Wednesday, April 8, 2015

गाजीपूर फ्लाॅवर मार्केट स्टोरी

देशाचा फ्लॉवर हब
गाजीपूरचा फुल बाजार
--------
संतोष डुकरे
-------
देशातील फुलांचा सर्वात मोठा बाजार, आशिया खंडातील फुल वितरणाचे सर्वात मोठे केंद्र अशा अनेक लौकिकांनी दिल्ली उत्तरप्रदेश सिमेवरील गाजीपूर येथिल फुल बाजार ओळखला जातो. शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसल्याने गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील फुल उत्पादकांसाठी हक्काची बाजारपेठ म्हणून हा बाजार पुढे आला आहे.
--------
दिल्ली सरकारने कनॉट प्लेस, महेरोली व फतेहपुरी या तिन ठिकाणच्या लहान मोठ्या प्रमाणात चाललेल्या फुल बाजारांचे उत्तरप्रदेश सिमेवरील गाजीपूर गावात 2010-11 मध्ये स्थलांतरण केले. दिल्ली विकास प्राधिकरण व दिल्ली कृषी पणन मंडळ यांनी विशेष प्रयत्न करुन हा बाजार स्थिर केला. यासाठी दिल्लीतील फुल बाजार सक्तीने बंद करण्यात आले. याचा मोठा सकारात्मक परिणाम फुल व्यापारावर होवून संबंधीत सर्वच घटकांच्या सुविधा, व्यवहार सुलभता आणि उलाढालीत मोठी वाढ झाली आहे.

गाजीपूर फुल बाजारात आज 190 नोंदणीकृत कमिशन एजंट आणि 222 नोंदणीकृत घावूक व्यापारी खरिददारांमार्फत फुलांची विक्री व वितरण केले जाते. जम्मू काश्‍मिरपासून तामिळनाडूपर्यंतची राज्ये आणि आशियापासून युरोपपर्यंतचे खंड या बाजारपेठेशी थेट जोडलेले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील फुल उत्पादक, अडते व व्यापारी यांचाही या उलाढालीत मोठा वाटा आहे. पुणे, नाशिक व मुंबईतून थेट शेतकऱ्यांमार्फत आणि स्थानिक फुल बाजारातील व्यापाऱ्यांमार्फतही या बाजारपेठेत दररोज मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची फुले विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत.

- शेतकऱ्यांना निशुल्क सेवा
दिल्ली कृषी पणन मंडळाच्या आदेशानुसार दिल्लीतील कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क वा कमिशन आकारण्यात येत नाही. हाच नियम या बाजारात 100 टक्के अमलात आणण्यात आला आहे. अडत्यांचे 6 टक्के कमीशन खरिददारांकडून वसुल केले जाते. यासाठी मालाची विक्री होतानाच मुळ किमतीत सहा टक्के जादा रक्कम मिळवून व्यवहार केला जातो. याशिवाय एक टक्के बाजार शुल्कही खरिददारांकडून अडत्यांमार्फत बाजार समिती वसुल करते. यासाठी बाजारात माल दाखल होतानाच गेटवर कोणत्या अडत्याकडे किती माल चाललाय याची नोंद घेतली जाते. दिवसाचे व्यवहार पूर्ण झाल्यानंतर अडतेनिहाय फुल विक्रीची माहिती संकलित करुन बाजार शुल्काची पडताळणी केली जाते. शेतकऱ्यांकडून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

- रात्र सर्वात महत्वाची
दिल्लीमध्ये सकाळी 8 पासून संध्याकाळपर्यंत मालवाहतूकीस बंदी आहे. गाजीपूर फुल बाजारातील बहुतेक उलाढाल रात्री 3 ते सकाळी 7 दरम्यान होवून सकाळी 8 पर्यंत फुलांची वाहने दिल्लीबाहेर पडलेली असतात. सणासुदीच्या मुख्य हंगामात तर रात्री 11-12 वाजताच फुल विक्री सुरु होते. सकाळी नऊ पर्यंत बाजार जवळपास संपलेला असतो. दुपारपर्यंत सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर दररोज सर्व बाजार स्वच्छ केला जातो. संध्याकाळपासून पुन्हा बाजारात रेल्वे, विमान व रस्ते या तिनही मार्गांनी देशभरातून फुलांची आवक सुरु होते. रेल्वे व विमानतळापासून मालाची वाहतूक करणारी स्वतंत्र खासगी यंत्रणा सक्रीय आहे.

- दिल्लीचे फ्लॉवर हब
शेतमालाचे वितरण केंद्र म्हणून देशाच्या दृष्टीने दिल्लीचे स्थान अनन्यसाधारण आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, काश्‍मिर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यासह देशातील बहुतेक राज्यांतून या ठिकाणी फुलांची आवक होते. विक्री व्यवहार झाल्यानंतर हीच फुले पुन्हा याच राज्यांसह संपूर्ण दिल्ली आणि परदेशातही पाठविण्यात येतात. मुंबईहून आलेल्या फुलांची पुन्हा मुंबईलाच विक्री झाल्यासारखे गमतीदार प्रकारही या ठिकाणी पहावयास मिळतात.

- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य
शेतकरी या एकमेव घटकावर सर्व बाजार व्यवस्था उभी आहे. यामुळे फुल बाजारात शेतकऱ्यांचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क न आकारता सर्वोत्तम सेवा देण्यात येत असल्याने देशभरातील शेतकऱ्यांनी या बाजाराचा लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न सुरु आहे. यासाठी सर्व राज्यांना यापुर्वी आवाहनही करण्यात आले होते. महाराष्ट्रातून इथे फुलांची चांगली आवक होते. महाराष्ट्रातील फुल उत्पादकांना बाजार समितीमार्फत यापुढेही परिपूर्ण सहकार्य करण्यात येईल. अशी माहिती बाजार समितीचे सचिव धिरेंद्र कुमार यांनी दिली.

