Saturday, April 18, 2015

उन्हाचा पारा वाढण्यास सुरवात - 18 Apr

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील पाऊस थांबून ढगाळ हवामान निवळण्यास सुरवात झाल्याबरोबर कमाल तापमानाचा पारा पुन्हा एकदा झेपावण्यास सुरवात झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात अनेक ठिकाणी कमाल तापमानात मोठी वाढ होवून ते पूर्वपदावर आले. पुढील दोन दिवसात राज्यातील किमान तापमानात आणखी दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी सकाळपर्यंत (ता.20) राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज व्यक्त केला असून कोणत्याही जिल्ह्यात पावसाची वा गारपीटीची शक्‍यता वर्तविण्यात आलेली नाही. हिमालयात पश्‍चिमी चक्रावात व राजस्थानात चक्राकार वारे सक्रीय आहे. महाराष्ट्र व अरबी समुद्रात सध्या कोणतीही हवामान स्थिती सक्रीय नाही.

दरम्यान, शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात तळकोकणात मानगाव येथे 15 मिलीमिटर, तेलेरे व वागडे येथे प्रत्येकी 13 मिलीमिटर, वैभववाडी व बांदा येथे प्रत्येकी 6 मिलीमिटर तर येडगाव येथे पाच मिलीमिटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. या तीनही विभागात कोठेही पावसाची नोंद झाली नाही.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार दिवसभरात विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय घट कायम होती. तर राज्यात उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. दिवसभरात राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान जळगाव येथे 40.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भात कमाल तापमानात वाढ झाली असली तरी अद्याप कमाल तापमानाचा पारा सरासरीहून दोन ते पाच अंश सेल्सिअसने घसरलेला आहे. पुढील दोन दिवसात तो सरासरीच्या पातळीवर येण्याचा अंदाज आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे शनिवारी (ता.18) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 34.2, अलिबाग 31.8, रत्नागिरी 33, पणजी 33.4, डहाणू 34.6, पुणे 36.7, जळगाव 40.2, कोल्हापूर 35.2, महाबळेश्‍वर 27.6, मालेगाव 39.4, नाशिक 37.6, सांगली 35.3, सातारा 34.9, सोलापूर 37.9, उस्मानाबाद 34.1, औरंगाबाद 36, परभणी 34.6, अकोला 37.2, अमरावती 37.4, बुलडाणा 34.7, चंद्रपूर 37.2, नागपूर 37.3, वाशिम 35, वर्धा 37, यवतमाळ 35.3
------------------ 

No comments:

Post a Comment