Tuesday, April 21, 2015

"कॉपसॅप'ला पंतप्रधान पुरस्कार

नवी दिल्ली ः कृषी विभागाच्या किड रोग सर्वेक्षण व संलनियंत्रण प्रकल्पाला (कॉपसॅप) केंद्र सरकारचा 2012-13 साठीचा संस्थात्मक श्रेणीतील "पंतप्रधान पुरस्कार' मंगळवारी (ता.21) प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्याचे जलसंधारण सचिव व तत्कालिन कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी हा पुरस्कार स्विकारला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

राष्ट्रीय पातळीवर लोकप्रशासनात उत्कृष्ट व नाविन्यपुर्ण काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नागरी सेवा दिनी (21 एप्रिल) वैयक्तिक, संस्थात्मक व सांघिक या तिन गटांमध्ये पुरस्कार दिले जातात. यंदा 2012-13 व 2013-14 वर्षांसाठीचे पुरस्कार वितरण करण्यात आले. नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबविलेल्या "जिल्हा कौशल्य विकास' कार्यक्रमाला व अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पश्‍चिम त्रिपुरात मांडवी ब्लॉक येथे राबविलेल्या "आर्थिक समावेशन' प्रकल्पाला सांघिक श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

क्रॉपसॅप प्रकल्पात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करुन शेतकऱ्यांची माहिती संकलित करून पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे वेळोवेळी किटकांचा प्रादुर्भाव होण्याचा अंदाज करणे आणि नुकसान पातळीच्या आतच किडीचे नियंत्रण करणे शक्‍य झाले. यातून राज्य शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान टळले.

जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमातून गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार 700 युवकांना प्रशिक्षण देणअयात आले असून यातील एक हजार 300 युवक स्वतःच्या पायावर उभे राहीले आहेत. या कार्यक्रमात आदीवासी व इतर गरजू युवकांना ऑटोमोबाईल उद्योग, बांधकाम, हॉटेल उद्योग आदींचे सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण दिले जाते. समुपदेशन केंद्रामार्फत प्रशिक्षितांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. हा प्रकल्प सर्व जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून यंदा तो नागपूरसह पाच जिल्ह्यांत प्रायोगिक तत्वावर सुरु होणार आहे. अभिषेक कृष्णा यांच्यासह गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रंजीत कुमार, टी.एस.के. रेड्डी, पी.बी.देशमाने, वाय.एस.शेंडे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
-----------

No comments:

Post a Comment