Wednesday, April 8, 2015

रविवारची मुलाखत - डाॅ. एस. एस. सिंधु

बाजारकेंद्रीत फुलोत्पादन तंत्रज्ञान महत्वाचे
------------
गेल्या काही दशकांमध्ये देशाने फुल पिकांविषयीच्या संशोधनात मोठी प्रगती केली आहे. अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. उत्पादकांनी ग्राहक वा बाजारपेठांचा कल लक्षात घेवून बाजारकेंद्रीत फुलोत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. सांगताहेत राष्ट्रपती भवनचे माजी फलोत्पादन संचालक, ऑल इंडिया कोआर्डीनेटेड फ्लोरिकल्चर रिसर्च प्रोजेक्‍टचे माजी संचालक व भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या फ्लोरिकल्चर ऍण्ड लॅन्डस्केपिंग विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. सिंधु

------------
संतोष डुकरे
------------
- उत्पादन व बाजारपेठेचा विचार करता फुलोत्पादनाची सद्यस्थिती काय आहे.
फुलोत्पादन भारतास नवीन नाही. मात्र मोठ्या क्षेत्रावर व्यवसायिक उत्पादन, संरक्षित शेतीच्या माध्यमातून पुष्पोत्पादन या गोष्टी भारतासाठी तुलनेत नवीनच आहेत. जगात 140 हून अधिक देशांत फुलांचे व्यवसायिक उत्पादन घेण्यात येते. जर्मनी व त्यानंतर जपान हे फुलांचे सर्वात मोठे वापरकर्ते आहेत. आपल्याकडे फुलोत्पादन व्यवसायात चांगली वाढ होत आहे. या व्यवसायाचा देशांतर्गत विकासदर सात ते आठ टक्के आहे. देशात सुमारे दोन लाख हेक्‍टर क्षेत्रावर फुलांचे उत्पादन घेण्यात येत असून त्यात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड ही राज्ये आघाडीवर आहेत. जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्याला फुले लागतात. फुले जिवनावश्‍यक घटकात येत नसली तरी फुलांशिवाय कोणत्याही समारंभाची कल्पानाही आपण करु शकत नाही, एवढे त्यांचे स्थान महत्वपूर्ण आहे. जगाची बाजारपेठ खुली आहे. हवामान, जमीन आदी बाबींतील विविधता ही आपल्याला फुलोत्पादनासाठी मोठी  संधी आहे.

- देशातील फुल पिकांच्या संशोधनाचा प्रवास कसा आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्थेने 1950 ते 60 च्या दशकात देशातील फुल पिक संशोधनाचा पाया घातला. सुरवातीला जनुकीय व त्यानंतर फलोत्पादन विभागाअंतर्गत संशोधन झाले. त्यानंतर 1983 मध्ये फ्लोरिकल्चर ऍण्ड लॅन्डस्केपिंग या स्वतंत्र विभागाची स्थापना झाली. डॉ. बी. पी. पाल यांच्या नेतृत्वाखाली गुलाब व इतर पिकांच्या बाबतीत मैलाचा दगड ठरले असे उल्लेखनिय कार्य झाले. जर्मप्लाझम कलेक्‍शन ऍण्ड कॉन्झरवेशन, नवीन वाणांची निर्मिती, बाजारपेठेनुसार गुणवत्तापुर्ण फुलोत्पादन तंत्रज्ञान विकसन, फुल पिकांचे काढणीपश्‍चित तंत्रज्ञान व मुल्यवर्धन, फुल पिकांवरील किड, रोग व विकृती निर्मुलन विषयक संशोधन ही प्रमुख उद्दीष्टे डोळ्यासमोर ठेवून फुल पिकविषयक मुलभूत संशोधन करण्याचे काम या विभागामार्फत करण्यात येत आहे.

- बोगनवेलचे आंतरराष्ट्रीय नोंदणी केंद्र म्हणूनही फ्लोरीकल्चर ऍण्ड लॅन्डस्केपिंग विभाग कार्यरत आहे. याबाबतची कार्यपद्धती व सद्यस्थिती काय.
बोगनवेल ही महत्वाचे शोभेचे फुलझाड आहे. त्याच्या जातींची नोंदणी व संग्रह करण्याचे केंद्र म्हणून या ठिकाणी काम केले जाते. केंद्रात आत्तापर्यंत बोगनवेलीच्या 378 जातींची नोंदणी झाली आहे. यामध्ये 150 भारतीय जातींचा समावेश आहे. त्यातील 30 जाती एनबीआरआय, लखनौ यांनी तर 10 जाती आयएआरआयने विकसित केल्या आहेत. बोगनवेलीचे स्वतंत्र उद्यान विकसित करण्यात आले असून याठिकाणी संशोधन सुरु आहे. या ठिकाणी बोगनवेलीच्या 150 व्हरायटी संग्रहीत करण्यात आलेल्या आहे. बोगनवेलीचे प्रपोगेशन करुन ती मागणीनुसार मागणीनुसार उपलब्ध केली जाते.

