Wednesday, April 15, 2015

शंकर बहिरट - यांत्रिकरण पुरवठा यशोगाथा


शेती यांत्रिकी सेवातून
शुन्यातून साधली प्रगती
------------
मातीतून उगवलेल्या माणसाला मातीची ओढ शांत बसू देत नाही. कोठेही असला तरी त्याचं मन शेतीकडं ओढ घेत राहते. याच ओढीनं इंद्रायणी काठच्या चिंबळी (ता.खेड, पुणे) गावातील शंकर बहिरट यांनी इलेक्‍ट्रेशियनची नोकरी करता शेतीपुरक व्यवसायातही शुन्यातून भरारी घेतली. त्यांच्या शेतीला यांत्रिकी सेवा पुरविण्याच्या सेवाभावी व्यवसायाने 50 किलोमिटर परिघातील शेतकऱ्यांची शेती सोपी केली आहे.
-------------
संतोष डुकरे
-------------
देवाच्या आळंदीपासून जवळच चिंबळी हे गाव आहे. त्यातील अनेक कोरडवाहू शेतकरी एकत्र कुटुंबांपैकी शंकर बहिरट यांचे एक. कुुटंबाची 15 एकर कोरडवाहू जमीन असली तरी त्यातून फारसे उत्पन्न नव्हते. यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच. शेतीची आवड असली तरी अर्थाजनासाठी बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नव्हते. मग इलेक्‍ट्रॉनिकमध्ये आयटीआय केले आणि भोसरीत 1993 साली एका खासगी कंपनीत नोंकरी सुरु केली.

नोकरीत आयुष्य घालवायचे नाही ही खुणगाठ पक्की होती. यातूनच भोसरीत इलेक्‍ट्रॉनिक वस्तू विक्री व दुरुस्तीचे दुकान टाकले. लहान भावाला शिकवले आणि त्यालाही याच व्यवसायात पारंगत करुन सर्व जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. पण शेतीची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. सुरवात करायची, पण माहित काही नाही. म्हणून घरची कामं झाली तरी खूप या विचाराने ट्रॅक्‍टर घ्यायचा निर्णय घेतला. मुळात आर्थिक परिस्थिती बेताची त्यात दिवसरात्र जिव काढून संसाराला कमवायचे की नवीन वस्तूच्या मोहात बॅंकेचे हप्ते भरायचे हा विचार करुन त्यांनी जुना ट्रॅक्‍टर घेण्याचा निर्णय घेतला. एका मित्राच्या भागिदारीत एक जुना ट्रॅक्‍टर (फोर्ड) विकत घेतला. पुढे मित्राला अडचणी आल्याने जमीन मशागतीचा व्यवसाय स्वतःच करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात झोकून दिले.

सुमारे 25 वर्षापूर्वीचा काळ. शेतकऱ्यांकडे घरोघरी मशागतीसाठी बैल होते. पेरणी, मशागत, खळ्यात मळणी सर्व कामे बैलांनीच व्हायची. महिनोन्‌ महिने काम नसायचं. ट्रॅक्‍टर उभा रहायचा. ड्रायवरचा पगारही खिशातून द्यावा लागायचा. काही दिवस तळेगाव एमआयडीसीत भाड्याने देऊन पाहीला पण गणित तोट्याचं झालं. यादरम्यान घरच्या शेतीत लक्ष दिले. पंधरा एकरपैकी चार एकर बागायत, त्यालाही तीन किलोमिटरहून इंद्रायणीचं पाणी पंधरा जणांनी भागिदारीत आणलेले. पंधरा दिवसातून एक दिवसाची बारी वाट्याला यायची. पाणी पुरेना. मजूरांची समस्या वाढली. अर्थकारण तोट्यात जायला लागलं. त्यामुळे शेतीवर अवलंबून राहणे काही पटेना. शेवटी शेतीला यांत्रिकी सेवा पुरविण्याच्या व्यवसायातच झोकून देण्याचा निर्णय घेतला.

