Friday, April 24, 2015

भेंडी निर्यात सुरु

- फायटो प्रमाणपत्रांना हिरवा कंदील

पुणे (प्रतिनिधी) ः निर्यात प्रणाली सुधारणेच्या नावाखाली गेली 25 दिवस बंद असलेली भेंडी निर्यात अखेर पुन्हा सुरु झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाने शुक्रवारी रात्री निर्यातक्षम बागांना फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. यामुळे शनिवारपासुन राज्यातील भेंडीची युरोपिय देशांना होणारी निर्यात पुन्हा सुरु झाली आहे.

युरोपिय बाजारपेठेत पाठवलेल्या भेंडीत फळमाशी (थ्रीप्स) आढळल्याचे निदर्शनास आल्यानंतर निर्यात प्रणालीत सुधारणा करुन सर्व उत्पादन क्षेत्राची नोंदणी व प्रत्यक्ष तपासणी करुन कीडमुक्त उत्पादनाची हमी मिळविण्यासाठी केंद्रीय कृषी विभागाने स्वतःहून मार्चअखेरीस देशातील भेंडी निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्रीय कृषी सचिवालय, प्लॅन्ट क्वारंटाईन विभाग व अपेडा यांच्याकडून निर्यात प्रणालीत सुधारणा करण्यात येणार होती.

मात्र बंदीला 20 दिवस उलटल्यानंतरही याबाबत केंद्राकडून काहाही हालचाल झाली नाही. यामुळे भेंडीचे देशांतर्गत दर कोसळले. निर्यातीचा हंगाम हातचा जावून मोठे नुकसान होण्याचा धोका उद्भवला होता. बारामती व फलटणमधील शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी या प्रश्‍नी लक्ष घातल्यानंतर वेगाने सुत्र हलून निर्यात पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेली तीन दिवस प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाचे पथक महाराष्ट्रात तळ ठोकून असून निर्यातदारांनी अपेडाकडे नोंदवलेल्या बहुतेक बागा तपासून फळमाशीचा प्रादुर्भाव नसलेल्या किंवा नगण्य असलेल्या क्षेत्रावरील भेंडीच्या निर्यातीसाठी ना हरकत दिली आहे. याबाबतचे ऑडिट रिपोर्ट केंद्राला पाठविल्यानंतर प्लॅन्ट क्वारंटाईन विभागाने निर्यातीस पात्र ठरलेल्या भेंडीला फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याच्या सुचना राज्याच्या कृषी विभागाला दिल्या आहेत. यानुसार फलटण, बारामती परिसरातून भेंडी निर्यात करणाऱ्या केबी एक्‍स्पोर्टसह इतर काही कंपन्यांची निर्यात शनिवारपासून पुन्हा सुरळित सुरु झाली आहे.

""मुंबई व पुण्यातून शुक्रवारी रात्री फायटो मिळाल्याबरोबर राज्यातून चार पाच कंपन्यांच्या कन्साईनमेंट युरोपला रवाना झाल्या आहेत.''
- सचिन यादव, सरव्यवस्थापक, के बी एक्‍स्पोर्ट, फलटण
------------------- 

No comments:

Post a Comment