- 10 एकर क्षेत्रावर होणार विस्तार
गाजीपुर फुल बाजाराचे विस्तारिकण प्रस्तावित आहे. यासाठीचा दिल्ली विकास प्राधिकरणामार्फत सध्याच्या बाजाराच्या ठिकाणीच दहा एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. येत्या महिनाभरात नवीन विस्तारीत बाजारपेठ उभारणीच्या प्रस्तावास मंजूरी मिळण्याची शक्‍यता आहे. यात फुलांची साठवणूक, प्राथमिक प्रक्रीया आदी साठीच्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विचार करण्यात आला असल्याचे बाजार समितीचे सहसचिव मनिष कश्‍यप यांनी सांगितले.

- चिनी फुलांचे आक्रमण
दिल्ली व शेजारील राज्यांमध्ये फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पंचतारांकीत हॉटेल, विवाह समारंभ आयोजित करणाऱ्या कंपन्या हे फुलांचे मुख्य ग्राहक असून किरकोळ व्यापारी, विक्रेत्यांमार्फतही फुलांना मोठा उठाव असतो. मात्र गेल्या काही वर्षात चिनमधून प्लॅस्टिकच्या फुलांची आवक व त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही फुले कमी किमतीत अनेकदा वापरता येत असल्याने त्यास पसंती वाढत आहे. यामुळे फुलांच्या देशांतर्गत बाजारपेठेतील उलाढाल व दरांवरही विपरीत परिणाम झाल्याची अडते व व्यापाऱ्यांची तक्रार आहे. चिन त्यांचे प्लॅस्टिक कचरा फुलांच्या रुपात भारतात डंपिंग करत आहे. याबद्दल विविध बाजार घटकांमध्ये मोठा असंतोष आहे. चिनी प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालून देशातील फुल उत्पादक व बाजारपेठेला संरक्षण द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

- अडत्यांकडून शेतकऱ्यांना सहाय्य
गाजीपूरमधील अडते आणि विविध राज्यांतील शेतकरी यांच्यात विशेष सौदहार्यपूर्ण संबंध आहेत. अनेक शेतकरी वर्षानुवर्षापासून अडत्यांशी जोडलेले आहेत. या शेतकऱ्यांना फुल उत्पादनासाठी आर्थीक मदत, देशभरातून चांगले बियाणे उपलब्ध करुन देणे, दरातील तेजीतील फायदा मिळून देण्यासाठी लागवडीच्या वेळांपासून विविध प्रकारच्या माहितीचे आदान प्रदान करण्यास अडत्यांमार्फत प्राधान्य देण्यात येत आहे. लुज फ्लॉवरच्या काही अडत्यांनी तर कलकत्यावरुन येणाऱ्या झेंडूला पर्याय म्हणून पंजाब, हरियाणा, युपीच्या फुल उत्पादकांना कलकत्यावरुन बियाणे व रोपांचा पुरवठा केला आहे. यामुळे इथल्या शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे.
-------
* अडते कोट
""चीनमधून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकची फुले येत आहेत. फुलांचे मोठे ग्राहक आता 80 टक्के चायनिज फुले विकत घेतात. यामुळे बाजारपेठेला मोठा फटका बसलाय. मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करुनही कुणी या प्रश्‍नाकडे गांभिर्याने पाहत नाही.''
- इर्शाद महोम्मद, अडत्या

""सणावाराला फुलांच्या दरात तेजी असते. बाजारात चढ उतार सुरु असतात मात्र शेतकऱ्यांना सरासरी चांगली मिळते. शेतकऱ्यांच्या मालावरच सर्व मार्केट चाललंय. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे कमीशन घेण्यात येत नाही.
- जयवीर सिंह, अध्यक्ष, एकता फ्लावर्स कमीशन एजेन्ट वेलफेअर असोसिएशन

""मी गेली 45 वर्ष व्यवसायात आहे. सर्वांचीच उलाढाल वाढतेय. फुले कधी शिल्लक राहत नाहीत. मात्र मंदीच्या काळात शेतकऱ्यांवर झेंडु बाजारातच सोडून जाण्याची वेळ येते, याचे वाईट वाटते. शेतकरी उत्पादनात मास्टर आहेत. मार्केटच्या दृष्टीने नियोजन गरजेचे आहे.''
- रविंदर सिंह सैनी, फुल उत्पादक व अडते
-------
* बाजार समिती कोट
""गाजीपुरच्या नावाखाली बिगरनोंदणीकृत लोकांना फुले विकून फसवणूक झाल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी अडत्या किंवा व्यापारी निवडताना काळजी घ्यावी. फक्त नोंदणीकृत अडत्या व व्यापाऱ्यांशीच व्यवहार करावा. काहीही अडचण असेल तर बाजार समितीशी संपर्क साधावा.''
ृ- मनिष कश्‍यप, सहसचिव, बाजार समिती
---------
* चौकट
- गाजीपुर फुल बाजाराची चढती कमान (फुलांची आवक)
वर्ष --- फ्लॉवर बंडल (संख्या) --- कट फ्लॉवर (नग) --- लुज फ्लॉवर (किलोग्राम)
2010-11 --- 5919011 --- 294500 --- 8519185
2011-12 --- 10742508 --- 1169456 --- 6398385
2012-13 --- 13997355 --- 1553743 --- 10824219
2013-14 --- 19696501 --- 2388875 --- 15797293
-------
* संपर्क -
मनिष कश्‍यप, सहसचिव,
फुल बाजार, गाजीपूर, दिल्ली 96
09213726627
--------















No comments:

Post a Comment