रानं कडक असल्यानं नांगरणीला 10-10 बैल लागायचे. यामुळे बैलांनी नांगरणी कमी झाली आणि हळूहळू नांगरणीला ट्रॅक्‍टरची मागणी वाढत गेली. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेवून 2005 साली 15 एचपी चे मळणी मशीन (सोनालिका) घेतले. ते ही जुने. पण ट्रॅक्‍टरने मळणी करणे लोकांच्या पचनी पडायचे नाही. अनेक गैरसमजूती होत्या. पण हळूहळू लोकांचे विचार बदलत होते. मळणी यंत्राचा व्यवसाय वाढल्यावर त्यासाठी कर्ज काढून 18 एचपीचा नवीन चारचाकी (मित्सुबिशी) घेतला. सर्व अवजारे, पेरणी यंत्र विकत घेतली. त्यावर ज्वारी, बाजरी, गहू, उडीद, हरभरा आदी पिकांची मळणी करण्याचे काम सुरु झाले. हळुहळु मागणी वाढत गेली.

यानंतर 2008 साली 25 एचरपीचे मोठे मळणी यंत्र (कामधेनू) घेतले. हे यंत्र सर्वप्रथम घेतलेल्या जुन्या ट्रॅक्‍टरला जोडले. दोन ट्रॅक्‍टर व दोन मळणी यंत्रांचा सेटअप उभा राहीला. कंपनीचे काम पाहता पाहता हे सर्व सुरु होते. हा व्यवसाय कधीही बंद करण्याची वेळ येवू शकते, अशी तयारी ठेवूनच सर्व वाटचाल सुरु होती. व्यवसायात पाय रोवण्यासाठी शेतकऱ्यांना कमी वेळात अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु होता. अत्याधुनिक अवजारे, कमी वेळेत कमी पैशात काम होत असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत होता.

शेतकऱ्यांची मागणी वाढल्याने 2010 मध्ये त्यांनी 50 एचपीचा आणखी एक जुना ट्रॅक्‍टर (मॅसे टाफे 5245) विकत घेतला. त्यांना हा ट्रॅक्‍टर ठराविक कंपनीचाच हवा होता. पण मिळेना. शेवटी कंपनीच्या डिलरकडून ट्रॅक्‍टर विकलेल्या लोकांची यादी मिळवली आणि जुन्या ट्रॅक्‍टरची चौकशी सुरु केली. शेवटी तालुक्‍यातच निमगाव दावडी येथिल एका शेतकऱ्याकडे हा ट्रॅक्‍टर मिळाला. हा ट्रॅक्‍टर, औजारे आली आणि कामे आणखी वाढली. 2012 पासून भुईमुग कमी होऊन सोयाबीन पिक वाढले. त्यासाठीही मागणी वाढली.

दरम्यान, बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने पेरणी व इतर कामांना छोट्या ट्रॅक्‍टरची मागणी वाढल्याने 2013 मध्ये त्यांनी 18 एचपीचा आणखी एक नवीन ट्रॅक्‍टर (मित्सुबिशी) विकत घेतला. जुन-जुलैमध्ये दोन्ही लहान ट्रॅक्‍टर पेरणीच्या कामावर दिवसरात्र सुरु असतात. सारा यंत्र, सरी यंत्र, चार फाळी नांगर आदी सर्व यंत्रे सुसज्ज असतात. पॉलीहाऊस, फळबागांमध्येही ट्रॅक्‍टरला मोठी मागणी असते. याच दरम्यान 2013 ला वीस वर्षांच्या नोकरीतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्ववेळ व्यवसायाला वाहून घेतले.

गहू पिकाच्या काढणीसाठी पंजाबहून चौफुला भागात हार्वेस्टर येत. अवकाळी पाऊस, मजूरांची समस्या, वातावरण यामुळे गहू कापणी करुन मळण्यापेक्षा शेककरी हार्वेस्टर आणत. हे हार्वेस्टर मोठे होते. ते अव्वाच्या सव्वा भाडे आकारायचे. संपूर्ण गाव बेतून जायचे. बाहेरचे लोक आपल्या गावात येवून व्यवसाय करतात तर आपण का नाही, या विचारानं शेवटी हार्वेस्टर घ्यायचे नक्की केलं.