बोगनवेल सोसायटी ऑफ इंडिया ही 1860 साली सोसायटी ऍक्‍टनुसार स्थापन झालेली देशातील सर्वात जुनी सोसायटी आहे. गेली 45 वर्षे संस्थेमार्फत बोगनवेलीच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेतत. त्यांच्यासोबत भारतीय कृषी संशोधन संस्थेत नुकतेच बोगनवेल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध शासकीय संस्था व खासगी उद्योगांनी त्यात सहभाग घेतला. बोगनवेलीचा विविध बाबींसाठी अधिकाधिक वापर वाढावा, म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.



- फुलांचा राजा गुलाब आणि आपली संस्था यांचे अतुट नाते आहे. याबाबत काय सांगाल.
संस्थेमार्फत सुरवातीच्या काळात सर्वाधिक काम गुलाबावर झाले. डॉ. बी. पी. पाल, डॉ. विष्णू स्वरुप, डॉ. मलिक, डॉ. ए. पी. सिंग आदींनी गुलाबाचे दर्जेदार वाण विकसित करण्यात अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले. डॉ. पाल हे तसे गहू पैदासकार होते. त्यांनी या विभागाची सुत्रे हाती घेतल्यानंतर गुलाबाच्या पैदाशीत खुपच रस घेतला. त्याच्या काळात गुलाबाच्या 100 हून अधिक जाती प्रसारित करण्यात आल्या. भारतीय गुलाबाला जागतिक बाजारपेठ खुली करण्यासाठी जर्मनीतील फ्रॅंकफर्ट व ऍस्टरडॅम बाजारपेठेत सर्वप्रथम 1969 साली पथदर्शक स्वरुपात गुलाबाची निर्यात केली. जागतिक बाजारपेठेत या निर्यातीचे मोठे स्वागत झाले. आत्तापर्यंत गुलाबाच्या 155 हून अधिक संकरित, म्युटन्ट, सुधारीत जाती प्रसारित करण्यात आल्या आहेत. त्या देशभर, जगभर लोकप्रिय झाल्या आहेत. यातील मृणालिनी, भिम, डेल्ली प्रिन्सेस या वाणांच्या गौरवार्थ पोस्टामार्फत तिकिटेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

- पिकांच्या संशोधनात जनुके वा जिनोटाईप्सची महत्वाचे ठरतात. याबाबत काय स्थिती आहे.
संस्थेमार्फत फुलपिकांच्या जिनोटाईप्सचे कलेक्‍शन करण्यात आलेले आहे. त्यातून अनेक नवीन वाण विकसित करण्यात आले आहेत. ग्लॅडिओलसचे देशात सर्वाधिक जिनोटाईप्स कलेक्‍शन (150) भारतीय कृषी संशोधन संस्थेकडे आहे. ग्लॅडिओलसमध्ये डॉ. आर. एल. मिश्रा व इतरांनी महत्वपूर्ण कार्य केले आहे. आत्तापर्यंत ग्लॅडीओलसच्या 37 जाती विकसित करण्यात आल्या आहेत. पुसा सुहागिनी, पुसा किरण, पुसा शुभम, गुंजन, गुलाल आदी जाती लोकप्रिय आहेत.

- इतर पिकांचे संशोधन व तंत्रज्ञानाबाबत काय स्थिती आहे.
क्रिसॅन्थिममच्या पुसा अनमोल, पुसा सेंट्रीनरी, पुसा आदित्य, पुसा चित्राक्षा यासह सात जाती प्रसारित करण्यात आल्या आहेत. पुसा अनमोल ही पिवळसर गुलाबी फुलांची तर पुसा सेंट्रीनरी ही पिवळ्या फुलांची जात आहे. या दोन्ही जाती गॅमा किरणांनी म्युटेशन करुन विकसित करण्यात आल्या असून त्याचे प्लॅन्ट ब्रिडर राईट्‌स मिळविण्याची प्रक्रीया सुरु आहे. पुसा अनमोल ही फोटो ऍन्ड थर्मो इनसेन्सिटिव्ह आहे. यामुळे या वाणाचे वर्षात तीन वेळा म्हणजेच तिनही हंगामात उत्पादन घेता येते.

