Monday, April 13, 2015

तयारी खरिपाची - भाग 1

राज्यात यंदा 162 लाख टन
अन्नधान्य उत्पादनाचे उद्दीष्ट

कृषी विभागाचे नियोजन; मुख्य भर खरिपावर

*कोट
""खरिपाची शाश्‍वती वाढविण्यासाठी कापूस व सोयाबीनमध्ये कडधान्य पिकांची आंतरपिक म्हणून लागवड वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत यंदाच्या खरिपात विदर्भ व मराठवाड्यात विशेष प्रयत्न करण्याचे नियोजन आहे.''
- के. व्ही. देशमुख, विस्तार संचालक, कृषी विभाग

पुणे (प्रतिनिधी) ः राज्याच्या कृषी विभागाने यंदा (2015-16) अन्नधान्याचे एक कोटी 62 लाख 22 हजार टन तर तेलबियांचे 60 लाख 66 हजार टन उत्पादन करण्याचे उद्दीष्ट निश्‍चित केले आहे. याचा मुख्य भार नेहमीप्रमाणे खरिप हंगामावर राहणार आहे. खरिपात एक कोटी 51 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी करुन अन्नधान्यांचे एक कोटी टन, तेलबियांचे 57 लाख टन, कापसाचे 69 लाख गाठी तर उसाचे 773 लाख टन उत्पादन मिळविण्याचे उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट गाठण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत खरिपात विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

खरिप हा राज्यांचा मुख्य हंगाम आहे. यातील बहुतेक पिके सिंचनासाठी पावसावर अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षातील पाऊस, पिक पेरणी, उत्पादन, उत्पादकता विचारात घेवून कृषी विभागामार्फत योजनांची अंमलबजावणी व शेतकऱ्यांना खते, बियाणे आदी पुरक सुविधा पुरविण्यासाठी पेरणी क्षेत्र, उत्पादन व उत्पादकतेची उद्दीष्टे निश्‍चित करण्यात आली आहेत. ही उद्दीष्टे सरासरी व गेल्या काही वर्षांपेक्षा जास्त ठरविण्यात आली आहेत. यानुसार हंगामात पिकनिहाय उत्पादकतावाढ कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

हंगामात सर्वाधिक 46.50 लाख हेक्‍टर क्षेत्रावर तृणधान्ये, 38.28 लाख हेक्‍टरवर तेलबिया, 34.24 लाख हेक्‍टरवर कापूस, 23.05 लाख हेक्‍टरवर कडधान्ये तर 8.95 लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊस पिक राहील, असे नियोजन आहे. गेल्या वर्षी पाऊस महिनाभर उशीरा आल्याने व त्यानंतरही पावसात खंड पडल्याने खरिपाला मोठा फटका बसला होता. सोयाबीन व कापूस वगळता उर्वरीत सर्वच पिकांच्या लागवडीत मोठी घट झाली होती. यंदा त्यात भरिव वाढ अपेक्षित आहे.

- उत्पादकतेच्या केंद्रस्थांनी तृणधान्ये
राज्यातील खरिप तृणधान्यांची सरासरी उत्पादकता कमी आहे. यामुळे यंदाच्या हंगामात कडधान्ये, गौण तेलबिया, ऊस, कापूस यांच्यापेक्षाही कृषी विभागाचा मुख्य भर ज्वारी, बाजरी, भात व मका या तृणधान्यांवर आणि सोयाबीन या मुख्य तेलबिया पिकावर राहणार आहे. यासाठी विशेष अभियान, प्रात्यक्षिके राबवण्याचे नियोजन आहे.

- रब्बी, उन्हाळी सरासरीएवढे
खरिपापाठोपाठ येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागाने पिक पेरणीचे उद्दीष्ट सरासरीएवढे तर उत्पादन व उत्पादकता वाढीचे उद्दीष्ट सरासरीहून अधिक प्रमाणात नक्की केले आहे. रब्बीत 62.90 लाख हेक्‍टरवर पेरणीचे तर 62 लाख टन अन्नधान्य व 2.60 लाख टन तेलबिया उत्पादनाचे उद्दीष्ट आहे. उन्हाळी हंगामात 1.38 लाख हेक्‍टरवर पेरणीचे आणि एक लाख टन अन्नधान्य व 1.40 लाख टन तेलबिया उत्पादनाचे नियोजन आहे.

*चौकट
- असे आहे खरिपाचे उद्दीष्ट (2015)
पिक --- पिक पेरणी (लाख हेक्‍टर) --- उत्पादन (लाख टन) --- उत्पादकता (किलो प्रति हेक्‍टर)
भात --- 14.42 --- 28.63 --- 1918
ज्वारी --- 10.37 --- 14.98 --- 1444
बाजरी --- 11.45 --- 11.13 --- 972
नाचणी --- 1.27 --- 1.26 --- 986
मका --- 7.87 --- 23.70 --- 3012
तूर --- 11.83 --- 11.88 --- 1004
मुग --- 5.34 --- 3.55 --- 665
उडीद --- 4.47 --- 3.02 --- 677
भुईमुग --- 2.98 --- 3.34 --- 1122
तीळ --- 0.70 --- 0.23 --- 322
कारळे --- 0.42 --- 0.10 --- 248
सुर्यफुल --- 0.99 --- 0.56 --- 562
सोयाबीन --- 33.08 --- 52.38 --- 1584
ऊस --- 8.95 --- 773.08 --- 86 (टन)
कापूस (गाठी) --- 34.24 --- 68.89 --- 342
----------(समाप्त)--------- 

No comments:

Post a Comment