Sunday, April 26, 2015

"शेती'साठी करा मोबाईलचा वापर - Mazahi Aaika

तरुण पोरांची मोबाईलवर भराभर फिरणारी बोटं पाहिली की हेवा वाटतो त्यांचा. किती लवकर ही मुलं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन वापरतात. पण, त्यात "टाईमपास'चा भाग किती आणि उपयोग काय? मुलानं हट्ट धरला म्हणून त्याला दहा हजाराचा ऍन्ड्रॉईड मोबाईल घेतला. मग आग्रहाने त्याच्याकडून मी त्याचा वापर समजून घेतला. पाण्याची मोटर चालू बंद करायचं, दुधाचा हिशेब ठेवायचं, सर्व पिकांचे फोटो काढून त्याचे रेकॉर्ड ठेवण्याचं काम तो मोबाईलवरच करतो.

गेल्या दहा वर्षात जगात सर्वाधिक वेगाने विकसित झाले, लोकांनी स्विकारलेले आणि जगणं सोपं झालं अशा तंत्रज्ञानामध्ये मोबाईलचा नंबर पहिला असेल. जादूच्या कांडीसारखे काम करतो राव मोबाईल. पण आपण शेतकऱ्यांनी त्याकडं गांभिर्यानं पाहिलेलंच नाही अजून. घराघरात पोरांकडं मोबाईल आहेत, पण ते गेम खेळायला, गाणी ऐकायला आणि पिक्‍चर पहायला घेतलेत की काय असं दिसतं. त्याचा शेतीसाठी कसा वापर करायचा हेच अनेकांना उमगत नाही. उमगले तरी पचणी पडत नाही. आणि याच वेळी आपण बाजारभावासाठी, योजनांच्या माहितीसाठी, नवीन शोधण्यासाठी, प्रश्‍नांवर उत्तर मिळविण्यासाठी हेलपाटे मारत खर्च करत बसतो. काखेत कळसा आणि गावला वळसा म्हणतात तशी अवस्था आहे.

मोबाईल हे आता फक्त संभाषणाचे माध्यम राहीलेले नाही. आपण शेतकऱ्यांनी सर्वात आधी आपले मोबाईल निट समजून घेतले पाहिजेत. त्यात आपण काय काय करु शकतो हे समजलं तर फुटकटे हालपाटे, हमाली, खर्च वाचू शकतो. नुकसान वाचू शकतं, उत्पादन वाढू शकतं. ही अतिशयोक्ती नाही. राज्यात अनेकजण मोबाईलच्या मदतीनं चांगली शेती करत आहेत. मोबाईलवर वॉट्‌सअपमध्ये पिकनिहाय शेतकरी गट तयार झालेत. त्यात शेतकरी, शास्त्रज्ञ, व्यापारी सगळेच असतात. फोटो, व्हिडीओ सर्वांना पाहता येतात. शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहारही होतात.

फेसबूकवर शेतकरी गट तयार करुन अनेकांनी खते, बियाणे मिळविण्यापासून ग्राहकांना थेट विक्रीपर्यंत लाभ मिळवला आहे. अत्यंत अद्ययावत माहिती समजल्यानं चांगला निर्णय, लाभ घेता येतो. आपल्या शेताचे संकेतस्थळ, फेसबूक पेज तयार करुन आपण आपल्या मालाची प्रसिद्धी करु शकतो. त्यातूनही ग्राहकांशी, तज्ज्ञांशी जोडणी करता येते. आपल्या भागातील हवामानाची रोजची माहिती, जगातल्या हव्या त्या बाजारपेठेतील बाजारभाव मिळवता येतात. कुठूनही पाण्याची मोटार चालू बंद करण्यापासून ते अगदी किड रोगांवर शास्त्रज्ञांकडून उपाय मिळवतात येतात. पण यासाठी सर्वात महत्वाचे काम म्हणजे मोबाईल समजून घेणं आणि त्याचा शेतीसाठी वापर सुरु करणं. सुरवातीला जड जाईल, पण जमलं की गाडी सुसाट पळलं.
- एक शेतकरी
-------------- 

Friday, April 24, 2015

यशोगाथा - सोपान करंडे, कोल्हारवाडी, पुणे

एकत्र कुटुंब यशोगाथा
सोपान करंडे, कोल्हारवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे
------------------- 

तयारी खरिपा ची - भाग 4

निविष्ठा गुणनियंत्रणासाठी
कृषी विभागाची जय्यत तयारी

दृष्टीक्षेपात गुणवत्ता नियंत्रण...
- 1131 निरिक्षकांची नेमणूक; न्यायालयीन दाव्याचीही तयारी
ृ- विक्री केंद्रे, गोदामे, प्रयोगाशाळा, उत्पादन केंद्रांची होणार तपासणी
- बियाणे 20875, खते13000, किटकनाशके 5400 नमुने तपासणी
- कृषीच्या सर्व कार्यालयांना तपासणीचे "टारगेट', मार्गदर्शक सुचना वितरीत
- खरेदीची बिले, शेतकऱ्यांच्या सह्या, बोगस व जादा दराने विक्रीवर कटाक्ष
- डमी गिऱ्हाईके पाठवूनही केली जाणार लिंकिंगचा पंचनामा

पुणे (प्रतिनिधी) ः येत्या खरिप हंगामात राज्यभर वितरिक होणाऱ्या हजारो टन खते, बियाणे व किटकनाशकांची गुणवत्ता तपासण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. निविष्ठा तपासणी मोहीमेच्या दृष्टीने मे महिना सर्वाधिक महत्वाचा राहणार आहे. कृषी विभागाने यासाठी राज्यभर निरिक्षक, भरारी पथके, तक्रार निवारण समित्यांची स्थापना केली असून शेतकऱ्यांना निविष्ठांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात येत्या खरिपासाठी 407 निविष्ठा उत्पादकांकडून खते, बियाणे, औषधांचा पुरवठा होणार असून त्यांचे तब्बल एक लाख 18 हजार 993 वितरकांमार्फत शेतकऱ्यांना पुरवठा होणार आहे. गुणवत्ता नियंत्रण अभियानात या सर्व उत्पादक व विक्रेत्यांची कायद्यानुसार तपासणी होणार आहे. बोगस, अप्रमाणित व भेसळयुक्त निविष्ठा, जादा दराने विक्री, लिंकिंग, साठेबाजी आदी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागामार्फत जप्ती, विक्री बंदी, परवाने रद्द करणे, न्यायालयात दावे दाखल करणे, पोलिसात फौजदारी तक्रार दाखल करणे आदी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे.

नियमित पुरवठ्यांच्या निविष्ठांबरोबरच अनुदानित निविष्ठांची पात्र शेतकऱ्यांनाच वितरण झाले का याचीही उलटतपासणी करण्यात येणार आहे. दोषी कंपन्या व व्यक्तींवर न्यायालयात दावे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून या कामी हालगर्जीपणा करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

- कंपन्यांची असमान वर्गवारी
निविष्ठा उत्पादकांची त्यांची गेल्या काही वर्षातील गुणवत्ता विषयक कामगिरी, झालेल्या कारवाया, तक्रारी यानुसार अ, ब, क, ड या चार गटात वर्गिकरण करण्यात आले असून अ व ब गटातील अनुक्रमे पाच व 10 टक्के तपासणी करण्यात येणार आहे. सर्वाक्षिक कटाक्ष क व ड गटातील कंपन्यांवर राहणार आहे. या कंपन्यांच्या अनुक्रमे 25 व 60 टक्के नमुन्यांची तरपासणी करण्यात येणार आहे. म्हणजे गुणवत्ता तपासणीसाठी काढलेल्या 100 नमुन्यांत 60 नमुने ड गटातील, 25 नमुने क गटातील, 10 नमुने ब गटातील तर फक्त पाच नमुने अ गटातील कंपन्यांचे असतील.

- लेबल क्‍लेम तपासणी मोहीम
कृषी विभागाच्या सर्व यंत्रणेमार्फत एक जून ते 30 जून 2015 या कालावधीत राज्यभर लेबल लिफलेट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत उत्पादक व विक्रेते यांची तपासणी, संशयास्पद निविष्ठांचे नमुने व लेबल क्‍लेमची तपासणी कयात येणार आहे. यात कायद्याचे उल्लंघन झालेल्याचे वा फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित निविष्ठा, व्यक्ती व परवान्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या स्पष्ट सुचना आयुक्तालयामार्फत सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

- संजिवकांचीही होणार तपासणी
पिक वाढ संजिवकांसह कुठल्याही कायद्यात समाविष्ट नसलेल्या निविष्टांचीही गुणवत्ता तपासणी करण्याचा महत्वपुर्ण निर्णय कृषी आयुक्तालयाने घेतला आहे. मात्र ही तपासणी त्यात नोंदणीकृत किटकनाशकांचे काही घटक आहेत का या संदर्भाने होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची अशा निविष्ठांमधून होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या अशा सर्व निविष्ठांची तपासणी करण्याचे आदेश निरिक्षकांना देण्यात आले आहेत.

- येथे करा तक्रार
कृषी निविष्ठांविषयी शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर 1800 233 4000 हा टोल फ्री म्हणजेच निशुल्क दुरध्वनी क्रमांक उपलब्ध आहे. विभागिय पातळीवर तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी तंत्र अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे ः पुणे - 9373101242, नाशिक - 9423082046, अमरावती - 9422855587, औरंगाबाद - 9422293200, कोल्हापूर - 944963709, लातूर - 9422875606, नागपूर - 9404951051

- तक्रारीवर अशी होईल कार्यवाही
शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर नोंदवहीत त्याची नोंद करुन शेतकऱ्याला पोच दिली जाईल. उपविभागिय कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत सात दिवसाच्या आत क्षेत्रिय पहाणी, तपासणी होईल. पंचनाम्यात शेतकऱ्याची साक्ष घेतली जाईल व पंचनाम्याची अंतिम प्रतही त्याला दिली जाईल. अहवालातील निष्कर्ष स्पष्ट व निसंग्दिग्ध असावा, वाटते, शक्‍यता असे शब्द वापरु नये व सर्व बाबींची शास्त्रीय, कायदेशीर नोंद ठेवावी, असे आदेश उपविभागिय व तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कापूस पिक विषयक तक्रारींवरील कार्यवाही कापूस बि बियाणे कायद्याअंतर्गत जिल्हास्तरीय समितीमार्फत स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.
------------(समाप्त)--------- 

भेंडी निर्यात सुरु

- फायटो प्रमाणपत्रांना हिरवा कंदील

पुणे (प्रतिनिधी) ः निर्यात प्रणाली सुधारणेच्या नावाखाली गेली 25 दिवस बंद असलेली भेंडी निर्यात अखेर पुन्हा सुरु झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाने शुक्रवारी रात्री निर्यातक्षम बागांना फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. यामुळे शनिवारपासुन राज्यातील भेंडीची युरोपिय देशांना होणारी निर्यात पुन्हा सुरु झाली आहे.

युरोपिय बाजारपेठेत पाठवलेल्या भेंडीत फळमाशी (थ्रीप्स) आढळल्याचे निदर्शनास आल्यानंतर निर्यात प्रणालीत सुधारणा करुन सर्व उत्पादन क्षेत्राची नोंदणी व प्रत्यक्ष तपासणी करुन कीडमुक्त उत्पादनाची हमी मिळविण्यासाठी केंद्रीय कृषी विभागाने स्वतःहून मार्चअखेरीस देशातील भेंडी निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्रीय कृषी सचिवालय, प्लॅन्ट क्वारंटाईन विभाग व अपेडा यांच्याकडून निर्यात प्रणालीत सुधारणा करण्यात येणार होती.

मात्र बंदीला 20 दिवस उलटल्यानंतरही याबाबत केंद्राकडून काहाही हालचाल झाली नाही. यामुळे भेंडीचे देशांतर्गत दर कोसळले. निर्यातीचा हंगाम हातचा जावून मोठे नुकसान होण्याचा धोका उद्भवला होता. बारामती व फलटणमधील शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी या प्रश्‍नी लक्ष घातल्यानंतर वेगाने सुत्र हलून निर्यात पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेली तीन दिवस प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाचे पथक महाराष्ट्रात तळ ठोकून असून निर्यातदारांनी अपेडाकडे नोंदवलेल्या बहुतेक बागा तपासून फळमाशीचा प्रादुर्भाव नसलेल्या किंवा नगण्य असलेल्या क्षेत्रावरील भेंडीच्या निर्यातीसाठी ना हरकत दिली आहे. याबाबतचे ऑडिट रिपोर्ट केंद्राला पाठविल्यानंतर प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाने निर्यातीस पात्र ठरलेल्या भेंडीला फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याच्या सुचना राज्याच्या कृषी विभागाला दिल्या आहेत. यानुसार फलटण, बारामती परिसरातून भेंडी निर्यात करणाऱ्या केबी एक्‍स्पोर्टसह इतर काही कंपन्यांची निर्यात शनिवारपासून पुन्हा सुरळित सुरु झाली आहे.

""मुंबई व पुण्यातून शुक्रवारी रात्री फायटो मिळाल्याबरोबर राज्यातून चार पाच कंपन्यांच्या कन्साईनमेंट युरोपला रवाना झाल्या आहेत.''
- सचिन यादव, सरव्यवस्थापक, के बी एक्‍स्पोर्ट, फलटण
------------------- 

आम्ही स्वयंसेवी - SSIAST

शेतकरी प्रबोधन, प्रशिक्षणात
श्री श्री कृषी विज्ञान संस्थेची मोहर
----------------
संतोष डुकरे
---------------
शेतकऱ्यांच्या विकासाचा हे मुख्य उद्दीष्ट घेवेवून आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी कर्नाटकातील बंगलोर 2000 साली श्री श्री ऍग्रिकल्चर सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी ट्रस्ट (श्री श्री कृषी विज्ञान व तंत्रज्ञान संस्था) ची स्थापन केली. गेल्या पंधरा वर्षात या संस्थेमार्फत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये भरीव कामगिरी करण्यात आली असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ज्ञानाची व प्रगतीची नवी कवाडे खुली झाली आहेत.
-------------------
श्री श्री कृषी विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेमार्फत देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात संस्थेमार्फत अनेक उपक्रम सुरू आहेत. नैसर्गिक शेती, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, रसायनमुक्त शेती, कृषी विषयक पदविका अभ्यासक्रम, पर्यावरण विकास, देशी गोवंश संगोपन व संवर्धन, देशी बीज विकास आदी विषयक अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांवर संस्थेचा मुख्य भर असून त्यातून अनेक यशोगाथा आकाराला आल्या आहेत.

रासायनिक किंवा अनैसर्गिक अनैसर्गिक कृषी निविष्ठा वापरल्याने कृषी उत्पादनात वाढ झाली असली तरी त्याच्या दुष्परिणामांमुळे वातावरण, हवा, पाणी, माती प्रदूषित झाले आहे. अशा स्थितीत जमिनीवरील व जमिनीखालील जैविक चक्र सक्रिय करण्याच्या उद्देषाने संस्थेमार्फत रसायनमुक्त नैसर्गिक शेती ला चालना देण्यात येत आहे. देशी गाय, तिचे शेण, मूत्र यांचा वापर वाढविण्यास शेतकऱ्यांना चालना देण्यात येत आहे. याशिवाय संस्थेमार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशातील 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

रसायनमुक्त नैसर्गिक शेती, देशी गायीचे महत्त्व व शेण-मुत्राचा वापर, उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर, आंतरपिके, मिश्रशेती पद्धती, कीड व रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी विविध वनस्पतीचा वापर, देशी बियाणे निवड पद्धतीने वाण सुधारणा, बियाण्याचे सर्वेक्षण, संरक्षण व उत्पादन, बियाणे बॅंक, फळे व भाजीपाला उत्पादनवाढ व काढणीपश्‍चात प्रक्रिया, जमीन समृद्धी अशा अनेक विषयांवर संस्थेमार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मानसिक उभारी देण्यापासून ते पीक उत्पादनवाढीपर्यंत अनेक प्रकारचे पाठबळ संस्थेमार्फत देण्यात येत आहे.