झेंडूच्या पिकाबाबत केली दोन तीन दशकांपासून संशोधन सुरु आहे. संस्थेमार्फत संशोधित पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा, पुसा अप्रिता गेंदा, पुसा दिप गेंदा आदी जाती विशेष लोकप्रिय आहेत. खास नवरात्रीचा हंगाम डोळ्यासमोर ठेवून पुसा दीप ही जात नुकतिच विकसित करण्यात आली आहे. पुढच्या वर्षीपासून या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लॅन्डस्केपिंगमध्ये भारतीय पद्धतीसाठी कोणत्या प्रकारचे गवत अधिक योग्य राहील याबाबत काम सुरु आहे. विविध हवामान पद्धती व उपयोगासाठी झुडपे व वेलवर्गिय वनस्पतींवरही संशोधन सुरु करण्यात आलेले आहे.

- फुलपिकांच्या संशोधनाची दिशा काय आहे.
गुलाबामध्ये कट फ्लॉवर, फ्रॅग्नंट फ्लॉवर व हार्डी गार्डन व्हरायटी डेव्हलपमेंटचे काम सुरु आहे. ग्लॅडिओलसच्या कंदापासून वाण तयार करण्यात येत आहेत. त्यांचा मल्टिप्लिकेशन रेट वाढविण्यासाठी व फ्युसॅरियम विल्ट रोगप्रतिकारक ग्लॅडिओलस व्हरायटी तयार करण्याचे डेव्हलप करण्याचे काम सुरु आहे. क्रिसॅन्थिमम मध्ये कट फ्लॉवर व लुज फ्लॉवर या दोन्हींमध्ये वर्षभर फुले देणारी, सर्व हंगामात दर्जेदार उत्पादन देणारे वाण विकसित करण्यात येत आहेत. विविध वाण विकसित करण्यासाठी म्युटेशन ब्रिडिंग टेक्‍नॉलॉजीवर मुख्य भर देण्यात येत आहे.

- संशोधनाचे व्यवसायिकरण करण्याबाबत काय उपक्रम सुरु आहेत.
आयएआरआयमार्फत विकसित संशोधनाचे व्यवसायिकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. त्यामार्फत फ्लोरिकल्चर ऍण्ड लॅन्डस्केपिंग डिव्हिजनमार्फत विकसित करण्यात आलेल्या काही तंत्रज्ञानाचे व्यवसायिकरण करण्यात आले आहे. यासाठी काही खासगी कंपन्यांसोबत करार करण्यात आले असून कंपन्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादने उपलब्ध केली आहेत. हैद्राबाद येथील एका खासगी कंपनीने क्रिसॅन्थिममच्या पुसा अनमोल वाणासाठी करार केला असून या वाणाचे व्यवसायीकरण केले आहे. विभागामार्थ फुलांचे निर्जलिकरण (ड्राय फ्लॉवर) करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. काही फुलांची ड्रायिंग टेक्‍नॉलॉजी विकसित करण्यात आली आहे. त्याचेही व्यवसायिकरण करण्यात आले आहे.

- आयएआरआय विकसित फुलपिकांच्या जाती शेतकऱ्यांना कशा मिळवता येतील.
फ्लोरीकल्चर ऍण्ड गार्डनिंग विभागामार्फत तंत्रज्ञान प्रसारासाठी शेतकरी मेळावे, प्रदर्शने आयोजित केली जातात. त्यात उपस्थित राहून शेतकरी हे तंत्रज्ञान, नवीन जाती पाहू शकतात. याशिवाय शेतकऱ्यांना नवीन जातींचे बियाणे, कंद, छाटणी केलेल्या फांद्याही देण्यात येतात. सर्वसाधारणपणे बोगनवेलचे बड वुड जानेवारी फेब्रुवारीमध्ये, ग्लॅडिओलस ऑक्‍टोबरमध्ये, क्रिसॅन्थिममचे कंद जुलैमध्ये उपलब्ध असते. झेंडूचे बियाणे वर्षातील बहुतांश काळ उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना या केंद्रावरुन हे लागवड साहित्य उपलब्ध मिळू शकते. यासाठी विभागाशी 011 25841929 या क्रमांकावर संपर्क साधावा.
------------


No comments:

Post a Comment