Monday, April 20, 2015

ऍग्रोवनवर शुभेच्छांचा वर्षाव

विशेषांकाचे राज्यभर स्वागत

पुणे (प्रतिनिधी) ः ऍग्रोवनच्या दशकपूर्ती निमित्त सोमवारी (ता.20) राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, लोकप्रतिनिधी, व्यवसायिक, कृषी विभाग व विद्यापीठांचे अधिकारी-कर्मचारी, कृषी व संलग्न विद्याशाखांचे विद्यार्थी आदींकडून अभिनंदन व शुभेच्छांचा मोठा वर्षाव झाला. समाजातील सर्वच स्तरांतून ऍग्रोवनच्या दशकपुर्तीबद्दल आनंद आणि या प्रवासात सहभागी असल्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला.

वर्धापनदिनानिमित्त राज्यात 22 ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ऍग्रो संवाद चर्चासत्रांना शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विविध पिके व तंत्रज्ञानाची माहिती घेतानाच ऍग्रोवनविषयी आदरभाव व्यक्त करत शुभेच्छांचीही देवघेव झाली. अनेक ठिकाणी ऍग्रोवनचे प्रातिनिधीक सत्कारही करण्यात आले.ऍग्रोवनचे प्रतिनिधीकडे, दुरध्वनी व फेसबुक पेजवरही वाचकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. अनेक ऍग्रोवन प्रेमींनी थेट ऍग्रोवनच्या कार्यालयात येवून शुभेच्छा देत ऍग्रोवनवरील प्रेम व्यक्त केले.

दशकपुर्ती निमित्त सलग तीन दिवस विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यातील पहिला "हवामान संरक्षित शेती' विशेषांक सोमवारी प्रसिद्ध झाला. या विशेषांकाचेही राज्यभर मोठ्या उत्साहात स्वागत झाले. मंगळवारी (ता.21) प्रिसिजन फार्मिंग विशेषांक तर बुधवारी (ता.22) बाजारपेठ विशेषांक प्रसिद्ध होणार आहे. या विशेषांकाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कृषी सारख्या विषयात दैनिक चालविण्याचे शिवधनुष्य सकाळ माध्यम समुहाने समर्थपणे पेलले आहे. ऍग्रोवन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगती करण्यासाठी मिळालेले सर्वोत्तम माध्यम आहे. ऍग्रोवनमुळे राज्यभर अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा घडू शकल्या. ऍग्रोवनची ताकद फार मोठी आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल ऍग्रोवनचे व ऍग्रोवनच्या सर्व टीमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, या शब्दात माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऍग्रोवनशी संपर्क साधून विशेष गौरव केला. माजी कृषीमंत्री व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनीही भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
-----------(समाप्त)---------- 

No comments:

Post a Comment