- श्री श्री किसान मंच
देशभरात कृषी क्षेत्रात संस्थेचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपातळीपासून जिल्हा, राज्य व देशपातळीवर संस्थात्मक उभारणीचे काम नुकतेच संस्थेमार्फत सुरू आहे. ग्राम पातळीवर श्री श्री किसान मंच स्थापन करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्‍नांवर, अडचणीवर, तंत्रज्ञान प्रसार, पणन विषयक काम करण्यात येत आहे. जिल्हा पातळीवरील कृषी तज्ज्ञांच्या समितीमार्फत शेतकरी, शासन, ग्राहक, शास्त्रज्ञ व धोरणकर्ते अशा विविध वर्गाला स्वाभिमान, आर्थिक बळ, आत्मिक व आध्यात्मिक बळ देण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अंकुशदादा भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषी शिखर समिती स्थापन करण्यात आलेली असून त्यात कृषिभूषण विजयअण्णा बोराडे, माजी कृषी आयुक्त कृष्णा लव्हेकर, माजी कृषी संचालक जयंत महल्ले, ज्येष्ठ पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नितीन मार्कंडेय व डॉ. माधव पोळ यांचा समावेश आहे. या समितीमार्फत विदर्भातील सात, मराठवाड्यातील तीन व पश्‍चिम महाराष्ट्रातील चार अशा 14 जिल्ह्यांमध्ये शेतकरी मेळावे व इतर उपक्रम सुरू आहेत. किसान मंचकडे आत्तापर्यंत सहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

- देशी गोवंश विकास
देशी गाईची दूध उत्पादन क्षमता व इतर गुण लोक विसरत चालले आहेत. योग्य संवर्धन व जोपासना केल्यास देशी गाय जर्सी व इतर गायींच्या बरोबरीने दूध देत आहेत. जर्सी व तत्सम गायीचे दूध "ए 1' समजले जाते. हे दूध दूध मानवी आरोग्यास हानिकारक असते, असे न्युझीलॅन्डमधील शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. तुलनेत देशी गायीच्या दुधाला "ए 2' दूध संबोधले जाते. आशिया खंडातील देशी गायींचे दूध पुरातन काळापासून उत्कृष्ट समजले जाते आहे. या पार्श्‍वभूमीवर "ए 2' दुधाचा प्रसार, प्रचार, उत्पादन वाढविण्यासाठी जागृती करण्याचे प्रयत्न संस्थेमार्फत सुरू आहेत. देशी गाईच्या संवर्धन व संगोपनासाठी देशात 10 गोशाळा स्थापन केल्या असून सुरत, महाराष्ट्र, चेन्नई या राज्यांत गोशाळांचे काम चालू आहे.

- देशी बीज बॅंक
दर्जेदार, सकस व अस्सल गावरान किंवा देशी बियाणे हा समृद्ध शेतीचा मुख्य आधार असतो. नैसर्गिक शेतीत देशी बियाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दृष्टीने संस्थेमार्फत देशी बियाण्याच्या विकासासाठी व प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करण्यात येत आहे. त्यातही महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यांमध्ये या कामाची व्याप्ती अधिक असून आत्तापर्यंत गहू, हरभरा, मूग आदी पिकांच्या हजारो रुपयांच्या देशी बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी स्वतःची बियाणे बॅंक तयार करत आहेत.

- सर्वांसाठी कृषी शिक्षण
देशातील सर्व वयोगटातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, फळे व भाजीपाला मूल्यवर्धन पदविका, पीक व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका, ऍग्री क्‍लिनिक ऍण्ड ऍग्री बिझनेस प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका आदी विविध प्रकारचे कृषी शैक्षणिक अभ्यासक्रम संस्थेमार्फत उपलब्ध करण्यात आले असून त्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आहे. संस्थेच्या बंगलोर येथील मुख्य कार्यालयातून हे अभ्यासक्रम चालवले जातात.

- कमी खर्चाचे देशी तंत्रज्ञान
संरक्षित शेतीचे अत्यंत कमी खर्चाचे मात्र अतिशय उपयुक्त असे देशी तंत्रज्ञान प्रसारित करण्यासाठी संस्थेमार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. यातूनच कमी खर्चिक पॉलिहाऊस, शेडनेट हाउस उभारणी व वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. शेतीविषयक विविध बाबींवर संशोधन करण्यासाठी संस्थेमार्फत रांची येथे संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

- पाणलोट विकास
सिंचन हा शेतीचा आत्मा आहे. तो अधिक सशक्त करण्यासाठी संस्थेमार्फत पाणलोट विकास, जलसंवर्धन, मृद संवर्धन, नदी नाले पुनरुज्जीवन आदी कामे करण्यात येत आहेत. या जोडीनेच वन लागवड, फळझाड लागवड, जैविक इंधन झाडाची लागवड या माध्यमातून वन व पर्यावरण समृद्धीलाही चालना दिली जात आहे. दर वर्षी गुरुपौर्णिमेला "दी आर्ट ऑफ लिव्हिंग - वर्ल्ड एन्व्हिरॉन्मेंट डे' साजरा केला जातो. यात प्रामुख्याने वृक्षलागवड कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संस्थेमार्फत देशात आत्तापर्यंत एक कोटीहून अधिक लक्ष्मीतरू वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. हा बहुगुणी वृक्ष असून त्याचा वापर कॅन्सरवरील उपचार व इतर अनेक कारणांसाठी केला जातो.

- श्री श्री शेतकरी बाजार
शेतकऱ्यांना गोपालन, दुग्धव्यवसाय, फळे, भाजीपाला, अन्नधान्य उत्पादन याबाबत मार्गदर्शन करून सेंद्रिय उत्पादनवाढ करतानाच काढणीपश्‍चात प्रक्रिया आणि शेतमाल विक्री व्यवस्थेतही सुधारणा करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. यासाठी मध्य प्रदेशातील भोपाळ, बिहारमधील रांची आदी ठिकाणी श्री श्री शेतकरी बाजार सुरू करण्यात आले आहेत. गुजरातमध्ये सुरत व इतर काही शहरांमध्ये ऑरगॅनिक शॉप सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी शेतकरी आपला शेतमाल थेट विक्रीसाठी ठेवतात. याशिवाय संस्थेच्या नावाने जालन्यासह अनेक शहरामध्येही शेतकरी उत्पादनाची थेट विक्री करत आहेत.

*कोट
""नैसर्गिक व सेंद्रीय शेती केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांच्या विकासासाठी संस्था कार्यरत आहे. मातीपासून शेतमाल विक्रीपर्यंत "मुल्य साखळीचा'चा प्रत्येक कमकुवत दुवा बळकट करण्याचा प्रयत्न आहे.''
- डॉ. रामकृष्ण मुळे, अध्यक्ष, श्री श्री ऍग्रिकल्चर सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी ट्रस्ट, बंगलोर
---------------
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ ः ssiast.com
संपर्क ः डॉ. रामकृष्ण मुळे - 09342139075
---------------
छायाचित्रे - अमित गद्रे सरांच्या लॉग ईनला मुव्ह केलेली आहेत.
---------------

भेंडी निर्यातीसाठी बागांची तपासणी सुरु

शरद पवार यांच्या सुचनेनंतर गती; निर्यात सुरु होण्याची शक्‍यता

पुणे (प्रतिनिधी) ः युरोपसाठीच्या भेंडी निर्यातीवर स्वतःहून बंदी घालून तीन आठवडे गप्प बसलेल्या केंद्रीय कृषी विभागाला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी बंदीच्या परिणामांचे गांभिर्य लक्षात आणून दिल्यानंतर जाग आली आहे. श्री. पवार यांच्या सुचनेनंतर लगेचच केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून काटेकोर तपासणी करुन निर्यातक्षम प्लॉटची माहिती दिल्लीला पाठवणे सुरु झाले आहे. येत्या दोन दिवसात निर्यातीला हिरवा झेंडा मिळण्याची शक्‍यता आहे.

ऐन हंगामात निर्यात प्रक्रीयेत सुधारणा करण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने देशातील भेंडी युरोपला निर्यात करण्यास बंदी घातली. भेंडीच्या क्षेत्राची पाहणी करुन किडमुक्त पिकाची खात्री पटल्यानंतर निर्यातीला मान्यता दिली जाईल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात दोन तीन आठवडे उलटूनही काहीही हालचाल झाली नाही. शेवटी बारामती व फलटण परिसरातील शेतकरी विश्‍वासराव जाचक, अरविंद निंबाळकर, संदीप शिंदे, अमोल परकाळे, ऍड. अभिजित पवार, हणमंत लोंढे आणि निर्यात कंपनी प्रतिनिधी सचिन यादव व विकास नागवडे यांनी श्री.पवार यांची दिल्लीत भेट घेवून या प्रश्‍नी तोडगा काढण्याची विनंती केली.

श्री. पवार यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर केंद्रीय कृषी सचिव श्रीराज हुसेन व प्लॉंट क्वारंटाईनचे विभागाचे सहसचिव उत्पल सिंग यांच्याशी संपर्क साधला. हंगाम हातचा जावू नये यासाठी पिकाची पहाणी करुन निर्यात सुरु करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, निर्यातदारांना सुधारणेस थोडा वेळ द्यावा, अशा सुचना दिल्या. निर्यातदारांनी युरोपच्या निकषांचे आणि कृषी विभागाच्या एसओपीचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर भेंडी उत्पादक शेतकरी, श्री. यादव व श्री. सिंग आणि हुसेन यांची कृषी भवनमध्ये बैठक झाली. प्लॉन्ट क्वारंटाईनची टिम लवकरच कार्यान्वित होईल, असे आश्‍वासन त्यांनी या वेळी दिली.

यानंतर लगेचच निर्यातदारांनी अपेडाला दिलेल्या उत्पादकांच्या माहितीनुसार प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाचे अधिकारी बारामती व फलटनमध्ये दाखल झाले. गेल्या दोन तीन दिवसात या अधिकाऱ्यांनी विविध निर्यातदारांकडील भेंडीच्या क्षेत्राची पहाणी केली आहे. या पिक पहाणीचे अहवाल दिल्लीला पाठविण्यात येत असून निर्यातदार केंद्राच्या फायटो प्रमाणपत्रासाठीच्या ना हरकतीच्या प्रतिक्षेत आहेत. केबी एक्‍सपोर्टच्या तपासणी झालेल्या 40 पैकी तीन प्लॉट निर्यातीसाठी अपात्र तर 37 प्लॉट पात्र ठरल्याची माहिती कंपनीचे सरव्यवस्थापक सचिन यादव यांनी दिली. फलटण व बारामती या दोन तालुक्‍यात सुमारे 600 एकर क्षेत्रावर भेंडीचे पिक घेण्यात येत आहे.

- पॅकहाऊस पातळीवर तपासणीची गरज
प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाने फळमाशी मुक्त आंब्याची खात्री देण्यासाठी बॅकवर्ड लिंकेजमध्ये बागेच्या पातळीवरील उपाययोजना तर फॉरवर्ड लिंकेजमध्ये पॅक हाऊसच्या पातळीवर हॉट वॉटर ट्रिटमेंट बंधनकारक केली आहे. भेंडीच्या बाबतीत मात्र फक्त बॅकवर्ड लिंकेजमध्येच पिकातील किडींची पाहणी करण्यात येत आहे. हे करताना फॉरवर्ड लिंकेजचा महत्वाचा भाग असलेल्या पॅक हाऊस पातळीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आंब्याप्रमाणेच भेंडीचीही पॅक हाऊस पातळीवर थ्रीप्समुक्त असल्याची खात्री केल्यास बंदीचा प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली निघू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
------------(समाप्त)-----------

यवतमाळ डाळींब प्रशिक्षण

पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), यवतमाळ व अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ, पुणे (डाळिंब संघ) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (ता.26) यवतमाळ येथील गुरुदेव मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय डाळींब पिक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. डाळींब संघाचे अध्यक्ष अरुण देवरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

आमदार लमदन येरावार, जिल्हाधिकारी राहुल महिवाल, विभागिय कृषी सहसंचालक शु.रा. सरदार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यावेळी उपस्थित राहणार आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर व मोडनिंब (सोलापूर) येथिल कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रशांत कुंभार हे यावेळी डाळींब लागवडीपासून फळ विक्रीपर्यंतच्या सर्व बाबींवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मा व डाळिंब संघामार्फत करण्यात आले आहे.
--------------

Thursday, April 23, 2015

इस्राईलयच्या अभ्यास सहलीसाठी शेतकरी रवाना

ऍग्रोवन-केसरीतर्फे आयोजन; दौऱ्यात ऍग्रीटेक कृषी प्रदर्शनाचा सहभाग

पुणे (प्रतिनिधी) ः इस्राईलमधील अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि ऍग्रीटेक आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळ-ऍग्रोवन व केसरी टुर्स यांचा 32 शेतकऱ्यांचा गट गुरुवारी (ता. 23) इस्राईलला रवाना झाला. 28 व 29 एप्रिल रोजी येथे जागतिक पातळीवरील ऍग्रीटेक हे कृषी प्रदर्शन होत आहे. याकरिता ऍग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण व उपसरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले हेही या सहलीत सहभागी आहेत.

ऍग्रोवनमार्फत राज्यभरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय कृषी सहली हा या उपक्रमांचाच एक भाग असून, यंदा इस्राईलमधील कृषी ज्ञान तंत्रज्ञान अभ्यासण्यासाठी राज्यभरातील शेतकरी, संडे फार्मर, कृषी उद्योजक, अभ्यासक या सहलीत सहभागी झाले आहेत. केसरी ट्रॅव्हल्स मार्फत सहलीचे नियोजन करण्यात आले आहे.

इस्राईलच्या शेतीविषयी, पाणी वापराविषयी आत्तापर्यंत खूप ऐकले आहे. त्यामुळे तिथली शेती पाहण्याची, शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची आणि आपल्या उपयोगाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसाद करून स्वतःच्या शेतावर त्याची अंमलबजावणी करण्याच्या इच्छेने ऍग्रोवनसोबत या सहलीत सहभागी झालो आहोत. ऍग्रोवन आणि केसरी या कृषी आणि पर्यटन क्षेत्रातील दिग्गजांसोबत जगातले सर्वोत्कृष्ट कृषी तंत्रज्ञान पाहता येणार असल्याचा आनंद आहे, अशी भावना सुभाष महाले (नाशिक), शिवराम विरमकर (पुणे), दिपक पांढरे, डॉ. शाम बाभुळकर, निर्मला शेंबेकर आदींनी व्यक्त केली.

- प्रदर्शन आणि भेटी
सहा दिवसांच्या दौऱ्यात सहभागी शेतकरी तज्ज्ञांसोबत इस्राईलमधील काटेकोर पाणीवापर, गुणवत्तापूर्ण फळे, भाजीपाला व पीक उत्पादन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, हरितगृह आदी विषयक अद्ययावत तंत्रज्ञान प्रत्यक्ष अनुभवून आत्मसाद करणार आहेत. याशिवाय, इस्राईलमधील जागतिक वारसा म्हणून घोषित झालेली ठिकाणे, मृत समुद्र आदी पर्यटन स्थळांनाही भेटी देण्यात येणार आहेत.
----------------
""इस्राईल कोल्हापूर, सांगलीहूनही छोटा देश असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी शेतीत भारताहून खूप मोठी झेप घेतली आहे. फळे, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, सिंचन, पाण्याचा पुर्नवापर आदी विषयक माहिती या दौऱ्यात शेतकऱ्यांना सखोलपणे अभ्यासता येईल.''
- आदिनाथ चव्हाण, संपादक, ऍग्रोवन 

उन्हाच्या झळा वाढल्या - 23 April

- कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार
- किमान तापमानात अनेक ठिकाणी वाढ
- तुरळक ठिकाणी पावसाचीही हजेरी

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील चारही हवामान विभागांमध्ये कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या झळा तिव्र झाल्या आहेत. याबरोबरच तुरळक ठिकाणी पाऊसही सुरु आहे. शुक्रवारी (ता.24) तापमानात फारसा बदल होण्याची शक्‍यता नाही. हवामान खात्याने मराठवाड्यात एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याचा तर उर्वरीत राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

पुणे वेधशाळेने शनिवारपासून (ता.25) सोमवारपर्यंत (ता.27) विदर्भात एक दोन ठिकाणी पावसाची शक्‍यता व्यक्त केली असून उर्वरीत सर्व विभागांमध्ये हवामान कोरडे राहणार असल्याचे म्हटले आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात अनेक ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेले राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आलेली आहे.

राज्यातील चारही विभागात कमाल तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकणात भिरा येथे 41.5 अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे राज्यातील सर्वात जास्त 42.6 अंश सेल्सिअस, मराठवाड्यात नांदेड येथे 40.5 अंश सेल्सिअस तर विदर्भात वर्धा येथे 42.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भात सर्वत्र कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असून उर्वरीत महाराष्ट्रात तो चाळिशीच्या आसपास आहे. याबरोबरच कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीहून एक ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

दरम्यान, कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडला. पुणे जिल्ल्हयात जुन्नर, आंबेगाव खेड, मावळ तालुक्‍यात बुधवारी सायंकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार भागात व मावळमध्ये नांगरणी झालेल्या जमिनीत पाणी जिरुन साचले एवढा पाऊस झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. सोलापूर व सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. अक्कलकोटमध्ये सर्वाधिक 21 मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

देशातील हवामान स्थितीमध्ये तेलंगणापासून दक्षिण भारतात हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. पश्‍चिम बंगाल व बिहारच्या भागात चक्राकार वारे सक्रीय असून या वाऱ्यांपासून छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. पूर्व राजस्थान व लगतच्या भागावरही चक्राकार वारे सक्रीय आहेत. हिमालयीन भागात येत्या 27 एप्रिलनंतर नवीन पश्‍चिमी चक्रावात सक्रीय होण्याचा अंदाज आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे गुरुवारी (ता.23) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 34.5, अलिबाग 35.4, रत्नागिरी 33.2, पणजी 34.8, डहाणू 36.5, भिरा 41.5, पुणे 38.9, जळगाव 42.6, कोल्हापूर 36, महाबळेश्‍वर 30, नाशिक 37.6, सांगली 38, सातारा 38.7, सोलापूर 41.7, उस्माबाद 38.2, औरंगाबाद 39, परभणी 39, नांदेड 40.5, अकोला 41.3, अमरावती 40.4, बुलडाणा 39.5, ब्रम्हपुरी 41.6, नागपूर 42.3, वाशिम 39.8, वर्धा 42.5, यवतमाळ 40.5
---------(समाप्त)----------- 

Wednesday, April 22, 2015

दक्षिण आशियात सर्वत्र यंदा कमी पाऊस

एल निनोचा फटका शक्‍य; क्‍लायमेट आउटलुक फोरमचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः दक्षिण आशियातील सर्व देशांमध्ये येत्या जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीहून कमी प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरममार्फत (एसएएससीओएफ-6) व्यक्त करण्यात आला आहे. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश या देशांमध्ये कमी पाऊस पडण्याची सर्वाधिक शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. फोरममार्फत गेल्या वर्षीही सरासरीहून कमी ते सरासरीएवढ्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारताचा हिमालयीन भाग, केरळ, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल व ईशान्येकडील सर्व राज्ये, बांगलादेश, म्यानमार, अंदमान निकोबार व मालदीव या भागात यंदा सरासरीहून अधिक प्रमाणात मॉन्सून बरसण्याची शक्‍यता अधिक आहे. भारतात राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांमध्ये सरासरीहून कमी पावसाची शक्‍यता अधिक असल्याचे फोरमने प्रसिद्ध केलेल्या अंदाजात स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीच्या मॉन्सून पावसाचा आढावा आणि येत्या हंगामातील मॉन्सून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियायी देशांच्या फोरमची सहावी बैठक बांगलादेशातील ढाका येथे सुरू आहे. या बैठकीत दोन दिवसांच्या माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला. भारतासह सर्व दक्षिण आशियायी देशांतील राष्ट्रीय व विभागीय पातळीवरील हवामान विषयक संशोधन संस्था या बैठकीत सहभागी झाल्या आहेत.

