Friday, April 24, 2015

भेंडी निर्यातीसाठी बागांची तपासणी सुरु

शरद पवार यांच्या सुचनेनंतर गती; निर्यात सुरु होण्याची शक्‍यता

पुणे (प्रतिनिधी) ः युरोपसाठीच्या भेंडी निर्यातीवर स्वतःहून बंदी घालून तीन आठवडे गप्प बसलेल्या केंद्रीय कृषी विभागाला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी बंदीच्या परिणामांचे गांभिर्य लक्षात आणून दिल्यानंतर जाग आली आहे. श्री. पवार यांच्या सुचनेनंतर लगेचच केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून काटेकोर तपासणी करुन निर्यातक्षम प्लॉटची माहिती दिल्लीला पाठवणे सुरु झाले आहे. येत्या दोन दिवसात निर्यातीला हिरवा झेंडा मिळण्याची शक्‍यता आहे.

ऐन हंगामात निर्यात प्रक्रीयेत सुधारणा करण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने देशातील भेंडी युरोपला निर्यात करण्यास बंदी घातली. भेंडीच्या क्षेत्राची पाहणी करुन किडमुक्त पिकाची खात्री पटल्यानंतर निर्यातीला मान्यता दिली जाईल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात दोन तीन आठवडे उलटूनही काहीही हालचाल झाली नाही. शेवटी बारामती व फलटण परिसरातील शेतकरी विश्‍वासराव जाचक, अरविंद निंबाळकर, संदीप शिंदे, अमोल परकाळे, ऍड. अभिजित पवार, हणमंत लोंढे आणि निर्यात कंपनी प्रतिनिधी सचिन यादव व विकास नागवडे यांनी श्री.पवार यांची दिल्लीत भेट घेवून या प्रश्‍नी तोडगा काढण्याची विनंती केली.

श्री. पवार यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करुन सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर केंद्रीय कृषी सचिव श्रीराज हुसेन व प्लॉंट क्वारंटाईनचे विभागाचे सहसचिव उत्पल सिंग यांच्याशी संपर्क साधला. हंगाम हातचा जावू नये यासाठी पिकाची पहाणी करुन निर्यात सुरु करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, निर्यातदारांना सुधारणेस थोडा वेळ द्यावा, अशा सुचना दिल्या. निर्यातदारांनी युरोपच्या निकषांचे आणि कृषी विभागाच्या एसओपीचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर भेंडी उत्पादक शेतकरी, श्री. यादव व श्री. सिंग आणि हुसेन यांची कृषी भवनमध्ये बैठक झाली. प्लॉन्ट क्वारंटाईनची टिम लवकरच कार्यान्वित होईल, असे आश्‍वासन त्यांनी या वेळी दिली.

यानंतर लगेचच निर्यातदारांनी अपेडाला दिलेल्या उत्पादकांच्या माहितीनुसार प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाचे अधिकारी बारामती व फलटनमध्ये दाखल झाले. गेल्या दोन तीन दिवसात या अधिकाऱ्यांनी विविध निर्यातदारांकडील भेंडीच्या क्षेत्राची पहाणी केली आहे. या पिक पहाणीचे अहवाल दिल्लीला पाठविण्यात येत असून निर्यातदार केंद्राच्या फायटो प्रमाणपत्रासाठीच्या ना हरकतीच्या प्रतिक्षेत आहेत. केबी एक्‍सपोर्टच्या तपासणी झालेल्या 40 पैकी तीन प्लॉट निर्यातीसाठी अपात्र तर 37 प्लॉट पात्र ठरल्याची माहिती कंपनीचे सरव्यवस्थापक सचिन यादव यांनी दिली. फलटण व बारामती या दोन तालुक्‍यात सुमारे 600 एकर क्षेत्रावर भेंडीचे पिक घेण्यात येत आहे.

- पॅकहाऊस पातळीवर तपासणीची गरज
प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाने फळमाशी मुक्त आंब्याची खात्री देण्यासाठी बॅकवर्ड लिंकेजमध्ये बागेच्या पातळीवरील उपाययोजना तर फॉरवर्ड लिंकेजमध्ये पॅक हाऊसच्या पातळीवर हॉट वॉटर ट्रिटमेंट बंधनकारक केली आहे. भेंडीच्या बाबतीत मात्र फक्त बॅकवर्ड लिंकेजमध्येच पिकातील किडींची पाहणी करण्यात येत आहे. हे करताना फॉरवर्ड लिंकेजचा महत्वाचा भाग असलेल्या पॅक हाऊस पातळीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आंब्याप्रमाणेच भेंडीचीही पॅक हाऊस पातळीवर थ्रीप्समुक्त असल्याची खात्री केल्यास बंदीचा प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली निघू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
------------(समाप्त)-----------

No comments:

Post a Comment