Sunday, April 26, 2015

"शेती'साठी करा मोबाईलचा वापर - Mazahi Aaika

तरुण पोरांची मोबाईलवर भराभर फिरणारी बोटं पाहिली की हेवा वाटतो त्यांचा. किती लवकर ही मुलं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन वापरतात. पण, त्यात "टाईमपास'चा भाग किती आणि उपयोग काय? मुलानं हट्ट धरला म्हणून त्याला दहा हजाराचा ऍन्ड्रॉईड मोबाईल घेतला. मग आग्रहाने त्याच्याकडून मी त्याचा वापर समजून घेतला. पाण्याची मोटर चालू बंद करायचं, दुधाचा हिशेब ठेवायचं, सर्व पिकांचे फोटो काढून त्याचे रेकॉर्ड ठेवण्याचं काम तो मोबाईलवरच करतो.

गेल्या दहा वर्षात जगात सर्वाधिक वेगाने विकसित झाले, लोकांनी स्विकारलेले आणि जगणं सोपं झालं अशा तंत्रज्ञानामध्ये मोबाईलचा नंबर पहिला असेल. जादूच्या कांडीसारखे काम करतो राव मोबाईल. पण आपण शेतकऱ्यांनी त्याकडं गांभिर्यानं पाहिलेलंच नाही अजून. घराघरात पोरांकडं मोबाईल आहेत, पण ते गेम खेळायला, गाणी ऐकायला आणि पिक्‍चर पहायला घेतलेत की काय असं दिसतं. त्याचा शेतीसाठी कसा वापर करायचा हेच अनेकांना उमगत नाही. उमगले तरी पचणी पडत नाही. आणि याच वेळी आपण बाजारभावासाठी, योजनांच्या माहितीसाठी, नवीन शोधण्यासाठी, प्रश्‍नांवर उत्तर मिळविण्यासाठी हेलपाटे मारत खर्च करत बसतो. काखेत कळसा आणि गावला वळसा म्हणतात तशी अवस्था आहे.

मोबाईल हे आता फक्त संभाषणाचे माध्यम राहीलेले नाही. आपण शेतकऱ्यांनी सर्वात आधी आपले मोबाईल निट समजून घेतले पाहिजेत. त्यात आपण काय काय करु शकतो हे समजलं तर फुटकटे हालपाटे, हमाली, खर्च वाचू शकतो. नुकसान वाचू शकतं, उत्पादन वाढू शकतं. ही अतिशयोक्ती नाही. राज्यात अनेकजण मोबाईलच्या मदतीनं चांगली शेती करत आहेत. मोबाईलवर वॉट्‌सअपमध्ये पिकनिहाय शेतकरी गट तयार झालेत. त्यात शेतकरी, शास्त्रज्ञ, व्यापारी सगळेच असतात. फोटो, व्हिडीओ सर्वांना पाहता येतात. शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहारही होतात.

फेसबूकवर शेतकरी गट तयार करुन अनेकांनी खते, बियाणे मिळविण्यापासून ग्राहकांना थेट विक्रीपर्यंत लाभ मिळवला आहे. अत्यंत अद्ययावत माहिती समजल्यानं चांगला निर्णय, लाभ घेता येतो. आपल्या शेताचे संकेतस्थळ, फेसबूक पेज तयार करुन आपण आपल्या मालाची प्रसिद्धी करु शकतो. त्यातूनही ग्राहकांशी, तज्ज्ञांशी जोडणी करता येते. आपल्या भागातील हवामानाची रोजची माहिती, जगातल्या हव्या त्या बाजारपेठेतील बाजारभाव मिळवता येतात. कुठूनही पाण्याची मोटार चालू बंद करण्यापासून ते अगदी किड रोगांवर शास्त्रज्ञांकडून उपाय मिळवतात येतात. पण यासाठी सर्वात महत्वाचे काम म्हणजे मोबाईल समजून घेणं आणि त्याचा शेतीसाठी वापर सुरु करणं. सुरवातीला जड जाईल, पण जमलं की गाडी सुसाट पळलं.
- एक शेतकरी
-------------- 

No comments:

Post a Comment