जगभरातील हवामान स्थिती, विविध मॉडेलमार्फत व्यक्त करण्यात आलेले अंदाज व प्रशांत महासागरातील सौम्य एल निनोची सद्यःस्थिती या बाबी विचारात घेता दक्षिण आशियामध्ये येत्या मॉन्सूनमध्ये सरासरीहून कमी प्रमाणात पाऊस राहील याबाबत बैठकीत सहभागी सर्व शास्त्रज्ञांचे एकमत झाले. प्रशांत महासागरात एल निनो स्थिती असली तरी ती सौम्य असली तरी हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाच्या प्रमाणावर परिणाम होईल, यावरही तज्ज्ञांचे एकमत झाले. मॉन्सून कालावधीत एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्‍यता 70 टक्के आहे. मॉन्सून काळात सुरवातीला सौम्य राहून अखेरच्या टप्प्यात त्याची तीव्रता वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली.

मॉन्सून काळात हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान व इतर संलग्न घटक मॉन्सूनला अनुकूल राहण्याची शक्‍यता आहे. उत्तर गोलार्धातील बर्फाचे प्रमाण सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये सरासरीहून अधिक, डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये ते सरासरीच्या किंचित कमी होते. तर मार्चमध्ये त्यात सरासरीहून घट झाली. उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील बर्फाचे प्रमाण व आशियातील मॉन्सून यांच्यात नकारात्मक किंवा परस्परविरोधी संबंध आहे. यासह इतर घटकांच्या गेल्या काही महिन्यातील प्रभाव हा अंदाज देताना विचारात घेण्यात आल्याचे फोरममार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
-------------- 

यंदा देशात मॉन्सून सरासरीहून कमीच !

आयएमडीचा 93 टक्के पावसाचा अंदाज

*कोट
""मॉन्सूनचा कमी पावसाचा अंदाज असल्याने यंदाही दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागण्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आणि धोरणकर्त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.''
- डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री, भारत सरकार

""मॉन्सूनचे आगमन नक्की कधी होईल, याबाबतचा अंदाज हवामान विभागामार्फत येत्या 15 मे रोजी व्यक्त करण्यात येणार आहे.''
- डॉ. डी. एस. पै, प्रमुख, लांब पल्ल्याचा अंदाज विभाग, भारतीय हवामानशास्त्र विभाग

पुणे (प्रतिनिधी) : देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून) यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीहून कमी (93 टक्के) पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी (ता.22) व्यक्त केला. या अंदाजाहून पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यता गृहीत धरण्यात आली आहे. देशाची मॉन्सून पावसाची सरासरी 89 सेंटीमिटर म्हणजेच 890 मिलीमिटर आहे. गेल्या वर्षीच्या अंदाजाहूनही यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने देशात दुष्काळाची छाया कायम राहण्याची शक्‍यता आहे.

नवी दिल्ली येथील पृथ्वी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा हा अंदाज जाहिर केला. हवामान विभागाच्या लांब पल्ल्याच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. पै यावेळी उपस्थित होते. हवामान खात्यामार्फत मॉन्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जून महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे. या अंदाजात जुलै व ऑगस्ट महिन्यांतील पावसाचा अंदाज, मॉन्सूनची वाटचाल आणि भारताच्या चारही विभागात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण स्पष्ट करण्यात येणार असल्याचे डॉ. पै यांनी सांगितले.

यंदा सरासरीहून कमी पाऊस (90 ते 96 टक्के) पडण्याची शक्‍यता सर्वाधिक 35 टक्के असून, त्या खालोखाल सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस (90 टक्‍क्‍यांपेक्षा कमी) पडण्याची शक्‍यता 33 टक्के आहे. सरासरीएवढा पाऊस (96 ते 104 टक्के) पडण्याची शक्‍यता 28 टक्के आहे. सरासरीहून अधिक पावसाची (104 ते 110 टक्के) शक्‍यता फक्त 3 टक्के तर सरासरीहून अति पावसाची (110 टक्‍क्‍यांहून अधिक) शक्‍यता एक टक्के असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

उत्तर अटलांटिक व उत्तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे डिसेंबर व जानेवारी महिन्यातील तापमान, हिंदी महासागराच्या विषुववृत्ताजवळील पृष्ठभागाचे फेब्रुवारी महिन्यातील तापमान, पूर्व आशियातील फेब्रुवारी व मार्च महिन्यातील समुद्रसपाटीवरील हवेचा दाब, वायव्य युरोपमधील भूपृष्ठावरील हवेचे जानेवारी महिन्यातील तापमान व विषुववृत्तीय भागातील प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचे फेब्रुवारी व मार्च महिन्यातील प्रमाण या घटकांच्या नोंदींवरुन हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच मॉडेलनुसार हवामान विभागाने देशात 95 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीपेक्षा 12 टक्के आणि अंदाजाहून सात टक्के कमी (88 टक्के) पाऊस पडला.

- मॉन्सून मिशन मॉडलचा 91 टक्के अंदाज
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीच्या मॉन्सून मिशन प्रोजेक्‍ट अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या मॉडेलनुसार मॉन्सून प्रायोगिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीच्या 91 टक्के पावसाचा अंदाज आहे. या अंदाजात पाच टक्के उणे-अधिक फरक होण्याची शक्‍यता गृहीत धरण्यात आली आहे.
..............
"एल निनो'चा प्रभाव राहणार
आयएमडी आणि आयआयटीएमच्या अंदाजानुसार यंदाच्या मॉन्सून हंगामात एल-निनोचा प्रभाव राहण्याची शक्‍यता आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रशांत महासागराच्या पश्‍चिम आणि मध्य भागामध्ये पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. तर डिसेंबर 2014 ते मार्च 2015 या कालावधीमध्ये पूर्व प्रशांत महासागरामध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी होते. मात्र या तापमानात सध्या वाढ झाली असून, तेथे एल निनोची प्रभाव कमी आहे. एकंदरीत लक्षणे पाहता "एल निनो'चा मॉन्सूनवरील प्रभाव वाढण्याची चिन्हे आहेत. हिंदी व प्रशांत या दोन्ही महासागरांच्या सागरी पृष्ठभागाच्या स्थितीचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात येत असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
..........
चौकट
- अशी आहे पावसाची शक्‍यता (मॉन्सून 2015)
पावसाचे प्रमाण ---- शक्‍यता
90 टक्‍क्‍यांहून कमी --- 33 टक्के
90 ते 96 टक्के --- 35 टक्के
96 ते 104 टक्के --- 28 टक्के
104 ते 110 टक्के --- 3 टक्के
110 टक्‍क्‍यांहून अधिक --- 1 टक्के
................. 

Tuesday, April 21, 2015

विकास देशमुख यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार

पुणे ः राज्याचे कृषी आयुक्त व तत्कालिन पुणे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते राज्य शासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देवून नुकतेच गौरविण्यात आले. महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे व मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यावेळी उपस्थित होते. नागरी सेवा दिनाच्या औचित्याने मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री. देशमुख यांनी 2011 ते 2014 या कालावधीत पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. आर्थिक दुर्बल घटकांना 100 चौरस मीटर जागेत घर बांधणीसाठी आराखडे मंजूरीसाठी नमुना नकाशे मंजूर करण्यातआल्याने गावाच्या सुनियोजित विकासाला चालना मिळाली. हीच योजना आता राज्यभर राबविण्यात येणार आहे.

याशिवाय गौण खनिज कारवाईमध्ये जीपीएस तंत्रज्ञान व टोटल स्टेशन मशीनद्वारे मोजणी करुन शासनाच्या महसूली जमेत मोठी वाढ, अकृषक परवानगीसाठी ऑनलाईन पद्धत, गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले पांदणरस्ते खुले करण्याची मोहीम, शासन आपल्या दारी उपक्रमातून प्रमुख गावांमध्ये शिबिर घेवून विविध योजनांचे लाभ वाटप (समाधान योजना), राजस्व अभियान व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी या उल्लेखनिय कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
-----------

"कॉपसॅप'ला पंतप्रधान पुरस्कार

नवी दिल्ली ः कृषी विभागाच्या किड रोग सर्वेक्षण व संलनियंत्रण प्रकल्पाला (कॉपसॅप) केंद्र सरकारचा 2012-13 साठीचा संस्थात्मक श्रेणीतील "पंतप्रधान पुरस्कार' मंगळवारी (ता.21) प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्याचे जलसंधारण सचिव व तत्कालिन कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी हा पुरस्कार स्विकारला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

राष्ट्रीय पातळीवर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नाविन्यपुर्ण काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नागरी सेवा दिनी (21 एप्रिल) वैयक्तिक, संस्थात्मक व सांघिक या तिन गटांमध्ये पुरस्कार दिले जातात. यंदा 2012-13 व 2013-14 वर्षांसाठीचे पुरस्कार वितरण करण्यात आले. नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबविलेल्या "जिल्हा कौशल्य विकास' कार्यक्रमाला व अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पश्‍चिम त्रिपुरात मांडवी ब्लॉक येथे राबविलेल्या "आर्थिक समावेशन' प्रकल्पाला सांघिक श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

क्रॉपसॅप प्रकल्पात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करुन शेतकऱ्यांची माहिती संकलित करून पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे वेळोवेळी किटकांचा प्रादुर्भाव होण्याचा अंदाज करणे आणि नुकसान पातळीच्या आतच किडीचे नियंत्रण करणे शक्‍य झाले. यातून राज्य शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान टळले.

जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमातून गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार 700 युवकांना प्रशिक्षण देणअयात आले असून यातील एक हजार 300 युवक स्वतःच्या पायावर उभे राहीले आहेत. या कार्यक्रमात आदीवासी व इतर गरजू युवकांना ऑटोमोबाईल उद्योग, बांधकाम, हॉटेल उद्योग आदींचे सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण दिले जाते. समुपदेशन केंद्रामार्फत प्रशिक्षितांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. हा प्रकल्प सर्व जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून यंदा तो नागपूरसह पाच जिल्ह्यांत प्रायोगिक तत्वावर सुरु होणार आहे. अभिषेक कृष्णा यांच्यासह गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रंजीत कुमार, टी.एस.के. रेड्डी, पी.बी.देशमाने, वाय.एस.शेंडे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
-----------

युरोप, अमेरिकेला साखर निर्यात खुली

निर्यात धोरणा सुधारणा; तत्काळ अंमलबजावणी सुरु

पुणे (प्रतिनिधी) ः युरोप व अमेरिकेत साखर निर्यात करण्यासाठी मुक्त व्यापार धोरण अवलंबायचा निर्णय परराष्ट्र व्यापार महासंचालक (डीजीएफटी) कार्यालयाने घेतला आहे. यासाठी देशाच्या साखर निर्यात धोरणात सुधारणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणीही तत्काळ सुरु करण्यात आली आहे. यानुसार आता देशातील कुठल्याही साखर कारखान्याला युरोप व अमेरिकेला साखर निर्यात करण्यासाठी इंडियन शुगर एक्‍झिम कॉर्पोरेशन लि. या संस्थेमार्फत त्यांनी दिलेल्या मर्यादेतच साखर निर्यात करण्याचे बंधन राहीलेले नाही.

साखर निर्यात धोरणातील कलम 93 मध्ये साखर निर्यातीबाबतच्या नियमावलीचा समावेश आहे. यापुर्वीच्या तरतुदीनुसार युरोप व अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांसाठी निर्यात खुली होती. फक्त निर्यात होणाऱ्या साखरेची नोंद परराष्ट्र व्यापार महासंचालकांच्या विभागिय कार्यालयांकडे करणे बंधनकारक होते. ही नियमावली कायम ठेवत युरोप व अमेरीकेसाठीची निर्यातही खुली करण्यात आली आहे.

अमेरिकेसाठीच्या आयातीच्या तुलनेत देशांतर्गत उत्पादनाला संरक्षण देणाऱ्या "टेरिफ रेट कोटा' पॉलिसीचा अवलंब करण्यात आला आहे. यासाठी निर्यातदाराला साखरेचे मुळ उत्पादन प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ ओरिजीन) व निर्यातीविषयीची सर्व माहिती (वजन, किंमत, अंतर, नाव, परदेशी खरिददाराचा पत्ता इ.) मुंबईतील अतिरिक्त महासंचालक, परराष्ट्र व्यापार यांना व अपेडा (नवी दिल्ली) यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

युरोपसाठी सीएक्‍सएल कोटा पद्धती अंतर्गत साखर निर्यात करण्यासाठी अपेडा मार्फत त्यांच्या स्वतंत्र मार्गदर्शक सुचनांनुसार कोटा निश्‍चित करुन देण्यात येणार आहे. याशिवाय निर्यात होणाऱ्या सारखेचे वजन, किंमत, अंतर, नाव, परदेशी खरिददाराचा पत्ता इ. सर्व माहिती अपेडाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठीचे मुळ उत्पादन प्रमाणपत्र मुंबईतील अतिरिक्त महासंचालक परराष्ट्र व्यापार यांच्यामार्फत देण्यात येईल.

याशिवाय सेंद्रीय साखर निर्यातीची सर्व निर्यातप्रणाली पुर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहे. सेंद्रीय साखरेसाठी अपेडाचे प्रमाणपत्र बंधनकारक असून निर्यातीपुर्वी परराष्ट्र व्यापार महासंचालक कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. या सारखेच्या निर्यातीला प्रमाणाचे (क्वांटिटी) बंधन नाही. साखर निर्यात खुली आहे तोपर्यंत ही निर्यात सुरु ठेवता येईल, असे परराष्ट्र व्यापार महासंचालक कार्यालयाने म्हटले आहे.
-------- 

Monday, April 20, 2015

मुलाखत - डॉ. सुनिल पब्बी


आठवड्याची मुलाखत ः संतोष डुकरे
----------------------------------
डॉ. सुनिल पब्बी, प्रमुख, नॅशनल सेंटर फॉर कॉन्झरवेशन ऍन्ड युटिलायझेशन ऑफ ब्लू ग्रीन अल्गी, आयएआरआय, नवी दिल्ली
--------
डिपार्टमेंट ऑफ बायोटेक, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत 1986 साली स्थापना करण्यात आली. जर्मप्लाझम सेंटर म्हणून हे कार्यरत होते. 800 पेक्षा जास्त प्रजातींचा संग्रह आहे. बायोफर्टीलायझर शेतीसाठछी उपयुक्त. विशेषतः भातासाठी. स्थिर पाण्यात वाढते. लो लॅन्ड राईसमध्ये उपयुक्त. फोटो ऍटोट्रॉपीक. नायट्रोजन फिक्‍सेशन प्लॅन्ट आहे. याचा वापर केला तर नत्राची बचत होते. एकरी 20 ते 25 किलो नत्र, प्रतिपिक, प्रतिहंगाम वाचते. कॉन्ट्रीब्युशन आहे. युरीया डबल बचत. 46 टक्के नत्र, 40 टक्के बचत होईल.

सॉईल हेल्थ इम्प्रुव्हमेंट, वॉटर होल्डींग कॅपॅसिटी वाढते. जमीनीचे कन धरुन ठेवते. सॉईल बफरिंग कॅपॅसिटी, ऑरगॅनिक कार्बन वाढते. ग्रीन बायोमास. यांना खाद्य म्हणून फक्त सुर्यप्रकाश, पाणी व कार्बन डायऑक्‍साईड लागतो. खातात. जगतात तेव्हा नत्र स्थिरीकरण करतात. मरतात तेव्हा इतर सुक्ष्म जिवांचे खाद्य म्हणून उपयुक्त ठरतात. खतपतवार. पाण्याच्या पृष्ठभागावर वाढत असल्याने पिकात गवत वाढत नाही. तणनियंत्रणावरील खर्चात बचत होते. आम्ही 500 ग्रॅम पॅकेट एक एकर भात क्षेत्रासाठी वापरतो.

