Sunday, April 19, 2015

भेंडी निर्यातीवर केंद्राची कुऱ्हाड

ऐन हंगामात बंदी; सिस्टिम सुधारणेचे कारण

पुणे (प्रतिनिधी) ः युरोपात निर्यात झालेल्या भेंडीत फुलकिडे आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर भेंडीच्या निर्यात प्रक्रीयेत सुधारणा करण्याच्या कारणाखाली केंद्र सरकारने स्वतःच देशातील भेंडी निर्यातीवर ऐन हंगामात बंदी घातली आहे. विशेष म्हणजे क्षेत्र नोंदणी व पहाणीची कोणतीही यंत्रणा कार्यरत नसताना हा निर्णय घेण्यात आला. यामुळे भेंडीचे देशांतर्गत दर निम्म्याहून अधिक घसरले असून शेतकरी व निर्यातदारांचे मोठे नुकसान होण्यास सुरवात झाली आहे.

भाजीपाला पिकांची लागवड ते निर्यात ही सर्व प्रक्रीया देखरेखीखाली ठेवून त्यानंतरच निर्यातीसाठीचे फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र देण्यासाठी अपेडामार्फत व्हेजीटेबलनेट हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. मात्र गेली अनेक महिने ते चाचण्यांच्याच पातळीवर आहे. यामुळे राज्यात निर्यातीसाठीच्या भेंडी व इतर भाजीपाला पिकांची नोंदणी झालेली नाही. ही सिस्टीम कार्यान्वित करण्याआधीच युरोपातून आलेल्या काही तक्रारींवरुन निर्यातबंदीचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला आणि निर्यात पुन्हा सुरु करण्याबाबत उत्सूकता दाखविण्यात येत नसल्याबद्दल शेतकरी व निर्यातदारांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

युरोपिय देशांत निर्यातीसाठी आवश्‍यक असलेले फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रीया प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाने 31 मार्चपासून बंद केली आहे. नोंदणीकृत शेतामधील भेंडी फुलकिडे मुक्त पॅक हाऊसमध्ये पॅक केली तरच निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेर विचार होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. फुलकिडीचा प्रादुर्भाव किती आहे हे पाहण्यासाठी 10 एप्रिलला केंद्राच्या यंत्रणांमार्फत बारामती व फलटण परिसरात भेंडीची पहाणी करण्यात आली. मात्र त्यानंतर आत्तापर्यंत कोणताही मार्ग निघालेला नसून निर्यात बंदच आहे.

- अशी होणार सुधारणा
काही व्यापारी बाजारातून खरेदी करुन भेंडी निर्यात करत होते. त्यामुळे दोन महिन्यात फुल किड आढळल्याच्या 23 नोटीसा (नॉन कम्प्लायन्सेस) आल्या. नोटीसांची संख्या जास्त झाली की त्याचे रुपांतर बंदीत होते. त्यामुळे सिस्टिम सुधारण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले आहे. एका निर्यातदाराला तीन नोटीसा आल्या तर त्यांच्यावर बंदी घालण्याचा आणि ज्या ऍथॉरिटीच्या मान्यतेने निर्यात झाली त्यांचे काम काढून घेण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. उत्पादन ते निर्यात प्रक्रीयेतील प्रत्येक घटकाची जबाबदारी नव्याने निश्‍चित करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाचे फायटोसॅनिटरी अधिकारी गोविंद हांडे यांनी दिली.

- उरला फक्त महिना !
युरोपच्या बाजारपेठात भेंडी पाठविण्यासाठी मार्च ते 15 मे हा कालावधी सर्वोत्तम असतो. गेल्या काही वर्षात या कालखंडातील निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज 12 ते 15 टन भेंडी एकट्या लंडनला निर्यात होते. यानंतर 15 मे पासून जॉर्डनची भेंडी सुरु होते आणि भारतीय भेंडीची मागणी थांबते. या बाजारपेठेचा लाभ मिळविण्यासाठी आता फक्त महिनाभराचा कालावधी उरला आहे.

*कोट
""फलटणहून दररोज 25 टन भेंडी निर्यात होत होती. आता 40 रुपये किलोवरुन 17 रुपयांवर दर घसरले आहेत. प्रचंड नुकसान सुरु असून निर्यातीची लिंकही तुटते आहे. हंगाम संपायला महिनाच राहीलाय. शासनाने लवकरात लवकर निर्णय सुरु करावी.''
- सचिन यादव, भेंडी निर्यातदार, फलटण, सातारा

""युरोपिय समुदायाने दिलेल्या नोटीशींच्या आधारे त्यांनी बंदीची कार्यवाही करण्याआधीच केंद्राने बंदी घातली आहे. निर्यातीसाठी उत्पादकांपासून पॅकींग पर्यंतची सर्व माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्राच्या "ऑडिट टीम' मार्फत शेताची पहाणी करुन पिक फुलकिड मुक्त असल्याची खात्री झाल्यास निर्यातीला परवानगी देण्यात येणार आहे.''
- गोविंद हांडे, फायटोसॅनिटरी अधिकारी, कृषी विभाग
-----------(समाप्त)----------- 

No comments:

Post a Comment