Tuesday, December 30, 2014

दुष्काळी ज्वारी, ठरेल उसाला भारी !

मोक्‍याच्या अवस्थेत संरक्षित पाण्यासाठी ठिबक सिंचन, योग्य अंतरावर लागवड व विद्राव्य खतांचा वापर या त्रिसुत्रीचा वापर केल्यास नफ्याच्या पातळीवर कोरडवाहू ज्वारीचे अवघ्या चार महिन्याचे पिक 16 महिन्यांच्या बागायती ऊस पिकालाही भारी पडू शकते याचे आदर्श पिक प्रात्यक्षिक शिरुर तालुक्‍यातील (जि.पुणे) कासारी गावचे प्रगतशील शेतकरी व भारतीय किसान संघाचे प्रांत कोषाध्यक्ष मधुकर (अण्णा) हरी टेमगिरे यांनी उभारले आहे. पुणे-शिरुर रस्त्यावरच हायवेपासून हाकेच्या अंतरावर असलेले हे पिक सध्या ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.
------------
संतोष डुकरे
-------------
सुक्ष्म सिंचनाचे तंत्रज्ञान सर्वसाधारणपणे बागायती व नगदी पिके विशेषतः फळपिके व भाजीपाला यांच्यासाठीच वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यातही अन्नधान्य पिकांसाठी त्याचा वापर करण्याचे धाडस फार कुणी करत नाही. मात्र हे संरक्षित पाणीसाठ्याच्या बळावर हे धाडस दाखवले तर कोरडवाहू अन्नधान्य पिकंही नगदी व पुरेपुर मोबदला देणारे होऊ शकते हे टेमगिरे व त्यांच्या सहकार्यांनी उभारलेल्या प्रात्यक्षिकांवर सहज नजरेस भरते.

पीक सल्लागार केशव म्हस्के यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शनाखाली चालू हंगामात मधुकर टेमगिरे (कासारी), गजानन इंगळे (दहीवडी), भाऊसाहेब पळसकर (करडे) यांनी प्रत्येकी एक एकरावर तर गणेश काळे व सहकार्यांनी (निमोने) तीन एकरावर असे तालुक्‍यात एकूण सहा एकर क्षेत्रावर ठिबक सिंचनावर ज्वारीचे उत्पादन घेण्यात आले आहे. सर्वांनी बाजारात सहज उपलब्ध असलेले सर्वसाधारण बियाणे (निर्मल सिड्‌स कंपनीचा सुवर्णा वाण) यासाठी वापरले आहे. हे सर्व शेतकरी भारतीय किसान संघाचे सदस्य आहेत. किसान संघामार्फत याच धर्तीवर सोलापूर, नांदेड व लातूर जिल्ह्यातही ज्वारी उत्पादकतावाढ प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत.

- आधी प्रयोग मग प्रात्यक्षिके
शिक्रापूर परिसरात ठिबकवरील ज्वारीचे प्रात्यक्षिक घेण्याआधी सल्लागार श्री. म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन वर्षे 10 गुंठे क्षेत्रावर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागात याबाबतचे प्रयोग घेण्यात आले. पहिला प्रयोग कर्जत तालुक्‍यातील कुळधरण गावात कांतीलाल गुंड यांच्या शेतात झाला. त्यात सुक्ष्म सिंचनाबरोबरच ज्वारीची रोपे नर्सरीत तयार करुन रोपांची पुर्नलागवड करण्यात आली. या प्रयोगात प्रति कणीस सरासरी 200 ग्रॅम उत्पादन मिळाले. दुसरा प्रयोग राळेगणसिद्धी गावातील सदाशीव मापारी यांच्या शेतात झाला. यात टोकण पद्धतीने लागवड व ठिबकचा वापर करण्यात आला. हा प्रयोग पाहण्यासाठी शिरुरमधील दौंडकर स्मारक समितीमार्फत श्री. टेमगिरे यांच्या नेतृत्वाखाली 40 शेतकऱ्यांची अभ्यास सहल नेण्यात आली. याप्रेरणेने टेमगिरे यांच्याच नेतृत्वाखाली शिक्रापूर परिसरातील चार गावांमध्ये चालू रब्बी हंगामात 6 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. श्री मस्के या प्रयोगाला दर आठ दिवसांनी भेट देवून मार्गदर्शन करतात. त्यांनी आखून दिलेल्या दिनक्रमानुसारच या प्रयोगाचे सर्व काम सुरु आहे.

- सर्व बाबींच्या काटेकोर नोंदी
टेमगिरे यांनी एक ऑक्‍टोबर 2014 रोजी एक बाय एक फुटावर एकेका बिजाची लागवड केली. ठिबकसाठी दोन ओळींमध्ये एक लॅटरल ठेवण्यात आली. यानंतर 17 व 18 ऑक्‍टोबरला नर्सरीतील रोपांचा वापर करुन गॅप फिलींग केले. पहिली प्रतिबंधात्मक फवारणी दोन नोव्हेंबरला तर दुसरी फवारणी सहा नोव्हेंबरला केली. दोन्ही फवारणीमध्ये सल्लागारांच्या सांगण्यानुसार किडनाशक, बुरशीनाशक व बायोझाईम यांचा एकत्रित वापर केला. दरम्यान 24 ऑक्‍टोबरला 10ः26ः26, युरीया व सुक्ष्म मुलद्रव्य खतांचा डोस दिला. यानंतर नोव्हेंबरच्या 2 ते 11 तारखेदरम्यान दररोज एक दिवसाआड प्रती दिवस पाच किलो याप्रमाणे 0ः52ः34 व युरिया आणि कॅल्शियम नायट्रेट विद्राव्य स्वरुपात ठिबक सिंचन संचातून दिले. पाठोपाठ एक दिवस पाच किलो झिंक सल्फेट विद्राव्य स्वरुपात दिले. दोन वेळा खुरपणी केल्या.

- रोपे तयार केली तर...
ज्वारीची रोपे तयार करुन त्यांची ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केल्यास एकसमान वाढ, उत्पादनक्षम ताटांची अधिकतम संख्या यामुळे उत्पादनात निश्‍चितच भरिव वाढ येत असल्याचे कर्जत येथे केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले. मात्र यात ज्वारीची रोपे तयार करण्यासाठी अतिरिक्त 20 हजार रुपये खर्च येतो. उत्पादन खर्चात होणारी ही वाढ टाळण्यासाठी कासारी येथील या प्रात्यक्षिकात रोपांऐवजी टोकण पद्धतीने ज्वारी लागवड करण्यात आली. एक एकरमध्ये किमान 30 ते 32 हजार रोपांपासून दर्जेदार उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. किसान संघ व इतर माध्यमातून राज्यातील अनेक शेतकरी व मान्यवरांनी आत्तापर्यंत या प्रात्यक्षिक क्षेत्राला भेट दिली आहे. या क्षेत्रातून एकरी किमान 40 क्विंटल ज्वारी उत्पादनाचा शेतकरी व तज्ज्ञांचा अंदाज आहे. पिक व कणसाचा आकार पाहता जास्तीत जास्त 50 क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळण्याची आशा आहे.

- उत्पादन खर्च एकरी 40 हजार
टेमगिरेंनी या प्रात्यक्षिकाच्या सुरवातीपासूनच काटेकोर नोंदी व हिशेब ठेवले आहेत. ठिबकवरील या ज्वारी उत्पादनासाठी जमीनीची पुर्वमशात म्हणजेच नागंरणी, रोटरणी, एक ट्रक शेणखत, लागवड, दोन खुरपण्या, दोन फवारण्या, ठिबक सिंचन साहित्य भाडे यापोटी आत्तापर्यंत 30 हजार रुपये खर्च झाले आहेत. कापणी, मळणीसह धान्य हाती पडेपर्यंत आणखी 10 हजार रुपये खर्चाचा अंदाज आहे. एकूण उत्पादन खर्च एकरी 40 हजार रुपयांच्या आत राहील, असे त्यांचे गणित आहे.