लहान लहान तुकड्याच्या जमीनींमुळे लहान हार्वेस्टर घ्यायचे नक्की केले. चांगल्या ब्रॅन्डेड कंपनीचाच (क्‍लास) पसंत पडला. पण बजेट 17 लाखापर्यंत जात होते. महिनाभराचा हंगाम त्यात किती कमवणार. शिवाय परिसरात प्लॉटींग वाढून शेतीचे क्षेत्र वेगाने कमी होतेय. अशा स्थितीत आतबट्ट्याचा उद्योग करण्यापेक्षा जुना छोटा हार्वेस्टर घ्यायचे नक्की केले. इंटरनेटवर शोध घेतला. मांडवगण फराटा येथील शेतकऱ्याची जाहिरात वाचली. पहायला कुणी नाही म्हणून त्यांना विकायचा होता. दहा वर्षे जुना हार्वेस्टर विकत घेतला. यानंतर डिसेंबर 14 ला याच कंपनीचा याच क्षमतेचा आणखी एक जूना हार्वेस्टर विकत घेतला.

हार्वेस्टरसाठी उत्तर प्रदेशचे मजूर बोलवतात. गव्हासाठी एक महिना, सोयाबीनच्या वेळी 20 ते 25 दिवस आणि भात काढणीला 20 दिवस हार्वेस्टर चालतो. हार्वेस्टरचा सोयाबीनसाठी मळणी यंत्रासारखाही वापर करतात. शेतकऱ्यांचा त्याला खूपच चांगला प्रतिसाद लाभला. आकाराने छोटा, वजन कमी, शेतापर्यंत पोचायला व लहानात लहान शेतीतही वापरायला सोपा यामुळे शेतकऱ्यांमध्ये हे यंत्र लोकप्रिय झाले आहे.

- अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास
शेतकऱ्यांना यांत्रिकी सेवा पुरविताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकडे बहिरट यांचा कटाक्ष असतो. यातूनच कमी वेळेत अधिक चांगले काम व्हावे यासाठी चार फाळांचा नांगर, पेरणीसाठी माणसाची आवश्‍यकता नसलेले ऍटोमॅटिक सिड ड्रील, जास्त ब्लेडचा रोटावेटर, फळबागांच्या मशागतीसाठी व फावरणीसाठी छोटा ट्रॅक्‍टर, मळणीसाठी ट्रॅक्‍टरवर चालणारी मळणीयंत्रे, पिक काढणीसाठी नामांकीत कंपनीचा धान्याचे नुकसान न करणारा आणि अडचणीच्या ठिकाणीही सहज पोचू शकणारा अत्याधुनिक हार्वेस्टर अशी अत्याधुनिक यंत्रसामग्री त्यांनी शेतकऱ्यांच्या दिमतीला कार्यक्षमपणे उभी केली आहे.

- सर्व यंत्रांची स्वतः दुरुस्ती
बहिरटांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यवसाय विस्तार करताना दोन छोटे ट्रॅक्‍टर वगळता प्रत्येकी 50 एचपीचे दोन मोठे ट्रॅक्‍टर, दोन मळणी यंत्रे, दोन हार्वेस्टर आणि इतर यंत्रे व औजारे जुनी करेदी केली आहेत. नोकरीत इलेक्‍ट्रॉनिकच्या मेन्टेनन्स विभागात काम करत असल्याने जुन्या यंत्रांची त्यांना भिती नव्हती. सुरवातीला त्रास होईल पण जुनी यंत्रे आपण कमी खर्चात नव्यापेक्षाही भारी चालवू शकू असा विश्‍वास त्यांच्याकडे होता. त्यातूनच त्यांनी ही सर्व यंत्रे दुरुस्त करण्याचे संपूर्ण ज्ञान आत्मसाद केले. अगदी गिअर बॉक्‍सपासून मशिनपर्यंतचा यंत्रांचा सर्व मेन्टेनन्स ते स्वतः घरच्या घरी करतात. छोट्या ट्रॅक्‍टरला मोठे मळणी यंत्र जोडायचा प्रयत्न कुणी केला नव्हता. त्यांनी तो प्रयोग यशस्वी केला, त्याबद्दल ट्रॅक्‍टर कंपनीमार्फतही त्यांचे कौतुक करण्यात आले.

