी पिकांच्या पेरणीची वेळ साधण्यासाठी उत्सूक असलेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या पेरणीसाठी थंडीची प्रतिक्षा आहे. नैऋत्य मोसमी वारे देशातून पूर्णतः माघारी परतल्याने पावसाळा संपून हिवाळा ऋतू सुरु झाला आहे. मात्र हिवाळ्याच्या पहिल्याच ऑक्टोबर महिन्यात कमाल व किमान या दोन्ही तापमानांनी उचल खाल्ली आहे. पाणवठ्यांच्या भागातील पहाटेच्या थोड्याफार थंडीचा अपवाद वगळता राज्यात अद्याप हिवाळा सुरु होऊनही हिवाळ्याची चाहूल लागलेली नाही.

बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोला येथे राज्यातील सर्वाधिक ३७.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीहून दोन ते पाच अंशांनी उंचावलेले आहे. किमान तापमान विदर्भात सर्वाधिक उंचावले आहे. या विभागात नेक ठिकाणी किमाल तापमानात सरासरीहून दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणातही किमान तापमान सरासरीहून अल्प प्रमाणात उंचावलेले आहे. यामुळे अद्याप फारशी थंडी अनुभवास आलेली नाही.

हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या उपग्रह छायाचित्रांनुसार दक्षिण अरबी समुद्र व मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान आहे. उत्तरेकडील हिमालयालगतच्या राज्यांमध्ये व दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू राज्यांमध्ये पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने गुरुवारपासून राजस्थान, पंजाब, हरियानाच्या भागात माल व किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या भागातील तापमानात आणखी घट झाल्यास पुढील आठवड्यात उत्तरेकडून थंडी दाखल होवू शकते. मात्र, अद्याप यादृष्टीने हवामान घटकांची फारशी प्रगती झालेली नाही.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे बुधवारी (ता.२१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान व कंसात कमाल तापमानातील सरासरीहूनची वाढ अंश सेल्सिअसमध्ये - पुणे ३३.९ (२.२), नगर ३६.८ (४.१), जळगाव ३७.४ (२.६), कोल्हापूर ३३.९ (२.५), महाबळेश्वर २९.४ (३.५), मालेगाव ३६.४ (३), नाशिक ३४.४ (२.१), सांगली ३४.७ (२.२), सातारा ३३.१ (२.४), सोलापूर ३५.७ (३), मुंबई ३५.४ (२.६), अलिबाग ३७ (४.६), रत्नागिरी ३७ (४.६), पणजी ३५.८ (३.७), डहाणू ३५.६ (२.९), उस्मानाबाद ३३.२ (२.७), औरंगाबाद ३३.४ (१.५), परभणी ३५.९ (३.४), अकोला ३७.६ (४.१), अमरावती ३५.२ (१.६), बुलडाणा ३४.७ (२.३), ब्रम्हपुरी ३५.८ (३.४), चंद्रपूर ३६.८ (४.१), गोंदिया ३४.९ (२.६), नागपूर ३६.१ (३.४), वाशिम ३३.८, वर्धा ३७ (४.४), यवतमाळ ३५ (३.३)
------------------------------------ 

Monday, October 19, 2015

अतिसुक्ष्म ते अतिभव्य कृषी तंत्रज्ञानाचे सिमोल्लोंघन

लोगो - अॅग्रोवन कृषी प्रदर्शन 2015
-----------------
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन दोन दिवसांवर


पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील शेतीसाठी आणि शेती संबंधीत प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरणारे अॅग्रोवनचे कृषी प्रदर्शन आता अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपले आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच शुक्रवारी (ता.23) पिंपरी येथील हिंदुस्तान अॅंटिबायोटिक्सच्या मैदानावर हे प्रदर्शन सुरु होणार आहे. अतिसुक्ष्म व मोबाईल टेक्नॉलॉजीपासून ते अतिभव्य यंत्रसामग्रीपर्यंत सर्व प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसाद करुन शेती विकासाचे सिमोल्लंघन करण्याची संधी यातून उपलब्ध होणार आहे.

जमीनीची मशागत किंवा लागवड पुर्व कामांपासून ते पिक उत्पादनाची प्रक्रीया, विक्री व निर्यातीपर्यंतच्या संपूर्ण मुल्य साखळीतील प्रत्येक घटकाबाबतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असेल. शेतीपुरक व्यवसायातील संधींशी शेतकऱ्यांची जोडणी करण्यासाठी विशेष दालनांचीही निर्मिती करण्यात आली आहे. राज्य व परराज्यातील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद विचारात घेवून शेतकऱ्यांच्या सोईसाठी पुणे शहराजवळ असलेल्या पिंपरीमधील एच.ए.च्या भव्य मैदानावर यंदा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लहान-मोठ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अवजारे, ट्रॅक्‍टर, हार्वेस्टर, पिकांचे नवीन वाण, खते, बियाणे, ठिबक आणि तुषार सिंचन, कीडनाशके, पशूपालन, कुक्कुटपालन, प्रक्रिया उद्योग, पीक व्यवस्थापन, ठिबक सिंचन व तुषार सिंचन, पॅकेजिंग, शीतगृह तंत्र, सौर उर्जा उपकरणे, प्रतवारी यंत्रणा, टिश्‍यूकल्चर, पशूपालन, पोल्ट्री उद्योग, पॉलीहाऊस आदींचा यात समावेश आहे.

