Sunday, April 19, 2015

ऍग्रोवनचा आज 10 वा वर्धापनदिन !

राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबवत विकासाची शाश्‍वत दिशा दाखविणारा "दै ऍग्रोवन' आपली 10 वर्षांची वाटचाल आज (ता.20) पूर्ण करत आहे. शेतकऱ्यांप्रती समर्पित दशकपूर्तीच्या निमित्ताने देशभरातून ऍग्रोवनवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. वर्धापनदिनानिमित्त ऍग्रोवनमार्फत 19 जिल्ह्यांमध्ये ऍग्रो संवाद चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

शेती या एकमेव विषयाला वाहिलेले वृत्तपत्र यशस्वी होईल का, असा प्रश्‍न ऍग्रोवन सुरु होताना उपस्थित करण्यात येत होता. यास सडेतोड उत्तर देत राज्य व परराराज्यातील शेतकऱ्यांनीही ऍग्रोवनला पहिल्या क्रमांकाची पसंती दिली आहे. दैनिकासोबतच विविध विषयांना वाहिलेले विशेषांक, कृषी ज्ञानमाला पुस्तके, चर्चासत्रे, कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम, कृषी प्रदर्शने, सरपंच महापरिषदा, अभ्यास सहली व परदेश दौरे, पाणी परिषद आदींच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी करत असलेल्या एकमेवाद्वितीय कार्याबद्दल ऍग्रोवनचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.

राज्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या विकासातील ऍग्रोवनचा वाटा दिलखुलासपणे मान्य केला असून अनेकांनी आपल्या घराला, शेताला, शेततळ्यांना ऍग्रोवनचे नाव देवून ऍग्रोवनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुढील वाटचालीसाठी समाजाच्या सर्व थरातून ऍग्रोवनकडे शुभेच्छांचा ओघ सुरु आहे.

दशकपुर्ती निमित्त ऍग्रोवनमार्फत सोमवारी (ता.20) राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये ऍग्रो संवाद चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. द्राक्ष, डाळींब, केळी, कांदा, संत्रा, ऊस, कपाशी, सोयाबीन, आले आदी पिकांचे उत्पादन व व्यवस्थापन तंत्रज्ञान, खरीप हंगामाची पूर्वतयारी, भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन, शेडनेट व पॉलिहाऊस तंत्रज्ञान आदी विषयांवर या चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी या चर्चासत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऍग्रोवनमार्फत करण्यात आले आहे.
--------- 

No comments:

Post a Comment