Friday, December 26, 2014

द्राक्ष विमा भरपाई निश्चित

द्राक्ष उत्पादकांना मिळणार
अवेळी पावसाची भरपाई

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पावसाचा तडाखा; अनेक तालुके विमा भरपाईस पात्र

पुणे (प्रतिनिधी) ः चालू हंगामात द्राक्ष पिकासाठी हवामानाधारीत पिक विमा योजनेतून विमा संरक्षण मिळविणाऱ्या शेतकऱ्यांना अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी विमा भरपाई मिळणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. योजनेतील निकषांनुसार नुकसानग्रस्त मंडळांतील पावसाच्या प्रमाणानुसार भरपाईची रक्‍कम निश्‍चित करण्यात येणार आहे. जास्त पाऊस झालेल्या भागात भरपाईची रक्कम हेक्‍टरी एक लाख 10 हजार रुपयांपर्यंत निश्‍चित होणार आहे.

राज्य शासनामार्फत 10 सप्टेंबर 2014 ला द्राक्ष पिकासाठी हवामानाधारीत फळपिक विमा योजना लागू करण्यात आली. यातून द्राक्ष बागेला हेक्‍टरी दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी हेक्‍टरी नऊ हजार रुपये विमा हप्ता भरुन त्यात सहभाग घेतला आहे. अवेळी पावसाच्या विमा संरक्षणासाठी 16 ऑक्‍टोबर ते 7 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2014 ते 31 जानेवारी 2015 असे तिन टप्पे निश्‍चित करण्यात आलेले आहेत. किमान चार मिलीमिटर पाऊस नुकसान भरपाईसाठी पात्र असून या तिन कालखंडात त्यासाठी वेगवेगळी भरपाई रक्कम निश्‍चित करण्यात आलेली आहे. सर्वाधिक 51 मिलीमिटरहून अधिकच्या पावसासाठी नाशिक व नगर जिल्ह्यांसाठी या तिन टप्प्यात अनुक्रमे 15 हजार, 80 हजार व 30 हजार भरपाईची तरतूद आहे. इतर जिल्ह्यांमध्ये हीच भरपाई तिन कालखंडांसाठी अनुक्रमे 20 हजार, 90 हजार आणि 40 हजार अशी आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विविध कालखंडात वेगवेगळी भरपाई निश्‍चित आहे.

द्राक्ष विमा संरक्षण कालावधीचे पहिले दोन टप्पे आत्तापर्यंत पार पडले असून तिसरा टप्पा सध्या सुरु आहे. या पहिल्या दोन टप्प्यांच्या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी अवेळी पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसला आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने यातील विमा उतरविलेल्या बागा भरपाईस पात्र ठरणार आहेत. संबंधीत शेतकऱ्यांना पावसाच्या प्रमाणानुसार हवामान धोक्‍यासाठी आवश्‍यक असलेली विमा रक्कम मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे विभागिय अधिक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी दिली.

विमा संरक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबरमध्ये 14, 15, 16, 17, 18 व 19 तारखेला पाऊस झाला. नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाचा विचार करता नगरमध्ये 42.2 मिलीमिटर, पारनेर 25.1, श्रीगोंदा 18.8, कर्जत 65, जामखेड 10.8, शेवगाव 57.5, पाथर्डी 36.8, नेवासा 30.4, राहूरी 62, संगमनेर 17.1, अकोले 12.8, कोपरगाव 53, श्रीरामपूर 56.7 तर राहाता तालुक्‍यात 28.3 मिलीमिटर पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्‍यात 10.1, मुळशी 20.3, भोर 34.8, मावळ 16.9, वेल्हे 35.8, जुन्नर 14.4, खेड 13.6, आंबेगाव 11.8, शिरुर 16.8, बारामती 12.6, इंदापूर 15.9, दौंड 21.1 तर पुरंदरमध्ये 13.3 मिलीमिटर पाऊस झाला. याच कालावधीत सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर 27.1, दक्षिण सोलापूर 11.4, बार्शी 29.4, अक्कलकोट 18, मोहोळ 14, माढा 32.8, करमाळा 17.4, पंढरपुर 10.3, सांगोला 21.3, माळशिरस 22.3 तर मंगळवेढा तालुक्‍यात 10.9 मिलीमिटर पाऊस झाला.

विमा संरक्षणाच्या सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या टप्प्यात 12, 13 व 14 डिसेंबरला पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यात कमी अधिक पाऊस पडला आहे. यामुळे द्राक्ष विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना दोन्ही कालावधीसाठीच्या भरपाईचा लाभ मिळणार असल्याची माहिती श्री. आवटे यांनी दिली.
---------(समाप्त)---------- 

No comments:

Post a Comment