राज्य व देशपातळीवरील विद्यापीठे, संशोधन संस्था, प्रक्रीयाविषयक संस्था, शासनाचे विविध विभाग यांचाही यात तंत्रज्ञान व तज्ज्ञांसह सक्रीय सहभाग आहे. फोर्स मोटर्स लि. हे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक तर जे.जे. ओव्हरसीज हे प्रायोजक आहेत. आईज कार्पोरेशन प्रा.लि. हे सहप्रायोजक आणि डॉ.बावसकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा.लि. हे नॉलेज पार्टनर आहेत.

- ट्रॅक्टर जिंकण्याची संधी
अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे या ही वर्षी फोर्स टॅक्टर्समार्फत ट्रॅक्टर भेट मिळविण्याची संधी मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रदर्शनस्थळी प्रवेश घेताना देण्यात येणारी प्रवेशिका पूर्ण भरुन जमा करणे अत्यावश्यक आहे. जमा होणाऱ्या प्रवेशिकांतून एका भाग्यवान शेतकऱ्याला फोर्समार्फत हा ट्रॅक्टर देण्यात येईल.

- स्वतंत्र विषयांना स्वतंत्र दालने
राज्यभरातील शेतकऱ्यांनी अॅग्रोवनकडे केलेली विचारणा व मागणी यानुसार या प्रदर्शनात विविध विषयांवरील तंत्रज्ञानाची स्वतंत्र दालने उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये कृषी पर्यटन, बांबू पॉलिहाऊस, इनलाईन ठिबक मशिन, पशुखाद्य, मोबाईल तंत्रज्ञान आदी दालनांचा समावेश आहे.

- चर्चासत्रांची मेजवानी
प्रदर्शनात पाचही दिवस सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात विविध विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. दुष्काळमुक्तीपासून पिक उत्पादन ते प्रक्रीया उद्योजक होण्यापर्यंतच्या अनेक विषयांचा यात समावेश असून राज्यभरातील तज्ज्ञ मार्गदर्शक व प्रगतशिल शेतकरी त्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

चौकट
- अॅग्रोवन कृषी प्रदर्शन
कालावधी - 23 ते 27 ऑक्टोबर 2015
ठिकाण - हिंदुस्तान अॅंटिबायोटिक्स (एच.ए) मैदान, पिंपरी, पुणे
वेळ - सकाळी 11 ते सायंकाळी 7
प्रवेश शुल्क - प्रतिव्यक्ती 40 रुपये
वाहतूक सेवा - न.ता. वाडी बस स्थानक (शिवाजीनगर) विशेष बस सेवा
-------------- 

Tuesday, October 13, 2015

पाणी वाटप

पुणे (प्रतिनिधी) - कायद्यातील तरतूदींनुसार समन्यायी पाणी वाटप अमलात आणण्यासाठी पश्चिम पट्ट्यातील धरणांतून उजणी व इतर धरणांमध्ये नदीमार्गे पाणी सोडल्यास प्रत्यक्ष सोडलेल्या पाण्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक पाणी वाया जाते असा पुर्वानुभव आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या आग्रहातून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील धरणांमधून उजणी व इतर धरणांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला तर प्रचंड प्रमाणात पाणी वाया जाण्याचा धोका आहे. यातून सर्वांचेच मोठे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी समन्यायी पाणी वाटपाच्या पद्धतीची फेररचना करण्याची गरज तज्ज्ञांमार्फत व्यक्त करण्यात येत आहे.

यंदाचा पावसाळा संपल्यानंतरही धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा होऊ शकलेला नाही. उजणीत अवघा १० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. याच वेळी घाटालगतच्या खडकवासला, पवना, चासकमान आदी धरणांमध्ये ६० ते ८० टक्के पाणीसाठा आहे. या धरणांतून उजनीमध्ये पाणी सोडण्याची याचिका जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी नुकत्याच झालेल्या सुनावणीत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी, उजणी प्रकल्पाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून त्यांची बाजू ऐकूण घेतली आहे. येत्या आठ - पंधरा दिवसात याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या संभाव्य नुकसानीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुणे विभागातील धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती फारशी समाधानकारक नाही. पश्चिम पट्ट्यातील अनेक धरणे ५५ ते ८० टक्के भरली आहे. यामुळे पश्चिम पट्ट्यातील धरणांतून उजणीमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी आहे. नाशिक विभागातही नाशिकमधील धरणे व जायकवाडी प्रकल्प याबाबत अशीच स्थिती आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यानुसार राज्यात समन्यायी पाणी वाटपाचे धोरण आहे. संबंधीत खोऱ्यातील पाण्याचे ता भागातील सर्वांना समन्यायी पद्धतीने पाणी वाटून देण्याचे काम याद्वारे करण्यात येते. मात्र खोऱ्याच्या एका बाजूला पाणी असताना दुसरीकडे धरणे कोरडी असून तिव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचे वाटप समन्यायी व्हावे हे खरे पण सुमारे ३०० किलोमिटरपर्यंत ते पुरवताना बाष्पिभवन, गळती आदी माध्यमातून मोठे नुकसानीचा धोका आहे. शिवाय यामुळे पाटाने पाणी सोडण्यावरही मर्यादा येणार आहे. यामुळे नदीतून पाणी सोडू नये, अशी मागणी आहे.

