Monday, April 13, 2015

देशभर पावसाचा इशारा

राज्यात गारपीट, पूर्वमोसमीचा तडाखा कायम

- हातकणंगलेत आभाळ फाटलं
शनिवारी सायंकाळच्या सुमारास हातकणंगलेत आभाळ फाटल्यासारखेच पाऊस कोसळला. वाऱ्याने पत्रे उडून गेले. क्षणार्धात घर होत्याच नव्हते झाले. विजेचे खांब धडधडा कोसळले. कडब्याच्या बडीम बघता बघता वाहून गेल्या. अख्ख शेत वाहून जात आहे काय अशीच स्थिती आळते, लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी, मजले, हातकणंगले, तारदाळ, खोतवाडी, कोरोची या गावाची झाली. विहिरी गाळाने भरल्या. केळी, ऊस, भाजीपाल्याचे पिक भुईसपाट झाली. ओढ्याला पूर आला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या 20-30 वर्षात असा पाऊस कधीच अनुभवला नसल्याचे अनेकांनी सांगितले.

*चौकट
- बुधवारपर्यंत गारपीटीचा अंदाज
हवामान खात्याने मंगळवारी (ता.14) सकाळपर्यंत मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी तर कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सुरु असलेली गारपीट बुधवारपासून (ता.14) थांबण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारी सकाळपर्यंत फक्त विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज आहे.

पुणे (प्रतिनिधी) ः हवेच्या कमी दाबामुळे देशांतर्गत भागात बाष्पाचा पुरवठा वाढल्याने हवामान खात्याने देशात सर्वत्र पावसाचा अंदाज व्यक्त केला असून बहुतेक राज्यांमध्ये वादळी पाऊस व गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पूर्वमोसमी पाऊस व गारांचा तडाखा सुरुच आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात हातकणंगलेत सर्वाधीत 120 मिलीमिटर अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 50 मिलीमिटरहून अधिक प्रमाणात वादळी पाऊस व गारपीट झाली.

चक्राकार वारे व कमी दाबाच्या पट्ट्यांच्या सक्रीयतेमुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्ही बाजूंनी देशांतर्गत भागात बाष्पाचा पुरवठा सुरु असल्याने देशात सर्वत्र पावसाची शक्‍यता आहे. सोमवारी (ता.13) दिवसभरात हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, ओदीशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्रात गारपीटीचा तर उर्वरीत राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भ व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीटीसह हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. बुलडाणा, सातारा, कोल्हापूर, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांना या वादळी पाऊस व गारपीटीचा मोठा तडाखा बसला. पावसाच्या दमदार हजेरीमुळे विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात कमाल व किमान तापमानात मोठी घसरण झाली.

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान जळगाव येथे 38 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस झाल्याने कमाल व किमान तापमानात सरासरीहून तब्बल नऊ अंशांपर्यंत घट झाली आहेत. यामुळे किमान तापमान 20 अंशांहून खाली तर कमाल तापमानाचा पारा 35 अंशाहूनही खाली घसरला आहे. मराठवाड्यातही कमाल व किमान तापमानात सरासरीहून आठ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. यामुळे उन्हाच्या झळा लाही लाही करत असतानाच अचानक तापमान कोसळून थंडावा निर्माण झाल्याची स्थिती आहे.

दरम्यान, गुजरात व लगतच्या भागात हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे सक्रीय झाले असून त्यांच्याशी संलग्न असलेला कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंतच्या भागात सक्रीय आहे. उत्तर पाकिस्तान व लगतच्या जम्मू काश्‍मिरमध्ये समुसपाटीच्या पातळीहून 5.8 किलोमिटर उंचीवर चक्रावार वाऱ्यांच्या स्वरुपाच पश्‍चिमी चक्रावात सक्रीय झाला आहे. पुर्व राजस्थान व लगतच्या भागावर समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय आहेत. याच वेळी आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश व लगतच्या बांग्लादेशच्या भागावर समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय आहेत. या वाऱ्यांशी संलग्न कमी दाबाचा पट्टा दक्षिण छत्तीसगडपासून बंगालपर्यंतच्या भागात सक्रीय आहे. यामुळे देशांतर्गत भागाकडे अरबी समुद्र व उपसागर या दोन्ही बाजूंनी बाष्पाचा पुरवठा होत आहे.

रविवारी (ता.12) सकाळपर्यंतच्या चोविस तासात ठिकठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः
मध्य महाराष्ट्र ः हातकणंगले 120, खडकेवाडी 62, कापशी 59, गडहिंग्लज 34, वाठार 27, सांगली 29, जळगाव 10, ऐनपूर 15, नागापूर 11, कर्जत 13, बांभोरा 29, खर्डा 26, जामखेड 10, शेवगाव 12, बोधेगाव 67, घोडेगाव 52, चांदा 51, वांबोरी 35, रवांदे 15, दुधानी 61, वाघोली 18, पलूज 39.2, उस्लामपूर 23, कोरेगाव 39, मांगले 25, सोलापूर 1, पुणे 0.5

मराठवाडा ः नांदेड 10, औरंगाबाद 6, उस्मानाबाद 5, परभणी 2,

विदर्भ ः सावळदबारा 52, आंभी 42, अकोला 37, परतवाडा 26, ढेपेवाडा 22, अंजनगाव 22, पाटणसावंगी 21.6, सावळीखेडा 19.4, सेमाडोह 17.6, अमरावती 11, भातकुली 10.2, बुलडाणा 10, चंद्रपूर 6, यवतमाळ 4, नागपूर 0.5
-------------------- 

No comments:

Post a Comment