Tuesday, December 30, 2014

उमेद वाढूया ... साहेबराव वाघ, धुळे

हे दिवसही जातील...
------------
गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांना निसर्गाचा कमी पाऊस, जास्त पाऊस, वारा, गारपीट याचा मोठा मार बसला. शेतीचे उत्पादन अत्यंत अल्प झाले. शेतीत भांडवल ओतले तर पिके चांगले येतात. यासाठी शेतकरी बॅंकांकडे हेलपाटे घालून कर्ज घेतात, शेतीत खर्च करतात. उत्पादन न आल्याने सर्व आर्थिक गणित कोलमडते. गेल्या तीन वर्षात निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे.

संकटे येतात, परंतु ती कायमस्वरुपी राहत नाही. "हे दिवसही जातील' हे लक्षात घेतले पाहीजे. एका शेतकऱ्याला दोन मुले होती. त्यांचे वाटणीचे वेळी एक सोन्याची अंगठी होती. तिच्यावर हे दिवसही जातील असे लिहले होते. दुसरा हिस्सा दुप्पट पैशाचा होता. थोरल्या मुलाने दुप्पट पैसे घेतले आणि लहान मुलाने सोन्याची अंगठी घेतली. पुढे संकटे आली. थोरल्याने संकटातून वाचण्यासाठी पैसे संपवले. लहान भावावरही संकटे आली. परंतु त्याच्याकडे असलेल्या अंगठीवरील धिराच्या संदेशाने त्याला हुरुप आला. तो डगमगला नाही. वडीलांच्या संदेशाचा अर्थ त्याला पूर्ण समजला. संकटातही संधी शोधत तग धरुन राहीला. संकटाचे दिवस कायम स्वरुपी नसतात. रात्रीनंतर दिवस येतोच.

जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुच शोधून पाही या समर्थांच्या वचनाचे मनन झाले पाहिजे. सर्व सुखी असा कोणीही नाही. धाडस माणसाचे अंगी असावयास पाहिजे. संयम आणि सहनशिलता सोडू नये. शेतकऱ्यांनी विवेकपूर्ण वागणे अगत्याचे आहे. आत्महत्या हा संकटावर मात करण्याचा मार्ग किंवा उपाय नाही. उलट त्यामुळे उर्वरीत सर्व कुटुंबच संकटांच्या मालिकेत सापडते. संकटे कोणावर आली नाहीत. ती सर्वांवर येतात. त्यातून जिद्दीने मार्ग काढण्यातच पुरुषार्थ आहे. भ्याडपणे आणि अविचाराने वागले तर नुकसान आपल्याच कुटुंबाचे होते. तरुणपणी अवघ्या 30 ते 50 वयात अघोरी कृत्य करुन शरीर नष्ट करणे हा नैतिक गुन्हा आहे. आपल्याला जगण्याचा अधिकार आहे, मरणाचा नाही. विचारपुर्वक निर्णय घेवून ठामपणे, शुर योद्‌ध्याप्रमाणे संकटाशी मुकाबला करण्यातच धन्यता व आदर्शपणा आहे.

वाईट दिवस किंवा संकटे नेहमीच येतात असे नाही. दर दोन तीन वर्षांनी यामध्ये बदल होत असतो. आपला थोरपुरुषांचा वारसा आहे. सर्वांनी संकटाशी दोन हात करुन त्यावर विजय मिळवलेला आहे. म्हणून "हे दिवसही जातील' यावर विश्‍वास ठेवून आत्मघाताचे कृत्य करु नका. संकटाला घाबरुन आत्महत्या करणे हे पाप आहे. आपल्यानंतर कुटुंबातील आई, बाप, बायको, मुले यांनी कसे जगावे. घरातील कर्ता पुरुषाने याचा विचार करण्याची आता गरज आहे. आपण असे अघोरी, आत्मघातकी, चुकीचे पाऊल उचलू नका. "बचेंगे तो और भी लढेंगे' याचा विसर पडू देऊ नका. धाडसाने, जिद्दीने, संयमाने वागुन एकमेकांच्या सहकार्याने आलेल्या नैसर्गिक संकटाशी मुकाबला करावयास पाहिजे.
------------
साहेबराव वाघ, प्रगतशील शेतकरी, कापडणे, ता. जि. धुळे
9767571826
------------ 

No comments:

Post a Comment