- उसाहून दुप्पट नफा शक्‍य
शिक्रापूर परिसरात शेतकऱ्यांना ऊस पिकापासून वार्षिक एकरी सरासरी 50 हजार रुपये नफा होतो. याऊलट सुक्ष्म सिंचन पद्धतीने एकट्या रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकापासून शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो असा दावा, टेमगिरे करतात. त्यांच्या गणितानुसार 40 क्विंटल ज्वारीपासून प्रति क्विंटल तीन हजार रुपये दराने एक लाख 20 हजार रुपये व चाऱ्यापासून सुमारे 20 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. उत्पादन खर्चाचे 40 हजार रुपये वजा जाता एक लाख रुपये निव्वळ नफा हाती राहू शकतो. शिवाय खरीप व उन्हाळी हंगामात पाणी उपलब्धतेनुसार शेतकरी इतर पिकेही घेऊ शकतात.
-----------
*प्रतिक्रीया
""गेल्या वर्षी 10 गुंठ्यावर प्रयोग झाला. यंदा तो सहा एकरवर आहे. या प्रात्यक्षिकांचे यश पाहून यापुढील काळात शेतकरी स्वतःहून या पद्धतीने उत्पादन घेतील. किसान संघाच्या माध्यमातून राज्यातील सर्व ज्वारी उत्पादक भागात प्रात्यक्षिके उभारण्याचा प्रयत्न आहे.''
- मधुकर टेमगिरे, प्रयोगशिल शेतकरी व प्रांत कोषाध्यक्ष, भारतीय किसान संघ

""टेमगिरे यांच्या ठिबकवरील ज्वारीच्या प्रयोगाचे निष्कर्ष प्रेरणादायी आहेत. कृषी विभागाने परिसरात 500 हेक्‍टरवर ज्वारी पिक प्रात्यक्षिके घेतली आहेत. या शेतकऱ्यांना हा प्रयोग दाखवून पुढील हंगामात या पद्धतीने ज्वारी उत्पादकतावाढीस चालना देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.''
- सुरेश जोशी, मंडळ कृषी अधिकारी, शिक्रापूर
-------------
संपर्क ः
मधुकर टेमगिरे - 9403722447, 9850099847
केशव म्हस्के - 9822075738
------------- 

उमेद वाढूया ... साहेबराव वाघ, धुळे

हे दिवसही जातील...
------------
गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांना निसर्गाचा कमी पाऊस, जास्त पाऊस, वारा, गारपीट याचा मोठा मार बसला. शेतीचे उत्पादन अत्यंत अल्प झाले. शेतीत भांडवल ओतले तर पिके चांगले येतात. यासाठी शेतकरी बॅंकांकडे हेलपाटे घालून कर्ज घेतात, शेतीत खर्च करतात. उत्पादन न आल्याने सर्व आर्थिक गणित कोलमडते. गेल्या तीन वर्षात निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे.

संकटे येतात, परंतु ती कायमस्वरुपी राहत नाही. "हे दिवसही जातील' हे लक्षात घेतले पाहीजे. एका शेतकऱ्याला दोन मुले होती. त्यांचे वाटणीचे वेळी एक सोन्याची अंगठी होती. तिच्यावर हे दिवसही जातील असे लिहले होते. दुसरा हिस्सा दुप्पट पैशाचा होता. थोरल्या मुलाने दुप्पट पैसे घेतले आणि लहान मुलाने सोन्याची अंगठी घेतली. पुढे संकटे आली. थोरल्याने संकटातून वाचण्यासाठी पैसे संपवले. लहान भावावरही संकटे आली. परंतु त्याच्याकडे असलेल्या अंगठीवरील धिराच्या संदेशाने त्याला हुरुप आला. तो डगमगला नाही. वडीलांच्या संदेशाचा अर्थ त्याला पूर्ण समजला. संकटातही संधी शोधत तग धरुन राहीला. संकटाचे दिवस कायम स्वरुपी नसतात. रात्रीनंतर दिवस येतोच.

जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुच शोधून पाही या समर्थांच्या वचनाचे मनन झाले पाहिजे. सर्व सुखी असा कोणीही नाही. धाडस माणसाचे अंगी असावयास पाहिजे. संयम आणि सहनशिलता सोडू नये. शेतकऱ्यांनी विवेकपूर्ण वागणे अगत्याचे आहे. आत्महत्या हा संकटावर मात करण्याचा मार्ग किंवा उपाय नाही. उलट त्यामुळे उर्वरीत सर्व कुटुंबच संकटांच्या मालिकेत सापडते. संकटे कोणावर आली नाहीत. ती सर्वांवर येतात. त्यातून जिद्दीने मार्ग काढण्यातच पुरुषार्थ आहे. भ्याडपणे आणि अविचाराने वागले तर नुकसान आपल्याच कुटुंबाचे होते. तरुणपणी अवघ्या 30 ते 50 वयात अघोरी कृत्य करुन शरीर नष्ट करणे हा नैतिक गुन्हा आहे. आपल्याला जगण्याचा अधिकार आहे, मरणाचा नाही. विचारपुर्वक निर्णय घेवून ठामपणे, शुर योद्‌ध्याप्रमाणे संकटाशी मुकाबला करण्यातच धन्यता व आदर्शपणा आहे.

वाईट दिवस किंवा संकटे नेहमीच येतात असे नाही. दर दोन तीन वर्षांनी यामध्ये बदल होत असतो. आपला थोरपुरुषांचा वारसा आहे. सर्वांनी संकटाशी दोन हात करुन त्यावर विजय मिळवलेला आहे. म्हणून "हे दिवसही जातील' यावर विश्‍वास ठेवून आत्मघाताचे कृत्य करु नका. संकटाला घाबरुन आत्महत्या करणे हे पाप आहे. आपल्यानंतर कुटुंबातील आई, बाप, बायको, मुले यांनी कसे जगावे. घरातील कर्ता पुरुषाने याचा विचार करण्याची आता गरज आहे. आपण असे अघोरी, आत्मघातकी, चुकीचे पाऊल उचलू नका. "बचेंगे तो और भी लढेंगे' याचा विसर पडू देऊ नका. धाडसाने, जिद्दीने, संयमाने वागुन एकमेकांच्या सहकार्याने आलेल्या नैसर्गिक संकटाशी मुकाबला करावयास पाहिजे.
------------
साहेबराव वाघ, प्रगतशील शेतकरी, कापडणे, ता. जि. धुळे
9767571826
------------ 

उमेद बांधूया - डाॅ. रामचंद्र साबळे

निश्‍चिय करुया लढण्याचा...
---------
डॉ. रामचंद्र साबळे, जेष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ
---------
उंच दगडी इमारतींवर, किल्ल्यांवर, विहीरींच्या काठावर दगडांच्या फटीत पिंपळ आणि वडाची झाडे वाढताना आपण पाहतो. त्यांना कधी कोणी अन्न वा पाणी देत नाही. दुष्काळ असो की अवर्षण ती झाडे तग धरतात. जिवंत राहतात. पावसाचे थोडेफार पाणी मिळताच पुन्हा वाढतात. उन्हाळ्यात उन्हाचे तिव्र चटके, पाण्याविना गळणारी पाने सारे काही सहन करतात. मात्र जिवंत राहतात. अनुकूल स्थिती आली की पुन्हा वाढत राहतात. बिकट परिस्थितीवर, संकटांवर मात करणे आपण त्यांच्याकडून शिकूया. आत्महत्तेचा विचार हद्दपार करुया. नव्या उमेदिने नव्या जोमाने जिवण जगूया. निश्‍चयाने परिस्थिती बदलूया.

शेती व्यवसाय हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग भरभरुन देतो तेव्हाच शेतीची भरभराट होते. निसर्गात काही बदल झाल्यास त्याचे परिणामही नैसर्गिकपणे होतात. या सर्व बाबी समजून घेऊन शेती व्यवसाय करणे गरजेचे आहे. कितीही अडचणी आल्या, आपत्ती आल्या तरी त्यावर मात करीन असा निश्‍चय प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे.

टेन्शन, फस्ट्रेशन आणि डिप्रेशन या बाबी शेतकऱ्यांच्या नाहीत. त्यामुळे त्यांचा विचारही मनाला शिवू देण्याची गरज नाही. निसर्गाशी एकरुप होवून जगण्याची, त्यातून नवनिर्मिती करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. स्वतःबरोबरच इतरांसाठी अन्न, धान्य, चारा निर्मितीचे बहुमोल काम आपण करतोय. जगाचे खरे पोशिंदे आपण आहोत, त्यामुळे काही अडचण आली. संकटे आली तर खचून न जाता आपली क्षमता आणखी वाढविण्यावर भर द्यायला हवा. इतरांना जगविण्याचा वसा आपण घेतला आहे, मग आपण खचून कसे चालेल.