बीजीए बायोफर्टीलायझर तीन चार वर्षे सलग वापरले तर ते जमीनीत एस्टाब्लिश होते. ते पुन्हा वापरण्याची गरज राहत नाही.

बीजीए बनविण्याची टेक्‍नॉलॉजी विकसित केली आहे. गेल्या दोन वर्षात चार फर्म विकले आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत. झोनल टेक्‍नॉलॉजी युनिट.त्याच्या दिल्ली, पंजाब, टेक्‍नॉलॉजी.

फ्रेश वॉटर बीजीए वर शेतीच्या दृष्टीने काम करणारी ही देशातलीच नव्हे तर आशिया खंडातली एकमेव यंत्रणा आहे. याव्यतिरिक्त बिगरकृषी दृष्टीने बनारस, मद्रास व त्रिची येथील विद्यापीठांमध्ये काम सुरु आहे.

काही नवीन अल्गी आयडेन्टिफाय केली आहेत. त्यांचा बायो फ्युएल बनविण्यासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. बीजीए फॉर बायोफ्युएल ही नवी दिशा धरुन काम सुरु आहे.

बीजीए मधून कलर तयार होतो. हे खाद्य रंग. नॅचलर कलर, फुड इंटस्ट्रीमध्ये कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये, फार्मासिटीकल इंडस्ट्रीमध्ये हे रंग अतिशय उपयुक्त. शिवाय ते अतिशय महागही असतात. स्पायरुलिना - बीजीए - 70 टक्के प्रोटीन असते. खान्यासाठी हे अतिशय उपयुक्त प्रोटिन सोअर्सस, त्यावरही मोठे काम सुरु आहे. कमजोर, कुपोषित मुले त्यांना प्रोटिन व व्हिटॅमिनचा स्वस्त स्त्रोत उपलब्ध होऊ शकतो. 10-12 प्रजाती त्या दृष्टीने निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यावरती काम सुरु आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या अंतर्गत यात काम सुरु आहे.

बेसीन,क अवलंब करा. शेतकऱ्यांना वाढवून घाव माटीन... 20 रुपये प्रति 500 ग्रॅम पॅकेट, एक एकर साठी पुरेसे. हे पॅकेट दोन वर्षे टिकते. पाण्यात गेले की वाढते. वर्षभर कधीही वापरता येते. 2-4 पाकिटे पाहिजे असल्यास आयएआरआयच्या या केंद्रात वर्षभरात कधीही उपलब्ध होती. मात्र जास्त प्रमाणात हवे असल्यास आधी ऑडर देणे आवष्यक राहील. चार प्रकारचे बीजीए कल्चर या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या पॅकेटमध्ये चारही प्रकारचा समावेश असतो. त्यात ऍनाबिना, नॉस्टॉक, टॉलीपोथ्रीक्‍स व ऑलोसिटा या चार प्रकारांचा समावेश असतो. नायट्रोजन जास्त फिक्‍स करत चालतात. जास्त फास्ट ग्रोथ होते. भात सुरवातीला लाकर... नंदर दुसर्या चारही मिक्‍स असतात. एकत्रित. भात.

हरित शेवाळ. त्याचे अनेक प्रकार. त्यात बायो डिझेल निर्मितीची क्षमता. ते बनविण्याचे अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत. अनेकांत तेलाची मात्रा 30 ते 45 टक्के आहे. लॅबोरेटरीमध्ये 50 टक्के पर्यंत मात्रा आढळली आहे. नॅचरल सनलाईटला तेलाची मात्र किती राहील, फॅट व तेल . ते एका टेक्‍नॉनॉजी ने बायोडिझेल मध्ये कन्व्हर्ट केली. स्टॅन्डर्ड बायोडिझेलशी मॅच होतंय. केमिकली ऍण्ड फिजिकली.

हरित शेवाल... कार्याचं तेल काढतात. जैविक इंधन. क्वालीटी वाईज चांगले इंधन. हमी काढले. 40 टक्के ते 60 टक्के. त्यावर अजून रिसर्च सुरु आहे. टोटल नाही. जैविक उर्जेसाठी प्रभावी पर्यंय म्हणून तुलना होत आहे. टीम कोशिश कर रही है. संशोधन सुरु आहे.
---------------
संपर्क ः बीजीए डिव्हिजन, आयएआरआय, 011 25848431
इ मेल ः डॉ. पब्बी - sunil.pabbi@gmail.com
--------(समाप्त)-------- 

मॉन्सून 2015 चा अंदाज मंगळवारी (22)

नवी दिल्ली ः भारतीय हवामान खात्यामार्फत व्यक्त करण्यात येणारा नैऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीसाठीचा अंदाज येत्या मंगळवारी (ता.22) व्यक्त करण्यात येणार आहे. यासाठी येथिल पृथ्वी भवनमध्ये दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. विज्ञान, तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन हे मॉन्सून अंदाज जाहिर करणार आहेत.

गेली तिन वर्षे महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये पडत असलेला दुष्काळ, यंदा एल निनोचा प्रभाव जाणविण्याबाबत व्यक्त होत असलेले तर्क वितर्क व काही संस्थांनी व्यक्त केलेले परस्परविरोधी मॉन्सून अंदाज या पार्श्‍वभूमीवर हवामान खात्याच्या यंदाच्या मॉन्सून अंदाजाला विशेष महत्व आहे. मॉन्सून काळातील एल निनोचा प्रभाव, महिनानिहाय पाऊस, पावसाचे वितरण, त्यातील खंड, अतिवृष्टी आदी बाबींवर या अंदाजात प्रकाश टाकण्यात येणार आहे.
----------- 

MSc Agri Entrance प्रवेश अर्जांना मुदतवाढ

पुणे ः महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कृषी व संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिक्षेसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27 एप्रिलपर्यंत व परिक्षा शुल्क बॅंकेत जमा करण्याची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत विढविण्यात आली आहे. संबंधीत परिक्षेस बसणाऱ्या परिक्षार्थींनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन परिक्षा मंडळ नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी केले आहे.
------------------ 

ऍग्रोवनवर शुभेच्छांचा वर्षाव

विशेषांकाचे राज्यभर स्वागत

पुणे (प्रतिनिधी) ः ऍग्रोवनच्या दशकपूर्ती निमित्त सोमवारी (ता.20) राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, लोकप्रतिनिधी, व्यवसायिक, कृषी विभाग व विद्यापीठांचे अधिकारी-कर्मचारी, कृषी व संलग्न विद्याशाखांचे विद्यार्थी आदींकडून अभिनंदन व शुभेच्छांचा मोठा वर्षाव झाला. समाजातील सर्वच स्तरांतून ऍग्रोवनच्या दशकपुर्तीबद्दल आनंद आणि या प्रवासात सहभागी असल्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला.

वर्धापनदिनानिमित्त राज्यात 22 ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ऍग्रो संवाद चर्चासत्रांना शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विविध पिके व तंत्रज्ञानाची माहिती घेतानाच ऍग्रोवनविषयी आदरभाव व्यक्त करत शुभेच्छांचीही देवघेव झाली. अनेक ठिकाणी ऍग्रोवनचे प्रातिनिधीक सत्कारही करण्यात आले.ऍग्रोवनचे प्रतिनिधीकडे, दुरध्वनी व फेसबुक पेजवरही वाचकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. अनेक ऍग्रोवन प्रेमींनी थेट ऍग्रोवनच्या कार्यालयात येवून शुभेच्छा देत ऍग्रोवनवरील प्रेम व्यक्त केले.

दशकपुर्ती निमित्त सलग तीन दिवस विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यातील पहिला "हवामान संरक्षित शेती' विशेषांक सोमवारी प्रसिद्ध झाला. या विशेषांकाचेही राज्यभर मोठ्या उत्साहात स्वागत झाले. मंगळवारी (ता.21) प्रिसिजन फार्मिंग विशेषांक तर बुधवारी (ता.22) बाजारपेठ विशेषांक प्रसिद्ध होणार आहे. या विशेषांकाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कृषी सारख्या विषयात दैनिक चालविण्याचे शिवधनुष्य सकाळ माध्यम समुहाने समर्थपणे पेलले आहे. ऍग्रोवन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगती करण्यासाठी मिळालेले सर्वोत्तम माध्यम आहे. ऍग्रोवनमुळे राज्यभर अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा घडू शकल्या. ऍग्रोवनची ताकद फार मोठी आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल ऍग्रोवनचे व ऍग्रोवनच्या सर्व टीमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, या शब्दात माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऍग्रोवनशी संपर्क साधून विशेष गौरव केला. माजी कृषीमंत्री व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनीही भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
-----------(समाप्त)---------- 

कुलगुरुंचा मार्गदर्शक ऍग्रोवन

टीम ऍग्रोवन
पुणे ः राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हालाही ऍग्रोवनमधून प्रेरणा व मार्गदर्शन मिळते. कृषीशी संबंधित सर्व क्षेत्रातील अपडेट माहितीने अपडेट राहता येते. विद्यापीठांच्या कामाची दिशा ठरविण्यापासून ते विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यापर्यंत सर्व बाबींसाठी ऍग्रोवनची पावलोपावली मदत होते. ऍग्रोवन हा राज्यातील कृषी ज्ञान तंत्रज्ञान विस्ताराचे सर्वोत्तम माध्यम आहे, अशी भावना राज्यातील आजी-माजी कुलगुरुंनी व्यक्त केली आहे.

- विद्यापीठ शेतकरीकेंद्रीत करण्यास मदत
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचा कुलगुरू म्हणून काम करण्याला दीड वर्षाचा अवधी झाला. या अवधीत मराठवाड्यातील शेती, त्यामधील प्रश्‍न, शेतकऱ्यांना प्राधान्याने भेडसावणाऱ्या समस्या, त्यावरील उपाययोजना याबाबत मला सातत्याने 'ऍग्रोवन' या एकमेव कृषी दैनिकाची पदोपदी मदत झाली. यामुळे सहाजिकच मी ऍग्रोवनचा दैनंदिन वाचक बनलो. प्रत्यक्ष अंक वाचने शक्‍य होत नाही, तेथे मी इंटरनेटवर न चुकता अंकाचे अवलोकन करतो. कृषी विद्यापिठात शेतकरी केंद्रबिंदू ठेवून बदल करण्यासाठी ऍग्रोवन वाचनाची विशेष मदत झाली. ऍग्रोवनमधील शेतिविषयक ज्ञान व त्यातील यशकथा केवळ शेतकऱ्यांनाच प्रेरणा देतात असे नाही तर त्या आम्हा शास्त्रज्ञांनाही कायम प्रेरणा व मार्गदर्शन करण्याचे काम करतात.

शासनाला कृषी क्षेत्राविषयी प्रभावी सल्ला देण्याचे काम ऍग्रोवनने केल्याचे आपण या दैनीकाचे वाचक झाल्यापासून अनुभवतोय. कोणतेही वृत्त, माहितीपूर्ण लेख प्रकाशीत करतांना विषयाच्या तळाशी जावून त्यानंतरच त्याला प्रसिद्‌धी देण्याची ऍग्रोवनची भूमिका खरोखरच कौतूकास्पद आहे. त्यामुळे सहाजिकच या वर्तमानपत्राने आपले वेगळे स्थान समाजात निर्माण केले आहे. दुसऱ्या देशातील संशोधनाबाबत माहिती देवून आम्हालाही त्यासंदर्भात अपडेट ठेवण्याचे काम ऍग्रोवन सातत्याने करतोय. ज्याप्रमाणे काम करणाराकडून अपेक्षा असतात त्याप्रमाणे ऍग्रोवननेही जागतीक बाजारपेठेचे अवलोकन करून आयात निर्यातिसंदर्भात देश व राज्यातील कृषी क्षेत्राला त्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती देण्याचे पाऊल उचलावे. सोबतच जनसामान्यांचे या दैनिकावरील प्रेम पाहता अंकाच्या पानांची संख्या वाढवावी, असे वाटते.

डॉ. बी. वेंकटेश्‍वरलू, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ परभणी.
------------
- शेतकऱ्यांसाठी वरदान
महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदान असेच ऍग्रोवनबद्दल म्हणावे लागेल. कृषी विस्ताराच्या माध्यमातून प्रयोगशाळांपर्यंत मर्यादीत तंत्रज्ञानाच्या विस्तारात ऍग्रोवनची भुमिका वाखाणण्याजोगी आहे. कृषी क्षेत्रातील वाईट गोष्टींवर बोट ठेवत, त्या सुधारण्यासाठी काय केले पाहिजे, याविषयीचे विवेचनात्मक लिखाणही प्रसारीत झाले. नुसते प्रश्‍नच न मांडता, त्या प्रश्‍नांची उत्तरे दिली, अशाप्रकारचा प्रयत्न भारतीच वृत्तपत्रसृष्टीत पहिल्यांदाच झाला असावा. राज्यातील बेमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीबद्दल सातत्याने लिखाण झाले. त्यामाध्यमातून धोरणांवरही टिका करण्याचे धारिष्ट दाखविण्यात आले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, असाच हेतू त्यामागे होता. पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने केलेल्या कार्याला देखील राज्यव्यापी प्रसिध्दी मिळाली.

डॉ. आदित्यकुमार मिश्रा, कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.
--------------
- उपयोगितेच्या दृष्टीने सर्वोत्तम
ऍग्रोवन हे फक्त वृत्तपत्र नाही तर तो खूप चांगला उपक्रम आहे. शेतकऱ्यांना तो अतिशय उपयुक्त आहे. चर्चासत्रे, प्रशिक्षण आदी उपक्रमही फार चांगले असतात. मी अतिशय आवडीने दररोज ऍग्रोवन वाचतो. राज्यातील शेतीची सद्यस्थिती, शासनाची धोरणे, बदलती दिशा, नवीन तंत्रज्ञान समजण्यासाठी ऍग्रोवन हे अतिशय चांगले माध्यम आहे. वेगवेगळ्या विषयावरील लेख त्यात असतात. शेतीशी संबंधीत सर्व विषय त्यात समाविष्ट केले जातात. फलोत्पादन, विविध पिके, पुरक व्यवसाय ते हवामान बदलापर्यंत शेती व संलग्न विषयांची सर्व काही अद्ययावत माहिती एका जागी मिळते. संपूर्ण महाराष्ट्रात जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तो अतिशय लोकप्रिय असल्याचा प्रत्यय वारंवार येतो. उपयोगितेच्या दृष्टीने ऍग्रोवन खरोखरच सर्वोत्तम आहे. गेली दहा वर्षे ऍग्रोवनने कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. ऍग्रोवनची पुढील कारकिर्दही अशिच उल्लेखनिय राहील, असा विश्‍वास वाटतो. या निमित्ताने ऍग्रोवनला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
- डॉ. तुकाराम मोरे, कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
---------------------
- कृषीक्रांतीचे नवे पर्व सुरु केले
ऍग्रोवनने महाराष्ट्राच्या शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याचे काम केले आहे. तरुण शेतकऱ्यांमध्ये नवी चेतना निर्माण केली. नवीन तंत्रज्ञान, जगभरातील शेतीमधील स्थित्यंतर, कृषी विभाग, कृषी विद्यापीठांमध्ये चाललेले कार्य व संशोधन पोचविले. जगभरातील शेतीच्या वाटचालीची माहिती मिळाल्याने युवा शेतकऱ्यांची पावले शेतीकडू वळू लागली. शेतीमधील बदलाचे निमित्तच ऍग्रोवन ठरला असे म्हटले तरी वावगे ठरू नये. संत साहित्याविषयीचे लिखान होत असल्याने ग्रामीण भागाला जागविण्याचे आणि जगविण्याचा वसाही जपला गेला. अशाप्रकारे सर्वांगीण दैनिकाचा मान ऍग्रोवनला मिळाला आहे. ग्रामीण भागातील वैशिष्ट्य जपणारे पान नुकतेच सुरु झाले. महिला विश्‍वासाला उभारी देणारे कामही झाले. "कारभारणी तुझ्याचसाठी' या महिला विश्‍वासाठी समर्पीत पानातून ग्रामीण भागातील महिलांच्या कार्याची ओळख करुन देण्याचा प्रयत्न होत आहे. विकसनशील गावाचा परिचय ग्रामविकास पानातून तर ऍग्रीकॅम्पस सारख्या पानांच्या बळावर कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी निगडीत बाबींची माहिती दिली जाते. कृषीक्रांतीचे नवे पर्वच या माध्यमातून सुुरु झाले आहे.
- डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरु, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
---------------
- विस्ताराचे अद्वितीय कार्य
ऍग्रोवन आज शेतीची प्रयोगशाळा झाली आहे. जलयुक्‍त शिवार अभियानाबाबत जाणीवजागृती निर्माण करण्यातही या दैनिकाचे योगदान आहे. चांगले काम करणाऱ्यांचे कार्य राज्यासमोर आणत त्यांचा आदर्शही मांडण्याचे फार मोठे कार्य ऍग्रोवनने केले. सरकारच्या धोरणांमध्ये बदल व्हावा, शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, भुमि अधिग्रहणापासून अद्यावत तंत्रज्ञानापर्यंतच्या सर्व बाबी सोप्या करुन मांडण्यात याचा हातखंडा आहे. कृषीधोरण कसे असावे, कृषीचा अर्थसंकल्प असावा का ? अशा विविध मुद्यांवर चर्चाही घडवून आणली. बेमोसमी पाऊस, गारपीटीनंतर शेतकऱ्यांच्या अवस्थांचे विदारक चित्र मांडले गेले. ही विदारकता निश्‍चितच शासनकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी होती. अशाप्रकारच्या मालिकांमधून ग्राऊंड रियालिटी साकारली. अनेकांना चिंतन करायला भाग पाडले. अकोला कृषी विद्यापीठाचा कुलगूरू असताना अनेक प्रकारचे संशोधन बांधावर पोचविण्यात या दैनिकाने योगदान दिले. विस्ताराचे कार्यही अद्वितीयच आहे.
- डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगूरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
---------------------
मी सुरवातीपासून ऍग्रोवन सुरु होण्याच्या आधीपासून ऍग्रोवन सोबत आहे. ऍग्रोवन कसा असावा यासाठी दहा वर्षापूर्वी कांदा लसून संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीत मी सहभागी होतो. कुलगुरु म्हणूनही मला ऍग्रोवनची चांगली साथ मिळाली. ऍग्रोवन राज्यातील खेड्यापाड्यात आणि शेजारील चार पाच राज्यांमध्येही फार चांगल्या प्रकारे पोचला आहे. महत्वाचे विषय ऍग्रोवन प्रभावीपणे मांडतो. पाणी प्रश्‍न असेल, दुष्काळ, बाजारभाव याविषयी ऍग्रोवनने चांगले काम केलेले आहे. यशोगाथाही अतिशय उत्तम असतात. शेतकऱ्यांच्या अडी अचडणी, संशोधन, धोरणात्मक बाबी अतिशय चांगल्या प्रकारे मांडल्या जातात. शासनाने, लोकप्रतिनिधींनी याची गांभिर्याने दखल घ्यायला हवी.
- डॉ. किसन लवांडे, माजी कुलगुरु, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ राहुरी
------------------------ 

Sunday, April 19, 2015

ऍग्रोवनचा आज 10 वा वर्धापनदिन !

राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबवत विकासाची शाश्‍वत दिशा दाखविणारा "दै ऍग्रोवन' आपली 10 वर्षांची वाटचाल आज (ता.20) पूर्ण करत आहे. शेतकऱ्यांप्रती समर्पित दशकपूर्तीच्या निमित्ताने देशभरातून ऍग्रोवनवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. वर्धापनदिनानिमित्त ऍग्रोवनमार्फत 19 जिल्ह्यांमध्ये ऍग्रो संवाद चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

शेती या एकमेव विषयाला वाहिलेले वृत्तपत्र यशस्वी होईल का, असा प्रश्‍न ऍग्रोवन सुरु होताना उपस्थित करण्यात येत होता. यास सडेतोड उत्तर देत राज्य व परराराज्यातील शेतकऱ्यांनीही ऍग्रोवनला पहिल्या क्रमांकाची पसंती दिली आहे. दैनिकासोबतच विविध विषयांना वाहिलेले विशेषांक, कृषी ज्ञानमाला पुस्तके, चर्चासत्रे, कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम, कृषी प्रदर्शने, सरपंच महापरिषदा, अभ्यास सहली व परदेश दौरे, पाणी परिषद आदींच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी करत असलेल्या एकमेवाद्वितीय कार्याबद्दल ऍग्रोवनचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.

राज्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या विकासातील ऍग्रोवनचा वाटा दिलखुलासपणे मान्य केला असून अनेकांनी आपल्या घराला, शेताला, शेततळ्यांना ऍग्रोवनचे नाव देवून ऍग्रोवनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुढील वाटचालीसाठी समाजाच्या सर्व थरातून ऍग्रोवनकडे शुभेच्छांचा ओघ सुरु आहे.

दशकपुर्ती निमित्त ऍग्रोवनमार्फत सोमवारी (ता.20) राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये ऍग्रो संवाद चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. द्राक्ष, डाळींब, केळी, कांदा, संत्रा, ऊस, कपाशी, सोयाबीन, आले आदी पिकांचे उत्पादन व व्यवस्थापन तंत्रज्ञान, खरीप हंगामाची पूर्वतयारी, भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन, शेडनेट व पॉलिहाऊस तंत्रज्ञान आदी विषयांवर या चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऍग्रोवनमार्फत करण्यात आले आहे.
--------- 

भेंडी निर्यातीवर केंद्राची कुऱ्हाड

ऐन हंगामात बंदी; सिस्टिम सुधारणेचे कारण

पुणे (प्रतिनिधी) ः युरोपात निर्यात झालेल्या भेंडीत फुलकिडे आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर भेंडीच्या निर्यात प्रक्रीयेत सुधारणा करण्याच्या कारणाखाली केंद्र सरकारने स्वतःच देशातील भेंडी निर्यातीवर ऐन हंगामात बंदी घातली आहे. विशेष म्हणजे क्षेत्र नोंदणी व पहाणीची कोणतीही यंत्रणा कार्यरत नसताना हा निर्णय घेण्यात आला. यामुळे भेंडीचे देशांतर्गत दर निम्म्याहून अधिक घसरले असून शेतकरी व निर्यातदारांचे मोठे नुकसान होण्यास सुरवात झाली आहे.

भाजीपाला पिकांची लागवड ते निर्यात ही सर्व प्रक्रीया देखरेखीखाली ठेवून त्यानंतरच निर्यातीसाठीचे फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र देण्यासाठी अपेडामार्फत व्हेजीटेबलनेट हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. मात्र गेली अनेक महिने ते चाचण्यांच्याच पातळीवर आहे. यामुळे राज्यात निर्यातीसाठीच्या भेंडी व इतर भाजीपाला पिकांची नोंदणी झालेली नाही. ही सिस्टीम कार्यान्वित करण्याआधीच युरोपातून आलेल्या काही तक्रारींवरुन निर्यातबंदीचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला आणि निर्यात पुन्हा सुरु करण्याबाबत उत्सूकता दाखविण्यात येत नसल्याबद्दल शेतकरी व निर्यातदारांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

युरोपिय देशांत निर्यातीसाठी आवश्‍यक असलेले फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रीया प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाने 31 मार्चपासून बंद केली आहे. नोंदणीकृत शेतामधील भेंडी फुलकिडे मुक्त पॅक हाऊसमध्ये पॅक केली तरच निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेर विचार होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. फुलकिडीचा प्रादुर्भाव किती आहे हे पाहण्यासाठी 10 एप्रिलला केंद्राच्या यंत्रणांमार्फत बारामती व फलटण परिसरात भेंडीची पहाणी करण्यात आली. मात्र त्यानंतर आत्तापर्यंत कोणताही मार्ग निघालेला नसून निर्यात बंदच आहे.

- अशी होणार सुधारणा
काही व्यापारी बाजारातून खरेदी करुन भेंडी निर्यात करत होते. त्यामुळे दोन महिन्यात फुल किड आढळल्याच्या 23 नोटीसा (नॉन कम्प्लायन्सेस) आल्या. नोटीसांची संख्या जास्त झाली की त्याचे रुपांतर बंदीत होते. त्यामुळे सिस्टिम सुधारण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले आहे. एका निर्यातदाराला तीन नोटीसा आल्या तर त्यांच्यावर बंदी घालण्याचा आणि ज्या ऍथॉरिटीच्या मान्यतेने निर्यात झाली त्यांचे काम काढून घेण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. उत्पादन ते निर्यात प्रक्रीयेतील प्रत्येक घटकाची जबाबदारी नव्याने निश्‍चित करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाचे फायटोसॅनिटरी अधिकारी गोविंद हांडे यांनी दिली.

- उरला फक्त महिना !
युरोपच्या बाजारपेठात भेंडी पाठविण्यासाठी मार्च ते 15 मे हा कालावधी सर्वोत्तम असतो. गेल्या काही वर्षात या कालखंडातील निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज 12 ते 15 टन भेंडी एकट्या लंडनला निर्यात होते. यानंतर 15 मे पासून जॉर्डनची भेंडी सुरु होते आणि भारतीय भेंडीची मागणी थांबते. या बाजारपेठेचा लाभ मिळविण्यासाठी आता फक्त महिनाभराचा कालावधी उरला आहे.

*कोट
""फलटणहून दररोज 25 टन भेंडी निर्यात होत होती. आता 40 रुपये किलोवरुन 17 रुपयांवर दर घसरले आहेत. प्रचंड नुकसान सुरु असून निर्यातीची लिंकही तुटते आहे. हंगाम संपायला महिनाच राहीलाय. शासनाने लवकरात लवकर निर्णय सुरु करावी.''
- सचिन यादव, भेंडी निर्यातदार, फलटण, सातारा

""युरोपिय समुदायाने दिलेल्या नोटीशींच्या आधारे त्यांनी बंदीची कार्यवाही करण्याआधीच केंद्राने बंदी घातली आहे. निर्यातीसाठी उत्पादकांपासून पॅकींग पर्यंतची सर्व माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्राच्या "ऑडिट टीम' मार्फत शेताची पहाणी करुन पिक फुलकिड मुक्त असल्याची खात्री झाल्यास निर्यातीला परवानगी देण्यात येणार आहे.''
- गोविंद हांडे, फायटोसॅनिटरी अधिकारी, कृषी विभाग
-----------(समाप्त)----------- 

Saturday, April 18, 2015

पूर्वमोसमी पावसाचा 5 ते 50 पट दणका !

*चौकट
- महाराष्ट्रातील पूर्वमोसमी पाऊस (1 मार्च ते 15 एप्रिल 15)
विभाग --- सरासरी (मीमी.)--- प्रत्यक्ष पडलेला पाऊस (मीमी.)--- वाढ (टक्के)
कोकण --- 0.7 --- 37.7 --- 5138
मध्य महाराष्ट्र --- 6.5 --- 46.6 --- 616
मराठवाडा --- 9.4 --- 65.8 --- 600
विदर्भ --- 16.3 --- 90.4 --- 455

पुणे (प्रतिनिधी) ः गेली अनेक वर्षे वळवापुरताच मर्यादित असलेल्या पूर्वमोसमी पावसाने यंदा आक्रमक रुप घेत नेहमीपेक्षा राज्यात ठिकठिकाणी तब्बल पाच ते 50 पटीने अधिक दणका दिला आहे. पूर्वमोसमीच्या निम्या कालावधीत सरासरीच्या तुलनेत कोकणात 52 पट (5138 टक्के), मध्य महाराष्ट्रात सात पट (616 टक्के), मराठवाड्यात सात पट (600 टक्के) तर विदर्भात पाच पट (455 टक्के) अधिक पाऊस झाला आहे.

देशात 1 मार्च ते 31 मे हा कालखंड पूर्वमोसमी पावसाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. पूर्वमोसमीचा निम्मा कालावधी नुकताच पूर्ण झाला असून त्यात देशात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस कोसळला आहे. त्यातही महाराष्ट्रात त्याचा दणका सर्वात मोठा असून सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोसाटयाचा वादळी वारा, त्यात ताड ताड बरसणाऱ्या गारा आणि पाऊसधारा यांचा कहर वेळोवेळी सोसावा लागला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार पूर्वमोसमी हंगामात गेल्या दिड महिन्यात सर्वाधिक 196 मिलीमिटर पाऊस विदर्भातील अकोला जिल्ह्यात पडला आहे. पाठोपाठ भंडारा जिल्ह्यात 116 मिलीमिटर, वाशिममध्ये 115.5 मिलिमिटर, नागपूरमध्ये 99.3 मिलीमिटर तर गोंदियात 95.4 मिलीमिटर पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस विदर्भात व त्यापाठोपाठ मराठवाड्यात झाला आहे. मराठवाड्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये 65 ते 80 मिलीमिटर दरम्यान पाऊस झाला आहे. पावसाच्या टक्केवारीतील वाढ कोकणात सर्वाधिक आहे. रायगड जिल्ह्यात सरासरीहून सर्वाधिक 13 हजार 438 टक्के पाऊस जास्त पडला आहे.

देशाची एक मार्च ते 16 एप्रिलपर्यंतची पूर्वमोसमी पावसाची सरासरी 47.8 मिलीमिटर आहे. प्रत्यक्षात सरासरीच्या दुपटीहून अधिक म्हणजेच 96.6 मिलीमिटर (102 टक्के) पाऊस पडला आहे. इशान्य भारतातील आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड, मनिपूर, मिझोरम व त्रिपुरा या सात राज्यांचा अपवाद वगळता देशातील उर्वरीत सर्व राज्यांमध्ये पूर्वमोसमी पाऊस सरासरीहून कित्येक पटींनी अधिक बरसला आहे. पूर्वमोसमी पावसात देशात सर्वाधिक 5138 टक्‍क्‍यांची वाढ कोकणात झाली आहे.

सर्वसाधारणपणे बोलीभाषेत पावसाच्या मुख्य कालावधीव्यतिरिक्त इतर वेळी पडलेल्या पावसाला अवकाळी पाऊस म्हणून ओळखले जाते. मॉन्सून सुरु होण्याच्या आधी झालेल्या पावसाला वळवाचा पाऊस असेही नाव आहे. हवामान खात्याने त्याच्या शास्त्रिय परिभाषेनुसार पावसाच्या कालावधीचे तीन विभागात विभाजन केले आहे. यानुसार 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस, 1 ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी अखेर पडणाऱ्या पावसाला बिगरमोसमी पाऊस तर 1 मार्च ते 31 मे या कालावधी पडणाऱ्या पावसाला पूर्वमोसमी पाऊस असे संबोधले जाते.

*चौकट
- जिल्हानिहाय पाऊस (1 मार्च ते 15 एप्रिल 15)
जिल्हा --- सरासरी (मीमी) --- पाऊस (मीमी) --- वाढ (टक्के)
मुंबई शहर --- 0.5 --- 15 --- 2900
रायगड --- 0.4 --- 54.5 --- 13438
रत्नागिरी --- 1.3 --- 31.7 --- 2338
सिंधुदुर्ग --- 1.5 --- 45.9 --- 2960
मुंबई उपनगर --- 0.5 --- 13 --- 2500
ठाणे --- 0.5 --- 21.9 --- 4277
नगर --- 5.7 --- 70.3 --- 1133
धुळे --- 3.9 --- नोंद नाही --- नोंद नाही
जळगाव --- 5.3 --- 59.6 --- 1025
कोल्हापूर --- 14.7 --- 35.9 --- 144
नंदुरबार --- 0.9 --- 14.4 --- 1496
नाशिक --- 2 --- 45.2 --- 2161
पुणे --- 4.6 --- 55.1 --- 1098
सांगली --- 13.3 --- 44.9 --- 238
सातारा --- 8.5 --- 40.8 --- 380
सोलापूर --- 9 --- 24.8 --- 175
औरंगाबाद --- 4.7 --- 65.3 --- 1289
बीड --- 7.6 --- 68.4 --- 800
हिंगोली --- 10.3 --- 66.5 --- 545
जालना --- 5.8 --- 61.4 --- 958
लातूर --- 13.6 --- 60.4 --- 344
नांदेड --- 14 --- 80.5 --- 475
उस्मानाबाद --- 8.3 --- 59.2 --- 614
परभणी --- 11.7 --- 56.4 --- 382
अकोला --- 11.2 --- 169 --- 1409
अमरावती --- 10 --- 97.6 --- 876
भंडारा --- 24.1 --- 116 --- 381
बुलडाणा --- 7.4 --- 92.3 --- 1147
चंद्रपूर --- 19.8 --- 85.1 --- 330
गडचिरोली --- 20.1 --- 55.7 --- 177
गोंदिया --- 22.2 --- 95.4 --- 330
नागपूर --- 21.5 --- 99.3 --- 362
वर्धा --- 17.5 --- 80.3 --- 359
वाशिम --- 11.3 --- 115.5 --- 922
यवतमाळ --- 16.1 --- 71.8 --- 346
----------(समाप्त)---------


चिन पिक उत्पादन अंदाज हवामान सेवा

पिक उत्पादन अंदाजासाठी
चिनची विशेष हवामान सेवा

बिजिंग, चीन (वृत्तसंस्था) ः शेती पिकांच्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी चीनच्या हवामानशास्त्र विभागामार्फत (सीएमए) चालू वर्षासाठी खास सेवा सुरु करण्यात आली आहे. हवामान विभागामार्फत प्रमुख अन्न पिकांसाठीचे वस्तुनिष्ठ, सांख्यिकी व डायनॅमिक पद्धतीचे हवामान अंदाज देण्यात येणार आहेत.