- 25 किलोमिटरपर्यंत कार्यक्षेत्र
चिंबळी गावापासून चारही बाजूंना 25 किलोमिटरपर्यंतच्या परिसरातील शेतकऱ्यांना बहिरट सेवा पुरवितात. अगदी अर्धा एकराचे काम असले तरी ते तेवढ्यासाठी ट्रॅक्‍टर पाठवितात. आळंदी, डुडुळगाव, मोशी, चिखली, देहू, वाल्हेरकरवाडी, चिंबळी, कुरुळी, चाकण, केळगाव, पुणे, पिंपरी, चिंचवड, कोथरुड आदी भागातील शेतकरी व संस्थांची जमीन मशागतीपासून ते पिक मळणीची यांत्रिकीकरणाची सर्व कामे ते करतात. पुण्यात गार्डनिंग, फार्मची कामे डास्त असतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कचरा व्यवस्थापन करणाऱ्या ठेकेदारालाही त्यांनी शेती कामाची तातडीची गरज असेल तेव्हा उपलब्ध करुन देण्याच्या बोलीवर एक छोटा ट्रॅक्‍टर ईएम द्रावण फावरणीसाठी भाड्याने दिला आहे. या व्यवसायाने त्यांना मोठी आर्थिक प्रगती करणे शक्‍य झाले आहे.

- उधारीच्या समस्येवर मात
उधारी ही या व्यवसायातिल मुख्य समस्या आणि बेशिस्त हे तिचे कारण. गरीब शेतकरी हिशेबात चोख असतो. असतील तर लगेच पैसे देतो, नसतील तर चार सहा महिन्याने कधी देणार ते स्पष्ट सांगतो. शब्द पाळतो. आर्थिक स्थिती मजबूत असलेले शेतकऱ्यांनाच बुडवण्याची घाण सवय असते. अशा 300 बुडव्यांची यादीच बहीरट यांनी तयार केलेली आहे. त्यांना दर महिन्याला टच करत राहतात. तीन चार वर्षांनी का होईना पण थोडे थोडे पैसे मिळतात. वाईट लोकांच्या अनुभवाचा चांगल्या लोकांना सेवा देण्यावर वाईट परिणाम होऊ द्यायचा नाही, हे बहिरट यांच्या व्यवसायाचे सुत्र आहे. बुडवेगरी गृहीत धरुन तेवढी गंगाजळी त्यांनी तयार ठेवली आहे. यामुळे उधारीची समस्या कधी जाणवलेली नाही, असे ते आवर्जून सांगतात.

- काटेकोर टाईम मॅनेजमेंट
व्यवसाय वाढत असतानाही बहिरट यांनी नोकरीवर परिणाम होऊ दिला नाही. कंपनीच्या 8 तासात कंपनीसाठी आणि त्याव्यतिरिक्त सर्व वेळ व्यवसायासाठी झोकून काम करत होते. कंपनीत अनेकदा उपस्थितीचे पुरस्कार मिळत असतानाच व्यवसायातही त्यांची प्रगती सुरु होती. कंपनीत विकासाला मर्यादा होत्या. कामगार म्हणूनच आयुष्य घालवायचे का, हा प्रश्‍न त्यांना सतावयाचा. शेवटी पूर्णवेळ व्यवसायातच झोकून द्यायचा निर्णय घेवून 2013 ला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. हे करतानाही वाचलेले 8 तास कुटुंब, सामाजिक गोष्टी, स्वतःसाठी वेळ आणि कंपनीतून मिळायचे किंमान तेवढे उत्पन्न मिळविण्यासाठीची व्यवसायवृद्धी यातून त्यांनी दिनक्रम अधिकाधिक उत्पादक बनवला आहे.

