Monday, April 20, 2015

कुलगुरुंचा मार्गदर्शक ऍग्रोवन

टीम ऍग्रोवन
पुणे ः राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हालाही ऍग्रोवनमधून प्रेरणा व मार्गदर्शन मिळते. कृषीशी संबंधित सर्व क्षेत्रातील अपडेट माहितीने अपडेट राहता येते. विद्यापीठांच्या कामाची दिशा ठरविण्यापासून ते विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यापर्यंत सर्व बाबींसाठी ऍग्रोवनची पावलोपावली मदत होते. ऍग्रोवन हा राज्यातील कृषी ज्ञान तंत्रज्ञान विस्ताराचे सर्वोत्तम माध्यम आहे, अशी भावना राज्यातील आजी-माजी कुलगुरुंनी व्यक्त केली आहे.

- विद्यापीठ शेतकरीकेंद्रीत करण्यास मदत
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचा कुलगुरू म्हणून काम करण्याला दीड वर्षाचा अवधी झाला. या अवधीत मराठवाड्यातील शेती, त्यामधील प्रश्‍न, शेतकऱ्यांना प्राधान्याने भेडसावणाऱ्या समस्या, त्यावरील उपाययोजना याबाबत मला सातत्याने 'ऍग्रोवन' या एकमेव कृषी दैनिकाची पदोपदी मदत झाली. यामुळे सहाजिकच मी ऍग्रोवनचा दैनंदिन वाचक बनलो. प्रत्यक्ष अंक वाचने शक्‍य होत नाही, तेथे मी इंटरनेटवर न चुकता अंकाचे अवलोकन करतो. कृषी विद्यापिठात शेतकरी केंद्रबिंदू ठेवून बदल करण्यासाठी ऍग्रोवन वाचनाची विशेष मदत झाली. ऍग्रोवनमधील शेतिविषयक ज्ञान व त्यातील यशकथा केवळ शेतकऱ्यांनाच प्रेरणा देतात असे नाही तर त्या आम्हा शास्त्रज्ञांनाही कायम प्रेरणा व मार्गदर्शन करण्याचे काम करतात.

शासनाला कृषी क्षेत्राविषयी प्रभावी सल्ला देण्याचे काम ऍग्रोवनने केल्याचे आपण या दैनीकाचे वाचक झाल्यापासून अनुभवतोय. कोणतेही वृत्त, माहितीपूर्ण लेख प्रकाशीत करतांना विषयाच्या तळाशी जावून त्यानंतरच त्याला प्रसिद्‌धी देण्याची ऍग्रोवनची भूमिका खरोखरच कौतूकास्पद आहे. त्यामुळे सहाजिकच या वर्तमानपत्राने आपले वेगळे स्थान समाजात निर्माण केले आहे. दुसऱ्या देशातील संशोधनाबाबत माहिती देवून आम्हालाही त्यासंदर्भात अपडेट ठेवण्याचे काम ऍग्रोवन सातत्याने करतोय. ज्याप्रमाणे काम करणाराकडून अपेक्षा असतात त्याप्रमाणे ऍग्रोवननेही जागतीक बाजारपेठेचे अवलोकन करून आयात निर्यातिसंदर्भात देश व राज्यातील कृषी क्षेत्राला त्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती देण्याचे पाऊल उचलावे. सोबतच जनसामान्यांचे या दैनिकावरील प्रेम पाहता अंकाच्या पानांची संख्या वाढवावी, असे वाटते.

डॉ. बी. वेंकटेश्‍वरलू, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ परभणी.
------------
- शेतकऱ्यांसाठी वरदान
महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदान असेच ऍग्रोवनबद्दल म्हणावे लागेल. कृषी विस्ताराच्या माध्यमातून प्रयोगशाळांपर्यंत मर्यादीत तंत्रज्ञानाच्या विस्तारात ऍग्रोवनची भुमिका वाखाणण्याजोगी आहे. कृषी क्षेत्रातील वाईट गोष्टींवर बोट ठेवत, त्या सुधारण्यासाठी काय केले पाहिजे, याविषयीचे विवेचनात्मक लिखाणही प्रसारीत झाले. नुसते प्रश्‍नच न मांडता, त्या प्रश्‍नांची उत्तरे दिली, अशाप्रकारचा प्रयत्न भारतीच वृत्तपत्रसृष्टीत पहिल्यांदाच झाला असावा. राज्यातील बेमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीबद्दल सातत्याने लिखाण झाले. त्यामाध्यमातून धोरणांवरही टिका करण्याचे धारिष्ट दाखविण्यात आले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, असाच हेतू त्यामागे होता. पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने केलेल्या कार्याला देखील राज्यव्यापी प्रसिध्दी मिळाली.