- पाणीवापरावर निर्बंध हवेत
पुणे व पिंपरी चिंचवडसह मोठ्या शहरांमध्ये प्रतिव्यक्ती गरजेपेक्षा कित्येक पट अधिक पाणी वापरले जाते. जादा पाणी वापरामुळे सांडपाणीही अधिक प्रमाणात तयार होत असून त्यासाठीही अतिरिक्त पाणी वाया घालवले जाते. शहरांच्या या अतिरेकी पाणी वापरामुळे शेतीला पाणी कमी पडत असून शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरवले जात आहे. यंदाची स्थिती पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने बिकट आहे. यामुळे पाणी वापरावर निर्बंध आणावेत. राज्य शासनाने या सर्व बाबींकडे गांभिर्याने पहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
----------------------- 

मॉन्सून दोन दिवसात परतनार



पावसाळ्याची अखेर; हिवाळ्याची चाहूल

पुणे (प्रतिनिधी) - बरोब्बर चार महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर आता येत्या दोन दिवसात राज्यातील पावसाळा संपणार असून हिवाळ्याला प्रारंभ होणार आहे. हवामान खात्याने येत्या दोन दिवसात नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या वाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील परतीचा प्रवास पूर्ण होऊन राज्य मॉन्सूनमुक्त होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतेक ठिकाणी पाऊस थांबला असून उन्हाची ताप व थंडीची झुळूकही वाढू लागली आहे. तुरळक ठिकाणी पडत असलेला पाऊसही या दोन दिवसात पूर्णपणे थांबण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने शुक्रवारी (ता.१६) सकाळपर्यंत फक्त कोकणात एखाददुसऱ्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून उर्वरीत संपूर्ण महाराष्ट्रात आकाश निरभ्र व हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकणेतर महाराष्ट्रात कोठेही पावसाची शक्यता नाही. या भागात कमाल तापमानात अल्पशी वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात ऑक्टोबर हिट जाणवू लागली असून कमाल तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत उंचावला आहे.

गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. मध्य पूर्व अरबी समुद्रातील तिव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तिव्रता आणखी कमी होऊन त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र महाराष्ट्रापासून दूर ओमानच्या आखाताच्या दिशेने सरकत आहे. राज्यांतर्गत भागात वाऱ्याची दिशाही मॉन्सूनच्या नेहमीच्या दिशेच्या विरुद्ध झाली आहे. राज्यात बाष्पयुक्त ढगांची आवकही थांबलेली आहे. यामुळे राज्यातील पाऊस थांबून मॉन्सून माघारी परतणार अशी स्थिती आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. माथेरान येथे सर्वाधिक ४० मिलीमिटर पाऊस पडला. कोकणात सांगे व मध्य महाराष्ट्रात सुरगणा येथे प्रत्येकी २० मिलीमिटर पाऊस पडला. कणकवली, लांजा, संगमेश्वर, देवरुख, सुधागड, पाली, विक्रमगड, गगनबावडा, गारगोटी, भुदरगड, गिरणा धरण, महाबळेश्वर या ठिकाणी प्रत्येकी १० मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - अलिबाग ३३ (२६), डहाणू ३४ (२६), पणजी ३२ (२५), हर्णे ३३ (२५), मुंबई ३३ (२५), रत्नागिरी ३३ (२३), नगर ३५ (२०), जळगाव ३८ (२१), कोल्हापूर ३२ (२२), महाबळेश्वर २६ (१७), मालेगाव ३८ (२२), नाशिक ३३ (२१), पुणे ३१ (२१), सांगली ३१ (२३), सातारा ३१ (२०), सोलापूर ३५ (२३), औरंगाबाद ३३ (२१), नांदेड ३७ (१९), उस्मानाबाद ३३ (२०), परभणी ३६ (२१), अकोला ३७ (२१), अमरावती ३५ (२०), ब्रम्हपुरी ३६ (२३), बुलडाणा ३४ (२३), चंद्रपूर ३५ (२३), नागपूर ३७ (२०), वर्धा ३७ (२०), यवतमाळ ३५ (२०)
------------------