देशपातळीवरील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी व कृषी क्षेत्रावरील आपत्तींना प्रतिबंध व त्यांचे निराकरण करण्यासाठी पिकांच्या वाढीच्या काळातील संभाव्य आपत्ती पूर्वसुचना, देशपातळीवरील कृषी हवामान अंदाज, हवामान सेवांची गुणवत्ता आणि स्तर वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पिक उत्पादन अंदाजाच्या विशेष सेवेतून राष्ट्रीय व प्रांतिक पातळीवरील हवामान विभागांमध्ये माहितीचे आदानप्रदान वाढविण्यास आणि हवामान अंदाजाचा स्तर वाढविण्यास चालना देण्यात येणार आहे. यादरम्यान सीएमएमार्फत हवामान अंदाज तंत्रज्ञान संशोधन व वापरास अधिक बळकटी देण्यात येणार आहे. यातून कृषी उत्पादनांच्या हवामान अंदाज सेवांना नव्या उंचीवर घेवून जाण्याचे उद्दीष्ट आहे.
------------- 

उन्हाचा पारा वाढण्यास सुरवात - 18 Apr

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील पाऊस थांबून ढगाळ हवामान निवळण्यास सुरवात झाल्याबरोबर कमाल तापमानाचा पारा पुन्हा एकदा झेपावण्यास सुरवात झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात अनेक ठिकाणी कमाल तापमानात मोठी वाढ होवून ते पूर्वपदावर आले. पुढील दोन दिवसात राज्यातील किमान तापमानात आणखी दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी सकाळपर्यंत (ता.20) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज व्यक्त केला असून कोणत्याही जिल्ह्यात पावसाची वा गारपीटीची शक्‍यता वर्तविण्यात आलेली नाही. हिमालयात पश्‍चिमी चक्रावात व राजस्थानात चक्राकार वारे सक्रीय आहे. महाराष्ट्र व अरबी समुद्रात सध्या कोणतीही हवामान स्थिती सक्रीय नाही.

दरम्यान, शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात तळकोकणात मानगाव येथे 15 मिलीमिटर, तेलेरे व वागडे येथे प्रत्येकी 13 मिलीमिटर, वैभववाडी व बांदा येथे प्रत्येकी 6 मिलीमिटर तर येडगाव येथे पाच मिलीमिटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. या तीनही विभागात कोठेही पावसाची नोंद झाली नाही.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार दिवसभरात विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय घट कायम होती. तर राज्यात उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. दिवसभरात राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान जळगाव येथे 40.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भात कमाल तापमानात वाढ झाली असली तरी अद्याप कमाल तापमानाचा पारा सरासरीहून दोन ते पाच अंश सेल्सिअसने घसरलेला आहे. पुढील दोन दिवसात तो सरासरीच्या पातळीवर येण्याचा अंदाज आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे शनिवारी (ता.18) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 34.2, अलिबाग 31.8, रत्नागिरी 33, पणजी 33.4, डहाणू 34.6, पुणे 36.7, जळगाव 40.2, कोल्हापूर 35.2, महाबळेश्‍वर 27.6, मालेगाव 39.4, नाशिक 37.6, सांगली 35.3, सातारा 34.9, सोलापूर 37.9, उस्मानाबाद 34.1, औरंगाबाद 36, परभणी 34.6, अकोला 37.2, अमरावती 37.4, बुलडाणा 34.7, चंद्रपूर 37.2, नागपूर 37.3, वाशिम 35, वर्धा 37, यवतमाळ 35.3
------------------ 

माझं गाव माझं शिवार - संतोष गाढवे

जावे पुस्तकांच्या गावा - संतोष डुकरे
--------------
पुस्तकाचे नाव - माझं गाव माझं शिवार
कवी - संतोष गाढवे (9049318656)
प्रकाशन - स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे
किंमत - 100 रुपये
पाने - 94
---------
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि मातीत मुरलेल्या कवी संतोष गाढवे यांचा हा कवितासंग्रह वास्तवाच्या पायावर शेती आणि शेतीशी संबंधीत सर्व बाबींच्या सुख दुःखाचा धांडोळा घेतो. कविता आणि गितांच्या माध्यमातून व्यक्त होत शेतकऱ्याचं जगणं मांडताना अत्यंत बारिक सारिक तपशीलासह बोलीभाषेत त्यांनी केलेला अविष्कार प्रत्येक रचनेत सुरवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. प्रत्येक लेखकाची व्यक्त होण्याची भाषा आणि पद्धत (फॉर्म) वेगवेगळा असतो. गाढवे यांची शैली मातीत मळलेली आणि शेत शिवारात घोळलेली आहे. शेतकऱ्यांचे रुजणे, बहरणे, उत्पादित होणे, कुटुंबाचे भावजिवन, स्त्रीजिवन ते शोषण, दारिद्य, फसवणूक आदी कांगोरे या कवितांमधून दाहकतेने व्यक्त झाले आहेत. त्यात परिस्थितीची हतबलता आहे, उदास सुर आहे आणि प्रसंगी जिवघेण्या रुढींशी, लादलेल्या गुलामीशी विद्रोह करण्याचा अंगारही आहे.

दूर दुष्काळात गाव
शिवार सुनासुना
पिकं वाळली झडली
नाही उगवला दाणा
उसतोड कवितेत त्यांनी या शब्दात मुळ प्रश्‍नाला हात घालत बळीराजा रंक होण्याचं सुत्र उलगडलं आहे. याच प्रकारे शेतकरी जिवनाचं वास्तव मांडण्याचे काम श्री. गाढवे यांनी या कवितासंग्रहात वारंवार केलं आहे. यात शेताच्या कपाळी हिरवा मळवट भरणारा बिलोरी श्रावण आहे. मातीच्या कुशीत देहभान हरपून जगणारा रानभैरी आहे. ऊन, वारा, पाऊस, नांगरणी, पेरणी, मशागत, पाखरु, बोरी, बाभळी, गाव, घर, यात्रा-जत्रा, सण, सुगी, धान्य ते धान्याची दारु असा धगीपासून धोरणापर्यंत शेतीचा सर्व पट यात आहे. बाप हाकतो उन्हा नांगर, तवा मिळते तव्यात भाकर हे जाण मांडतानाच त्याच कवितेत...

टंच भरलं कणीस
घरं भरती लुटारु
त्यानं पोसल्या दाण्याची
साले बनविती दारु
या शब्दात पिक काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, धोरणं आणि सद्यस्थिती यांचे वाभाडेही कवीने काढले आहे. त्यांच्या तावडीतून देवाच्या नावाखाली सुरु असलेली शेतकऱ्यांना लुटणारी दुकानदारी, बाजार व्यवस्थेमार्फत होणारे शोषण, भेदभाव, जातीपातीचे राजकारण ते अगदी शेतकरी तरुणांचे शेतीपासून भरकटणेही सुटलेले नाही. शेतकरी वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्यानंतर कुठलाही आडपडदा न ठेवता शेतकरी बाप या कवितेत ते म्हणतात...

उभ्या पावसात बाप चिंब भिजतो राबतो
माझ्या डोळ्यांत रोज तो नवं सपान बघतो

शिकून सवरुन असा नंदीबैल मी सजलो
वाण असून वशिल्याविना घरच्या दावणीला डांबलो
बाप माझा गावभर सारं सांगत सुटला
म्हणे पोरानं मला उभ्या जलमाचा गाडला

एकूणच शेती आणि शेतकरी जिवनाचे वेगवेगळे आयाम मांडणारा हा कवितासंग्रह आवर्जून वाचावा आणि अभ्यासावा असाच आहे.
---------(समाप्त)---------- 

Friday, April 17, 2015

सिसकॉफची मॉन्सून बैठक ढाक्‍यात

पुणे (प्रतिनिधी) ः साऊथ एशियन क्‍लायमेट आऊटलूक फोरम (सिसकॉफ) ची सहावी बैठक रविवारपासून (ता.19) बांग्लादेशातील ढाका येथे सुरु होणार आहे. दुष्काळ, पाणी आणि नैऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) अंदाज हे या बैठकीचे विषय असून त्यात दक्षिण आशियासाठीचा जून ते सप्टेंबर 2015 या कालावधीसाठीचा मॉन्सून पावसाचा अंदाज जाहिर करण्यात येणार आहे.

अफगाणिस्तान, बांग्लादेश, भुतान, भारत, मालदिव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान व श्रीलंका या देशांचे हवामानशास्त्र विभाग, दक्षिण आशिया पातळीवरील हवामानविषयक संस्था व निवडक वापरकर्ते (शेतकरी इ.) यांचा या बैठकीत समावेश आहे. यावेळी हवामान अंदाज विषयक कौशल्यवृद्धी आणि दुष्काळ या दोन विषयांवरील प्रशिक्षण कार्यक्रमही पार पडणार आहेत.

सर्व दक्षिण आशियायी देशांची अर्थव्यवस्था मॉन्सूनवर अवलंबून आहे. या अनुषंगाने मॉन्सून पावसावर विविध घटकांवरील परिणाम, त्यातील बदल आणि मॉन्सून पाऊस याविषयी अचूक अंदाज व्यक्त करण्याच्या दृष्टीने जागतीक हवामान संस्थेच्या (डब्लूएमओ) पुढाकाराने हा फोरम स्थापन करण्यात आलेला आहे. त्यात भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे.
--------------- 

कात्रजने घटवले लोणी, तुपाचे दर

पुणे ः पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने तुपाचे विक्री दर प्रति लिटर 60 रुपये व लोण्याचा (क्रीम) विक्री दर प्रति किलोस 30 रुपयांनी घटविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार संघामार्फत गाय व म्हशीच्या दुधापासून तयार केलेले तुप अनुक्रमे 190 रुपये व 205 रुपये प्रति बॅग (500 मिली) व गाय व म्हशीचे लोणी अनुक्रमे 245 व 260 रुपये प्रतिकिलो दराने विक्री करण्यात येणार असल्याचे संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी कळविले आहे.
----------- 

राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी - 17 april

तळकोकणात गारपीट; आजपासून हवामान कोरडे

पुणे (प्रतिनिधी) ः शुक्रवारी सकाळपर्यंतच्या (ता.17) चोविस तासात मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडला. शनिवारी दुपारनंतर तळकोकणा सावंतवाडी परिसरात पाऊस व गारपीट झाली. हवामान खात्याने शनिवारपासून (ता.18) मंगळवारपर्यंत (ता.21) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात कोठेही पावसाची अथवा गिरपीटीची शक्‍यता व्यक्त करण्यात आलेली नाही.

दरम्यान, कोकणात काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मराठवाडा व विदर्भाच्या संपूर्ण भागात व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल नऊ अंश सेल्सिअसपर्यंतची उल्लेखनिय घट तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरीत भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्यात उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान रायगड जिल्ह्यातील भिरा येथे 38.7 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

गेली काही दिवस अरबी समुद्र व मध्य महाराष्ट्रात सक्रीय असलेले चक्राकार वारे, कमी दाबाचा पट्टा या हवामान स्थिती नाहिशा झाल्याने पावसाची शक्‍यताही मावळली असून राज्यातील ढगाळ हवामान पुढील पाच दिवसात निवळण्याची शक्‍यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात कोठेही पावसाची वा गारपीटीची शक्‍यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी (ता.17) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात ठिकठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः
मध्य महाराष्ट्र ः महाबळेश्‍वर 43.7, लामज 35.4, जेऊर 22, उंडळे, मलकापूर प्रत्येकी 20, काळे 18, कोटोली 16, शिरुर, मोरगिरी, सावळज, चरण प्रत्येकी 15, सुपणे 13.4, कोर्टी 13, उमरेड, पासार्णी, खानापूर प्रत्येकी 11, तळवली, कोकरुड प्रत्येकी 10, ओनी, कराड, धोम, विटा प्रत्येकी 8, रांजणगाव, वाई प्रत्येकी 7, तापोळा 6.3, पाटपन्हाळे, पांगारी प्रत्येकी 6, गुहागर, वैराग, नारी, शेनोली प्रत्येकी 5, पौड 3, सोलापूर, कोल्हापूर प्रत्येकी 1

विदर्भ ः वरुड 9, राजुरा 4.3, खापरी 18.3, बारव्हा 5, चिचगड 12, दारव्हा 16, मुलचेरा 11

मराठवाडा ः पार्टी 25, परभणी 7, उस्मानाबाद 3,
-------------- 

स्कायमेट मॉन्सून अंदाज - 18 April

यंदा मॉन्सून सरासरीएवढा

आगमन सर्वसाधारण वेळेआधी; स्कायमेट संस्थेचा अंदाज


पुणे (प्रतिनिधी) ः देशात यंदा मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या आधी जोरदारपणे दाखल होईल आणि देशभर सरासरीएवढा (102 टक्के) पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेट वेदर सर्विसेस या संस्थेने व्यक्त केला आहे. महिनानिहाय सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये 107 टक्के, जुलैमध्ये 104 टक्के, ऑगस्टमध्ये 99 टक्के तर सप्टेंबरमध्ये 96 टक्के पाऊस पडणार असल्याचे स्कायमेटमार्फत जाहिर करण्यात आले आहे.

देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत 887 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडेल. यात चार टक्‍क्‍यांनी वाढ किंवा घट होऊ शकते. हंगामात सरासरीहून अती पाऊस पडण्याची शक्‍यता 8 टक्के, सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्‍यता 25 टक्के, सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्‍यता 49 टक्के, सरासरीहून कमी पाऊस पडण्याची शक्‍यता 16 टक्के तर दुष्काळ पडण्याची शक्‍यता फक्त दोन टक्के असल्याची माहिती संस्थेमार्फत देण्यात आली आहे.

मॉन्सून देशात दाखल होतानाच त्यापासून जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हंगामात कोकणासह पश्‍चिम किनारपट्टीवर बहुतेक ठिकाणी, पंजाब, हरियाना, केरळ, गोवा आणि उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागात चांगला पाऊस होईल. तर तामिळनाडू, रायलसिमा व कर्नाटकच्या दक्षिण भागात सरासरीहून कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्‍यता जुनमध्ये 64 टक्के, जुलैमध्ये 74 टक्के, ऑगस्टमध्ये 72 टक्के तर सप्टेंबरमध्ये 57 टक्के आहे. याउलट सरासरीहून कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्‍यता जुनमध्ये 7 टक्के, जुलैमध्ये 9 टक्के, ऑगस्टमध्ये 18 टक्के तर सप्टेंबरमध्ये 25 टक्के आहे. म्हणजेच एकूण हंगामाचा विचार करता सरासरीएवढ्या किंवा त्याहून अधिक पावसाची शक्‍यता सर्वाधिक आहे. त्यातही मॉन्सून वेळेत दाखल होण्याची व त्याचे देशभर चांगल्या प्रमाणात वितरण होण्याची चिन्हे आहेत.

स्कायमेटने 2012 मध्ये देशात सरासरीहून 95 टक्के तर 2013 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. या दोन्ही वर्षी अनुक्रमे 93 टक्के व 105 टक्के पाऊस पडल्याने दोन्ही अंदाज बरोबर आले. गेल्या वर्षी (2014) 91 टक्के पावसाचा अंदाज व्यक्क करण्यात आला होता. प्रत्यक्षात 88 टक्के पाऊस पडला. अंदाजातील चार टक्के कमी अधिक बदलाची शक्‍यता विचारात घेता आत्तापर्यंत वर्तविण्यात आलेले मॉन्सूनचे तिनही अंदाज बरोबर आल्याचा दावा संस्थेमार्फत करण्यात आला आहे.

अंदाज मॉन्सूनपूर्व घडामोडींचा...
- एप्रिलचा शेवटचा आठवडा, मेचा पहिला आठवडा - पश्‍चिम किनारपट्टीवर पाऊस
- मेच्या दुसऱ्या आठवड्यात गुजरात व महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
ृ- उत्तर व इशान्य भारतात पूर्वमोसमी पावसात वाढीचा अंदाज
- मॉन्सून वेळेच्या आधी व जोरदारपणे दाखल होण्याची शक्‍यता

*चौकट
- असा राहील देशातील पाऊस (मॉन्सून 2015)
महिना --- पावसाचे प्रमाण (मी.मी)--- टक्केवारी
जून --- 174 --- 107
जुलै --- 300 --- 104
ऑगस्ट --- 258 --- 99
सप्टेंबर --- 167 --- 96

*चौकट
- अंदाज महाराष्ठ्रातील मॉन्सूनचा (सरासरीच्या तुलनेत पाऊस - 2015)
महिना --- कोकण --- मध्य महाराष्ट्र --- मराठवाडा --- विदर्भ
जून --- अती जास्त --- थोडा जास्त --- सरासरीएवढा --- कमी
जुलै --- सरासरीएवढा --- सरासरीएवढा --- सरासरीएवढा --- सरासरीएवढा
ऑगस्ट --- कमी --- कमी --- कमी --- कमी
सप्टेंबर --- कमी --- कमी --- कमी --- कमी
-----------(समाप्त)---------- 

Wednesday, April 15, 2015

शंकर बहिरट - यांत्रिकरण पुरवठा यशोगाथा


शेती यांत्रिकी सेवातून
शुन्यातून साधली प्रगती
------------
मातीतून उगवलेल्या माणसाला मातीची ओढ शांत बसू देत नाही. कोठेही असला तरी त्याचं मन शेतीकडं ओढ घेत राहते. याच ओढीनं इंद्रायणी काठच्या चिंबळी (ता.खेड, पुणे) गावातील शंकर बहिरट यांनी इलेक्‍ट्रेशियनची नोकरी करता शेतीपुरक व्यवसायातही शुन्यातून भरारी घेतली. त्यांच्या शेतीला यांत्रिकी सेवा पुरविण्याच्या सेवाभावी व्यवसायाने 50 किलोमिटर परिघातील शेतकऱ्यांची शेती सोपी केली आहे.
-------------
संतोष डुकरे
-------------
देवाच्या आळंदीपासून जवळच चिंबळी हे गाव आहे. त्यातील अनेक कोरडवाहू शेतकरी एकत्र कुटुंबांपैकी शंकर बहिरट यांचे एक. कुुटंबाची 15 एकर कोरडवाहू जमीन असली तरी त्यातून फारसे उत्पन्न नव्हते. यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच. शेतीची आवड असली तरी अर्थाजनासाठी बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नव्हते. मग इलेक्‍ट्रॉनिकमध्ये आयटीआय केले आणि भोसरीत 1993 साली एका खासगी कंपनीत नोंकरी सुरु केली.