अडचणींमध्येही संधी शोधतो आणि त्या काबीज करतो तो यशस्वी होतो. शेतीत दररोज नवीन संधी असते. आपण या संधी शोधणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी नुकसान होताच मनात अविचार वाढवणे आणि स्वतःच बरंवाईट करणे या गोष्टी प्रथम हद्दपार कराव्यात. संत बहिणाबाई चौधरी यांनी... अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके, मग मिळते भाकर... असे म्हटलेच आहे. भाकरी मिळवतानाही हाताला बसणारे चटके सहन करावे लागतात. तसेच शेती करतानाही मनाला बसणारे चटके सहन करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. तसा निश्‍चय करण्याची वेळ आता आली आहे.

जेथे जेणे आळस केला तो सर्वस्वी बुडाला या उक्तीनुसार आळस झटका आणि नव्या उमेदीने, नव्या जोमाने नाविन्यपूर्ण शेती व्यवसाय करायचे स्वप्न उराशी बाळगा. तसा निश्‍चय करा. मनावर सर्व संसाराचे ओझे असले तरीही चित्त उदासिन होऊ देवू नका. नाविन्याने प्रेरित होऊन शास्त्रावर आधारीत शेती करा. नव्या उमेदीने अपार कष्ट करण्याचे, संकटे पचविण्याचे विचार मनात बाळगा. तुमच्या शेतीत नवनवीन संकल्पना राबवा, यश तुम्हाला साथ देईल.
--------- 

फळे भाजीपाला प्रशिक्षण समारोप

पुणे ः राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेती उत्पादनाचा नफा वाढविण्यासाठी फळे व भाजीपाला प्रक्रीया तंत्रज्ञान मोहिम राबविण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एन. के. जरग यांनी व्यक्त केले. फळे व भाजीपाला प्रक्रीया महासंघामार्फत आयोजित सात दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नुकताच झाला. यावेळी ते बोलत होते. नगरसेवक अशोक हरणावळ, महासंघाचे अध्यक्ष बी.के.माने आदी यावेळी उपस्थित होते.

प्राचार्य एस.आर. नजन, प्रा. बी. बी. गुंजाळ, प्रा. संतोष घारे, प्रा. रमेश बेंद्र, प्रा. राऊत, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी एम. डी. लिके, एम.सी.डी.चे सुरेश उमप यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. उषा माने, किर्ती जोशी, विद्या जव्हेरी व सुनिता घोगरे यांनी प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात 40 प्रशिक्षणार्थींना जॅम, जेली, सॉस, लोणची, सोया दुध, दुध प्रक्रिया व निर्जलीकरण यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
------------- 

रोझ सोसायटी गुलाब प्रदर्शन

पुणे (प्रतिनिधी) ः दि रोझ सोसायटी ऑफ पुणे या संस्थेमार्फत येत्या तीन व चार जानेवारीला टिळक स्मारक मंदिर येथे हिवाळी गुलाब प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन तीन जानेवारीला दुपारी तीन वाजता एस्सार गृपचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश कारले यांच्या हस्ते, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांच्या उपस्थित होणार आहे. शनिवारी दुपारी एक ते रात्री आठ व रविवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रदर्शन सुरु राहणार आहे.

प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पारनेर (नगर) येथिल गुलाब उत्पादक शेतकरी राहुल शंकर पडवळ यांना "गुणवंत गुलाब शेतकरी' पुरस्कार तर गुलाब विषयक लेखनासाठी प्रा. अरुण वाराणशीवार यांना कै. लक्ष्मीबाई अनंत नाईक रौप्यपदक देवून गौरविण्यात येणार आहे. प्रदर्शनामध्ये 75 विभाग आहेत. उत्कृष्ट पुष्परचना आणि गुलाबाची छायाचित्रे यांचाही यात समावेश आहे. प्रदर्शनाचे बक्षिस वितरण रविवारी (ता.4) संध्याकाळी किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे कार्यकारी संचालक आर. आर. देशपांडे यांच्या हस्ते होणार असल्याचे रोझ सोसायटीचे अध्यक्ष रविंद्र भिडे यांनी सांगितले.
--------------- 

Monday, December 29, 2014

थंडीचा कडाका; गारपीटीचे सावट - 29 डिसेंबर

हवामान खात्याचा इशारा कायम

*किमान तापमानाचा पारा... (अंश सेल्सिअस)
महाराष्ट्रात ः नागपूर 5, नांदेड 6, नाशिक 6, अकोला 7, पुणे 7.8, औरंगाबाद 8
देशात ः श्रीनगर -4.1, अमृतसर 0, चंदीगड 1.2, दार्जिलींग 2.8, सिमला 3.1, अंबाला 3.7

पुणे (प्रतिनिधी) ः कोकण वगळता राज्याच्या उर्वरीत सर्व भागात थंडीचा कहर वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने विदर्भातील थंडीची लाट अधिक तिव्र झाली झाली आहे. सोमवारी पहाटे नागपूरात पारा पाच अंशांपर्यंत निचांकी घसरला. मराठवाडा व उत्तर मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट आहे. बुधवारपर्यंत (ता.31) या तीनही विभागांमध्ये थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याच वेळी बुधवारपासून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह काही ठिकाणी बुधवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

हिमालयीन भाग, बंगालचा उपसागर व अरबी समुद्र या तिनही बाजूने हवामानाच्या विविध "सिस्स्टिम' सक्रीय आहेत. त्याचा मोठा परिणाम सध्या महाराष्ट्राच्या हवामानावर होत आहे. पश्‍चिम हिमालयीन परिसरात मंगळवारी रात्रीपासून नवीन पश्‍चिमी चक्रावाताचा प्रभाव जाणवण्याची शक्‍यता आहे. उत्तर भारतात कडाक्‍याची थंडी व दाट धुके आहे. या भागातून राज्यात थंडीचे वारे दाखल होत आहेत.

बंगालच्या उपसागरावर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र उपसागराच्या नैऋत्य भागात श्रीलंका-तामिळनाडूलगत सक्रीय आहे. मंगळवारी या कमी दाबाच्या क्षेत्राची तिव्रता आणखी वाढून त्याचे रुपांतर कमी तिव्रतेच्या चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. लक्षद्वीप परिसरात व बांग्लादेश जवळही चक्राकार वारे सक्रीय आहेत. तामिळनाडूच्या किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस सुरु आहे. आंध्र प्रदेश व केरळमध्येही कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे.

सोमवारी सकाळपर्यंत विदर्भाच्या काही भागात थंडीची तीव्र लाट तर मराठवाड्याच्या काही भागात थंडीची लाट होती. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरसरीपेक्षा लक्षणीय घट तर मराठवाडा व विदर्भाच्या उर्वरीत भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. बुधवारी सायंकाळी पुणे परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. पुणे परिसरात ढगाळ हवामान असून सापेक्ष आद्रतेचे प्रमाण राज्यात सर्वाधीक 97 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे.

सोमवारी (ता.29) सकाळपर्यंतच्या 24 तासातील किमान तापमान व कंसात किमान तापमानात सरासरीहून झालेली घट अंश सेल्सिअसमध्ये ः अलिबाग 16 (-2), भिरा 15, डहाणू 16 (-1), गोवा 20 (-1), हर्णे 17 (-5), मुंबई 15 (-2), रत्नागिरी 17 (-2), जळगाव 7.2 (-4), जेऊर 10, कोल्हापूर 15 (0), महाबळेश्‍वर 12 (-1), मालेगाव 8 (-3), नाशिक 6.1 (-4), पुणे 7.8 (-3), नगर 9.8, सांगली 13 (-1), सातारा 9.9 (-3), सोलापूर 12.5 (-2), औरंगाबाद 8.1 (-3), नांदेड 6 (-5), बीड 8, उस्मानाबाद 9 (-3), परभणी 9 (-4), अकोला 7.1 (-6), अमरावती 10.2 (-5), ब्रम्हपुरी 9.2 (-3), बुलडाणा 9.4 (-5), चंद्रपूर 11, नागपूर 5 (-7), वर्धा 7 (-6), यवतमाळ 8 (-7), वाशिम 12.6

