Friday, April 24, 2015

आम्ही स्वयंसेवी - SSIAST

शेतकरी प्रबोधन, प्रशिक्षणात
श्री श्री कृषी विज्ञान संस्थेची मोहर
----------------
संतोष डुकरे
---------------
शेतकऱ्यांच्या विकासाचा हे मुख्य उद्दीष्ट घेवेवून आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी कर्नाटकातील बंगलोर 2000 साली श्री श्री ऍग्रिकल्चर सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी ट्रस्ट (श्री श्री कृषी विज्ञान व तंत्रज्ञान संस्था) ची स्थापन केली. गेल्या पंधरा वर्षात या संस्थेमार्फत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये भरीव कामगिरी करण्यात आली असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ज्ञानाची व प्रगतीची नवी कवाडे खुली झाली आहेत.
-------------------
श्री श्री कृषी विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेमार्फत देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात संस्थेमार्फत अनेक उपक्रम सुरू आहेत. नैसर्गिक शेती, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, रसायनमुक्त शेती, कृषी विषयक पदविका अभ्यासक्रम, पर्यावरण विकास, देशी गोवंश संगोपन व संवर्धन, देशी बीज विकास आदी विषयक अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांवर संस्थेचा मुख्य भर असून त्यातून अनेक यशोगाथा आकाराला आल्या आहेत.

रासायनिक किंवा अनैसर्गिक अनैसर्गिक कृषी निविष्ठा वापरल्याने कृषी उत्पादनात वाढ झाली असली तरी त्याच्या दुष्परिणामांमुळे वातावरण, हवा, पाणी, माती प्रदूषित झाले आहे. अशा स्थितीत जमिनीवरील व जमिनीखालील जैविक चक्र सक्रिय करण्याच्या उद्देषाने संस्थेमार्फत रसायनमुक्त नैसर्गिक शेती ला चालना देण्यात येत आहे. देशी गाय, तिचे शेण, मूत्र यांचा वापर वाढविण्यास शेतकऱ्यांना चालना देण्यात येत आहे. याशिवाय संस्थेमार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशातील 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

रसायनमुक्त नैसर्गिक शेती, देशी गायीचे महत्त्व व शेण-मुत्राचा वापर, उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर, आंतरपिके, मिश्रशेती पद्धती, कीड व रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी विविध वनस्पतीचा वापर, देशी बियाणे निवड पद्धतीने वाण सुधारणा, बियाण्याचे सर्वेक्षण, संरक्षण व उत्पादन, बियाणे बॅंक, फळे व भाजीपाला उत्पादनवाढ व काढणीपश्‍चात प्रक्रिया, जमीन समृद्धी अशा अनेक विषयांवर संस्थेमार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मानसिक उभारी देण्यापासून ते पीक उत्पादनवाढीपर्यंत अनेक प्रकारचे पाठबळ संस्थेमार्फत देण्यात येत आहे.

- श्री श्री किसान मंच
देशभरात कृषी क्षेत्रात संस्थेचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपातळीपासून जिल्हा, राज्य व देशपातळीवर संस्थात्मक उभारणीचे काम नुकतेच संस्थेमार्फत सुरू आहे. ग्राम पातळीवर श्री श्री किसान मंच स्थापन करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्‍नांवर, अडचणीवर, तंत्रज्ञान प्रसार, पणन विषयक काम करण्यात येत आहे. जिल्हा पातळीवरील कृषी तज्ज्ञांच्या समितीमार्फत शेतकरी, शासन, ग्राहक, शास्त्रज्ञ व धोरणकर्ते अशा विविध वर्गाला स्वाभिमान, आर्थिक बळ, आत्मिक व आध्यात्मिक बळ देण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अंकुशदादा भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कृषी शिखर समिती स्थापन करण्यात आलेली असून त्यात कृषिभूषण विजयअण्णा बोराडे, माजी कृषी आयुक्त कृष्णा लव्हेकर, माजी कृषी संचालक जयंत महल्ले, ज्येष्ठ पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नितीन मार्कंडेय व डॉ. माधव पोळ यांचा समावेश आहे. या समितीमार्फत विदर्भातील सात, मराठवाड्यातील तीन व पश्‍चिम महाराष्ट्रातील चार अशा 14 जिल्ह्यांमध्ये शेतकरी मेळावे व इतर उपक्रम सुरू आहेत. किसान मंचकडे आत्तापर्यंत सहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

- देशी गोवंश विकास
देशी गाईची दूध उत्पादन क्षमता व इतर गुण लोक विसरत चालले आहेत. योग्य संवर्धन व जोपासना केल्यास देशी गाय जर्सी व इतर गायींच्या बरोबरीने दूध देत आहेत. जर्सी व तत्सम गायीचे दूध "ए 1' समजले जाते. हे दूध दूध मानवी आरोग्यास हानिकारक असते, असे न्युझीलॅन्डमधील शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. तुलनेत देशी गायीच्या दुधाला "ए 2' दूध संबोधले जाते. आशिया खंडातील देशी गायींचे दूध पुरातन काळापासून उत्कृष्ट समजले जाते आहे. या पार्श्‍वभूमीवर "ए 2' दुधाचा प्रसार, प्रचार, उत्पादन वाढविण्यासाठी जागृती करण्याचे प्रयत्न संस्थेमार्फत सुरू आहेत. देशी गाईच्या संवर्धन व संगोपनासाठी देशात 10 गोशाळा स्थापन केल्या असून सुरत, महाराष्ट्र, चेन्नई या राज्यांत गोशाळांचे काम चालू आहे.