डॉ. आदित्यकुमार मिश्रा, कुलगुरू, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.
--------------
- उपयोगितेच्या दृष्टीने सर्वोत्तम
ऍग्रोवन हे फक्त वृत्तपत्र नाही तर तो खूप चांगला उपक्रम आहे. शेतकऱ्यांना तो अतिशय उपयुक्त आहे. चर्चासत्रे, प्रशिक्षण आदी उपक्रमही फार चांगले असतात. मी अतिशय आवडीने दररोज ऍग्रोवन वाचतो. राज्यातील शेतीची सद्यस्थिती, शासनाची धोरणे, बदलती दिशा, नवीन तंत्रज्ञान समजण्यासाठी ऍग्रोवन हे अतिशय चांगले माध्यम आहे. वेगवेगळ्या विषयावरील लेख त्यात असतात. शेतीशी संबंधीत सर्व विषय त्यात समाविष्ट केले जातात. फलोत्पादन, विविध पिके, पुरक व्यवसाय ते हवामान बदलापर्यंत शेती व संलग्न विषयांची सर्व काही अद्ययावत माहिती एका जागी मिळते. संपूर्ण महाराष्ट्रात जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तो अतिशय लोकप्रिय असल्याचा प्रत्यय वारंवार येतो. उपयोगितेच्या दृष्टीने ऍग्रोवन खरोखरच सर्वोत्तम आहे. गेली दहा वर्षे ऍग्रोवनने कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. ऍग्रोवनची पुढील कारकिर्दही अशिच उल्लेखनिय राहील, असा विश्‍वास वाटतो. या निमित्ताने ऍग्रोवनला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
- डॉ. तुकाराम मोरे, कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
---------------------
- कृषीक्रांतीचे नवे पर्व सुरु केले
ऍग्रोवनने महाराष्ट्राच्या शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याचे काम केले आहे. तरुण शेतकऱ्यांमध्ये नवी चेतना निर्माण केली. नवीन तंत्रज्ञान, जगभरातील शेतीमधील स्थित्यंतर, कृषी विभाग, कृषी विद्यापीठांमध्ये चाललेले कार्य व संशोधन पोचविले. जगभरातील शेतीच्या वाटचालीची माहिती मिळाल्याने युवा शेतकऱ्यांची पावले शेतीकडू वळू लागली. शेतीमधील बदलाचे निमित्तच ऍग्रोवन ठरला असे म्हटले तरी वावगे ठरू नये. संत साहित्याविषयीचे लिखान होत असल्याने ग्रामीण भागाला जागविण्याचे आणि जगविण्याचा वसाही जपला गेला. अशाप्रकारे सर्वांगीण दैनिकाचा मान ऍग्रोवनला मिळाला आहे. ग्रामीण भागातील वैशिष्ट्य जपणारे पान नुकतेच सुरु झाले. महिला विश्‍वासाला उभारी देणारे कामही झाले. "कारभारणी तुझ्याचसाठी' या महिला विश्‍वासाठी समर्पीत पानातून ग्रामीण भागातील महिलांच्या कार्याची ओळख करुन देण्याचा प्रयत्न होत आहे. विकसनशील गावाचा परिचय ग्रामविकास पानातून तर ऍग्रीकॅम्पस सारख्या पानांच्या बळावर कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी निगडीत बाबींची माहिती दिली जाते. कृषीक्रांतीचे नवे पर्वच या माध्यमातून सुुरु झाले आहे.
- डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरु, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
---------------
- विस्ताराचे अद्वितीय कार्य
ऍग्रोवन आज शेतीची प्रयोगशाळा झाली आहे. जलयुक्‍त शिवार अभियानाबाबत जाणीवजागृती निर्माण करण्यातही या दैनिकाचे योगदान आहे. चांगले काम करणाऱ्यांचे कार्य राज्यासमोर आणत त्यांचा आदर्शही मांडण्याचे फार मोठे कार्य ऍग्रोवनने केले. सरकारच्या धोरणांमध्ये बदल व्हावा, शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, भुमि अधिग्रहणापासून अद्यावत तंत्रज्ञानापर्यंतच्या सर्व बाबी सोप्या करुन मांडण्यात याचा हातखंडा आहे. कृषीधोरण कसे असावे, कृषीचा अर्थसंकल्प असावा का ? अशा विविध मुद्यांवर चर्चाही घडवून आणली. बेमोसमी पाऊस, गारपीटीनंतर शेतकऱ्यांच्या अवस्थांचे विदारक चित्र मांडले गेले. ही विदारकता निश्‍चितच शासनकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी होती. अशाप्रकारच्या मालिकांमधून ग्राऊंड रियालिटी साकारली. अनेकांना चिंतन करायला भाग पाडले. अकोला कृषी विद्यापीठाचा कुलगूरू असताना अनेक प्रकारचे संशोधन बांधावर पोचविण्यात या दैनिकाने योगदान दिले. विस्ताराचे कार्यही अद्वितीयच आहे.
- डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगूरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
---------------------
मी सुरवातीपासून ऍग्रोवन सुरु होण्याच्या आधीपासून ऍग्रोवन सोबत आहे. ऍग्रोवन कसा असावा यासाठी दहा वर्षापूर्वी कांदा लसून संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीत मी सहभागी होतो. कुलगुरु म्हणूनही मला ऍग्रोवनची चांगली साथ मिळाली. ऍग्रोवन राज्यातील खेड्यापाड्यात आणि शेजारील चार पाच राज्यांमध्येही फार चांगल्या प्रकारे पोचला आहे. महत्वाचे विषय ऍग्रोवन प्रभावीपणे मांडतो. पाणी प्रश्‍न असेल, दुष्काळ, बाजारभाव याविषयी ऍग्रोवनने चांगले काम केलेले आहे. यशोगाथाही अतिशय उत्तम असतात. शेतकऱ्यांच्या अडी अचडणी, संशोधन, धोरणात्मक बाबी अतिशय चांगल्या प्रकारे मांडल्या जातात. शासनाने, लोकप्रतिनिधींनी याची गांभिर्याने दखल घ्यायला हवी.
- डॉ. किसन लवांडे, माजी कुलगुरु, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ राहुरी
------------------------ 

No comments:

Post a Comment