सोमवारी (ता.20) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील सापेक्ष आद्रता व कंसात सरासरीच्या तुलनेत सापेक्ष आद्रतेतील वाढ किंवा घट टक्‍क्‍यांमध्ये ः अलिबाग 75 (0), भिरा 33 (-41), डहाणू 57 (-8), पणजी 72 (-1), हर्णे 51 (-5), मुंबई 44 (-22), रत्नागिरी 49 (-9), जळगाव 56 (-14), जेऊर 52 (-17), कोल्हापूर 58 (-14), महाबळेश्‍वर 60 (-3), मालेगाव 70 (3), नाशिक 60 (-9), पुणे 97 (-13), सांगली 71 (-2), सातारा 84 (10), सोलापूर 47 (-19), औरंगाबाद 47 (-15), नांदेड 58 (-9), परभणी 44 (-17), अकोला 60 (-2), अमरावती 89 (-37), ब्रम्हपुरी 55, बुलडाणा 58 (2), चंद्रपूर 65 (-8), नागपूर 57 (-12), वर्धा 51 (-7), यवतमाळ 30 (-24)

देशातील प्रमुख ठिकाणचे सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः श्रीनगर -4.1, अमृतसर 0, चंदीगड 1.2, दार्जिलींग 2.8, सिमला 3.1, अंबाला 3.7, कोहिमा 3.9, रांची 4, सतना 4.3, नवी दिल्ली 4.8, मंगलुरु 22.3, चेन्नई 22.5, थिरुअनंतपुरम 23.8, पोर्ट ब्लेअर 26.6
----------------- 

Friday, December 26, 2014

कृषी विभागाला केंद्राचा १ कोटीचा पुरस्कार, कडधान्य उत्पादकतावाढ

केंद्राचा राज्य कृषी विभागाला
एक कोटी रुपयांचा पुरस्कार

कडधान्य उत्पादकतावाढीचा गौरव

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या आर्थिक वर्षात (2013-14) महाराष्ट्रात कडधान्य पिकांच्या उत्पादकतावाढीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्याच्या कृषी विभागाची केंद्र सरकारच्या "कमंडेशन ऍवार्ड' साठी निवड झाली आहे. एक कोटी रुपये व सन्मान असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांनी राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना पत्र पाठवून याबाबतची घोषणा केली आहे.

अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कडधान्य पिकांची उत्पादकता देशाच्या सरासरी कडधान्य उत्पादकतेपेक्षा कमी असलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कडधान्य अभियान राबविण्यात येत आहे. कडधान्य पिकांचे उत्पादन, उत्पादकता वाढविण्यासाठी प्रात्यक्षिके, निविष्ठा, तंत्रज्ञान प्रसार यासाठी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात योजना राबवली जाते. चांगली उत्पादकतावाढ करणाऱ्या राज्यांच्या कृषी विभागांना केंद्रामार्फत पुरस्कार देवून गौरविण्यात येते. कडधान्य पिकांच्या गटात महाराष्ट्राला हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

गेल्या खरीपात राज्यात 19 लाख 78 हजार हेक्‍टरवर कडधान्य पिकांची पेरणी झाली. त्यापासून हेक्‍टरी 730 किलोच्या सरासरी उत्पादकतेने राज्यात 14 लाख 43 हजार टन कडधान्य उत्पादन झाले. पाठोपाठ रब्बी हंगामात 19 लाख 42 हजार हेक्‍टरवर कडधान्य पिकांची पेरणी झाली. त्यात हेक्‍टरी 864 किलोच्या सरासरीने राज्यात 16 लाख 77 हजार टन कडधान्य उत्पादन झाले. एकूण वर्षात 39 लाख 20 हजार हेक्‍टरवर कडधान्य पिकांची पेरणी होवून 31 लाख 20 हजार टन कडधान्य उत्पादन झाले. या कामगिरीसाठी कृषी विभागाला हा पुरस्कार जाहिर झाल्याची माहिती कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी दिली.
--------------- 

द्राक्ष विमा भरपाई निश्चित

द्राक्ष उत्पादकांना मिळणार
अवेळी पावसाची भरपाई

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पावसाचा तडाखा; अनेक तालुके विमा भरपाईस पात्र

पुणे (प्रतिनिधी) ः चालू हंगामात द्राक्ष पिकासाठी हवामानाधारीत पिक विमा योजनेतून विमा संरक्षण मिळविणाऱ्या शेतकऱ्यांना अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी विमा भरपाई मिळणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. योजनेतील निकषांनुसार नुकसानग्रस्त मंडळांतील पावसाच्या प्रमाणानुसार भरपाईची रक्‍कम निश्‍चित करण्यात येणार आहे. जास्त पाऊस झालेल्या भागात भरपाईची रक्कम हेक्‍टरी एक लाख 10 हजार रुपयांपर्यंत निश्‍चित होणार आहे.

राज्य शासनामार्फत 10 सप्टेंबर 2014 ला द्राक्ष पिकासाठी हवामानाधारीत फळपिक विमा योजना लागू करण्यात आली. यातून द्राक्ष बागेला हेक्‍टरी दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी हेक्‍टरी नऊ हजार रुपये विमा हप्ता भरुन त्यात सहभाग घेतला आहे. अवेळी पावसाच्या विमा संरक्षणासाठी 16 ऑक्‍टोबर ते 7 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2014 ते 31 जानेवारी 2015 असे तिन टप्पे निश्‍चित करण्यात आलेले आहेत. किमान चार मिलीमिटर पाऊस नुकसान भरपाईसाठी पात्र असून या तिन कालखंडात त्यासाठी वेगवेगळी भरपाई रक्कम निश्‍चित करण्यात आलेली आहे. सर्वाधिक 51 मिलीमिटरहून अधिकच्या पावसासाठी नाशिक व नगर जिल्ह्यांसाठी या तिन टप्प्यात अनुक्रमे 15 हजार, 80 हजार व 30 हजार भरपाईची तरतूद आहे. इतर जिल्ह्यांमध्ये हीच भरपाई तिन कालखंडांसाठी अनुक्रमे 20 हजार, 90 हजार आणि 40 हजार अशी आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विविध कालखंडात वेगवेगळी भरपाई निश्‍चित आहे.

द्राक्ष विमा संरक्षण कालावधीचे पहिले दोन टप्पे आत्तापर्यंत पार पडले असून तिसरा टप्पा सध्या सुरु आहे. या पहिल्या दोन टप्प्यांच्या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी अवेळी पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसला आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने यातील विमा उतरविलेल्या बागा भरपाईस पात्र ठरणार आहेत. संबंधीत शेतकऱ्यांना पावसाच्या प्रमाणानुसार हवामान धोक्‍यासाठी आवश्‍यक असलेली विमा रक्कम मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे विभागिय अधिक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी दिली.

विमा संरक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबरमध्ये 14, 15, 16, 17, 18 व 19 तारखेला पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाचा विचार करता नगरमध्ये 42.2 मिलीमिटर, पारनेर 25.1, श्रीगोंदा 18.8, कर्जत 65, जामखेड 10.8, शेवगाव 57.5, पाथर्डी 36.8, नेवासा 30.4, राहूरी 62, संगमनेर 17.1, अकोले 12.8, कोपरगाव 53, श्रीरामपूर 56.7 तर राहाता तालुक्‍यात 28.3 मिलीमिटर पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्‍यात 10.1, मुळशी 20.3, भोर 34.8, मावळ 16.9, वेल्हे 35.8, जुन्नर 14.4, खेड 13.6, आंबेगाव 11.8, शिरुर 16.8, बारामती 12.6, इंदापूर 15.9, दौंड 21.1 तर पुरंदरमध्ये 13.3 मिलीमिटर पाऊस झाला. याच कालावधीत सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर 27.1, दक्षिण सोलापूर 11.4, बार्शी 29.4, अक्कलकोट 18, मोहोळ 14, माढा 32.8, करमाळा 17.4, पंढरपुर 10.3, सांगोला 21.3, माळशिरस 22.3 तर मंगळवेढा तालुक्‍यात 10.9 मिलीमिटर पाऊस झाला.