- असा बसतो कर्जाचा विळखा
अनेकजण कर्ज काढून ट्रॅक्‍टर, हार्वेस्टर विकत घेतात. बॅंकेचे हप्ते सुरु झाले की हातघाईला येतात. मग कमी दरात कामे ओढायला सुरवात करुन स्वतःचा अधिकच तोटा करुन घेतात. ग्राहकही अशा अडलेल्यांचा गैरफायदा घेतात. दर कमी आणि उधारी जास्त अशी स्थिती होते. मुंडक्‍यावर पाय देवून हप्ते फेडण्यात यश आले, तरी तोपर्यंत ट्रॅक्‍टर खिळखिळा होतो. इंजिन कामावर येते, टायर गोटा झालेले असतात. बॅंकेचे हप्ते बंद होतात आणि गॅरेजचे हप्ते सुरु होतात. शेवटे असे ट्रॅक्‍टर उकीरड्याच्या किंवा गोठ्यांच्या कडेला जिर्ण अवस्थेत उभे राहतात. हप्ते थकतात त्यांचे ट्रॅक्‍टर बॅंक ओढून नेते. सर्व खर्च बॅंकेच्या घशात जातो. मग घरात वाद सुरु होतात. एकदा वैफल्यग्रस्त अवस्था आली, निगेटिव्हीटी वाढली की पुढे काहीच करता येत नाही. यामुळे शक्‍यतो बॅंकेच्या वाट्याला जावू नये असे बहिरट आवर्जून सांगतात.

- शेतकऱ्यांचे समाधान हाच बहुमान
चिंबळी परिसरातील बहुतेक शेतकरी अत्यल्पभुधारक आहेत. त्यामुळे मशागतीची सर्व भिस्त ट्रॅक्‍टरवर आहे. बहिरट ठरल्या वेळी कामे पूर्ण करतात. अगदी पेरणीच्या वेळीही घरच्या माणसाची गरज नसते, बियाणे दिले की झाले. पेरणीपासून मळणीपर्यंतची सर्व सेवा दिल्याने शेतकऱ्यांशी घरोब्याचे संबंध आहेत. हार्वेस्टरची हमी मिळाली नाही तर शेतकरी पेरणी करत नाहीत, एवढे हे नाते घट्ट आहे. खोटं आश्‍वासन द्यायचे नाही, दिलेली वेळ मोडायची नाही, हा त्यांचा शिरस्ता आहे. शक्‍य नसेल तर या वेळी दुसरं कुणाकडूनही काम करुन घ्या सांगतात. अनेकदा पाऊस हाकेच्या अंतरावर येतो आणि बहिरटांची यंत्रे शेतावर पोचतात. मळणी होवून धान्याची राशी लागते आणि पाऊस सुरु होतो. अशा वेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नुकसान टळल्याचे जे समाधान असते.. तो माझा खरा बहुमान असतो, असं बहिरट अभिमानानं सांगतात.
--------
*अनुभवाचे बोल
ट्रॅक्‍टर घेण्याआधी लक्षात घ्या...
- जुना की नवीन ते ठरवा. नवीनला 12-13 लाख रुपये लागतात. दिवसरात्र हप्ता फेडण्याचे टेन्शन राहते.
- निसर्गाच्या भरवशावर हंगामी व्यवसाय. त्यातही गळेकापू स्पर्धेमुळे व्यवसायाची हमी नाही.
- ट्रॅक्‍टरला आधी खिशातले पैसे घालून डिझेल घालावे लागते. ड्रायवरचा पगार द्यावा लागतो.
- इतर सर्व वाहणे मोकळी पळतात. ट्रॅक्‍टर कायम ओव्हरलोडवर चालतो. यामुळे प्रत्येक गोष्टीवर ताण पडतो.
- ताणामुळे गिअर बॉक्‍स, इंजिन, अवजारे यांची तुटातुट सुरु राहते. परिणामी मॅन्टेनन्स जास्तच असतो.
- एकदा मेन्टेनन्स निघायला लागला की माणूस हातघाईला येतो. चालढकल केली तर धंदाच बंद पडतो.
- ट्रॅक्‍टरला डिझेल जास्त लागते. ऑईलपासून सर्वच गोष्टी महाग. मॅकॅनिक लवकर मिळत नाही.