नोकरीत आयुष्य घालवायचे नाही ही खुणगाठ पक्की होती. यातूनच भोसरीत इलेक्‍ट्रॉनिक वस्तू विक्री व दुरुस्तीचे दुकान टाकले. लहान भावाला शिकवले आणि त्यालाही याच व्यवसायात पारंगत करुन सर्व जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. पण शेतीची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. सुरवात करायची, पण माहित काही नाही. म्हणून घरची कामं झाली तरी खूप या विचाराने ट्रॅक्‍टर घ्यायचा निर्णय घेतला. मुळात आर्थिक परिस्थिती बेताची त्यात दिवसरात्र जिव काढून संसाराला कमवायचे की नवीन वस्तूच्या मोहात बॅंकेचे हप्ते भरायचे हा विचार करुन त्यांनी जुना ट्रॅक्‍टर घेण्याचा निर्णय घेतला. एका मित्राच्या भागिदारीत एक जुना ट्रॅक्‍टर (फोर्ड) विकत घेतला. पुढे मित्राला अडचणी आल्याने जमीन मशागतीचा व्यवसाय स्वतःच करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात झोकून दिले.

सुमारे 25 वर्षापूर्वीचा काळ. शेतकऱ्यांकडे घरोघरी मशागतीसाठी बैल होते. पेरणी, मशागत, खळ्यात मळणी सर्व कामे बैलांनीच व्हायची. महिनोन्‌ महिने काम नसायचं. ट्रॅक्‍टर उभा रहायचा. ड्रायवरचा पगारही खिशातून द्यावा लागायचा. काही दिवस तळेगाव एमआयडीसीत भाड्याने देऊन पाहीला पण गणित तोट्याचं झालं. यादरम्यान घरच्या शेतीत लक्ष दिले. पंधरा एकरपैकी चार एकर बागायत, त्यालाही तीन किलोमिटरहून इंद्रायणीचं पाणी पंधरा जणांनी भागिदारीत आणलेले. पंधरा दिवसातून एक दिवसाची बारी वाट्याला यायची. पाणी पुरेना. मजूरांची समस्या वाढली. अर्थकारण तोट्यात जायला लागलं. त्यामुळे शेतीवर अवलंबून राहणे काही पटेना. शेवटी शेतीला यांत्रिकी सेवा पुरविण्याच्या व्यवसायातच झोकून देण्याचा निर्णय घेतला.

रानं कडक असल्यानं नांगरणीला 10-10 बैल लागायचे. यामुळे बैलांनी नांगरणी कमी झाली आणि हळूहळू नांगरणीला ट्रॅक्‍टरची मागणी वाढत गेली. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेवून 2005 साली 15 एचपी चे मळणी मशीन (सोनालिका) घेतले. ते ही जुने. पण ट्रॅक्‍टरने मळणी करणे लोकांच्या पचनी पडायचे नाही. अनेक गैरसमजूती होत्या. पण हळूहळू लोकांचे विचार बदलत होते. मळणी यंत्राचा व्यवसाय वाढल्यावर त्यासाठी कर्ज काढून 18 एचपीचा नवीन चारचाकी (मित्सुबिशी) घेतला. सर्व अवजारे, पेरणी यंत्र विकत घेतली. त्यावर ज्वारी, बाजरी, गहू, उडीद, हरभरा आदी पिकांची मळणी करण्याचे काम सुरु झाले. हळुहळु मागणी वाढत गेली.

यानंतर 2008 साली 25 एचरपीचे मोठे मळणी यंत्र (कामधेनू) घेतले. हे यंत्र सर्वप्रथम घेतलेल्या जुन्या ट्रॅक्‍टरला जोडले. दोन ट्रॅक्‍टर व दोन मळणी यंत्रांचा सेटअप उभा राहीला. कंपनीचे काम पाहता पाहता हे सर्व सुरु होते. हा व्यवसाय कधीही बंद करण्याची वेळ येवू शकते, अशी तयारी ठेवूनच सर्व वाटचाल सुरु होती. व्यवसायात पाय रोवण्यासाठी शेतकऱ्यांना कमी वेळात अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु होता. अत्याधुनिक अवजारे, कमी वेळेत कमी पैशात काम होत असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत होता.

शेतकऱ्यांची मागणी वाढल्याने 2010 मध्ये त्यांनी 50 एचपीचा आणखी एक जुना ट्रॅक्‍टर (मॅसे टाफे 5245) विकत घेतला. त्यांना हा ट्रॅक्‍टर ठराविक कंपनीचाच हवा होता. पण मिळेना. शेवटी कंपनीच्या डिलरकडून ट्रॅक्‍टर विकलेल्या लोकांची यादी मिळवली आणि जुन्या ट्रॅक्‍टरची चौकशी सुरु केली. शेवटी तालुक्‍यातच निमगाव दावडी येथिल एका शेतकऱ्याकडे हा ट्रॅक्‍टर मिळाला. हा ट्रॅक्‍टर, औजारे आली आणि कामे आणखी वाढली. 2012 पासून भुईमुग कमी होऊन सोयाबीन पिक वाढले. त्यासाठीही मागणी वाढली.

दरम्यान, बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने पेरणी व इतर कामांना छोट्या ट्रॅक्‍टरची मागणी वाढल्याने 2013 मध्ये त्यांनी 18 एचपीचा आणखी एक नवीन ट्रॅक्‍टर (मित्सुबिशी) विकत घेतला. जुन-जुलैमध्ये दोन्ही लहान ट्रॅक्‍टर पेरणीच्या कामावर दिवसरात्र सुरु असतात. सारा यंत्र, सरी यंत्र, चार फाळी नांगर आदी सर्व यंत्रे सुसज्ज असतात. पॉलीहाऊस, फळबागांमध्येही ट्रॅक्‍टरला मोठी मागणी असते. याच दरम्यान 2013 ला वीस वर्षांच्या नोकरीतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्ववेळ व्यवसायाला वाहून घेतले.

गहू पिकाच्या काढणीसाठी पंजाबहून चौफुला भागात हार्वेस्टर येत. अवकाळी पाऊस, मजूरांची समस्या, वातावरण यामुळे गहू कापणी करुन मळण्यापेक्षा शेककरी हार्वेस्टर आणत. हे हार्वेस्टर मोठे होते. ते अव्वाच्या सव्वा भाडे आकारायचे. संपूर्ण गाव बेतून जायचे. बाहेरचे लोक आपल्या गावात येवून व्यवसाय करतात तर आपण का नाही, या विचारानं शेवटी हार्वेस्टर घ्यायचे नक्की केलं.

लहान लहान तुकड्याच्या जमीनींमुळे लहान हार्वेस्टर घ्यायचे नक्की केले. चांगल्या ब्रॅन्डेड कंपनीचाच (क्‍लास) पसंत पडला. पण बजेट 17 लाखापर्यंत जात होते. महिनाभराचा हंगाम त्यात किती कमवणार. शिवाय परिसरात प्लॉटींग वाढून शेतीचे क्षेत्र वेगाने कमी होतेय. अशा स्थितीत आतबट्ट्याचा उद्योग करण्यापेक्षा जुना छोटा हार्वेस्टर घ्यायचे नक्की केले. इंटरनेटवर शोध घेतला. मांडवगण फराटा येथील शेतकऱ्याची जाहिरात वाचली. पहायला कुणी नाही म्हणून त्यांना विकायचा होता. दहा वर्षे जुना हार्वेस्टर विकत घेतला. यानंतर डिसेंबर 14 ला याच कंपनीचा याच क्षमतेचा आणखी एक जूना हार्वेस्टर विकत घेतला.

हार्वेस्टरसाठी उत्तर प्रदेशचे मजूर बोलवतात. गव्हासाठी एक महिना, सोयाबीनच्या वेळी 20 ते 25 दिवस आणि भात काढणीला 20 दिवस हार्वेस्टर चालतो. हार्वेस्टरचा सोयाबीनसाठी मळणी यंत्रासारखाही वापर करतात. शेतकऱ्यांचा त्याला खूपच चांगला प्रतिसाद लाभला. आकाराने छोटा, वजन कमी, शेतापर्यंत पोचायला व लहानात लहान शेतीतही वापरायला सोपा यामुळे शेतकऱ्यांमध्ये हे यंत्र लोकप्रिय झाले आहे.

- अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास
शेतकऱ्यांना यांत्रिकी सेवा पुरविताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकडे बहिरट यांचा कटाक्ष असतो. यातूनच कमी वेळेत अधिक चांगले काम व्हावे यासाठी चार फाळांचा नांगर, पेरणीसाठी माणसाची आवश्‍यकता नसलेले ऍटोमॅटिक सिड ड्रील, जास्त ब्लेडचा रोटावेटर, फळबागांच्या मशागतीसाठी व फावरणीसाठी छोटा ट्रॅक्‍टर, मळणीसाठी ट्रॅक्‍टरवर चालणारी मळणीयंत्रे, पिक काढणीसाठी नामांकीत कंपनीचा धान्याचे नुकसान न करणारा आणि अडचणीच्या ठिकाणीही सहज पोचू शकणारा अत्याधुनिक हार्वेस्टर अशी अत्याधुनिक यंत्रसामग्री त्यांनी शेतकऱ्यांच्या दिमतीला कार्यक्षमपणे उभी केली आहे.

- सर्व यंत्रांची स्वतः दुरुस्ती
बहिरटांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यवसाय विस्तार करताना दोन छोटे ट्रॅक्‍टर वगळता प्रत्येकी 50 एचपीचे दोन मोठे ट्रॅक्‍टर, दोन मळणी यंत्रे, दोन हार्वेस्टर आणि इतर यंत्रे व औजारे जुनी करेदी केली आहेत. नोकरीत इलेक्‍ट्रॉनिकच्या मेन्टेनन्स विभागात काम करत असल्याने जुन्या यंत्रांची त्यांना भिती नव्हती. सुरवातीला त्रास होईल पण जुनी यंत्रे आपण कमी खर्चात नव्यापेक्षाही भारी चालवू शकू असा विश्‍वास त्यांच्याकडे होता. त्यातूनच त्यांनी ही सर्व यंत्रे दुरुस्त करण्याचे संपूर्ण ज्ञान आत्मसाद केले. अगदी गिअर बॉक्‍सपासून मशिनपर्यंतचा यंत्रांचा सर्व मेन्टेनन्स ते स्वतः घरच्या घरी करतात. छोट्या ट्रॅक्‍टरला मोठे मळणी यंत्र जोडायचा प्रयत्न कुणी केला नव्हता. त्यांनी तो प्रयोग यशस्वी केला, त्याबद्दल ट्रॅक्‍टर कंपनीमार्फतही त्यांचे कौतुक करण्यात आले.

- 25 किलोमिटरपर्यंत कार्यक्षेत्र
चिंबळी गावापासून चारही बाजूंना 25 किलोमिटरपर्यंतच्या परिसरातील शेतकऱ्यांना बहिरट सेवा पुरवितात. अगदी अर्धा एकराचे काम असले तरी ते तेवढ्यासाठी ट्रॅक्‍टर पाठवितात. आळंदी, डुडुळगाव, मोशी, चिखली, देहू, वाल्हेरकरवाडी, चिंबळी, कुरुळी, चाकण, केळगाव, पुणे, पिंपरी, चिंचवड, कोथरुड आदी भागातील शेतकरी व संस्थांची जमीन मशागतीपासून ते पिक मळणीची यांत्रिकीकरणाची सर्व कामे ते करतात. पुण्यात गार्डनिंग, फार्मची कामे डास्त असतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कचरा व्यवस्थापन करणाऱ्या ठेकेदारालाही त्यांनी शेती कामाची तातडीची गरज असेल तेव्हा उपलब्ध करुन देण्याच्या बोलीवर एक छोटा ट्रॅक्‍टर ईएम द्रावण फावरणीसाठी भाड्याने दिला आहे. या व्यवसायाने त्यांना मोठी आर्थिक प्रगती करणे शक्‍य झाले आहे.

- उधारीच्या समस्येवर मात
उधारी ही या व्यवसायातिल मुख्य समस्या आणि बेशिस्त हे तिचे कारण. गरीब शेतकरी हिशेबात चोख असतो. असतील तर लगेच पैसे देतो, नसतील तर चार सहा महिन्याने कधी देणार ते स्पष्ट सांगतो. शब्द पाळतो. आर्थिक स्थिती मजबूत असलेले शेतकऱ्यांनाच बुडवण्याची घाण सवय असते. अशा 300 बुडव्यांची यादीच बहीरट यांनी तयार केलेली आहे. त्यांना दर महिन्याला टच करत राहतात. तीन चार वर्षांनी का होईना पण थोडे थोडे पैसे मिळतात. वाईट लोकांच्या अनुभवाचा चांगल्या लोकांना सेवा देण्यावर वाईट परिणाम होऊ द्यायचा नाही, हे बहिरट यांच्या व्यवसायाचे सुत्र आहे. बुडवेगरी गृहीत धरुन तेवढी गंगाजळी त्यांनी तयार ठेवली आहे. यामुळे उधारीची समस्या कधी जाणवलेली नाही, असे ते आवर्जून सांगतात.

- काटेकोर टाईम मॅनेजमेंट
व्यवसाय वाढत असतानाही बहिरट यांनी नोकरीवर परिणाम होऊ दिला नाही. कंपनीच्या 8 तासात कंपनीसाठी आणि त्याव्यतिरिक्त सर्व वेळ व्यवसायासाठी झोकून काम करत होते. कंपनीत अनेकदा उपस्थितीचे पुरस्कार मिळत असतानाच व्यवसायातही त्यांची प्रगती सुरु होती. कंपनीत विकासाला मर्यादा होत्या. कामगार म्हणूनच आयुष्य घालवायचे का, हा प्रश्‍न त्यांना सतावयाचा. शेवटी पूर्णवेळ व्यवसायातच झोकून द्यायचा निर्णय घेवून 2013 ला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. हे करतानाही वाचलेले 8 तास कुटुंब, सामाजिक गोष्टी, स्वतःसाठी वेळ आणि कंपनीतून मिळायचे किंमान तेवढे उत्पन्न मिळविण्यासाठीची व्यवसायवृद्धी यातून त्यांनी दिनक्रम अधिकाधिक उत्पादक बनवला आहे.

- असा बसतो कर्जाचा विळखा
अनेकजण कर्ज काढून ट्रॅक्‍टर, हार्वेस्टर विकत घेतात. बॅंकेचे हप्ते सुरु झाले की हातघाईला येतात. मग कमी दरात कामे ओढायला सुरवात करुन स्वतःचा अधिकच तोटा करुन घेतात. ग्राहकही अशा अडलेल्यांचा गैरफायदा घेतात. दर कमी आणि उधारी जास्त अशी स्थिती होते. मुंडक्‍यावर पाय देवून हप्ते फेडण्यात यश आले, तरी तोपर्यंत ट्रॅक्‍टर खिळखिळा होतो. इंजिन कामावर येते, टायर गोटा झालेले असतात. बॅंकेचे हप्ते बंद होतात आणि गॅरेजचे हप्ते सुरु होतात. शेवटे असे ट्रॅक्‍टर उकीरड्याच्या किंवा गोठ्यांच्या कडेला जिर्ण अवस्थेत उभे राहतात. हप्ते थकतात त्यांचे ट्रॅक्‍टर बॅंक ओढून नेते. सर्व खर्च बॅंकेच्या घशात जातो. मग घरात वाद सुरु होतात. एकदा वैफल्यग्रस्त अवस्था आली, निगेटिव्हीटी वाढली की पुढे काहीच करता येत नाही. यामुळे शक्‍यतो बॅंकेच्या वाट्याला जावू नये असे बहिरट आवर्जून सांगतात.