विमा संरक्षणाच्या सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या टप्प्यात 12, 13 व 14 डिसेंबरला पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यात कमी अधिक पाऊस पडला आहे. यामुळे द्राक्ष विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना दोन्ही कालावधीसाठीच्या भरपाईचा लाभ मिळणार असल्याची माहिती श्री. आवटे यांनी दिली.
---------(समाप्त)---------- 

"त्या' 18 डाळींब उत्पादकांना 6.25 लाख रुपये भरपाई

स्वयंचलित हवामान यंत्राचा घोळ; महसूल विभागाची नोंद अखेर ग्राह्य

पुणे (प्रतिनिधी) ः जोरदार पाऊस होऊनही "कंपनीच्या स्वयंचलित हवामान केंद्रातील पर्जन्य मापकात पावसाची नोंद नाही' या कारणाखाली इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने इंदापूरातील 18 शेतकऱ्यांना डाळींब विमा भरपाई नाकारली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर विभागिय अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आता कंपनीने ही भरपाई मान्य केली आहे. भरपाईचे 6.25 लाख रुपये खातेदारांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी नुकतिच स्टॅट बॅंक ऑफ इंडियाकडे जमा करण्यात आली आहे. निमगाव केतकी येथिल शेतकरी आबासाहेब हेगडे व साहेबराव मोहिते यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.

हवामानाधारीत फळपिक विमा योजनेतून (2013-14) निमगाव केतकी महसूल मंडळातील 18 शेतकऱ्यांनी डाळींब पिकासाठी 25 हेक्‍टर क्षेत्राचा विमा उतरवला होता. हेक्‍टरी एक लाख रुपये संरक्षणासाठी या शेतकऱ्यांनी हेक्‍टरी सहा हजार रुपये विमा हप्ता भरला होता. या योजनेतील निकषानुसार एक फेब्रुवारी 2014 ते 31 मार्च 2014 या कालावधीत प्रतिदिन 11 ते 20.99 मिलीमिटर दरम्यान पाऊस पडल्यास 15 हजार रुपये, 21 ते 30.99 मिलीमिटर दरम्यान पाऊस पडल्यास 25 हजार रुपये आणि 31 मिलीमिटरहून जास्त पाऊस पडल्यास प्रति हेक्‍टर 60 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार होती.

निमगाव केतकी मंडळात 10 मार्च 2014 रोजी 28 मिलीमिटर पाऊस पडला. महसूल विभागाच्या पर्जन्यमापकात याची नोंद झाली. मात्र विमा कंपनीच्या स्वयंचलित हवामान केंद्रातील पर्जन्यमापकात याची नोंद झाली नाही. यामुळे कंपनीने शेतकऱ्यांनी भरपाई देण्यास नकार दिला. याबाबत शेतकऱ्यांनी 10 सप्टेंबर 2014 रोजी विभागिय अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. निमगाव केतकी येथे सदर दिवशी 28 मिलीमिटर पाऊस पडल्याचे प्रमाणपत्र इंदापूरच्या तहसिलदारांनी दिल्यानंतर ही नोंद ग्राह्य धरुन कंपनीने शेतकऱ्यांनी भरपाई द्यावी, असा आदेश विभागिय अधिक्षक कृषी अधिक्षक विनयकुमार आवटे यांनी दिला.

कृषी विभागाच्या या आदेशानुसार विमा कंपनीने 18 शेतकऱ्यांनी प्रति हेक्‍टर 25 हजार रुपये याप्रमाणे 25 हेक्‍टर क्षेत्रासाठी सहा लाख 25 हजार रुपये भरपाई मंजूर करुन बॅंकेकडे जमा केली आहे. अवेळी पाऊस, अति उष्णता, अतिथंडी आदी आपत्तींमुळे फळपिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकर्यांना संरक्षण देण्यासाठी हवामान आधारीत फळपिक विमा योजना चांगली असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
-------------- 

Wednesday, December 24, 2014

कोकण कृषी विद्यापीठात माजी विद्यार्थी मेळावा

दापोली, जि. रत्नागिरी (प्रतिनिधी) ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथिल कृषी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात येत्या 10 व 11 जानेवारीला माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी महाविद्यालयात 1965 ते 1995 या कालावधीत नोंदणी करुन पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे. उपस्थिती निश्‍चिती व अधिक माहितीसाठी संपर्क - 9422534721, 9011566767
------------ 

Saturday, December 20, 2014

विदर्भात थंडी कायम

उर्वरित महाराष्ट्रात पारा सरासरीवर

पुणे (प्रतिनिधी) ः उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रमाणात अल्पशी घट झाल्याने विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा सरासरीच्या जवळपास आला आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील वाढलेली थंडी कमी होवून सर्वसाधारण पातळीवर आली आहे. विदर्भातील थंडीची लाट ओसरली असली तरी थंडीचा कडाका कायम आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात यवतमाळ येथे राज्यात सर्वात कमी 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

शनिवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची मोठी वाढ झाली. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात झालेली लक्षणिय घट कायम आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झालेली आहे. याउलट कोकण व गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे शनिवारी (ता. 20) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान व कंसात किमान तापमानात सरासरीहून झालेली घट अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 19.2 (1), अलिबाग 19.5 (1), रत्नागिरी 22.5 (3), पणजी 23.5 (3), डहाणू 17 (-1), भिरा 21.5 (4), पुणे 13.4 (2), नगर 9.8 (-1), जळगाव 10 (-2), कोल्हापूर 17.8 (3), महाबळेश्‍वर 13.6 (0), मालेगाव 10 (-1), नाशिक 10.4 (0), सांगली 16.5 (3), सातारा 14.5 (2), सोलापूर 13.8 (-1), उस्मानाबाद 10.3, औरंगाबाद 11 (0), परभणी 10.6 (-2), नांदेड 8 (-4), अकोला 9.4 (-5), अमरावती 12.4 (-3), बुलडाणा 10.6 (-3), ब्रम्हपुरी 10.4 (-2), चंद्रपूर 10, गोंदिया 8.2, नागपूर 8.5 (-3), वाशिम 12.8, वर्धा 9.5 (-5), यवतमाळ 7.8 (-7)
------------------ 

Friday, December 19, 2014

थंडीची लाट कायम , 19 डिसेंबर

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात उत्तरेकडून येणारे कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह कायम असल्याने राज्यातील थंडीची लाट व घटलेले किमान तापमानही कायम आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात विदर्भ व मराठवाड्यात थंडीची लाट कायम होती. राज्यात दिवसभर नगर येथे सर्वात कमी 6.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हीच परिस्थिती येत्या रविवारपर्यंत (ता.22) कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

हिमालयेतर भागांमध्ये मध्य प्रदेशमध्ये किमान तापमानात सर्वाधिक घट झालेली आहे. देशातील हिमालयेतर भागामध्ये खजुराहो येथे निचांकी 3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. याबाजूने विदर्भ, छत्तीसगडमध्ये थंड वारे दाखल होत आहेत. उत्तर महाराष्ट्रात थंड वार्यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे किमान तापमानात लक्षणिय घट झालेली आहे. उत्तरेकडून विदर्भ, मराठवाड्यापर्यंत कोरडे थंड वारे वाहत आहेत.

थंड वाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीहून लक्षणीय घट झाली. कोकण, गोवा व मराठवाड्याच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली. कोकण, गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. यादरम्यान अरबी समुद्राचा नैऋत्य भागात सक्रीय असलेला कमी दाबाचा पट्टा पश्‍चिमेकडे सरकला आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे शुक्रवार (ता.19) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान व कंसात किमान तापमानात सरासरीहून झालेली घट अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 18.6 (0), अलिबाग 17.1 (-1), रत्नागिरी 22.7 (3), डहाणू 16.4 (-2), भिरा 21.5, पुणे 9 (-2), नगर 6.5 (-4), जळगाव 8 (-4), कोल्हापूर 17 (2), महाबळेश्‍वर 12.4 (-2), मालेगाव 8.5 (-2), नाशिक 7.3 (-3), सांगली 15.7 (2), सातारा 11.4 (-2), सोलापूर 13.2 (-2), उस्मानाबाद 9.5, औरंगाबाद 8.8 (-2), परभणी 9.7 (-3), नांदेड 7.4 (-5), अकोला 7.7 (-5), अमरावती 11.2 (-4), बुलडाणा 9.5 (-6), ब्रम्हपुरी 10 (-2), चंद्रपूर 10.2, गोंदिया 6.6 (-6), नागपूर 6.6 (-5), वाशिम 13, वर्धा 8 (-5), यवतमाळ 8 (-7)
-------------- 

आंबा फळपिक विम्यासाठी उरले फक्त 10 दिवस

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील आंबा पिकाला हवामानाधारीत फळपिक विमा योजनेतून विमा संरक्षण मिळविण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2014 ही आहे. पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची तर इतर शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. यातून 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत विविध हवामान घटकांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हेक्‍टरी पाच हजार ते एक लाख रुपये भरपाई मिळणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे निकष आहेत.