- देशी बीज बॅंक
दर्जेदार, सकस व अस्सल गावरान किंवा देशी बियाणे हा समृद्ध शेतीचा मुख्य आधार असतो. नैसर्गिक शेतीत देशी बियाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दृष्टीने संस्थेमार्फत देशी बियाण्याच्या विकासासाठी व प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करण्यात येत आहे. त्यातही महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यांमध्ये या कामाची व्याप्ती अधिक असून आत्तापर्यंत गहू, हरभरा, मूग आदी पिकांच्या हजारो रुपयांच्या देशी बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी स्वतःची बियाणे बॅंक तयार करत आहेत.

- सर्वांसाठी कृषी शिक्षण
देशातील सर्व वयोगटातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, फळे व भाजीपाला मूल्यवर्धन पदविका, पीक व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका, ऍग्री क्‍लिनिक ऍण्ड ऍग्री बिझनेस प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका आदी विविध प्रकारचे कृषी शैक्षणिक अभ्यासक्रम संस्थेमार्फत उपलब्ध करण्यात आले असून त्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आहे. संस्थेच्या बंगलोर येथील मुख्य कार्यालयातून हे अभ्यासक्रम चालवले जातात.

- कमी खर्चाचे देशी तंत्रज्ञान
संरक्षित शेतीचे अत्यंत कमी खर्चाचे मात्र अतिशय उपयुक्त असे देशी तंत्रज्ञान प्रसारित करण्यासाठी संस्थेमार्फत विशेष प्रयत्न सुरू आहेत. यातूनच कमी खर्चिक पॉलिहाऊस, शेडनेट हाउस उभारणी व वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. शेतीविषयक विविध बाबींवर संशोधन करण्यासाठी संस्थेमार्फत रांची येथे संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

- पाणलोट विकास
सिंचन हा शेतीचा आत्मा आहे. तो अधिक सशक्त करण्यासाठी संस्थेमार्फत पाणलोट विकास, जलसंवर्धन, मृद संवर्धन, नदी नाले पुनरुज्जीवन आदी कामे करण्यात येत आहेत. या जोडीनेच वन लागवड, फळझाड लागवड, जैविक इंधन झाडाची लागवड या माध्यमातून वन व पर्यावरण समृद्धीलाही चालना दिली जात आहे. दर वर्षी गुरुपौर्णिमेला "दी आर्ट ऑफ लिव्हिंग - वर्ल्ड एन्व्हिरॉन्मेंट डे' साजरा केला जातो. यात प्रामुख्याने वृक्षलागवड कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संस्थेमार्फत देशात आत्तापर्यंत एक कोटीहून अधिक लक्ष्मीतरू वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. हा बहुगुणी वृक्ष असून त्याचा वापर कॅन्सरवरील उपचार व इतर अनेक कारणांसाठी केला जातो.

- श्री श्री शेतकरी बाजार
शेतकऱ्यांना गोपालन, दुग्धव्यवसाय, फळे, भाजीपाला, अन्नधान्य उत्पादन याबाबत मार्गदर्शन करून सेंद्रिय उत्पादनवाढ करतानाच काढणीपश्‍चात प्रक्रिया आणि शेतमाल विक्री व्यवस्थेतही सुधारणा करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. यासाठी मध्य प्रदेशातील भोपाळ, बिहारमधील रांची आदी ठिकाणी श्री श्री शेतकरी बाजार सुरू करण्यात आले आहेत. गुजरातमध्ये सुरत व इतर काही शहरांमध्ये ऑरगॅनिक शॉप सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी शेतकरी आपला शेतमाल थेट विक्रीसाठी ठेवतात. याशिवाय संस्थेच्या नावाने जालन्यासह अनेक शहरामध्येही शेतकरी उत्पादनाची थेट विक्री करत आहेत.

*कोट
""नैसर्गिक व सेंद्रीय शेती केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांच्या विकासासाठी संस्था कार्यरत आहे. मातीपासून शेतमाल विक्रीपर्यंत "मुल्य साखळीचा'चा प्रत्येक कमकुवत दुवा बळकट करण्याचा प्रयत्न आहे.''
- डॉ. रामकृष्ण मुळे, अध्यक्ष, श्री श्री ऍग्रिकल्चर सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी ट्रस्ट, बंगलोर
---------------
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ ः ssiast.com
संपर्क ः डॉ. रामकृष्ण मुळे - 09342139075
---------------
छायाचित्रे - अमित गद्रे सरांच्या लॉग ईनला मुव्ह केलेली आहेत.
---------------

No comments:

Post a Comment