Tuesday, April 14, 2015

पूर्वमोसमी मुसळधार - 14 april

गारपीटीचा इशारा कायम; अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात पूर्वमोसमी पावसाची मुसळधार सर आणि गारपीटीचा तडाखा कायम आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, कळवण, सटाणा आणि वर्धा जिल्ह्यात गारपीट झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या तिन्ही विभागांतील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. पुणे, नाशिक, वर्धा, औरंगाबाद, नागपूरसह अनेक जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी (ता.16) सकाळपर्यंत विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र आकाश ढगाळलेले राहण्याची शक्‍यता आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जेनेसह हलक्‍या स्वरुपाचा वादळी पाऊस पडला. कोकणात हवामान कोरडे होते. सोलापूरमध्ये राज्यात सर्वात जास्त 34 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या संपूर्ण भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झालेली आहे.

देशपातळीवरील हवामान स्थितीमध्ये मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकवरील कमी दाबाचा पट्टा, दक्षिण अंदमानातील कमी दाबाचा पट्टा, गुजरात, मध्य प्रदेश, आसाम व मेघालयावरील चक्राकार वारे आणि उत्तर प्रदेशवरील कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बुधवारी (ता.15) हिमालयीन भागात नवीन पश्‍चिमी चक्रावात सक्रीय होण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता.14) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यात ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः
मध्य महाराष्ट्र ः कसबेवनी 9, त्र्यंबकेश्‍वर 6, नगर 10, शेवडी 11, तळेगाव 25, अकोले 43, साकिरवाडी 16, राजूर 17, कोतूळ 56, कसबे बावडा 7

मराठवाडा ः औरंगाबाद व फुलंब्री प्रत्येकी 20, भोकरदन 18, केदारखेडा 38, सातोना 9, रांजणी 13, तळणी 10, घाटंदूर 42, आंबेजोगाई, माजलगाव व परभणी प्रत्येकी 10

विदर्भ ः मोप 18, रिठाड 11, यवतमाळ 2, दिग्रस 11, महागाव 9, वणी 8, घाटंजी 8, नागपूर 7.4, कामठी 17, नगरधन 15, नवेगाव 10, मौदा 18.2, चाचेर 30.2, कोंढाळी 19, सावरगाव 21, उमरेड 18, नंद 50.3, कुही 20.1, भंडारा 11, मोहाडी 19, कन्हळगाव 23, आढळगाव 31, पवनी 12, मोहली 18
--------------- 

No comments:

Post a Comment