अवेळी पाऊस व तापमान या हवामान धोक्‍यापासून निश्‍चित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास ठरलेल्या प्रमाणात विमा कंपन्यांमार्फत भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळे निकष व वेगवेगळे विमा हप्ते लागू करण्यात आले आहेत. आंबा पिकासाठी नगरमध्ये 75 हजार रुपयांचे विमा संरक्षण असून त्यासाठी शासकीय अनुदान वजा जाता शेतकऱ्यांना हेक्‍टरी चार हजार 500 रुपये विमा हप्ता भरावा लागेल. पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी एक लाख रुपयांचे विमा संरक्षण असून त्यासाठी अनुक्रमे सहा हजार रुपये व पाच हजार 750 रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांना बॅंकेत भरावा लागणार आहे. नगरसाठी टाटा एआयजी, पुण्यासाठी इफ्कोटोकियो तर सोलापूरसाठी एडीएफसी आर्गो ही कंपनी विमा सेवा देणार आहे.

या योजनेमध्ये पिकाला धोकादायक हवामानघटक व नुकसानभरपाईची रक्कम ही निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यांमध्ये नुकसानकारक हवामान घटकाचे प्रमाण भरपाईसाठी वेगवेगळे आहेत. अवेळी पावसाच्या लाभासाठीसंरक्षित कालावधीत किमान पाच मिलीमिटरहून अधिक पाऊस होणे बंधनकारक आहे. नगरमध्ये किमान 2 दिवस, पुण्यात 3 दिवस तर सोलापूरात 4 दिवस दररोज पाच मिलीमिटरहून अधिक पाऊस झाला तरच नुकसान भरपाईपात्र ठरणार आहे. कमी तापमानासाठी सलग तीन दिवस 9 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी तापमान, जास्त तापमानासाठी (टप्पा अ) सलग तीन दिवस 39 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान तर जास्त तापमानासाठी (टप्पा ब) 43 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान सलग तीन दिवस असेल तर होणारे नुकसान भरपाईपात्र असेल. अधिकाधिक आंबा उत्पादकांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुण्याचे विभागिय अधिक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी केले आहे.

*चौकट
- अशी आहे विमा संरक्षण
हवामान धोका --- संरक्षण कालावधी --- भरपाईची जास्तीत जास्त रक्कम (रुपये)
अवेळी पाऊस --- 1 जानेवारी ते 31 मे --- 30 हजार
कमी तापमान --- 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी --- 30 हजार
जास्त तापमान --- 1 मार्च ते 31 मार्च --- 25 हजार
जास्त तापमान --- 1 एप्रिल ते 31 मे --- 15 हजार
------------------ 

Thursday, December 18, 2014

मराठवाडा, विदर्भात थंडीची लाट

मध्य महाराष्ट्रातही थंडीचा कडाका कायम

पुणे (प्रतिनिधी) ः विदर्भापाठोपाठ मराठवाड्यात थंडीची लाट दाखल झाली असून मध्य महाराष्ट्रातही किमान तापमानात लक्षणिय घट होवून थंडीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी पहाटे यवतमाळ येथे राज्यातील निचांकी 6.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. कोकणेतर महाराष्ट्रात वाढलेली ही थंडी व थंडीची लाट किमान येत्या शनिवारपर्यंत (ता.20) कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात परभणी, बुलडाणा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आदी ठिकाणी थंडीच्या लाटेची नोंद झाली. यवतमाळमध्ये किमान तापमानात सरासरीहून राज्यात सर्वाधिक तब्बल 9 अंश सेल्सिअसने घट झाली. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीहून लक्षणिय घट झाली. कोकण गोव्याच्या काही भागात व मराठवाड्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात सरासरीहून किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात राज्यात कमाल तापमान 24 ते 32 अंश सेल्सिअसदरम्यान होते. अनेक ठिकाणी कमाल तापमानातील घट सरासरीहून पाच ते सात अंशांनी अधिक आहे. कमाल तापमानातील या घसरणीमुळे अनेक ठिकाणी दिवसाही थंडी अनुभवास येत आहे. राज्यात सर्वत्र हवामान कोरडे होते. अरबी समुद्राचा नैऋत्य भाग व आरपासच्या भागावरील कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणचे किमान तापमान व कंसात किमान तापमानात सरासरीहून झालेली घट अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 19.2 (-1), अलिबाग 16.5 (-1), रत्नागिरी 19.1 (-1), पणजी 21.8 (-1), डहाणू 16.4 (-2), भिरा 18.5 (-2), हर्णे 17 (-6) पुणे 9.1 (-4), नगर 8.1 (-3), जळगाव 8.4 (-4), कोल्हापूर 15 (0), महाबळेश्‍वर 10.6, मालेगाव 8.5, नाशिक 7, सांगली 13.6, सातारा 11.9, सोलापूर 11.9, उस्मानाबाद 8.4, औरंगाबाद 9.8, परभणी 8 (-5), नादेड 10, अकोला 7.5 (-6), अमरावती 11.2 (-4), बुलडाणा 9.2 (-5.5), ब्रम्हपुरी 9.9 (-2), चंद्रपूर 10.2 (-2.5), गोंदिया 6.8 (-5.5), वाशिम 12, वर्धा 8.8 (-5), यवतमाळ 6.2 (-9)
------------------------- 

उमेद बांधूया... डाॅ. सदानंद मोरे

कर्मयोगी व्हा, हे दिवसही जातील !
----------
डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन
-----------
तत्वज्ञान सांगणे हे विचारवंताचे काम मानले जाते. पण तत्वज्ञानाचे आचरण करणे अशा पंडितांना जमेलच असे नाही. भगवदगितेत कृष्णाने कर्मयोग तत्वज्ञान सांगितले आहे. महाभारतात अनेक ठिकाणी त्याचा विस्ताराने उल्लेख आला आहे. त्यात गुढवाद वा श्रद्धा नाही तर ते पुर्णपणे बुद्धीवादी तत्वज्ञान आहे. कर्म करणे आपल्या हाती आहे. कर्माचे फळ आपल्या हाती नाही. कर्माचे फळ होण्यासाठी आणखी घटक लागतात. त्यावर आपले नियंत्रण नसते.

महाभारतात कृष्णाने कर्मयोग स्पष्ट करताना शेतकऱ्याचेच उदाहरण दिले आहे. शेतकरी जमीनीची मशागत करतो. चांगले बियाणे, चांगले खत वापरतो. मेहनत करतो. आवश्‍यक ते सर्व काही बरोबर करतो. पण एखाद्या वर्षी पाऊस पडत नाही. पिक येत नाही. मोठे नुकसान होते. पण अशा स्थितीतही शेतकरी हताश होत नाही. तो पुन्हा पेरणी करतो. शेतकरी हा स्वभावतःच कर्मयोगी आहे, असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. शेती हा व्यवसायच असा आहे की यश आपल्या हातात नाही. सर्व काही निसर्गावर अवलंबून आहे.

शेतकरी हा जन्मतः स्वभावतः कर्मयोगी आहे. कर्म करत राहून फळाची अपेक्षा करू नये. एखाद्या कर्माचे फळ मिळण्यासाठी अनेक घटकांचा समावेश असतो. एखाद्या वेळी अपेक्षेप्रमाणे काही मिळणार नाही, हे देखील गृहीत धरले पाहिजे. सर्वच काही आपल्या हातात नसते. दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांची मनोवृत्ती तयार केली पाहिजे. पुढाऱ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचे राजकीय भांडवल करणे योग्य नाही.

पावसाची अनिश्‍चितता ही अनादी काळापासून आहे. नापिकी किंवा दुष्काळ हा काही नवीन नाही, याची जाणीव ठेवावी. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्वेग करू नये. निराश न होता परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत. आपली शेती पावसावर अवलंबून आहे. कधी अपुरा पाऊस पडतो, तर कधी पडतच नाही. जेथे पाऊस पडतो तेथे पाणी वाहून जाते. 15 व्या शतकामध्ये दुर्गा देवीचा भीषण दुष्काळ आला होता. संत तुकाराम महाराज यांच्या काळातही दुष्काळ पडला होता.

दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान
स्त्री एक अन्न अन्न करीता मेली
या शब्दात तुकोबांनी भोगलेल्या दुष्काळातील कर्मयोग दाखवला आहे. दुष्काळ कुणाला चुकला नाही. तुकोबांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावे. शेतकरी हा मुळतःच झुंजार असतो. निसर्गाशी लढण्याची ताकद अंगी असते. संकटाच्या काळात खचुन न जाता, वाईट विचार न करता श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगाचे आचरण करत ठामपणे उभे ठाकले पाहिजे. या अचडणीच्या काळावरही मात करता येईल. हे दिवसही जातील.
-----------
शब्दांकन ः संतोष डुकरे
----------- 

Saturday, December 6, 2014

व्हर्जिन सिड्‌स कंपनीवर फौजदारी कारवाईचे आदेश

2012 चे बोगस बियाणे प्रकरण; भरपाई वसुलीसाठी कारवाई

पुणे (प्रतिनिधी) ः यवतमाळ जिल्ह्यातील 91 शेतकऱ्यांना दोषयुक्त बीटी कापूस बियाण्यामुळे झालेल्या नुकसानीपोटी 13 लाख 89 582 रुपयांची भरपाई न दिल्याबद्दल औरंगाबादमधील व्हर्जिन सिड्‌स प्रा. ली. या बियाणे कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकांनी यवतमाळच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले दिले आहे. गेल्या 20 दिवसापासून कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत यवतमाळ कृषी विभागामार्फत चाचपणी सुरु आहे. मात्र अद्याप कंपनीवर गुन्हा दाखल झालेला नाही.

दोन वर्षांपूर्वी 2012 च्या खरीपात यवतमाळ जिल्ह्यातील 91 शेतकर्यांनी व्हर्जिन सिड्‌सच्या बीजी 2 कापूस वाणाबाबत कृषी विभागाकडे तक्रारी नोंदविल्या होत्या. हा वाण बोंडअळी, पांढरी माशी आदी किडींना मोठ्या प्रमाणात बळी पडल्याची शेतकऱ्यांची तक्रार होती. बीटीच्या नावाखाली नॉन बिटी बियाणे देवून कंपनीने फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप होता. यानुसार कृषी विभागामार्फत या प्रकरणी पंचनामे होवून प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात आले. यात बियाणे दोषी असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकांकडे झालेल्या सुनावणीत संचालकांनी कॉटन सिड ऍक्‍टमधील तरतुदीनुसार कंपनीला या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश दोन मार्च 2013 ला दिला. मात्र यानंतर अद्यापपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई दिलेली नाही.कॉटन सिड ऍक्‍टमधील तरतूद व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आता संचालकांनी या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

- शेतकऱ्यांची कागदपत्रे ठरली महत्वाची
या प्रकरणात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीच्या पावत्या, पिक पेरणीची नोंद झालेला सात बारा, तक्रार अर्जाची पोच, उत्पादनासाठी प्रत्यक्षात झालेला खर्च, नुकसानीचे स्वरुप व तिव्रता याबाबतची वस्तुनिष्ठ माहिती, चौकशी अहवाल, कृषी विज्ञान केंद्राचा अहवाल, पाठपुराव्याची पत्रे आदी कागदपत्रे सादर करण्यात आली होती. यामुळे जागरुक शेतकऱ्यांच्या तक्रारीस पुराव्यांचे पाठबळही मिळाले. याशिवाय चौकशीचे अहवाल, प्रयोगशाळेचे तपासणी अहवाल वेळेत मिळण्यासाठी सुशिल ठोकळ व इतर शेतकऱ्यांनी विशेष पाठपुरावा केला होता.

*चौकट
... तर कृषी विभागाने द्यावी भरपाई
""बियाणे दोषी असल्याचे सिद्ध करण्यासाठी तालुका कृषी विभागापासून सर्वच पातळ्यांवर प्रचंड झगडावे लागले. दारव्हा, यवतमाळ, पुणे जाण्या-येण्यासाठी फार पैसा, वेळ खर्च झाला. आर्थिक मनस्ताप सोसावा लागला. शेतकऱ्यांना दोषी बियाणे मिळू नये, फसवणूक होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यामुळे आता कंपनीकडून भरपाई वसुल होत नसेल तर कृषी विभागाने आम्हाला भरपाई द्यावी.''
- सुशिल शिवशंकर ठोकळ, रा. चाणी, ता. दारव्हा, जि. यवतमाळ
----------------------------- 

Thursday, December 4, 2014

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यास केंद्र सरकार अनुकूल



पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर; काही अटींवर मिळणार मंजूरी

*कोट
""बैलगाडंयाच्या शर्यती हा पारंपरिक वारसा असलेला खेळ आहे. या खेळात प्राण्यांवर क्रौर्य होता कामा नये या अटीवर परवानगी देण्याचा विचार शासन करीत आहे.''
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री

नवी दिल्ली (प्रतिनिधी) ः सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी केंद्र शासनामार्फत काही अटींवर उठविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. नागपंचमी या सणामध्ये नागांची होणारी छळवणूकी संदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही जावडेकर यांनी सांगितले.
गेल्या आठ महिन्यांपासून विविध संस्था, संघटना व राजकीय नेतृत्वामार्फत बैलगाडा शर्यतींवर बंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 11 जुलै 2011 रोजी बैलांच्या प्रदर्शन व प्रशिक्षणावर बंदी घालण्यात आली. यानंतर ऑगस्ट 2011 मध्ये महाराष्ट्र सरकारने बैलांच्या शर्यती, खेळ, प्रदर्शने व प्रशिक्षणावर बंदी घातली. यानंतर राज्य शासनाने परित्रक काढून ही बंदी वळू किंवा सांड यांच्यापुरतीच मर्यादीत असल्याचा खुलासा केला. याप्रकरणी बराच गदारोळ होवून प्राणीमित्रांमार्फत उच्च न्यायालयात दावा दाखल झाला. उच्च न्यायालयाने मार्च 2012 मध्ये बैलांच्या शर्यती थांबविण्याचे आदेश दिले. राज्य शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली. दरम्यान या निर्णयाच्या पुर्नविचाराची याचिका उच्च न्यायालयात फेटाळण्यात आली.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खेड तालुका चालक-मालक संघ व प्रभाकर सपाते आदींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शर्यतींची मार्गदर्शक तत्वे निश्‍चित करुन 15 फेब्रुवारी 2013 ला विशिष्ट अटींवर शर्यतींना मान्यता देण्यात आली. यानंतर जानेवारी 2014 मध्ये या अटींचे उल्लंघन होत असल्याबाबत गार्गी गोगई यांची सर्वोच्च न्यायालयात बंदीसाठी याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने 7 मे 2014 च्या निर्णयाने बैलांच्या शर्यती, झुंजी, खेळ यावर बंदी घातली. साहसी खेळांमध्ये बैलांच्या वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव फेटाळत तमिळनाडू सरकारची याबाबतची अधिसूचनाही सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली. गेल्या आठ महिन्यांपासून देशात ही बंदी लागू आहे.
-------------- 

हवामान कोरडे, तापमान स्थिर

पुणे (प्रतिनिधी) ः गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे 10.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शनिवारी सकाळपर्यंत राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून तापमानात फारसा बदल होण्याची शक्‍यता नाही.

गुरुवारी (ता.4) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 19.6, अलिबाग 20.6, रत्नागिरी 19.4, पणजी 19.3, डहाणू 20.2, भिरा 17.5, पुणे 13.3, नगर 12.5, जळगाव 11.3, कोल्हापूर 19, महाबळेश्‍वर 15, मालेगाव 13.5, नाशिक 12.1, सांगली 16, सातारा 14.1, सोलापूर 14.8, उस्मानाबाद 13.4, औरंगाबाद 14.2, परभणी 14.1, नांदेड 11.5, अकोला 12.6, अमरावती 15.4, बुलडाणा 14.6, ब्रम्हपुरी 13.9, चंद्रपूर 14, गोंदिया 10.4, नागपूर 11.6, वाशिम 16.8, वर्धा 13.2, यवतमाळ 11.6
------- 

डाॅ. गलांडे, डाॅ. खरबडे पुरस्कार

डॉ. गलांडे, डॉ. खरवडे यांना
जागतिक विविधता कॉग्रेसमध्ये पुरस्कार

पुणे ः येथिल कृषी महाविद्यालयातील डॉ. शरद गलांडे व डॉ. साताप्पा खरबडे यांना श्रीलंकेतील कोलोंबो येथे झालेल्या जागतिक विविधता कॉग्रेसमध्ये नुकतेच उत्कृष्ट पेपर वाचन पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यांनी लोकरी मावा नियंत्रणासाठी मित्र क्‍किटकाचे तंत्र व संवर्धन या विषयावर संशोधन पेपर सादर केला.