- शेतकऱ्यांचे समाधान हाच बहुमान
चिंबळी परिसरातील बहुतेक शेतकरी अत्यल्पभुधारक आहेत. त्यामुळे मशागतीची सर्व भिस्त ट्रॅक्‍टरवर आहे. बहिरट ठरल्या वेळी कामे पूर्ण करतात. अगदी पेरणीच्या वेळीही घरच्या माणसाची गरज नसते, बियाणे दिले की झाले. पेरणीपासून मळणीपर्यंतची सर्व सेवा दिल्याने शेतकऱ्यांशी घरोब्याचे संबंध आहेत. हार्वेस्टरची हमी मिळाली नाही तर शेतकरी पेरणी करत नाहीत, एवढे हे नाते घट्ट आहे. खोटं आश्‍वासन द्यायचे नाही, दिलेली वेळ मोडायची नाही, हा त्यांचा शिरस्ता आहे. शक्‍य नसेल तर या वेळी दुसरं कुणाकडूनही काम करुन घ्या सांगतात. अनेकदा पाऊस हाकेच्या अंतरावर येतो आणि बहिरटांची यंत्रे शेतावर पोचतात. मळणी होवून धान्याची राशी लागते आणि पाऊस सुरु होतो. अशा वेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नुकसान टळल्याचे जे समाधान असते.. तो माझा खरा बहुमान असतो, असं बहिरट अभिमानानं सांगतात.
--------
*अनुभवाचे बोल
ट्रॅक्‍टर घेण्याआधी लक्षात घ्या...
- जुना की नवीन ते ठरवा. नवीनला 12-13 लाख रुपये लागतात. दिवसरात्र हप्ता फेडण्याचे टेन्शन राहते.
- निसर्गाच्या भरवशावर हंगामी व्यवसाय. त्यातही गळेकापू स्पर्धेमुळे व्यवसायाची हमी नाही.
- ट्रॅक्‍टरला आधी खिशातले पैसे घालून डिझेल घालावे लागते. ड्रायवरचा पगार द्यावा लागतो.
- इतर सर्व वाहणे मोकळी पळतात. ट्रॅक्‍टर कायम ओव्हरलोडवर चालतो. यामुळे प्रत्येक गोष्टीवर ताण पडतो.
- ताणामुळे गिअर बॉक्‍स, इंजिन, अवजारे यांची तुटातुट सुरु राहते. परिणामी मॅन्टेनन्स जास्तच असतो.
- एकदा मेन्टेनन्स निघायला लागला की माणूस हातघाईला येतो. चालढकल केली तर धंदाच बंद पडतो.
- ट्रॅक्‍टरला डिझेल जास्त लागते. ऑईलपासून सर्वच गोष्टी महाग. मॅकॅनिक लवकर मिळत नाही.

ट्रॅक्‍टर घेताना...
- जातीवंत शेतकरी असाल तरच ट्रॅक्‍टर घ्यावा. निसर्ग, माती आणि मशीन या तिन्हींचे ज्ञान पाहीजे.
- वाफसा, तण, नियोजित पिक, हवामान या सर्वाचा विचार करुन, शेतकऱ्यांना सल्ला देवून निर्णय घ्यावा लागतो.
- यंत्र घेताना कंपन्या, डिलरला, अनुदान किंवा कर्जाला भुलायचे नाही. फायदा तोट्याचा विचार करायचा.
- इंजिन चांगले पाहिजे. जुनी मशिन घेतल्यास आवश्‍यकतेनुसार इंजिनकाम करायचे.
- टायर चांगले ठेवले, वरच्यावर रिमोल्ड केले तर नव्या पेक्षाही जुना ट्रॅक्‍टर सरस ठरतो.
- आपण जे यंत्र वापरतो त्याची निगा व दुरुस्तीची संपूर्ण माहीती आपल्याला हवी.

जुना ट्रॅक्‍टर, यंत्र घेताना...
- वयापेक्षा वापर किती आहे, हे पाहून निर्णय घ्या. अनेकजण घरगुती कामाला किंवा हौस म्हणूनही घेतात. असे ट्रॅक्‍टर चांगले.
- दिसण्यावर जावू नका. ट्रॉली जोडायचा हुक, नांगराचा फाळ, अवजारे यांची झिज पाहून वापर लक्षात घ्या.
- अवजारे जोडायच्या लिंक, हायड्रॉलिकची अवस्था यावरुन ट्रॅक्‍टरची अवस्था लक्षात येते.
- या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील आणि ट्रॅक्‍टरचे वय जास्त असेल तरी तो ट्रॅक्‍टर नव्याला भारी असतो.
- असा जुना ट्रॅक्‍टर "लो लेवल ट्रायल' झाल्यासारखा असतो. तरीही त्याची व्यवस्थित ट्रायल घ्यायची.
- गरज आहे तेच यंत्र व्यवस्थित किमतीत मिळतेय आणि समोरचाही व्यवहाराला चांगला आहे हे पाहूनच घ्यावे.
- त्यातूनही वस्तूच खराब लागलीच तर किमान 50 हजार रुपये बाजूला काढून ठेवायचे. ऐनवेळी खोळंबा, ताण होत नाही.
- ट्रॅक्‍टरचे इंजिन फेल झाले तरी 50 हजाराच्या पुढे खर्च जात नाही. गिअर बॉक्‍स 10-12 हजाराच्या पुढे जात नाही.

यांत्रिकी सेवा व्यवसाय करताना...
- शेतीत ट्रॅक्‍टर, हार्वेस्टरच्या ड्रायवरचे काम अतिशय कौशल्याचे. शेती व यंत्र दोन्हींचे ज्ञान लागते.
- ड्रायवर नसेल तेव्हा स्वतः काम करण्याची तयारी हवी, तुमच्या व्यवसायातलं सगळं तुम्हाला यायला हवे
- अतिवृष्टी, दुष्काळ अशा स्थितीत महिनेच काय वर्षभरही बसुन रहावं लागतं. तशाही अवस्थेतही खंबिर राहता आले पाहिजे.
- तत्पर व नियोजनबद्ध सेवा महत्वाची. वेळेचे काटेकोरपणे पाळणे आवश्‍यक. प्रचलित दराहून एक रुपयाही जादा घेवू नये.
- शेतकरी दुसरीकडे गेला तर राग धरु नये. कुणाचीही अडवणूक करु नये. दुखवू नये. बिकट परिस्थितीतही सर्वोत्तम सेवा द्यावी.
- नफा नाही म्हणून लहान कामे टाळू नये. शेतकऱ्यांशी असलेले संबंध व त्याचे काम महत्वाचे हे लक्षात ठेवावे.
--------
- असे आहेत दर
फणणी - 700 रुपये प्रति तास
सारे पाडणे - 600 रुपये प्रति तास
रोटावेटर (42 ब्लेड, 6 फुट) - 900 रुपये प्रति तास
नांगरणी (4 फाळी नांगर) - 900 रुपये प्रति तास
पेरणी (ऍटोमेटिक पेरणी यंत्र) - 800 रुपये प्रति तास
मळणी - गहू - 200 रुपये क्विंटल; ज्वारी, बाजरी - 150 रुपये क्विंटल
हार्वेस्टर ः तीन हजार रुपये एकर (लहान प्लॉट, अडचणीचे रस्ते)
----------
संपर्क ः शंकर बहिरट 9850240130
------------------- 

गारपीटीची शक्‍यता मावळली - 15 April

पावसाचा अंदाज आजचा दिवस

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या आठवडाभरात राज्यात ठिकठिकाणी सातत्याने सुरु असलेली गारपीट अखेर थांबण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने फक्त गुरुवारी (ता.16) मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये एखाद-दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा दिला असून गुरुवारपासून (ता.17) राज्यात कोठेही गारपीट होण्याची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी सकाळपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला.

कुलाबा व पुणे वेधशाळांनी गुरुवारी मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारपासून राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहणार असल्याचे स्पष्ट केले असून पावसाचा किंवा गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही.

बुधवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडला. कोकणात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या संपूर्ण भागात कमाल तापमानात सरासरीहून पाच ते आठ अंश सेल्सिअसने उल्लेखनिय घट झाली आहे. किमान तापमानही बहुतेक ठिकाणी सरासरीहून घसरलेले होते. भिरा येथे राज्यात सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

अरबी समुद्रावर समुद्रसपाटीपासून दीड किलोमिटर उंचीवर लक्षद्वीपच्या भागात चक्राकार वारे सक्रीय आहेत. दुसरीकडे मध्य प्रदेशवरही चक्राकार वारे सक्रीय आहेत. या दोन्ही चक्राकार वाऱ्यांदरम्यान म्हणजेच लक्षद्वीपपासून कर्नाटक, मध्य महाराष्ट्र ते मध्य प्रदेशच्या दक्षिण भागापर्यंत समुद्रसपाटीपासून दीड किलोमिटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. दक्षिण अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. हिमालयात पश्‍चिमी चक्रावात सक्रीय झाला असून त्याचा प्रभाव 19 एप्रिलनंतर पश्‍चिम हिमालयीन भागात जानवेल असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

विदर्भ ः बेलोरा 32.2, अंबाडा 24, रिधोरा 20, मेटपांझरा 18, कामठी 17.6, पुसाळा 16, मोर्शी 15, नागपूर व पार्डी प्रत्येकी 14.8, लोणी 13.3, असराली 12.8 सावरगाव 12, नरखेड 9.2, सोयगाव 7.3, बोरी, वाडी, बुलडाणा, राजुरा, काटोल प्रत्येकी 6, खापरी 5, धुळघाट, कोरडी, कळमेश्‍वर, किट्टीपूर व धारणी प्रत्येकी 4, अर्णी व वर्धा प्रत्येकी 1

मध्य महाराष्ट्र ः लोणावळा 30, खडकाळा 19, महाबळेश्‍वर 13.4, यवत 11, जामखेड 9.4, नायगाव, केडगाव व लामज प्रत्येकी 8, तापोळा 5, शिवने 4, त्र्यंबकेश्‍वर 3, वडगाव मावळ व जुन्नर प्रत्येकी 2,

मराठवाडा ः मानवत व नांदपूर प्रत्येकी 20, अखाडा 12, पाली 10, कळमनुरी 5, पाडोदा व वरंगा प्रत्येकी 4, कावडगाव व पाथरी प्रत्येकी 3

कोकण ः अंबरनाथ 10
------------- 

सरकारच्या मनात आहे तरी काय ?

ना पंचनामे, ना मदत
सरकारच्या मनात आहे तरी काय ?

राज्यभरातील शेतकऱ्यांचा सवाल

टीम ऍग्रोवन
पुणे ः मोठमोठे ताफे घेवून मंत्री आले, गारपीटीचे नुकसान पाहून गेले. तत्काळ मोठी मदत देवू म्हणाले. प्रत्यक्षात नुकसानीला महिना उलटून गेला तरी ना पंचनामे व्यवस्थित केलेत, ना मदत मिळाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात पिके गाळून आणि राज्यकर्त्यांनी पोकळ घोषणा करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारच्या मनात शेतकऱ्यांना मदत द्यायचे नक्की आहे का ? असा सवाल राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

गेली जवळपास दीड महीने राज्यात अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त पिकांचे पंचनामे सुरु असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात राज्याच्या बहुतेक भागात पंचनामे झालेच नसल्याचे आणि झाले तेथेही महत्वाची नुकसानग्रस्त पिके पंचनाम्यातून वगळल्याची कैफियत शेतकऱ्यांनी माडली आहे. गारपीटग्रस्तांना यापुर्वी दिलेल्या मदतीपेक्षा मोदींनी जाहिर केलेली सुधारीत मदत कमी असल्याबद्दल आणि राज्य सरकारने याविषयी चुप्पी साधल्याबद्दलही शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. पंचनाम्यांचे निकष सुधरावेत, मदतीच्या रकमेत वाढ करावी आणि मदत तातडीने द्यावी, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

- दोनदा आघात, मदतीचा पत्ता नाही
मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसून माझी 13 एकरावरील पपई पूर्णतः जमीनदोस्त झाली. तर सात एकरापैकी निम्म्यापेक्षा जास्त कांद्याचे पीक वाया गेले. तलाठ्यामार्फत रितसर पंचनामे झाले. मदत किंवा नुकसान भरपाई लगेच मिळेल, अशी आशा बाळगून होतो. प्रत्यक्षात महिनाभराच्या अंतराने 11 एप्रिलला पुन्हा अवकाळीचा फटका बसून शिल्लक कांद्याचे पीक हातचे गेले, तरीही पूर्वीची नुकसान भरपाई पदरात पडली नाही.
- राकेश काकुस्ते, शेणपूर, जि. धुळे.

- अर्धवट पंचनामे, शुन्य मदत
आमच्या केळीबागांना तसेच कलिंगड, गहू, हरभरा पिकांना मार्च महिन्यातील गारपीट व अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. मात्र, महसूल व कृषी विभागाने फक्त गहू आणि हरभऱ्याचे पंचनामे केले आहेत. आम्हाला वरुन आदेश नाहीत, असे सांगून हेटाळणी केली. संबंधित यंत्रणेच्या आडमुठेपणामुळे आम्हाला आजतागायत कोणतीही नुकसान भरपाई मिळू शकलेली नाही. गारपिटीच्या तडाख्यातून वाचलेली कलिंगडाची फळे आता एक- दीड रुपये किलो दराने विकावी लागत आहे.
- गोकूळ पाटील, चांगदेव, जि. जळगाव.

- देखावा पुरे, आधार द्या !
खरीपात दुष्काळाने वाट लावली. रब्बीत सावरण्याचा प्रयत्न केला. पावणेदोन लाखाची पदरमोड केली. पण अवकाळी पावसाने सारं पिकं गमावलं. पण एका एकरातल्या बटाट्याचं पिक जमीनीतच सडले. गहू अन्‌ हरभऱ्याचा पंचनामा करणाऱ्या यंत्रणेने बटाटा, अद्रक, कांदा पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे टाळले. संकट समोर असतांना बॅंकेने कापसाच्या विक्रीतून मिळालेल्या थोड्याबहूत पैशातून थकित कर्ज कापलं. आता चरितार्थाचे वांधे आहेत. पत्नीच्या आजारपणाचा इलाज करण्यासाठी पैसा नाहीत. सरकारनं पंचनाम्यांचा दिखावा न करता किमान शेतीला लागलेला खर्च देवून कायम दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या आम्हा शेतकऱ्यांना आधार द्यावा.
- हबीब शहा उस्मान शहा, दानापूर ता. भोकरदन. जि. जालना.

- पंचनाम्याला कुणी फिरकलेलंच नाही
पाण्यामुळे यंदा वर्षी द्राक्षबाग काढून टाकली. त्यात एक एकर घेवडा, 2 एकर मका अशी पीके केली. गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस व गारपीटीने काढणीस आलेला घेवडा आणि मका पूर्णतः खराब झाला. त्यापूर्वी तीन साडेतीन एकर ज्वारीही अशीच काळी भंगार झाली. पंचनाम्यासाठी, पाहणीसाठी कोणताही अधिकारी-कर्मचारी फिरकलेला नाही. सरकारलाही कुठंवर मागावं, पण पर्यायच नाही. त्याशिवाय आम्ही तगूच शकणार नाही. नुकसानग्रस्त पिकासाठी तातडीने मदत द्यावी, वीजेचे बील माफ करावे. कर्ज माफ करावे, तरच आम्ही पुन्हा उभारु, अन्यथा काही खरे नाही.
-भारत गवळी, नान्नज, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर

- पंचनाम्याचे निकष बदला
फेब्रुवारीपासून सतत गारपीट, पाऊस होत असताना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. संत्रा बागेच्या हायटेक व्यवस्थापनावर 40 ते 45 हजार रुपयांचा एकरी खर्च होतो. त्यानुसार संत्राबागांसाठी एकरी 25 हजार रुपयांची मदत मिळण्याची गरज आहे. आज संत्रा उत्पादकांना हेक्‍टरी 12 हजार मदतीचा निकष आहे. हा तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. गारपीटीनंतर संत्रा, मोसंबी बागांचे तत्काळ नुकसान दृष्टीपथात येत नाही. आर्दता वाढल्याने 15 दिवसांनी फळगळ वाढीस लागते, त्यामुळे संत्रा बागांच्या पंचनाम्यांच्या निकषात बदलाची गरज आहे.
- मनोज जवंजाळ, काटोल, ता. काटोल, जि. नागपूर.

- अधिकारी फिरकलेच नाहीत, मदतीबाबत शंका
रिसोड तालुक्‍यातील हळद उत्पादकांचे कधीच भरुन न निघणारे नुकसान झाले. पावसामुळे हळकुंड कालवंडल्याने (काळे पडले) 2500 ते 3000 रुपयांचा दर मिळणेही दुरापास्त वाटते. त्यामुळे नुकसानीचा अंदाज आणि बाजारपेठेचा आढावा घेऊनच आर्थिम मदतीचे धोरण ठरले पाहिजे. तालुक्‍यात हळद उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असताना प्रशासनातील एकही अधिकारी सर्व्हेक्षण व पंचनाम्यासाठी शिवारात पोचला नाही. त्यामुळे मदतीबाबत साशंकताच आहे.
- गजानन काष्टे, भर जहॉंगीर, ता. रिसोड, जि. वाशीम.

- पोकळ आश्‍वासने, मदत नाही
केंद्रीय कृषिमंत्री भल्या मोठ्या ताफ्यासह 21 मार्चला येवून गेले. कर्जमाफी, योजनांतून मदत मिळावी यासाठी निवेदने दिली. त्यानंतर यंत्रणेने पंचनामेही पूर्ण केले. हेक्‍टरी 25 हजारांची मदत मिळेल, असे मंत्र्यांनी सांगितले होते. पहिला टप्पा तर लगेच दोन दिवसात मिळेल, असे सांगण्यात आले. पण नुकसान होऊन आता महिना झाला. आणखी दोन वेळा पाऊस, गारपीट झाली. पंतप्रधान तर अगोदरच्या रक्कमेपेक्षा दीड पट म्हणजे 37 हजारापर्यंत मदत देऊ असं म्हणाले. अजून तरी कोणतीच मदत शासनाकडून मिळाली नाही. आमची अन परिसरातील द्राक्षशेती उध्दवस्त झाली आहे. पुढील हंगामाचीही चिंता सतावतेय. मदत करावी असं खरोखरच सरकारच्या मनात आहे की नाही हेच कळत नाहीय !''
- डॉ. योगेश डुंबरे, वनसगाव, ता. निफाड, जि. नाशिक
----------(समाप्त)--------