ट्रॅक्‍टर घेताना...
- जातीवंत शेतकरी असाल तरच ट्रॅक्‍टर घ्यावा. निसर्ग, माती आणि मशीन या तिन्हींचे ज्ञान पाहीजे.
- वाफसा, तण, नियोजित पिक, हवामान या सर्वाचा विचार करुन, शेतकऱ्यांना सल्ला देवून निर्णय घ्यावा लागतो.
- यंत्र घेताना कंपन्या, डिलरला, अनुदान किंवा कर्जाला भुलायचे नाही. फायदा तोट्याचा विचार करायचा.
- इंजिन चांगले पाहिजे. जुनी मशिन घेतल्यास आवश्‍यकतेनुसार इंजिनकाम करायचे.
- टायर चांगले ठेवले, वरच्यावर रिमोल्ड केले तर नव्या पेक्षाही जुना ट्रॅक्‍टर सरस ठरतो.
- आपण जे यंत्र वापरतो त्याची निगा व दुरुस्तीची संपूर्ण माहीती आपल्याला हवी.

जुना ट्रॅक्‍टर, यंत्र घेताना...
- वयापेक्षा वापर किती आहे, हे पाहून निर्णय घ्या. अनेकजण घरगुती कामाला किंवा हौस म्हणूनही घेतात. असे ट्रॅक्‍टर चांगले.
- दिसण्यावर जावू नका. ट्रॉली जोडायचा हुक, नांगराचा फाळ, अवजारे यांची झिज पाहून वापर लक्षात घ्या.
- अवजारे जोडायच्या लिंक, हायड्रॉलिकची अवस्था यावरुन ट्रॅक्‍टरची अवस्था लक्षात येते.
- या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील आणि ट्रॅक्‍टरचे वय जास्त असेल तरी तो ट्रॅक्‍टर नव्याला भारी असतो.
- असा जुना ट्रॅक्‍टर "लो लेवल ट्रायल' झाल्यासारखा असतो. तरीही त्याची व्यवस्थित ट्रायल घ्यायची.
- गरज आहे तेच यंत्र व्यवस्थित किमतीत मिळतेय आणि समोरचाही व्यवहाराला चांगला आहे हे पाहूनच घ्यावे.
- त्यातूनही वस्तूच खराब लागलीच तर किमान 50 हजार रुपये बाजूला काढून ठेवायचे. ऐनवेळी खोळंबा, ताण होत नाही.
- ट्रॅक्‍टरचे इंजिन फेल झाले तरी 50 हजाराच्या पुढे खर्च जात नाही. गिअर बॉक्‍स 10-12 हजाराच्या पुढे जात नाही.

यांत्रिकी सेवा व्यवसाय करताना...
- शेतीत ट्रॅक्‍टर, हार्वेस्टरच्या ड्रायवरचे काम अतिशय कौशल्याचे. शेती व यंत्र दोन्हींचे ज्ञान लागते.
- ड्रायवर नसेल तेव्हा स्वतः काम करण्याची तयारी हवी, तुमच्या व्यवसायातलं सगळं तुम्हाला यायला हवे
- अतिवृष्टी, दुष्काळ अशा स्थितीत महिनेच काय वर्षभरही बसुन रहावं लागतं. तशाही अवस्थेतही खंबिर राहता आले पाहिजे.
- तत्पर व नियोजनबद्ध सेवा महत्वाची. वेळेचे काटेकोरपणे पाळणे आवश्‍यक. प्रचलित दराहून एक रुपयाही जादा घेवू नये.
- शेतकरी दुसरीकडे गेला तर राग धरु नये. कुणाचीही अडवणूक करु नये. दुखवू नये. बिकट परिस्थितीतही सर्वोत्तम सेवा द्यावी.
- नफा नाही म्हणून लहान कामे टाळू नये. शेतकऱ्यांशी असलेले संबंध व त्याचे काम महत्वाचे हे लक्षात ठेवावे.
--------
- असे आहेत दर
फणणी - 700 रुपये प्रति तास
सारे पाडणे - 600 रुपये प्रति तास
रोटावेटर (42 ब्लेड, 6 फुट) - 900 रुपये प्रति तास
नांगरणी (4 फाळी नांगर) - 900 रुपये प्रति तास
पेरणी (ऍटोमेटिक पेरणी यंत्र) - 800 रुपये प्रति तास
मळणी - गहू - 200 रुपये क्विंटल; ज्वारी, बाजरी - 150 रुपये क्विंटल
हार्वेस्टर ः तीन हजार रुपये एकर (लहान प्लॉट, अडचणीचे रस्ते)
----------
संपर्क ः शंकर बहिरट 9850240130
------------------- 

No comments:

Post a Comment