डॉ. खरवडे यांनी या कॉग्रेसमध्ये मित्र किटकांच्या शाश्‍वत संवर्धनासाठी स्थानिक कौशल्याचा वापर या चर्चासत्राचे अध्यक्षपद भुषविले. तर डॉ. गलांडे यांनी जागतिक विविधता व व्यापार या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भुषविले. कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांचे या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु, प्राध्यपक आदींमार्फत अभिनंदन करण्यात आले आहे.
--------
फोटोओळ ः
कोलोंबो, श्रीलंका ः जागतिक जैवविविधता कॉग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अनिता एम. यांच्या हस्ते डॉ. गलांडे व डॉ. खरबडे यांनी उत्कृष्ट पेपर वाचनाचा पुरस्कार स्विकारला.

कृषी प्रथम सत्र परिक्षा पुढे ढकलल्या...

कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या
प्रथम सत्र परिक्षा पुढे ढकलल्या

पुणे (प्रतिनिधी)ः महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील संगल्न व खासगी कृषी महाविद्यालयांच्या विविध विद्याशाखांच्या प्रथम सत्राच्या परिक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. यानुसार 15 व 16 डिसेंबरला होणारी लेखी परिक्षा अनुक्रमे 18 व 19 डिसेंबरला तर 18 ते 30 डिसेंबरला होणारी प्रात्यक्षिक परिक्षा 20 ते 31 डिसेंबर 2014 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कृषी उद्योग, व्यवसायातील जागतिक संधी या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे प्रथम सत्र परिक्षांच्या वेळापत्रकात हे बदल करण्यात आल्याची माहिती परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी दिली.
----------- 

Wednesday, December 3, 2014

तुरळक ठिकाणी तापमानात घट

राज्यभर कोरडे हवामान
पुणे (प्रतिनिधी) ः हवामान खात्याने शुक्रवारी (ता.5) सकाळपर्यंत किमान तापमानात फारसा बदल न होण्याचा व सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकण व गोव्याच्याकाही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट तर मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरसरीहून किंचित घट झाली. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नांदेड येथे 11 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

बुधवारी (ता.3) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 20, अलिबाग 20.5, रत्नागिरी 19.1, पणजी 20.6, डहाणू 20.2, पुणे 12.9, नगर 12.5, जळगाव 12.6, कोल्हापूर 17.6, महाबळेश्‍वर 15, मालेगाव 15.2, नाशिक 12.8, सांगली 15.5, सातारा 12.8, सोलापूर 14.5, उस्मानाबाद 13.8, औरंगाबाद 15.4, परभणी 14.7, नांदेड 11, बीड 14.2, अकोला 15, अमरावती 15.2, बुलडाणा 16.4, ब्रम्हपुरी 13.8, नागपूर 11.6, वाशिम 17.2, वर्धा 14, यवतमाळ 13.6
-------------- 

राज्यातील 35 लाख कोरडवाहू शेतकरी संकटात

निम्मा रब्बी नापेर; धान्य चारा टंचाईचा धोका

पुणे (प्रतिनिधी) ः दुष्काळग्रस्त भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांची अन्नसुरक्षा व जनावरांची चारासुरक्षा या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असलेला यंदाचा रब्बी हंगाम तब्बल निम्म्याने नापेर राहील्याने सुमारे 35 लाखाहून अधिक शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याची स्थिती आहे. सर्व रब्बी पिकांच्या पेरणीचा कालावधी आठ-पंधरा दिवसांपूर्वीच संपली आहे. त्यात आता गेल्या पंधरा दिवसात राज्यात कोठेही पाऊस झालेला नसल्याने ओलही उपलब्ध नाही. यामुळे तुरळक ठिकाणचे बागाईत वगळता तब्बल 30 ते 35 लाख हेक्‍टर रब्बी क्षेत्र नापेर व उत्पादनाच्या दृष्टीने खाटे राहणार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अन्नधान्य उत्पादन व जनावरांसाठी चारा या दोन्ही दृष्टीने रब्बी हंगाम महत्वाचा समजला जातो. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने यंदा बहुसंख्य शेतकऱ्यांना पुरेसा चारा साठवता आलेला नाही. त्यात आता रब्बीही नापेर व अनुत्पादक चालल्याने शेतकर्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. रब्बी पूर्णतः हातचा जाणार हे लक्षात आल्यानंतर आता संपूर्ण रब्बी पट्ट्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी जनावरांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, हे विशेष.

कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी या वेळेपर्यंत राज्यात 42 लाख हेक्‍टरहून अधिक पेरण्या झाल्या होत्या. यंदा फक्त 28 लाख 71 हजार हेक्‍टरवर पेरण्या झालेल्या आहेत. यातही तृणधान्य व कडधान्य पिकांचे क्षेत्र निम्म्याने तर तेलबिया पिकांचे क्षेत्र सद्यस्थितीत तब्बल 86 टक्‍क्‍यांनी घटलेले आहे. तृणधान्याचे 20 लाख 32 हजार हेक्‍टर, कडधान्याची सात लाख 76 हजार हेक्‍टर तर तेलबिया पिकांची फक्त 62 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होऊ शकली आहे. सुर्यफुल पिकाची अवघे सहा टक्के, करडईची 15 टक्के तर गव्हाची 25 टक्के पेरणी झाली आहे. उगवण झालेली पिकेही पाण्याच्या ताणामुळे संकटात आहेत.

रब्बीला सर्वाधिक फटका पुणे विभागात बसलेला आहे. सरासरी 22 लाख हेक्‍टरपैकी एवघ्या 10 लाख हेक्‍टरवर पेरण्या झाल्या असून तब्बल 12 लाख हेक्‍टर क्षेत्र या विभागात नापेर आहे. पुणे जिल्ह्यात फक्त 25 टक्के रब्बी पेरण्या होऊ शकल्या आहेत. याशिवाय नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, वर्धा या जिल्ह्यांत रब्बीला मोठा फटका आहे. उर्वरीत जिल्ह्यांमध्येही जेमतेम क्षेत्रावर पेरण्या होऊ शकल्या आहेत. नगर जिल्ह्यात सर्वाधिक चार लाख 35 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तर कोकणात अद्याप रब्बी पेरण्या होवू शकलेल्या नाहीत. कोकण वगळता उर्वरीत भागात रब्बी पेरण्या अद्यापही सुरु असल्याचे आयुक्तालयाने म्हटले आहे.

जिल्हानिहाय रब्बी पेरणी हेक्‍टरमध्ये व कंसात पेरणीची सरासरीच्या तुलनेत टक्केवारी ः नाशिक 33300 (25), धुळे 20800 (34), नंदुरबार 29300 (42), जळगाव 66500 (44), नगर 435300 (55), पुणे 147300 (25), सोलापूर 475300 (57), सातारा 158800 (73), सांगली 210100 (84), कोल्हापूर 10100 (25), औरंगाबाद 79100 (30), जालना 114500 (53), बीड 215500 (57), लातूर 117600 (63), उस्मानाबाद 175600 (39), नांदेड 52300 (41), परभणी 67700 (21), हिंगोली 12900 (10), बुलडाणा 93800 (62), अकोला 43000 (37), वाशिम 47700 (53), अमरावती 64400 (44), यवतमाळ 42000 (48), वर्धा 9300 (17), नागपूर 52900 (37), भंडारा 19400 (48), गोंदिया 19700 (74), चंद्रपूर 38600 (32), गडचिरोली 18900 (73)

- पिकनिहाय रब्बी पेरणी (1 डिसेंबरपर्यंत)
पिक --- पेरणी (हेक्‍टर) --- सरासरीच्या तुलनेत टक्केवारी
ज्वारी --- 16,08,800 --- 52
गहू --- 2,96,700 --- 25
हरभरा --- 7,22,900 --- 55
मका --- 1,22,200 --- 123
करडई --- 31,700 --- 15
जवस --- 13,800 --- 28
सुर्यफुल --- 10,700 --- 6
तीळ --- 600 --- 17
------------------------