Thursday, April 23, 2015

उन्हाच्या झळा वाढल्या - 23 April

- कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार
- किमान तापमानात अनेक ठिकाणी वाढ
- तुरळक ठिकाणी पावसाचीही हजेरी

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील चारही हवामान विभागांमध्ये कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या झळा तिव्र झाल्या आहेत. याबरोबरच तुरळक ठिकाणी पाऊसही सुरु आहे. शुक्रवारी (ता.24) तापमानात फारसा बदल होण्याची शक्‍यता नाही. हवामान खात्याने मराठवाड्यात एक दोन ठिकाणी पाऊस पडण्याचा तर उर्वरीत राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

पुणे वेधशाळेने शनिवारपासून (ता.25) सोमवारपर्यंत (ता.27) विदर्भात एक दोन ठिकाणी पावसाची शक्‍यता व्यक्त केली असून उर्वरीत सर्व विभागांमध्ये हवामान कोरडे राहणार असल्याचे म्हटले आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात अनेक ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेले राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आलेली आहे.

राज्यातील चारही विभागात कमाल तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकणात भिरा येथे 41.5 अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे राज्यातील सर्वात जास्त 42.6 अंश सेल्सिअस, मराठवाड्यात नांदेड येथे 40.5 अंश सेल्सिअस तर विदर्भात वर्धा येथे 42.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भात सर्वत्र कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असून उर्वरीत महाराष्ट्रात तो चाळिशीच्या आसपास आहे. याबरोबरच कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीहून एक ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

दरम्यान, कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडला. पुणे जिल्ल्हयात जुन्नर, आंबेगाव खेड, मावळ तालुक्‍यात बुधवारी सायंकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार भागात व मावळमध्ये नांगरणी झालेल्या जमिनीत पाणी जिरुन साचले एवढा पाऊस झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. सोलापूर व सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. अक्कलकोटमध्ये सर्वाधिक 21 मिलीमिटर पावसाची नोंद झाली.

देशातील हवामान स्थितीमध्ये तेलंगणापासून दक्षिण भारतात हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. पश्‍चिम बंगाल व बिहारच्या भागात चक्राकार वारे सक्रीय असून या वाऱ्यांपासून छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. पूर्व राजस्थान व लगतच्या भागावरही चक्राकार वारे सक्रीय आहेत. हिमालयीन भागात येत्या 27 एप्रिलनंतर नवीन पश्‍चिमी चक्रावात सक्रीय होण्याचा अंदाज आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे गुरुवारी (ता.23) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 34.5, अलिबाग 35.4, रत्नागिरी 33.2, पणजी 34.8, डहाणू 36.5, भिरा 41.5, पुणे 38.9, जळगाव 42.6, कोल्हापूर 36, महाबळेश्‍वर 30, नाशिक 37.6, सांगली 38, सातारा 38.7, सोलापूर 41.7, उस्माबाद 38.2, औरंगाबाद 39, परभणी 39, नांदेड 40.5, अकोला 41.3, अमरावती 40.4, बुलडाणा 39.5, ब्रम्हपुरी 41.6, नागपूर 42.3, वाशिम 39.8, वर्धा 42.5, यवतमाळ 40.5
---------(समाप्त)----------- 

No comments:

Post a Comment